Posts

अमृतवर्षा २६

(आपल्या व्यक्तित्वामधील विभिन्न घटकांमध्ये ऐक्य, एकजिनसीपणा कसा निर्माण करावा, हे श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

संकल्प दृढ ठेवा. आज्ञापालन न करणाऱ्या मुलांना ज्याप्रमाणे योग्य वळण लावले जाते त्याप्रमाणे, तुमच्यातील अडेलतट्टू, हट्टी भागांना वळण लावा. त्यांच्यावर सातत्यपूर्वक, सहनशीलतेने काम करा. त्यांच्या चुका त्यांना समजावून सांगा.

तुमच्या चेतनेच्या आत खोलवर चैत्य पुरुष (Psychic being) असतो. हा चैत्य पुरुष म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’चे मंदिर असते. या केंद्राभोवती तुमच्यातील विभिन्न असणाऱ्या सर्व भागांचे, तुमच्या अस्तित्वातील सगळ्या परस्परविरोधी हालचालींचे एकीकरण झाले पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या चैत्य पुरुषाची चेतना व त्याची अभीप्सा प्राप्त झाली की, सगळ्या शंका, अडचणी नाहीशा होऊ शकतात. त्याला कमी-अधिक वेळ लागेल, परंतु अंतिमत: तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित!

एकदा जरी तुम्ही ‘ईश्वरा’कडे वळला असाल आणि म्हणाला असाल की, “मला तुझे होऊन राहायचे आहे”, आणि तो जर “हो” म्हणाला असेल, तर हे अखिल जग सुद्धा तुम्हाला त्यापासून रोखू शकणार नाही. अंतरात्मा (Inner being) जेव्हा स्वत:चे समर्पण करतो तेव्हा मुख्य अडचणच नाहीशी होते.

बाह्य अस्तित्व हे केवळ एखाद्या कवचाप्रमाणे असते. सामान्य व्यक्तींमध्ये हे कवच इतके टणक आणि जाड असते की, त्यामुळे त्यांना त्यांच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’ची यत्किंचितही जाणीव नसते. (परंतु) एकदा, अगदी एका क्षणासाठी जरी, अंतरात्मा म्हणला असेल, “मी इथे आहे आणि मी तुझाच आहे” तर जणू एक प्रकारचा सेतू निर्माण होतो आणि मग ते बाह्य कवच हळूहळू पातळ होत जाते. जोपर्यंत अंतरंग व बहिरंग भाग पूर्णपणे जोडले जाऊन, एकत्व पावत नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते.

– श्रीमाताजी [CWM 03 : 07]

अमृतवर्षा २४

(प्राणतत्त्वाच्या असहकारामुळे, कित्येक वर्षांची मेहनत मातीमोल कशी ठरू शकते यासंबंधी धोक्याचा इशारा दिल्यानंतर श्रीमाताजी आता एक दिलासा देत आहेत.)

भाग ०३

स्वत:मध्ये असलेली अभीप्सेची ज्योत आणि ध्येयप्राप्तीसाठी लागणारी चेतना जीवित ठेवण्याइतपत ज्यांनी आपल्या चैत्यपुरुषाशी (Psychic being) पुरेसा संपर्क प्रस्थापित केलेला असतो त्या लोकांच्या बाबतीत (प्राणाच्या हटवादीपणामुळे येणारा) असा कसोटीचा काळ फार टिकत नाही. आणि त्यापासून त्यांना फारसा धोकाही पोहोचत नाही.

(चैत्यपुरुषाशी संपर्क प्रस्थापित झालेल्या) अशा व्यक्ती, एखाद्या बंडखोर मुलाला एखादी व्यक्ती जशी हाताळते त्याप्रमाणे, या चेतनेच्या साहाय्याने, धीराने व चिकाटीने सत्य व प्रकाश दाखवून देऊन, पटवून देण्याचा प्रयत्न करत, आपल्या प्राणाला हाताळू शकतात आणि क्षणभरासाठी झाकोळला गेलेला सद्भाव परत मिळवू शकतात.

आणि आता हा अखेरचा दिलासा : जे कोणी खरोखर प्रामाणिक आहेत, जे खरोखर सद्प्रवृत्त आहेत, त्यांच्याबाबतीत मात्र प्राणाचे हे उद्रेक, हे क्षोभ प्रगतीसाठीचे उपयुक्त असे साधन बनू शकतात. ज्या ज्या वेळी तुमच्यावर असा आघात होईल, असे एखादे वादळ तुमच्यामध्ये निर्माण होईल, त्या प्रत्येक वेळी, तुम्ही त्याचे स्वरूप बदलून, त्याचा नव्या प्रगतीसाठी उपयोग करून घेऊ शकाल; ध्येयप्राप्ती साध्य करून देणारे एक पुढचे पाऊल असे रूप तुम्ही त्याला देऊ शकाल.

अगदी नेमकेपणाने सांगायचे तर, तुमच्यामध्ये, या आघाताच्या मूळ कारणाकडे म्हणजे तुम्ही जे चुकीचे वागलात, तुम्ही जे चुकीचे विचार केलेत, तुमच्या ज्या चुकीच्या भावना होत्या – त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून पाहण्यासाठी आवश्यक असणारी खरीखुरी प्रामाणिकता असेल; तुम्ही ती दुर्बलता, ती हिंसा, तुमचा तो पोकळ अभिमान जर तुम्ही पाहू शकाल; (मी एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरले की प्राणतत्त्वामध्ये मनापेक्षाही पुष्कळ अधिक मिथ्याभिमान असतो.) आणि या सर्व गोष्टींकडे जर तुम्ही अगदी रोखून बघितलेत, जणू डोळ्यात डोळे घालून रोखून पाहिलेत आणि अगदी प्रामाणिकपणे, मनापासून जर तुम्ही कबूल केलेत; आणि जर तुम्हाला पटले की, तुमच्या चुकीमुळे, तुमच्या दोषामुळे अमुक एक गोष्ट घडली आहे तर, त्या भागावर तुम्ही जणू जळजळीत निखारा ठेवू शकाल.

त्यामुळे तुमची दुर्बलता शुद्ध होईल आणि एका नवीन चेतनेमध्ये तिचे परिवर्तन होईल. मग तुम्हाला कळून येईल, वादळानंतर तुमच्यात बदल झालेला आहे, तुमचा थोडातरी विकास झालेला आहे, तुम्ही खरोखरीच काही प्रगती साधली आहे.

– श्रीमाताजी [CWM 04 : 51-52]

अमृतवर्षा २३

(प्राणतत्त्वाचे सहकार्य लाभले नाही तर त्या व्यक्तीची कशी बिकट अवस्था होते हे श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

भाग ०२

…जर का हे प्रकरण फारच बळावले (म्हणजे प्राणतत्त्वाने असहकार पुकारला आणि त्याला मनाची जोड मिळाली तर) आणि तुम्ही वेळीच प्रतिकार केला नाहीत तर, तुम्ही निराशेला बळी पडता आणि म्हणू लागता, ”खरेतर हे जीवन माझ्यासारख्यांसाठी बनविलेलेच नाही. मी स्वर्गामध्ये खरा सुखी होईन. तेथे सर्वजण खूप चांगले असतात आणि व्यक्तीला जे काही पाहिजे ते ती तेथे करू शकते.” अशा रीतीने या स्वर्गकल्पना जन्म पावलेल्या असतात. मला खरोखरीच वाटते की, मन आणि प्राणतत्त्व या दोघांनी मिळून ही स्वर्गकल्पना शोधून काढलेली असावी!

कारण, जेव्हा तुमचे जीवन आणि तुमचे अस्तित्व तुमच्या इच्छावासनांशी मिळतेजुळते नसते तेव्हा, तुम्ही शोक करू लागता आणि म्हणता, ”पुरे झाले आता हे जीवन! हे जीवन दुःखमय आहे, फसवे आहे. मला मरण हवे आहे.” त्यानंतर असा क्षण येतो की, जेव्हा परिस्थिती अधिकच गंभीर, बिकट बनते. निराशा बंडखोरीमध्ये बदलते आणि विषण्णता ही असंतोषाचे रूप धारण करते.

(अर्थातच) मी वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींविषयी बोलत आहे. ….ही वाईट प्रवृत्तीची माणसे संतापतात, चिडतात, त्यांना सर्वकाही मोडून तोडून, खाली खेचून जमीनदोस्त करायचे असते. अशा वेळी ते म्हणू लागतात, “आता तुम्ही पाहाच, मला जसे पाहिजे तसे जे वागत नाहीत, ते त्याबद्दल शिक्षा भोगतील.” आणि तेव्हा मग परिस्थिती अधिकच गंभीर, बिकट बनते; कारण त्याला साथ द्यायला हे भौतिक मन तेथे तयारच असते. मग काय, हे मन सूड उगविण्याच्या नाना भन्नाट कल्पना सुचवू लागते. निराशेच्या भरात तुम्ही एक मूर्खपणा करता आणि या सूडभावनेतून तुम्ही अजून एक मूर्खपणा करता!

निराशेच्या भरात तुम्ही केलेल्या मूर्खपणाच्या कृतींचा व्यक्तिश: तुमच्याशी संबंध असतो, पण दुष्टपणाने केलेल्या दुष्ट कृतींचा इतरांशीही संबंध असतो. कधीकधी तर ही अविचारी कृत्ये फारच गंभीर स्वरूपाची हानी पोहोचविणारी असतात. तुमच्यापाशी थोडीशी जरी सदिच्छा असेल तर, जेव्हा अशा रीतीने तुम्ही तीव्र भावनांनी पछाडले जाता, तेव्हा काहीच कृती करायची नाही असे ठरवून तुम्ही स्वत:ला जर सांगितलेत की, “मी मुळीच हलणार नाही, हे वादळ शांत होईपर्यंत मी थांबीन.” तर फारच उत्तम; कारण (व्यक्तीने जर तसे केले नाहीत तर,) कित्येक महिन्यांचे नियमितपणे केलेले परिश्रम काही क्षणात मातीमोल होण्याची शक्यता असते. (क्रमशः…)

– श्रीमाताजी [CWM 04 : 51]

अमृतवर्षा २२

(‘जीवनाचे शास्त्र’ या लेखमालिकेमध्ये श्रीमाताजींचे एक वचन असे आहे की – “प्राणतत्त्वाचे सहकार्य मिळाले तर, कोणताच साक्षात्कार अशक्य नाही आणि कोणतेच रूपांतरण कठीण नाही.” या विधानाचे श्रीमाताजी येथे स्पष्टीकरण करत आहेत.)

भाग ०१

श्रीमाताजी : प्राणतत्त्वाला स्वत:च्या शक्तीची चांगली जाणीव असते; आणि म्हणूनच प्राणाला महत्त्व आहे. त्याच्या ठिकाणी प्रचंड कार्यशक्ती असल्याने कोणतीच अडचण ओलांडणे त्याला कठीण नसते; पण त्याने योग्य गोष्टीला साथ दिली पाहिजे.

त्याने सहकार्य केले तर सर्वकाही अद्भुत रीतीने घडून येईल. पण त्याच्याकडून असे सहकार्य सतत मिळणे हे काही तितकेसे सोपे नाही. प्राण हा एक चांगला कार्यकर्ता आहे; तो अत्यंत चांगल्या रीतीने कर्म करणारा आहे. पण कर्म करत असताना स्वत:चे समाधान मिळविण्यासाठी तो नेहमी धडपडत राहतो. कर्मामधून त्याला काहीतरी हवे असते, कर्मातला सर्व आनंद त्याला हवा असतो, सर्व फायदा त्यालाच पाहिजे असतो; आणि जेव्हा या ना त्या कारणाने (अशी कारणे अनेक असू शकतात) हे समाधान त्याला मिळू शकले नाही तर तो दु:खी होतो, त्याचे सुख अजिबात नाहीसे होऊन जाते : ”हे बरोबर नाही; मी कर्म करतो आणि त्याच्या मोबदल्यात मला काहीच मिळत नाही?” असे म्हणून तो खट्टू होतो. तो जागचा हलत नाही, तो ढिम्म बनतो, काहीच बोलत नाही आणि कधी कधी तर तो असेही म्हणतो, ”म्हणजे मी कोणीच नाही, मला काही अस्तित्वच नाही का?” तेव्हा तुमच्या शरीरातून सर्व त्राण निघून जातात, तुम्हाला अतोनात थकवा वाटतो, तुम्हाला गळून गेल्यासारखे वाटते आणि तुम्ही काहीही करू शकत नाही.

आणि एकाएकी ही परिस्थिती अधिकच बिकट होते, कारण, मनाचे या प्राणतत्त्वाशी बरेच सख्य असते; तर्कसंगत विचार करणाऱ्या मनाशी नव्हे तर, भौतिक मनाशी या प्राणतत्त्वाची अगदी घनिष्ठ मैत्री असते. त्यामुळे जेव्हा प्राणतत्त्व म्हणू लागते, “मला अमुक एका गोष्टीशी काही कर्तव्य नाही; मला नीट वागणूक मिळालेली नाही, मला त्या गोष्टीशी कोणताही संबंध नको आहे,” त्यावेळी साहजिकच हे भौतिक मन प्राणाला पुष्टी देण्यासाठी, त्याचे समर्थन करण्यासाठी, त्याला सबळ कारणे पुरविण्यासाठी पुढे सरसावते, आणि मग पुन्हा एकदा तीच रडकथा सुरु होते : प्राणतत्त्व म्हणू लागते, “जीवनात काही अर्थ नाही; खरेच मला या लोकांचा अगदी वीट आला आहे. सर्वच परिस्थिती माझ्यावर उलटलेली दिसते. आता येथून निघून गेलेलेच बरे.” इ. इ.. असे नेहमी नेहमी घडून येते; मात्र कधी तरी, कुठेतरी बुद्धीचा प्रकाश दिसतो आणि ती म्हणते, “पुरे झाले आता हे सगळे नाटक.” (क्रमशः…)

– श्रीमाताजी [CWM 04 : 50-51]

अमृतवर्षा २१

व्यक्तीमध्ये श्रद्धा नसेल तर तिला प्रार्थना करणे अवघड जाते. परंतु स्वत:ची श्रद्धा वाढविण्याचेच एक साधन म्हणून व्यक्ती प्रार्थना करू शकली तर…. किंवा श्रद्धा निर्माण व्हावी अशी अभीप्सा ती बाळगू शकली तर… यापैकी बहुतांशी सगळ्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असते.

व्यक्तीकडे एखादी गोष्ट नसेल आणि ती व्यक्तीला हवी असेल, तर त्यासाठी अतिशय सातत्यपूर्ण प्रयत्नांची, सातत्याने आस बाळगण्याची, दृढ संकल्पाची आणि प्रत्येक क्षणी प्रामाणिक राहण्याची नितांत आवश्यकता असते. तेव्हा मग एक ना एक दिवस, ती गोष्ट घडून येईल अशी खात्री व्यक्तीला बाळगता येईल – कधीकधी ती गोष्ट अगदी क्षणार्धातदेखील घडून येऊ शकते.

अशी काही माणसं असतात की, त्यांच्यापाशी श्रद्धा असते पण अशा काही वेळा असतात की, जेव्हा त्यांच्यामध्ये असणारी विरोधी स्पंदनं (पृष्ठभागावर) येतात आणि त्यांच्यावर हल्ला करतात. (परंतु) जर त्यांची इच्छा प्रामाणिक असेल तर अशी माणसं या हल्ल्यांपासून त्यांच्या श्रद्धेचा बचाव करू शकतात, अशा हल्ल्यांना परतवून लावू शकतात.

काही जण असे असतात की, जे शंका जोपासतात कारण त्यामध्ये त्यांना एक प्रकारची मजा वाटते – परंतु त्याच्या इतके भयानक दुसरे काही नाही. असे करणे म्हणजे किटकाला फळामध्ये खुशाल राहू देण्यासारखे आहे, त्याची परिणती ते फळ संपून जाण्यात होणार. अशा प्रकारचे कोणतेही स्पंदन हे सहसा प्रथम मनात निर्माण होते – अशा वेळी व्यक्तीने पहिली कोणती गोष्ट केली पाहिजे तर, ती म्हणजे तिने ठाम राहिले पाहिजे आणि त्या शंकेला नकार दिला पाहिजे. आता काय घडते ते पाहू या, असे म्हणून त्याकडे पाहत राहणे टाळले पाहिजे कारण अशा प्रकारचे कुतूहल हे अतिशय घातक असते.

जे सरळ, साधे आहेत, प्रांजळ आहेत, सरळमार्गी आहेत, कोणतीही बौद्धिक जटिलता ज्यांच्यामध्ये नाही अशा माणसांपेक्षा बुद्धिवादी व्यक्तींना श्रद्धा बाळगणे हे कदाचित अधिक कठीण असते. परंतु मला वाटते, एखाद्या बुद्धिवादी माणसाकडे जर श्रद्धा असेल तर ती एक अतिशय शक्तिशाली गोष्ट ठरते, ज्यामधून चमत्कारदेखील घडून येऊ शकतात.

– श्रीमाताजी [CWM 06 : 121]

अमृतवर्षा २०

कर्म करणे हा साधनेचा एक चांगला मार्ग आहे, कारण तुम्हाला एखादे कर्म जर योग्य प्रकारे करायची इच्छा असेल तर तुम्ही म्हणजे ते ‘कर्म’च बनला पाहिजेत, ती ‘कर्म करणारी व्यक्ती’ नव्हे. अन्यथा तुम्हाला ते कधीच योग्य रीतीने करता येणार नाही. कारण ‘कर्म करणारी व्यक्ती’ असे तुम्ही राहिलात आणि त्यातही तुमचे विचार भरकटत असतील तर निश्चितपणे असे होईल की, तुम्ही जर काही नाजूक गोष्टी हाताळत असाल तर त्या मोडतील, तुटतील; तुम्ही स्वयंपाक करत असाल तर तुमच्या हातून एखादा पदार्थ करपून जाईल, तुम्ही जर खेळत असाल तर तुम्ही हराल. तेव्हा कर्मामध्ये मोठी साधना असते हे लक्षात घ्या आणि तुम्हाला ती साधना चांगल्या रीतीने करायची असेल तर (कर्म करत असताना स्वत: कर्मरूप होणे) हाच एक मार्ग आहे.

…अगदी सगळ्या गोष्टींबाबत हे असेच असते. कोणतीही गोष्ट जर ती योग्य प्रकारे केली तर ती योग-साधनेचा भाग बनू शकते. आणि योग्य प्रकारे केली नाही तर अगदी (तुमच्या) तपस्येचादेखील काही उपयोग होऊ शकणार नाही आणि परिणामी तुमची प्रगतीसुद्धा होणार नाही. कारण परत तेच! तुम्ही जर तपस्या करत असाल आणि ती करत असताना सदासर्वकाळ स्वत:कडे पाहात असाल आणि मनातल्या मनात स्वत:शीच बोलत असाल, ‘माझी प्रगती होत आहे ना? माझे भले होईल ना? मी यशस्वी होईन ना?” तर तेव्हा तो तुमचा अहंकार असतो, तो हळू हळू वाढत जातो आणि सर्व जागा व्यापून टाकतो, मग तो अन्य कशालाच जागा उरू देत नाही. आध्यात्मिक अहंकार हा सर्वात वाईट असतो कारण तो त्याच्या स्वत:च्या हीनपणाबद्दल पूर्णपणे बेसावध असतो, त्याला असे वाटत असते की, मी अगदी दैवी नसलो तरी मी खूप श्रेष्ठ आहे….

(वर उल्लेख केल्याप्रमाणे, व्यक्ती स्वत: कर्मरूप बनून न जाता, कर्म करणारी आणि ते करताना सातत्याने स्वत:कडेच बघत राहणारी व्यक्ती म्हणून शिल्लक राहिली आणि) पुन्हापुन्हा स्वत:कडे मागे वळून बघत राहिली, म्हणजेच ती अगदी कोत्या अहंकाराच्या मर्यादांमध्ये स्वत:ला कोंडून घेत राहिली तर त्यातून न्यूनगंड, स्वत:च्या मर्यादा, स्वतःचा क्षुद्रपणा, अक्षमता या सर्व गोष्टी निर्माण होतात. व्यक्तीने आपली दारे खुली केली पाहिजेत, स्वत:ला व्यापक केले पाहिजे. आणि त्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वत:वर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, व्यक्ती जे काही कर्म करत असते त्या कर्मावर लक्ष केंद्रित करायला तिला जमले पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 04 : 362-364]

अमृतवर्षा १९

(कर्म हे साधनेचा भाग कसा होऊ शकते हे श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

व्यक्तीने कर्मामध्ये अधिकाधिक गढून जाण्याचा आणि परिणामतः स्वतःला विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्यक्तीने कर्म करताना ते ‘ईश्वरा’र्पण म्हणून केले पाहिजे; अगदी निरलसपणे, भरपूर, स्वत:चा पूर्णपणे निरास करून, स्वत:मधील सर्व काही देऊ करण्याच्या भावनेने केले पाहिजे. व्यक्तीने स्वत:बद्दल विचार न करता, फक्त करत असलेल्या कर्माचाच विचार केला पाहिजे.

…तुम्हाला जर एखादी गोष्ट उत्तम रीतीने करायची असेल, मग ती कोणतीही का असेना, एखादा खेळ खेळणे, पुस्तक लिहिणे, चित्र काढणे, गायनवादन करणे किंवा अगदी शर्यत जिंकणे अशी ती कोणतीही गोष्ट असू शकते. तुम्हाला जर कोणतीही गोष्ट उत्तमरित्या करायची असेल तर तुम्ही जी गोष्ट करत आहात ती गोष्टच तुम्ही बनले पाहिजे; ते कार्य करताना स्वतःकडे पाहणारी तुमच्यातील ती क्षुद्र व्यक्ती शिल्लक राहता कामा नये. कारण व्यक्ती जर कर्म करताना स्वत:कडे पाहू लागली… तर ती व्यक्ती अजूनही अहंकारामध्ये गुंतलेली आहे असा त्याचा अर्थ होईल. व्यक्ती जे कर्म करत आहे ते कर्मच जर ती झाली, तर ती एक मोठी प्रगती ठरते.

अगदी बारक्यासारक्या तपशीलानिशी व्यक्तीने हे करायला शिकले पाहिजे. एक मजेशीर उदाहरण पाहा : समजा, तुम्हाला एका बाटलीतून दुसऱ्या बाटलीत पाणी ओतायचे असेल; तर तेव्हा तुम्ही एकाग्र होता (एक शिस्त, एक प्रकारचा व्यायाम म्हणून तुम्ही तसा प्रयत्न केला पाहिजे.) जोपर्यंत ज्या बाटलीत पाणी भरायचे असते ती बाटली तुम्ही असता, ज्या बाटलीतून पाणी भरायचे ती बाटलीही तुम्ही असता आणि ती पाणी ओतण्याची प्रक्रियाही तुम्हीच असता, जोपर्यंत तुम्ही केवळ तेच असता तोवर सगळे काही नीट चालू असते. पण चुकून तुम्ही एक क्षणभर जरी विचार केलात : ”अरे वा! पाणी न सांडता भरलं जातंय, अरे मला जमतंय की!” त्याच क्षणी पाणी सांडते. प्रत्येक गोष्टीमध्ये, अगदी सर्वच गोष्टींमध्ये हे असेच घडते.

– श्रीमाताजी [CWM 04 : 362]

अमृतवर्षा १७

(स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणायचे असेल तर स्वत:चे निरीक्षण कसे करावे याबद्दल श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

सबंध दिवसातील तुमच्या गतीविधी, क्रियाप्रतिक्रिया तुम्ही एकामागून एक यंत्रवत अखंडपणे नुसत्या न्याहाळत बसलात, तर त्याने तुमची प्रगती होऊ शकणार नाही. या निरीक्षणातून तुम्हाला प्रगती करून घ्यायची असेल, तर तुमच्या अंतरंगांतील असे काहीतरी, असा एखादा उत्तम भाग तुम्ही शोधून काढला पाहिजे की, जो प्रकाशयुक्त असेल, सदिच्छायुक्त असेल आणि प्रगतीसाठी अत्यंत उत्सुक असेल; आणि त्यामुळे त्याच्या प्रकाशात तुम्ही स्वत:ला तपासू शकाल. चित्रपटात जशी एकामागून एक चित्रे सरकतात, त्याप्रमाणे दिवसभरातील तुमच्या सर्व कृती, सर्व भावना, सर्व आवेग, उर्मी, विचार त्या प्रकाशयुक्त भागासमोरून सरकत जाऊ देत. त्यानंतर त्यामध्ये सुसंगती लावण्याचा प्रयत्न करा; म्हणजे अमुक एका गोष्टीनंतरच दुसरी गोष्ट का घडली, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.

तुमच्यासमोरील प्रकाशमय पडद्याकडे निरखून पाहा. काही गोष्टी त्याच्या समोरून जातात, सहज सरळ जातात. दुसऱ्या काही गोष्टींची थोडीशी छाया पडते आणि काही गोष्टी अशा असतात की, त्यांची अतिशय काळीकुट्ट आणि आपल्याला आवडणार नाही अशी छाया पडते. तुम्ही या बाबतीत अत्यंत प्रामाणिक, प्रांजळ असले पाहिजे. एखादा खेळ खेळत असल्याप्रमाणे अगदी प्रामाणिकपणे हे काम करा.

”अमुक परिस्थितीमध्ये मी अशी एक कृती केली, माझ्या मनात अशा अशा भावना होत्या, मी अमुक एका रीतीने त्यावेळी विचार केला. खरेतर, माझे ध्येय आहे आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व! पण आत्ता माझी कृती या ध्येयाला धरून होती की नाही?” असा विचार करा. जर ती कृती तुमच्या ध्येयाला धरून घडली असेल, तर त्या प्रकाशमय पडद्यावर तिची काळी छाया पडणार नाही; ती कृती पारदर्शक असेल. मग त्या कृतीविषयी चिंता करण्याचे तुम्हाला कारण नाही.

ती कृती तुमच्या ध्येयाशी सुसंगत नसेल तर मात्र तिची छाया पडेल. मग तुम्ही विचार करा – “का बरे ही अशी छाया पडली? आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व यांविषयीच्या माझ्या संकल्पाच्या विरोधी असे या कृतीमध्ये काय होते?” बहुतेक वेळा तिचा संबंध अचेतनेशी, बेसावधपणाशी असल्याचे तुम्हाला आढळून येईल. तेव्हा मग आपण केलेल्या बेसावध गोष्टींमध्ये तिची नोंद करा आणि ठरवा की, पुढच्या वेळेस अशी एखादी गोष्ट करण्यापूर्वीच मी सावध राहण्याचा प्रयत्न करीन.

….या सर्व गोष्टी तुमच्या ध्येयप्रकाशात बघा. ”अमुक एका वृत्तीची जोपासना करणे हे माझ्या आत्मशोधाशी, ध्येयप्राप्तीशी मिळतेजुळते आहे की नाही? मी हा काळा कोपरा प्रकाशासमोर ठेवीत आहे. प्रकाश त्यामध्ये शिरून तो काळा भाग नाहीसा होईपर्यंत मी हे करणार आहे.” तुम्ही असे केल्यानंतर हा खेळ संपलेला असतो.

मात्र तुमच्या सबंध दिवसाचे नाटक एवढ्याने संपत नाही, हे तर स्पष्टच आहे. कारण त्या प्रकाशासमोरून तुम्हाला आणखी कित्येक गोष्टी न्यायच्या राहिलेल्या असतात. मात्र हा खेळ, तुम्ही पुढे चालू ठेवलात आणि अत्यंत मनःपूर्वकतेने तुम्ही हा खेळ पुन्हा पुन्हा खेळत राहिलात तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की, त्यानंतर सहा महिन्यांनी तुम्ही तुम्हालाच ओळखू शकणार नाही. (इतकी सुधारणा आता तुमच्यामध्ये झालेली असते.)

– श्रीमाताजी [CWM 04 : 38-39]

अमृतवर्षा १६

(पूर्णत्वप्राप्तीची पहिली पायरी म्हणजे स्वत:चे निरीक्षण करणे. हे निरीक्षण कसे करावे यासंबंधी श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

आपल्यामधील आंतरिक क्रियांचा, गतीविधींचा कोठे व कसा उगम होतो यासंबंधी आपल्याला स्पष्ट कल्पना आली पाहिजे. कारण आपल्या अस्तित्वामध्ये परस्परविरोधी प्रवृत्ती असतात. काही प्रवृत्ती तुम्हाला एका बाजूस खेचतात, दुसऱ्या प्रवृत्ती तुम्हाला दुसऱ्या बाजूस खेचतात आणि त्यामुळे जीवनामध्ये सगळा गोंधळ माजतो. तुम्ही स्वत:चे नीट निरीक्षण केलेत तर असे दिसून येईल की, अस्वस्थ होण्यासारखे तुमच्याकडून काही घडले तर, लगेचच तुमच्या त्या कृतीचे समर्थन करण्यासाठी तुमचे मन अनुकूल कारणे देऊ लागते. हे मन कोणत्याही गोष्टीला मुलामा देण्यासाठी तयारच असते. आणि त्यामुळेच अशा परिस्थितीमध्ये स्वत:ला जाणणे कठीण होऊन बसते. मनोमय अस्तित्वाच्या या छोट्या छोट्या खोटेपणाकडे स्पष्टपणे पाहण्यासाठी आणि स्वत:ला खऱ्या अर्थाने जाणण्यासाठी व्यक्ती पूर्णपणे प्रामाणिकच असावी लागते.

– श्रीमाताजी [CWM 04 : 38]

अमृतवर्षा १५

 

पूर्णत्वप्राप्तीसाठीची पहिली पायरी म्हणजे आपल्या स्वत:विषयी, आपल्या अस्तित्वाच्या भिन्न भिन्न भागांविषयी व त्या प्रत्येकाच्या निरनिराळ्या कार्यांविषयी जागृत होणे. हे भाग एकमेकांपासून अलगपणे पाहण्यास तुम्ही शिकले पाहिजे; तेव्हाच तुम्हाला तुमच्या ठिकाणी घडणाऱ्या क्रिया व तुम्हाला कृतिप्रवण करणारे अनेक आवेग, प्रतिक्रिया आणि परस्परविरोधी इच्छा यांचा उगम कोठे आहे हे स्पष्टपणे कळू शकेल.

…(आपल्या अस्तित्वाच्या) या क्रियांचे, गतीविधींचे विशेष काळजीपूर्वक निरीक्षण करून, त्यांना आपल्या उच्चतम ध्येय-न्यायासनासमोर आणून, त्याने दिलेला निर्णय मानण्याची आपण प्रामाणिक इच्छा बाळगली असेल, तरच आपल्यामधील निर्णयक्षमतेला असे वळण लावण्याची आपण आशा बाळगू शकू, की जी कधीच चुकणार नाही.

श्रीमाताजी [CWM 12 : 03]