Posts

साधना, योग आणि रूपांतरण – १०

(ध्यानामध्ये, निद्रेमध्ये किंवा जागेपणी जी सूक्ष्म पातळीवरील दृश्यं दिसतात, विविध देवदेवतादींची दर्शनं होतात ती खरी असतात की खोटी असा प्रश्न कोणी साधकाने विचारलेला दिसतो, त्यासंबंधी श्रीअरविंद येथे खुलासेवार लिहीत आहेत….)

वस्तुनिष्ठ (objective) दृश्यांइतकीच व्यक्तिनिष्ठ (Subjective) अंतर्दर्शनेदेखील खरी असू शकतात – फरक इतकाच की, वस्तुनिष्ठ दृश्य हे स्थूल, भौतिक अवकाशातील वास्तव गोष्टींबाबतचे असते, तर अंतर्दर्शने ही अन्य स्तरांवरील वास्तव गोष्टींची असतात; जे स्तर सूक्ष्म भौतिक पातळीपर्यंत उतरत आलेले असतात. अगदी प्रतीकात्मक दर्शनंसुद्धा, जर ती वास्तविकतेची (reality) प्रतीकं असतील तर ती खरी असतात. एवढेच काय तर, स्वप्नांनासुद्धा सूक्ष्म क्षेत्रामध्ये एक वास्तविकता असू शकते. जे सत्य आहे किंवा सत्य होते किंवा जे सत्य असणार आहे अशा गोष्टींचे प्रतिनिधित्व जर ही दर्शनं करत नसतील आणि ती दर्शनं म्हणजे नुसत्या काल्पनिक मनोमय रचना असतील तर मात्र ती दर्शनं अ-सत्य, मिथ्या असतात. तुम्हाला ‘कृष्णा’चे जे दर्शन झाले आहे (चंदेरी निळसर रंगातील, बासरी वाजविणारा आणि नृत्यमुद्रेमध्ये उभा असणारा ‘कृष्ण’ हे जे दर्शन झाले आहे) ते खरे असू शकते….

कधीकधी विकसनासाठी कोणतेही प्रयत्न न करतादेखील ही सूक्ष्मदृष्टी जन्मजात आणि सवयीची अशी असू शकते; काहीवेळा ती स्वतःहून जागृत होते आणि मग तिचा अनुभव पुष्कळ वेळा येतो किंवा तिच्या विकसनासाठी अगदी थोडीशी साधनादेखील पुरेशी असते. (अर्थात) अशी दृश्यं दिसणे हे अनिवार्यपणे आध्यात्मिक उपलब्धीचे लक्षण असतेच असे नाही; परंतु सहसा व्यक्ती ‘योगसाधने’च्या माध्यमातून जसजशी अंतरंगात प्रवेश करू लागते, ती अंतरंगात राहून जीवन जगू लागते तसतशी ही सूक्ष्मदृष्टीची शक्ती कमीअधिक प्रमाणात जागृत होऊ लागते. परंतु ही गोष्ट नेहमीच अगदी सहजपणे घडते असेही नाही, विशेषतः व्यक्तीला जर प्रामुख्याने बुद्धिप्रधान जीवन जगण्याची सवय असेल किंवा तिला बाह्यवर्ती प्राणिक चेतनेमध्येच जीवन जगण्याची सवय असेल तर ही गोष्ट तितकीशी सहजपणे घडत नाही.

मला वाटते, तुम्ही ‘दर्शना’चा, म्हणजे ‘देवतेने आपल्या भक्तासमोर स्वतःला प्रकट करणे’ या गोष्टीचा विचार करत आहात, परंतु ती गोष्ट निराळी असते. तिथे त्या ‘देवते’च्या अस्तित्वावरील आवरण दूर होते, मग ते अनावरण तात्पुरते असेल किंवा स्थायी स्वरूपाचे असेल, आणि मग ते दर्शन म्हणून घडेल किंवा त्या देवतेच्या सान्निध्याची अगदी आत्मीय भावना या स्वरूपात अनुभवास येईल. ही अस्तित्वाची जाणीव दृश्यापेक्षा अधिक सघन असते आणि त्या देवतेबरोबर वारंवार किंवा नित्य होणाऱ्या संवादाच्या स्वरूपात ती अनुभवास येते. व्यक्ती जेव्हा आपल्या अंतरात्म्यामध्ये खोलखोल जाऊ लागते आणि चेतनेचा विकास घडू लागतो किंवा भक्तीच्या उत्कटतेमध्ये वाढ होते तेव्हा त्या देवतेच्या अस्तित्वाची जाणीव होते. चढत्यावाढत्या आणि तल्लीन भक्तीच्या भारामुळे (pressure) जेव्हा बाह्यवर्ती चेतनेचे कवच पुरेसे मोडून पडते, तेव्हा अशा प्रकारचा संपर्क अनुभवास येतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 103-104)

साधना, योग आणि रूपांतरण – ०९

(एका साधकाला त्याच्या मिटल्या डोळ्यांसमोर जी दृश्यं दिसली त्याचे वर्णन त्याने श्रीअरविंदांना लिहून पाठविले आहे, असे दिसते. त्यावर श्री अरविंदांनी त्याला दिलेले हे उत्तर… )

तुम्ही ज्या दृश्यांचे वर्णन केले आहे ती दृश्यं साधनेच्या प्रारंभिक टप्प्यांवर दिसतात. येथे दिसणारी बहुतांशी दृश्यं म्हणजे मानसिक स्तरावरील रचना असतात आणि (त्यामुळे) प्रत्येक वेळी त्यांना नेमका अर्थ देता येतोच असे नाही. कारण ती दृश्यं साधकाच्या व्यक्तिगत मनावर अवलंबून असतात.

साधनेच्या नंतरच्या एका टप्प्यावर सूक्ष्मदृष्टीची शक्ती साधनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते; परंतु सुरुवातीला, साधकाने त्याच्या तपशीलांना अतिरिक्त महत्त्व न देता, चेतना अधिक विकसित होईपर्यंत, मार्गक्रमण करत राहिले पाहिजे. ‘दिव्य प्रकाश’, ‘दिव्य सत्य’ आणि ‘ईश्वराच्या उपस्थितीची जाणीव’ यांच्याप्रति असलेली चेतनेची उन्मुखता ही नेहमीच ‘योगसाधने’मधील एक महत्त्वाची गोष्ट असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 100)

साधना, योग आणि रूपांतरण – ०८

व्यक्ती जेव्हा ध्यान करायचा प्रयत्न करू लागते तेव्हा सुरुवातीला येणारा पहिला अडथळा म्हणजे झोप येणे. तुम्ही हा अडथळा ओलांडून पलीकडे जाता तेव्हा अशी एक अवस्था येते की, तुमचे डोळे मिटलेले असतात पण तुम्हाला विविध गोष्टी, माणसं आणि अनेक प्रकारची दृश्यं दिसायला लागतात. ही काही वाईट गोष्ट नाही तर, ते एक चांगले लक्षण आहे. तुम्ही योगसाधनेमध्ये प्रगती करत असल्याचे ते द्योतक आहे, असा त्याचा अर्थ होतो.

बाह्यवर्ती वस्तू पाहणाऱ्या बाह्य चर्मचक्षूंशिवाय, आपल्यामध्ये एक आंतरिक दृष्टीदेखील असते; ही आंतरिक दृष्टी आजवर न पाहिलेल्या आणि आजवर अज्ञात असलेल्या गोष्टी पाहू शकते; ती दूर अंतरावरील गोष्टी पाहू शकते; अन्य स्थळकाळातील किंवा अन्य जगतांमधील गोष्टीसुद्धा ती पाहू शकते; ही आंतरिक दृष्टी तुमच्यामध्ये आता खुली होऊ लागली आहे. श्रीमाताजींच्या शक्तिकार्यामुळे ती तुमच्यामध्ये खुली होऊ लागली आहे आणि तुम्ही तिला अटकाव करण्याचा प्रयत्न करता कामा नये. श्रीमाताजींचे नित्य स्मरण करत राहा, त्यांना आवाहन करत राहा आणि त्यांची उपस्थिती तुम्हाला जाणवावी आणि त्यांच्या शक्तीचे कार्य तुमच्यामध्ये सुरू असल्याचे तुम्हाला जाणवावे अशी आस बाळगा. परंतु त्यासाठी, इथूनपुढे श्रीमाताजींच्या शक्ति-कार्यामुळे, तुमच्यामध्ये या किंवा यांसारख्या ज्या घडामोडी घडून येतील, जे बदल घडून येतील, त्यांना नकार देण्याची आवश्यकता नाही; फक्त इच्छावासना, अहंकार, अस्वस्थता आणि इतर चुकीच्या घडामोडी या गोष्टींना मात्र नकार दिलाच पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 99)

साधना, योग आणि रूपांतरण – ०७

‘ईश्वरा’कडे जाण्याचा ‘ध्यान’ हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. ध्यानामुळे जर (‘ईश्वर शक्ती’चे) अवरोहण (descent) घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही…

‘कर्म’ हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे. परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ‘ईश्वरा’ऐवजी, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ‘ईश्वर’ हेच साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन होऊ शकते.

प्रेम, भक्ती, …या गोष्टी ‘ईश्वरा’कडे पोहोचण्याचे जवळचे मार्ग असतात किंवा असू शकतात. (असू शकतात असे म्हणण्याचे कारण की) प्रेम आणि भक्ती या गोष्टी जर अधिक प्राणप्रधान (Vital) असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान, नैराश्य या गोष्टींमध्ये (सी-सॉ सारखी) दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे प्रेम व भक्तीचा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ‘ईश्वरा’कडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, व्यक्ती स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवतीच घोटाळत राहण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 212)

साधना, योग आणि रूपांतरण – ०६

योग म्हणजे ‘ईश्वरा’शी ऐक्य, आणि ‘ईश्वरा’शी ऐक्य साधण्यासाठी तुम्ही जे काही करता ती म्हणजे ‘साधना’.

तुम्ही सामान्य चेतनेपासून दूर झाले पाहिजे आणि ईश्वरी ‘चेतने’च्या संपर्कात आले पाहिजे. त्यासाठी तुम्ही नेहमी श्रीमाताजींना आवाहन करा, त्यांच्याप्रति खुले, उन्मुख व्हा; त्यांच्या ‘शक्ती’ने तुमच्यामध्ये कार्य करून, तुम्हाला सुपात्र बनवावे यासाठी त्यांच्याजवळ प्रार्थना करा, तशी आस बाळगा; इच्छा-वासना, अस्वस्थता, मन आणि प्राणाचे अडथळे यांना नकार द्या.

मन व प्राण स्वस्थ, शांत करणे आणि श्रीमाताजींची ‘शांती’, श्रीमाताजींची ‘उपस्थिती’, त्यांचा ‘प्रकाश’, ‘शक्ती’ आणि ‘आनंद’ यांसाठी अभीप्सापूर्वक एकाग्रता करणे म्हणजे ‘ध्यान’.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 135)

साधना, योग आणि रूपांतरण – ०५

तुम्हाला जर खरोखरच या योगमार्गाचे (पूर्णयोगाचे) अनुसरण करायचे असेल आणि योगसाधना करायची असेल, तर ती तुम्ही कोणाकडून कौतुक किंवा मानसन्मान मिळावा यासाठी करता कामा नये; तर योगसाधना ही तुमच्या जिवाची अनिवार्य निकड असल्यामुळे केली पाहिजे, कारण त्याशिवाय अन्य कोणत्याच मार्गाने तुम्ही आनंदी होऊ शकणार नाही. लोकांनी तुमची प्रशंसा केली काय किंवा नाही केली काय, ती गोष्ट अजिबात महत्त्वाची नाही. तुम्ही अगोदरच स्वत:ला समजावले पाहिजे की, जसजसे तुम्ही सामान्य माणसाहून अधिक प्रगत होत जाल, त्यांच्या सामान्य जीवनपद्धतीहून अधिकाधिक दूर जाल, तसतशी लोकं तुमची प्रशंसा कमी प्रमाणात करू लागतील. आणि हे स्वाभाविकच आहे कारण की, ती लोकं तुम्हाला नीट समजून घेऊ शकणार नाहीत. मी पुन्हा एकवार सांगते की, या गोष्टीला अजिबात महत्त्व नाही.

तुम्ही प्रगती केल्याविना राहूच शकत नाही म्हणून (योग) मार्गावर प्रगत होत राहण्यामध्ये ‘खरा प्रामाणिकपणा’ सामावलेला आहे. तुम्ही ‘दिव्य जीवना’साठी स्वत:ला वाहून घेता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही; तुम्ही स्वत:चे रूपांतर करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही. (हे सारे तुम्ही करता) कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते.

जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

– श्रीमाताजी (CWM 03 : 282-283)

साधना, योग आणि रूपांतरण – ०३

व्यक्तीने (साधनेसाठी) तिच्या दैनंदिन जीवनाच्या परिस्थितीतून बाहेर पडलेच पाहिजे असे काही बंधनकारक नाही; मात्र व्यक्तीने तिचा आंतरिक दृष्टिकोन पूर्णपणे बदलणे आवश्यक असते. व्यक्तीने तिच्या अंगवळणी पडलेल्या गोष्टी करायला हरकत नाहीत पण त्या करताना तिचा दृष्टिकोन मात्र निराळा असावा. योगसाधना करण्यासाठी जीवनातील सर्व गोष्टींचा परित्याग करून एकांतवासात निघून जाणे, एखाद्या आश्रमात जाऊन राहणे गरजेचे आहे, असे माझे म्हणणे नाही.

एक मात्र खरे आहे की, एखादी व्यक्ती जर प्रपंचात व प्रापंचिक परिस्थितीमध्ये राहून योगाचरण करीत असेल तर ते अधिक अवघड असते; अर्थात ते अधिक परिपूर्णसुद्धा असते. कारण प्रत्येक क्षणी प्रापंचिक व्यक्तीला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या समस्यांना, सर्वसंगपरित्याग करून एकांतवासात गेलेल्या व्यक्तीला तोंड द्यावे लागत नाही; कारण अशा व्यक्तीच्या बाबतीत समस्यांचे प्रमाण अगदीच कमी झालेले असते. पण प्रापंचिक व्यक्तीला मात्र अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते; व्यक्तीच्या भोवती असणाऱ्या, आणि ज्यांच्याशी तिचा सतत संबंध येतो त्या त्या व्यक्तींना तुमच्या वागण्याचे आकलन न होण्यापासूनच याची सुरुवात होते; व्यक्तीने त्यासाठी तयार असले पाहिजे, सहनशीलता आणि अतीव अलिप्तता यांसह सुसज्ज असले पाहिजे. लोक तुमच्याविषयी काय विचार करतात व काय बोलतात याची, योगमार्गाची वाटचाल करणाऱ्या व्यक्तीने पर्वा करता कामा नये; हा अगदी अपरिहार्य असा आरंभबिंदू असतो.

जग तुमच्याबद्दल काय बोलते अथवा विचार करते, ते तुम्हाला कशी वागणूक देते याबाबत तुम्ही पूर्णपणे निर्लिप्त असले पाहिजे. लोक तुमच्याविषयी काय समजूत करून घेतात याचे तुम्हाला फारसे महत्त्व वाटता कामा नये आणि त्याचा तुम्हाला यत्किंचितही स्पर्श होता कामा नये. यामुळेच (हे साध्य करणे अवघड असल्यामुळेच) सर्वसंगपरित्याग करून एकांतवासात जाऊन योगसाधना करण्यापेक्षा, व्यक्तीला तिच्या नेहमीच्या परिस्थितीमध्ये राहून योगसाधना करणे हे सहसा अधिक अवघड असते. हे खरोखरच जास्त कठीण असते, पण आपण येथे सोप्या गोष्टी करण्यासाठी आलेलो नाही. रुपांतरणाचा विचारच ज्यांच्या मनाला शिवत नाही त्यांच्यासाठी आपण त्या गोष्टी सोडून देऊ.

– श्रीमाताजी (CWM 04 : 377-378)

साधना, योग आणि रूपांतरण – ०२

‘साधना’ म्हणजे योगाचा सराव करणे, योगाभ्यास करणे.

साधनेचे परिणाम साध्य करण्यासाठीच्या आणि कनिष्ठ प्रकृतीवर विजय मिळवण्यासाठीच्या संकल्पावर एकाग्रता करणे म्हणजे ‘तपस्या’.

‘ईश्वरा’ची पूजा करणे, त्याच्यावर प्रेम करणे, त्याच्याप्रति आत्मसमर्पण करणे, त्याच्याप्रति अभीप्सा बाळगणे, त्याची प्रार्थना आणि नामस्मरण करणे या सर्व गोष्टींचा समवेश ‘आराधने’मध्ये होतो.

चेतना अंतरंगात एकाग्र करणे, चिंतन-मनन करणे, समाधी अवस्थेत शिरणे म्हणजे ‘ध्यान’.

“ध्यान, तपस्या आणि आराधना’’ ही सर्व साधनेची विविध अंग आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 215)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१७)

‘दिव्य’ चेतनेप्रत स्वतःला खुले करण्याचे किंवा त्यामध्ये प्रवेश करण्याचे अनेक मार्ग आहेत. मी जो माझा मार्ग सांगतो तो असा आहे की, व्यक्तीने स्वतःच्या अंतरंगात शिरण्याचा सातत्यपूर्ण सराव करायचा; अभीप्सेच्या माध्यमातून त्या ‘ईश्वरा’प्रति स्वत:ला खुले करायचे आणि एकदा का व्यक्ती त्या ‘ईश्वरा’विषयी आणि त्याच्या कार्याविषयी सजग झाली की त्या ‘ईश्वरा’प्रति स्वतःचे संपूर्णपणे आत्मदान करायचे.

या आत्मदानाचा अर्थ असा की, कशाचीही मागणी न करता, त्या ‘दिव्य चेतने’च्या सतत संपर्कात राहायचे किंवा तिच्याशी ऐक्य राखायचे; तिची शांती, शक्ती, प्रकाश, आणि आनंद यांबद्दल अभीप्सा बाळगायची; मात्र अन्य कशाचीही मागणी करायची नाही. या जगामध्ये व्यक्तीला जे कार्य नेमून देण्यात आले आहे ते कार्य, जीवनात व कृतीमध्ये उतरविण्यासाठी त्या ‘दिव्य शक्ती’चे माध्यम बनायचे. व्यक्तीला एकदा का मन, हृदय व शरीर यांमध्ये कार्यरत असणाऱ्या ‘आत्मशक्ती’ची, ‘दिव्य शक्ती’ची जाणीव होऊ शकली आणि त्याप्रत व्यक्ती खुली होऊ शकली, म्हणजे मग शिल्लक उरते ते म्हणजे त्या ‘दिव्य शक्ती’शी एकनिष्ठ राहणे, सातत्याने तिला आवाहन करणे, आणि जेव्हा ती अवतरते, तेव्हा तिला तिचे कार्य करू देणे आणि निम्नतर चेतनेशी व निम्नतर प्रकृतीशी संबंधित असणाऱ्या इतर सर्व गोष्टींना आणि कनिष्ठ ‘शक्तीं’ना नकार देणे.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 441)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०७)

(काव्य, ग्रंथ-वाचन, सामाजिक संपर्क इत्यादी प्रत्येक गोष्टींचे निश्चितपणे काही महत्त्व असते पण साधकाचा मुख्य भर साधनेवर असला पाहिजे आणि त्याला पूरक ठरतील अशा इतर सर्व गोष्टी असल्या पाहिजेत… हे श्रीअरविंद एका साधकाला सांगत आहेत. ते सांगत असताना ‘साधना म्हणजे काय’ हे त्यांनी स्पष्ट केले आहे.)

साधना हीच मुख्य गोष्ट असली पाहिजे आणि साधना म्हणजे प्रकृतीचे शुद्धीकरण, आत्म-निवेदन (Consecration), चैत्य पुरुष, अंतर्मन, प्राण यांचे खुले होणे (Opening), आणि ‘ईश्वरा’शी संपर्क आणि त्याच्या उपस्थितीचा अनुभव, सर्व गोष्टींमध्ये ‘ईश्वरा’ची प्रचिती; साधना म्हणजे समर्पण, भक्ती, चेतनेचे विश्वचेतनेमध्ये विस्तृतीकरण, सर्वांभूती एकाच ‘आत्म्या’च्या अस्तित्वाचा अनुभव, प्रकृतीचे आंतरात्मिक आणि आध्यात्मिक रूपांतर.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 78)