समर्पण – ५२
तुम्ही तुमचे जीवन ईश्वरार्पण करायचे ठरविलेले असते, तसा निर्णय तुम्ही घेतलेला असतो. परंतु तुमच्या बाबतीत अचानक, काहीतरी असुखद असे घडते, अनपेक्षित असे घडते आणि तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया ही विरोध करण्याचीच असते. परंतु तुम्ही तुमचे जीवन ईश्वरार्पण केलेले असते, तुम्ही एकदाच कायमचे म्हटलेले असते की, “आता माझे जीवन हे ईश्वराचे आहे.” आणि मग अचानक एखादा अतिशय असुखद प्रसंग घडतो (आणि तसा तो खरोखरच घडू शकतो.) आणि मग तुमच्यामधीलच असा एखादा घटक की ज्याला समर्पण नको असते, तो घटक विरोधी प्रतिक्रिया देतो. परंतु इथे, जर तुम्हाला तुमच्या अर्पणाच्याबाबतीत खरेखुरे तर्कशुद्ध राहायचे असेल तर तुम्ही तो असुखद प्रसंग पुढे आणला पाहिजे आणि तो सुद्धा ईश्वरार्पण केला पाहिजे आणि त्या ईश्वराला अतीव प्रामाणिकपणे म्हटले पाहिजे की, “तुझीच इच्छा पूर्ण होवो; जर तू त्या पद्धतीने ठरविले असशील, तर ते त्या पद्धतीनेच घडेल.” अशी स्वेच्छापूर्वक आणि उत्स्फूर्त निष्ठा पाहिजे, आणि म्हणूनच हे अतिशय अवघड आहे.
ज्या गोष्टीसाठी तुम्ही मेहनत घेतली होती, पण जी गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडली नाही, अशा अगदी लहानातील लहान गोष्टीबाबत सुद्धा, विरोधी प्रतिक्रिया येण्याऐवजी तुम्ही अगदी आपोआपच, दुर्दम्यपणे, दोन पावले मागे जाता आणि म्हणता, “नाही, विरोध करता कामा नये.” – जर तुम्ही संपूर्ण समर्पण केले असेल, अगदी समग्र समर्पण केले असेल, तर विरोधी प्रतिक्रिया उमटत नाही. सुखद प्रसंगाबाबत जितके तुम्ही अविचल, शांत, स्थिरचित्त असता, तितकेच तुम्ही असुखद प्रसंगाबाबतदेखील अविचल, शांत, स्थिरचित्त असता. जर एखादी गोष्ट अमुक एका प्रकारे घडली तर बरे होईल, अशी तुमची कल्पना असू शकते, पण जर का ती काही वेगळ्याच पद्धतीने घडली तरी, हे योग्यच झाले, असे तुम्हाला वाटते.
उदाहरणार्थ, तुम्ही एखादी गोष्ट करण्यासाठी पुष्कळ मेहनत घेतलेली असते, काहीतरी घडावे म्हणून, तुम्ही पुष्कळ वेळ दिलेला असतो, तुमची बरीच ऊर्जा, बरीचशी इच्छाशक्ती वापरलेली असते; परंतु, हे सारे ईश्वरी कार्यासाठी खर्च केलेले असते. (याला म्हणतात, अर्पण.) आता असे समजूया की, एवढे सगळे कष्ट घेतल्यानंतर, एवढे सगळे कार्य केल्यानंतर, एवढे सारे प्रयत्न केल्यानंतरही, ती गोष्ट अगदी वेगळ्याच पद्धतीने घडून आली, म्हणजे त्यात यश आले नाही. जर तुम्ही खरोखर समर्पित असाल तर अशा वेळी तुम्ही म्हणाल, “चांगले झाले, हे योग्यच आहे. मला जे करता येणे शक्य होते ते सारे मी केले, जितक्या चांगल्या पद्धतीने करता येणे शक्य होते तितके चांगले केले, आता हा माझा निर्णय नाही, हा ईश्वराचा निर्णय आहे, त्याने जे काही ठरविले आहे ते मी पूर्णतया स्वीकारत आहे.” आणि तेच जर दुसऱ्या बाजूला, जर तुम्ही प्रगाढ आणि सहजस्फूर्त असे समर्पण केलेले नसेल तर तुम्ही स्वतःशीच म्हणता, “हे असे कसे झाले? मी निःस्वार्थीपणे ही गोष्ट केली होती, त्याच्यासाठी इतके कष्ट उपसले होते, त्रास सहन केला होता, तो ईश्वरी कार्यासाठी सहन केला होता आणि आता हे असे फळ पदरी पडले, यश मिळालेच नाही.” शंभरापैकी नव्याण्णव वेळा तरी असेच घडते. म्हणूनच खरेखुरे समर्पण ही खूप अवघड गोष्ट आहे.
– श्रीमाताजी
(CWM 05 : 52-53)