श्रीमाताजी एक आठवण सांगत आहेत : जेव्हा मी पॅरिसमध्ये राहत असे तेव्हा मी सर्व प्रकारच्या स्नेहमेळाव्यांना जात असे; लोक वेगवेगळी संशोधने करत असत; आध्यात्मिक (तथाकथित आध्यात्मिक), गूढवादी संशोधनं इ. जिथे चालत असत तिथे मी जात असे.
एका तरुण स्त्रीला भेटण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आले होते. मला वाटते ती स्वीडिश तरुणी होती; तिला ज्ञानप्राप्तीची, नेमके सांगावयाचे तर शिकण्याची एक पद्धत सापडली होती. ती तिने आम्हाला समजावून सांगितली. आम्ही तिघीचौघी जणी होतो. तिचे फ्रेंच काही तितकेसे बरे नव्हते; पण ती जे काही सांगत होती त्याविषयी तिला बऱ्यापैकी खात्री होती.
ती म्हणाली, “हे बघा, तुम्ही कोणतीही एक वस्तु घ्या; किंवा फळ्यावर कोणतेही एक चिन्ह काढा किंवा एखादे चित्र काढा. – ते काही तितकेसे महत्त्वाचे नाही – तुम्हाला जे काही सोयीचे आहे ते घ्या. समजा, उदाहरणादाखल मी तुमच्यासाठी हे चित्र काढते.. (तिच्यापाशी फळा होता.) हं तर मी चित्र काढले आहे.”
तिने एक अर्धभौमितिक असे चित्र काढले. ”आता, तुम्ही या चित्रासमोर बसा आणि तुमचे सर्व लक्ष या चित्रावर एकवटा – हे जे चित्र तुमच्यासमोर आहे त्यावर तुमचे लक्ष एकवटा. तुमच्या जाणिवेमध्ये त्या चित्राशिवाय दुसरे काहीही येऊ देऊ नका – केवळ तेच तुमच्या जाणिवेमध्ये असू दे.”
तुमचे डोळे त्या चित्रावरच खिळलेले असतात आणि तुम्ही तुमची नजर अजिबात हटवत नाही. तुम्ही जणू काही त्या चित्राने संमोहित झाल्यासारखे असता. तुम्ही पाहता, तुम्ही पाहता, पाहता, पाहता… काहींना कमी अधिक वेळ लागतो, पण ज्याला त्याची सवय आहे त्याच्याबाबतीत हे काहीसे लगेच घडून येते. तुम्ही पाहत राहता, पाहता, पाहता आणि एकाएकी तुम्ही ज्या चित्राकडे पाहत असता ते चित्रच तुम्ही बनून जाता. त्या चित्राविना या जगामध्ये दुसरे काही जणू शिल्लकच राहात नाही आणि तेव्हा एकाएकी तुम्ही दुसऱ्या बाजूला जाता; आणि जेव्हा तुम्ही त्या दुसऱ्या बाजूला जाता तेव्हा तुमचा एका नवीनच चेतनेमध्ये प्रवेश झालेला असतो आणि तुम्हाला ज्ञान होते. हे सारे अद्भुत होते, त्यामुळे आम्ही खूप हसलो. पण हे काहीसे खरे आहे. सराव करण्याजोगी ही एक चांगली पद्धत आहे.
अर्थात, एखादे चित्र किंवा एखादी वस्तु घेण्याऐवजी तुम्ही एखादी कल्पना, काही शब्द घेऊ शकता. तुम्हाला भेडसावणारी एखादी समस्या असते, आणि तुम्हाला त्या समस्येचे उत्तर माहीत नसते. तुम्ही ती समस्या वस्तुनिष्ठपणे मांडा, ती अगदी नेमकी, अचूक मांडा. शक्य असेल तितक्या संक्षिप्त शब्दांमध्ये मांडा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा, प्रयत्न करा. तुम्ही केवळ शब्दांवर लक्ष केंद्रित करता पण शक्य असेल तर ते शब्द ज्याचे प्रतिनिधित्व करतात त्या कल्पनेवर लक्ष केंद्रित करा, म्हणजे त्या समस्येवर लक्ष केंद्रित करा. जोवर दुसरे काही शिल्लकच उरणार नाही तोवर त्यावर लक्ष केंद्रित करा. आणि हे खरे आहे, एकाएकी, तुमच्यामध्ये काहीतरी खुलेपणाची भावना निर्माण होईल आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला असाल. दुसरी बाजू पण कशाची?
ह्याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या जाणिवेचे एक द्वार उघडलेले असते. आणि तुम्हाला ताबडतोब तुमच्या समस्येची उकल होते.
‘व्यक्तीने स्वत:शी एकात्म कसे पावावे’ हे शिकण्याची ही एक उत्तम पद्धत आहे.
– श्रीमाताजी
(CWM 05 : 218-219)