Tag Archive for: संकल्पशक्ती

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३१

कोणतेही साहाय्य नसताना, केवळ स्वतःच्या अभीप्सेच्या आणि संकल्पशक्तीच्या आधारे, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींवर मात करता येईल असे बळ क्वचितच एखाद्याकडे असते. आणि अगदी कोणी जरी अशी मात केलीच तरी त्याला या कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींवर केवळ एका विशिष्ट प्रकारचेच नियंत्रण मिळविता येते, त्यांच्यावर पूर्ण प्रभुत्व मिळविता येत नाही.

कनिष्ठ शक्तींशी सामना करत असताना, आपण ईश्वरी शक्ती‌च्या बाजूचे असावे यासाठी आणि ईश्वरी शक्ती‌चे साहाय्य मिळविता यावे यासाठी (साधकाकडे) संकल्पशक्ती व अभीप्सा असणे आवश्यक असते. आध्यात्मिक संकल्पाची आणि हृदयाच्या आंतरात्मिक अभीप्सेची परिपूर्ती करणारी ईश्वरी शक्तीच केवळ (कनिष्ठ प्रकृतीवर) विजय मिळवू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 721)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३०

साधक एका विशिष्ट अवस्थेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तरी त्याने वैयक्तिकरित्या अभीप्सा बाळगणे आवश्यकच असते. सारे काही आपोआप घडून येत आहे आणि विकासासाठी विशिष्ट ज्ञान व सहमतीचीच तेवढी आवश्यकता आहे अशी अवस्था येत नाही तोपर्यंत तरी, ही वैयक्तिक अभीप्सा आवश्यक असते.

*

ईश्वराला केलेले आवाहन म्हणजे ‘अभीप्सा’ आणि चेतना-शक्तीने प्रकृतीवर टाकलेला दबाव म्हणजे ‘संकल्पशक्ती’.

*

‘अभीप्सा’ म्हणजे शक्तींना केलेले आवाहन. शक्तींकडून जेव्हा त्या आवाहनाला प्रतिसाद मिळतो तेव्हा साधकामध्ये अविचल ग्रहणशीलतेची एक केंद्रिभूत झालेली पण सहजस्फूर्त अशी स्वाभाविक स्थिती असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 58, 57, 57)

भारताचे पुनरुत्थान – १३

पूर्वार्ध

लेखनकाळ : इ.स.१९१०
खरी अडचण ही आपल्या अवतीभोवती नसते; तर ती नेहमी आपल्या स्वत:मध्येच असते. व्यक्तीला अजेय बनविण्यासाठी संकल्पशक्ती, निरपेक्ष वृत्ती (Disinterestedness) आणि श्रद्धा या तीन गोष्टींची आवश्यकता असते. स्वतःला बंधमुक्त करून घेण्याची आपली इच्छा असू शकते, तसा संकल्पही केलेला असू शकतो पण पुरेशा श्रद्धेचा अभाव असू शकतो. आपल्यामध्ये स्वतःच्या परममोक्षाबद्दल श्रद्धा असू शकते पण त्यासाठी आवश्यक असणारी साधने वापरण्यासाठी जी इच्छा लागते त्या इच्छेचा अभाव आपल्याकडे असू शकतो. आणि जरी इच्छा व श्रद्धा या दोन्ही गोष्टी असल्या तरीसुद्धा, त्यांचा अवलंब आपण आपल्या कार्यफलाच्या आसक्तीला चिकटून राहून करत असण्याची शक्यता असते. किंवा तो अवलंब आपण अनिष्टकारक प्रतिक्रिया निर्माण करणाऱ्या द्वेषमूलक आवेगांनी, अंध उत्तेजनेने किंवा घाईघाईने जबरदस्तीने करत असण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच, अशा प्रकारच्या भव्य कार्यामध्ये, (स्वतःला बंधमुक्त करण्यासारख्या कार्यामध्ये) न भूतो न भविष्यति अशा अडथळ्यांवर मात करण्यासाठी म्हणून, मनाच्या आणि शरीराच्या शक्तींहूनही अधिक उच्च असणाऱ्या ‘शक्ती’चा आश्रय घेण्याची आवश्यकता असते. ही साधनेची गरज असते.

ईश्वर आपल्या अंतरंगामध्येच आहे; ‘सर्वशक्तिमान’, ‘सर्वव्यापी’, ‘सर्वज्ञ’ शक्ती’ या रूपामध्ये तो आपल्या अंतरंगामध्ये विराजमान आहे. त्या ईश्वराचे आणि आपले स्वरूप मूलतः एकसमानच आहे. आपण त्याच्या संपर्कात आलो आणि स्वतःला जर त्याच्या हाती सोपविले तर, तो आपल्यामध्ये त्याची स्वतःची शक्ती ओतेल आणि मग, आपल्यामध्येसुद्धा देवत्वाचा अंश आहे, आपल्यामध्ये त्या सर्वशक्तिमानतेचा, सर्वव्यापकत्वाचा आणि सर्वज्ञतेचा काही अंश आहे, ही अनुभूती आपल्याला येईल. मार्ग दीर्घ आहे, पण आत्मसमर्पणामुळे तो जवळचा होतो; मार्ग कठीण आहे पण परिपूर्ण विश्वासामुळे तो सुकर होतो.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 536-537)

तुम्ही जर योगसाधना करत असाल तर, तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तीचा अभाव या गोष्टींना अनुमती देता कामा नये. कारण तसे करणे याचा अर्थ ‘ज्ञान झाले पण त्यापाठोपाठ सक्षमता आली नाही’ असा होतो. एखादी गोष्ट असता कामा नये याची जाणीव होणे आणि तरीदेखील ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे; अशा दुर्बलतेस कोणत्याही गंभीर तपस्येमध्ये थारा दिला जात नाही. अशा संकल्पशक्तीचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो. तुम्हाला कळते की अमुक एक गोष्ट असता कामा नये, तुम्हाला हे ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट शिल्लक राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता. कारण ज्ञान आणि क्षमता, शक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

म्हणजे असे म्हणता येईल, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तीला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुम्ही पौरुषहीन, दुबळे, धैर्यहीन आणि सामर्थ्यहीन ठरता. अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण (अमुक एखादी गोष्ट करणे योग्य नाही हे) माहीत असूनदेखील, तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते.

याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादी अळी दडून बसलेली असते तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला आहे, कसेही करून, त्याला शोधून नष्टच केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी चालवून दिलेली दुर्बलता ही पुढे जाऊन, कधीच सुधारता न येणाऱ्या अडचणींचे कारण ठरते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 221)