Tag Archive for: शिक्षण

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो आजार दिवसेंदिवस अधिक पसरत चाललेला दिसत आहे आणि आता तर आपल्या काळात त्याने उग्र रूप धारण केले आहे; त्याला आपण ‘उपयुक्ततावाद’ (Utilitarianism) म्हणतो. माणसे आणि वस्तू, परिस्थिती आणि कृती, उपक्रम या गोष्टी जणू त्याच दृष्टिकोनातून बघितल्या जातात आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांची पारख केली जाते, असे दिसते. एखादी गोष्ट जर उपयुक्त नसेल तर तिला काही मोलच नसते. जे अजिबात उपयुक्त नाही त्यापेक्षा जे थोडे का होईना उपयुक्त आहे, ते निश्चितच अधिक चांगले आहे. पण यासाठी उपयुक्त म्हणजे काय यावर आधी आपले एकमत व्हावे लागेल; उपयुक्त कोणासाठी, उपयुक्त काय आणि कशासाठी? याची व्याख्या करावी लागेल.

जे मानववंश स्वत:ला सुसंस्कृत समजतात त्यांची अशी समजूत असते की, ज्या गोष्टीमधून पैसा मिळविता येतो, जे अर्थोत्पादन करू शकते ते ते उपयुक्त असते. प्रत्येक गोष्टीचा निर्णय व मूल्यमापन आर्थिक दृष्टिकोनातूनच केले जाते. यालाच मी ‘उपयुक्ततावाद’ म्हणते. आणि हा आजार अत्यंत संसर्गजन्य आहे; इतका की या रोगापासून अगदी लहान मुलांचासुद्धा बचाव होऊ शकलेला नाही.

ज्या वयात मुलांनी सौंदर्य, महानता, पूर्णत्व यांची स्वप्ने पाहिली पाहिजेत त्या वयात, आजची मुले केवळ पैशाची स्वप्ने पाहू लागली आहेत आणि हा पैसा कसा मिळवायचा याचीच त्यांना चिंता लागली आहे. म्हणून मुले जेव्हा अभ्यासाचा विचार करत असतात तेव्हा, त्यांना काय उपयोगी पडू शकेल; म्हणजे काय केले असता, मोठे झाल्यावर त्यांना त्यातून भरपूर पैसा कमावता येईल; याचाच ती अधिक विचार करत असतात.

त्यांच्या दृष्टीने एकच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाची ठरते; आणि ती म्हणजे परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण होण्यासाठी स्वत:ची तयारी करणे; कारण पदविका, प्रमाणपत्र, विविध पदव्या यांच्या साहाय्यानेच केवळ त्यांना चांगली अधिकार-पदे प्राप्त होऊ शकतील आणि त्यातूनच ते भरपूर पैसा कमावू शकतील. त्यांच्या दृष्टीने अभ्यासाचा इतर कोणताच हेतू नसतो, त्या व्यतिरिक्त त्यांना अभ्यासात काहीही स्वारस्य नसते.

ज्ञानासाठी ज्ञान मिळविणे; प्रकृतीचे आणि जीवनाचे रहस्य जाणून घेण्यासाठी अभ्यास करणे; चेतनेचा विकास घडविण्यासाठी स्वतःला शिक्षित करणे; आत्मप्रभुत्व मिळविण्यासाठी स्वयंशिस्त लावणे; स्वत:च्या दुर्बलता, अक्षमता व अज्ञान यांवर मात करणे; अधिक उदात्त व विशाल, अधिक उदार व अधिक सच्च्या अशा ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी स्वत:ची तयारी करणे…. या साऱ्याचा आजची मुले क्वचितच विचार करतात आणि या साऱ्या गोष्टींना ते फार आदर्शवादी, कल्पनारम्य असे मानतात. व्यावहारिक बनणे, पैसा कसा कमवावयाचा हे शिकणे आणि त्यासाठी स्वत:ला तयार करणे फक्त याच गोष्टी त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात.

– श्रीमाताजी [CWM 12 : 351-352]

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने स्वतःची प्रगती केली पाहिजे, गुणांची जोपासना केली पाहिजे, स्वतःच्या दोषांवर मात केली पाहिजे. स्वतःला अज्ञान आणि अक्षमतेमधून बाहेर काढण्यासाठी मिळालेली एक संधी या दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. व्यक्तीने असे केले तर मग जीवन विलक्षण स्वारस्यपूर्ण होईल आणि मग त्यासाठी कष्ट सोसणे अधिक श्रेयस्कर होईल.

*

सर्वसाधारणपणे सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, इंद्रियांना वळण लावणे, शिक्षण घेणे, संस्कृती जोपासणे या सर्व गोष्टी म्हणजे असंस्कृत उपजत प्रेरणा, इच्छावासना आणि कामना यांमध्ये सुधारणा घडविण्याची साधनं असतात. या प्रेरणा, इच्छावासना, कामनादी गोष्टींना नष्ट करणे हा त्यावरचा उपाय नाही; तर त्यांच्यामध्ये सुसंस्कृतता आणली पाहिजे, त्यांची जोपासना विचारपूर्वक केली पाहिजे, त्यांच्यामध्ये उच्च अभिरुची रुजवली पाहिजे. त्यांच्यामध्ये सुधारणा घडविण्याचा हा सर्वात खात्रीचा मार्ग आहे. चेतनेची प्रगती आणि विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांच्या वाढीस जास्तीत जास्त वाव दिला पाहिजे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुसंवादाची जाणीव वाढीस लागू शकेल; आकलनात नेमकेपणा येऊ शकेल. तो मानवाच्या शिक्षणाचा आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असतो.

– श्रीमाताजी (CWM 12 : 124, 120-121)

(‘श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ या श्रीअरविंद आश्रमाच्या शाळेमध्ये मुलांच्या आंतरात्मिक आणि आध्यात्मिक विकासाला पोषक असे वातावरण मिळते. येथेच श्रीमाताजींच्या प्रेरणेतून ‘फ्री प्रोग्रेस एज्युकेशन’ या नवीन शिक्षणपद्धतीचा उदय झाला. प्रचलित शिक्षणपद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने शिक्षण देताना या शाळेतील शिक्षकांना काही अडचणी येत असत, त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागत असे. अशा वेळी श्रीमाताजी त्यांना विविध उपाययोजना सुचवत असत; त्यांना मार्गदर्शन करत असत. त्यापैकीच हा अंशभाग..)

व्यक्तीमधील परिपूर्णतेची क्षमता सर्वोच्च शक्यतेपर्यंत वाढविणे हे (आपल्या) शिक्षणाचे ध्येय आहे; व्यक्तीला जीवनामध्ये किंवा समाजामध्ये केवळ यशस्वी होण्यासाठी तयार करणे हे शिक्षणाचे ध्येय नाही.

*

केवळ यश मिळविणे हे उद्दिष्ट ठेवू नका; आपले ध्येय परिपूर्णत्व हे आहे. तुम्ही एका नूतन जगाच्या उंबरठ्यावर उभे आहात (आणि एवढेच नव्हे तर,) तुम्ही त्याच्या उदयामध्ये सहभागी होत आहात आणि त्याच्या निर्मितीमध्ये तुम्ही साधनभूत होत आहात हे कधीही विसरू नका. रूपांतरणाइतकी (transformation) दुसरी कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही. त्याच्या इतकी उपयुक्त अशी इतर कोणतीच गोष्ट नाही.

– श्रीमाताजी (CWM 12 : 120)

(श्रीअरविंद येथे भारतीय परंपरेतील वर्णाश्रम व्यवस्थेविषयी तपशील आणि त्या पाठीमागे असलेला विचार समजावून सांगत आहेत. व्यक्तीने या समाजव्यवस्थेमध्ये राहून, समाजऋण फेडून स्वतःचा विकास करून घेत, अध्यात्मप्रांतांत मार्गक्रमण करायचे असते; प्राचीन काळी असलेल्या या व्यवस्थेविषयी ते लिहितात…)

भारतीय प्रणालीने व्यक्तीला एक चौकट आखून दिली आहे. या प्रणालीने व्यक्तीला तिच्या जीवनासाठी एक श्रेणीबद्ध रचना आखून दिली आहे आणि व्यक्तीला उन्नती करण्यासाठी एक प्रकारच्या शिडीसारखा या प्रणालीचा उपयोग होऊ शकतो. अशा प्रकारची विलक्षण सोय हे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चार आश्रमांचे उद्दिष्ट होते. जीवनाचे हे विभाजन स्वाभाविक अशा चार कालावधींमध्ये करण्यात आले होते आणि जीवनविषयक ही जी सांस्कृतिक कल्पना होती ती प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने यातील प्रत्येक टप्प्याची आखणी करण्यात आली होती. विद्यार्थिदशेचा एक कालावधी असे, गृहस्थजीवनाचा एक कालावधी असे, एकांतवासात राहण्याचा किंवा अरण्यवास स्वीकारून राहण्याचा एक कालावधी असे आणि नंतर सामाजिक जीवनापासून मुक्त होऊन राहण्याचा, परिव्राजकावस्थेचा असा एक कालावधी असे.

ब्रह्मचर्याश्रम

मनुष्याने जीवनामध्ये जे जाणून घेणे आवश्यक आहे, जे करणे आणि जे बनणे आवश्यक आहे त्या गोष्टी करण्यासाठी आवश्यक अशी पायाभरणी विद्यार्थिजीवनात केली जात असे. आवश्यक असणाऱ्या कला, शास्त्रं, ज्ञानशाखा यांचे तपशिलवार ज्ञान त्याला दिले जात असे. आणि त्याच वेळी मनुष्याच्या नैतिक प्रकृतीला वळण लावण्यावर अधिक भर दिला जात असे. आध्यात्मिक ज्ञानाची जी वैदिक सूत्रं होती त्यामध्ये व्यक्तीने पारंगत असावे, हा प्रारंभिक काळामध्ये एक अनिवार्य घटक असे.

प्राचीन काळामध्ये हे सर्व शिक्षण शहरी जीवनाच्या धकाधकीपासून दूर आणि त्या शिक्षणाला अनुकूल असणाऱ्या वातावरणामध्ये दिले जात असे. जी व्यक्ती या जीवनचक्रातून यशस्वीरित्या पार झाली आहे अशी व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत असे. ज्या व्यक्तीला काही लक्षणीय आध्यात्मिक ज्ञानाचा साक्षात्कार झाला आहे, अशी व्यक्तीच बरेचदा शिक्षकपदी कार्यरत असे. परंतु कालांतराने शिक्षण हे अधिकाधिक बौद्धिक व ऐहिक स्वरूपाचे होत गेले. ते शहरांमध्ये व विद्यापीठांमध्ये दिले जाऊ लागले. हळूहळू चारित्र्याच्या आंतरिक तयारीपेक्षा व ज्ञानापेक्षा, बुद्धीच्या प्रशिक्षणावर आणि शिक्षणावर भर देण्यात येऊ लागला. प्राचीन काळी आर्यांची अर्थ, काम, धर्म व मोक्ष या जीवनाच्या चारही महान उद्दिष्टांबाबत तयारी झालेली असे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 20 : 174-175)

भारताचे पुनरुत्थान – १५

(इ. स. १९१८ साली ‘राष्ट्रीय शिक्षण सप्ताहा’निमित्त श्री. अरविंद घोष यांनी दिलेला संदेश)

हा असा काळ आहे की, जेव्हा अखिल जगाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती आणि त्याची पावले कोणत्या दिशेने वळण घेणार आहेत हे येणाऱ्या शतकासाठी म्हणून दमदारपणाने निर्धारित केले जात आहे. आणि हे निर्धारण कोणत्या एखाद्या सामान्य शतकासाठीचे नाही तर, ज्या शतकामध्ये मानवसृष्टीच्या आंतरिक व बाह्य इतिहासाच्या दृष्टीने प्रचंड उलथापालथी व्हायच्या आहेत असे हे शतक आहे आणि हे एक महान निर्णायक वळण आहे.

आपण आत्ता ज्या कृती करू त्यानुसार, त्या कर्मांची मधुर फळे आपल्याला प्रदान केली जाणार आहेत. आत्ताच्या या निर्णायक क्षणी देण्यात आलेली अशा प्रकारची प्रत्येक हाक ही आपल्या देशवासीयांच्या अंतरात्म्याला देण्यात आलेली ही एक संधी असणार आहे; देशवासीयांना इथे एक (जाणीवपूर्वक) निवड करावी लागणार आहे आणि त्याबरोबरच, ती त्यांच्यासाठी एक कसोटीदेखील असणार आहे. ती हाक प्रत्येकाच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च उंचीपर्यंत जाऊन पोहोचेल आणि त्याच्या पारड्यात ‘नियतीच्या स्वामी’चे अगदी उघडपणाने झुकते माप पडेल, अशी आपण सदिच्छा बाळगू या.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 413)

विचार शलाका – १३

खऱ्या शिक्षणाबाबत पहिले तत्त्व हे आहे की, काहीही शिकविता येत नाही. शिक्षक हे प्रशिक्षक किंवा काम करवून घेणारे नसतात, ते साहाय्यक आणि मार्गदर्शक असतात. त्यांनी सुचवायचे असते; लादायचे नसते. ते खरंतर, विद्यार्थ्याच्या मनाला प्रशिक्षण देत नाहीत, तर ज्ञानाची साधने परिपूर्ण कशी करावीत हे फक्त ते विद्यार्थ्याला दाखवून देतात आणि या प्रक्रियेमध्ये त्याला प्रोत्साहन देतात. ते विद्यार्थ्याला ज्ञान प्रदान करत नाहीत, तर ज्ञान स्वत:च कसे प्राप्त करून घ्यायचे हे त्याला दाखवितात. ते विद्यार्थ्याच्या अंतरंगातील ज्ञान बाहेर काढत नाहीत तर, ते ज्ञान कोठे आहे हे फक्त दाखवून देतात आणि ते पृष्ठभागी आणण्याची सवय कशी लावता येईल, हे विद्यार्थ्याला दाखवतात.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 384)

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो आजार दिवसेंदिवस अधिक पसरत चाललेला दिसत आहे आणि आता तर आपल्या काळात त्याने उग्र रूप धारण केले आहे; त्याला आपण ‘उपयुक्ततावाद’ म्हणतो. माणसे आणि वस्तू, परिस्थिती आणि कृती, उपक्रम या गोष्टी जणूकाही केवळ त्याच दृष्टिकोनातून बघितल्या जातात आणि जोखल्या जातात असे वाटते. जर एखादी गोष्ट उपयुक्त नसेल तर तिला काही मोलच नसते. जे अजिबात उपयुक्त नाही त्यापेक्षा काहीतरी जे उपयुक्त आहे ते निश्चितच अधिक चांगले आहे. पण यासाठी उपयुक्त म्हणजे काय यावर आधी आपले एकमत व्हावे लागेल – उपयुक्त कोणासाठी, उपयुक्त काय आणि कशासाठी ? ह्याची व्याख्या करावी लागेल.

जे मानववंश स्वत:ला सुसंस्कृत समजतात त्यांची अशी समजूत असते की, जे जे काही पैशाला आकर्षित करून घेऊ शकते, पैसा मिळवू शकते, पैसा उत्पन्न करू शकते ते ते उपयुक्त होय. प्रत्येक गोष्टीचा निर्णय व मूल्यमापन आर्थिक दृष्टिकोनातूनच केले जाते. ह्यालाच मी ‘उपयुक्ततावाद’ म्हणते.

आणि हा आजार खूपच संसर्गजन्य आहे कारण या रोगापासून अगदी लहान मुलांचासुद्धा बचाव होऊ शकलेला नाही. ज्या वयात मुलांनी सौंदर्य, महानता, पूर्णत्व यांची स्वप्ने पाहावयास हवीत, त्या वयात आजची मुले केवळ पैशाची स्वप्ने पाहू लागली आहेत आणि त्यांना चिंता आहे ती हा पैसा मिळवायचा कसा ह्याची.

म्हणून जेव्हा ती मुले अभ्यासाचा विचार करीत असतात, तेव्हा सर्वात जास्त ती ह्याच गोष्टीचा विचार करीत असतात की त्यांना काय उपयोगी पडू शकेल. काय केले असता, मोठे झाल्यावर त्यांना त्यातून भरपूर पैसा कमावता येतील. त्यांच्यालेखी एकच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाची ठरते ती म्हणजे परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण होण्यासाठी स्वत:ची तयारी करणे; कारण पदविका, प्रमाणपत्र, विविध पदव्या यांच्या साहाय्यानेच केवळ त्यांना चांगले हुद्दे प्राप्त होऊ शकतील आणि ते त्यातूनच भरपूर पैसा कमावू शकतील. त्यांच्यालेखी अभ्यासाचा इतर कोणताच हेतू नसतो, त्याव्यतिरिक्त त्यांना अभ्यासात काही स्वारस्यही नसते.

ज्ञानासाठी ज्ञान मिळविणे, प्रकृती आणि जीवनाचे रहस्य जाणून घेण्यासाठी अभ्यास करणे, जाणिवेचा विकास घडविण्यासाठी स्वतः शिकणे, स्वत:च स्वत:चा स्वामी बनण्यासाठी स्वयंशिस्त लावणे, स्वत:च्या दुर्बलता, अक्षमता व अज्ञान यांवर मात करणे, अधिक उदात्त व विशाल, अधिक उदार व अधिक सच्च्या अशा ध्येयाच्या दिशेने मार्गप्रवण होणे…. या साऱ्याचा आजची मुले क्वचितच विचार करतात आणि या साऱ्या गोष्टींना ते फार आदर्शवादी, कल्पनारम्य असे मानतात. व्यावहारिक बनणे, पैसा कसा कमवावयाचा हे शिकणे आणि त्यासाठी स्वत:ला तयार करणे फक्त ह्याच गोष्टी त्यांच्या लेखी महत्त्वाच्या असतात.

जे अधिक उन्नत आणि चांगल्या जीवनाची आकांक्षा बाळगतात, जे ज्ञान व पूर्णत्वासाठी तहानलेले असतात, येणाऱ्या अधिक पूर्ण सत्य अशा भविष्यकाळाची जे आतुरतेने वाट पाहतात केवळ अशीच मुले येथे आम्हाला हवी आहेत. इतरांसाठी बाहेरील जगामध्ये भरपूर जागा आहे.

– श्रीमाताजी