Posts

तुम्ही कोण होतात त्याचा विचार करू नका, तर तुम्ही जे बनण्याची आस बाळगून आहात त्याचाच विचार करा; तुम्ही जे साध्य करू इच्छिता त्यामध्येच पूर्णतः राहा. तुमच्या मृत भूतकाळाकडे पाठ फिरवा आणि थेट भविष्याकडे पाहा.

– श्रीमाताजी
(CWM 03:84)

लोक काय करतात, काय विचार करतात किंवा काय म्हणतात याने व्यथित होणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे आणि व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्व, केवळ ईश्वराच्याच प्रभावाखाली आले नसल्याचा आणि ते पूर्णतः ईश्वराभिमुख झाले नसल्याचा तो पुरावा आहे.

– श्रीमाताजी
(CWM 14:279)

प्रामाणिकपणा – ३६

आपण ‘ईश्वरा’ला फसवू शकत नाही हे आपल्याला कळते. अत्यंत हुशार असा ‘असुर’सुद्धा ‘ईश्वरा’ला फसवू शकत नाही. पण हे सारे समजत असूनदेखील, आपण पाहतो की, जीवनात बरेचदा – दिवसाच्या धावपळीत आपण स्वत:लाच फसविण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला त्याची जाणीवसुद्धा नसते, अगदी सहजपणे, अगदी आपोआप आपण अशी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. व्यक्ती नेहमीच स्वत:च्या कृतींचे समर्पक समर्थन करते, स्वत:च्या शब्दांबद्दल व कृतींबद्दल समर्थन देते. सुरुवाती सुरुवातीला नेहमी हेच घडते. भांडणांसारख्या गोष्टींविषयी मी येथे बोलत नाहीये; मी दैनंदिन जीवनातील बारकाव्याच्या गोष्टी सांगत आहे. नेहमी चुकतो तो दुसराच व चूक दुसऱ्यानेच केलेली असते, असे प्रत्येक जण समजत असतो.

मला एक असे मूल माहीत आहे, की जे स्वत:च खेळता-खेळता एका दारावर धडकले आणि नंतर मात्र त्यानेच त्या दाराला जोरात लाथ मारली. ही गोष्टही अशीच आहे. नेहमी चुकतो तो दुसराच व चूक त्या दुसऱ्यानेच केलेली असते. बाल्यावस्था पार केल्यावर जराशी समज आल्यावर देखील तुम्ही स्वत:चे समर्थन करताना अगदी असाच मूर्खपणा करता आणि म्हणता, “त्याने जर तसे केले नसते तर मी पण असा वागलो नसतो.’’ पण वास्तविक, हे याच्या अगदी उलट असायला हवे. समजा तुमच्या बरोबर कोणी आहे आणि जर तुम्ही प्रामाणिक असाल, तर तुमची स्वाभाविक प्रतिक्रिया जे योग्य आहे तेच करण्याची असली पाहिजे, भले मग तुमच्या सोबतची ती व्यक्ती, तसे करो वा न करो. यालाच मी ‘प्रामाणिक असणे’ असे म्हणते.

एक अगदी साधेसे उदाहरण घेऊ या. समजा एखाद्याला तुमचा राग आला तर, उलटून परत त्याला दुखावणाऱ्या, बोचणाऱ्या गोष्टी न बोलता, तुम्ही काहीच न बोलता, शांत राहिलात तर तुम्हाला त्याच्या रागाचा संसर्ग होत नाही. आणि तुम्ही स्वतःचेच निरीक्षण करून पाहिलेत तर, तुमच्या लक्षात येईल की, असे करणे किती अवघड आहे. ही बाब तशी अगदी प्राथमिक स्वरूपाची आहे, आपण प्रामाणिक आहोत किंवा नाही हे जाणण्यासाठीची ही एक छोटीशी सुरुवात आहे. आणि ज्या कोणाला प्रत्येक गोष्टीचा लगेचच संसर्ग होतो, जे अगदी हलक्या प्रतीचे विनोद करतात किंवा इतरांसारखाच मूर्खपणा करतात त्यांच्याविषयी तर मी बोलतच नाहीये. मी तुम्हाला सांगते : तुम्ही तुमची वृत्ती कितीही प्रामाणिक राखण्याचा प्रयत्न करत असाल तरीसुद्धा, जर तुम्ही भेदकपणे स्वतःचे निरीक्षण केलेत तर, शेकडो वेळा तरी तुम्हाला स्वतःमधील अप्रामाणिकपणा आढळून येईल. तेव्हा प्रामाणिकपणे वागणे हे किती कठीण असते हे तुमच्या लक्षात येईल.

– श्रीमाताजी [CWM 05 : 06]

प्रामाणिकपणा – १७

मी अनेकदा सांगत असते की, पूर्णपणे प्रामाणिक व्हा. स्वतःलादेखील फसविण्याचा कधीही प्रयत्न करू नका, स्वत:बद्दल असे कधीही म्हणू नका की, ‘मला जे जे करता येण्यासारखे होते ते सारेकाही मी केले आहे.’ उद्या जर तुम्ही यशस्वी झाला नाहीत, तर त्याचा अर्थ असा होईल की, जे करण्यासारखे होते ते सारे तुम्ही केले नव्हते. कारण तुम्हाला जे जे करता येणे शक्य होते ते ते ‘सारे’ तुम्ही खरोखरच केले असते, तर तुम्हाला निश्चितच यश मिळाले असते.

– श्रीमाताजी [CWM 04 : 73-74]

प्रामाणिकपणा – ०९

तडजोडविरहित प्रामाणिकपणा हा आध्यात्मिक सिद्धीचा खात्रीशीर मार्ग आहे.
ढोंग करू नका – प्रामाणिक बना.
केवळ आश्वासने देऊ नका – तशी कृती करा.
नुसती स्वप्ने बघू नका – ती प्रत्यक्षात उतरवा.

*

पूर्णपणे प्रामाणिक व्हा; म्हणजे कोणत्याही विजयापासून तुम्हाला वंचित केले जाणार नाही.

– श्रीमाताजी [CWM 14 : 66]

प्रामाणिकपणा – ०५

….केवळ बाहेरून चांगले ‘दिसण्यापेक्षा’ प्रत्यक्षात तसे ‘असणे’ अधिक बरे. आपला प्रामाणिकपणा जर परिपूर्ण आणि निर्दोष असेल, तर आपण चांगले आहोत असे दाखविण्याची गरज नाही. आणि ‘परिपूर्ण प्रामाणिकपणा’ म्हणजे आम्हाला असे म्हणायचे आहे की, आपले सर्व विचार, भावना, संवेदना आणि कृती यांमधून अन्य काही नाही तर, फक्त आपल्या अस्तित्वाचे मध्यवर्ती ‘सत्-तत्त्व’च आविष्कृत झाले पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 12 : 268]

कर्म आराधना – ५३

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे आणि प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ‘ईश्वरी उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म ही एक उत्तम संधी प्रदान करते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.
*
कर्माच्या माध्यमातून योगसाधना हा पूर्णयोगाच्या साधनेच्या प्रवाहामध्ये प्रवेश करण्याचा सर्वांत सोपा आणि सर्वांत अधिक प्रभावी मार्ग आहे.

– श्रीअरविंद
[CWSA 32 : 247], [CWSA 32 : 256-257]

कर्म आराधना – ५२

साधकासाठी बाह्य संघर्ष, अडचणी, संकटे या गोष्टी म्हणजे अहंकार आणि रजोगुणात्मक इच्छा यांच्यावर मात करण्याची आणि नि:शेष समर्पण साध्य करून घेण्याची केवळ साधने असतात. व्यक्ती जोपर्यंत यशावर भर देत असते तोपर्यंत ती व्यक्ती अंशतः का होईना पण अहंकारासाठी कर्म करत असते; आणि ते दाखवून देण्यासाठी तसेच पूर्ण समता यावी म्हणून अडीअडचणी आणि बाह्य अपयश या गोष्टी येत राहतात. विजय-शक्ती प्राप्त करून घेऊच नये, असा याचा अर्थ नाही; परंतु केवळ नजीकच्या कार्यातील यश हीच काही सर्वस्वी महत्त्वाची गोष्ट नाही; ग्रहण करण्याची क्षमता आणि एक महत्तर, अधिक महत्तर सुयोग्य दृष्टी प्रक्षेपित करण्याची क्षमता आणि आंतरिक ‘शक्ती’चे विकसन याच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. आणि हे सारे अतिशय शांतपणे आणि धीराने, नजीकच्या विजयामुळे उत्तेजित न होता किंवा अपयशाने खचून न जाता केले पाहिजे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 241-242]

कर्म आराधना – ५१

व्यावहारिक कर्म आपल्या योगाशी विसंगत नाही. शांती आणि ज्ञानाच्या आधारावर कर्म चालू राहिले पाहिजे. ते जाणीवपूर्वक आणि शांतचित्ताने केलेले असले पाहिजे. ज्यामध्ये खूप लोकांचा संबंध नाही, जे काम एकट्याने पूर्ण करणे शक्य आहे अशा प्रकारचे एखादे काम व्यक्ती हाती घेऊ शकते. उदाहरणार्थ, तशा प्रकारचे एखादे बौद्धिक काम किंवा एखादे शारीरिक काम हे या योगामध्ये करता येऊ शकते. अशी एक वेळ येऊ शकते की, जेव्हा सर्व कामधाम सोडून द्यावे लागेल; पण अशा स्थितीची उपयुक्तता तात्कालिक असते. त्या कालावधीमध्ये व्यक्तीने प्रकर्षाने एकाग्रतापूर्ण साधना केली पाहिजे.

दुसरी गोष्ट अशी की, व्यक्ती जेव्हा चेतनेच्या दुसऱ्या स्तरावर उन्नत होते तेव्हा तिचा समग्र दृष्टिकोनच बदललेला आहे, असे तिला आढळून येते. या अवस्थेमध्ये ती आधीचे बौद्धिक काम पूर्वीप्रमाणेच पुढे कायम करू शकेल असे नाही. उच्चतर चेतना कार्य करण्यास सुरुवात करेपर्यंत व्यक्तीला वाट पाहावी लागते. अर्थात, एकदा का व्यक्तीचे समग्र व्यक्तित्व रूपांतरित झाले की, तिला जीवनाच्या सर्व स्तरांचा स्वीकार करावा लागतो आणि उच्चतर चेतनेचे या जीवनात आविष्करण करावे लागते.

– श्रीअरविंद
[Evening talks : 179-180]

कर्म आराधना – ५०

भौतिक वस्तुंमध्ये चेतना असते. मनुष्यामध्ये किंवा प्राण्यामध्ये जशी चेतना असते आणि जसा प्राण असतो तशी चेतना किंवा तसा प्राण भौतिक वस्तुंमध्ये नसतो हे आपल्याला माहीत आहे, परंतु त्यांच्यामध्येही गुप्त रूपाने आणि खरीखुरी चेतना असते. आणि म्हणूनच आपण भौतिक वस्तुंना योग्य तो मान दिला पाहिजे आणि आपण त्यांचा योग्य रीतीने वापर केला पाहिजे, त्यांचा गैरवापर किंवा अपव्यय करता कामा नये, त्यांचा वाटेल तसा वापर करता कामा नये; त्यांची हाताळणी निष्काळजीपणे करता कामा नये.

केवळ मनच नव्हे तर, आपली स्वतःची शारीरिक चेतना जेव्हा तिच्या अंधकारातून बाहेर पडते आणि सर्व वस्तुमात्रांच्या ठायी असलेल्या ‘एकमेवाद्वितीया’ची, सर्वत्र असलेल्या ‘ईश्वरा’चीच जेव्हा तिला जाणीव होते तेव्हा सर्व काही सचेत किंवा जिवंत असल्याची जाणीव व्यक्तीला होते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 287-288]