Tag Archive for: व्यावहारिक जीवन

सर्व आजार हे संतुलनातील बिघाड दर्शवितात. याला कोणताही अपवाद नाही, पण या संतुलनातील बिघाडांचे अनेक प्रकार असतात. मी आत्ता फक्त शरीराबद्दलच बोलत आहे, मी प्राणाच्या नाडीगत आजारांबद्दल किंवा मानसिक आजारांबाबत बोलत नाहीये. ते आपण नंतर पाहू. आत्ता आपण फक्त या गरीबबिचाऱ्या लहानशा शरीराबद्दल बोलत आहोत. आणि मी म्हटले त्याप्रमाणे, सर्व आजार, अगदी सर्व आजार, मग ते कोणतेही असू देत, मी त्यामध्ये अगदी अपघातसुद्धा समाविष्ट करेन, ह्या साऱ्या गोष्टी संतुलन बिघडल्यामुळे होतात.

म्हणजे असे की, तुमच्या शरीराचे सगळे अवयव, सगळे सदस्य आणि तुमच्या शरीराचे सर्व भाग हे एकमेकांशी सुसंवादी स्थितीत असतील तर, तुम्ही पूर्ण निरोगी स्थितीत असता. पण जर का कोठे अगदी थोडेसेही असंतुलन घडून आले तर, लगेच तुम्ही थोडेसे किंवा जास्त आजारी पडता, अगदी खूप जास्तसुद्धा आजारी पडता, अन्यथा मग अपघात तरी घडून येतो. जेव्हा जेव्हा आंतरिक असंतुलन असते, तेव्हा नेहमीच या गोष्टी घडून येतात.

पण तेव्हाही, तुम्ही शारीरिक संतुलनाला प्राणाच्या आणि मनाच्या संतुलनाची जोड दिली पाहिजे. सर्व प्रकारच्या गोष्टी सुरक्षितपणे करता येणे शक्य व्हावे यासाठी, म्हणजे तुमच्या बाबतीत कोणताही अपघात घडून येऊ नये म्हणून, तुमच्याकडे मानसिक, प्राणिक आणि शारीरिक असे तिहेरी संतुलन असायलाच हवे; आणि ते संतुलन केवळ प्रत्येक भागातच असून उपयोगाचे नाही; तर पुन्हा ते तीनही भाग परस्परांशीही सुसंवादी असायला हवेत.

…इथेच या समस्येचे निराकरणही आहे. अशी असंख्य संयुगे (combinations) असतात आणि परिणामतः आजारपणाची कारणेही असंख्य असतात आणि अपघातांची कारणेही अगणित असतात. तरीही आपल्याला समजून घेणे सोपे व्हावे म्हणून, आपण त्याचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

पहिली कोणती गोष्ट आवश्यक असेल तर ती म्हणजे, सर्वत्र पूर्ण समता राखणे आणि अस्वस्थ चिंताजनक विचारांना किंवा निराशेला तुमच्यामध्ये प्रवेश न करू देणे. एन्फ्लुएंझाच्या या तीव्र हल्ल्यानंतर, अशक्तपणा येणे किंवा बरे होण्याच्या प्रगतीमध्ये चढउतार असणे हे अगदी स्वाभाविक आहे. तुम्ही काय केले पाहिजे, तर शांत आणि विश्वासाने राहिले पाहिजे, कोणतीही काळजी करता कामा नये किंवा अस्वस्थ होता कामा नये. अगदी पूर्णपणे शांत राहिले पाहिजे आणि आवश्यक तेवढी विश्रांती घेण्यास तयार असले पाहिजे. चिंता करण्यासारखे काही नाही; विश्रांती घ्या म्हणजे आरोग्य आणि सामर्थ्य पुन्हा प्राप्त होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 587)

व्यक्ती निश्चितपणे आजारपणावर आतून कार्य करू शकते आणि तो आजार बरा करू शकते. फक्त एवढेच की, हे नेहमीच सोपे असते असे नाही. कारण जडभौतिकामध्ये खूप प्रतिरोध असतो, तो जडत्वाचा विरोध असतो. येथे अथक असे प्रयत्नसातत्य आवश्यक असते. प्रथमतः व्यक्तीला त्यात कदाचित सपशेल अपयश येईल किंवा आजाराची लक्षणे वाढतील; पण हळूहळू शरीरावरील किंवा एखाद्या विशिष्ट आजारावरील नियंत्रण दृढ होत जाईल. त्यातही, आजारपणाचा कधीतरी झालेला हल्ला असतो, तो आंतरिक साधनांनी बरा करणे तुलनेने अधिक सोपे असते; पण भविष्यातही त्या आजारापासून शरीर सुरक्षित ठेवणे हे अधिक अवघड असते.

दीर्घकालीन आजार असेल, तर तो बरा करण्यास अधिकच कठीण असतो, शरीराच्या अधूनमधून उद्भवणाऱ्या तक्रारींपेक्षा, असे जुनाट आजार शरीरातून पूर्णपणे नाहीसे होण्यास अधिक नाखूष असतात. जोवर शरीरावरील नियंत्रण हे सदोष असते, तोपर्यंत आंतरिक शक्तीच्या वापरामध्ये या सर्व व इतर अपूर्णता आणि अडचणी राहणारच. आंतरिक कार्याच्या आधारे, जरी तुम्ही आजारपण वाढू देण्यापासून रोखू शकलात, तरी पुष्कळ झाले; जोपर्यंत तुम्ही तो आजार पूर्ण बरा करण्याच्या क्षमतेचे होत नाही तोपर्यंत, ‘अभ्यासा’ने तुम्हाला ती आंतरिक शक्ती अधिक बळकट करत नेली पाहिजे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, जोपर्यंत ती आंतरिक शक्ती संपूर्णतया तिथे कार्यरत नसेल तोपर्यंत, भौतिक उपचारांची मदत घेणे सोडता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 579-580)

श्रीअरविंद एका साधकाला पत्रात लिहितात की, शक्तीच्या साहाय्याने तुम्हाला बरे व्हायचे असेल तर, त्यातील मुख्य अडथळा म्हणजे तुमच्या स्वतःच्या प्राणिक हालचाली. तुमच्या स्वतःच्या कल्पना, दावे, अग्रक्रम यावर अहंयुक्त भर – तुमच्या स्वतःच्या नीतिपरायणतेबद्दलची तुमची प्रौढी आणि दुसऱ्या बाजूला इतरांचा दुष्टपणा, तक्रारी, भांडणे, वादविवाद, तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांविषयीचा द्वेष आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया – ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या यकृतावर, पोटावर व नसांवर परिणाम झाला आहे.

जर तुम्ही या साऱ्या गोष्टी सोडून द्याल आणि शांतपणे जगाल, इतरांबरोबर शांतिपूर्ण रीतीने जगाल, स्वतःविषयी आणि इतरांविषयी कमी विचार करत आणि ईश्वराचा जास्त विचार करत जगाल तर, गोष्टी अधिक सोप्या होतील आणि तुमची तब्येत सुधारण्यास मदत करतील. आजारपणाला सामोरे जाताना, मनाची शांतचित्तता देखील आवश्यक आहे. कारण मनाची चलबिचल शक्तीचे कार्य थांबविते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 579)

आजारपणाचे हल्ले हे कनिष्ठ प्रकृतीचे किंवा विरोधी शक्तींचे हल्ले असतात, ते प्रकृतीमधील एखाद्या उघड्या भागाचा किंवा प्रकृतीकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा किंवा कोणत्यातरी दुर्बलतेचा फायदा घेऊ पाहातात – इतर सगळ्या बाहेरून आत येणाऱ्या गोष्टींप्रमाणेच हे हल्लेही बाहेरून होतात आणि ते परतवूनच लावावे लागतात. जर व्यक्तीला त्यांच्या येण्याची संवेदना होऊ शकली आणि ते शरीरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच व्यक्तीने त्यांना बाहेर फेकून द्यायची सवय लावून घेतली असेल आणि सामर्थ्य प्राप्त करून घेतले असेल तर, अशी व्यक्ती आजारपणापासून मुक्त राहू शकते.

कधी हा हल्ला आतून उद्भवल्यासारखाही जाणवतो, त्याचा अर्थ एवढाच की, त्याची जाणीव तुम्हाला तो अवचेतनेमध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी झालेली नव्हती; एकदा का तो अवचेतनेपर्यंत गेला की, त्याने स्वतःसोबत जी शक्ती आणली होती, ती शक्ती आज ना उद्या तेथून उद्भवतेच आणि तुमच्या शारीर प्रणालीवर आक्रमण करतेच. त्या आजाराने आत प्रवेश केल्यानंतरच तुम्हाला त्याची जाणीव झाली; याचे कारण असे की, तो आजार अवचेतनाद्वारे न उद्भवता, त्याने थेटपणे आत प्रवेश केला होता, कारण तो तुमच्या बाहेर असताना तुम्ही त्याला ओळखू शकला नव्हतात.

बऱ्याचदा आजारपण असेच येते, समोरून, किंवा बऱ्याचदा बाजूने, अगदी जाणवेल असे थेटपणे, आपल्या संरक्षणाच्या मुख्य चिलखतामधून म्हणजे आपल्या सूक्ष्म प्राणिक आवरणाला भेदून ते आजारपण आत प्रवेश करते; परंतु ते जडभौतिक शरीरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच या सूक्ष्म प्राणिक आवरणामध्येच त्याला थोपविता येणे शक्य असते. अशा वेळी तुम्हाला त्याचा काहीसा परिणाम जाणवू शकतो, म्हणजे उदा. तापाची कणकण किंवा थंडी वाजून आल्यासारखे होऊ शकते, परंतु, तरीही अशा वेळी त्या आजाराचे पूर्ण आक्रमण होत नाही. जर ते आजारपण आधीच रोखता आले किंवा व्यक्तीच्या प्राणिक आवरणानेच त्याला प्रतिकार केला आणि ते आवरण स्वतः सुदृढ, दमदार, अखंड, क्षतिहीन राहिले तर आजारपण येत नाही ; हल्ल्याचा कोणताही भौतिक परिणाम होऊ शकत नाही किंवा हल्ल्याचा मागमूसही ते शिल्लक ठेवत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 553-554)

निरोगी आयुष्य पुन्हा प्राप्त करून घेणे – अशा प्रकारच्या स्वयंसूचना म्हणजे मानसिक रूपांवरील खरीखुरी श्रद्धा होय. त्याचा परिणाम अबोध मनावर आणि अवचेतन मनावर देखील होतो. अबोध मनामध्ये आंतरिक अस्तित्वाच्या शक्ती कार्यरत होतात, त्याच्या गूढ शक्ती, ज्यांचे शरीरावर चांगला परिणाम होतील असे विचार, अशा इच्छा निर्माण करतात किंवा जागृत शक्तीदेखील उदयास आणतात. अवचेतनेमध्ये स्वयंसूचनांचा परिणाम होतो आणि आरोग्याच्या पुन:प्राप्तीला रोखणाऱ्या आजारपणाच्या आणि मृत्युच्या (प्रकट वा अप्रकट) सूचनांना त्या अटकाव करतात किंवा त्यांना शांत करतात. मन, प्राण आणि शारीर चेतनेमधील विरोधी सूचनांशी दोन हात करण्यासाठी सुद्धा अशा स्वयंसूचनांची मदत होते. हे सारे जेव्हा पूर्णपणाने केले जाते किंवा समग्रतेने केले जाते तेव्हा लक्षणीय परिणाम दिसून येतात.

– श्रीअरविंद
(CWSA 31:559)

आजारपणातून एकतर, एकप्रकारची अपूर्णता येते किंवा अशक्तपणा येतो नाहीतर मग, शारीरिक प्रकृती विरोधी स्पर्शांसाठी खुली होते. तसेच आजारपण हे बरेचदा कनिष्ठ प्राण किंवा शारीरिक मन किंवा इतरत्र कोठेतरी कोणत्यातरी अंधकाराशी किंवा विसंवादाशीसुद्धा संबंधित असते.

एखादी व्यक्ती जर श्रद्धेच्या जोरावर किंवा योग-सामर्थ्याच्या आधारे किंवा दिव्य शक्तीच्या प्रवाहाद्वारे, आजारापासून पूर्णपणे सुटका करून घेऊ शकत असेल, तर ते खूपच चांगले. पण बरेचदा व्यक्तीची समग्र प्रकृती खुली नसल्यामुळे किंवा ती त्या शक्तीला पूर्णपणे प्रतिसाद देऊ शकत नसल्यामुळे, अशा रीतीने आजाराचा पूर्णतः नायनाट करणे, बरेचदा शक्य होत नाही.

मनामध्ये श्रद्धा असू शकते आणि मन प्रतिसादही देते; मात्र कनिष्ठ प्राण किंवा शरीर त्याचे अनुसरण करत नाहीत. किंवा मन आणि प्राण तयार असतील तर, शरीरच प्रतिसाद देत नाही किंवा ते अंशतःच प्रतिसाद देते, असेही होऊ शकते. कारण एखादा विशिष्ट आजार निर्माण करणाऱ्या शक्तींना प्रतिसाद देण्याची त्याला सवय जडलेली असते अणि सवय ही प्रकृतीच्या जडभौतिक भागामधील सर्वाधिक दुराग्रही शक्ती असते. अशा परिस्थितीमध्ये, भौतिक उपायांवर विसंबणे चालू शकते – अर्थात मुख्य उपाय म्हणून नाही, तर त्या शक्तीच्या कार्यासाठी एक प्रकारचे भौतिक साहाय्य किंवा मदत म्हणून! खूप कडक आणि जालीम उपायांची मदत घेऊ नये तर, जे शरीराला हानीकारक न होता, उपायकारक होतील अशाच उपायांची मदत घ्यावी.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 580)

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधील हा अंशभाग)

तुम्ही बाह्य गोष्टींवर फार अवलंबून असता कामा नये; कारण तुमच्या अशा प्रवृत्तीमुळेच तुम्ही परिस्थितीला एवढे अवास्तव महत्त्व देता. परिस्थिती साहाय्य किंवा अडथळा करू शकत नाही, असे माझे म्हणणे नाही – परंतु परिस्थिती ही केवळ परिस्थिती असते, ती काही आपल्यामध्ये असणारी मूलभूत गोष्ट नाही आणि त्या परिस्थितीचे साहाय्य किंवा तिचा अडथळा ही मूलभूत महत्त्वाची गोष्ट असता असता कामा नये.

कोणत्याही मानवी महत्त्प्रयासामध्ये किंवा गंभीर मानवी प्रयासांमध्ये असते त्याप्रमाणेच योगामध्येही, अधिक प्रमाणात विरोधी हस्तक्षेप आणि प्रतिकूल परिस्थिती असणे स्वाभाविकच असते; ज्यावर मात करावीच लागते. त्यांना एवढे अतिरिक्त महत्त्व देणे म्हणजे त्यांचे महत्त्व वाढविण्यासारखे आहे, आणि त्यांची संख्यावृद्धी करत करत, त्यांची ताकद वाढविण्यासारखे हे आहे; त्यामुळे जणू काही त्यांच्या आत्मविश्वासामध्ये आणि पुन्हा पुन्हा (चाल करून) येण्याच्या त्यांच्या सवयीमध्ये वाढ करण्यासारखे आहे.

व्यक्ती त्यांच्या विरोधात, विश्वासपूर्ण व निर्धारपूर्वक संकल्पाचे कौशल्यपूर्ण प्रयत्नसातत्य राखू शकत नसेल तर, किमानपक्षी जर त्या परिस्थितीला समतेने सामोरे जाईल तर, ती त्या गोष्टींचे महत्त्व, त्यांचे परिणाम क्षीण करते आणि अंततः, (अगदी क्षणार्धात असे नव्हे, पण अंततः) त्यांच्या चिवटपणापासून आणि पुनरुद्भवण्यापासून सुटका करून घेऊ शकते.

आणि म्हणूनच, आपल्या अंतरंगामध्ये असणारी ही संकल्पक शक्ती (determining power) ओळखणे – कारण हेच गहन सत्य आहे; ती व्यवस्थित मार्गी लावणे आणि बाह्य परिस्थितीच्या ताकदी विरोधात आंतरिक सामर्थ्य पुनर्स्थापित करणे हेच योगाचे तत्त्व आहे.

अगदी दुर्बलातील दुर्बल व्यक्तीमध्ये सुद्धा हे सामर्थ्य असते; व्यक्तीने ते ओळखले पाहिजे, ते प्रकट केले पाहिजे आणि सर्व जीवन-प्रवासात व समरप्रसंगांत ते सदासर्वकाळ अग्रस्थानी ठेवले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 697)

(‘जीवनाचे शास्त्र’ या लेखमालिकेमध्ये श्रीमाताजींचे एक वचन असे आहे की – “प्राणतत्त्वाचे सहकार्य मिळाले तर, कोणताच साक्षात्कार अशक्य नाही आणि कोणतेच रूपांतरण अव्यवहार्य नाही.” या विधानाचे अधिक स्पष्टीकरण करताना त्या म्हणतात.)

प्राणतत्त्वाला स्वत:च्या शक्तीची चांगली जाणीव असते; आणि म्हणूनच प्राणाला महत्त्व आहे. त्याच्या ठिकाणी प्रचंड कार्यशक्ती असल्याने कोणतीच अडचण ओलांडणे त्याला कठीण नसते; पण त्याने योग्य गोष्टीला साथ द्यावयास हवी. त्याने सहकार्य केले तर सर्वकाही अद्भुत रीतीने घडून येईल. पण त्याच्याकडून असे सहकार्य सतत मिळणे हे काही तितकेसे सोपे नाही.

प्राण हा एक चांगला कार्यकर्ता आहे; तो अत्यंत चांगल्या रीतीने कर्म करणारा आहे. पण कर्म करत असताना स्वत:चे समाधान मिळविण्यासाठी तो नेहमी धडपडत राहतो. कर्मामधून त्याला काहीतरी हवे असते, कर्मातला सर्व आनंद त्याला हवा असतो, सर्व फायदा त्यालाच पाहिजे असतो; आणि जेव्हा या ना त्या कारणाने (कारण अशी कारणे अनेक असू शकतात) हे समाधान त्याला मिळू शकले नाही तर तो दु:खी होतो, त्याचे सुख अजिबात नाहीसे होऊन जाते : ”हे बरोबर नाही; मी कर्म करतो आणि त्याच्या मोबदल्यात मला काहीच मिळत नाही?” असे म्हणून तो खट्टू होतो. तो जागचा हलत नाही, तो ढिम्म बनतो, काहीच बोलत नाही आणि कधी कधी तर तो असेही म्हणतो, ”म्हणजे मी कोणीच नव्हे, मला अस्तित्वच नाही.” तेव्हा तुमच्या शरीरातून सर्व त्राण निघून जातात, तुम्हाला अतोनात थकवा वाटतो, तुम्हाला गळून गेल्यासारखे वाटते आणि तुम्ही काहीही करू शकत नाही.

आणि एकाएकी ही परिस्थिती अधिकच बिकट होते कारण, मी तुम्हाला हे सांगितलेच पाहिजे की, मनाचे ह्या प्राणतत्त्वाशी बरेच सख्य असते; तर्कसंगत विचार करणाऱ्या मनाची नव्हे तर, भौतिक मनाची ह्या प्राणतत्त्वाशी अगदी घनिष्ठ मैत्री असते. त्यामुळे जेव्हा प्राणतत्त्व म्हणू लागते, “मला अमुक तमुकशी काही कर्तव्य नाही; मला नीट वागणूक मिळालेली नाही, मला त्याच्याशी काहीही संबंध नको आहे,” त्यावेळी साहजिकच हे भौतिक मन प्राणाला पुष्टी देण्यासाठी, त्याचे समर्थन करण्यासाठी, त्याला सबळ कारणे पुरविण्यासाठी पुढे सरसावते, आणि मग पुन्हा एकदा तीच रडकथा सुरु होते :

प्राणतत्त्व म्हणू लागते, “जीवनात काही अर्थ नाही; खरेच मला या लोकांचा अगदी वीट आला आहे. सर्वच परिस्थिती माझ्यावर उलटलेली दिसते. आता येथून निघून गेलेलेच बरे.” इ. इ.. असे नेहमी नेहमी घडून येते; पण कधी तरी, कुठेतरी बुद्धीचा प्रकाश दिसतो आणि ती म्हणते, “पुरे झाले आता हे सगळे नाटक.”

पण जर का हे प्रकरण फारच बळावले आणि तुम्ही वेळीच प्रतिकार केला नाहीत तर, तुम्ही निराशेला बळी पडता आणि म्हणू लागता, ”खरेतर हे जीवन माझ्यासारख्यांसाठी बनविलेलेच नाही. मी स्वर्गामध्ये खरा सुखी होईन. तेथे सर्वजण चांगले वागणारे असतील आणि मला जे काय पाहिजे ते तेथे मला करता येईल.” अशा रीतीने या स्वर्गकल्पना जन्म पावलेल्या असतात.

मला खरोखरीच वाटते की, मन आणि प्राणतत्त्व या दोघांनी मिळून संगनमताने ही स्वर्गकल्पना शोधून काढलेली आहे. कारण, जेव्हा तुमचे जीवन आणि तुमचे अस्तित्व तुमच्या इच्छावासनांशी मिळतेजुळते नसते तेव्हा, तुम्ही शोक करू लागता आणि म्हणता, ”पुरे झाले आता हे जीवन. हे जीवन दुःखमय आहे, फसवे आहे. मला मरण हवे आहे.” त्यानंतर असा क्षण येतो की, जेव्हा परिस्थिती अधिकच गंभीर, बिकट बनते. निराशा बंडखोरीमध्ये पालटते आणि विषण्णता ही असंतोषाचे रूप धारण करते.

मी याठिकाणी वाईट वृत्तीच्या व्यक्तींविषयी बोलत आहे. ….ही वाईट प्रवृत्तीची माणसे संतापतात, चिडतात, त्यांना सर्वकाही मोडून तोडून, खाली खेचून जमीनदोस्त करायचे असते : “आता तुम्ही पाहाच, मला जसे पाहिजे तसे जे वागत नाहीयेत, ते त्याबद्दल शिक्षा भोगतील,” असे ते म्हणू लागतात. आणि तेव्हा मग परिस्थिती अधिकच गंभीर, बिकट बनते; कारण त्याला साथ द्यायला हे भौतिक मन तेथे तयारच असते. मग काय, हे मन सूड उगविण्याच्या नाना अद्भुत कल्पना सुचवू लागते. निराशेच्या भरात तुम्ही एक मूर्खपणा करता आणि या सूडभावनेतून अजून एक!

निराशेच्या भरात तुम्ही केलेल्या मूर्खपणाच्या कृतींचा व्यक्तिश: तुमच्याशी संबंध असतो, पण दुष्टपणाने केलेल्या दुष्ट कृतींचा इतरांशीही संबंध असतो. कधीकधी तर ही अविचारी कृत्ये फारच गंभीर स्वरूपाची हानी पोहोचविणारी असतात.

तुमच्यापाशी थोडीशी जरी सदिच्छा असेल तर, जेव्हा अशा रीतीने तुम्ही तीव्र भावनांनी पछाडले जाता, तेव्हा काहीच कृती करायची नाही असे ठरवून तुम्ही स्वत:ला जर सांगितलेत की, “मी मुळीच हलणार नाही, हे वादळ शांत होईपर्यंत मी असाच स्तब्ध राहीन.” तर फारच चांगले; कारण जर तुम्ही तसे केले नाहीत तर, तुमचे कित्येक महिन्यांचे नियमितपणे केलेले परिश्रम काही क्षणात धुळीस मिळतात.

(श्रीमाताजी ‘जीवनाचे शास्त्र’ या लेखमालिकेतील काही भाग वाचतात आणि म्हणतात की, ‘याठिकाणी आता मी तुम्हाला एक दिलासा दिला आहे.” तो भाग असा -)

“ज्यांनी आपल्या चैत्यपुरुषाशी इतका पुरेसा संबंध प्रस्थापित केला आहे की, ज्यामुळे ते अभीप्सा-ज्योती व प्राप्तव्य ध्येयाची जाणीव जितीजागती ठेवू शकतात, त्या लोकांच्या बाबतीत असे आणीबाणीचे कसोटीचे प्रसंग फार काळ टिकत नाहीत. आणि त्यापासून त्यांना फारसा धोकाही पोहोचत नाही. (चैत्यपुरुषाशी संपर्क प्रस्थापित झालेल्या) अशा व्यक्ती, एखाद्या बंडखोर मुलाला एखादी व्यक्ती जशी हाताळते त्याप्रमाणे, ध्येयाविषयीच्या या जाणिवेच्या साहाय्याने, धीराने व चिकाटीने सत्य व प्रकाश दाखवून देऊन, त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत, आपल्या प्राणाला हाताळू शकतात आणि क्षणभरासाठी झाकोळला गेलेला सद्भाव परत जागृत होतो.

(श्रीमाताजी आता पुढे विवेचन करत आहेत) आणि आता हा अखेरचा दिलासा. जे कोणी अंत:करणाने खरेखुरे सच्चे आहेत, जे खरेखुरे सद्प्रवृत्त आहेत, त्यांच्याबाबतीत मात्र प्राणाचे हे उद्रेक, हे क्षोभ प्रगतीसाठीचे उपयुक्त असे साधन होऊ शकतात. ज्या ज्या वेळी तुम्हावर असा आघात होईल, असे वादळ तुम्हामध्ये उठेल, त्या प्रत्येक वेळी, तुम्ही त्याचे स्वरूप बदलून, त्याचा नवीन प्रगतीसाठी उपयोग करून घेऊ शकाल. ध्येयप्राप्ती साध्य करून देणारे एक पुढचे पाऊल असे त्याला रूप येऊ शकेल.

अगदी नेमकेपणाने सांगायचे तर, जर तुमच्यामध्ये, या आघाताच्या मूळ कारणाकडे म्हणजे तुम्ही जे चुकीचे वागलात, तुम्ही जे चुकीचे विचार केलेत, तुमच्या ज्या चुकीच्या भावना होत्या – त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून पाहण्यासाठी आवश्यक असणारी खरीखुरी प्रामाणिकता जर तुमच्यापाशी असेल; तुम्ही ती दुर्बलता, ती हिंसा, तुमचा तो पोकळ अभिमान जर तुम्ही पाहू शकाल; (मी एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरले की प्राणतत्त्वामध्ये मनापेक्षाही पुष्कळ अधिक मिथ्याभिमान असतो.) आणि या सर्व गोष्टींकडे जर तुम्ही रोखून बघितलेत, अगदी जणू डोळ्यात डोळे घालून रोखून पाहिलेत आणि अगदी प्रामाणिकपणे, मनापासून जर तुम्ही कबूल केलेत; जर तुम्हाला पटले की, तुमच्या चुकीमुळे, तुमच्या दोषामुळे अमुक एक गोष्ट घडली आहे तर, त्या भागावर तुम्ही जणू जळजळीत निखारा ठेवू शकाल. त्यामुळे तुमची दुर्बलता शुद्ध होईल आणि एका नवीन चेतनेमध्ये तिचे परिवर्तन होईल. मग तुम्हाला कळून येईल, वादळानंतर तुमच्यात बदल झालेला आहे, तुमचा थोडातरी विकास झालेला आहे, तुम्ही खरोखरीच काही प्रगती साधली आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 50-52)

तुम्ही या जगामध्ये एका विशिष्ट वातावरणामध्ये, विशिष्ट लोकांमध्ये जन्माला आलेले असता. जेव्हा तुम्ही अगदी लहान असता तेव्हा (काही अगदी अपवादात्मक उदाहरणे वगळता), तुमच्या सभोवार जे असते ते तुम्हाला अगदी स्वाभाविक असे वाटत असते कारण तुम्ही त्यामध्येच जन्माला आलेले असता आणि तुम्हाला त्याची सवय झालेली असते. परंतु कालांतराने, म्हणजे जेव्हा तुमच्यामध्ये आध्यात्मिक अभीप्सा जागृत होते, तेव्हा ज्या वातावरणात आजवर तुम्ही राहत होतात त्याच वातावरणात तुम्हाला पूर्णतया आजारी, अस्वस्थ असल्यासारखे वाटू लागते. कारण उदाहरणच घ्यायचे झाले तर, ज्या लोकांनी तुमचे संगोपन केलेले असते त्यांच्यामध्ये तुमच्यासारखी आस नसते किंवा तुमच्यामध्ये ज्या कल्पना विकसित होत असतात, त्याच्याशी पूर्णत: विरोधी अशा त्यांच्या कल्पना असतात.

अशावेळी “बघा, असे हे माझे कुटुंब आहे, आता मी तरी काय करू? मला आईवडील, भाऊबहीण आहेत, इ. इ.” असे सांगत बसण्यापेक्षा…तुम्ही शोधार्थ बाहेर पडू शकता (अगदी प्रवासालाच निघाले पाहिजे असे काही मला येथे म्हणावयाचे नाही.) ज्यांना तुमच्याविषयी आत्मीयता वाटते अशा जीवांच्या शोधात, ज्यांच्यामध्ये तुमच्यासारखीच अभीप्सा आहे, अशा व्यक्तींच्या शोधार्थ तुम्ही बाहेर पडू शकता. तुमच्याप्रमाणेच कशाच्या तरी प्राप्तीची आस असणाऱ्या व्यक्तींशी तुमची गाठ पडावी अशी अगदी प्रामाणिक आस तुम्हाला असेल तर, ते तुम्हाला या ना त्या प्रकारे भेटतील असे प्रसंग तुमच्या जीवनात नेहमीच येतात, कधीकधी अशी परिस्थिती अगदी अवचितपणे जुळून येते. आणि तुमच्या मानसिकतेशी अगदी मिळतीजुळती मानसिकता असणाऱ्या अशा एक किंवा अधिक व्यक्तींशी जेव्हा तुमची गाठभेठ होते तेव्हा अगदी सहजस्वाभाविकपणे तुमच्यामध्ये जवळीक, आत्मीयता, मैत्री यांचे अनुबंध निर्माण होतात. आणि तुमच्या आपापसांत एक प्रकारचे बंधुत्वाचे नाते तयार होते, त्याला एक खरेखुरे कुटुंब असे म्हणता येईल.

तुम्ही एकत्र असता कारण तुम्ही एकमेकांच्या जवळचे असता. तुम्ही एकत्र असता कारण तुमच्यामध्ये समान अभीप्सा असते. तुम्ही एकत्र असता कारण तुमच्या जीवनात तुम्ही समान ध्येय प्राप्त करून घेऊ इच्छित असता. तुमच्या परस्परांमध्ये एक प्रकारचा आंतरिक सुसंवाद असतो आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा एकमेकांशी संवाद साधता तेव्हा तुम्हाला त्याचे सहजपणे आकलन होते, चर्चा करत बसण्याची गरज भासत नाही. हे खरेखुरे कुटुंब होय, हे अभीप्सा बाळगणारे खरेखुरे कुटुंब होय, हे आध्यात्मिकतेचा संग असणारे खरेखुरे कुटुंब होय.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 258-259)