सद्भावना – १२
प्रश्न : सद्भावनेच्या स्पंदनाने व्यक्ती जगाला मदत करू शकते का?
श्रीमाताजी : सद्भावनेच्या साहाय्याने व्यक्ती अनेक गोष्टी बदलू शकते, फक्त ती सद्भावना अत्यंत शुद्ध आणि निर्भेळ असली पाहिजे. हे तर उघडच आहे की, एखादा विचार, एखादी अतिशय शुद्ध आणि सच्ची प्रार्थना जर विश्वात प्रसृत झाली तर ती तिचे कार्य करतेच. परंतु हा अतिशय शुद्ध आणि सच्चा विचार जेव्हा मानवी मेंदूत प्रवेश करतो तेव्हा त्याचे काय होते? त्याचे अवमूल्यन होते. ज्ञान आणि आंतरिक चेतनेच्या प्रयत्नांच्या माध्यमातून, जर तुम्ही तुमच्यातील एखाद्या इच्छेवर खरोखर मात केलीत, म्हणजे ती इच्छा मावळली आणि नाहीशी झाली, आणि जर का आंतरिक सद्भावनेने, चेतनेच्या, प्रकाशाच्या, ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या इच्छेचा विलय करू शकलात, तर तुम्ही ती इच्छा पूर्ण केली असताना जेवढे समाधानी झाले असता, त्याच्यापेक्षा शतपटीने स्वतःच वैयक्तिकरित्या सर्वप्रथम आनंदी व्हाल आणि नंतर त्याचे अद्भुत परिणाम घडून येतील. तुम्हाला कल्पनाच करता येणार नाही, पण त्याचे जगभरात पडसाद उमटतील. त्याचा परिणाम सर्व जगभरात पसरेल. कारण तुम्ही जी स्पंदने निर्माण केलेली असतील ती पसरत राहतील. या गोष्टी बर्फाच्या गोळ्याप्रमाणे वाढत जातात. तुमच्या चारित्र्यामध्ये जो विजय तुम्ही प्राप्त करून घ्याल, तो किती का लहान असेना, तोच विजय संपूर्ण जगात प्राप्त करून घेणे शक्य असते. मी आत्ता हेच सांगितले : आंतरिक प्रकृतीमध्ये परिवर्तन न करता केलेल्या सर्व गोष्टी – हॉस्पिटल्स, शाळा उभारणे इ. इ. – या एक प्रकारच्या घमेंडीतून केल्या जातात, कारण त्या पाठीमागे ‘मी कोणीतरी थोर असल्या’ची भावना असते, पण स्वतःमधील या छोट्याछोट्या अ-लक्षित गोष्टींवर मात केलेली असेल तर, (त्याचे परिणाम जरी लपलेले असले तरी) त्यामुळे अगणित पटीने अधिक महान विजय प्राप्त करून घेता येतो. तुमच्यामधील प्रत्येक कृती जी मिथ्या असते आणि सत्याच्या विरोधी असते, ती प्रत्येक कृती म्हणजे दिव्य जीवनाला दिलेला नकार असतो. तुमच्या छोट्या प्रयत्नांचे लक्षणीय परिणाम होतात, कदाचित तुम्हाला ते समजण्याचे समाधानही मिळणार नाही, परंतु त्याचा खराखुरा आणि नेमकेपणाने अधिक अ-वैयक्तिक (impersonal) आणि सार्वत्रिक परिणाम घडून येतो.
– श्रीमाताजी
(CWM 05 : 19-20)