Posts

जेव्हा तुम्ही इतरांसोबत काही काम करत असता त्यावेळी जर तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तर ती दिव्य कृपा आहे, प्रगती करण्यासाठी तुम्हाला देण्यात आलेली ती एक उत्तम संधी आहे असे समजा.

आणि हे सोपे आहे : तुम्ही ह्या बाजूने असण्याऐवजी त्या बाजूने असता. तुम्ही स्वत:कडे पाहण्याऐवजी, तुम्ही त्या दुसऱ्या माणसामध्ये प्रवेश करता आणि तेथून पाहता. त्यासाठी तुमच्यापाशी थोडीशी कल्पनाशक्ती हवी; तुमच्या विचारांवर, तुमच्या कृतीवर थोडेसे अधिक प्रभुत्व हवे. पण हे काही तितकेसे कठीण नाही. जर तुम्ही थोडासाही प्रयत्न करून पाहाल तर, कालांतराने तुम्हाला ते खूप सोपे वाटू लागेल.

तुम्ही केवळ पाहणे आणि “हे असे का आहे? ते तसे का आहे? त्याने तसे का केले? तो तसे का म्हणाला?” असले स्वतःशीच बोलत बसणे, केवळ मानसिक प्रयत्न करणे पुरेसे नाही. त्यातून तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. असेच करत राहिलात तर तुम्हाला काहीच समजणार नाही. तुम्ही सर्व प्रकारच्या स्पष्टीकरणाची कल्पना करत राहाल, जी अगदीच निरुपयोगी असतील आणि “तो माणूस मूर्ख आहे, दुष्ट आहे.” असे म्हणायला लागण्यापलीकडे त्याचा काहीच उपयोग होणार नाही.

उलट, जर तुम्ही थोडासा प्रयत्न केलात, तुमच्या पासून दूर एखादी दूरस्थ वस्तू असल्याप्रमाणे त्याकडे पाहण्याऐवजी, जर तुम्ही त्याच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न केलात, तुम्ही आत शिरलात, तुमच्या समोर जो माणूस आहे त्याच्या डोक्यात शिरकाव कारण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही एकाएकी, स्वत:ला दुसऱ्या बाजूला पाहाल; तुम्ही स्वत:कडेच पाहाल आणि आता तुम्हाला व्यवस्थितपणे कळेल की, तो तसे का म्हणत आहे; सर्वकाही सुस्पष्ट असेल, का, कशामुळे, कारण काय, त्या गोष्टीमागची त्याची भावना…सारे सारे काही. तुम्हाला दिवसातून शंभर वेळा असे करण्याची संधी मिळेल असा हा प्रयोग आहे. सुरुवाती सुरुवातीला तुम्हाला त्यात काही फारसे यश येणार नाही पण जर तुम्ही चिकाटीने प्रयत्न करत राहिलात तर तुम्ही लक्षणीयरित्या यशस्वी झालेले असाल; त्यामुळे जीवनात एका मोठेच स्वारस्य निर्माण होते.

ज्यामुळे तुमची खरोखरीच प्रगती होते असे हे कार्य आहे. कारण ज्या क्षुद्र अशा चिखलामध्ये तुम्ही स्वतःला छान रीतीने कोंडून घेतलेले असते आणि ज्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीवर अडखळत राहता, त्यामधून हे कार्य तुम्हाला बाहेर काढते.

प्रकाशावर आपटत राहणारे किडे तुम्ही पाहिले आहेत ना? व्यक्तीची जाणीव ही काहीशी तशीच असते, ती प्रत्येक वस्तुवर ठोकर खात राहते, कधी इकडे कधी तिकडे, कारण त्या गोष्टी तिच्यासाठी परक्या असतात. पण ठोकरा खात राहण्याऐवजी व्यक्ती जर अंतरंगात प्रवेश करेल तर ती त्या गोष्टीचा एक हिस्साच बनून जाते. अशा रीतीने व्यक्ती स्वत:ला व्यापक बनविते, मोकळेपणाने श्वास घेते, आतमध्ये वावरायला पुरेशी जागा असते, तेव्हा व्यक्ती कशावर तरी जाऊन धडपडत नाही, ती आत प्रवेश करते, खोलवर जाते आणि तिला सारे काही समजून येते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 220-221)

व्यक्तीने स्वत:शी एकात्म कसे पावायचे हे शिकण्याची ही एक उत्तम पद्धत आहे. उदाहरणार्थ, तुम्ही कोणाबरोबर तरी आहात. ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगते, तुम्ही त्याच्या अगदी विरुद्ध असे काहीतरी सांगता (विरोध करण्याच्या हिरिरीतून, हे बहुधा नेहमीच घडते) आणि तुम्ही वादविवाद करायला सुरुवात करता. साहजिकच आहे की, तुम्ही कोणत्याच मुद्यापाशी येऊन पोहोचणार नाही; हां, जर तुम्ही भांडकुदळ असाल तर त्यातून भांडणं मात्र होतील.

पण तसे करण्याऐवजी, म्हणजे स्वत:च्या शब्दांमध्येच किंवा स्वत:च्या कल्पनांमध्येच बंदिस्त होऊन राहण्याऐवजी जर तुम्ही स्वत:ला सांगितलेत, “एक मिनिट थांब, मी प्रयत्न करून पाहाते आणि तो मला असे का म्हणाला ते समजावून घेते. हो, तो मला तसे का म्हणाला?” तुम्ही चिंतन करता, “का? का? का?” तुम्ही तिथेच प्रयत्न करत थांबून राहता. दुसरा माणूस बोलतच असतो – परंतु आता तो खूष होतो कारण तुम्ही आता त्याला विरोध करत नसता. तो तावातावाने बोलत राहतो; त्याला वाटते की, त्याने तुम्हाला त्याचे म्हणणे पटवून दिले आहे.

तो काय म्हणत आहे त्यावर तुम्ही अधिकाधिक लक्ष एकवटू लागता; हळूहळू त्याच्या भावनेच्या आणि शब्दांच्या माध्यमातून जणू काही तुम्ही त्याच्या मनात प्रवेश करता. जेव्हा तुम्ही त्याच्या डोक्यात प्रवेश करता, तेव्हा एकदम तुम्ही त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये प्रवेश करता. आणि थोडी कल्पना करा, तो तुमच्याशी तसा का बोलत आहे ह्याचे तुम्हाला आकलन होते.

आणि जर तुमच्याकडे पुरेसे बुद्धिचापल्य असेल आणि जर तुम्ही, तुम्हाला पूर्वज्ञात असलेल्या कल्पनेच्या बरोबरीने ही आत्ताच समजलेली कल्पना शेजारी शेजारी ठेवलीत तर आता तुमच्याकडे एकत्रितपणे दोन विचारसरणी असतील आणि त्या दोहोंना एकवटणारे असे सत्य तुम्ही शोधून काढू शकाल. आणि इथेच तुम्ही खरीखुरी प्रगती केलेली असेल.

स्वत:चे विचार व्यापक करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.

जर तुम्ही एखाद्या युक्तिवादाला सुरुवात करणार असाल, तर ताबडतोब शांत व्हा. तुम्ही शांत राहिले पाहिजे, काहीही बोलू नका आणि ती दुसरी व्यक्ती गोष्टींकडे ज्या पद्धतीने पाहत आहे त्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करा. त्याने, तुम्ही तुमची पाहण्याची पद्धतच विसरून जाल, असे काही घडणार नाही. उलट, तुम्ही त्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे मांडू शकाल.. तेव्हा तुम्ही खरंच प्रगती केलेली असेल, एक खरीखुरी प्रगती!

– श्रीमाताजी
(CWM 05 : 218-219)

संक्रमणकाळात विचारांची अधिकच आवश्यकता असते. क्रांतिकारी कालखंड दोन प्रकारच्या अविचारी, कोणतेही आकलन नसलेल्या, कोणताही विचारविमर्श न केलेल्या मनांना जन्म देतो; एक असे मन की जे जुन्या गोष्टींना, केवळ ते जुने आहे म्हणून चिकटून राहते आणि दुसरे मन अमुक एक गोष्ट केवळ नवीन आहे म्हणून त्याच्या पाठीमागे वेड्यासारखे धावत सुटते. या दोहोंमध्ये स्वयंघोषित मध्यममार्गी माणूस उभा राहतो. तो म्हणतो, जुन्यामधले काहीतरी आणि नवीन मधलेही काहीतरी असे दोन्ही असू दे. या दोन टोकांच्या माणसांपेक्षा हा मध्यममार्गी माणूस काही कमी अविचारी नसतो. तो मध्यममार्गाच्या सूत्राच्या आणाभाका घेतो आणि अशक्य असा ताळमेळ घालू पाहतो. ‘जुन्या बाटल्यांमध्ये नवीन वाईन भरता येत नाही’ असे जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतात तेव्हा त्याच्या म्हणण्याचा हाच आशय असतो.

विचार केव्हाही एखादे सूत्र ठरवीत नाही, आधीच अंदाज बांधत नाही, तर तो प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करतो. जर एखादा माणूस म्हणेल की, प्रबुद्ध युरोपाच्या मार्गानुसार तुमच्या सर्व सवयी, संकल्पना बदला तर विचार उत्तर देईल, ”मला आधी विचार करू दे. युरोप हा प्रबुद्ध आहे आणि भारत अडाणी आहे असे मी का गृहीत धरू? कदाचित असेही असू शकेल की, युरोपियन लोक हेच खरे अडाणी असू शकतील आणि भारतीय ज्ञानामध्ये खरेखुरे तथ्य असेल. मला शोधले पाहिजे.” आणि दुसऱ्या बाजूने जर एखादा माणूस म्हणेल, ”भारतीय बन आणि भारतीयांप्रमाणे वाग,” तर विचार म्हणेल, ”भारतीय बनण्यासाठी मला भारतीयांप्रमाणेच वागावे लागेल का याविषयी माझ्या मनात संभ्रम आहे. कदाचित असेही असू शकेल की, भारतीयांना जे अपेक्षित नव्हते तेच आत्ताच्या काळातील या देशातील माणसे बनली असतील. भारतीय संस्कृतीच्या वेगवेगळ्या कालखंडांमध्ये भारतीय कसे होते हे मला शोधलेच पाहिजे आणि संस्कृतीमधील शाश्वत काय आणि तात्पुरते काय ह्याचा शोध मला घेतलाच पाहिजे. असेही शक्य आहे की, आम्ही गमावलेल्या काही खऱ्याखुऱ्या भारतीय गोष्टी युरोपयिनांकडे असू शकतील.” भारतीय असणे चांगलेच आहे, पण भारतीय असणे म्हणजे ज्ञानाने भारतीय असणे होय, केवळ पूर्वग्रहाने नव्हे.

मानवी समाजाच्या रक्षणासाठी, तसेच व्यक्तीच्या आणि मानवी समूहाच्या परिपूर्णतेसाठी नेमका कोणता आचार उत्तम आहे हे विचार, विवेक आणि ज्ञान यांच्या साहाय्याने ठरविणे ह्यावरच हिंदुधर्माची उभारणी करण्यात आलेली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 499-500)