Tag Archive for: वंदे मातरम्

भारताचे पुनरुत्थान – ०५

वंदे मातरम् हा मंत्र जन-मानसात दुमदुमू लागला होता. नव्हे, आता हा मंत्र म्हणजे स्वातंत्र्याकांक्षी देशभक्तांच्या अस्मितेचा मानबिंदू ठरला होता. त्याच सुमारास ‘बंदे मातरम्’ या नियतकालिकाचा क्षितिजावर उदय झाला आणि त्यामध्ये प्रकाशित होणाऱ्या प्राध्यापक श्री. अरविंद घोष यांच्या जहाल लेखनामुळे, वंदे मातरम् हा मंत्रोच्चार भारतीयांच्या हृदयातील मातृभूमीच्या प्रेमाला आवाहन करणारा ठरला.

‘बंदे मातरम्’ हे कलकत्त्याहून प्रकाशित होणारे दैनिक होते. हे दैनिक म्हणजे संपूर्ण स्वराज्याची संकल्पना साकार करू पाहणाऱ्या भारताच्या राजकीय जनजागृती-कार्यक्रमाचा अविभाज्य भाग होता. अल्पावधीतच हे वृत्तपत्र भारताच्या राजकीय चळवळीचे मुखपत्र बनले. त्यातील लेखांमुळे प्राध्यापक अरविंद घोष प्रथमच प्रसिद्धीच्या झोतामध्ये आले.

वंगभंगाच्या पार्श्वभूमीवर श्री. बिपिनचंद्र पाल यांनी ‘बंदे मातरम्’ हे दैनिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. याचा पहिला अंक दि. ०६ ऑगस्ट १९०६ रोजी प्रकाशित झाला. श्री. अरविंद घोषदेखील या दैनिकाच्या कार्यामध्ये सहभागी झाले. लेखक, संपादक, सल्लागार या नात्याने श्री. अरविंद या नियतकालिकाच्या कामकाजात सक्रिय सहभागी होते.

‘बंदे मातरम्’मधून देशप्रेमाचा आणि परकीय सत्तेच्या गुलामीविरूद्धचा संदेश दिला जात असे पण त्याची शब्दयोजनाच अशी असे की, त्यावर कोणताही कायदेशीर आक्षेप घेणे ब्रिटिश सरकारला शक्य होत नसे. वास्तविक बिटिश सरकार श्री. अरविंद घोष यांना अटक करू इच्छित होते परंतु सरकारला त्यांच्यावरील आरोप सिद्ध करता आला नाही. यामुळे एक गोष्ट मात्र घडली की, आजवर पडद्याआड राहून कार्यरत असणारे अरविंद घोष एकाएकी प्रसिद्धीच्या झोतात आले. आणि तेथूनच पुढे ‘स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी’ या नात्याने त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

‘बंदे मातरम्’ने देशासमोर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि निष्क्रिय प्रतिकार ही चतुःसूत्री ठेवली. निष्क्रिय प्रतिकाराचा सिद्धान्त मांडणारी ‘द डॉक्ट्रिन ऑफ पॅसिव्ह रेझिस्टन्स’ नावाची श्री. अरविंद लिखित लेखमाला ‘बंदे मातरम्’मधून प्रकाशित करण्यात आली.

या नियतकालिकाची आर्थिक बाजू नीट सांभाळता यावी या दृष्टीने श्री. अरविंद यांच्या सूचनेनुसार, ‘बंदे मातरम् कंपनी’ची स्थापना करण्यात आली होती. मात्र पुढे अलिपूर बाँबकेसमध्ये त्यांना अटक झाल्यावर, त्यांच्या अनुपस्थितीमुळे ‘बंदे मातरम्’चे प्रकाशन थांबले.

“श्रीअरविंदांच्या लेखणीची धाडसी वृत्ती, ज्वलंत विचारसरणी, सुस्पष्ट कल्पना, शुद्ध आणि शक्तिशाली शब्दरचना, जळजळीत वक्रोक्ती आणि निखळ विनोदबुद्धी यांची बरोबरी देशातील कोणत्याही भारतीय किंवा अँग्लो-इंडियन दैनिकाला करता आली नाही,” असे उद्गार श्री. बिपिनचंद्र पाल यांनी काढले होते.

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

भारताचे पुनरुत्थान – ०४

(भारत मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे सध्या १५० वे जयंतीवर्ष सुरू आहे. मुळात बंगाली भाषेत असलेल्या या गीताचा पूर्वाश्रमीच्या श्री. अरविंद घोष यांनी इंग्रजीमध्ये गद्यानुवाद केला आहे. त्याचा मराठी भावानुवाद आज प्रस्तुत करत आहोत….)

हे माते, मी तुला वंदन करत आहे.
जलसमृद्ध आणि धनधान्यसमृद्ध असणाऱ्या हे माते,
दक्षिणवाऱ्यांमुळे तू शीतलतनू झाली आहेस;
सुगीच्या पिकांनी घनगर्द झालेल्या हे माते,
मी तुला वंदन करत आहे.
चंद्रप्रकाशाच्या वैभवामध्ये तुझ्या रात्री न्हाऊन निघाल्या आहेत,
विविध फुलांनी बहरलेले वृक्षरूपी सुंदर वस्त्र
तुझ्या भूमीने परिधान केले आहे,
तुझे हास्य मंजुळ आहे आणि तुझी वाणी मधुर आहे,
परमानंदप्रदायिनी, वरदायिनी असणाऱ्या हे माते,
मी तुला वंदन करत आहे.

सप्त कोटी मुखांमधून उठणाऱ्या गर्जनांनी
आणि सप्त कोटी प्रजाजनांच्या दोन्ही हातांमध्ये उगारलेल्या शस्त्रांमुळे
तू रुद्रभीषण दिसत आहेस, तेव्हा हे माते,
तू दुर्बल आहेस असे म्हणण्याचे धारिष्ट्य कोण बरे करेल?
अपरिमित शक्ती धारण करणाऱ्या रक्षणकर्त्या मातेसमोर,
आणि शत्रूंच्या पलटणी पळवून लावणाऱ्या मातेसमोर
मी नतमस्तक आहे. हे माते, मी तुला वंदन करत आहे.

तूच ज्ञान आहेस आणि तूच आमचा स्वधर्म आहेस,
तूच आमच्या हृदयांमध्ये निवास करत आहेस.
तूच आमचा आत्मा आहेस आणि आमच्या देहामधील प्राणही तूच आहेस.
आमच्या बाहुंमधील शक्तिसामर्थ्य तूच आहेस,
आमच्या हृदयामधील प्रेम आणि श्रद्धादेखील तूच आहेस,
आम्ही सर्व मंदिरांमध्ये तुझ्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत असतो.
कारण तू युद्ध-शस्त्रे धारण केलेली दशभुजा दुर्गा आहेस,
आणि कमलपुष्पांमध्ये विहरणारी सौंदर्यदेवतादेखील तूच आहेस.
परावाणीरूप असणाऱ्या, वेदप्रदायिनी देवते,
मी तुला वंदन करत आहे.

हे ऐश्वर्यदेवते,
विशुद्ध व अनुपम जलप्रवाहांनी आणि
फुलाफळांनी समृद्ध असणाऱ्या हे माते,
मी तुला वंदन करत आहे.
श्यामलवर्णी, ऋजुस्वभावी, सुहास्यवदन असणाऱ्या,
आभूषणं परिधान केलेल्या, शृंगाराने विनटलेल्या,
वैभवधारिणी हे माते,
वैविध्यसंपन्न हे माते, मी तुला वंदन करत आहे.

– श्रीअरविंद (CWSA 05 : 467-468)

भारताचे पुनरुत्थान – ०३

‘बंदे मातरम्’ या नियतकालिकामधून
कलकत्ता : दि. १९ फेब्रुवारी १९०८

भारतामध्ये दोन महान मंत्र आहेत, त्यातील एक मंत्र म्हणजे ‘वंदे मातरम्’! हा मंत्र म्हणजे आपल्या मातृभुमीविषयी जागृत झालेल्या प्रेमाची सामूहिक आणि सार्वत्रिक गर्जना आहे. आणखी एक अधिक गुप्त आणि गूढ मंत्रदेखील आहे, पण तो अजूनपर्यंत उघड झालेला नाही. यापूर्वीही एकदा विंध्य पर्वतरांगांमधील संन्याशांनी ‘वंदे मातरम्’ हा मंत्र जगाला दिला होता. परंतु आपल्याच स्वकीयांनी विश्वासघात करून तो गमावला होता. कारण तेव्हा आपले राष्ट्र पुनरुत्थानासाठी परिपक्व झाले नव्हते आणि अकाली झालेली जागृती राष्ट्राला वेगाने अधोगतीकडे घेऊन गेली असती, म्हणून आपण तो मंत्र गमावून बसलो.

परंतु इ. स. १८९७ च्या प्रचंड उलथापालथीमध्ये संन्याशांनी पुन्हा एकदा ती गर्जना ऐकली आणि भारताचे पुनरुत्थान व्हावे ही ‘ईश्वरी’ आज्ञा आहे याची त्यांना जेव्हा जाणीव झाली, तेव्हा पुन्हा एकदा ‘वंदे मातरम्’ हा मंत्र जगासमोर प्रकट करण्यात आला. त्याचा प्रतिध्वनी लोकांच्या अंतःकरणांमध्ये निनादत राहिला आणि जेव्हा काही मोजक्या महान हृदयांमध्ये तो निनाद शांततेमध्ये परिपक्व होत गेला तेव्हा संपूर्ण राष्ट्र त्या मंत्राच्या प्रकटीकरणाविषयी जागृत झाले.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 877)