Posts

साधना, योग आणि रूपांतरण – १९२

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०८

एकाग्रतेचा परिणाम सहसा अगदी त्वरेने घडून येत नाही; मात्र काही जणांमध्ये तो एकदम वेगवान आणि अचानकपणे घडून येतो; परंतु बहुतेकांना मात्र पूर्वतयारीसाठी आणि समायोजनासाठी कमीअधिक कालावधी लागतो. विशेषतः अभीप्सा आणि तपस्येद्वारे, जिथे प्रकृतीची काही प्रमाणात का होईना पण पूर्वतयारी झालेली नसते, तिथे अधिक कालावधी लागतो.

ज्ञानमार्गाची एक ‘अद्वैती’ प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती स्वतःच्या मन, प्राण आणि शरीराशी असलेल्या तादात्म्याला नकार देते, ती सातत्याने असे म्हणत राहते की, “मी मन नाही”, “मी प्राण नाही”, “मी शरीर नाही.” या गोष्टींना ती स्वतःच्या खऱ्या ‘स्व’पासून अलग करून पाहते आणि कालांतराने व्यक्तीला साऱ्या मानसिक, प्राणिक, शारीरिक क्रिया-प्रक्रिया आणि मन, प्राण व शरीराच्या स्वयमेव जाणिवासुद्धा बाह्य व बहिवर्ती क्रिया बनत चालल्याचे जाणवू लागते. त्याचवेळी अंतरंगामध्ये, त्यांच्यापासून निर्लिप्त अशी अलग स्वयंभू अस्तित्वाची जाणीव वाढीस लागते, जी जाणीव वैश्विक आणि परात्पर चैतन्याच्या साक्षात्कारामध्ये खुली होते.

अशीच आणखी एक अतिशय शक्तिशाली पद्धत आहे ती म्हणजे सांख्य दर्शनाची पद्धत. या पद्धतीमध्ये ‘पुरुष’ आणि ‘प्रकृती’चे विलगीकरण केले जाते. यामध्ये मनावर ‘साक्षित्वा’ची भूमिका लादली जाते म्हणजे मन, प्राण, शरीराच्या सर्व कृती या ‘मी’ आणि ‘माझे’ यांपासून वेगळ्या असतात, त्या बाह्य क्रिया बनलेल्या असतात, पण ‘प्रकृती’शी संबंधित असतात आणि ‘मी’च्या बाह्य व्यक्तित्वावर लादल्या जातात. या कोणत्याही गोष्टींनी ‘मी’ बांधला जात नाही, ‘मी’ हा त्यांपासून निर्लिप्त असतो; शांत, साक्षी ‘पुरुष’ असतो. परिणामतः व्यक्तीमध्ये एक प्रकारचे विभाजन वाढीस लागते. साधकाला स्वतःच्या अंतरंगामध्ये एका स्थिर, शांत, स्वतंत्र चेतनेच्या वाढीची जाणीव होते, ज्या चेतनेला पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शारीरिक प्रकृतीच्या खेळापासून आपण स्वतः दूरस्थ आहोत याची जाणीव होते.

सहसा जेव्हा असे घडून येते तेव्हा उच्चतर ‘चेतने’ची शांती, उच्चतर ‘शक्ती’चे कार्य अगदी त्वरेने खाली आणणे शक्य असते, आणि त्यामुळे ‘योगा’ची संपूर्ण वाटचाल वेगाने घडून येऊ शकते. परंतु बरेचदा, आवाहन (call) आणि एकाग्रतेला प्रतिसाद म्हणून ‘शक्ती’च स्वतःहून खाली अवतरित होते आणि मग, उपरोक्त गोष्टी आवश्यक असतील तर ती त्या करते आणि साहाय्यकारी व अनिवार्य अशा इतर मार्गांचा किंवा प्रक्रियांचा उपयोग करते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 328-329)

साधना, योग आणि रूपांतरण – १२०

ज्ञानासाठी, प्रेमासाठी किंवा कर्मासाठी ‘ईश्वरा’शी सायुज्य पावणे म्हणजे ‘योग’. माणसाच्या अंतरंगात आणि बाहेर असणाऱ्या, सर्वज्ञ व सर्वशक्तिमान ‘ईश्वरा’शी योगी स्वतःचे थेट नाते प्रस्थापित करतो. तो त्या अनंताशी जोडलेला असतो; या विश्वामध्ये ‘ईश्वरा’चे सामर्थ्य प्रवाहित करण्याची तो एक वाहिनी (channel) बनतो. मग ते शांत परोपकाराच्या भूमिकेद्वारे असेल किंवा सक्रिय उपकाराच्या भूमिकेद्वारे असेल.

– जेव्हा एखादा मनुष्य स्वतःची व्यक्तिगत दलदल सोडून, इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन, इतरांसाठी जगू लागतो;
– जेव्हा तो सुयोग्य रीतीने आणि प्रेमाने व उत्साहाने कर्म करू लागतो; मात्र परिणामांची चिंता सोडून देतो, तो विजयासाठी उत्सुक नसतो किंवा पराजयाची भीतीही बाळगत नाही;
– जेव्हा तो त्याची सारी कर्मे ‘ईश्वरा’ला अर्पण करतो आणि आपला प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती दिव्यत्वाच्या वेदीवर अर्पण करतो;
– जेव्हा तो भीती व द्वेष, घृणा व किळस, आसक्ती यांपासून मुक्त होतो आणि ‘प्रकृती’च्या शक्तींप्रमाणे, कोणतीही घाईगडबड न करता, अविश्रांतपणे, अपरिहार्यपणे, परिपूर्णपणे कर्म करतो;
– जेव्हा तो, ‘मी म्हणजे देह आहे’, ‘मी म्हणजे हृदय आहे’ किंवा ‘मी म्हणजे मन आहे’ किंवा ‘मी म्हणजे या तिन्हींची गोळाबेरीज आहे’; या विचारांच्या वर उठतो आणि जेव्हा तो स्वतःच्या, खऱ्या ‘स्व’ चा शोध घेतो;
– जेव्हा त्याला स्वतःच्या अमर्त्यतेची आणि मृत्युच्या अ-वास्तवतेची जाण येते;
– जेव्हा त्याला ज्ञानाच्या आगमनाची अनुभूती येते आणि जेव्हा मी स्वतः अकर्ता आहे, आणि ती दिव्य शक्ती माझ्या मनाच्या द्वारे, माझ्या वाणीच्या द्वारे, माझ्या इंद्रियांच्या द्वारे, आणि माझ्या सर्व अवयवांद्वारे अप्रतिहत (unresisted) रीतीने कार्य करत आहे, अशी जाण त्याला येते;
– अशा रीतीने, सर्वांचा ‘स्वामी’, मानवतेचा ‘साहाय्यक’ आणि ‘सखा’ असणाऱ्या ‘ईश्वरा’प्रत तो मनुष्य स्वतः जे काही आहे, तो स्वतः जे काही करतो ते आणि त्याच्यापाशी जे काही आहे, अशा सर्व गोष्टींचा, जेव्हा परित्याग करतो तेव्हा मग, तो नित्य त्या ‘ईश्वरा’मध्ये निवास करू लागतो आणि मग अशा तऱ्हेने दुःख, अस्वस्थता किंवा मिथ्या क्षोभ यांची त्याला बाधा होत नाही; तेव्हा तोच ‘योग’ असतो.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 11)

साधना, योग आणि रूपांतरण – ८२

(बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक अस्तित्व यांमधील आवरण भेदण्याच्या प्रक्रियेसंबंधी आपण कालच्या भागात माहिती घेतली.)

ही आंतरिक प्रक्रिया अनेक प्रकारे घडू शकते. आणि संपूर्णपणे बुडी घेण्याच्या ज्या सर्व खुणा असतात त्या सर्व एकत्रितपणे आढळून येतील असा एक व्यामिश्र अनुभवदेखील कधीकधी येऊ शकतो. आपण कोठेतरी आतमध्ये जात आहोत किंवा खूप खोलवर जात आहोत अशी एक संवेदना त्यामध्ये असते. आंतरिक गहनतेच्या दिशेने प्रवास चालू असल्याची जाणीव असते; आणि बरेचदा एक स्थिरतेची, सुखद सुन्नतेची (numbness), आणि हातपाय जड झाल्याची जाणीव असते. वरून येणाऱ्या शक्तीच्या दबावामुळे चेतना, शरीरामधून निघून अंतरंगामध्ये वळत असल्याची ती खूण असते. त्या दबावामुळे शरीर हे आंतरिक जीवनासाठी (आवश्यक असणाऱ्या) एका अचल आधाराचे रूप घेते किंवा एक प्रकारच्या सुदृढ आणि स्थिर उत्स्फूर्त आसनाच्या स्थितीमध्ये येते. लाटा खालून वर डोक्यापर्यंत उसळत आहेत अशा प्रकारची एक जाणीव असते, आणि त्यामुळे बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक जागृतीचा अनुभव येतो.

आधारामधील (मन, प्राण, शरीर यातील) कनिष्ठ चेतना वर असणाऱ्या उच्चतर चेतनेस भेटण्यासाठी आरोहण (ascend) करत असते. तांत्रिक मार्गामध्ये ज्यावर खूप भर दिला जातो त्या कुंडलिनी जागृतीच्या प्रक्रियेशी ही प्रक्रिया मिळतीजुळती असते. कुंडलिनी शक्ती शरीरामध्ये वेटोळे घातलेल्या स्थितीत सुप्त असते आणि ती मज्जारज्जूद्वारे आरोहण करत जाते आणि चक्रांच्या माध्यमातून ब्रह्मरंध्राच्याही वर स्थित असणाऱ्या ‘ईश्वरा’ला भेटण्यासाठी ब्रह्मरंध्रापर्यंत जाते, या प्रक्रियेशी तो अनुभव समकक्ष असतो. आमच्या पूर्णयोगामध्ये, ही काही विशेष अशी प्रक्रिया नसते, तर समग्र कनिष्ठ चेतना ही कधी प्रवाहांच्या रूपात तर कधी लाटांच्या रूपात उत्स्फूर्तपणे वर उसळी मारत असते, तर कधीकधी ही प्रक्रिया कमी सघन असते. आणि दुसऱ्या बाजूने, ‘ईश्वरी चेतना’ आणि तिच्या ‘शक्ती’चे शरीरामध्ये अवरोहण (descent) होत असते. स्थिरता आणि शांती, ऊर्जा आणि शक्ती, प्रकाश, मोद आणि आनंद, व्यापकता आणि मुक्तता, आणि ज्ञान या गोष्टी जणू शरीरामध्ये वरून ओतल्या जात आहेत असा तो अवरोहणाचा अनुभव असतो. ‘ईश्वरी अस्तित्वा’चा किंवा ‘उपस्थिती’चा अनुभव येतो. कधीकधी यापैकी एखादा तर कधी त्यातील बरेचसे किंवा कधीकधी तर सर्वच एकत्रितपणे, असा अनुभव येतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 215-216)

साधना, योग आणि रूपांतरण – ८१

आंतरिक पुरुष आणि बाह्यवर्ती चेतना यांच्यातील आवरण भेदणे ही योगसाधनेमधील एक निर्णायक प्रक्रिया असते. ‘ईश्वरा’शी ऐक्य हा ‘योगा’चा अर्थ आहे, त्याचप्रमाणे, प्रथम तुमच्या आंतरिक आत्म्याप्रति आणि नंतर तुमच्या उच्चतर आत्म्याप्रति जागृत होणे, म्हणजे अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख होणे असा देखील ‘योगा’चा अर्थ आहे. वास्तविक, या जागृतीमुळे आणि आंतरिक पुरुष अग्रस्थानी आल्यामुळेच तुम्ही ‘ईश्वरा’शी एकत्व पावू शकता. बाह्यवर्ती भौतिक, शारीरिक मनुष्य म्हणजे केवळ एक साधनभूत व्यक्तिमत्त्व असते आणि ते स्वतःहून, या एकत्वापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. त्याला केवळ कधीकधी घडणाऱ्या (ईश्वरी) संपर्कांचा, धार्मिक भावनांचा, अपूर्ण सूचनांचा अनुभव येऊ शकतो. आणि या गोष्टीसुद्धा बाह्यवर्ती चेतनेकडून येत नाहीत तर त्या आपल्या अंतरंगी जे आहे त्याच्याकडून येतात.

(आवरण भेदण्याच्या) दोन परस्परपूरक प्रक्रिया असतात. एका प्रक्रियेमध्ये आंतरिक पुरुष अग्रभागी येतो आणि त्याच्या स्वतःच्या स्वाभाविक गतिविधींचा ठसा बाह्यवर्ती चेतनेवर उमटवितो; त्या गतिविधी बाह्यवर्ती चेतनेच्या दृष्टीने असाधारण आणि अस्वाभाविक असतात. बाह्यवर्ती चेतनेपासून स्वतःला आत ओढून, आंतरिक स्तरांमध्ये प्रविष्ट होणे, तुमच्या आंतरिक आत्म्याच्या जगतामध्ये प्रवेश करणे आणि तुमच्या अस्तित्वाच्या झाकलेल्या भागांबाबत जागृत होणे ही झाली दुसरी प्रक्रिया. एकदा का तुम्ही (अंतरंगामध्ये) अशी बुडी घेतलीत की मग, तुम्ही योगमय, आध्यात्मिक जीवनासाठी आहात अशी मोहोर तुमच्यावर उमटविली जाते आणि ती कशानेही पुसली जाऊ शकत नाही. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 215)

साधना, योग आणि रूपांतरण – ०६

योग म्हणजे ‘ईश्वरा’शी ऐक्य, आणि ‘ईश्वरा’शी ऐक्य साधण्यासाठी तुम्ही जे काही करता ती म्हणजे ‘साधना’.

तुम्ही सामान्य चेतनेपासून दूर झाले पाहिजे आणि ईश्वरी ‘चेतने’च्या संपर्कात आले पाहिजे. त्यासाठी तुम्ही नेहमी श्रीमाताजींना आवाहन करा, त्यांच्याप्रति खुले, उन्मुख व्हा; त्यांच्या ‘शक्ती’ने तुमच्यामध्ये कार्य करून, तुम्हाला सुपात्र बनवावे यासाठी त्यांच्याजवळ प्रार्थना करा, तशी आस बाळगा; इच्छा-वासना, अस्वस्थता, मन आणि प्राणाचे अडथळे यांना नकार द्या.

मन व प्राण स्वस्थ, शांत करणे आणि श्रीमाताजींची ‘शांती’, श्रीमाताजींची ‘उपस्थिती’, त्यांचा ‘प्रकाश’, ‘शक्ती’ आणि ‘आनंद’ यांसाठी अभीप्सापूर्वक एकाग्रता करणे म्हणजे ‘ध्यान’.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 135)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०६)

 

(मनुष्याने) मानवजातीला उपयुक्त ठरावे ही पाश्चात्त्यांकडून उसनी घेतलेली संकल्पना आहे आणि त्यामुळे झालेला हा जुनाच गोंधळ आहे. हे स्पष्टच आहे की, मानवजातीला ‘उपयुक्त’ ठरण्यासाठी ‘योगा’ची आवश्यकता नाही. जो कोणी मानवी जीवन जगत असतो तो या ना त्या प्रकारे मानवजातीला उपयुक्तच ठरत असतो.

 

‘योग’ हा ईश्वराभिमुख असतो, मनुष्याभिमुख नाही. ‘दिव्य अतिमानसिक चेतना’ आणि ‘शक्ती’ जर खाली या जडभौतिक जगात आणता आली आणि प्रस्थापित करता आली तर साहजिकच त्याचा अर्थ असा होईल की, त्यामुळे मानवजात आणि तिच्या जीवनासहित, पृथ्वीकरता मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून येईल मात्र मानवजातीवरील हा प्रभाव म्हणजे त्या परिवर्तनाचा केवळ एक परिणाम असेल; ते साधनेचे उद्दिष्ट असू शकणार नाही. ‘दिव्य चेतने’मध्ये निवास करणे आणि त्या चेतनेचे जीवनात आविष्करण करणे हेच साधनेचे उद्दिष्ट असले पाहिजे.

 

– श्रीअरविंद (CWSA 28 : 441-442)

विचारशलाका ३२

 

मूलत: सर्व प्रकारचे योग म्हणजे आपली चेतना उन्नत करणे किंवा अधिक सखोल करणे होय. असे केल्याने आपली चेतना ही, आपल्या सामान्य चेतनेच्या आणि आपल्या सामान्य ‘प्रकृती’च्या अतीत असणाऱ्या गोष्टींसाठी सक्षम होऊ शकेल.

आपल्या आंतरिक सखोलतेशी, आपल्या वर असणाऱ्या उत्तुंगतेशी, आपल्या अतीत असणाऱ्या व्यापकतेशी ‘संपर्क साधणे’ म्हणजे योग. त्यांच्या महान प्रभावाप्रत, महान अस्तित्वांप्रत, त्यांच्या हालचालीबाबत ‘खुले असणे’ किंवा आपल्या पृष्ठवर्ती चेतनेमध्ये आणि आपल्या अस्तित्वामध्ये त्यांचा ‘स्वीकार करणे’ म्हणजे योग; किंवा योग म्हणजे उत्तुंगतेप्रत आरोहण असते, आणि आपल्या कक्षांच्या अतीत असणाऱ्या व्यापकतेमध्ये, आंतरिक सखोलतेमध्ये ‘प्रवेश करणे’ असते. ज्यामुळे आपल्या बाह्य अस्तित्वाचे परिवर्तन होईल, आपल्या अस्तित्वाला तो आत्मा कवळून घेईल आणि त्या आत्म्याचे सुशासन आपल्या बाह्य अस्तित्वावरदेखील चालू लागेल.

आपण ज्या ‘सद्वस्तु’चा शोध घेऊ इच्छितो ती आपल्या पृष्ठभागावर नसते किंवा जर ती ‘सद्वस्तू’ तिथे असलीच तर ती अवगुंठित (Concealed) असते. आपल्या आवाक्यात असलेल्या चेतनेपेक्षा अधिक गहनतर, उच्चतर किंवा व्यापकतर चेतनाच तेथे पोहोचू शकते, त्या ‘सद्वस्तु’ला स्पर्श करू शकते, त्या ‘सद्वस्तु’चे ज्ञान करून घेऊ शकते आणि त्या ‘सद्वस्तु’ला प्राप्त करून घेऊ शकते. आपण आपल्या सामान्य चेतनेच्या आतमध्ये, तेथे काय आहे हे शोधण्यासाठी, बुडी मारली तरी त्या ‘सद्वस्तु’च्या केवळ अंशभागामध्येच आपला प्रवेश होतो.

– श्रीअरविंद [CWSA 12 : 327-328]

विचारशलाका ०९

साधक : आम्हाला ‘योगा’संबंधी काही सांगाल का?

श्रीमाताजी : ‘योग’ तुम्हाला कशासाठी हवा आहे? शक्ती प्राप्त व्हावी म्हणून? मन:शांती, शांतचित्तता लाभावी म्हणून? का मानवतेची सेवा करायची आहे म्हणून? तुम्ही योगमार्ग स्वीकारण्यास पात्र आहात हे दर्शविण्यासाठी वरीलपैकी कोणतेही उद्दिष्ट पुरेसे नाही.

त्याकरता तुम्हाला पुढील काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत :

तुम्हाला ‘ईश्वरा’साठी ‘योगमार्गा’चे आचरण करावेसे वाटते का?

‘ईश्वर’ हाच तुमच्या जीविताचे परमोच्च सत्य आहे का?

म्हणजे ‘ईश्वरा’वाचून जगणेच आता अगदी अशक्य झाले आहे, अशी तुमची अवस्था आहे का?

तुम्हाला असे वाटते का की, ‘ईश्वर’ हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे आणि ‘ईश्वरा’विना तुमच्या जीवनास काहीच अर्थ नाही?

तसे असेल तरच तुम्हाला ‘योगमार्ग’ स्वीकारण्याविषयी आंतरिक हाक आली आहे असे म्हणता येईल.

‘ईश्वरा’विषयीची तळमळ, अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करायचे; ती सतत जागृत, सावध व जिवंत ठेवायची. आणि त्यासाठी जर कशाची गरज असेल तर ती असते एकाग्रतेची! ‘ईश्वरा’वरील एकाग्रतेची – ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांच्याप्रत समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ‘ईश्वरा’वर एकाग्रता करणे आवश्यक असते.

स्वत:च्या हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. तुमच्या चेतनेचे बाहेर दूरवर पसरलेले सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि आत बुडी मारा, आत खोल खोल जा. तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यांत एक ज्योत तेवत आहे. तेच तुमच्या अंतरीचे ‘ईश्वरत्व’, तेच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

एकाग्रता करण्याची इतरही केंद्र आहेत – एक असते मस्तकाच्या वर (सह्स्त्रार), दुसरे असते दोन भुवयांच्या मध्यभागी (भ्रूमध्यामध्ये, आज्ञाचक्र)! प्रत्येक केंद्राची स्वतंत्र अशी उपयुक्तता असते आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट असे परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (central being) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामध्येच उत्पन्न होतात – रूपांतरणास आवश्यक असलेली प्रेरणा व उत्कटता आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या सुद्धा तेथूनच निर्माण होतात.

– श्रीमाताजी [CWM 03 : 01]

विचारशलाका – ०२

‘योग’ हे असे एक साधन आहे की, ज्याद्वारे आपल्याला, बहिर्वर्ती आणि व्यक्त चेतनेकडून आंतरिक आणि सत्य चेतनेप्रत घेऊन जाण्यात येते आणि त्याद्वारे आंतरिक साधनेच्या माध्यमातून आपण वस्तुमात्रांमागील ‘सत्या’शी एकत्व पावण्याप्रत येऊन पोहोचतो.

योग-चेतना (Yogic Consciousness) बाह्य व्यक्त विश्वाच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करते, असे नाही तर उलट, ती त्या विश्वाकडे अंतर्दृष्टीने पाहते. ती विश्वाकडे बाह्य दृष्टीने पाहत नाही किंवा त्याचा बाह्य अनुभवही घेत नाही तर ती आंतरिक सखोल, महत्तर, सत्यतर चेतनेच्या प्रकाशात बाह्य विश्वाला त्याचे योग्य ते मूल्य प्रदान करते, त्यात परिवर्तन घडविते. आणि त्याला सद्वस्तुचा ‘कायदा’ लागू करते; प्राणिमात्रांच्या ‘अज्ञानी’ कायद्याच्या जागी ईश्वरी ‘संकल्प’ आणि ‘ज्ञाना’चा नियम प्रस्थापित करते.

चेतनेमधील (Consciousness) बदल हाच योगप्रक्रियेचा समग्र अर्थ होय.

– श्रीअरविंद [CWSA 12 : 327]

जीवनाचा आणि ‘योगा’चा योग्य विचार केला असता, असे दिसून येते की, सर्व जीवन म्हणजे ‘योग’च आहे. मग ते जाणीवपूर्वक असो किंवा अर्ध-जाणीवपूर्वक असो. मनुष्यामध्ये सुप्त असलेल्या क्षमतांच्या आविष्करणाच्या द्वारे, आत्मपूर्णत्वाच्या दिशेने चाललेला पद्धतशीर प्रयत्न हा ‘योग’ या संकल्पनेचा आमचा अर्थ आहे. आणि या प्रयत्नांमध्ये विजय प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेली उच्चतम अट म्हणजे, मानवामध्ये आणि ‘विश्वा’मध्ये अंशत: आविष्कृत झालेल्या विश्वात्मक आणि विश्वातीत ‘अस्तित्वा’शी व्यक्तिगत मानवाचे ऐक्य, ही होय.

जीवनाच्या सर्व दृश्य रुपांच्या मागे आपण दृष्टी टाकली तर, असे दिसून येईल की, हे जीवन म्हणजे ‘प्रकृती’चा एक महान ‘योग’ आहे. ही प्रकृती जाणीवपूर्वक किंवा अर्धजाणीवपूर्वक, स्वत:चे पूर्णत्व गाठावयाच्या प्रयत्नामध्ये आहे; स्वतःमधील विविध शक्ती सारख्या वाढत्या प्रमाणात प्रकट करीत, प्रकृती स्वतःचे पूर्णत्व गाठण्याचा प्रयत्न करीत आहे. या ‘योगा’च्या आधारे, प्रकृती तिच्या दिव्य सत्य स्वरूपाशी ऐक्य पावण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून तिचा हा महान हेतू अधिक वेगाने आणि प्रभावीपणे साध्य व्हावा, म्हणून प्रकृतीने मानव या आपल्या विचारशील घटकाद्वारे, आत्मजाणीवयुक्त साधनांचा आणि कृतींच्या संकल्पयुक्त योजनाबद्ध व्यवस्थेचा, या ‘पृथ्वी’वर प्रथमच वापर केला आहे.

स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे, “योग हे व्यक्तीने आपल्या पार्थिव जीवनामध्ये असताना, स्वत:ची विकासप्रक्रिया शीघ्रतेने एकाच जन्मात, किंबहुना काही वर्षांमध्येच, वा काही महिन्यांमध्येच साध्य करून घेण्याचे साधन आहे.”

– श्रीअरविंद [CWSA 23 : 06]