Tag Archive for: मोक्ष

 

(सन १९१०)

खरी अडचण ही आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये नसते; तर ती नेहमी आपल्यामध्येच असते. व्यक्तीला अजेय बनविण्यासाठी संकल्पशक्ती, निरपेक्षता आणि श्रद्धा या तीन गोष्टींची आवश्यकता असते. आपल्यामध्ये पारतंत्र्यातून सुटका करून घेण्याची इच्छा असू शकते, पण पुरेशा श्रद्धेचा अभाव असू शकतो. आपल्यामध्ये स्वतःच्या परम मोक्षाबद्दल श्रद्धा असू शकते पण त्यासाठी आवश्यक असणारी साधने वापरण्यासाठी जी इच्छा लागते त्या इच्छेचा आपल्याकडे अभाव असू शकतो. आणि जरी इच्छा व श्रद्धा या दोन्ही गोष्टी असल्या तरीसुद्धा, आपण त्यांचा अवलंब हा आपल्या कार्यफलाच्या तीव्र आसक्तीला चिकटून करत असण्याची शक्यता असते. किंवा तो अवलंब आपण अनिष्टकारक प्रतिक्रिया निर्माण करणाऱ्या द्वेषमूलक आवेगांनी, अंध उत्तेजनेने किंवा घाईघाईत जबरदस्तीने करत असण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच, (स्वतःला बंधमुक्त करण्याच्या) अशा प्रकारच्या भव्य कार्यामध्ये, पूर्वी कधीही ज्या अडथळ्यांना सामोरे जावे लागले नव्हते त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी म्हणून, मनाच्या आणि शरीराच्या शक्तींहूनही अधिक उच्च असणाऱ्या ‘शक्ती‌’चा आश्रय घेण्याची आवश्यकता असते. येथेच साधनेची आवश्यकता असते.

ईश्वर‌ आपल्या अंतरंगामध्येच आहे. सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञ ‘शक्ती‌’ या रूपामध्ये तो आपल्या अंतरंगामध्ये विराजमान आहे. त्या ईश्वरा‌चे आणि आपले स्वरूप मूलतः एकच आहे. आपण जर त्याच्या संपर्कात आलो आणि स्वतःला त्याच्या हाती सोपविले तर, तो आपल्यामध्ये त्याची स्वतःची शक्ती ओतेल आणि मग, आपल्यामध्येसुद्धा देवत्वाचा अंश आहे, आपल्यामध्ये त्या सर्वशक्तिमानतेचा, सर्वव्यापकत्वाचा आणि सर्वज्ञतेचा काही अंश आहे, ही अनुभूती आपल्याला येईल. मार्ग दीर्घ आहे, पण आत्मसमर्पणामुळे तो जवळचा होतो; मार्ग कठीण आहे पण परिपूर्ण विश्वासामुळे तो सोपा होतो.

इच्छाशक्ती ही सर्वशक्तिमान असते परंतु ती ईश्वरी इच्छा असली पाहिजे; म्हणजे ती निःस्वार्थी, स्थिरचित्त आणि परिणामांबाबत निश्चिंत असली पाहिजे. येशू ख्रिस्ताने असे म्हटले होते की, “तुमच्याकडे मोहरीच्या दाण्याएवढी जरी श्रद्धा असेल तरी तुम्ही एखाद्या पर्वतासमोर उभे राहून त्याला म्हणू शकता, ये आणि तुम्ही तसे म्हटल्यावर तो खरोखरच तुमच्यापाशी येईल.” येथे श्रद्धा या शब्दाचा अर्थ, खरंतर, परिपूर्ण श्रद्धेसहित ईश्वरी संकल्प असा आहे. श्रद्धा तर्कवितर्क करत बसत नाही, तिला ज्ञात असते. कारण दृष्टीवर तिची सत्ता असते आणि ईश्वरी‌ संकल्प काय आहेत हे ती जाणते. आणि तिला हे ज्ञात असते की, ईश्वरा‌ची जी इच्छा आहे तसेच घडणे आवश्यक असते. अंध असलेली श्रद्धा नव्हे पण आध्यात्मिक दृष्टी उपयोगात आणणारी श्रद्धा ही सर्वज्ञ बनू शकते.

इच्छाशक्ती ही सर्वव्यापीसुद्धा असते. ती ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येते त्या सर्वांमध्ये स्वतःहून झेपावून प्रवेश करू शकते आणि ती स्वतःची शक्ती, तिचा विचार, तिचा सळसळता उत्साह, तात्पुरत्या किंवा चिरस्थायी स्वरूपात त्या सर्वांना प्रदान करू शकते. एखाद्या एकांतवासात राहणाऱ्या माणसाने निःस्वार्थी आणि निःशंक संकल्पशक्तीचा अवलंब केल्यास, त्याचा विचार हा राष्ट्राचा विचार बनू शकतो. एका वीराची इच्छा ही लाखो भ्याड लोकांच्या हृदयामध्ये धैर्य निर्माण करू शकते.

हीच साधना आपण सिद्धीस नेली पाहिजे. आपल्या मोक्षाची ही पूर्वअट आहे. आपण आजवर अपरिपूर्ण श्रद्धेसहित अपरिपूर्ण इच्छा आणि अपरिपूर्ण निरपेक्षता यांचा अवलंब करत आलो आहोत. वास्तविक, आपल्यासमोर असलेले कार्य हे पर्वत हालविण्यापेक्षा काही कमी कठीण आहे असे नाही. ते साध्य करू शकेल अशी शक्ती अस्तित्वात आहे. परंतु ती शक्ती आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या एका गुप्त दालनामध्ये दडून बसलेली आहे. आणि त्या दालनाच्या किल्ल्या ईश्वरा‌च्या हातात आहेत. चला, आपण त्याचा शोध घेऊ आणि त्याच्याकडे त्या किल्ल्या मागू या.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 536-537)

साधना, योग आणि रूपांतरण – १८८

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०४

सर्वोच्च आध्यात्मिक ‘आत्मा’ हा आपल्या व्यक्तित्वाच्या आणि शारीर-अस्तित्वाच्या मागे नसतो, तर तो सर्वस्वी त्याच्या पलीकडे, ऊर्ध्वस्थित असतो. आंतरिक चक्रांपैकी सर्वोच्च चक्र हे मस्तकामध्ये असते, तर सर्वात गहनतम चक्र हे हृदयामध्ये असते; परंतु जे चक्र थेटपणे ‘आत्म्या’प्रत खुले होते ते मस्तकाच्याही वर, शरीराच्या पूर्णपणे बाहेर म्हणजे ज्याला ‘सूक्ष्म शरीर’ असे संबोधले जाते, त्यामध्ये असते.

या (सर्वोच्च) आत्म्याला दोन पैलू असतात आणि त्यांच्या साक्षात्काराचे परिणाम हे या दोन पैलूंशी संबंधित असतात. एक पैलू हा अक्रिय, स्थितीमान (static) असतो. ही स्थिती व्यापक शांतीची, मुक्तीची व नीरवतेची असते. या शांत ‘आत्म्या’वर कोणत्याही कृतीचा वा अनुभवाचा काही परिणाम होत नाही. तो त्यांना निःपक्षपातीपणे आधार पुरवत असतो पण तो त्यांची निर्मिती करत असावा असे दिसत नाही, किंबहुना तो या साऱ्यापासून अलिप्तपणे, उदासीनपणे दूर उभा राहतो.

या आत्म्याचा दुसरा पैलू हा गतिशील असतो आणि विश्वात्मा म्हणून तो अनुभवास येतो, तो संपूर्ण वैश्विक कृतीला केवळ आधारच पुरवितो असे नाही तर तो ती कृती निर्माण करतो, आणि ती कृती स्वतःमध्ये सामावूनही घेतो. या वैश्विक कृतीमध्ये आपल्या शारीरिक अस्तित्वांशी संबंधित असलेल्या घटकांचाच नव्हे तर त्यांच्या अतीत असणाऱ्या सर्व घटकांचा, इहलोक आणि सर्व अन्य लोक, या विश्वाच्या भौतिक तसेच अतिभौतिक श्रेण्यांचा समावेशदेखील त्यामध्ये होतो. तसेच, सर्वांमध्ये वसत असलेला आत्मा एकच आहे याची आपल्याला जाणीव होते. इतकेच नाही तर, तो सर्वाच्या अतीत, परात्पर, सर्व व्यक्तिगत जन्माला किंवा वैश्विक अस्तित्वालाही ओलांडून जाणारा म्हणून संवेदित होतो.

सर्वांमध्ये वसत असलेल्या त्या एकामध्ये म्हणजे विश्वव्यापक आत्म्यामध्ये प्रविष्ट होणे म्हणजे अहंभावापासून मुक्त होणे. अशा वेळी, हा अहंभाव एकतर चेतनेमधील एक छोटीशी साधनभूत परिस्थिती बनून शिल्लक राहतो किंवा मग आपल्या चेतनेमधून तो पूर्णपणे नाहीसा होतो. यालाच ‘अहंभावाचे निर्वाण’ असे म्हणतात. सर्वांच्या अतीत असणाऱ्या परात्पर आत्म्यामध्ये प्रविष्ट होण्यामधून आपण वैश्विक चेतना आणि कृतीच्या पूर्णपणे अतीत होण्यास सक्षम होतो. विश्व-अस्तित्वामधून पूर्ण मुक्ती मिळविण्याचा तो एक मार्ग असू शकतो, यालाच ‘लय, मोक्ष, किंवा निर्वाण’ असे संबोधले जाते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 325-326)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०९)

‘ईश्वरी उपस्थिती’ आणि ‘दिव्य चेतने’मध्ये प्रवेश करणे आणि त्याने परिव्याप्त होणे हे या योगाचे (पूर्णयोगाचे) उद्दिष्ट आहे; ‘ईश्वरा’वर केवळ ‘ईश्वरा’साठीच प्रेम करणे, आपली प्रकृती ही ‘ईश्वरा’च्या प्रकृतीशी मिळतीजुळती करणे, मेळविणे आणि आपली इच्छा, आपली कर्मे, आपले जीवन हे सारे ‘ईश्वरा’चे साधन बनवणे हे या योगाचे उद्दिष्ट आहे. महान योगी बनणे किंवा अतिमानव (Superman) बनणे (काळाच्या ओघात तसे घडेलही) किंवा अहंकाराच्या शक्तीसाठी, अभिमानासाठी किंवा सुखासाठी ‘ईश्वरा’ला आपलेसे करणे, हे काही या योगाचे उद्दिष्ट नाही. या योगाद्वारे मुक्ती मिळत असली तरीही हा योग ‘मोक्षा’साठी नाही, किंवा यामधून इतरही साऱ्या गोष्टी साध्य होत असल्या तरीपण, त्या गोष्टी हे आपले उद्दिष्ट असता कामा नये. एकमेव ‘ईश्वर’ हेच आपले उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 21)

विचार शलाका – ०६

निर्व्यक्तिक, ‘केवल’, ‘अनंत’ अशी ईश्वराची कल्पना करून, त्याचा अनुभव घ्यावयाचा की विश्वातीत, विश्वात्मक नित्य पुरुषाचा वेध घेऊन, त्याला जाणून घ्यावयाचे, त्याचा अनुभव घ्यावयाचा; हे ठरवण्याची आपल्याला मोकळीक आहे; आपला त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणताही असू देत, परंतु आध्यात्मिक अनुभूतीचे एक महत्त्वाचे सत्य हे आहे की, तो ईश्वर आपल्या हृदयांतच आहे; तो सर्व जीवनाच्या केंद्रस्थानी आहे आणि सर्व जीवन त्याच्यामध्ये सामावलेले आहे आणि त्याचा शोध घेणे म्हणजेच महान आत्मशोध होय.

सांप्रदायिक श्रद्धांचे भिन्न भिन्न प्रकार हे, भारतीय मनाला, सर्वत्र असलेल्या एकमेव ‘परमात्म्या’च्या व ‘ईश्वरा’च्या दर्शनाचे भिन्न प्रकार म्हणून प्रतीत होतात. ‘आत्मसाक्षात्कार’ ही एकच आवश्यक गोष्ट आहे. ‘अंतरात्म्या’प्रत खुले होणे, ‘अनंता’त वसति, ‘शाश्वता’ची साधना व सिद्धी, ‘ईश्वरा’शी ऐक्य, हे भारतीय धर्माचे एकमेव साध्य आहे. आध्यात्मिक मोक्षाचा अर्थ हाच आहे, हेच ते जिवंत ‘सत्य’ आहे, जे मानवाला पूर्णत्व देते व मुक्त करते.

सर्वोच्च आध्यात्मिक सत्याचे केलेले गतिमान अनुसरण आणि सर्वोच्च आध्यात्मिक ध्येय हे भारतीय धर्माला एकत्र आणणारे बंध आहेत; त्याच्या हजारो रूपांच्या पाठीमागे, जर कोणते सामाईक सार असेल तर ते हेच होय.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 183-184)

विचार शलाका – ०५

पूर्वीच्या योगांच्या तुलनेत ‘पूर्णयोग’ नवीन आहे : व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ईश्वराचा साक्षात्कार करून व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी हे येथे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ अति-वैश्विक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेही येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक (supramental) चेतनेची शक्ती आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 400)

व्यक्तिगत मोक्षाच्या इछेचे स्वरूप कितीही उदात्त असले तरी, ती एक प्रकारची वासनाच असते आणि ती अहंभावातून निर्माण झालेली असते. आपल्या व्यक्तित्वाची कल्पना प्रामुख्याने आपल्या समोर असते; आपल्याला व्यक्ती म्हणून वैयक्तिक हिताची, वैयक्तिक कल्याणाची इच्छा असते; दुःखापासून सुटका व्हावी अशी एक व्यक्ती म्हणून आपली तळमळ असते; जन्म-मृत्युच्या फेऱ्यातून सुटका व्हावी अशी आपल्या मनात तीव्र इच्छा उत्पन्न होते; आणि यातूनच मोक्षाची कल्पना निर्माण होते; अर्थात ही कल्पना हे अहंभावाचे अपत्य आहे.

अहंभावाचा पाया पूर्णपणे नष्ट करण्यासाठी, व्यक्तिगत मोक्षाच्या इच्छेच्या वर उठणे आवश्यक असते. आपण जर ईश्वर-प्राप्तीसाठी धडपडत असू, तर ती धडपड केवळ ईश्वरासाठीच असली पाहिजे, अन्य कोणत्याही कारणासाठी नव्हे; कारण आपल्या जीवाला आलेली ती परमोच्च हाक असते, आपल्या चैतन्याचे ते सर्वात गहन असे सत्य असते.

*

वैयक्तिक आत्म्याने सर्व जगताच्या अतीत जाऊन, विश्वात्मक ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे एवढ्यापुरताच ‘पूर्णयोग’ मर्यादित नाही; तर तो ‘सर्व आत्म्यांची एकत्रित बेरीज’, म्हणजे विश्वात्मक साक्षात्कार देखील आपल्या कवेत घेतो; असा हा ‘पूर्णयोग’ व्यक्तिगत मोक्ष किंवा सुटका एवढ्यापुरता मर्यादित राहूच शकत नाही. पूर्णयोगाचा साधक विश्वात्मक मर्यादांच्या अतीत झालेला असूनही, तो सर्वात्मक ईश्वराशी देखील एकात्म असतो. या विश्वातील त्याचे दिव्य कर्म अजूनही शिल्लक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 269-70)