Posts

प्रश्न : माणसं जर मृत्यूच पावली नाहीत, तर वाढत्या वयाबरोबर त्यांचे शरीर निरूपयोगी होणार नाही का?

श्रीमाताजी : नाही, तुम्ही चुकीच्या बाजूने पाहात आहात. त्यांच्या शरीराचा ऱ्हास झाला नाही तरच ते मृत्युपासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकतील. शरीराचा ऱ्हास होतो त्यामुळेच तर ते मरण पावतात. त्यांचे शरीर निरुपयोगी होते त्यामुळेच तर ते मरण पावतात. त्यांना मृत्यू नको असेल तर, त्यांचे शरीर निरुपयोगी होता कामा नये… शरीराचा ऱ्हास होतो, प्रकृती खालावत जाते आणि नंतर पूर्णतः त्याला उतरती कळा लागून, अंतीमत: ते नाश पावते म्हणूनच मृत्यू आवश्यक होऊन बसतो. परंतु शरीरानेसुद्धा अंतरात्म्याच्या (Inner being) प्रगमनशील वाटचालीचे अनुसरण केले, चैत्य पुरुषाला (Psychic being) असते तशीच प्रगतीची आणि पूर्णत्वाची जाणीव शरीरालासुद्धा झाली तर, शरीर मृत पावण्याची कोणतीच आवश्यकता उरणार नाही. वय वाढत गेले म्हणून शरीराचा ऱ्हास होण्याचे काहीच कारण नाही. प्रकृतीचा हा केवळ एक नित्य-परिपाठ, सवय आहे. ‘सद्यस्थिती’त जे काही घडत आहे, त्याचा हा एक केवळ परिपाठ आहे. आणि नेमके हेच मृत्युचे कारण आहे.

…जर शरीर टिकून राहायचे असेल तर, त्याचा ऱ्हास होता कामा नये. तेथे क्षीणता असताच कामा नये. त्याने या एका बाजूवर विजय प्राप्त करून घेतला पाहिजे, तो म्हणजे, त्याचा ऱ्हास न होता, त्याचे रूपांतर झाले पाहिजे. त्याचा जर ऱ्हास होणार असेल तर अमर्त्यत्वाची शक्यताच उरत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 111-115)

मृत्युला त्याचे स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व नाही, तर मृत्यू म्हणजे शरीरामध्ये असणाऱ्या ऱ्हासकारक तत्त्वाचा केवळ परिणाम आहे. आणि ते तत्त्व आधीपासूनच तेथे अस्तित्वात असते – ते जडभौतिक प्रकृतीचाच एक भाग आहे. परंतु त्याच बरोबर, मृत्यू अटळ आहे, असेही नाही. एखाद्याकडे जर आवश्यक ती चेतना आणि ती शक्ती असेल तर, शरीराचा -हास आणि मृत्यू अटळ नाहीत.

परंतु, ज्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विनाशकारक तत्त्वच समूळ नाहीसे होईल अशा रितीने, ती चेतना आणि ती शक्ती समग्र जडभौतिक प्रकृतीमध्ये उतरविणे, ही सर्वाधिक कठीण गोष्ट आहे.

*

विकासक्रमामध्ये (evolution) मृत्यू आवश्यक आहे कारण शरीर याहून अधिक प्रगती करू शकत नाही – चेतनेची जी प्रगती किंवा विकास चालू आहे त्यासाठी हे शरीर यापुढे साधन म्हणून पुरे पडू शकणार नाही. – त्यामुळे चेतनेला तिचे शारीरिक साधन बदलून नवे साधन धारण करावे लागेल. आत्म्याचे विकासानुगामी साधन (plastic instrument) बनावे यासाठी शरीरामध्ये काही उतरविता आले तर मग मृत्यूची आवश्यकताच शिल्लक राहणार नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 310-311), (CWSA 28 : 310)

देहधारी जीव, आज आहे त्याच शरीरामध्ये कोणत्याही बदलाच्या आवश्यकतेशिवाय प्रगती करू शकेल, इतपत आजवर विकसित झालेला नाहीये; आणि त्यामुळेच मृत्यूचे अस्तित्व आहे. तसेच खुद्द हे शरीरदेखील अजून पुरेसे जागृत झालेले नाही.

मन आणि प्राण आणि शरीर जर स्वतःच अधिक सचेत व अधिक लवचीक असते तर मृत्युची आवश्यकताच नव्हती.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 313-314)

या जन्मात तुमच्या प्राणतत्त्वाचे परिवर्तन झाले आहे की नाही यावर, तुमची मरणोत्तर स्थिती काय असेल हे पुष्कळसे अवलंबून असते. तुम्ही स्वतः म्हणजे जर अस्ताव्यस्त प्रेरणांचे एक मिश्रण असाल, तर मृत्युसमयी, ज्यावेळी तुमची चेतना मागे सरून पार्श्वभूमीमध्ये जाते, त्यावेळी तुमच्यातील भिन्नभिन्न व्यक्तिमत्त्वे अलग अलग होतात आणि त्यांना साजेसे वातावरण मिळावे म्हणून ती व्यक्तिमत्त्वे घाईघाईने इकडेतिकडे तसे वातावरण शोधण्याची धडपड करतात. एखादा भाग त्याला अनुकूल मनोवृत्तीच्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीमध्ये शिरू शकतो, दुसरा एखादा भाग एखाद्या प्राण्यामध्येही शिरू शकतो. पण जो भाग ईश्वरी उपस्थितीविषयी जागृत असतो तो भाग केंद्रीय आंतरात्मिक अस्तित्वाशी संलग्न राहू शकतो. पण जर तुम्ही पूर्णतः सुसंघटित झालेले असाल; तुमचे एकजिनसी, अखंड व्यक्तित्वामध्ये परिवर्तन झालेले असेल, आणि क्रमविकासाच्या ध्येयप्राप्तीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला असाल तर तुमच्या मृत्युनंतरही तुम्ही जागृत राहाल आणि तुमच्या अस्तित्वाचे सातत्य टिकवू शकाल…

…(परंतु) बहुतांशी सर्वसामान्य माणसं ही त्यांच्या देहाशी इतकी एकजीव झालेली असतात की शारीरिक विघटनानंतर त्यांच्यातील स्वतःचे असे काहीच टिकून राहत नाही. पण अगदी काहीच टिकून राहत नाही असेही नाही – प्राणिक आणि मानसिक द्रव्य नेहमीच शिल्लक राहते पण ते शारीरिक व्यक्तिमत्त्वाशी एकरूप नसते. आणि जे शिल्लक राहते त्यावर बाह्य व्यक्तिमत्त्वाचा कोणताही स्पष्ट ठसा नसतो कारण बाह्य व्यक्तिमत्त्व हे इच्छा, आवेग यांच्या गोंधळात संतुष्ट असते; शारीरिक कार्यांच्या संलग्नतेमुळे आणि सहकार्यामुळे तयार झालेली ती एक तात्पुरती संघटनात्मक एकता असते आणि जेव्हा ती कार्ये संपून जातात तशी त्यांची ही वरकरणी-एकतादेखील साहजिकपणेच संपुष्टात येते. फक्त जर का विविध भागांना एक प्रकारची मानसिक शिस्त लावण्यात आली असेल आणि सर्वांना समान मानसिक आदर्शाचे अनुसरण करण्यास शिकविण्यात आले असेल तर तेथे एक प्रकारचे खरोखरीची व्यक्तिविशिष्टता (genuine individuality) असू शकते की ज्यामध्ये या पार्थिव जीवनाची स्मृती साठून राहते आणि मग ती स्मृती (मृत्युनंतरही) जाणीवपूर्वक टिकून राहू शकते. कलाकार, तत्त्वज्ञानी आणि इतर विकसित व्यक्ती की, ज्या सुरचित, व्यक्तित्वसंपन्न झालेल्या असतात आणि ज्यांच्या प्राणिक अस्तित्वाचे काही प्रमाणात रूपांतर झालेले असते अशी अस्तित्वं (मरणोत्तरही) टिकून राहू शकतात, कारण त्यांनी आपल्या बाह्य चेतनेमध्ये चैत्य अस्तित्वाचे थोडेफार प्रतिबिंब उमटविलेले असते; हे चैत्य अस्तित्व मूलतः अमर्त्य असते आणि केंद्रवर्ती अशा दिव्य संकल्पाभोवती अस्तित्वाची क्रमाक्रमाने घडण करत नेणे हे त्याचे उद्दिष्ट असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 144-146)

जडभौतिक शरीरामध्ये मनुष्यप्राणी स्वगृही व सुरक्षित असतो; देह हा त्याचे सुरक्षाकवच असते. काही लोक असे असतात ज्यांच्यामध्ये स्वतःच्या शरीराविषयी तिरस्कार भरलेला असतो व ते असा विचार करतात की, त्यांच्या मृत्युनंतर गोष्टी अधिक चांगल्या व अधिक सोप्या होतील. परंतु वास्तविकता अशी आहे की, शरीर हे तुमचे आश्रयस्थान असते, गडकोट असतो. तुम्ही जेव्हा शरीरात निवास करीत असता तेव्हा विरोधी जगताच्या शक्तींना तुमच्यावर थेट ताबा मिळविणे कठीण असते. दु:स्वप्ने म्हणजे काय? तर, दु:स्वप्ने म्हणजे तुम्ही प्राणिक जगतामध्ये (vital world) केलेले भ्रमण असते. आणि दुःस्वप्नाच्या तावडीत जेव्हा तुम्ही सापडता तेव्हा तुम्ही प्रथम काय करता? तर, तुम्ही झपाट्याने स्वत:च्या शरीरात परत येता आणि तुम्ही तुमच्या सामान्य शारीरिक चेतनेमध्ये परतून येईपर्यंत स्वतःला खडबडवून जागे करता. परंतु प्राणिक शक्तीच्या जगतात मात्र तुम्ही परके असता; तो अपरिचित समुद्र असतो व त्यात तुमच्याकडे दिशादर्शक होकायंत्र नसते, की सुकाणूही नसते. कसे जावे, कुठे जावे हे तुम्हाला काहीही कळत नसते आणि जे करायला हवे त्याच्या अगदी विरुद्ध असेच प्रत्येक पावलागणिक तुम्ही करत असता. या जगताच्या कोणत्याही प्रदेशात तुम्ही थेट प्रवेश केला तर तेथील जीव तुमच्याभोवती गोळा होतात, ते तुम्हाला घेरतात आणि तुमच्यामध्ये असलेले सर्वकाही काढून घेऊ पाहतात, जे त्यांना काढता येईल ते काढून त्याला ते स्वतःचे अन्न व भक्ष्य बनवू पाहतात. तुमच्याकडे जर शक्तिशाली प्रकाश आणि अंतरंगातून प्रस्फुरित होणारी शक्ती नसेल, तर तुम्ही तुमच्या शरीराविना तिथे कसे वावरत असता? तर, जणू काही कडाक्याच्या थंडीमध्ये आश्रय देणारे घर तुमच्यापाशी नसावे, संरक्षण करणारे उबदार कपडेही तुमच्याकडे नसावेत, इतकेच नव्हे तर तुमच्या शरीरांतर्गत असणाऱ्या नाड्या झाकून घेण्यासाठी त्वचादेखील नसावी आणि त्या त्वचेविना त्या नाड्या, धमन्या, शिरा उघड्या पडलेल्या असाव्यात, अशा तऱ्हेने तुम्ही तिथे वावरत असता.

अशीही काही माणसे असतात जी म्हणतात की, “मी या शरीरात किती दुःखी आहे.” आणि त्या दु:खापासून सुटका म्हणून ते मृत्युचा विचार करत असतात! परंतु मृत्युनंतरदेखील तुमचा बाह्य प्राणिक परिवेश अगदी तसाच कायम असतो आणि इहलोकातील जीवनामध्ये तुमच्या हालअपेष्टांना कारणीभूत असणाऱ्या शक्तींसारख्याच शक्तींचा तुम्हाला तेथेही धोका असतो. शरीराच्या विघटनामुळे, तुम्ही प्राणिक जगताच्या उघड्या अवकाशात जबरदस्तीने ढकलले जाता. आणि त्यानंतर तुमच्याकडे कोणतेही सरंक्षण नसते. आणि वेगाने सुरक्षिततेमध्ये परत येण्यासाठी भौतिक शरीरही आता तुमच्याकडे नसते.

इथे या पृथ्वीवर असताना, प्रत्यक्ष देहामध्ये असतानाच पूर्ण शक्तीचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही शिकले पाहिजे आणि पूर्ण ज्ञान आत्मसात केले पाहिजे.

…अंध:कारमय जीव ज्यामुळे तुमच्यापाशी येतील किंवा तुमच्यावर सत्ता गाजवू शकतील अशा कोणत्याही गोष्टीपासून तुम्ही पूर्णपणे मुक्त असले पाहिजे; जर तुम्ही तसे मुक्त नसाल तर सावध व्हा!

कोणतीही आसक्ती नाही, इच्छा नाहीत, आवेग नाहीत, पसंतीनापसंती नाही; संपूर्ण समता, अविचल शांती आणि ईश्वरी संरक्षणाविषयी परिपूर्ण श्रद्धा : हे सारे असेल तर तुम्ही सुरक्षित असता; नसेल तर तुम्ही संकटात सापडता. आणि जोवर तुम्ही सुरक्षित नसता, तोवर कोंबडीची पिल्ले ज्याप्रमाणे आईच्या पंखाखाली आसरा घेतात, तसे करणे अधिक चांगले!

– श्रीअरविंद
(CWM 03 : 47-48)

मृत्युनंतर काही कालावधी असा असतो की जेव्हा जीवात्मा प्राणिक जगतामधून (vital world) जातो आणि तेथे काही काळ राहतो. या संक्रमणाचा केवळ पहिला भागच काहीसा भयंकर वा वेदनादायी, यातनामय असू शकतो. देहामध्ये असताना त्याच्या ज्या प्राणिक वासना आणि सहजप्रवृत्ती होत्या, त्यातील शिल्लक राहिलेल्या गोष्टींवर, विशिष्ट अशा परिस्थितीत, उरलेल्या काळात तो काम करतो.

ज्या क्षणी तो या साऱ्याने थकून जातो आणि याही पलीकडे जाण्याची त्याची तयारी होते, त्या क्षणी लगेचच त्याचा प्राणमय कोष गळून पडतो. त्यानंतर, मानसिक अवशेषांपासून (mental survivals) सुटका करून घेण्यासाठी जो थोडा कालावधी लागतो, त्या कालावधीनंतर चैत्य जगतात (psychic world) विश्रांत अवस्थेत जाण्यासाठी जीवात्मा निघून जातो आणि पृथ्वीवरील पुढील जन्म येईपर्यंत तो तेथे राहतो.

एखादी व्यक्ती तिच्या सदिच्छेद्वारे किंवा जर तिला गूढ मार्गाचे ज्ञान असेल तर त्या माध्यमातून त्या जीवात्म्याला साहाय्य करू शकते.

त्याच्याविषयी शोक करून किंवा त्याच्यामध्ये मनाने गुंतून राहून किंवा ज्यामुळे तो खाली, या भूलोकाजवळ खेचला जाईल अशी कोणतीही गोष्ट करून आपण त्याला बांधून ठेवू नये किंवा विश्रांतीस्थळाकडे होणारा त्याचा प्रवास लांबवू नये.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 529-530)

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला त्याच्या पत्नीच्या निधनानंतर जे पत्र लिहिले आहे त्यातील हा अंश…)

तुझ्या पत्नीच्या भयंकर मृत्युमुळे तुला केवढा मोठा धक्का बसला असेल हे मी समजू शकतो. पण आता तू सत्याकांक्षी आहेस, सत्याचा साधक आहेस. त्यामुळे तू तुझे मन सामान्य मानवी प्रतिक्रियांच्या वर स्थिर केले पाहिजेस आणि सर्व गोष्टींकडे तू एका व्यापक, महत्तर प्रकाशातून पाहिले पाहिजेस.

अज्ञानमय जीवनाच्या उतारचढावांमधून, वाटचाल करणारा एक जीव या दृष्टीकडे तुझ्या मृत पत्नीकडे पाहा. या प्रवासात अशा काही घटना घडतात की ज्या मानवी मनाला दुर्दैवी भासतात. आयुष्यावर अकाली घाला घालणारा, असा हा आकस्मिक अपघाती किंवा विदारक मृत्यू नेहमीच, आपण ज्याला जीवन म्हणतो त्या, पार्थिव जीवनाची क्षणभंगुरता दर्शविणारा असतो. आणि मानवी मनाला हा विशेषच यातनामय व दुर्दैवी भासतो.

पण एखादा (साधक) ह्या वरपांगी दृश्यामागील संगती पाहू शकतो, तो हे जाणतो की, जीवात्म्याच्या प्रवासात जे जे काही घडते त्याला काही अर्थ असतो; त्याचे काही प्रयोजन असते. जीवाच्या अनुभव-मालिकेतील अशा घटनेचे स्थानही तो साधक ओळखून असतो; हा अनुभव त्या जीवाला अशा एका वळणबिंदूपाशी घेऊन जात असतो की जेथून तो अज्ञानाकडून प्रकाशाकडे मार्गस्थ होतो. ईश्वरी प्रारब्धानुसार जे जे काही घडते ते चांगल्यासाठीच हे तो साधक जाणतो – मनाला जरी ते तसे भासले नाही तरी!

अस्तित्वाच्या दोन अवस्थांच्या मधील सीमारेषा ओलांडून गेलेला जीव या दृष्टीने तू तुझ्या पत्नीकडे पाहा. विश्रांतिस्थळाकडे चाललेल्या तिच्या प्रवासाला, तुझ्या शांत विचारांद्वारे साहाय्य कर आणि ‘ईश्वरी साहाय्या’ने तिला त्या मार्गावर साथ द्यावी म्हणून प्रार्थना करून, तिला मदत कर. दीर्घकाळ चाललेल्या शोकामुळे मृतात्म्याला मदत तर होणार नाहीच उलट त्याच्या प्रवासाला विलंब होईल. तुझी जी हानी झाली त्याबद्दल कुढत बसू नकोस तर तिच्या आध्यात्मिक कल्याणाचा विचार कर.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 528)

आपले जीवन सत्कारणी लागावे अशी ज्यांची इच्छा असते, तेच असे म्हणतात की, ”जोवर आवश्यकता आहे तोवर मी इथे राहीन, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत! आणि माझे ध्येय साध्य करत असताना एकही क्षण मी व्यर्थ दवडणार नाही”, वेळ आली तर अशीच माणसं सर्वोत्तम कामगिरी करून दाखवितात.

असे का? – कारण अगदी सोपे आहे, कारण ते त्यांच्या ध्येयासाठी जगतात, त्यांच्या ध्येयाच्या सत्यासाठी जगत असतात, कारण त्यांचे ध्येय हीच त्यांच्यासाठी खरी गोष्ट असते, ते ध्येय हेच त्यांच्या जगण्याचे खरे प्रयोजन असते, आणि सर्व गोष्टींमध्ये त्यांना हे ध्येयच दिसत असते, अस्तित्वाचे प्रयोजन दिसत असते आणि असे लोक भौतिक जीवनाच्या हीनदीनतेमध्ये कधीच खाली उतरून येत नाहीत.

तात्पर्य असे की, व्यक्तीने मृत्युची इच्छा कधीही धरता कामा नये.
व्यक्तीने मृत्युची आस कधीही बाळगू नये.
व्यक्तीला मृत्युची भीती कधीही वाटता कामा नये.
आणि सर्व परिस्थितींमध्ये व्यक्तीने आत्मोल्लंघनाचा संकल्प करायला हवा.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 354-355)

मृत्युबद्दल शोक करण्यासारखे काहीच नाही कारण मृत्यू म्हणजे केवळ एका प्रांतांतून दुसऱ्या प्रांतांत जाण्यासारखे आहे – की कदाचित जिथे तुम्ही बरेचदा गाढ झोपेमध्ये असताना जात असता.

*

… मृत्यू म्हणजे वैयक्तिक अस्तित्वाची समाप्ती नव्हे तर मृत्यू म्हणजे केवळ देह सोडणे होय, हे खरे वास्तव आहे. माणसाचा मृत्यू होत नाही कारण तो एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जातो आणि तेथील वातावरणानुसार कपडे बदलतो.

*

जे काही घडले आहे त्याचा आता शांतपणे स्वीकार केला पाहिजे कारण घटना घडून गेली आहे. मानवी दृष्टीला – जी फक्त वर्तमान व बाह्य दृश्यच पाहत असते तिला – ते चांगले वाटले नाही तरी आत्म्याच्या एका जीवनाकडून दुसऱ्या जीवनाकडे होणाऱ्या वाटचालीसाठी तेच सर्वोत्तम असते. अध्यात्म-साधकासाठी मृत्यू म्हणजे जीवनाच्या एका रूपाकडून दुसऱ्या रूपाकडे जाणारा फक्त एक मार्ग आहे आणि म्हणून कोणाचा मृत्यू झालेला नसतो, तर ते केवळ प्रस्थान आहे; या दृष्टीने मृत्युकडे पाहा…

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 529)

तीन गोष्टींपासून माणसाने स्वतःला जपले पाहिजे.

एक म्हणजे रोगाची सामूहिक सूचना. रोग हा निःसंशयपणे अस्तित्वात असणारी गोष्ट आहे, म्हणजे कार्यामध्ये विलंब करण्याचा, कार्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही विरोधी शक्ती असतातच, ह्या अर्थाने म्हणावयाचे आहे.

बाह्यतः ते रोग काही कल्पनांवर आधारलेले असतात; रोगजंतुंविषयीच्या, जीवजंतुंविषयीच्या आणि तत्सम गोष्टींविषयीच्या ज्ञानावर ते आधारलेले असतात. (त्याला लोक ‘ज्ञान’ असे म्हणतात.) पण रोगजंतुंमुळे रोग होतात असे म्हणणे म्हणजे गोष्टी उलट्यापालट्या करण्यासारखे आहे, खाली डोकं वर पाय करण्यासारखे आहे कारण हे रोगजंतू, जीवजंतू आणि तत्सम गोष्टी ह्या कारण नसून परिणाम असतात.

तीन गोष्टींच्या एकत्रिकरणाचा त्या परिणाम असतात.

दुरिच्छा, कमीअधिक प्रमाणातील पूर्णपणे वाईट अशी इच्छा; नियम व त्याचे परिणाम यांविषयीचे अज्ञान म्हणजे कारण व त्याचा परिणाम यांविषयीचे घोर अज्ञान; आणि अर्थातच, एक प्रकारचे जडत्व – या सगळ्याच गोष्टी जडत्वाचीच रूपं आहेत पण जडत्वाचे सर्वात मोठे रूप म्हणजे स्वीकारण्याची आणि प्रतिसाद देण्याची अक्षमता. या तिन्ही गोष्टींच्या एकत्रीकरणातून रोग निर्माण होतात आणि मग अंतिम परिणाम म्हणजे मृत्यु. म्हणजे तयार झालेल्या सुमेळाचे विघटन.

– श्रीमाताजी
(Conversation with a disciple : March 02, 1968)