Tag Archive for: भीती

 

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल आणि कुरूप स्पंदनामुळे पूर्णयोगाच्या या मार्गाकडे कधीही पाठ फिरविता कामा नये. तुमच्यापाशी दुर्दम्य धैर्य, परिपूर्ण प्रामाणिकपणा असला पाहिजे. तुम्ही कोणताही विकल्प उपयोगात न आणता किंवा सौदेबाजी न करता संपूर्ण आत्मदान केले पाहिजे. अर्पण करताना त्याच्या मोबदल्यात काहीतरी मिळावे अशी अपेक्षा तुम्ही बाळगता कामा नये. मी स्वतःला ईश्वरार्पित केले तर त्यामुळे माझे संरक्षण होईल या हेतुने तुम्ही ते अर्पण करता कामा नये. तुमच्या श्रद्धेला पुराव्याची आवश्यकता भासता कामा नये. (पूर्णयोगाच्या) मार्गावर प्रगत व्हायचे असेल तर या सर्व गोष्टी अनिवार्य असतात; (कारण) या गोष्टीच तुम्हाला सर्व संकटांमध्ये आश्रय देतात.

* श्रीमाताजी (CWM 15 : 190)

अस्तित्वाच्या विविध घटकांमध्ये परस्परांमध्ये दुफळी असणे हा अप्रामाणिकपणा असतो. तुमचा देह आणि तुमच्या अस्तित्वाचे सत्य या दोहोंमध्ये खोल दरी असणे हा सर्वात मोठा अप्रामाणिकपणा असतो. जेव्हा या दरीमुळे तुमचे खरे अस्तित्व तुमच्या देहापासून विलग होते तेव्हा प्रकृती ती दरी सर्व प्रकारच्या विरोधी सूचनांच्या मदतीने तत्काळ भरून टाकते. भीती ही त्यातील सर्वात भयानक सूचना असते तर शंका ही त्यातील सर्वात घातक सूचना असते. कोठेही कोणत्याच गोष्टीमुळे तुमच्या अस्तित्वाच्या सत्याला नकार न देणे, हा प्रामाणिकपणा असतो.

– श्रीमाताजी (Growing up with the Mother by Tara Jauhar : 165)

माझा एक मित्र होता, त्याला रात्रीच्या वेळी झोपेत स्वतःच्या प्राणिक देहामधून बाहेर जायची सवय होती. त्याने मला एकदा तक्रारवजा सुरात सांगितले की अशा वेळी त्याला नेहमीच एका ढाण्या वाघाशी सामना करावा लागत असे आणि त्यामुळे मग त्याची ती सारी रात्र बेचैनीत जात असे. मी त्याला त्याची सगळी भीती काढून टाकायला सांगितली. आणि “सरळ त्या श्वापदाकडे चालत जा आणि त्याच्या चेहऱ्याकडे एकटक रोखून बघत राहा,” असे सांगितले, अर्थातच “आवश्यकता पडली तर मदतीसाठी धावा कर”, असेही सांगितले. त्याने तसे केले आणि अहो आश्चर्य! त्या वाघाचे रूपांतर अचानक एका अगदी किरकोळ अशा मांजरामध्ये झाले.

एखाद्या प्राणिक अस्तित्वाच्या डोळ्यांमध्ये डोळे मिसळून निर्भयपणे एकटक पाहत राहण्याचा काय जादुई परिणाम घडून येतो, त्याची तुम्हाला कल्पना नाहीये. अगदी या पृथ्वीवर, प्राणिक शक्तींचा अवतार असे ज्यांना म्हणता येईल, ज्याला आपण सहसा प्राणी असे म्हणतो, त्यांना तुम्ही अशा पद्धतीने हाताळाल तर, तुम्हाला अगदी सहजी प्रभुत्व मिळण्याची खात्री बाळगता येईल. तुम्ही तीळमात्रही न डगमगता, न घाबरता जर प्रत्यक्ष एखाद्या वाघाच्या डोळ्याला डोळा भिडवून थेटपणे पाहू शकलात तर, तो वाघसुद्धा तुमच्यापासून पळ काढेल. यत्किंचितही न घाबरता जर तुम्ही सापानी रोखलेल्या नजरेला नजर भिडवू शकलात तर, तो साप तुम्हाला कधीच चावू शकणार नाही. पण जर का पाय लटलट कापत असतील आणि केवळ नजर एकटक खिळलेली असेल, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तुमच्यामध्ये अजिबात अस्वस्थता असता कामा नये. तुम्हाला भीती वाटावी म्हणून, तो आपला फणा उभारून, तुम्हाला आकर्षित करत राहतो तेव्हा, तुम्ही अगदी शांत आणि एकाग्र असले पाहिजे.

मानवाच्या डोळ्यांमध्ये असलेल्या प्रकाशाविषयी प्राणी सतर्क असतात आणि हा प्रकाश जर माणसं योग्य रीतीने प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये टाकू शकली तर, प्राण्यांना तो प्रकाश सहन करणे अशक्य होते. माणसांच्या नजरेमध्ये एक शक्ती सामावलेली असते; माणसाची नजर जर स्थिर आणि निर्भय असेल तर, त्या शक्तीमुळे प्राणी निष्प्रभ होतात. सारांशरूपाने सांगावयाचे तर, दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. त्या अशा की, कधीही, अगदी कधीही घाबरता कामा नये आणि तुमची ताकद शंभर पटीने अधिक वाढावी म्हणून सर्व परिस्थितीमध्ये योग्य त्या मदतीसाठी ईश्वराचा धावा केला पाहिजे.

  • श्रीमाताजी (CWM 03:166)

शिक्षेच्या भीतीने नव्हे तर, आपण खोडसाळ आहोत हे समजल्यामुळे खजील होऊन, लहान मुलाचा खोडसाळपणा बंद झाला पाहिजे. त्यामुळे त्याची खरी प्रगती होते. भीतीमुळे जर त्याचा खोडसाळपणा बंद होणार असेल तर, त्यामुळे मानवी चेतनेमधून ते मूल एक पायरी खाली घसरते कारण भीती ही चेतनेची अधोगती आहे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 362)

‘प्रकृती’पाशी पुरेसे द्रष्टेपण असते; ती प्रत्येक वातावरणामध्ये त्या वातावरणाला अनुसरून सुयोग्य अशी गोष्ट निर्माण करत असते. अर्थातच, एखाद्याने माणसाला केंद्रस्थानी ठेवता कामा नये, त्याने असे म्हणता कामा नये की, अमुक अमुक गोष्ट ‘निसर्गा’ने माणसाच्या भल्यासाठी केली आहे. परंतु असे असेल असे काही मला वाटत नाही, कारण या पृथ्वीवर माणसाचा उदय होण्यापूर्वी कितीतरी आधीपासूनच ‘प्रकृती’ने या साऱ्या गोष्टींची निर्मिती केलेली होती.

एखाद्या देशाची पर्यावरणीय परिस्थिती आणि त्या देशामध्ये तयार होणारे उत्पादन यांच्यामध्ये एक प्रकारची सुसंवादिता विकसित झालेली आढळते; जसे की, प्राण्यांचा अधिवास ज्या देशांमध्ये असतो त्या देशाची विशालता आणि तेथील प्राण्यांचा आकार या दोहोंमध्ये एक प्रकारची सुसंवादिता आढळते. उदाहरणार्थ, भारतातील हत्ती हे आफ्रिकेमधील हत्तींपेक्षा आकाराने कितीतरी लहान असतात. आणि असे म्हटले जाते की, आफ्रिकेमध्ये प्रचंड मोकळी जागा आहे आणि त्यामुळे तेथील प्राणीदेखील आकाराने मोठे असतात.

सृष्टीनिर्मितीमध्येच ही एक प्रकारची सुसंवादिता प्रस्थापित झालेली आहे आणि पुढे देश जसजसे आकाराने लहान होत गेले, प्रांत जसजसे आकुंचित होत गेले तसतसे, त्या प्रांतामध्ये राहणारे प्राणीदेखील आकाराने लहानलहान होत गेले. आणि मोकळी जागा आणि त्या प्राण्यांचे आकारमान यांच्यामध्ये सुयोग्य प्रमाण उरले नाही तेव्हा ते प्राणी नष्ट झाले. तुम्ही जर बेसुमार घरं बांधलीत, तर मग तेथे अस्वलं, लांडगे यांसारखे प्राणी शिल्लक राहणार नाहीत, साहजिकच, सर्वात आधी वाघ आणि सिंह नामशेष होतील; आणि मला वाटते यामध्ये माणसांचा हात आहे…

भीती माणसांना अत्यंत विघातक बनवते. पण जसजसे माणसांचे जथेच्या जथे संख्येने वाढत जातील आणि रिकाम्या जागा कमी कमी होत जातील तसतसे प्राणिमात्रांचे आकार कमीकमी होत जातील. मग आपण या सगळ्यांसाठी नियम तरी कसे बनवणार?

– श्रीमाताजी
(CWM 07 : 53-54)

सद्भावना – २०

विद्यार्थ्यांसमोर आदर्श उदाहरण ठेवा. ते जसे घडावेत असे तुम्हाला वाटते तसे आधी तुम्ही स्वतः बना. तुम्ही निरपेक्षपणाचे, सहनशीलतेचे, आत्म-नियंत्रणाचे, स्वतःच्या छोट्याछोट्या वैयक्तिक नापसंतींवर मात करण्याचे, सातत्यपूर्ण चांगल्या खेळकर विनोदाचे, सातत्यपूर्ण सद्भावनेचे, इतरांच्या अडचणी समजून घेण्याचे उदाहरण त्यांच्या नजरेसमोर ठेवा; स्वभावातील समत्वाचे उदाहरण त्यांना घालून द्या की, ज्यामुळे मुलं भयमुक्त होतील. भीतीमुळेच ती कपटी, अप्रामाणिक आणि इतकेच काय पण धूर्तसुद्धा बनतात, आपल्याला शिक्षा होईल या भीतीने ती तशी बनतात. मात्र तुमच्याबद्दल जर त्यांना विश्वास वाटला तर ते तुमच्यापासून काहीही लपविणार नाहीत आणि मग ते निष्ठावान व प्रामाणिक व्हावेत यासाठी तुम्ही त्यांना साहाय्य करू शकाल. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यासमोर आदर्श उदाहरण ठेवले पाहिजे! श्रीअरविंद त्याविषयी म्हणतात, व्यक्तीमध्ये सर्व परिस्थितीत अविचल राहील अशी चांगली विनोदबुद्धी असली पाहिजे, स्वतःला विसरून जाण्याची क्षमता असली पाहिजे; व्यक्तीने स्वतःच्या छोट्याछोट्या त्रासदायक गोष्टी इतरांवर लादता कामा नयेत, व्यक्ती दमलेली असेल किंवा अस्वस्थ असेल, तेव्हासुद्धा तिने चिडचिडे, अधीर होता कामा नये. यासाठी काहीशा पूर्णत्वाची, आत्म-नियंत्रणाची आवश्यकता असते, की जे साक्षात्काराच्या मार्गावरील एक मोठे पाऊल असते. खरा अग्रणी (leader) बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या अटींची परिपूर्ती जो कोणी करेल, मग भलेही तो लहान मुलांच्या एखाद्या छोट्याशा गटाचा नायक का असेना, तो योगसिद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या साधनेबाबत पुष्कळच प्रगत झालेला असतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 81)

विचार शलाका – १५

एकदा का तुम्ही योगमार्गामध्ये प्रवेश केलात की, तुम्ही सर्व प्रकारच्या भीतीपासून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे. मनामधील, प्राणामधील, शरीरामधील भीती, ही भीती तर शरीराच्या पेशीपेशींमध्ये भिनलेली असते; या सर्व प्रकारच्या भीतीपासून सुटका करून घेतली पाहिजे. तुम्हाला योगमार्गावर जे धक्के खावे लागतात त्याचा एक उपयोग म्हणजे या भीतीपासून तुमची सुटका करणे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या या भीतीच्या कारणांपासून मुक्त, निर्लिप्त, अस्पर्शित आणि शुद्ध असे त्यांच्यासमोर उभे ठाकू शकत नाही तोपर्यंत ही भीतीची कारणे तुमच्यावर पुन्हापुन्हा हल्ला करतच राहतात. एखाद्याला समुद्राची भीती वाटते तर दुसऱ्या एखाद्याला आगीची भीती वाटते. दुसऱ्याला कदाचित असे आढळेल की, त्याला वारंवार वणव्यापाठीमागून वणव्याला सामोरे जावे लागत आहे. त्याच्या शरीरातील एकूण एक पेशीचे भीतीने थरकापणे बंद होण्याइतपत जोवर तो प्रशिक्षित होत नाही, तोपर्यंत हे चालूच राहते. ज्याला तुम्ही घाबरत असता, ती भीती जोवर जात नाही तोवर ती गोष्ट पुन्हा पुन्हा तुमच्यापाशी येत राहते. जो रूपांतरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि जो या मार्गाचे अनुसरण करणारा आहे त्याने पूर्णतः निर्भय बनले पाहिजे. त्याच्या प्रकृतीच्या कोणत्याही भागामध्ये भीतीचा लवलेशदेखील राहता कामा नये.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 57)

…कदाचित मनुष्याच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा अडथळा असतो तो भीतीचा; ही भीती बहु-आयामी, अनेकरूपी, आत्म-विसंगत, अतार्किक, अविवेकी, बरेचदा युक्तिहीन असते. सर्व प्रकारच्या भीतींपैकी सर्वांत सूक्ष्म आणि सर्वांत चिवट अशी जर कोणती भीती असेल तर ती असते मृत्युची. या भीतीची पाळेमुळे अवचेतनेमध्ये (subconscious) खूप खोलवर रुजलेली असतात आणि तेथून ती उपटून काढणे ही गोष्ट सोपी नसते. अर्थातच ही भीती अनेक गुंतागुंतीच्या घटकांपासून बनलेली असते. या घटकांमध्ये : सुरक्षिततेची भावना असते; आणि चेतनेचे सातत्य खात्रीशीररित्या टिकून राहावे यासाठी त्याच्या संरक्षणाविषयीची चिंता असते; त्यामध्ये अज्ञातासमोर कच खाणे असते ; अदृश्य आणि अनपेक्षितपणातून उद्भवलेली अस्वस्थताही त्यामध्ये असते; आणि कदाचित या साऱ्यामागे, पेशींमध्ये खोलवर दडलेली अशी एक सहजप्रेरणा असते की, मृत्यू ही काही अटळ गोष्ट नाही आणि जर काही अटी पाळल्या तर त्यावर विजय प्राप्त करता येतो. परंतु खरे सांगावयाचे तर, विजय मिळविण्यामध्ये एक प्रमुख अडथळा हा या भीतीचाच असतो.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 82)

तुम्हाला जर बरे व्हायचे असेल तर दोन अटी आहेत. पहिली अट अशी की, तुम्ही भीती बाळगता कामा नये, अगदी निर्भय राहायला हवे. आणि दुसरी अट अशी की, तुमच्यामध्ये ईश्वरी संरक्षणाबद्दल पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. ह्या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 15: 141)

भीती म्हणजे मूक संमती असते. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती बाळगता तेव्हा, तिची संभाव्यता तुम्ही मान्य करता असा त्याचा अर्थ होतो आणि अशा प्रकारे तुम्ही तिचे हात बळकट करत असता. ती अवचेतन संमती असते असे म्हणता येईल. भीतीवर अनेक मार्गांनी मात करता येते. धैर्याचा, श्रद्धेचा, ज्ञानाचा मार्ग हे त्यापैकी काही मार्ग आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 14:243-244)