Posts

भारत – एक दर्शन २४

महाभारताप्रमाणेच रामायणाच्या कवीनेसुद्धा त्याचा काव्यविषय म्हणून एक इतिहास, प्राचीन भारतीय वंशाशी संबंधित अशी एक प्राचीन कथा किंवा आख्यान हाती घेतले होते आणि त्याने त्यामध्ये आख्यायिकांमधील आणि लोकसाहित्यामधील तपशिलांची भर घातली. एवढेच नव्हे तर, त्यांचे जे उदात्त प्रयोजन होते, जो उदात्त अर्थ होता तो अर्थ त्या काव्याला स्वतःमध्ये अधिक सुयोग्यरीतीने धारण करता यावा यासाठी त्या कवीने त्यांना महाकाव्याच्या एका भव्योदात्त स्तरावर नेले. पार्थिव जीवनामध्ये आसुरी शक्तींबरोबर ईश्वरी शक्तीचा जो लढा चालू असतो तो लढा हाच महाभारताप्रमाणेच रामायणाचाही विषय आहे, परंतु रामायणामध्ये तो महाभारतापेक्षा अधिक शुद्ध आदर्शवादी रूपामध्ये मांडला आहे, तसेच त्याला अलौकिक परिणाम देण्यात आले आहेत आणि येथे मानवी व्यक्तिमत्त्वांमधील चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी काल्पनिकरित्या अधिक फुलवून सांगण्यात आलेल्या आहेत. एका बाजूला त्यामध्ये आदर्श मानवतेचे चित्रण आहे, सद्गुणांचे, नीतिमान व्यवस्थेचे दिव्य सौंदर्य दर्शविले आहे, धर्मावर आधारित सभ्यतेचे (civilization) दर्शन येथे घडविले आहे आणि या सभ्यतेमध्ये उदात्त नैतिक आदर्श दाखविले आहेत. त्यातील सौंदर्यपूर्ण सुडौलता, सुसंवाद आणि माधुर्य यांचे अनन्य आकर्षण वाटावे इतक्या प्रभावीपणे त्यांचे सादरीकरण करण्यात आले आहे; तर दुसऱ्या बाजूला अमानुष अहंकार, स्वार्थमूलक इच्छा आणि उन्मादपूर्ण हिंसा यांच्या रानटी, अराजकतापूर्ण आणि जवळजवळ आकारहीन शक्तींचे सादरीकरण करण्यात आले आहे. मानसिक प्रकृतीच्या या दोन संकल्पना आणि शक्ती येथे जिवंत आणि मूर्तरूप धारण करतात आणि त्यांच्यात संघर्ष होतो, आणि राक्षस आणि दिव्य मानव यांच्या निर्णायक संघर्षामध्ये, राक्षसावर दिव्य मानवाचा विजय होण्यामध्ये त्याची परिणती होते.

संकल्पनेची एकेरी विशुद्धता ज्यामुळे कमी होईल, पात्रांच्या रूपरेषांमधील प्रातिनिधिक शक्ती, आणि पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यांची अर्थवत्ता ज्यामुळे क्षीण होईल अशा सर्व छटा आणि अशी सर्व जटिलता रामायणामधून वगळण्यात आलेली आहे, आणि त्याचे आवाहन आणि त्यांचे महत्त्व मानवी हृदयापर्यंत जाऊन पोहोचेल इतपतच त्या गोष्टींना येथे स्थान देण्यात आले आहे. (क्रमश: …)

– श्रीअरविंद [CWSA 20 : 349-350]

भारत – एक दर्शन २३

मूलतः महाभारताचा जो साहित्य-प्रकार आहे तोच रामायणाचादेखील आहे. फरक एवढाच की रामायणाचा आराखडा अधिक साधा आहे, त्यातील वृत्ती अधिक सुकुमार आदर्शवादी आहे आणि त्यामध्ये काव्यात्मक ऊबदारपणा आणि रंग यांचा तजेला अधिक आहे. रामायणामध्ये उत्तरकालीन कवींनी पुष्कळच भर घातलेली असली तरीसुद्धा, या महाकाव्याचा अधिकांश भाग हा एकहाती लिहिण्यात आलेला आहे, हे अगदी स्पष्ट आहे, आणि महाभारताच्या तुलनेत त्यामध्ये जटिलता कमी आहे तसेच त्यामध्ये रचनेची स्वाभाविक अशी एकसंधता आहे. रामायणाचा आविष्कार हा फारसा तत्त्वज्ञानात्मक नाही, तो शुद्ध काव्यात्मक मनाचा आविष्कार अधिक आहे. तो रचनाकाराचा आविष्कार असण्यापेक्षा अधिक प्रमाणात एका कलाकाराचा आविष्कार आहे. आरंभापासून अंतापर्यंत रामायणाची कथा एकसंध आहे आणि ती कथा कथानकाचा मुख्य प्रवाह कधीच सोडत नाही.

असे असूनसुद्धा त्यामध्ये दृष्टीची विशालता आहे, रामायणाच्या संकल्पनेमध्ये महाकाव्यात्मक उदात्ततेची महाभारताहून अधिक मोठी, विस्तृत-पंखांची झेप आहे त्यामध्ये तपशीलवार मांडणीचा बारकावा अथपासून इतिपर्यंत तसाच कायम राखण्यात आला आहे आणि त्यामध्येच एक प्रकारची समृद्धी आहे. महाभारताची रचनात्मक शक्ती, सशक्त कारागिरी आणि त्याची पिंड-प्रकृती ही एखाद्या भारतीय स्थापत्यकाराची आठवण करून देणारी आहे तर, रामायणाच्या रूपरेषेची स्पष्टता आणि त्याची भव्यता, त्यातील रंगाची समृद्धी आणि रामायणाचे तपशीलवार आलंकारिक प्रत्यक्षीकरण यामुळे रामायणातून आत्म्याच्या साहित्याचे सूचन होते आणि भारतीय चित्रकलेच्या शैलीची आठवण येते. (क्रमश: …)

– श्रीअरविंद [CWSA 20 : 349]

भारत – एक दर्शन २२

महाभारत हा ‘पाचवा वेद’ आहे, असे म्हटले जाते. रामायण आणि महाभारत ही दोन्ही काव्यं म्हणजे फक्त महाकाव्यंच आहेत असे नाही तर, ती धर्मशास्त्रं आहेत; ती धार्मिक, नैतिक, सामाजिक आणि राजकीय शिकवणुकीचा एक मोठा भाग आहेत, असेही म्हटले जाते. आणि या महाकाव्यांचा लोकांच्या जीवनावर आणि त्यांच्या मनावर इतका प्रभाव आहे, या महाकाव्यांची लोकांवर एवढी पकड आहे की, ही महाकाव्यं म्हणजे भारतीय लोकांचे बायबलच (धर्मग्रंथ) जणू, असे त्यांचे वर्णन केले जाते. परंतु ही उपमा तितकीशी बरोबर नाही, कारण भारतीय लोकांच्या धर्मग्रंथांमध्ये वेद आणि उपनिषदांचा, तसेच पुराणे आणि तंत्रग्रंथांचा आणि धर्मशास्त्रांचादेखील समावेश होतो, या व्यतिरिक्त विविध प्रादेशिक भाषांमध्ये असलेल्या विपुल धार्मिक काव्यसंपदेची तर गोष्टच निराळी, येथे तर त्यांचा विचारच केलेला नाही. उच्च तात्त्विक आणि नैतिक संकल्पना आणि सांस्कृतिक आचारविचार लोकप्रिय करणे हे या महाकाव्यांचे कार्य होते; अंतर्यामी आणि विचारांमध्ये जे जे काही सर्वोत्तम होते, किंवा जीवनाशी जे निष्ठा बाळगणारे होते, किंवा सर्जनशील कल्पनाशक्तीला आणि आदर्श मनाला जे वास्तव वाटत होते किंवा जे भारतीय सामाजिक, नैतिक, राजकीय आणि धार्मिक संस्कृतीवर प्रकाश टाकणारे, वैशिष्ट्यपूर्ण असे होते, ते ते सारे अगदी उठावदारपणे, प्रभावीपणे, ठाशीवपणे बाहेर आणायचे हे या महाकाव्यांचे कार्य होते. त्याची काव्यात्मक कथेच्या पार्श्वभूमीवर, महान काव्याच्या चौकटीमध्ये बसवून, आणि ज्या थोर व्यक्तिमत्त्वांनी जनमानसाच्या राष्ट्रीय स्मृतींमध्ये घर केले होते, जी व्यक्तिमत्त्वे ही एकप्रकारे प्रातिनिधिक व्यक्तिमत्त्वेच बनली होती अशा थोर व्यक्तिमत्त्वांभोवती त्यांची गुंफण करून ते कार्य करण्यात आले होते.

या सर्व गोष्टी या महाकाव्यांमध्ये मोठ्या कलात्मक शक्तीने आणि परंपरांना काहीसे पौराणिक, काहीसे ऐतिहासिक रूप देत, काव्यरूपी देहामध्ये कथात्मक परिणाम देत, एकत्रित करण्यात आल्या होत्या, परंतु येथील जनतेकडून त्यांच्या धर्माचा एक भाग म्हणून आणि अत्यंत सखोल आणि एक जिवंत सत्य या भूमिकेतून या महाकाव्यांचा परिपोष करण्यात आला.

अशा प्रकारे रचण्यात आलेली महाभारत आणि रामायण ही महाकाव्यं, मग ती मूळ संस्कृतामध्ये असोत की प्रादेशिक बोलीभाषांमध्ये पुनर्रचना केलेली असोत, ती महाकाव्यं कथेकऱ्यांनी, भाटगायन करणाऱ्यांनी, पठण करणाऱ्या मंडळींनी, कीर्तनकारांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवली; ती लोकशिक्षणाची आणि लोकसंस्कृतीची प्रमुख साधने बनली, टिकून राहिली; त्या महाकाव्यांनी जनसामान्यांच्या सौंदर्यात्मक आणि धार्मिक मनांची, विचारांची, चारित्र्याची जडणघडण केली आणि एवढेच नव्हे तर त्यांनी, अगदी अशिक्षित, अडाणी लोकांनादेखील तत्त्वज्ञान, नीती, सामाजिक आणि राजकीय संकल्पना, सौंदर्यात्मक भावना, काव्य, कादंबरी आणि प्रणयरम्य साहित्य यांचे पुरेसे बाळकडू दिले.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 346]

भारत – एक दर्शन २१

आपल्या महत्त्वाच्या परंपरेचे, इतिहासाचे ज्ञान देणे, हे जुन्या वैदिक शिक्षणाचे एक अंग होते. प्राचीन समीक्षकांनी, उत्तरकालीन साहित्यिक महाकाव्यांपासून महाभारत व रामायण यांचे वेगळेपण लक्षात यावे या हेतूने या दोन महाकाव्यासाठी ‘इतिहास’ हा शब्द योजला होता. इतिहास म्हणजे एक प्राचीन ऐतिहासिक किंवा पौराणिक परंपरा होत; आणि आध्यात्मिक किंवा धार्मिक किंवा नैतिक किंवा एखादा आदर्शवादी अर्थ अभिव्यक्त करणारी कहाणी वा अर्थपूर्ण आख्यायिका म्हणून तिचा सर्जनात्मक उपयोग केला जात असे. आणि अशा प्रकारे लोकमानस घडविण्यासाठी त्यांचा उपयोग होत असे. महाभारत आणि रामायण या साहित्यकृती मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे इतिहास कथन करणाऱ्या आहेत आणि त्यांचे प्रयोजनदेखील व्यापक आहे.

ज्या कवींनी ही महाकाव्यं लिहिली आणि ज्यांनी या काव्यात्मक लिखाणामध्ये काही भर घातली त्या कवींचा त्या लिखाणामागचा उद्देश, हा एखादी प्राचीन कथा सुंदर वा उदात्त पद्धतीने सांगावी एवढाच नव्हता किंवा एक अतिशय रसगर्भ, अर्थगर्भ अशी रचना करावी असाही नव्हता, या दोन्ही निकषांमध्ये त्यांना उत्तुंग यश मिळालेले असले तरी, तो काही त्यांचा उद्देश नव्हता. तर ती काव्यं त्यांनी आपण जीवनाचे स्थापत्यकार आहोत, शिल्पकार आहोत या भूमिकेतून लिहिली आहेत. आपण राष्ट्रीय विचार, धर्म, नीती आणि संस्कृती यांना अर्थपूर्ण आकार देणारे रचनाकार, सर्जनशील अभिव्याख्याते आहोत या भूमिकेतून त्यांनी ते लिखाण केले होते. या महाकाव्यांमध्ये जीवनाविषयी सखोल विचार आहेत, धर्म व समाज यांविषयी विशाल आणि महत्त्वपूर्ण दृष्टिकोन आहे, या महाकाव्यांमधून काही अंशी तत्त्वज्ञानात्मक संकल्पनांचा प्रवाह खेळविण्यात आलेला आहे, या महाकाव्यांमध्ये बौद्धिक संकल्पनांच्या महान शक्तीच्या आणि जिवंत सादरीकरणाच्या साहाय्याने, भारताची प्राचीन संस्कृतीच जणू मूर्तिमंत करण्यात आली आहे.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 345-346]

भारत – एक दर्शन २०

संस्कृत भाषेतील प्राचीन आणि अभिजात ग्रंथांची गुणवत्ता, त्यांची अभिव्यक्ती, त्यांच्या उत्कृष्टतेची विपुलता, त्यांच्यामध्ये असणारी मौलिकता, त्यांचे सामर्थ्य आणि सौंदर्य, त्यांच्यातील आशय, त्यांची कला व रचना, त्या ग्रंथांमधील भाषेचे वैभव, विषयाला दिलेला न्याय, त्यांच्या वाणीची मोहकता, त्यांच्या प्रवृत्तीच्या पल्ल्याची उंची आणि रुंदी या सर्वच दृष्टींनी हे ग्रंथ जगाच्या महान साहित्यामध्ये निर्विवादपणे अग्रस्थानी बसण्यासारखे आहेत.

निर्णायक मत देण्याच्या योग्यतेच्या व्यक्तींकडून ज्या भाषेस सार्वत्रिक मान्यता मिळालेली आहे, ती स्वयमेव संस्कृत भाषा ही, मानवी मनाद्वारे निर्माण करण्यात आलेले सर्वांत भव्य, सर्वांत परिपूर्ण आणि आश्चर्य वाटावे इतके पर्याप्त कार्यक्षम साहित्यसाधन आहे; ही भाषा एकाच वेळी ऐश्वर्यशाली आहे, मधुर आहे, लवचीक आहे, सामर्थ्यवान आहे, सुस्पष्टपणे रचलेली आहे, आणि परिपूर्ण आहे, ती जोशपूर्ण आहे, सूक्ष्म आहे. आणि ज्या संस्कृतीचे ती प्रतिबिंबरूप माध्यम होती त्या संस्कृतीच्या आणि ज्या मनांना ती अभिव्यक्त करत होती त्या मनांच्या, वंशाच्या गुणवत्तेचा आणि त्यांच्या चारित्र्याचा पुरेसा पुरावाच म्हणता येईल अशी तिची गुणवत्ता होती आणि असे तिचे स्वरूप होते. संस्कृत कवींनी व विचारवंतांनी, तिच्या क्षमतांच्या वैभवाला साजेसा असा तिचा महान आणि उदात्त उपयोग करून घेतला आहे.

भारतीय मनाने जे अत्यंत प्रमुख, सृजनशील आणि भव्योदात्त साहित्य निर्माण केले आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा हा संस्कृत भाषेचा असला तरीदेखील केवळ संस्कृतमध्येच भारतीय मनाने उत्तुंग आणि सुंदर आणि परिपूर्ण गोष्टींची निर्मिती केली आहे, असे मात्र नाही. भारतीय साहित्याचा संपूर्ण अंदाज येण्यासाठी, संस्कृत भाषेप्रमाणेच, पाली भाषेमधील बौद्ध साहित्य आणि संस्कृतमूलक आणि द्राविडी अशा जवळजवळ बारा भाषांमधील काव्यात्मक साहित्याचा, – जे काही ठिकाणी सुसंपन्न आहे तर, काही ठिकाणी निर्मितीच्या दृष्टीने पाहता संख्येने तुरळक आहे, – अशा सर्व साहित्याचा धांडोळा घ्यावा लागतो.

…भारतीय संस्कृती आणि भारतीय लोक ज्याला महान साहित्यकृती आणि थोर व्यक्ती म्हणतात त्यामध्ये वेद आणि उपनिषदे, महाभारत आणि रामायण ही महाकाव्ये, कालिदास, भवभूती, भर्तृहरी आणि जयदेव यांसारख्या थोर व्यक्ती तसेच भारतीय नाट्यशास्त्र, काव्य आणि अद्भुतरम्य अशा समृद्ध अभिजात रचनांचा समावेश होतो; त्यामध्ये धम्मपद आणि जातके, पंचतंत्र, नानक आणि कबीर आणि मीराबाई यांची भजने आणि तुलसीदास, विद्यापती आणि चंडीदास व रामप्रसाद, रामदास आणि तुकाराम, तिरुवल्लुवर आणि कंबन तसेच तसेच दक्षिणी शैव संत आणि अलवार यांचाही समावेश होतो. तरी येथे केवळ सुविख्यात लेखक आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्यकृतींचाच विचार केला आहे. उत्कृष्टतेच्या दृष्टीने प्रथम आणि द्वितीय श्रेणीमध्ये ज्यांची गणना होऊ शकेल असे विपुल साहित्य विविध भाषांमध्ये निर्माण झाले आहे; त्यांची जगामधील सर्वात जास्त विकसित आणि सृजनशील लोकांमध्ये आणि जगातील सर्वात महान सभ्यतांमध्ये निश्चितपणे गणना करावी लागेल.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 314-315]

भारत – एक दर्शन १९

हिंदुधर्मामध्ये, ‘अनंता’च्या संकल्पनेखालोखाल जर मुख्य स्थान कोणाला मिळाले असेल तर ते ‘धर्मा’च्या संकल्पनेला आहे; आत्म्याखालोखाल धर्म हा त्याच्या जीवनाचा पाया असतो. अशी कोणतीच नीतिकल्पना नाही की जिच्यावर हिंदुधर्माने भर दिलेला नाही. प्रत्येक नीतिकल्पना हिंदुधर्माने आदर्श स्वरूपात आणि आदेशात्मक पद्धतीने मांडली आहे. या धर्माने शिकवणुक, आदेश, बोधकथा, कलाकृती, रचनात्मक उदाहरणे यांच्या साहाय्याने नीतिकल्पना लागू केल्या आहेत. सत्य, मानसन्मान, निष्ठा, इमान, धैर्य, पावित्र्य, प्रेम, सहनशीलता, आत्मत्याग, अहिंसा, क्षमा, करुणा, सौजन्य, परोपकार या हिंदुधर्मामधील सार्वत्रिक नीतिकल्पना आहेत, हिंदुधर्माच्या दृष्टिकोनातून या नीतिकल्पना म्हणजेच सुयोग्य मानवी जीवनाचे मूलद्रव्य, मनुष्यधर्माचा गाभा आहेत.

बौद्धधर्मामध्ये उच्च व उदात्त नीती आहे. जैन धर्मामध्ये आत्मजयाचे कठोर ध्येय आहे. हिंदुधर्मामध्ये धर्माच्या सर्वांगाची जी भव्य उदाहरणे आहेत ती कोणत्याही धर्मातील किंवा कोणत्याही प्रणालीमधील नैतिक शिकवणीपेक्षा आणि नैतिक आचरणापेक्षा काकणभरदेखील कमी नाहीत. किंबहुना ही उदाहरणे सर्वोच्च श्रेणी प्राप्त करतात. आणि इतर धर्मांहून त्यांचा परिणाम सर्वात प्रभावशाली शक्ती म्हणून झाला आहे. प्राचीन काळी या गुणांचे आचरण मोठ्या प्रमाणात होत होते हे सिद्ध करणारे आंतरिक आणि बाह्य असे पुष्कळ पुरावे आहेत.

…भारतीय आध्यात्मिक साधकांना सुपरिचित असणारा एक नियम पाश्चात्त्य टिकाकारांना कदाचित माहीत नसावा किंवा त्याचा अर्थ त्यांच्या लक्षात आला नसावा. तो नियम असा की, दिव्य ज्ञानप्राप्तीसाठी प्रथम मन व जीवन शुद्ध, सात्विक असणे आवश्यक असते; भगवद्गीतेमध्ये असे सांगितले आहे की, “दुष्कर्म करणाऱ्यांना मी गवसत नाही.” पाश्चात्त्य टिकाकार हेही जाणून घेण्यात असमर्थ ठरले की, भारतीयांच्या विचारसरणीनुसार, सत्याचे ज्ञान होणे म्हणजे बुद्धीने सत्य ओळखणे किंवा बुद्धीने सत्याला मान्यता देणे असे नसून, सत्याचे ज्ञान होणे म्हणजे त्या आत्म-सत्यानुसार नवीन चेतना जागृत होणे व नवीन जीवन जगणे.

पाश्चिमात्य मनासाठी नीती ही बहुतांशरित्या बाह्य वर्तनाची गोष्ट आहे; पण भारतीय मनासाठी वर्तन हे आत्मावस्थेच्या अभिव्यक्तीचे फक्त एक साधन आहे, आणि ते आत्मावस्थेचे केवळ एक लक्षण आहे. पालन करण्यासाठी हिंदुधर्माने नैतिक नियमावली, काही आदेश कधीकधी जरूर एकत्रित केलेले आढळतात, पण अधिक भर दिलेला आहे तो मनाच्या आत्मिक किंवा नैतिक शुद्धीवर. वर्तन, कृती ही केवळ आंतरिक शुद्धीचे बाह्य लक्षण आहे असे येथे सांगितले जाते; येथे “तुम्ही हिंसा करू नका” असे जोरदारपणे सांगितले जाते, खूप स्पष्टपणे सांगितले जाते, पण याहून अधिक ठामपणे एका आदेशावर भर दिला जातो की, “तुम्ही कोणाचाही द्वेष करू नका; लोभ, क्रोध, मत्सर या विकारांना बळी पडू नका.‘’ कारण हिंसेचे मूळ या द्वेषादि विकारातच असते.

आणखी एक गोष्ट म्हणजे हिंदुधर्मात सापेक्ष आदर्श मान्य करण्यात आले आहेत. युरोपीय बुद्धीला ही शहाणीव (wisdom) पचविणे जड जाते. ‘अहिंसा परमो धर्मः’ – अहिंसा हा हिंदुधर्मातील सर्वात श्रेष्ठ नियम आहे – तथापि योद्ध्यासाठी भौतिक (शारीरिक) अहिंसा हा नियम ठेवलेला नाही; मात्र न लढणारे लोक व दुबळे, नि:शस्त्र, पराभूत झालेले लोक, कैदी, जखमी, पळणारे लोक यांजविषयी योद्ध्याने दया, दाक्षिण्य व सन्मानबुद्धी दाखवलीच पाहिजे अशी हिंदुधर्म त्याच्याकडून आग्रहपूर्वक अपेक्षा बाळगतो. अशा प्रकारे सर्वांना एकच एक निरपवाद नियम लावण्यात जी अव्यावहारिकता असते ती हा धर्म टाळतो.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 148-149]

भारत – एक दर्शन १८

 

भारतीय धर्माने मानवी जीवनासमोर चार आवश्यक गोष्टी मांडल्या. प्रथमतः त्याने, ज्या सर्वोच्च चेतनेमधूनच सारे काही उदयाला येत असते, ज्या चेतनेचा परिचय न होताच, ज्या चेतनेमध्ये सारे जीवनकार्य चालू असते; ज्या परिपूर्ण, शाश्वत आणि अनंत चेतनेविषयी एक ना एक दिवस सर्वांनी जागृत होणे आणि जिच्याकडे परत येणे गरजेचेच आहे, त्या सर्वोच्च चेतनेविषयीचा किंवा विश्वात्मक आणि विश्वातीत अस्तित्वाच्या प्रांताविषयीचा विश्वास मानवी मनावर बिंबवला.

नंतर, भारतीय धर्माने या महत्तर अस्तित्वाच्या सत्यामध्ये विकसित होण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यासाठी जोपर्यंत मनुष्याची तयारी होत नाही तोपर्यंत व्यक्तिगत जीवनामध्ये, अनुभव आणि विकास यांच्याद्वारे होणाऱ्या स्वतःच्या तयारीची आवश्यकता मनुष्यामध्ये ठसवली.

तिसरी गोष्ट म्हणजे, या धर्माने मनुष्याला सुस्थापित, सु-अन्वेषित, बहुशाखीय, नित्य विस्तारत जाणारे ज्ञानाचे मार्ग आणि धार्मिक व आध्यात्मिक साधनापद्धती प्रदान केल्या.

आणि सरतेशेवटी चौथी गोष्ट म्हणजे, या उच्चतर पायऱ्यांसाठी ज्यांची अजून पुरेशी तयारी झालेली नाही अशांसाठी त्याने व्यक्तिगत आणि सामूहिक जीवनासाठी एक संरचना प्रदान केली, वैयक्तिक आणि समाजाच्या आचरणाची आणि शिस्तीची, मानसिक व नैतिक आणि प्राणिक विकसनाची एक चौकट पुरविली. ही अशी चौकट होती की जिच्यामध्ये व्यक्ती स्वतःच्या मर्यादांमध्ये राहून, स्वतःच्या प्रकृतीनुसार वागू शकत होती आणि हे सारे अशा रीतीने घडत असे की त्यामुळे अखेरीस, त्या व्यक्तीची त्या उच्चतर जीवनासाठी तयारी होत असे.

यातील पहिली तीन तत्त्व ही कोणत्याही धर्मासाठी अगदी अनिवार्य अशी तत्त्वं असतात, परंतु हिंदुधर्माने या चौथ्या तत्त्वालासुद्धा खूप महत्त्व दिले; त्याने जीवनातील कोणताही घटक हा निव्वळ ऐहिक आहे, अ-धार्मिक आहे आणि धार्मिक व आध्यात्मिक जीवनासाठी परका आहे असे समजून, त्यामधून त्याला कधीही वगळले नाही.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 181]

भारत – एक दर्शन १७

हिंदुधर्माचे मूलभूत वैशिष्ट्य लक्षात घेतले तर आणि तरच हिंदुधर्मातील विधी, संस्कार, धार्मिकविधी, उपासनापद्धती, आणि पूजाविधी यांचे आकलन होऊ शकेल. मूलत: हा धर्म अनाग्रही आणि सर्वसमावेशक स्वरूपाचा आहे. या धर्माने त्याच्या सहवासात आलेल्या सर्व धर्मांना स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतले; त्या त्या धर्मातील विधींचे पारलौकिक जगताच्या सत्याशी व ‘अनंता’च्या सत्याशी योग्य नाते त्याला प्रस्थापित करता आले तर हिंदुधर्म समाधानी होत असे. दुसरी एक गोष्ट हिंदुधर्म जाणत होता की, धर्म केवळ संत वा विचारवंतांनाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांना वास्तविकता म्हणून उपयोगात आणायचा असेल तर, त्याची हाक आपल्या सर्व अस्तित्वाला पोहोचली पाहिजे; ती केवळ आपल्या अतिबौद्धिक व बौद्धिक अंगांपर्यंत पोहोचणे पुरेसे नाही, तर ती अस्तित्वाच्या इतर अंगांपर्यंत पोहोचणे देखील आवश्यक आहे; कल्पना, भावना, सौंदर्यसंवेदना यांच्यापर्यंतही ती हाक पोहोचली पाहिजे. एवढेच नव्हे तर, अर्धवट अवचेतन असलेल्या अंगांच्या सहज जन्मजात भावनांना देखील ती हाक पोहोचली पाहिजे. ही सर्व अंग धर्माच्या प्रभावाखाली आली पाहिजेत.

धर्माने मनुष्याला अतिबौद्धिक, आध्यात्मिक सत्याकडे नेले पाहिजे, आणि त्या वाटचालीमध्ये त्याने प्रकाशपूर्ण बुद्धीची मदत घेतली पाहिजे पण असे करत असताना, आपल्या जटील प्रकृतीच्या उर्वरित अंगांना ‘ईश्वरत्वा’कडे घेऊन जाण्याबाबत दुर्लक्ष करणे त्याला परवडण्यासारखे नाही.

आणखी एक गोष्ट म्हणजे, प्रत्येक मनुष्य जेथे उभा असेल, त्याला जे जाणवत असेल त्या माध्यमातूनच, हात देऊन धर्माने त्याला आध्यात्मिक बनवले पाहिजे, अध्यात्मपरायण बनवले पाहिजे; सत्य आणि जिवंत शक्तीचे तो जोवर आकलन करू शकत नाही तोवर ती गोष्ट त्याच्यावर लादता कामा नये. प्रत्यक्ष-ज्ञानवादी बुद्धी (positivist intelligence), हिंदुधर्मातील ज्या गोष्टींना अतार्किक वा तर्कविरोधी असे संबोधते, लांछन लावते त्या सर्व गोष्टींचा हा खरा अर्थ आहे आणि हे त्या गोष्टींचे खरे उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 147-148]

भारत – एक दर्शन १६

 

(भारतीय धर्म सर्वोच्च आणि व्यापक अशा तीन आध्यात्मिक अनुभूतींवर, तीन मूलभूत संकल्पनांवर आधारलेला आहे. त्यातील दोन गोष्टींचा विचार आत्तापर्यंत झाला. आता तिसरी संकल्पना पाहू.)

भारतीय धर्माला आधारभूत असणारी तिसरी अत्यंत परिणामकारक संकल्पना ही आंतरिक आध्यात्मिक जीवनाला अतिशय गती देणारी आहे. ज्याप्रमाणे ‘परमेश्वरा’शी किंवा ‘ईश्वरा’शी वैश्विक चेतनेद्वारे संपर्क साधता येतो किंवा सर्व आंतरिक व बाह्य ‘प्रकृती’चा भेद करून संपर्क साधता येतो, त्याचप्रमाणे ‘तो ईश्वर’ प्रत्येक व्यक्तिभूत आत्म्याला स्वत:मध्येच, म्हणजे त्याच्या स्वत:च्या आध्यात्मिक भागामध्ये भेटू शकतो. कारण त्यामध्ये असे काहीतरी असते की, जे त्या ‘ईश्वरी अस्तित्वा’शी, ‘सत् तत्त्वा’शी एकत्व पावणारे असते, किमान त्या दिव्य ‘ईश्वरी अस्तित्वा’शी संबंधित तरी असते; ही ती अत्यंत परिणामकारक अशी तिसरी संकल्पना आहे. आपल्या मनापासून आणि प्राणापासून हे आत्म-ज्ञान दडवून ठेवणाऱ्या ‘अज्ञाना’तून आपण बाहेर पडू शकू आणि आपल्यामध्ये वसणाऱ्या ‘दिव्यत्वा’विषयी आपण जागृत होऊ शकू अशा पद्धतीने आपण जीवन जगावे, विकसित व्हावे, हे आपले ध्येय असावे हा भारतीय धर्माचा गाभा आहे. या तीन गोष्टी एकत्र केल्या तर त्यामध्येच ‘हिंदु’ धर्म सामावलेला आहे, हेच त्याचे मूलभूत सार आहे आणि जर कोणती श्रद्धा आवश्यक असेल तर हीच ती श्रद्धा होय.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 195]

भारत – एक दर्शन १५

(‘भारतीय’ धर्म सर्वोच्च आणि व्यापक अशा तीन आध्यात्मिक अनुभूतींवर, तीन मूलभूत संकल्पनांवर आधारलेला आहे. त्यातील दुसरी संकल्पना पुढील प्रमाणे)

भारतीय धर्माची दुसरी पायाभूत संकल्पना अशी आहे की, ‘शाश्वत’ आणि ‘अनंता’कडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. जे मूळ ‘अनंत’ आहे त्यात अनेक अनंत आहेत, आणि या अनेक अनंतांपैकी प्रत्येक अनंत ‘शाश्वत’च आहे. आणि येथे विश्वाच्या मर्यादांमध्ये ‘ईश्वर’ स्वत:ला अभिव्यक्त करतो, आणि अनेक मार्गांनी या विश्वामध्ये तो स्वत:ची परिपूर्ती करतो; परंतु हा प्रत्येक मार्गच त्या ‘शाश्वता’चा मार्ग असतो. प्रत्येक सान्तामध्ये आपल्याला ‘अनंता’ची भेट होऊ शकते. सर्व गोष्टी या अनंताची रूपे व प्रतीके असल्याने, त्यांद्वारे आपण ‘अनंता’कडे जाऊ शकतो. ब्रह्मांडातील सर्व शक्ती त्या ‘एका’चेच आविष्कार आहेत. सर्व शक्ती त्या ‘एका’च्या शक्ती आहेत. ‘प्रकृती’च्या कार्यामागे असणाऱ्या देवदेवतांकडे, त्या एका ‘ईश्वरा’च्या विविध शक्ती आहेत, ती एकाच ‘ईश्वरा’ची विविध नामरूपे आहेत अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले पाहिजे आणि त्यांचे पूजन केले पाहिजे.

सर्व घटनांच्या पाठीमागे, मग त्या घटना आपल्याला चांगल्या दिसोत वा वाईट, ग्राह्य वाटोत वा अग्राह्य, भाग्याच्या वाटोत अथवा दुर्भाग्याच्या वाटोत, त्यांच्या पाठीमागे अनंत ‘चित्शक्ती’ असते, कार्यकारी ‘शक्ती’ असते, अनंताचा ‘संकल्प’ किंवा ‘कायदा’ असतो, ‘माया’ असते, ‘प्रकृती’ असते, ‘शक्ती’ किंवा ‘कर्म’ असते. ‘अनंत’ निर्मिती करतो आणि ‘ब्रह्मा’ होतो, तो रक्षण करतो आणि ‘विष्णु’ होतो, संहार करतो किंवा स्वत:मध्ये सामावून घेतो आणि ‘रुद्र’ वा ‘शिव’ होतो. जी आद्य शक्ती या विश्वाला धारण करण्यासाठी आणि त्याचे रक्षण करण्यासाठी उपकारक ठरते ती किंवा जी स्वत:ची निर्मिती ‘जगत्-जननी’ म्हणून करते ती लक्ष्मी किंवा दुर्गा असते. अगदी संहारक रूप धारण करूनदेखील, जी कल्याणकारिणीच असते; तिला ‘चंडी’, ‘काली’, ‘कालीमाता’ म्हणतात.

एकच ‘ईश्वर’ विविध नामांनी आणि विविध देवदेवतांच्या रूपाने, विभिन्न गुणवैशिष्ट्यांद्वारे अभिव्यक्त होतो. ‘वैष्णवां’चा दिव्य प्रेमाचा देव आणि ‘शाक्तां’चा दिव्य शक्तिशाली देव हे दोन वेगळे देव असल्याचे भासतात, परंतु खरेतर वेगवेगळ्या रूपांमधून अभिव्यक्त होणारी ती एकच अनंत ‘देवता’ असते. व्यक्ती यांपैकी कोणत्याही नामरूपाच्या आधाराने ‘परमेश्वरा’शी संपर्क साधू शकते, ज्ञान असताना किंवा ज्ञान नसतानाही संपर्क साधू शकते; कारण अंतिमतः या नामरूपांद्वारे, त्यांच्या पलीकडे, त्यांच्या अतीत असलेला परम अनुभव घेण्यासाठी आपल्याला पुढे जाता येते.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 194-195]