Tag Archive for: भारताचे जीवितकार्य

 

दि. ०८ जून १९६७

साधक : मी असे ऐकले होते की, १९६७ साली भारत हा ‘जगाचा आध्यात्मिक गुरू’ होईल. पण कसा होईल? आपण जर आत्ताची परिस्थिती पाहिली तर…

श्रीमाताजी : भारताने जगाचे आध्यात्मिक नेतृत्व करणे आवश्यकच आहे. भारताच्या अंतरंगामध्ये ती क्षमता आहे. परंतु बाहेर… प्रत्यक्षामध्ये भारत हा आध्यात्मिक नेता होण्यासाठी भारताला या घडीला अजून बरेच काही करण्याची आवश्यकता आहे. सद्य परिस्थतीमध्ये त्यासाठी अतिशय चांगली संधी आहे.

*

(श्रीअरविंद-आश्रमाला भेट देण्यासाठी आलेल्या भारत सरकारच्या शिक्षण-आयोगाला श्रीमाताजींनी दिलेला संदेश…)

भारत सरकारने एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे आणि ती म्हणजे, त्यांना (भारताच्या उज्ज्वल) भवितव्यासाठी काही करायची इच्छा आहे की त्यांना अट्टहासाने गतकाळाशीच जखडून राहायचे आहे?

– श्रीमाताजी (CWM 13 : 367)

 

दि. ३१ मार्च १९६७

श्रीअरविंदांच्या जन्मापूर्वी, धर्म आणि आध्यात्मिकता या गोष्टी भूतकाळातील व्यक्तींभोवती केंद्रित झालेल्या असत. भूतलावरील जीवनाला नकार हे उद्दिष्ट असले पाहिजे असे त्या व्यक्ती जनसामान्यांना सांगत असत. त्याकाळी तुमच्यापुढे दोन पर्याय ठेवले जात असत. एकतर या इहलोकातील असे जीवन की जे क्षुल्लक मौजमजा व वेदना, सुख आणि दु:ख यांच्या चक्रामध्ये फिरत राहते आणि जर तुम्ही योग्य वर्तणूक ठेवली नाहीत तर तुम्हाला नरकाची भीती दाखविते किंवा मग येथून दुसऱ्या जगामध्ये पलायन, स्वर्ग, निर्वाण, मोक्ष इत्यादी… या दोन्हीपैकी एकाची निवड करायची; खरंतर त्यामध्ये निवड करण्यासारखे काहीच नाही कारण दोन्ही पर्याय तितकेच वाईट आहेत.

श्रीअरविंदांनी आपल्याला असे सांगितले की, असा विचार करणे हीच मूलभूत चूक होती; कारण त्यातूनच भारताची अवनती घडून आली आणि याच गोष्टी भारताच्या दुर्बलतेला कारणीभूत ठरल्या. मायावाद वगैरे विचार देशाची सारी ऊर्जा शोषून घेत होते. परंतु, हेही तितकेच खरे आहे की, भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे की, ज्याला आजही, जडभौतिकापलीकडेही (Matter) काही आहे याची जाणीव आहे. युरोप, अमेरिका आणि इतर देशांना याचा विसर पडलेला आहे. आणि म्हणूनच जतन करण्यासारखा आणि विश्वाला देण्यायोग्य एक संदेश आजही भारताकडे आहे. पण सद्यस्थितीत मात्र देश गोंधळलेल्या अवस्थेत आहे.

श्रीअरविंदांनी आम्हाला हे दाखवून दिले की, या भौतिक जीवनापासून पळ काढण्यामध्ये सत्य सामावलेले नाही; तर या भौतिक जीवनात राहूनच जीवनाचे रूपांतरण करायचे आहे; त्याचे रूपांतरण दिव्यत्वामध्ये करायचे आहे की ज्यामुळे ईश्वर या इथेच, या ‘जडभौतिक विश्वा’मध्ये आविष्कृत होऊ शकेल.

– श्रीमाताजी (CWM 12 : 210-211)

 

दि. ०७ सप्टेंबर १९६६

साधक : पृथ्वीतलावर आध्यात्मिक जीवनाची प्रतिष्ठापना करण्यासाठी भारताने जगाचे गुरू बनणे आवश्यक आहे असे मानले जाते. पण, माताजी, भारताला असे हे उच्च स्थान प्राप्त होण्यापूर्वी त्याने राजकीयदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, आणि भौतिकदृष्ट्याही समर्थ व्हायला नको का?

श्रीमाताजी : शंकाच नाही. आणि आत्ताचा विचार केला तर, खूप काही करणे आवश्यक आहे.

*

दि. १४ सप्टेंबर १९६६

साधक : सध्याची गोंधळलेली अवस्था ही सत्याची सत्ता कायमची प्रस्थापित होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बदलांची नांदी आहे का?

श्रीमाताजी : सत्याच्या शक्तीचा हा अखिल पृथ्वीवर येणारा दबाव आहे. रूपांतरणासाठी नकार देऊ पाहणाऱ्यांनी जागोजागी केलेल्या उठावामधून ही अव्यवस्था, गोंधळाची, मिथ्यत्वाची स्थिती निर्माण झाली आहे. सत्याचा मार्ग खात्रीलायक आहे पण ते सत्य केव्हा आणि कशा प्रकारे प्रकट होईल हे सांगणे कठीण आहे.

– श्रीमाताजी (CWM 13 : 366 & 366-367 )

 

 

दि. १३ ऑक्टोबर १९६५

साधक : एकंदरीत पाहिले तर सर्वसाधारणपणे सद्यस्थितीत जग हे एक प्रकारच्या असंतुलनामध्ये आणि गोंधळामध्ये जगत आहे असे दिसते. याचा अर्थ असा होतो का, की जग हे एका नवीन शक्तीच्या आविष्कारासाठी, सत्याच्या अवतरणासाठी स्वत:ला तयार करत आहे? की, या सत्याच्या अवतरणाच्या विरोधात बंड करू पाहणाऱ्या आसुरी शक्तींच्या कारस्थानांचा हा परिणाम आहे ? आणि या सर्वामध्ये भारताचे स्थान काय?

श्रीमाताजी : तुम्ही म्हणता आहात त्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत आहेत. खरंतर तयारीच चालू आहे, पण ती तयारी करण्याचा मार्ग मात्र गोंधळाचा आहे. अशा वेळी, भारताने आध्यात्मिक मार्गदर्शक झाले पाहिजे आणि त्याने सद्यस्थितीत जे काही घडत आहे ते स्पष्ट करून, उलगडून दाखविले पाहिजे. तसेच त्याने ही तयारी त्वरेने घडावी यासाठी साहाय्यक झाले पाहिजे. परंतु, दुर्दैवाने भारत हा पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे भौतिकतावादी झाला आहे आणि त्याला त्याच्या आत्म्याचा विसर पडला आहे.

-श्रीमाताजी (CWM 13 : 365-366)

 

दि. २९ सप्टेंबर १९६५

(श्रीअरविंद यांनी दि. ०४ एप्रिल १९५० रोजी लिहिलेल्या पत्रामधील एक परिच्छेद श्रीमाताजी एका फ्रेंच साधकाला वाचून दाखवत आहेत.)

“भारत स्वतंत्र झाला आहे. ईश्वरी कार्यासाठी भारताचे स्वातंत्र्य आवश्यक होते. सद्यस्थितीत भारताला काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे आणि पुढील काळात त्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता दिसत आहे, विशेषतः पाकिस्तानच्या संदर्भातील अडचणी. या अशा गोष्टी आहेत की ज्या येणारच होत्या आणि त्यावर मार्ग काढणे आवश्यकच होते… या प्रश्नाचे पूर्ण निराकरण होणार याची खात्री आहे पण दुर्देवाने, या प्रक्रियेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात मानवाला दुःखभोगांचा सामना करावा लागणे अटळ आहे. त्यानंतर मग ईश्वरासाठीचे कार्य अधिक सहज होईल आणि जगाला आध्यात्मिक प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाण्याचे स्वप्न प्रत्यक्ष साकारण्याची शक्यता आहे. म्हणूनच जगाला साहाय्य करण्याची माझी इच्छा विफल ठरली आहे असे मी, अगदी आत्तादेखील, म्हणजे या अशा अंधकारमय परिस्थितीमध्येही मानू शकत नाही.”

*

(उपरोक्त पत्राच्या आधारे भारतात स्थायिक झालेला फ्रेंच साधक आणि श्रीमाताजी यांच्यामध्ये पुढील संवाद झाला.)

साधक : पाकिस्तानची ही समस्या प्रतीकात्मक आहे आणि जोवर ती समस्या सोडवली जात नाही तोपर्यंत भारत जगामधील त्याची खरी भूमिका पार पाडू शकणार नाही, असे यावरून दिसते.

श्रीमाताजी : हो, खरे आहे.

साधक : तुम्ही असे म्हणाला होतात की, तुम्हाला काही संकेत मिळाले आहेत.

श्रीमाताजी : हो, ते भौतिक संकेत आहेत. मात्र मी त्या गोष्टी बोलणे उचित नाही. ती एक राजकीय घडामोड आहे. ‘भारत अखंड आहे,’ हा संदेश सर्वदूर पोहोचला आहे आणि तो स्वीकारला गेला आहे. पण आत्ता त्याविषयी काही न बोलणे अधिक बरे.

साधक : ही समस्या सुटलेली असेल तेव्हा किती बरे होईल… कारण हा भारत देश किती छान आहे!

श्रीमाताजी : हो, ती समस्या सुटेल. ते विधिलिखित आहे. हा देश अनन्यसाधारण आहे. वास्तविक, कोणतेही दोन देश एकसारखे नसतात, हे खरेच आहे. परंतु इतर देशांबाबत असे म्हणता येईल की, वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात पण त्या एकसमान प्रतलावरीलच असतात. पण (आध्यात्मिकता) ही एक गोष्ट मात्र केवळ भारतातच आहे. तुम्ही या देशात वावरत असताना त्या वातावरणातच तुम्ही ती गोष्ट श्वासाबरोबर आत घेत असता. मला अगदी तीव्रतेने, अगदी तीव्रतेने हा अनुभव आलेला आहे.

मी जेव्हा इथून १९१५ साली इथून फ्रान्सला जायला निघाले, काही अंतरावर गेले, तेव्हा मला असे जाणवले की काहीतरी हरविल्यासारखे वाटत आहे आणि आम्ही जेव्हा भूमध्य समुद्रात प्रवेश केला, तेव्हा तर मला ते सहन करणेच अशक्य होऊ लागले आणि मग मी आजारी पडले. (नंतर श्रीमाताजींचे काही वर्षे जपान येथे वास्तव्य होते.) एवढेच नाही तर, जपान हा सुद्धा वास्तविक बाह्यतः अगदी अनोखा देश आहे. अद्भुतरित्या सौंदर्यपूर्ण आणि सुसंवादी असा हा देश आहे. तेथे बाहयतः प्रत्येक क्षणाला एक हर्षोल्लास होता, स्तिमित करणारा हर्ष होता, तेथील सौंदर्याची अभिव्यक्ती अतिशय अद्भुत होती, आणि तरीसुद्धा मला तिथे आतून खूप पोकळ व रिक्त वाटत असे. मला तिथे कशाची तरी उणीव भासत असे. (श्वासाची घुसमट होत असावी अशा पद्धतीने श्रीमाताजी आविर्भाव करून दाखवितात.) तेथे एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा अभाव होता. आणि तिथे जी गोष्ट हरविल्यासारखी वाटत होती ती मला, इथे भारतात परतल्यानंतर गवसली.

(CWSA 36 : 506-507) & (Conversation with a Disciple, September 29, 1965)

 

दि. १६ सप्टेंबर १९६५

(भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना श्रीमाताजींनी दिलेला संदेश)

भारत सत्यासाठी आणि सत्याच्या विजयासाठी लढत आहे. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एक होत नाहीत तोपर्यंत, भारताने लढा देत राहणे आवश्यक आहे कारण ‘एक होणे’ हे त्यांच्या अस्तित्वाचे सत्य आहे.

– श्रीमाताजी (CWM 17 : 262)

दि. ०५ ऑगस्ट १९६५

(श्रीमाताजींनी श्रीअरविंद-आश्रमाच्या सेंटर ऑफ एज्युकेशनमध्ये ‘फ्री प्रोग्रेस एज्युकेशन’ नावाची नवीन शिक्षणपद्धती निर्माण केली. ‘सेंटर ऑफ एज्युकेशन’ची उद्दिष्टं आणि तेथील शिक्षणपद्धती यांचे मूल्यमापन करण्यासाठी आलेल्या भारत सरकारच्या शिक्षण आयोगाच्या शिष्टमंडळाने श्रीमाताजींना पुढील प्रश्न विचारले होते…)

प्रश्न : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सद्यकालीन आणि भावी जीवन विचारात घेता, भारताने शिक्षणामध्ये कोणते उद्दिष्ट ठेवले पाहिजे?
श्रीमाताजी : भारतमातेच्या मुलांना, मिथ्यत्वाला (falsehood) नकार देण्यास आणि सत्याचा आविष्कार करण्यास तयार केले पाहिजे.

प्रश्न : हे उच्चतर उद्दिष्ट गाठण्यासाठी देशाने कोणती पावले उचलावीत? आणि या दिशेने सुरुवात कशी करता येईल?
श्रीमाताजी : चैतन्याचे आविष्करण करण्यासाठी जडद्रव्याला तयार केले पाहिजे.

प्रश्न : भारताची खरी प्रतिभा काय आहे आणि तिचे भवितव्य काय आहे?
श्रीमाताजी : जडभौतिक जोपर्यंत आत्मचैतन्याचे आविष्करण करत नाही तोवर ते मिथ्या आहे, कुचकामी आहे; ही शिकवण जगाला देणे ही भारताची खरी प्रतिभा आहे.

प्रश्न : भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे? मानवामध्ये चैतन्याच्या वाढीसाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची काही मदत होऊ शकेल का?
श्रीमाताजी : चैतन्याच्या आविष्करणासाठी, भौतिकाचा पाया मजबूत, परिपूर्ण आणि अधिक प्रभावी करणे हाच विज्ञान व तंत्रज्ञानाचा एकमेव उपयोग आहे.

प्रश्न : राष्ट्रीय एकात्मतेविषयी भारताला चिंता वाटते. श्रीमाताजींचा या बाबतीतला दृष्टिकोन काय आहे? भारताने स्वत:विषयीचे आणि जगाविषयीचे कर्तव्य कसे पार पाडावे?
श्रीमाताजी : सर्व राष्ट्रांचे ऐक्य हे संपूर्ण जगाचे एक अपरिहार्य भविष्य आहे. परंतु सर्व राष्ट्रांचे ऐक्य घडून येण्यापूर्वी प्रत्येक देशाची अंतर्गत एकात्मता साध्य होणे आवश्यक आहे.

प्रश्न : भारताला भाषाविषयक प्रश्नाने भेडसावले आहे. याबाबतीला आमचा योग्य दृष्टिकोन कसा असावा?
श्रीमाताजी : ऐक्य ही लादलेली गोष्ट असता कामा नये; तर ऐक्य हे जिवंत वास्तव असले पाहिजे. जेव्हा भारत अखंड झालेला असेल तेव्हा भारताकडे स्वाभाविकपणे सर्वांना समजू शकेल अशी एक भाषा असेल.

प्रश्न : शिक्षण हा सर्वसाधारणपणे आज साक्षरतेचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा विषय बनलेला आहे. हे एकप्रकारे हानिकारक नाही का? शिक्षणाला त्याचे आंतरिक मोल आणि त्याची आंतरिक आनंददायकता प्राप्त होण्यासाठी काय करता येईल?
श्रीमाताजी : बुरसटलेल्या विचारसरणीमधून बाहेर पडा आणि आत्म-विकसनावर भर द्या.

प्रश्न : आजची आपली शिक्षणपद्धती कोणत्या आभासामध्ये, भ्रांतिमध्ये अडकली आहे? आणि त्यातून आपण बाहेर कसे पडू शकू?
श्रीमाताजी :
अ) आजच्या शिक्षणपद्धतीमध्ये यश, करिअर आणि पैसा यांना नको तेवढे महत्त्व देण्यात आलेले आहे.
ब) त्यातून बाहेर पडण्यासाठी चैतन्याशी संपर्क प्रस्थापित केला पाहिजे आणि अस्तित्वाचे जे सत्य आहे त्याच्या विकसनास व त्याच्या आविष्करणास सर्वोच्च महत्त्व दिले गेले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 13 : 361-363)

अधिक माहितीसाठी पाहा :
श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन (मराठी विकिपीडिया)
https://mr.wikipedia.org/s/6fyd

 

दि. १६ जुलै १९६५

भारताकडे आत्म्याचे ज्ञान आहे किंवा होते असे म्हणावे लागेल, परंतु भारताने जडभौतिक जीवनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे, त्याला त्रास सहन करावा लागला. तर पाश्चात्त्य देशांकडे भौतिकाचे ज्ञान आहे पण त्यांनी आत्मतत्त्वाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. (देश, काळ, परिस्थितीनुसार) थोडेफार फेरफार करावे लागले तरी, सर्वंकष शिक्षण (integral education) जगातील सर्व राष्ट्रांमध्ये स्वीकारले जाणे शक्य आहे. या शिक्षणाने पूर्ण विकसित आणि उपयोगात आणल्या गेलेल्या जडभौतिकावर, आत्मशक्तीचा यथायोग्य अधिकार पुन्हा प्राप्त करून घेतलाच पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 13 : 361)

 

दि. २९ जुलै १९६४

(श्रीमाताजींच्या भारताच्या नकाशामध्ये पाकिस्तान, नेपाळ, सिक्किम, भूतान, बांग्लादेश, ब्रह्मदेश आणि श्रीलंका यांचा समावेश आहे.)

अखंड भारताच्या त्या नकाशाबद्दल श्रीमाताजी म्हणतात : हा नकाशा भारत-पाकिस्तान फाळणीनंतर बनविण्यात आलेला आहे. वरकरणी कितीही बदल झाले तरी हाच खऱ्याखुऱ्या भारताचा नकाशा आहे. आणि लोकांना काहीही वाटले तरी, खऱ्याखुऱ्या भारताचा हा नकाशा असाच कायम राहणार आहे.

*

इ. स. १९६५

साधक : मला आशा आहे की, काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्या एकीकरणाच्या दिशेने टाकले गेलेले पहिले पाऊल असेल.
श्रीमाताजी : परमप्रज्ञेचे त्याकडे लक्ष आहे.

– श्रीमाताजी (CWM 13 : 360, 366)

 

दि. २६ जानेवारी १९६४

साधक : तुमच्या दिव्य दृष्टीला भारत कसा दिसतो असे जर तुम्हाला एका वाक्यात विचारले तर तुम्ही सारांशरूपाने काय सांगाल?
श्रीमाताजी : जगद्गुरू होणे ही भारताची खरी नियती आहे.

साधक : तुम्हाला आजचे वास्तव कसे दिसते, यावर तुम्ही एका वाक्यात आम्हाला काय सांगाल?
श्रीमाताजी : सद्यस्थितीतील वास्तव हे एक मोठेच मिथ्यत्व (falsehood) आहे; त्याने शाश्वत सत्य दडवले आहे.

साधक : तुमच्या मते, स्वप्न आणि वास्तव यांच्यामध्ये अडथळा बनलेल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या?
श्रीमाताजी : १) अज्ञान २) भीती ३) मिथ्यत्व, खोटेपणा

साधक : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने आजवर जी एकंदर प्रगती केली आहे त्याबाबत तुम्ही समाधानी आहात का?
श्रीमाताजी : नाही.

साधक : अलीकडच्या काळातील सर्वात मोठी लक्षणीय उपलब्धी कोणती? तुम्हाला ती एवढी महत्त्वाची का वाटते?
श्रीमाताजी : सत्याविषयीची आस जागृत झाली. ही बाब महत्त्वाची वाटते कारण सत्याशिवाय वास्तवच नाही.

साधक : सर्वात दु:खदायक अपयश म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टीकडे निर्देश कराल? आणि ती तुम्हाला सर्वात दु:खद का वाटते?
श्रीमाताजी : अप्रामाणिकपणा. कारण तो विध्वंसाकडे नेतो.

– श्रीमाताजी (CWM 13 : 358-359)