Tag Archive for: पूर्णयोग

रिक्त मन (vacant mind) आणि स्थिर मन (calm mind) यामध्ये फरक आहे. तो असा की, मन जेव्हा रिक्त असते तेव्हा त्यामध्ये कोणताही विचार नसतो, धारणा नसते, कोणत्याच प्रकारची कोणतीही मानसिक कृती तेथे नसते, कोणत्याही रचलेल्या कल्पना नसतात, तर गोष्टींचा एक मूलभूत बोध तेथे असतो. मात्र स्थिर मनामध्ये, मानसिक अस्तित्वाचे द्रव्य (substance) स्थिर झालेले असते; ते इतके स्थिर झालेले असते की त्यास कोणीही विचलित करू शकत नाही.

काही विचार आलेच किंवा काही कृती उदयाला आल्याच तर, त्या आता मनामधून उगम पावलेल्या नसतात; त्या बाहेरून आलेल्या असतात आणि निर्वात हवेमध्ये आकाशामधून पक्ष्यांचा थवा इकडून तिकडे भरारी घेऊन जावा त्याप्रमाणे ते विचार किंवा कृती मनामध्ये प्रवेश करतात आणि तशाच बाहेर निघून जातात. या गोष्टी (स्थिर) मनात फक्त येऊन जातात, त्या कशालाही धक्का लावत नाहीत किंवा त्या स्वतःची कोणती खूणही मागे सोडून जात नाहीत. अशा मनामध्ये अगदी हजारो प्रतिमा तरळून गेल्या किंवा प्रचंड उलथापालथ झाल्याच्या घटना जरी मनासमोरून तरळून गेल्या तरी ही स्थिर-अचलता तशीच टिकून राहते, जणू काही त्या मनाचा पोतच शाश्वत आणि अविनाशी शांतीच्या द्रव्याचा बनलेला असतो.

अशा प्रकारची स्थिरता प्राप्त झालेल्या मनाकडून कर्म करायला सुरुवात केली जाऊ शकते, अगदी अविरतपणे आणि जोरकसपणेही त्या कर्माचा प्रारंभ केला जाऊ शकतो, परंतु त्या परिस्थितीमध्येदेखील असे मन स्वतःची मूलभूत स्थिरता टिकवून ठेवते. (आता) त्या कर्माचा उगम हा त्या मनामधून होत नसतो तर असे मन फक्त, जे ऊर्ध्वस्थित आहे ते त्याच्याकडून ग्रहण करत असते आणि त्यामध्ये स्वतःचे असे काही न मिसळता, स्थिरचित्ताने, निरपेक्षपणे, पण तरीही सत्याच्या आनंदानिशी, त्यांना मानसिक रूप देत असते. मनाच्या माध्यमातून पुढे जात असताना त्या मार्गाचा प्रकाश आणि आनंदी शक्तीदेखील त्याच्या सोबत असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 145)

मन किंवा प्राण हे जेव्हा विचारांमुळे आणि भावनांमुळे त्रस्त झालेले नसतात, अस्वस्थ नसतात किंवा ते विचार व भावनांमध्ये गुंतून पडलेले नसतात, तसेच जेव्हा त्यांच्यामध्ये विचार व भावनांचा कल्लोळ नसतो, तेव्हा तेथे ‘अविचलता’ (Quietness) असते. प्रामुख्याने मन जर अलिप्त असेल आणि विचार व भावनांकडे ते पृष्ठवर्तीय गतीविधी म्हणून पाहत असेल तर, ‘मन अविचल आहे’ असे आपण म्हणतो. तसेच प्राणाबाबतही म्हणता येते.

अस्वस्थतेचा तसेच अस्वस्थपणे केलेल्या हालचालींचा किंवा अशांततेचा अभाव असणे म्हणजेच स्थिरता (Calmness) नव्हे, तर स्थिरता ही त्याहूनही एक अधिक सकारात्मक अवस्था असते.

कोणतीही गोष्ट जिला अशांत करत नाही किंवा करू शकत नाही अशी महान आणि सघन प्रशांतता असल्याची सुस्पष्ट जाणीव जेव्हा मनाला किंवा प्राणाला असते; तेव्हा आपण म्हणतो की, तेथे ‘स्थिरता‌’ प्रस्थापित झालेली आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137-138)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

(पूर्वार्ध)

श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या आधीपासूनच अस्तित्वात असते. सर्वसाधारणपणे असे आढळते की, व्यक्ती अनुभवाच्या बळावर नाही, तर श्रद्धेच्या बळावर योगसाधनेला सुरुवात करते. ही गोष्ट फक्त योगमार्ग आणि आध्यात्मिक जीवनाबाबतीतच लागू पडते असे नाही; तर ती सामान्य जीवनात सुद्धा लागू पडते. कार्यप्रवण व्यक्ती, संशोधक, नवज्ञान-शोधक (inventors), ज्ञाननिर्माते (त्यांच्या वाटचालीला) सुरुवात करतात ती श्रद्धेनेच. जोपर्यंत एखादी गोष्ट सिद्ध होत नाही किंवा घडून येत नाही तोपर्यंत अगदी निराशा जरी आली, अपयश आले, किंवा विरोधी पुरावा सापडला, नकार मिळाला तरीदेखील ते त्या गोष्टीचा पाठपुरावा करत राहतात; कारण त्यांच्यामधीलच कोणीतरी त्यांना सांगत असते की, (तुम्ही ज्याचा पाठपुरावा करत आहात) त्यामध्ये तथ्य आहे, त्याचा पाठपुरावा केलाच पाहिजे, ती गोष्ट साध्य केली पाहिजे.

अंधश्रद्धा चुकीची नाही का, असे रामकृष्ण परमहंस यांना विचारले असता, ते तर पुढे जाऊन असे म्हणाले की, श्रद्धा एकाच प्रकारची असू शकते आणि ती म्हणजे अंधश्रद्धा. कारण श्रद्धा ही एकतर अंधच असते अन्यथा ती श्रद्धाच नसते, मग ती इतर काहीतरी असते – मग ते तर्कशुद्ध अनुमान असेल, पुराव्याने सिद्ध केलेली प्रचिती असेल किंवा स्थापित झालेले ज्ञान असेल. (उत्तरार्ध उद्याच्या भागात)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 92-93)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प आणि अभीप्सेला स्थान आहे, मात्र इच्छेला थारा नाही. जर इच्छा असेल तर तेथे आसक्ती, अपेक्षा, लालसा, समत्वाचा अभाव, ईश्वरप्राप्ती झाली नाही तर होणारे दुःख यासारख्या, योगाशी विसंगत असणाऱ्या सर्व गोष्टी आढळून येतील.

*

व्यक्तीला जे काही प्राप्त होते त्याबाबत तिने समाधानी असले पाहिजे आणि तरीही सर्वत्व (all) साध्य होत नाही तोपर्यंत व्यक्तीने, अधिकासाठी कोणताही संघर्ष न करता, शांतपणे आस बाळगली पाहिजे. तेथे इच्छा असता कामा नये, संघर्षसुद्धा असता कामा नये तर अभीप्सा, श्रद्धा, खुलेपणा असला पाहिजे आणि (मुख्य म्हणजे) ईश्वरी कृपा असली पाहिजे.

श्रीअरविंद (CWSA 29 : 61, 60)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे (व्यक्तीमध्ये) बदल घडून येतो.

*

अभीप्सेमध्ये शब्दांची आवश्यकता नसते. अभीप्सा शब्दांद्वारे किंवा शब्दांवाचूनही व्यक्त होऊ शकते.

*

अभीप्सा ही विचारांच्या रूपातच असली पाहिजे असे काही गरजेचे नसते. ती आंतरिक भावनेच्या रूपातदेखील असू शकते. मन कामामध्ये गुंतलेले असतानासुद्धा ती टिकून राहू शकते.

*

स्वतःसाठी काही मिळविण्याच्या इच्छेमधून सहसा (दिव्य शक्ती) खेचून घेणे (Pulling) ही प्रक्रिया घडू लागते; पण अभीप्सेमध्ये मात्र, उच्चतर चेतना अवतरित व्हावी आणि तिने आपल्या अस्तित्वाचा ताबा घ्यावा म्हणून, तिच्याप्रत केलेले आत्मदान (self-giving) असते. जेवढी साद उत्कट असते, तेवढे हे आत्मदान अधिक असते.

श्रीअरविंद (CWSA 29 : 59-60, 58, 58, 61)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३३

अभीप्सा अधिक एक-लक्ष्यी असेल तर साहजिकच प्रगती अधिक वेगाने होते. पण त्यामध्ये जर प्राणाचा, त्याच्या इच्छावासनांसहित आणि शरीराचा, त्याच्या गतकालीन सवयीच्या वृत्तींसहित शिरकाव झाला तर मात्र अडचण येते आणि तसा तो शिरकाव बहुतेक सर्वांमध्येच होतो. असा शिरकाव होतो तेव्हा अभीप्सेमध्ये अस्वाभाविकता येते आणि साधनेमध्ये एक प्रकारची निरसता येते. अशी निरसता हा साधनेतील सर्वश्रुत अडथळा असतो. परंतु व्यक्तीने निराश होता कामा नये; चिकाटी बाळगली पाहिजे. या शुष्क कालावधीमध्येही व्यक्तीने संकल्प दृढ ठेवला तर (अस्वाभाविकता आणि निरसता) या गोष्टी निघून जातात आणि त्यानंतर अभीप्सेची एक महत्तर शक्ती व अनुभूती शक्य होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 61)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३२

अभीप्सा (aspiration) जशी असेल अगदी तंतोतंत त्यानुसारच उच्चतर चेतना अवतरित होईल असे नाही; पण म्हणून अभीप्सा काही निष्फल ठरत नाही. अभीप्सेमुळे चेतना खुली ठेवली जाते; तसेच येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मूकसंमती देण्याची साधकामध्ये जी एक निष्क्रिय अवस्था असू शकते त्या अवस्थेला अभीप्सेमुळे एक प्रकारचा आळा बसतो. आणि उच्चतर चेतनेच्या स्रोतांप्रति एक प्रकारची ओढ निर्माण होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 58)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३१

कोणतेही साहाय्य नसताना, केवळ स्वतःच्या अभीप्सेच्या आणि संकल्पशक्तीच्या आधारे, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींवर मात करता येईल असे बळ क्वचितच एखाद्याकडे असते. आणि अगदी कोणी जरी अशी मात केलीच तरी त्याला या कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींवर केवळ एका विशिष्ट प्रकारचेच नियंत्रण मिळविता येते, त्यांच्यावर पूर्ण प्रभुत्व मिळविता येत नाही.

कनिष्ठ शक्तींशी सामना करत असताना, आपण ईश्वरी शक्ती‌च्या बाजूचे असावे यासाठी आणि ईश्वरी शक्ती‌चे साहाय्य मिळविता यावे यासाठी (साधकाकडे) संकल्पशक्ती व अभीप्सा असणे आवश्यक असते. आध्यात्मिक संकल्पाची आणि हृदयाच्या आंतरात्मिक अभीप्सेची परिपूर्ती करणारी ईश्वरी शक्तीच केवळ (कनिष्ठ प्रकृतीवर) विजय मिळवू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 721)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३०

साधक एका विशिष्ट अवस्थेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तरी त्याने वैयक्तिकरित्या अभीप्सा बाळगणे आवश्यकच असते. सारे काही आपोआप घडून येत आहे आणि विकासासाठी विशिष्ट ज्ञान व सहमतीचीच तेवढी आवश्यकता आहे अशी अवस्था येत नाही तोपर्यंत तरी, ही वैयक्तिक अभीप्सा आवश्यक असते.

*

ईश्वराला केलेले आवाहन म्हणजे ‘अभीप्सा’ आणि चेतना-शक्तीने प्रकृतीवर टाकलेला दबाव म्हणजे ‘संकल्पशक्ती’.

*

‘अभीप्सा’ म्हणजे शक्तींना केलेले आवाहन. शक्तींकडून जेव्हा त्या आवाहनाला प्रतिसाद मिळतो तेव्हा साधकामध्ये अविचल ग्रहणशीलतेची एक केंद्रिभूत झालेली पण सहजस्फूर्त अशी स्वाभाविक स्थिती असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 58, 57, 57)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २९

‘ईश्वरी शक्ती’ नेहमीच अस्तित्वात असते, तुम्हाला तिची जाणीवही झाली होती आणि तुमच्या चेतनेतून जरी ती तुम्हाला काही काळ हरवल्यासारखी किंवा दूरस्थ झाल्यासारखी भासली तरीदेखील, ती तिथेच आहे आणि तीच प्रबळ ठरणार हे निश्चित, याची तुम्ही स्वतःला सतत आठवण करून देत जा. कारण ती ‘ईश्वरी शक्ती’ ज्या कोणाला स्पर्श करते आणि जवळ घेते, ते सारे जण तेव्हापासून त्या ‘ईश्वरी शक्ती’चेच होऊन जातात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 189)