Tag Archive for: पुनर्जन्म

साधनेची मुळाक्षरे – ३७

आपले पूर्वीचे सर्व संबंध आणि परिस्थिती यांचा सातत्याने परित्याग करत; येणाऱ्या प्रत्येक नवीन क्षणी, आपण जणू काही जीवनाला नव्यानेच सुरुवात करत आहोत असे समजून जीवन जगण्याकडे वाटचाल करणे म्हणजे ‘आध्यात्मिक पुनर्जन्म’ होय.

आपल्या गतकाळातील कृतींचा जो प्रवाह असतो, ज्याला ‘कर्म’ असे म्हटले जाते, त्यापासून मुक्त होणे म्हणजे ‘आध्यात्मिक पुनर्जन्म’ होय; वेगळ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर, ‘प्रकृती’च्या कार्यकारणाची जी सामान्य गतिविधी असते त्या बंधनापासून सुटका, मुक्तता म्हणजे ‘आध्यात्मिक पुनर्जन्म’ होय. जाणिवेमधून हे भूतकाळाचे बंध जेव्हा अगदी यशस्वीरीत्या तोडून टाकले जातात तेव्हा आपल्यातील सर्व चुका, सर्व गुन्हे, सर्व दोष आणि मूर्खपणाच्या साऱ्या गोष्टी ज्या आपल्या स्मरणामध्ये अजूनही जाग्या असतात; रक्त शोषणाऱ्या जळवांप्रमाणे ज्या आपल्याला अजूनही चिकटून बसलेल्या असतात, त्या सर्व गोष्टी गळून पडतात आणि आपण अत्यंत आनंददायीरीत्या मुक्त व्हावे म्हणून त्या आपल्याला सोडून जातात.

हे स्वातंत्र्य ही काही केवळ विचारगम्य गोष्ट नाही; तर ते अतिशय सघन, व्यावहारिक आणि भौतिक असे वास्तव आहे. आपण खरोखरच मुक्त असतो, आपल्याला कोणतीच गोष्ट बंधनात टाकू शकत नाही, कोणतीच गोष्ट आपल्यावर परिणाम करू शकत नाही, जबाबदारीच्या जाणिवेने आपण ग्रस्त नसतो.

आपल्याला आपल्या भूतकाळाचा प्रतिकार करायचा असेल, तो पुसून टाकायचा असेल किंवा त्याच्यातून बाहेर पडायचे असेल तर, केवळ पश्चात्ताप किंवा तत्सम गोष्टींद्वारे तसे करता येणार नाही; तर अशा प्रकारचा अरूपांतरित भूतकाळ कधी अस्तित्वात होता हेच आपण विसरून गेले पाहिजे आणि आपल्याला जखडून ठेवणाऱ्या बंधनांना तोडणाऱ्या, चेतनेच्या प्रबुद्ध अवस्थेमध्ये आपण प्रवेश केला पाहिजे.

आध्यात्मिक पुनर्जन्म घ्यायचा म्हणजे जेथे आपण ‘ईश्वरा’शी एकत्व पावलेले असतो आणि ‘कर्मा’च्या प्रतिक्रियांपासून शाश्वतपणे मुक्त असतो अशा चैत्य चेतनेमध्ये आपण प्रथम प्रवेश केला पाहिजे. चैत्य पुरुषाविषयी (psychic being) जाग आल्याखेरीज हे करता येणे शक्य नाही; परंतु आत्मा जो सदासर्वदा ‘ईश्वरा’प्रत समर्पित झालेला असतो, त्या आपल्या अंतर्यामी असणाऱ्या आत्म्याविषयी आपण एकदा का निःशंकपणे जागृत झालो की, सर्व बंधने नाहीशी होतात. मग मात्र भूतकाळ आपल्याला जखडून ठेवत नाही आणि जीवन कायमसाठी पुन्हा एकदा नव्याने सुरू होते. आध्यात्मिक पुनर्जन्माच्या अंतिम उच्चावस्थेची तुम्हाला कल्पना यावी म्हणून सांगते की, ‘अखिल विश्व प्रत्यक्षात प्रत्येक क्षणाला नाहीसे होत असते आणि प्रत्येक क्षणाला ते नव्याने निर्माण होत असते,’ असा सदासर्वकाळ अनुभव येऊ शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 176-177)

प्रश्न : समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या जन्मात बुद्धिमान बनावे म्हणून खूप मेहनत केली, पण जर तो पुढच्या जन्मात निर्बुद्ध म्हणून जन्माला आला, तर त्याच्या त्या मेहनतीचा, परिश्रमांचा काय उपयोग?

श्रीमाताजी : अशा व्यक्तीचा चैत्य पुरुष हा निर्बुद्ध नसतो. उदाहरणार्थ असे समजा की, त्या व्यक्तीच्या चैत्य पुरुषाने लेखक असण्याचा आणि त्यामुळे त्याचे अनुभव पुस्तकं आणि भाषणं या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा अनुभव घेतला आहे. म्हणजे तो ज्या परिस्थितीमध्ये, ज्या सहसंबंधांनिशी जगत होता त्या विशिष्ट क्षेत्रातील सगळे अनुभव त्याने घेतले आहेत. पण असे करण्यामध्ये अनुभवाच्या एका क्षेत्राची कमतरता राहून गेली. उदाहरणार्थ, आता तो म्हणतो की, “आजवर मी माझ्या मेंदूने, बुद्धिने विचार करत जगत आलो, एखादा बुद्धिमान माणूस जीवनाला जशा प्रतिक्रिया देईल तशा पद्धतीने आजवर मी देत आलो, आता मात्र मला भावनांनिशी माझे जीवन जगायचे आहे.” कारण बघा नेहमी, बुद्धिच्या अतिवापरामुळे सामान्य जीवनामध्ये भावनांची क्षमता क्षीण होऊन जाते, गमावली जाते. तेव्हा आता एका वेगळ्या अनुभवाचे, विकासाचे क्षेत्र त्याला हवे असल्याने तो त्याच्या वैचारिक उंचीचा त्याग करतो; तो आता बुद्धिमान, प्रज्ञावान लेखक राहत नाही तर, तो एक अतिसामान्य माणूस बनतो, पण आता तो सहृदय बनतो; तो खूप दयाळू, खूप उदार असा बनतो…..

हे काही फार दुर्मिळ उदाहरण आहे असे नाही. उदाहरणार्थ, जो चैत्य पुरुष त्याच्या कमाल वाढीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे, एकदा त्याने सत्ताधीशाचे अनुभव (एखाद्या सम्राटाच्या किंवा राजाच्या जीवनाचे) घेतले आहेत तर, आता बारा महिने चोवीस तास शासकीय दिमाख, तामझाम यामध्ये अडकलेले जीवन त्याला नकोसे वाटेल; अगदी सामान्य जीवन, अगदी सामान्य अशा परिस्थितीमध्ये जन्माला येणे, अगदी पारंपरिक सामान्य, मध्यमवर्गीय परिस्थितीमध्ये जन्माला येणे तो पसंत करेल हे शक्य आहे; त्यामुळे देशाचा प्रमुख म्हणून ज्या सगळ्या शासकीय शिष्टाचारांना तो बांधलेला होता त्यांच्याविना, अगदी अज्ञात राहून देखील त्याला काम करता येणे शक्य होईल.

म्हणून जर तुम्ही एका विशिष्ट दृष्टीने त्याकडे पाहिले तर तुम्ही म्हणाल, “हे असे कसे काय ? त्याचे अध:पतन झाले की काय?” पण हे अध:पतन नसते. हे समस्यांना दुसऱ्या बाजूने भिडणे असते, दुसऱ्या दृष्टिकोनातून सामोरे जाणे असते. कारण चेतनेसाठी (खऱ्याखुऱ्या, दिव्य चेतनेसाठी) यश किंवा अपयश ह्या समानच गोष्टी असतात, झगझगाट किंवा सामान्यपण ह्या गोष्टीदेखील सारख्याच असतात. महत्त्वाचा असतो तो चेतनेचा विकास ! आणि जी परिस्थिती अनुकूल आहे असे माणसाला वाटत असते ती कदाचित चेतनेच्या विकासाच्या दृष्टीने खूप प्रतिकूल देखील असू शकते….

– श्रीमाताजी
(CWM 05 : 267)

प्रश्न : प्रत्येक जन्मामध्ये मन, प्राण आणि शरीर नवीन असल्यामुळे, गत जन्मांमधील अनुभव त्याला कसे उपयोगी पडू शकतील? का आपल्याला त्या सगळ्या अनुभवांमधून पुन्हा एकदा जावे लागते?

श्रीमाताजी : काही अगदी अपवादात्मक व्यक्ती आणि उत्क्रांतीची अतिप्रगत अवस्था वगळता – विकसित होणारा आणि जन्मोजन्मी प्रगत होत राहणारा असा चैत्य पुरुष असतो, मन वा प्राण नाही. तर घडते असे की : ह्या चैत्य पुरुषाचा, कार्यमग्नतेचा आणि विश्रांतीचा एका आड एक असा काळ असतो. जडदेहातील सक्रिय जीवनामध्ये, शारीरिक जीवन जगत असताना येणाऱ्या अनुभवांमुळे एक प्रगतिमय जीवन त्याच्या अनुभवाला येते; ते जीवन देह, प्राण आणि मन यांचे अनुभव घेत असते; नंतर, सहसा, चैत्य पुरुष त्याचे आत्मसातीकरण करण्यासाठी एक प्रकारच्या विश्रांत स्थितीमध्ये जातो – तो कार्यमग्न जीवनामध्ये असताना, जी प्रगती त्याने सिद्ध केलेली असते त्याच्या परिणामांवर तेथे कार्य केले जाते. आणि जेव्हा हे आत्मसातीकरण पूर्ण होते, पृथ्वीवर सक्रिय जीवनात असताना त्याने केलेली ती प्रगती आत जिरवली जाते तेव्हा, आजवर झालेल्या त्या प्रगतीचा परिपाक घेऊन तो नवीन देह धारण करतो आणि प्रगत अशा अवस्थेमध्ये अवतरतो. या किंवा त्या घटकाचा अनुभव पूर्ण करण्याच्या दृष्टीने कोणत्या प्रकारचे जीवन असावे, शरीर कसे असावे, वातावरण कसे असावे ह्या साऱ्याची तो निवड करतो. अतिप्रगत अवस्थेमध्ये चैत्य पुरुष, देह सोडण्यापूर्वीच, त्याच्या पुढील जन्मामध्ये तो कोणत्या प्रकारचे जीवन जगणार आहे हे ठरवू शकतो.

जेव्हा त्याची घडण जवळजवळ पूर्ण होते आणि तो जाणीवसंपन्न झालेला असतो तेव्हा तो नवीन देहाच्या घडणीमध्ये देखील सहभागी होतो आणि सहसा आंतरिक प्रभावाद्वारे, तो अशा प्रकारे त्या देहाचे घटक, द्रव्य निवडतो की, त्यामुळे त्या देहाला जे नवीन अनुभव घ्यावयाचे आहेत त्याच्या गरजा तो सहज स्वीकारू शकेल. पण हे खूपच प्रगत स्थितीमध्ये घडून येते. आणि नंतर, पूर्ण घडण झालेला तो जेव्हा या पृथ्वीतलावर सेवाभावी वृत्तीने परततो, समाजाला मदत करण्याच्या भावनेने येतो आणि ईश्वरी कार्यामध्ये सहभागी होतो तेव्हा, गत जन्मांमधील प्राण व मनाचे काही विशिष्ट घटक हे त्या देहाच्या निर्मितीमध्येही तो उतरवू शकतो. हे जे विशिष्ट घटक आहेत ते गेल्या अनेक जन्मांमधून चैत्य पुरुषाभोवती सुरचित होत गेलेले असतात, सगर्भ झालेले असतात आणि मग ते तसे घटक टिकून राहू शकतात आणि परिणामत: ते एकंदरच प्रगतीमध्ये सहभागी होऊ शकतात. पण हे फारच पुढच्या अवस्थेमध्ये घडून येते. जेव्हा चैत्य पुरुष हा पूर्ण विकसित आणि अत्यंत जाणीवसंपन्न होतो, जेव्हा तो ईश्वरी संकल्पाचे जागृत साधन बनतो तेव्हा, त्याच्याकडून प्राण व मन यांची अशा तऱ्हेने सुरचना केली जाते की, ज्यामुळे प्राण व मन देखील सर्वसाधारण सुमेळामध्ये सहभागी होऊ शकतात आणि टिकून राहू शकतात.

देहाचे जरी विघटन झाले तरी, विकसनाच्या उच्च स्तराकडून मानसिक आणि प्राणिक पुरुषाच्या काही भागांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची अनुमती दिली जाते. म्हणजे असे की, माणसाने एखाद्या कृतीचे जे भाग विशेषेकरून विकसित केले असतील ते – मनाचे वा प्राणाचे काही भाग – हे अगदी त्या आकारामध्ये, त्या रूपामध्ये देखील, (in their form) म्हणजे कृतीच्या ज्या आकारामध्ये ते जसे पूर्ण सुरचित झाले होते, तसेच्या तसे टिकवून ठेवले जातात. उदाहरणार्थ, ज्यांनी स्वत:च्या मेंदूचे विशिष्ट प्रकारे विकसन घडविलेले असते, अशा अतिशय बुद्धिमान लोकांमध्ये, त्यांच्या अस्तित्वाच्या मानसिक भागाची रचना ही एक सुविकसित, सुघटित मेंदू या रूपात तशीच टिकून राहू शकते, त्या मेंदूला त्याचे त्याचे असे स्वत:चे जीवन असू शकते आणि भावी जन्मापर्यंत ते अविकृत स्वरूपात म्हणजे जसे आहे तसेच, त्यात कोणताही बदल न होता टिकून राहू शकते की, ज्यामुळे त्याच्या सर्व लाभांनिशी ते त्या नवीन जन्मातही सहभागी होऊ शकते.

कलाकारांमध्ये, उदाहरणार्थ काही विशिष्ट वादकांमध्ये, ज्यांनी आपल्या हातांचा वापर विशिष्ट अशा जागरूकतेने केलेला होता, त्यांचे प्राणिक व मानसिक द्रव्य हे त्यांच्या हातांच्या रूपाने टिकून राहिले आणि ते हात पूर्णपणाने जागरूक राहिले होते. ज्यांच्याविषयी त्यांना विशेष जिव्हाळा आहे अशा जिवंत व्यक्तींच्या देहांचा ते उपयोग करून घेऊ शकतात.

अन्यथा, अगदी सामान्य लोकांमध्ये म्हणजे ज्यांच्यामध्ये चैत्य अस्तित्व हे पुरेसे विकसित आणि सुघटित झालेले नाही, त्यांच्या बाबतीतही जेव्हा ते चैत्य अस्तित्व देह सोडते तेव्हा, विशेषत: मृत्यूवेळी ती व्यक्ती शांतचित्त आणि एकाग्र असेल तर, त्या व्यक्तीचे मानसिक व प्राणिक आकार काही काळ पर्यंत टिकून राहू शकतात; पण जर का व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला, आवेगपूर्ण स्थितीमध्ये, अनेकविध आसक्तींमध्ये गुंतलेले असताना जर मृत्यू झाला तर, अस्तित्वाचे हे विविध भाग विखुरले जातात, त्यांच्या त्यांच्या स्वत:च्या आयुष्यमानानुसार ते कमीअधिक काळ, त्या त्या संबंधित क्षेत्रांमध्ये जिवंत राहतात आणि नंतर नाहीसे होतात.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 268-270)

श्रीमाताजी : पालक, वातावरण आणि परिस्थिती यांमुळे ज्याची घडण होते ते बाह्य अस्तित्व म्हणजे मानसिक, प्राणिक आणि शारीरिक अस्तित्व हे पुनर्जन्मामध्ये नव्याने जन्माला येत नाही; तर चैत्य पुरुष हा एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये संक्रमित होत जातो. त्यामुळे, तर्कदृष्ट्या विचार केला तर, मानसिक किंवा प्राणिक अस्तित्वाला गत जन्मांचे स्मरण असू शकत नाही किंवा त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते किंवा या वा त्या व्यक्तीचे जीवनमान कसे होते, ह्याचे स्मरण असू शकत नाही. फक्त चैत्य पुरुषालाच त्याचे स्मरण असू शकते; आणि त्यामुळे, आपल्यामध्ये गत जन्मांचे नेमके कोणते ठसे उमटले आहेत हे, आपल्या चैत्य पुरुषाविषयी जागृत झाल्यावरच आपल्याला समजू शकते. पण खरेतर, आपण गत जन्मांमध्ये काय होतो यावर आपले लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, आपल्याला काय बनायचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 124)

जीवाची उत्क्रांती किंवा जडाच्या पडद्यामधून बाहेर पडून क्रमश: आत्मशोध घेतघेत विकसित होणे, फुलून येणे हा पुनर्जन्माच्या सिद्धान्ताचा खरा आधार आहे……

पण या उत्क्रांतीचे प्रयोजन काय ? ….दिव्य ज्ञान, सामर्थ्य, प्रेम आणि शुद्धता यांच्या दिशेने होणारा सातत्यपूर्ण विकास हे ह्या उत्क्रांतीचे प्रयोजन असून ह्या गोष्टी हेच खरे तर गुण आहेत आणि हे गुण हेच त्याचे खरे बक्षीस होय.

आत्म्याच्या सर्वसमावेशक आलिंगनातील परमानंद आणि विश्वाविषयीचा जिव्हाळा यांपर्यंत जाऊन पोहोचू शकेल अशी सातत्याने वृद्धिंगत होत जाणारी क्षमता आणि प्रेमानंद हेच प्रेमाच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस असते. योग्य ज्ञानाच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस म्हणजे अनंत अशा प्रकाशामध्ये हळूहळू, क्रमाक्रमाने विकसित होत राहणे; योग्य शक्तीच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस म्हणजे दिव्य शक्तीमध्ये स्वत: अधिकाधिकपणे तळ ठोकणे आणि शुद्धतेच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस म्हणजे अहंकारापासून अधिकाधिक मोकळे होत होत, जेथे सर्व गोष्टी रूपांतरित होत, दिव्य समतेशी सममेळ पावतात त्या निष्कलंक व्यापकतेप्रत जाऊन पोहोचणे हे होय. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा बाळगणे म्हणजे स्वत:ला एक प्रकारच्या मूर्खतेशी आणि पोरकट अज्ञानाशी जखडून ठेवणे होय; वर उल्लेख केलेल्या गोष्टींव्यतिरिक्त इतर गोष्टींना बक्षीस समजणे हे अपरिपक्वतेचे आणि अपूर्णतेचे लक्षण आहे.

आणि मग दु:खभोग आणि आनंद, दुर्दैव आणि समृद्धी ह्यांचे काय ? ह्याचे उत्तर असे की : हे सर्व जीवाच्या प्रशिक्षणातील अनुभव असून ते त्याला त्याच्या घडणीमध्ये साहाय्य करतात, त्या गोष्टी टेकूसारख्या असतात, ती साधने असतात, त्या परीक्षा असतात, त्या अग्निपरीक्षा असतात आणि समृद्धी ही तर दुःखभोगापेक्षाही अधिक दुष्कर अशी अग्निपरीक्षा असते. खरेतर, आपत्ती, दुःखभोग याकडे पापाची शिक्षा म्हणून पाहण्यापेक्षा, त्यांच्याकडे गुणांचे पारितोषिक म्हणून पाहिले गेले पाहिजे. कारण उमलून येण्याची धडपड करू पाहणाऱ्या जीवाच्या दृष्टीने या गोष्टी त्याचे शुद्धीकरण घडविणाऱ्या आणि अत्यंत साहाय्यक ठरतात. दुःखभोग म्हणजे जणू न्यायाधीशाने दिलेले कठोर पारितोषिक किंवा दुःखभोग म्हणजे वैतागलेल्या सत्ताधीशाचा संताप आहे असे समजणे किंवा दुःखभोग म्हणजे वाईट कृत्याचा परिणाम म्हणून वाईट फळ मिळणे असे समजणे म्हणजे या विश्व-उत्क्रांतीच्या कायद्याविषयी आणि ईश्वराच्या जीवाबरोबरच्या संभाव्य व्यवहाराविषयी अगदीच वरवरचा दृष्टिकोन बाळगणे होय.

आणि मग ही भौतिक समृद्धी, वैभव, मुलेबाळे, कला, सौंदर्य, सत्ता ह्यांचा उपभोग ह्यांचे काय? तर, आपल्या आत्म्याला हानी न पोहोचता, जर त्या गोष्टी प्राप्त करून घेतल्या आणि आपल्या भौतिक अस्तित्वावर दिव्य आनंद व कृपा यांचा वर्षाव या भूमिकेतून त्यांचा आनंद घेतला तर त्या चांगल्या आहेत. त्या आपण प्रथमत: इतरांसाठी, खरंतर सर्वांसाठी मिळविण्याचा प्रयत्न करूयात; आपल्यासाठी त्या वैश्विक परिस्थितीचा केवळ एक अंशभाग असतील किंवा पूर्णत्व अधिक जवळ आणण्याचे ते केवळ एक साधन असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 267-268)

(पुनर्जन्म म्हणजे बक्षीस किंवा शिक्षा असते अशी समजूत असणारी माणसं कसा विचार करतात याविषयी श्रीअरविंद येथे सांगत आहेत.)

एखादा माणूस भला दिसतो आहे पण त्या माणसाकडे श्रीमंती, पैसे, भाग्य नसेल तर सर्वसामान्य माणसं असा समज करून घेतात की, तो गत जन्मामध्ये नीच असला पाहिजे; तो त्याच्या गुन्ह्यांची सजा ह्या जन्मामध्ये भोगत असला पाहिजे. पण केवळ अचानकपणे मातेच्या उदरात असताना त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे आणि तो भला म्हणून या जन्मात जन्माला आला आहे. आणि त्याचवेळी दुसरीकडे, जर एखाद्या दुष्ट माणसाची भरभराट होत आहे आणि जग त्याच्या पायाशी लोळण घेत आहे असे दिसले, तर (वरीलप्रमाणे विचार करणाऱ्या लोकांच्या लेखी,) तो त्याच्या गतजन्मातील चांगुलपणाचा परिणाम असतो. वास्तविक, एकेकाळी तो संतसत्पुरुष असणार पण त्याने सद्गुणांच्या मोठेपणाच्या क्षणिकतेचा अनुभव घेतला असेल आणि म्हणून तर त्याने ह्या जन्मी हा पापाचा पंथ स्वीकारला नसेल ना? (असा ते विचार करतात.) त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींचे स्पष्टीकरण असते, त्यांना सगळ्या गोष्टींचे समर्थन करता येते. आपण मागच्या जन्मात केलेल्या पापांमुळे दुःख भोगतो, ह्या जन्मातील गुणांचे आपल्याला पुढील जन्मी बक्षीस मिळणार आहे आणि हे असे अनंत काळपर्यंत चालत राहणार आहे; असे त्यांचे मत असते.

तत्त्वज्ञानी लोकांना मात्र ह्यात काही राम आढळत नाही आणि ते पाप आणि पुण्य या दोन्हींपासून स्वत:ची सुटका करून घ्यायला सांगतात आणि इतकेच नव्हे तर अद्भुतरित्या चालविल्या जाणाऱ्या या विश्वापासून सुटका करून घेणे, ह्यातच आपले भले आहे असे ते सांगतात, पण ह्यात काही नवल नाही.

हे उघड आहे की, ही विचारसरणी ही जुन्याच लौकिक-पारलौकिक लालूच आणि धमकी यांचे एक वेगळे रूप आहे; चांगल्या वागणुकीसाठी स्वर्गीय सुखांच्या लयलूटीची लालूच आणि दुष्प्रवृत्त माणसासाठी नरकातील शाश्वत आगीची वा पाशवी नरकयातनांची धमकी !

या जगताचे नियमन कोणा एका बक्षीस वा शिक्षा देणाऱ्या योजकाकरवी होत असते, ही यामागील कल्पना आहे. परमेश्वर हा जणू काही न्यायाधीश आहे, पिता आहे, किंवा परमेश्वर म्हणजे जणूकाही, वर्गातील गुणी मुलांना नेहमी लॉलिपॉप देणारा व खोडकर, वात्रट मुलांना दमात घेणारा कोणी शाळाशिक्षक आहे, ह्या कल्पनेशी सादृश्य राखणारी वरील कल्पना आहे.

सामाजिक गुन्हा केला की, त्याला अवमानित करणारी शिक्षा द्यावयाची, कधीकधी तर अगदी अमानुष अशी शिक्षा द्यावयाची, या रानटी आणि अविचारी विचारप्रणालीशी साधर्म्य राखणारी ही कल्पना आहे.

देवाच्या प्रतिमेनुसार स्वत:ला घडविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, आपल्या स्वत:च्या प्रतिमेमध्ये देवाला बसविण्यावर माणसाचा नेहमी भर असतो; परंतु या सर्व कल्पना म्हणजे आपल्यातील बालबुद्धीचे, आपल्यामध्ये असणाऱ्या रानटीपणाचे वा पशुचे प्रतिबिंब असते. आपण अजून त्यापलीकडे गेलो नाही किंवा आपल्यामध्ये रूपांतर घडवून आणू शकलो नाही, ह्याचेच ह्या कल्पना निदर्शक असतात….

ज्याअर्थी ह्या कल्पना इतक्या ठाशीवपणे आढळतात त्याअर्थी त्यांचा मानवाला घडविण्यामध्ये काही एक उपयोग असणार हे निश्चित. कदाचित असेदेखील असू शकेल की, अप्रगत जीवदशेतील लोकांबरोबर परमेश्वर त्यांच्या त्यांच्या बालीशतेला धरून व्यवहार करीत असेल; आणि मृत्युनंतरच्या जीवनाविषयीच्या वा पुनर्जन्माविषयीच्या, स्वर्गनरकाच्या त्यांच्या ज्या काही रोमांचकारी कल्पना असतात त्या कल्पना त्यांना बाळगू देण्यास तो संमती देत असेल. कदाचित मृत्युनंतरच्या जीवनाविषयीच्या आणि पुनर्जन्माविषयीच्या या बक्षीस व शिक्षेच्या कल्पना आवश्यक असतील, कारण त्या आपल्या अर्ध-मानसिक पशुतेशी मिळत्याजुळत्या होत्या. पण खरंतर, एका विशिष्ट दशेनंतर ही प्रणाली तितकीशी परिणामकारक ठरत नाही. माणसं स्वर्ग व नरक या कल्पनांवर विश्वास ठेवतात पण ….मृत्युशय्येवर पश्चात्ताप होईपर्यंत किंवा गंगातीरी जाऊन स्नान करेपर्यंत किंवा बनारसमध्ये पवित्र मरण येईपर्यंत खुशाल पापं करीत राहतात; (बालीशपणापासून सुटका करून घेण्याची ही सारी बालीश साधनं आहेत.)

पण सरतेशेवटी, मन परिपक्व बनते तेव्हा मग ह्या बालीश, शाळकरी उपायांना ते तिरस्काराने दूर करते. कारण ज्याच्यामध्ये दैवी क्षमता सामावलेली असते अशा मानवाने, केवळ बक्षीस मिळते म्हणून गुणवान होणे किंवा भयामुळे पापापासून दूर राहणे हे मानवण्यासारखे नाही…. कृपणा: फलहेतव: असे गीतेमध्ये यथार्थपणे म्हटले आहे. ह्या एवढ्या विशालकाय, प्रचंड अशा जगाची व्यवस्था ह्या असल्या क्षुद्र, क्षुल्लक प्रेरणांवर बसवली असेल, हे न पटण्यासारखे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 265-268)

…अशीही काही माणसं असतात, जी थोडंफार काही शिकलेली असतात, ती कमी अधिक प्रमाणात गूढवादी असतात वा पुनर्जन्मावर त्यांचा बालीश विश्वास असतो. त्यांना असे वाटते की अशी एक छोटीशी व्यक्ती असते की जी, भौतिकाचे वस्त्र पांघरते, म्हणजे शरीर धारण करते आणि जेव्हा हे वस्त्र गळून पडते तेव्हा ती निघून जाते आणि नंतर परत दुसरे वस्त्र पुन्हा धारण करते… जणू एखाद्या बाहुलीचे कपड़े बदलावेत त्याप्रमाणे. काही लोकांनी तर यावर अगदी गांभीर्याने त्यांच्या गतजीवनातील गोष्टी सांगणारी पुस्तके लिहिली आहेत, ते अगदी माकड होते तेव्हापासूनच्या जीवनातील गोष्टी; हा निव्वळ बालीशपणा आहे.

कारण हजारापैकी नऊशे नव्व्याणव वेळी, केवळ त्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असणारी एक छोटीशी चैत्य रचना मृत्यूनंतर कायम राहते, बाकी सर्व गोष्टी विरघळून जातात, तुकडेतुकडे होऊन इथे तिथे विखरून जातात आणि त्यांची व्यक्तिविशिष्टता, व्यक्ती त्यांची पृथागात्मता टिकून राहत नाही.

आत्ता, या भौतिक जीवनामध्ये, भौतिक व्यक्ती जे काही करीत आहे त्यामध्ये चैत्य पुरुष कितीवेळा सहभागी होतो ?… जे कोणी योगसाधना करतात, थोडेफार अनुशासित आहेत त्या माणसांविषयी येथे मी बोलत नाही; जीवनामध्ये मध्यस्थी करू शकेल, मार्गदर्शन करू शकेल इतपत ज्यांचा चैत्यपुरुष विकसित झालेला आहे, चैत्यपुरुषाची अशी क्षमता ज्यांच्यापाशी आहे अशा एकंदर माणसांविषयी मी बोलत आहे – काहींची वर्षच्या वर्षं कोणत्याही चैत्य मध्यस्थीविना जातात.

आणि तरीसुद्धा ते तुम्हाला येऊन सांगतात की, ते अमुक एका देशामध्ये जन्मले होते, त्यांचे आईवडील कसे होते, ते कोणत्या घरामध्ये राहायचे, त्यांच्या चर्चचे छप्पर कसे होते, त्यांच्या शेजारी कसे जंगल होते, जीवनातील अशा प्रकारच्या खूप साधारण गोष्टी, घटना.. या सर्व गोष्टी निव्वळ मूर्खतापूर्ण आहेत कारण त्या पूर्णतया पुसल्या जातात, त्या तशाच टिकून राहत नाहीत;

एखाद्या व्यक्तीमध्ये जीवनातील एखाद्या विशिष्ट अशा क्षणाची आठवण टिकून राहू शकते : जेव्हा काही खास अशी परिस्थिती असते, काही महत्त्वाचे क्षण असतात, असे क्षण की जेव्हा चैत्य अस्तित्वाने आकस्मिकपणे त्यामध्ये सहभाग घेतलेला असतो; आंतरिक हाकेपोटी वा आत्यंतिक निकडीपोटी चैत्य अस्तित्वाने आकस्मिकपणे हस्तक्षेप केलेला असतो अशा वेळी त्या क्षणाची स्मृती चैत्य स्मृतीमध्ये कोरल्यासारखी होते. जेव्हा तुमच्याकडे अशी चैत्य स्मृती असते तेव्हा तुम्हाला जीवनातील त्या क्षणाची परिस्थिती, विशेषत: आंतरिक भावना, त्या क्षणी सक्रिय असलेली जाणीव आठवते. आणि मग ती काही सहसंबंधांनिशी, तुमच्या अवतीभोवती जे होते त्यानिशी, एखादा उच्चारलेला शब्द, एखादा ऐकलेला वाक्प्रयोग यानिशी तुमच्या जाणिवेसोबत राहते. पण सर्वात महत्त्वाचे काय असेल तर ते म्हणजे, तुमचा आत्मा ज्या स्थितीमध्ये होता ती आत्म्याची स्थिती वा अवस्था; कारण ती अवस्थाच कोरल्याप्रमाणे स्पष्टपणे टिकून राहते. ह्याच चैत्य जीवनाच्या खाणाखुणा असतात, की ज्या गोष्टींचा खोल ठसा उमटलेला होता, त्याच्या घडणीमध्ये ज्यांचा सहभाग होता. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमच्या चैत्य अस्तित्वाचा सातत्याने, नेहमी, स्पष्टपणे असा शोध लागतो तेव्हा यासारख्या गोष्टीच तुम्हाला आठवतात.

या अगदी अल्पस्वल्प असू शकतात, पण त्या एखाद्याच्या आयुष्यातील चमकदार गोष्टी असू शकतात पण माणूस असे सांगू शकत नाही की, ”मी असा असा माणूस होतो, मी असे असे केले, मी या नावाने ओळखला जात होतो, मी असे करत असे, मी तसे करीत असे..”

अन्यथा, तारीख, स्थळ, देश, तो काळ हे सर्व सांगण्याइतपत परिस्थितीचे एकीकरण झाले असण्याची ती दुर्मिळ घटिका असली पाहिजे. असे घडू शकते. स्वाभाविकपणेच चैत्य जाणीवच त्यामध्ये अधिकाधिक अंशाने सहभागी होते आणि त्यातून स्मृतींचा साठा वाढत राहतो. अशा वेळी व्यक्तीला मागील जन्मांचे स्मरण होऊ शकते पण ते त्याच्या सर्व तपशीलानिशी नक्कीच नाही. व्यक्ती काही ठरावीक क्षणांविषयी असे म्हणू शकते, “हे असे असे होते” किंवा ‘मी अशी होते.” इ.

….पण येथे आवश्यकता कशाची आहे तर व्यक्तीचे अस्तित्व हे चैत्य पुरुषाशी पूर्णपणे एकात्म पावलेले असावे, व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्वच त्याच्याभोवती रचले गेले असावे, त्याचे संपूर्ण अस्तित्व – त्याच्या छोट्या छोट्या भागांसहित, सर्व घटकांसहित, व्यक्तित्वाच्या सर्व गतिविधी, हालचाली ह्या चैत्य केंद्राभोवती गुंफलेल्या असल्या पाहिजेत – या सर्वांनिशी एकसंध एकच एक असे, पूर्णत: ईश्वराभिमुख झालेले अस्तित्व तयार झाले असले पाहिजे; असे झाले असता, जेव्हा देह पडेल (मृत्यू येईल) तेव्हाही ते अस्तित्व टिकून राहील. पूर्णत: तयार झालेला जागृत जीवच अशा रीतीने गत जन्मामध्ये काय घडले होते ते नेमकेपणाने आठवू शकतो. त्याच्या जाणिवेतील काहीही न गमावता तो एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्येदेखील जागृतपणे जाऊ शकतो. या पृथ्वीवर अशा अवस्थेपर्यंत पोहोचलेले किती जीव असतील?… मला वाटते, फार नाहीत. आणि सहसा त्यांची ही साहसं सांगत बसण्यास असे जीव फारसे उत्सुक नसतात.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 32-34)

देह सोडल्यानंतर चैत्य पुरुष, दुसऱ्या जगातील काही विशिष्ट अनुभव घेतल्यानंतर, मानसिक आणि प्राणिक व्यक्तिमत्त्व टाकून देतो आणि गतकाळातील अर्क आत्मसात करण्यासाठी आणि पुढील जन्माची तयारी करण्यासाठी विश्रांत अशा स्थितीत निघून जातो.

नवीन जन्माची परिस्थिती कशी असेल हे, ह्या तयारीवरच अवलंबून असते. या तयारीमधूनच, नवीन व्यक्तिमत्त्वाची पुनर्रचना आणि त्यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीची निवड यासाठी मार्गदर्शन मिळते.

निघून गेलेला चैत्य पुरुष भूतकाळातील अनुभव अर्करूपाने स्मरणात साठवून ठेवतो, तो त्यांचे रूप वा तपशील लक्षात ठेवत नाही. आत्ताच्या आविष्करणाचा एक भाग म्हणून आत्म्याने जर गत जीवनातील एक वा अधिक व्यक्तिमत्त्वं आपल्यासोबत आणली असतील तर, त्याला गत जन्मातील काही तपशील आठवण्याची शक्यता असते. अन्यथा, केवळ योगदृष्टीनेच अशी स्मृती येते.

चैत्य पुरुषाच्या उत्क्रांतीमध्ये प्रतिगामी वाटतील अशाही काही हालचाली असतात, पण त्या केवळ आडव्यातिडव्या हालचाली असतात, ते खरोखरीचे मागे जाऊन पडणे नसते, तर ते ज्याच्यावर अद्यापि काम झालेले नाही पण परत त्यावर अधिक चांगले काम करावे म्हणून, अशा कोणत्यातरी गोष्टीकडे परत फिरून जाणे असते.

आत्मा प्राणिमात्रांच्या अवस्थेत परत मागे जात नाही; पण प्राणिक व्यक्तिमत्त्वातील काही भाग स्वत:ला विलग करून घेत, स्वत:मधील पशुप्रवृत्तीवर काम करण्यासाठी, परत पशुजन्माला जाऊन मिळू शकतो. लोभी मनुष्य साप बनून पुन्हा जन्माला येतो, या लोकरूढ कल्पनेमध्ये काही तथ्य नाही. ह्या प्रचलित काल्पनिक अंधश्रद्धा आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 534)

प्रश्न : क्ष मला असे विचारत होता की, पुनर्जन्माच्या या मालिकेमध्ये एखादी स्त्री पुरुष म्हणून किंवा एखादा पुरुष स्त्री म्हणून जन्माला येऊ शकतो का? त्याच्यामध्ये आढळणाऱ्या बायकी लक्षणांचे स्पष्टीकरण ह्या प्रकारे करता येईल असे त्याला वाटते. मलापण असे जाणून घ्यायचे आहे की, चैत्य पुरुषाला लिंग अशी काही गोष्ट असते का ?

श्रीअरविंद : चैत्य पुरुषामध्ये लिंग अशी काही गोष्ट नसते, पण पुरुष किंवा स्त्री तत्त्व असे म्हणता येईल. पुरुष हा स्त्री म्हणून किंवा स्त्री ही पुरुष म्हणून पुन्हा जन्माला येऊ शकते का हा एक कठीण प्रश्न आहे. पुनर्जन्मामध्ये काही विशिष्ट धागा पाळला जातो आणि माझा अनुभव तसेच सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, एखादा जीव सहसा (स्त्री तर स्त्री किंवा पुरुष तर पुरुष) असा एकाच प्रकारचा धागा पकडतो. पण लिंगामध्ये बदल ही गोष्ट अशक्य आहे असे मात्र म्हणता येणार नाही.

असेही काही असतात की, जे एका आड एक यापद्धतीने जन्म घेतात. पुरुषामध्ये बायकी लक्षणे आढळली तर तेवढ्यावरून तो गेल्या जन्मी स्त्री होता, असे काही खात्रीशीररित्या सांगता येत नाही. विविध शक्तींच्या खेळामधून आणि त्यांच्या विविध रचनांमधून अशी लक्षणे दिसून येऊ शकतात. अशीही काही गुणवैशिष्ट्ये असतात की, जी दोन्ही लिंगांमध्ये समान असतात. स्वतःचे नसलेले असे एखादे मानसिक व्यक्तिमत्त्व, त्याचा अंशभाग हा जन्माच्या वेळी त्या व्यक्तीशी सहसंबंधित झालेला असू शकतो. ….पुनर्जन्म ही गुंतागुंतीची गोष्ट आहे आणि त्याविषयीची जी प्रचलित कल्पना आहे तितकी त्याची यंत्रणा साधीसोपी नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 548-549)

पुनर्जन्म या विषयाबद्दलची नेहमी होणारी एक सर्वसाधारण घोडचूक तुम्ही टाळली पाहिजे. कोणी एक ‘टायटस बाल्बस’ हा ‘जॉन स्मिथ’ म्हणून पुन्हा जन्म घेतो, म्हणजे तो माणूस मागील जन्मात होता अगदी त्याच व्यक्तिमत्त्वानिशी, त्याच चारित्र्याचा, तेच प्राप्तव्य लाभलेला असा जन्माला येतो; फरक इतकाच की आधी तो टोगा परिधान करावयाचा आणि आता तो कोटपँट वापरतो आणि लॅटिन भाषेऐवजी कॉकनी इंग्रजी भाषा बोलतो; अशी सर्वसाधारणपणे समजूत असते. पण हे असे काही नसते.

काळाच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत या भूतलावर तेच ते एकच व्यक्तिमत्त्व, तेच चारित्र्य पुन्हा पुन्हा धारण करण्यात फायदा काय? आत्मा हा अनुभव घेण्यासाठी, वाढीसाठी, उत्क्रांत होण्यासाठी जन्माला येतो; जडद्रव्यामध्ये ईश्वरत्व आणेपर्यंत हे विकसन चालू राहावयाचे असते. केंद्रात्मा पुन्हा जन्माला येत असतो; बाह्य व्यक्तिमत्त्वाचा पुनर्जन्म होत नाही…

व्यक्तिमत्त्व म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, त्या एका जन्मातील अनुभव घेण्यासाठी बनविण्यात आलेला निव्वळ एक साचा असतो. दुसऱ्या एका वेगळ्या जन्मामध्ये तो चैत्य पुरुष स्वत:साठी एक वेगळे व्यक्तिमत्त्व, वेगळ्या क्षमता, वेगळे जीवन आणि वेगळी कारकीर्द घडवेल. जर समजा, रोमन कवी व्हर्जिल हा परत जन्माला आला, तर तो एक किंवा दोन जन्मामध्ये परत काव्य हाताशी धरेलही, पण तो निश्चितपणे महाकाव्य लिहिणार नाही, तर त्याला ज्या पद्धतीच्या ललित, सुंदर रचना लिहावयाची इच्छा होती, पण रोममध्ये असताना तो त्या लिहू शकला नव्हता, तशा तो लिहील. पुढच्या एखाद्या जन्मामध्ये तो अजिबातच कवी नसेल, कदाचित तो सर्वोच्च सत्य अभिव्यक्त करू पाहणारा, आणि त्याच्या सिद्धीसाठी धडपडणारा तत्त्वज्ञानी, योगी असेल – कारण या गोष्टींकडेसुद्धा त्याच्या जाणिवेचा सुप्त कल होता. कदाचित आपल्या काव्यामधून त्याने ज्या एनियन वा ऑगस्टसचे वर्णन केले आहे त्यांच्यासारखा तो कोणी योद्धा वा सत्ताधीश आधीच्या जन्मात असू शकेल.

केंद्रात्मा या वा त्या अंगाने एक नवीन चारित्र्य, एक नवीन व्यक्तिमत्त्व वाढवतो, विकसित करतो आणि तो सर्व प्रकारच्या पार्थिव अनुभवांमधून जात राहतो. उत्क्रांत होणारा जीव जसजसा अधिकाधिक विकसित होत जातो, अधिकाधिक संपन्न आणि जटिल होत जातो, तसतसा आपली सर्व व्यक्तिमत्त्वं जणू तो साठवत जातो. कधीकधी ती व्यक्तिमत्त्वं त्याच्या सक्रिय घटकांच्या पाठीशी उभी असतात, त्याच्या दर्शनी व्यक्तिमत्त्वामध्ये, त्या व्यक्तिमत्त्वांचा काही रंग, काही गुणधर्म, काही क्षमता इथेतिथे अशा आढळून येतात – कधीकधी तर त्या अगदी पृष्ठवर्ती येतात आणि मग अशा व्यक्तीची विविधांगी व्यक्तिमत्त्वं आढळतात, ती व्यक्ती बहुआयामी असते, कधीकधी तर असे भासते की, त्या व्यक्तीच्या ठिकाणी वैश्विक क्षमता आहेत.

पण जर का आधीचेच व्यक्तिमत्त्व, आधीचीच क्षमता पूर्णत: पुढ्यात आणण्यात आली, तर आधी जे केले होते तेच करण्यासाठी ती व्यक्ती पुन्हा तशीच येणार नाही; तर नवीन आकारात, नवीन रूपात तीच क्षमता अभिव्यक्त होईल, पण असे करताना जे आधी अस्तित्वात होते, त्याचेच केवळ पुनरुत्पादन असे त्याचे स्वरूप असणार नाही; तर अस्तित्वाच्या एका नवीन सुमेळामध्ये त्यांचे सामावून जाणे असेल.

तेव्हा तुम्ही अशी अपेक्षा बाळगता कामा नये की, आधीचा योद्धा, आधीचा कवी त्यांच्या बाह्य व्यक्तिवैशिष्ट्यांनिशी जसाच्या तसा पुन्हा येईल – हां, असे असू शकते की, त्याच्या बाह्य गुणवैशिष्ट्यांपैकी काही पुन्हा नवीन जन्मामध्येही दिसून येतील; पण ती गुणवैशिष्ट्ये एका नवीन गुणसम्मुचयामध्ये नव्याने प्रतिबिंबित झालेली असतील. पूर्वी जे केले नव्हते ते करण्यासाठी एका नव्या दिशेने सर्व शक्ती कामाला लावल्या जातील. आणखी एक गोष्ट अशी की, पुनर्जन्मामध्ये व्यक्तिमत्त्व, चारित्र्य ह्याला प्राधान्याने महत्त्व असत नाही. प्रकृतीच्या उत्क्रांतीच्या पाठीमागे चैत्य पुरुष असतो आणि तोच उत्क्रांत होत असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 543-544)