Posts

एक प्रकारच्या आत्मीयतेच्या, सहमतीच्या भावनेने एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर जोडली जाते किंवा त्यामुळे माणसं एकमेकांकडे आकर्षित होतात किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या प्रकृतीमधील एखाद्या घटकाचे व दुसऱ्या व्यक्तीच्या एखाद्या घटकाचे परस्परांमध्ये आकर्षण असते आणि त्यामुळे दोन व्यक्ती परस्परांशी जोडल्या जातात. सुरुवातीला व्यक्तीला हे फक्त जाणवते; दुसऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीमधील जे काही सुखद आहे किंवा चांगले आहे ते व्यक्तीला दिसते, तिचे गुण दिसतात; आणि कधीकधी तर त्या व्यक्तीमध्ये नसलेले गुणही दिसतात; किंवा तिला जेवढे ते वाटत असतात तेवढे ते प्रत्यक्षात नसतात. परंतु नंतर मात्र अति-परिचयामुळे, प्रकृतीमधील ज्या घटकांविषयी आत्मीयता नसते असे इतर घटकदेखील जाणवू लागतात. कधीकधी कल्पनांमध्ये संघर्ष असतो किंवा परस्परविरोधी भावना असतात किंवा कधी कधी दोघांच्या अहंकारांमध्ये संघर्ष असतो. शाश्वत गाढ प्रेम किंवा घट्ट मैत्री असेल तर मात्र परस्परसंबंधांतील या अडचणींवर मात करता येते आणि दोघांमध्ये सुसंवाद किंवा सामंजस्य निर्माण होते; पण बहुधा हे असे असत नाही किंवा परस्परांमधील मतभेद इतके विकोपाला गेलेले असतात की, या सामंजस्याच्या वृत्तीला छेद बसतो किंवा कधीकधी अहंकार इतका दुखावला जातो की, त्यामुळे ती सामंजस्याची वृत्ती संकोच पावते. आणि मग अशा वेळी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे अधिकच काटेकोरपणे निरीक्षण करू लागण्याची शक्यता असते आणि दुसऱ्याचे दोष अतिरंजित करण्याची किंवा वस्तुतः दुसरी व्यक्ती दुराचारी नसली वा वाईट चारित्र्याची नसली तरीही तिच्यावर तसे दोषारोप करण्याची शक्यता असते; पूर्ण दृष्टिकोनच बदलून जाण्याची शक्यता असते, सद्भावना या दुर्भावनांमध्ये, दुरावलेपणामध्ये, कधीकधी तर शत्रुत्वामध्ये किंवा हाडवैरामध्येसुद्धा बदलण्याची शक्यता असते. मानवी जीवनात हे नेहमीच घडत असते. याच्या अगदी उलटदेखील घडते, परंतु ते मात्र इतक्या सहजासहजी घडत नाही. म्हणजे वाईट भावनांचे परिवर्तन सद्भावनांमध्ये, किंवा विरोधाचे रूपांतर सुसंवादामध्ये होणे मात्र इतक्या सहजपणाने घडत नाही. अर्थात दुसऱ्या व्यक्तीबद्दलचे वाईट मत किंवा वाईट भावना ही काही या एकाच कारणामुळे निर्माण होते असे नाही. स्वाभाविक तिरस्कार, मत्सर, परस्परांच्या आड येणारे हितसंबंध इ. अनेक कारणांमुळे हे घडून येते.

व्यक्तीने इतरांकडे शांत-स्थिर भावाने बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे; गुण वा दोष यांपैकी कशावरच अतिरिक्त भर देता कामा नये; कोणतीही वाईट भावना नको किंवा कोणता गैरसमज नको वा अन्याय नको; तर एका स्थिर मनाने आणि दृष्टीने बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 299-300)

जेव्हा व्यक्ती ‘ईश्वरा’वर खऱ्या अर्थाने आणि समग्रतया प्रेम करत असते तेव्हा व्यक्ती त्या ‘ईश्वरा’ने निर्माण केलेल्या सृष्टीवर आणि प्राणिमात्रांवरही प्रेम करते आणि साहजिकपणेच, या प्राणिमात्रांमधील काही जण त्या व्यक्तीला निकटचे वाटू शकतात आणि त्यांच्यावर ती व्यक्ती विशेष प्रेम करत असते. परंतु तेव्हा व्यक्तीला जे प्रेम वाटते ते सामान्य मानवी प्रकारचे स्वार्थी प्रेम नसते; आपला ताबा असावा, मालकी असावी, अशा प्रकारची इच्छा असणारे ते प्रेम नसते; तर कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता स्वतःला देऊ करणारे असे हे प्रेम असते.

प्रेमाच्या आनंदासाठी प्रेम करणे ही शांतिपूर्ण आणि आनंदी जीवनासाठीची अत्युत्तम परिस्थिती असते; दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, सर्व वस्तुमात्रांमधील ‘ईश्वरा’वर प्रेम करावे.

‘ईश्वरा’ची जी इच्छा आहे अगदी तीच इच्छा बाळगण्यामध्ये जर त्याची परिणती झाली तर, मग तेथे परिपूर्ण शांती असते.

– श्रीमाताजी
(CWM 17 : 371)

एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती अशी अपेक्षा करते की, त्या दुसऱ्या व्यक्तीनेही माझ्यावर प्रेम केले पाहिजे आणि ते प्रेमदेखील तिने तिच्या पद्धतीने व तिच्या स्वभावानुसार करता कामा नये तर, माझ्या पद्धतीने व माझ्या इच्छांचे समाधान होईल अशा पद्धतीनेच केले पाहिजे, आणि सहसा व्यक्ती हीच चूक पहिल्यांदा करते. सर्व मानवी दुःखांचे, निराशांचे, हालअपेष्टांचे हेच प्रमुख कारण आहे.

कोणतीही सौदेबाजी न करता, स्वतःला देऊ करणे म्हणजे प्रेम; अन्यथा ते प्रेमच नव्हे. परंतु हे क्वचितच कोणाला उमगले आहे आणि त्याहूनही कमी प्रमाणात प्रत्यक्षात आचरले गेले आहे.

– श्रीमाताजी
(CWM 17 : 370)

असे एक प्रेम असते की, ज्यामध्ये भावना या चढत्यावाढत्या ग्रहणशीलतेनिशी आणि वाढत्या एकात्मतेनिशी ईश्वराभिमुख झालेल्या असतात, हे प्रेम ‘ईश्वरा’कडून जे काही प्राप्त होत असते त्याचा इतरांवर वर्षाव करत असते, पण तो वर्षाव कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता, अगदी मुक्तपणे करत असते. तुम्ही तसे करण्यास जर सक्षम असाल तर तेव्हा मग, तो प्रेमाचा सर्वोच्च आणि सर्वाधिक समाधान देणारा मार्ग असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 291)

खरे प्रेम एकच असते आणि ते प्रेम म्हणजे ‘ईश्वरी प्रेम’; प्रेमाची इतर सर्व रूपं म्हणजे त्या ईश्वरी प्रेमाची विरूपे असतात, त्या प्रेमाची संकुचित, मर्यादित रूपं असतात. अगदी भक्ताचे देवावरील प्रेम हे सुद्धा एक प्रकारे प्रेमाचा ऱ्हासच असतो, कारण ते बरेचदा अहंकाराने कलंकित झालेले असते. परंतु, व्यक्ती ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासारखी बनण्याकडे तिचा स्वाभाविक कल असतो त्यामुळे, भक्त जर का प्रामाणिक असेल तर, तो ज्याची पूजाअर्चना करतो त्या ‘ईश्वरा’सारखा तो बनू लागतो आणि अशा प्रकारे त्याचे प्रेम हे अधिकाधिक शुद्ध होत जाते. व्यक्तीचे ज्याच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती ‘ईश्वर’च आहे असे समजून त्याची भक्ती करावी, हा एक उपाय म्हणून बरेचदा सांगितला जातो, पण जोवर व्यक्तीचे हृदय आणि विचार हे विशुद्ध होत नाहीत तोवर ही गोष्ट त्याला खेदजनक अधोगतीकडे घेऊन जाण्याची शक्यता असते.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 297)

(श्रीअरविंद एका साधकाला पत्राद्वारे लिहीत आहेत…)

…नातेसंबंध कधीच पूर्ण किंवा स्थायी समाधान देऊ शकत नाहीत; तसे असते तर मनुष्याला ईश्वरप्राप्तीसाठी धडपडण्याचे कारणच नव्हते. तो त्याच्या सर्वसामान्य ऐहिक जीवनामध्येच समाधानी राहिला असता. जेव्हा ईश्वर गवसतो आणि चेतना ही सत्य-चेतनेमध्ये उन्नत होते, तेव्हाच इतरांबरोबर खरी नाती निर्माण होऊ शकतात.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 283)

ईश्वराच्या समीपतेसाठी व्यक्तीमध्ये प्रेमाचा आणि सहानुभूतीचा अभाव असणे गरजेचे नाही; उलट, इतरांशी निकटतेची व एकत्वाची भावना असणे या गोष्टी म्हणजे, ईश्वरसान्निध्यामुळे आणि ईश्वराशी ऐक्यभावामुळे साधक ज्या दिव्य चेतनेमध्ये प्रवेश करतो, त्या दिव्य चेतनेचाच एक भाग असतात.

…तर दुसऱ्या बाजूने पाहता, मानवी समाज, मानवी मैत्री, प्रेम, स्नेह, सह-अनुभूती या गोष्टी, अगदी पूर्णतः किंवा सर्वच उदाहरणांबाबत असे नव्हे, पण मुख्यत्वेकरून आणि बऱ्याचदा प्राणिक (vital) आधारावर उभ्या असतात आणि त्यांच्या केंद्रस्थानी अहंकाराची पकड असते. आपल्यावर कोणीतरी प्रेम करत आहे याचे सुख, संपर्कामुळे अहंकार व्यापक होण्याचे सुख, आत्म्याचा परस्परांमध्ये प्रवेश, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचे पोषण होते असा प्राणिक देवाणघेवाणीचा उल्हास, या साऱ्या गोष्टींवर माणसांचे सहसा प्रेम असते – आणि यामध्ये इतरही काही आणि याहूनही अधिक स्वार्थी अशा प्रेरणा असतात; त्या प्रेरणा वरील मूलभूत गतिविधींमध्ये मिसळतात. यामध्ये अर्थातच उच्चतर आध्यात्मिक, आंतरात्मिक, मानसिक आणि प्राणिक घटकही प्रवेश करतात किंवा प्रवेश करू शकतात; परंतु एकंदरच ही सर्व गोष्ट खूप गुंतागुंतीची असते, अगदी तिच्या सर्वोत्तम अवस्थेत देखील ती गुंतागुंतीचीच असते. आणि म्हणूनच एका विशिष्ट अवस्थेमध्ये कोणत्यातरी प्रत्यक्ष कारणामुळे किंवा कारणाविनादेखील हे जग, जीवन, मानवी समाज आणि नातेसंबंध तसेच परोपकार या गोष्टी नीरस वाटू लागतात. (इतर सर्व गोष्टींप्रमाणेच हा परोपकारदेखील अहं-प्रेरित असाच असतो.)

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 285-286)

प्रकृतीची संपूर्ण ज्वाला ही ईश्वराकडे वळवावी आणि उर्वरित गोष्टींनी खऱ्या आधाराची वाट पाहावी, ही योगामधील प्रमाण गोष्ट आहे, असा आमचा दृष्टिकोन आहे; सामान्य चेतनेच्या चिखलमातीवर उच्चतर गोष्टींची उभारणी करणे सुरक्षित नसते. यासाठी मैत्री किंवा बंधुभाव सोडण्याची आवश्यकता नाही, परंतु मध्यवर्ती अग्नीच्या तुलनेत या गोष्टी गौण असल्या पाहिजेत. दरम्यानच्या काळात, एखाद्याने ‘ईश्वराबरोबरचे नाते’ हेच चित्तमग्न करणारे असे स्वतःचे ध्येय बनवले, – जे अगदी स्वाभाविक असते – तर ते साधनेला अधिकच बळकटी देते. आपण ज्या दिव्य चेतनेच्या शोधात आहोत त्या दिव्य चेतनेची प्रभा जेव्हा उजळलेली असते तेव्हा, आंतरात्मिक प्रेमाला (Psychic love) स्वतःचाच पूर्णतया शोध लागतो; जोपर्यंत आंतरात्मिक प्रेमाला हा शोध लागत नाही तोपर्यंत त्याला त्याचे प्रकाशमान, अविभाज्य असणारे स्व आणि रूप कायम राखणे अवघड होते.

मन, प्राण, शरीर ही आत्म्याची आणि जीवाची यथायोग्य साधने आहेत, जेव्हा ही साधने स्वतःसाठी कार्य करतात तेव्हा ती अज्ञानी आणि अपूर्ण गोष्टी निर्माण करतात – त्यांना जर आपण अंतरात्म्याची आणि जीवाची जागरूक साधने बनवू शकलो तर, त्यांना त्यांची स्वतःची दिव्यतर परिपूर्ती लाभते; पूर्णयोगामध्ये आपण ज्याला ‘रूपांतरण’ म्हणतो त्या पाठीमागची कल्पना हीच आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 308)

केवळ प्राणामध्येच जोश असतो आणि आंतरात्मिक प्रेम (Psychic love) मात्र कोणत्याही ज्वालेविना काहीसे थंड असते, असे समजण्याची चूक करता कामा नये. …आंतरात्मिक प्रेमामध्ये सुद्धा जोश असू शकतो, प्राणिक प्रेमाइतकीच उत्कट किंबहुना त्याहूनही अधिक उत्कट अशी ज्वाला असू शकते. तो शुद्ध अग्नी असतो, तो अहंकारात्मक इच्छावासनांच्या पूर्तीवर अवलंबून नसतो. तसेच, हे आंतरात्मिक-प्रेम ज्याला कवळते त्या समिधेचे (fuel) ते भक्षण करत नाही. ती ज्वाला लाल नसते, ती शुभ्र असते; परंतु उष्णतेच्या बाबतीत लाल उष्णतेपेक्षा ही धवल उष्णता कणभरदेखील उणी नसते. हे खरे आहे की, सहसा आंतरात्मिक प्रेमाला मानवी नातेसंबंध व मानवी प्रकृतीमध्ये पूर्ण वाव मिळत नाही; जेव्हा ते प्रेम ईश्वराभिमुख होऊन उन्नत होते तेव्हा तिथे त्याच्या अग्नीला अधिक सहजतेने पूर्णत्व आणि परमानंद गवसतो. मानवी नातेसंबंधांमध्ये हे आंतरात्मिक प्रेम इतर घटकांमध्ये मिसळून जाते; ते घटक लगेचच त्याला वापरण्याचा प्रयत्न करतात, त्याला झाकोळून टाकतात. अगदी क्वचितच काही क्षणी या प्रेमाला स्वतःची परिपूर्ण उत्कट अभिव्यक्ती करण्यास वाव मिळतो. अन्यथा, ते केवळ एक तत्त्व म्हणून प्रवेशते परंतु तरीसुद्धा ते प्राणप्रधान अशा त्या प्रेमामध्ये सर्व उच्चतर गोष्टी प्रदान करते – सुंदर असे माधुर्य, कोमलता, एकनिष्ठता, आत्मदान, आत्मत्याग, आत्म्याचे आत्म्याला भेटणे ह्या साऱ्या गोष्टी ते प्रदान करते. मानवी प्रेमाला स्वत:च्या अतीत जात, त्याला उन्नत करण्याची, त्याचे उदात्तीकरण करण्याची, त्याला आदर्श प्रेम बनविण्याची प्रक्रिया अंतरात्म्याकडूनच घडते. आंतरात्मिक प्रेम जर मानवी प्रेमाच्या मानसिक, प्राणिक, शारीरिक या इतर घटकांवरही वर्चस्व राखू शकले आणि त्यांच्यावर शासन करू शकले आणि त्या घटकांचे परिवर्तन घडवू शकले तर, या द्वैती जीवनामध्ये (dual life), असे प्रेम म्हणजे, आत्मा आणि त्याच्या साधनांचे ‘परिपूर्ण ऐक्य’ हे जे वास्तव आहे त्याचे या पृथ्वीवरील काहीसे प्रतिबिंब असू शकते किंवा ती त्या वास्तवतेची पूर्वतयारी असू शकते, असे म्हणता येईल. परंतु आंतरात्मिक प्रेमाची अशा प्रकारची अपूर्ण रुपेसुद्धा खूप दुर्मिळ असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 307-308)

दोन पुरुषांमध्ये किंवा दोन स्त्रियांमध्ये मैत्री होणे हे पुरुष आणि स्त्रीमध्ये मैत्री होण्यापेक्षा निश्चितपणे अधिक सोपे असते, कारण सहसा तेथे कोणतीही लैंगिक लुडबुड नसते. पुरुष आणि स्त्रीच्या मैत्रीला कोणत्याही क्षणी सूक्ष्मपणे किंवा थेटपणे लैंगिक वळण लागू शकते आणि त्यातून विकार निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु स्त्री-पुरुषांच्या बाबतीत शुद्ध मैत्री अशक्यच असते असे मात्र नाही; अशी मैत्री असू शकते आणि ती नेहमीच अस्तित्वात असते. मात्र एवढे सांभाळले पाहिजे की, कनिष्ठ प्राणाने मागल्या दाराने त्यात डोकावून पाहता कामा नये किंवा त्याला प्रवेश देता कामा नये, या खुल्या किंवा छुप्या कनिष्ठ प्राणिक प्रकृतीच्या (लैंगिक) आधाराव्यतिरिक्त इतर गोष्टींवर आधारित अशी आत्मीयता किंवा एक प्रकारचे आकर्षण, एक प्रकारचा सुसंवाद हा पुरुष आणि स्त्रीच्या प्रकृतीमध्ये बरेचदा आढळून येतो. कधीकधी असा सुसंवाद प्राधान्याने मानसिक किंवा आंतरात्मिक किंवा उच्चतर प्राणाच्या पातळीवरील असू शकतो किंवा या साऱ्यांच्या मिश्रणामधूनही त्याला आधार लाभत असतो. अशी मैत्री ही स्वाभाविक असते आणि अशा वेळी इतर गोष्टी मिसळल्यामुळे ती निम्न स्तरावर उतरेल किंवा ती मैत्री मोडेल अशी शक्यता खूपच कमी असते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 307)