योग आणि मानवी नातेसंबंध – १४
प्रकृतीची संपूर्ण ज्वाला ही ईश्वराकडे वळवावी आणि उर्वरित गोष्टींनी खऱ्या आधाराची वाट पाहावी, ही योगामधील प्रमाण गोष्ट आहे, असा आमचा दृष्टिकोन आहे; सामान्य चेतनेच्या चिखलमातीवर उच्चतर गोष्टींची उभारणी करणे सुरक्षित नसते. यासाठी मैत्री किंवा बंधुभाव सोडण्याची आवश्यकता नाही, परंतु मध्यवर्ती अग्नीच्या तुलनेत या गोष्टी गौण असल्या पाहिजेत. दरम्यानच्या काळात, एखाद्याने ‘ईश्वराबरोबरचे नाते’ हेच चित्तमग्न करणारे असे स्वतःचे ध्येय बनवले, – जे अगदी स्वाभाविक असते – तर ते साधनेला अधिकच बळकटी देते. आपण ज्या दिव्य चेतनेच्या शोधात आहोत त्या दिव्य चेतनेची प्रभा जेव्हा उजळलेली असते तेव्हा, आंतरात्मिक प्रेमाला (Psychic love) स्वतःचाच पूर्णतया शोध लागतो; जोपर्यंत आंतरात्मिक प्रेमाला हा शोध लागत नाही तोपर्यंत त्याला त्याचे प्रकाशमान, अविभाज्य असणारे स्व आणि रूप कायम राखणे अवघड होते.
मन, प्राण, शरीर ही आत्म्याची आणि जीवाची यथायोग्य साधने आहेत, जेव्हा ही साधने स्वतःसाठी कार्य करतात तेव्हा ती अज्ञानी आणि अपूर्ण गोष्टी निर्माण करतात – त्यांना जर आपण अंतरात्म्याची आणि जीवाची जागरूक साधने बनवू शकलो तर, त्यांना त्यांची स्वतःची दिव्यतर परिपूर्ती लाभते; पूर्णयोगामध्ये आपण ज्याला ‘रूपांतरण’ म्हणतो त्या पाठीमागची कल्पना हीच आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 308)
- संन्यासाश्रम - May 31, 2026
- वानप्रस्थाश्रम - May 30, 2026
- गृहस्थाश्रम - May 29, 2026






