Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ४६

निश्चल स्तब्ध बसणे ही एकाग्रतापूर्ण ध्यानासाठी अगदी स्वाभाविक अशी आसनस्थिती असते तर चालणे आणि उभे राहणे या, ऊर्जा वितरणासाठी आणि मनाच्या क्रियाकलापांसाठी अनुकूल अशा सक्रिय स्थिती असतात. व्यक्तीने जर स्थायी शांती आणि चेतनेची नैष्कर्म्य अवस्था प्राप्त करून घेतली असेल तर तेव्हाच व्यक्तीला चालत असताना किंवा अन्य काही करत असताना लक्ष एकाग्र करणे आणि (ईश्वरी शक्ती) ग्रहण करणे सुलभ जाते. चेतनेची जर स्वतःमध्येच मूलभूत नैष्कर्म्य अवस्था एकवटलेली असेल तर ती एकाग्रतेसाठी योग्य बैठक असते आणि शरीर निश्चल ठेवून लक्ष एकवटून बसणे ही ध्यानासाठी योग्य स्थिती असते. पहुडलेले असताना देखील एकाग्रता साधता येते पण ही स्थिती फारच निष्क्रिय असल्यामुळे चित्त एकाग्र होण्याऐवजी जडत्व, सुस्ती येण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच योगी नेहमी आसनस्थ स्थितीमध्ये बसतात. चालत असता, उभे असता, किंवा पहुडलेले असताना व्यक्ती ध्यान करण्याचा नित्य सराव करू शकते, परंतु आसनस्थ असणे ही मूळ स्वाभाविक स्थिती आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 311)

साधना, योग आणि रूपांतरण – ४५

सुरुवाती सुरुवातीला एकाग्रता करण्यासाठी, ध्यानाला बसण्यासाठी स्थिरता आणि शांतीपूर्ण अवस्था असणेच आवश्यक असते हे अगदी स्वाभाविक आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा अशी अवस्था असणे आणि ध्यान करण्याची तुम्हाला आवश्यकता वाटणे ही गोष्ट महत्त्वाची असते. परंतु अन्य वेळी मात्र त्याचा परिणाम म्हणून सुरुवातीला फक्त एक प्रकारची मानसिक अविचलता आणि विचारांपासून मुक्तता अनुभवास येईल.

कालांतराने शांतीपूर्ण अवस्था ही आंतरिक अस्तित्वामध्ये काहीशी स्थिर झालेली असते (कारण तुम्ही एकाग्रता करता तेव्हा आंतरिक अस्तित्वामध्येच प्रवेश करत असता,) तेव्हा मग ती शांतीपूर्ण अवस्था तिथून बाह्य व्यक्तित्वामध्ये येऊ लागते आणि बाह्य व्यक्तित्वाचे नियंत्रण करू लागते. आणि त्यामुळे तुम्ही काम करत असताना, इतरांबरोबर मिळूनमिसळून वागत असताना, बोलत असताना किंवा इतर व्यवहार करत असतानासुद्धा ती शांती आणि स्थिरता कायम राहते. कारण तेव्हा बाह्यवर्ती चेतना काहीही करत असली तरी आंतरिक अस्तित्व अंतरंगामध्ये स्थिरशांत असल्याचे व्यक्तीला जाणवते. खरोखर आपले आंतरिक अस्तित्व हेच आपले खरे अस्तित्व आहे आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे काहीसे पृष्ठवर्ती, वरवरचे अस्तित्व आहे आणि त्याच्या माध्यमातून आंतरिक अस्तित्वच या जीवनामध्ये कार्य करत आहे असे व्यक्तीला जाणवते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 313)

साधना, योग आणि रूपांतरण – ४४

तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा, तुमच्या बाह्यवर्ती मनाची लुडबूड त्यामध्ये असता कामा नये. कशाची अपेक्षा नाही किंवा कशाचा आग्रहही नाही, असे तुम्ही एखाद्या निरागस बालकाप्रमाणे साधेसरळ आणि मनमोकळे असले पाहिजे. एकदा अशी अवस्था प्राप्त झाल्यावर, मग उर्वरित सारेकाही तुमच्या अंतरंगामध्ये खोलवर असणाऱ्या अभीप्सेवर अवलंबून असते. आणि तुम्ही जर ‘ईश्वरा’ला साद दिलीत तर तुम्हाला प्रतिसाद देखील मिळेल.

– श्रीमाताजी (CWM 14 : 52)

साधना, योग आणि रूपांतरण – ४३

साधक : ध्यानासाठी अत्यावश्यक अशी आंतरिक व बाह्य परिस्थिती कोणती?

श्रीअरविंद : मूलभूत अशी कोणतीही बाह्य परिस्थिती आवश्यक नसते, परंतु ध्यानाच्या वेळी एकांत व विलगपणा (solitude and seclusion ) असेल आणि त्याचबरोबर शरीराची स्थिरता असेल, तर ध्यानासाठी या गोष्टींची मदत होते. नवोदितांसाठी या गोष्टी बऱ्याचदा अगदी आवश्यक असतात.

परंतु बाह्य परिस्थितीमुळे तुम्ही बांधले गेले आहात असे होता कामा नये. एकदा ध्यानाची सवय झाली की मग, कोणत्याही परिस्थितीत म्हणजे, पहुडलेले असताना, उठता-बसता, चालताना, एकटे असताना किंवा इतर लोकांसमवेत असताना, शांततेमध्ये किंवा गोंगाटामध्ये, कोणत्याही परिस्थितीत ध्यान करता आले पाहिजे. मनाचे भरकटणे, विस्मरण, निद्रा, शारीरिक आणि नाडीगत अधीरता व अशांती या ध्यानाच्या आड येणाऱ्या साऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ‘संकल्पाची एकाग्रता’ ही आंतरिक परिस्थिती सर्वप्रथम महत्त्वाची असते.

दुसरी आवश्यक परिस्थिती म्हणजे उत्तरोत्तर वाढणारे पावित्र्य आणि जेथून विचार आणि चित्त-वृत्तींचा उदय होतो, त्या आंतरिक चेतनेची (चित्ताची) स्थिरता. म्हणजे राग, दुःख, निराशा, ऐहिक घटनांविषयीची चिंता या साऱ्या अडथळा निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांपासून ‘चित्त’ मुक्त असले पाहिजे. नैतिक आणि मानसिक पूर्णत्व या दोन्ही गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे जोडलेल्या असतात.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 295)

साधना, योग आणि रूपांतरण – ४२

तुम्ही दिव्य ‘शक्ती’प्रत स्वत:ला उन्मुख, खुले करण्यासाठी ध्यान करू शकता, (तुमच्यातील) सामान्य चेतनेचा त्याग करण्यासाठी म्हणूनही तुम्ही ध्यान करू शकता, तुमच्या अस्तित्वामध्ये अधिक खोलवर प्रवेश व्हावा म्हणून तुम्ही ध्यान करू शकता, स्वत:चे पूर्णतया आत्मदान कसे करावे हे शिकण्यासाठी म्हणून तुम्ही ध्यान करू शकता. या अशा सर्व प्रकारच्या गोष्टींसाठी तुम्ही ध्यान करू शकता. तुम्ही शांती, अचंचलता, निश्चल-नीरवता यांमध्ये प्रवेश व्हावा म्हणूनही ध्यान करू शकता. लोक बहुधा यासाठीच ध्यान करतात पण त्यात त्यांना यश मिळत नाही. रूपांतरणाची ‘शक्ती’ प्राप्त व्हावी म्हणूनदेखील तुम्ही ध्यान करू शकता, तुमच्यातील कोणत्या गोष्टींचे रूपांतर व्हायला हवे त्याचा शोध घेण्यासाठी तुम्ही ध्यान करू शकता, प्रगतीची दिशा ठरविण्यासाठी ध्यान करू शकता. अगदी व्यावहारिक कारणांसाठीदेखील तुम्ही ध्यान करू शकता. तुम्हाला एखादी अडचण दूर करायची आहे, त्यावर उपाय शोधायचा आहे, एखाद्या कृतीमध्ये किंवा तत्सम एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला मदतीची आवश्यकता आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता.

– श्रीमाताजी (CWM 08 : 89)

साधना, योग आणि रूपांतरण – ४१

(ध्यानाची उद्दिष्टे काय असतात किंवा काय असावीत यासंबंधीचा विचार आपण येथे समजावून घेत आहोत. त्याचा हा उत्तरार्ध…)

‘योगा’मध्ये एकाग्रतेचा उपयोग अन्य उद्दिष्टासाठीदेखील केला जातो. उदा. आपल्या जाग्रत स्थितीपासून (waking state) म्हणजे चेतनेची जी सीमित आणि पृष्ठवर्ती अवस्था असते त्यापासून निवृत्त होऊन, आपल्या अस्तित्वाच्या अंतरंगामध्ये खोलवर जाण्यासाठीदेखील (‘समाधी’च्या विविध अवस्थांद्वारे ही खोली मोजली जाते) एकाग्रतेचा अवलंब केला जातो. या प्रक्रियेसाठी, विचारमालिकेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा (ध्यानापेक्षा), कोणत्यातरी एकाच वस्तुवर, संकल्पनेवर किंवा नामावर लक्ष केंद्रित करणे (निदिध्यास) अधिक परिणामकारक असते.

असे असले तरी, ध्यानामुळे ‘पूर्णयोगां’तर्गत अभिप्रेत असलेल्या समाधीची पूर्वतयारी होते. असे ध्यान आपले आपल्या अस्तित्वाच्या खोलवर असणाऱ्या अवस्थांशी अप्रत्यक्षपणे पण जाग्रत सायुज्य (communion) निर्माण करते. काहीही असले तरी, जो विचार ‘पुरुषा’च्या नियंत्रणाखाली (सांख्य तत्त्वज्ञानातील पुरुष) आणला गेला आहे अशा रचनात्मक विचाराची तेजस्वी कृती हा ध्यानाचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग असतो. त्याद्वारे उर्वरित सर्व चेतना नियंत्रित केली जाते, ती उच्चतर आणि विशालतर संकल्पनांनी परिपोषित केली जाते आणि त्या संकल्पनांच्या साच्यामध्ये चेतनेचे त्वरेने परिवर्तन केले जाते आणि अशा प्रकारे चेतना पूर्णत्वाला नेली जाते.

ध्यानाचे इतर आणि महत्तर उपयोग याच्याही पलीकडचे असतात पण ते आत्मविकसनाच्या पुढील टप्प्यांशी संबंधित असतात. ‘भक्तियोगा’मध्ये, या दोन्ही प्रक्रिया (ध्यान आणि निदिध्यासन) समग्र अस्तित्व एकाग्र करण्यासाठी, समानतेने उपयोगात आणल्या जातात. किंवा भक्तीविषयाच्या (आराध्य देवतेच्या) चिंतनाने, त्याच्या रूपाने, त्याच्या सत्त्वाने, त्याच्या गुणवैशिष्ट्यांनी आणि त्याच्याबद्दलच्या भक्तिभावाच्या व ऐक्याच्या आनंदाने समग्र प्रकृती न्हाऊन निघावी यासाठी या दोन्ही प्रक्रिया समानतेने उपयोगात आणल्या जातात. तेव्हा विचार हा ‘दिव्य प्रेमा’चा सेवक, ‘कैवल्य-आनंदा’ची तयारी करून घेणारा असा घडविला जातो.

‘ज्ञानयोगा’मध्येदेखील ध्यानाचा उपयोग, वरकरणी दिसणारे रूप आणि सत्य यांमध्ये, तसेच आत्मा आणि त्याची विविध रूपे यांमध्ये सदसद्विवेक करण्यासाठी केला जातो. व्यक्तिगत चेतनेचा ‘ब्रह्मन्’मध्ये प्रवेश व्हावा आणि नंतर सायुज्य घडावे यासाठी एकाग्र निदिध्यासनाचा अवलंब केला जातो. ‘पूर्णयोगा’मध्ये या सर्वच उद्दिष्टांचा सुमेळ साधला जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 446-447)

साधना, योग आणि रूपांतरण – ४०

(ध्यानाची उद्दिष्टे काय असावीत यासंबंधीचा विचार आपण येथे समजावून घेत आहोत. त्याचा हा पूर्वार्ध…)

कधीकधी एखाद्या विशिष्ट विषयावर विचारांची एकाग्रतापूर्वक मालिका या स्वरूपात ‘ध्यान’ (meditation) करायला सांगितले जाते; तर कधीकधी एका विशिष्ट प्रतिमेवर, शब्दावर किंवा संकल्पनेवर मनाची अनन्य एकाग्रता स्थिर करण्यास सांगण्यात येते. येथे ‘ध्यान’ म्हणण्यापेक्षा स्थिर असे ‘निदिध्यासन’ (contemplation) अपेक्षित असते. उपरोक्त दोन पद्धतींव्यतिरिक्त, ध्यानाच्या अन्य पद्धतीही असतात. त्यामुळे या दोन किंवा अधिक पद्धतींमधील निवड ही आपण योगामध्ये आपल्यासमोर कोणते उद्दिष्ट ठेवतो यावर अवलंबून असते.

सद्यस्थितीत विचारी मन (thinking mind) हे आपल्या हाती असणारे असे एक साधन आहे की, ज्याच्या साहाय्याने आपण आपल्या आंतरिक अस्तित्वाचे सचेत रीतीने आत्म-व्यवस्थापन करू शकतो. परंतु बहुतांशी व्यक्तींमध्ये, विचार म्हणजे विविध संकल्पना, संवेदना आणि प्रभाव यांचा एक गोंधळलेला प्रवाह असतो….

ज्याप्रमाणे शरीराच्या कार्यप्रणालीवर व प्राणिक क्रियांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी हठयोग्यांकडून स्थिर आसन व सुनियंत्रित श्वसनाच्या प्रक्रिया (प्राणायाम) उपयोगात आणल्या जातात, अगदी त्याचप्रमाणे मनाच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी राजयोग्यांकडून ‘विचारांची एकाग्रता’ ही प्रक्रिया उपयोगात आणली जाते. ध्यानाद्वारे आपण आपल्या चंचल मनाला ताळ्यावर आणतो आणि त्याच्या सर्व ऊर्जांची बचत व्हावी आणि त्या ऊर्जा कोणत्यातरी ईप्सित ज्ञानाच्या प्राप्तीवर किंवा स्वयंशिस्तीवर केंद्रित करता याव्यात यासाठी आपण मनाला एखाद्या व्यायामपटूप्रमाणे प्रशिक्षण देतो. ही गोष्ट माणसं सहसा सामान्य जीवनामध्येही करत असतात परंतु ‘प्रकृती’च्या या उच्चतर कार्यप्रणालीला ‘योग’ आपल्या हाती घेतो आणि तो तिला तिच्या संपूर्ण शक्यतांपर्यंत घेऊन जातो. मन ज्योतिर्मय रीतीने एका विचारवस्तुवर केंद्रित केले असता, आपण सार्वत्रिक ‘चेतने’मधील प्रतिसादाला जाग आणू शकतो आणि त्याच्याद्वारे त्या वस्तुविषयीचे ज्ञान आपल्या मनात ओतले जाऊन, आपल्या मनाचे समाधान केले जाते; किंवा त्याच्याद्वारे, त्या वस्तुचे केंद्रवर्ती किंवा मूलभूत सत्यदेखील आपल्यापाशी उघड केले जाते, योग या तथ्याची दखल घेतो.

(ध्यानाद्वारे) आपण ईश्वरी ‘शक्ती’चा प्रतिसाददेखील जागृत करत असतो, आणि त्यामुळे आपण ज्याचे ध्यान करतो त्याच्या कार्यप्रणालीवर आपल्याला विविध मार्गांनी चढतेवाढते प्रभुत्व मिळविता येते किंवा आपण ज्याचे ध्यान करतो ती गोष्ट आपल्यामध्ये निर्माण करण्यास किंवा आपल्यामध्ये ती सक्रिय करण्यास तो ‘ईश्वरी’ शक्तीचा प्रतिसाद आपल्याला सक्षम बनवितो. (उदाहरणार्थ) अशा प्रकारे, ‘दिव्य प्रेमा’च्या संकल्पनेवर आपण मन केंद्रित केले तर आपल्याला त्याच्या तत्त्वाचे आणि त्याच्या कार्यप्रणालीचे ज्ञान होते, आपण त्याच्याशी सायुज्य पावू शकतो, ते ‘दिव्य प्रेम’ आपल्या स्वतःमध्ये विकसित करू शकतो आणि आपले हृदय व आपली इंद्रिये त्याच्या धर्माचे पालन करतील याकडे आपण लक्ष पुरवू शकतो. (क्रमश:)
– श्रीअरविंद (CWSA 13 : 445-446)

साधना, योग आणि रूपांतरण – ३८

साधक : ध्यानाची उद्दिष्टे काय असली पाहिजेत किंवा ध्यानाच्या संकल्पना काय असायला हव्यात?

श्रीअरविंद : जी संकल्पना तुमच्या प्रकृतीशी आणि तुमच्या सर्वोच्च आकांक्षांशी अनुरूप असेल ती! परंतु जर तुम्ही मला नेमके उत्तर विचारत असाल, तर मी सांगेन की, ध्यानासाठी किंवा निदिध्यासनासाठी ‘ब्रह्म’ हे नेहमीच सर्वोत्कृष्ट उद्दिष्ट असते. त्याचप्रमाणे सर्वांतर्यामी ‘ईश्वर’ आहे व ‘ईश्वरा’मध्ये सर्व आहेत आणि सर्व काही ‘ईश्वर’च आहे या संकल्पनेवर मन स्थिर केले पाहिजे. मग तो ईश्वर ‘अवैयक्तिक’ आहे की ‘वैयक्तिक’ आहे किंवा तो व्यक्तिनिष्ठ असा ‘आत्मा’ आहे, या गोष्टीने मूलतः काही फरक पडत नाही. पण मला तरी (सर्वं खल्विदं ब्रह्म) ही संकल्पना सर्वोत्तम वाटते. कारण ती सर्वोच्च आहे आणि तिच्यामध्ये, म्हणजे ‘सर्व काही ब्रह्म आहे’ या संकल्पनेमध्ये, इहलौकिक सत्य असो किंवा पारलौकिक सत्य असो किंवा सर्व अस्तित्वाच्या अतीत असणारे सत्य असो, या सर्व सत्यांचा समावेश होतो.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 294-295)

साधना, योग आणि रूपांतरण – २८

सर्वसाधारणपणे (व्यक्तीमधील) चेतना ही सर्वत्र पसरलेली, विखुरलेली असते. ती या किंवा त्या दिशेने, या किंवा त्या वस्तुंच्या वा विषयांच्या मागे बारा वाटांनी धावत असते. जेव्हा एखादी शाश्वत स्वरूपाची गोष्ट करायची असते तेव्हा व्यक्ती प्रथम कोणती गोष्ट करत असेल तर ती म्हणजे – ही सर्वत्र विखुरलेली चेतना अंतरंगामध्ये ओढून घेते आणि एकाग्रता करते. त्यानंतर मग, जर व्यक्ती अधिक बारकाईने निरीक्षण करू लागली तर तिला असे आढळते की तिचे लक्ष एका जागी आणि कोणत्या तरी एका मनोव्यापारावर, एका विषयावर किंवा एखाद्या वस्तुवर केंद्रित झाले आहे – तुम्ही काव्यरचना करत असता किंवा एखादा वनस्पतीशास्त्रज्ञ फुलाचा अभ्यास करत असतो तसेच असते हे. जर तो विचार असेल तर व्यक्तीचे लक्ष तिच्या मेंदूमध्ये कोठेतरी एखाद्या जागी केंद्रित झालेले असते. आणि जर ती भावना असेल तर व्यक्तीचे लक्ष हृदयामध्ये केंद्रित झालेले असते.

योगमार्गातील एकाग्रता (concentration) म्हणजे याच गोष्टीचे विस्तारित आणि घनीभूत रूप असते. त्राटक करताना, व्यक्ती एखाद्या तेजस्वी बिंदुवर लक्ष केंद्रित करते त्याप्रमाणे एखाद्या वस्तुवर एकाग्रता केली जाऊ शकते. तेव्हा व्यक्तीला त्या बिंदुवर, त्या वस्तुवर अशा रीतीने लक्ष केंद्रित करावे लागते की व्यक्तीला फक्त तो बिंदूच दिसतो आणि त्या व्यतिरिक्त अन्य कोणताही विचार तिच्या मनात नसतो. व्यक्ती एखाद्या संकल्पनेवर, एखाद्या शब्दावर किंवा एखाद्या नामावर, (म्हणजे उदाहरणार्थ) ईश्वराच्या संकल्पनेवर, ॐ या शब्दावर किंवा कृष्णाच्या नामावर किंवा संकल्पना व शब्द किंवा संकल्पना व नाम यांच्यावर एकत्रितपणे लक्ष केंद्रित करू शकते. परंतु पुढे व्यक्ती योगामध्ये (भ्रूमध्यासारख्या) एका विशिष्ट स्थानीसुद्धा लक्ष केंद्रित करू शकते.

भ्रूमध्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याची एक प्रसिद्ध पद्धत आहे. भ्रूमध्य हे आंतरिक मनाचे, गूढ दृष्टीचे आणि संकल्पाचे केंद्र असते. तेथून तुम्ही तुमच्या एकाग्रतेचा जो विषय असतो त्याचा दृढपणे विचार केला पाहिजे किंवा त्या केंद्राच्या ठिकाणी त्या एकाग्रतेचा विषयाची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जर असे करण्यात यशस्वी झालात तर, काही काळानंतर, तुमची समग्र चेतना त्या स्थानी (अर्थात काही काळासाठी) एकवटली असल्याचे तुम्हाला जाणवेल. काही काळ आणि पुन्हापुन्हा तसे करत राहिल्याने ही प्रक्रिया सहज सुलभ बनते.

पूर्णयोगामध्ये आपण तेच करतो पण त्यामध्ये भ्रूमध्यामधल्या एका विशिष्ट बिंदुवरच लक्ष एकाग्र करावे लागते असे नाही, तर मस्तकामध्ये कोठेही तुम्ही लक्ष एकाग्र करू शकता किंवा शरीर-विज्ञान शास्त्रज्ञांनी जेथे हृदयकेंद्राचे स्थान निश्चित केले आहे तेथे म्हणजे छातीच्या मध्यभागी लक्ष एकाग्र केले जाते.

एखाद्या वस्तुवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, तुम्ही एखादा संकल्प करून मस्तकामध्ये लक्ष एकाग्र करू शकता; वरून तुमच्यामध्ये शांती अवतरित व्हावी म्हणून तिला आवाहन करू शकता किंवा काहीजण करतात त्याप्रमाणे, अदृष्ट (unseen) झाकण उघडावे (अपरा प्रकृती आणि परा प्रकृती यांच्यामध्ये असणारे झाकण, जे आपल्या टाळूच्या ठिकाणी असते.) आणि तेथून त्याच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत आरोहण करता यावे यासाठी तुम्ही लक्ष एकाग्र करू शकता. हृदयकेंद्रामध्ये तुम्ही (‘ईश्वरी शक्ती’प्रत) खुले होण्यासाठी एक अभीप्सा बाळगून, किंवा तेथे ‘ईश्वरा’ची चैतन्यमय प्रतिमा दिसावी किंवा ‘ईश्वरी’ उपस्थितीची जाणीव व्हावी यासाठी किंवा अन्य कोणत्या एखाद्या उद्दिष्टासाठी लक्ष एकाग्र करू शकता. तेथे तुम्ही नामजप करू शकता, पण तसे असेल तर, तेथे तुम्ही त्या नामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि हृदयकेंद्रामध्ये ते नाम आपोआप चालू राहिले पाहिजे.

तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की, जेव्हा असे एखाद्या विशिष्ट स्थानी लक्ष एकाग्र झालेले असते तेव्हा उर्वरित चेतनेचे काय होते? अशा वेळी, एकतर ती चेतना, इतर एकाग्रतेच्या वेळी जशी शांत होते तशी, ती शांत होऊन जाते किंवा तसे झाले नाही तर, विचार किंवा अन्य गोष्टी जणूकाही (तुमच्या) बाहेर असाव्यात त्याप्रमाणे इतस्ततः हालचाल करत राहतात पण एकाग्र झालेला भाग त्यांच्याकडे लक्ष देत नाही किंवा त्याने विचलितही होत नाही. अशावेळी एकाग्रता बऱ्यापैकी यशस्वी झालेली असते.

परंतु तुम्हाला जर अशा प्रकारे एकाग्रतेची, ध्यानाची सवय नसेल तर तुम्ही दीर्घ काळ ध्यान करून स्वतःला शिणवता कामा नये कारण शिणलेल्या मनाने ध्यान केले तर ध्यानाचे सर्व मोल वा त्याची शक्ती हरवून जाते. अशा वेळी तुम्ही एकाग्रतेच्या (concentration) ऐवजी, ‘विश्रांत’ अवस्थेमध्ये ध्यान (meditation) करू शकता. तुमची एकाग्रता जेव्हा सहजस्वाभाविक होते तेव्हाच तुम्ही अधिकाधिक दीर्घ वेळ ध्यान करू शकता.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 308-309)

साधना, योग आणि रूपांतरण – २७

साधक : मानसिक उपासनेचे प्रत्यक्ष आध्यात्मिक अनुभूतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी कोणती साधना करायची?

श्रीअरविंद : तुमच्या अंतरंगात असणाऱ्या तुमच्या चेतनेवर एकाग्रता करण्याचा सराव करणे, ही पहिली आवश्यक गोष्ट असते. सामान्य मानवी मनाच्या गतिविधी पृष्ठस्तरीय (surface) असल्यामुळे, खरा आत्मा झाकला जातो. परंतु या पृष्ठस्तरीय भागाच्या मागील बाजूस, अंतरंगामध्ये दुसरी एक गुह्य (hidden) चेतना असते आणि तिच्यामध्ये आपल्याला आपल्या खऱ्या आत्म्याची आणि प्रकृतीच्या महत्तर आणि गहनतर अशा सत्याची जाणीव होऊ शकते; आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो आणि प्रकृतीला मुक्त करून, तिचे रूपांतर घडवून आणता येऊ शकते. पृष्ठस्तरीय मन शांत करणे आणि अंतरंगात जीवन जगायला सुरुवात करणे, हे या एकाग्रतेचे उद्दिष्ट असते.

खऱ्या चेतनेची या पृष्ठस्तरीय चेतनेव्यतिरिक्त आणखी दोन मुख्य केंद्रं असतात. एक केंद्र हृदयामध्ये असते. (शारीरिक हृदयामध्ये नव्हे तर, छातीच्या मध्यभागी असणारे हृदयकेंद्र) आणि दुसरे केंद्र मस्तकामध्ये असते.

हृदयकेंद्रामध्ये केलेल्या एकाग्रतेमुळे अंतरंग खुले होऊ लागते आणि या आंतरिक खुलेपणाचे अनुसरण करत करत, आत खोलवर गेल्यास व्यक्तीला अंतरात्म्याचे किंवा व्यक्तिगत दिव्य तत्त्वाचे म्हणजे चैत्य पुरुषाचे (Psychic being) ज्ञान होते. अनावरण (unveiled) झालेला हा चैत्य पुरुष मग अग्रभागी येण्यास सुरुवात होते, तो प्रकृतीचे शासन करू लागतो, प्रकृतीला आणि तिच्या सर्व हालचालींना ‘सत्या’ च्या दिशेने, ‘ईश्वरा’ च्या दिशेने वळवू लागतो, आणि जे जे काही ऊर्ध्वस्थित आहे, ते अवतरित व्हावे म्हणून त्याला आवाहन करतो. त्याला त्या ईश्वराच्या ‘उपस्थिती’ची जाणीव होते, त्या ‘सर्वोच्चा’प्रत हा पुरुष स्वतःला समर्पित करतो आणि जी महत्तर ‘शक्ती’ आणि ‘चेतना’, ऊर्ध्वस्थित राहून आपली वाट पाहात असते, तिचे आपल्या प्रकृतीमध्ये अवतरण व्हावे यासाठी तो तिला आर्जव करतो.

‘ईश्वरा’प्रति स्वतःला समर्पित करत, हृदयकेंद्रावर एकाग्रता करणे आणि आंतरिक उन्मुखतेची व हृदयातील ईश्वराच्या ‘उपस्थिती’ची अभीप्सा बाळगणे हा पहिला मार्ग आहे आणि ते जर करता आले, तर ती स्वाभाविक सुरुवात म्हटली पाहिजे. कारण एकदा का त्याचे परिणाम दिसू लागले की मग, या मार्गाने केलेल्या वाटचालीमुळे, आध्यात्मिक मार्ग हा (दुसऱ्या मार्गाने सुरुवात केली असती त्यापेक्षा) अधिक सोपा आणि अधिक सुरक्षित होतो.

दुसरा मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक चक्रामध्ये करायची एकाग्रता. त्यामुळे जर का पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता येऊ शकली तर, आतील, व्यापक, अधिक गहन असे आंतरिक मन खुले होते. हे मन आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यास अधिक सक्षम असते. आणि एकदा का येथे एकाग्रता साध्य झाली की मग, व्यक्तीने शांत अशा मानसिक चेतनेस ऊर्ध्वाभिमुख करत मनाच्या वर असणाऱ्या सर्व गोष्टींप्रत खुले केले पाहिजे.

कालांतराने (आपली) चेतना ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते आणि अंततः ती चेतना, आजवर तिला ज्या झाकणाने शरीरामध्येच बद्ध करून ठेवले होते, त्या झाकणाच्या पलीकडे चढून जाते. आणि मस्तकाच्या वर असलेले केंद्र तिला गवसते, तेथे ती अनंतत्वामध्ये मुक्त होते. तेथे ती चेतना ‘विश्वात्म्या’च्या, ‘दिव्य शांती’च्या, ‘दिव्य प्रकाशा’च्या ‘दिव्य शक्ती’च्या, ‘दिव्य ज्ञाना’च्या, ‘परमानंदा’ च्या संपर्कात येऊ लागते आणि त्यामध्ये प्रवेश करू लागते आणि त्यांच्यासारखीच होऊन जाते. आणि तिला प्रकृतीमध्येही या गोष्टींचे अवतरण अनुभवास येऊ लागते.

अचंचलतेसाठी आणि ऊर्ध्वस्थित ‘आत्म्या’च्या व ‘ईश्वरा’च्या साक्षात्कारासाठी मनामध्ये अभीप्सा बाळगत, मस्तकामध्ये एकाग्र होणे हा एकाग्रतेचा दुसरा मार्ग होय. मात्र मस्तकामध्ये चेतनेची एकाग्रता करणे हा, त्याहूनही वर असणाऱ्या केंद्राप्रत चढून जाण्याच्या तयारीचा केवळ एक भाग असतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा व्यक्ती स्वतःच्या मनामध्ये आणि त्याच्या अनुभवांमध्येच बद्ध होण्याची शक्यता असते. किंवा व्यक्ती आध्यात्मिक विश्वातीतामध्ये जीवन जगण्यासाठी तेथे चढून जाण्याऐवजी ती फार फार तर, ऊर्ध्वस्थित ‘सत्या’ चे केवळ प्रतिबिंबच प्राप्त करून घेऊ शकते.

काही जणांना मानसिक एकाग्रता सोपी वाटते; तर काही जणांना हृदयकेंद्रावर एकाग्रता साधणे अधिक सोपे जाते; तर काही जणांना या दोन्ही केंद्रांवर आलटूनपालटून एकाग्रता करणे शक्य होते. पण हृदयकेंद्रापासून सुरुवात करणे अधिक इष्ट असते. अर्थात, जर व्यक्तीला तसे करणे शक्य असेल तर!

– श्रीअरविंद (CWSA 29 : 06-07)