Posts

भारत – एक दर्शन ०४

‘आध्यात्मिकता’ ही भारतीय मनाची गुरूकिल्ली आहे; भारतीय मनामध्ये अनंततेची जाणीव उपजतच आहे.

जीवनाच्या बाह्यवर्ती गोष्टींची जी शक्ती असते केवळ त्यामध्ये जीवन परिपूर्णत्वाने जगता येत नाही, जीवन योग्य प्रकारे समजावून घ्यायचे तर ते केवळ त्या प्रकाशामध्ये समजावून घेता येत नाही, याची जाण भारताला प्रारंभापासूनच होती. आणि ही अंतर्दृष्टी भारताने अगदी तर्कबुद्धीच्या युगामध्ये आणि वाढत्या अज्ञानयुगामध्येसुद्धा कधीही गमावलेली नाही. भारताला जडभौतिक नियम आणि शक्तींच्या माहात्म्याची जाण होती; भौतिक शास्त्रांच्या थोरवीवर त्याची बारकाईने नजर होती; सामान्य जीवनाच्या कलेचे व्यवस्थापन कसे करायचे हे भारताला ज्ञात होते.

परंतु भारताला हेही समजले की, जोपर्यंत अति-भौतिकाशी (supra-physical) योग्य प्रकारे संबंध प्रस्थापित होत नाही तोपर्यंत भौतिकाला आपली सार्थकता प्राप्त होत नाही; ब्रह्मांडाच्या जटिलतेचे स्पष्टीकरण मानवाच्या उथळ दृष्टीने पाहून किंवा त्याच्या सद्यकालीन परिभाषेमध्ये करता येत नाही, हे भारताच्या लक्षात आले. त्याच्या हे लक्षात आले की, मानवाला सहसा ज्याची जाणीव नसते अशा शक्ती मानवाच्या अंतरंगामध्येच आहेत, त्याच्या पाठीशी आहेत; मानवाला स्वतःच्या अगदी अल्प भागाचीच जाणीव आहे हे त्याला ज्ञात होते. अदृष्याने दृश्याला नेहमीच परिवेष्टित (surrounds) केलेले असते; ऐंद्रिय जाणिवेच्या सभोवताली अतिंद्रिय असते, एवढेच काय पण सांताच्या सभोवती अनंत नेहमीच व्यापून असते, याची जाण भारताला होती.

मनुष्यामध्ये स्वतःच्या पलीकडे विस्तारीत होण्याची शक्ती आहे, तो स्वतः आत्ता जसा आहे त्याहूनही अधिक पूर्ण आणि अधिक सखोल बनण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे हेही भारताला ज्ञात होते – हे सत्य युरोपला आत्ता नुकते कुठे उमगू लागले आहे आणि त्यांच्या सामान्य बुद्धिमतेला ते आत्तासुद्धा खूपच महान असे वाटत आहे.

 

– श्रीअरविंद [CWSA 20 : 06-07]

भारत – एक दर्शन ०३

जीवनविषयक भारतीय संकल्पना ही युरोपीयन संकल्पनांपेक्षा अधिक सखोल अशा केंद्रातून निघते आणि ती युरोपीयन संकल्पनांपेक्षा तुलनेने अधिक आंतरिक मार्गांवरून वाटचाल करत, एका अगदी वेगळ्या उद्दिष्टाप्रत जाऊन पोहोचते. भारतीय विचारदृष्टीचे एक वैशिष्ट्य हे आहे की, ती रूपांच्या माध्यमातून वेध घेते, इतकेच काय पण शक्तीच्या माध्यमातूनदेखील वेध घेते आणि सर्वत्र, प्रत्येक गोष्टीमध्ये ‘आत्म्या’चा शोध घेते.

भारतीयांच्या जीवनविषयक इच्छेचे हे वैशिष्ट्य आहे की, तिला जर आत्म्याचे सत्य गवसले नाही आणि त्या सत्यानुसार ती जगली नाही तर तिला कृतार्थ झाल्यासारखे वाटत नाही, स्वतःला परिपूर्णतेचा स्पर्श झाल्यासारखे तिला वाटत नाही, अधल्यामधल्या कोणत्याही स्थितीमध्ये कायमचे समाधान मानून राहणे तिला न्याय्य वाटत नाही. जगाविषयीची, ‘प्रकृती’विषयीची आणि अस्तित्वाविषयीची भारतीय संकल्पना भौतिक नसून, ती मानसिक आणि आध्यात्मिक आहे. जड भौतिकद्रव्य आणि अचेतन शक्ती याहून ‘चैतन्य’, आत्मा, चेतना या गोष्टी केवळ महत्तर आहेत असे नाही तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात आहेत आणि त्यातूनच जड भौतिकद्रव्य आणि अचेतन शक्ती या निम्नतर गोष्टींचा उदय होतो. सर्व प्रकारचे सामर्थ्य म्हणजे गुप्त आत्म्याची शक्ती असते किंवा त्याचे माध्यम असते; जगाला धारण करणारी ‘शक्ती’ ही सचेत ‘संकल्पशक्ती’ आहे आणि ‘प्रकृती’ ही तिच्या कार्यकारी शक्तीची यंत्रणा आहे. जडभौतिक द्रव्य हे त्यामध्ये लपलेल्या चेतनेचे शरीर किंवा क्षेत्र आहे, भौतिक विश्व हे ‘चैतन्या’चे रूप आणि चलनवलन आहे. मनुष्य म्हणजे जडद्रव्यापासून जन्माला आलेला प्राण आणि मन नाही आणि तो भौतिक प्रकृतीच्या कायमच आधीन राहणारा आहे, असेही नाही तर, प्राण आणि शरीर यांचा उपयोग करून घेणारा असा तो ‘आत्मा’ आहे. भारतीय मनुष्य अस्तित्वाच्या या संकल्पनेवर ज्ञानयुक्त श्रद्धा ठेवतो, त्या संकल्पनेनुसार जीवन जगण्याचा तो प्रयत्न करतो. त्याच्या उच्चकोटीच्या परिश्रमांचे शास्त्र हेच आहे आणि साधनाही हीच असते. अंतत: प्राण आणि शरीराला जखडलेल्या मनाचे कवच फोडून बाहेर यायचे, आणि एका महत्तर आध्यात्मिक चेतनेमध्ये प्रवेश करायचा ही त्याची आस असते; भारतीय संस्कृतीचा अगदी गाभाभूत अर्थ हाच आहे. ज्या भारतीय आध्यात्मिकतेविषयी बरीच चर्चा केली जाते ती आध्यात्मिकता याच संकल्पनेच्या आधारे घडलेली आहे.

(टीप – श्रीअरविंद येथे आध्यात्मिकतेविषयीची प्राचीन संकल्पना स्पष्ट करत आहेत, हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. परंतु त्यांची आध्यात्मिकतेविषयीची संकल्पना याहून अधिक व्यापक आहे, हे आपण जाणतोच.)

– श्रीअरविंद [CWSA 20 : 154-155]

भारत – एक दर्शन ०२

‘भारतीय’ संस्कृती आणि ‘युरोपीय’ संस्कृती यांच्यामधील भेदाचे मूळ हे आहे की, भारतीय सभ्यतेचे (civilisation) ध्येय ‘आध्यात्मिक’ आहे. या ध्येयाने भारतीय संस्कृतीच्या समृद्ध, विविध विलासी लय-रूपांना विशिष्ट वळण लावले आहे, त्यामुळे या संस्कृतीला तिचे अनन्यसाधारण स्वरूप आलेले आहे.

‘आध्यात्मिक अभीप्सा’ ही या संस्कृतीची शासक शक्ती होती, ही अभीप्सा हाच तिच्या विचारांचा गाभा होता आणि तीच तिची वर्चस्व गाजविणारी अभिलाषा होती. भारतीय संस्कृतीने आध्यात्मिकता हे जीवनाचे उच्चतम ध्येय ठरवले, एवढेच नव्हे, तर मानववंशाच्या भूतकालीन परिस्थितीमध्ये तिला शक्य झाले तितके सर्व जीवनच तिने आध्यात्मिकतेकडे वळविले.

परंतु धर्म हा मानवी मनातील आध्यात्मिक प्रेरणेचे पहिले आणि अपूर्ण असले तरी, स्वाभाविक रूप असल्याने व भारतीय संस्कृतीत अध्यात्मकल्पना प्रधान असून ती जीवनाची पकड घेत असल्याने, भारतीयांना आपला विचार व आचार धर्माच्या साच्यात घालण्याची आवश्यकता वाटली, तसेच जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये नेटाने, सातत्याने धार्मिक भावना भरण्याची आवश्यकता वाटली, त्यामुळे भारतीय संस्कृती ही व्यापक धार्मिक-तात्त्विक असण्याची अपेक्षा निर्माण झाली.

धर्ममते, पंथ यांची सत्ता ज्या कनिष्ठ पातळीवरील साधनामार्गांवर चालते त्या पातळ्यांपेक्षा उच्चतम आध्यात्मिकतेची पातळी खूपच वरची असते आणि ती एका मुक्त, व्यापक अवकाशात विहरत असते. आणि त्यामुळे साहजिकच ती धर्माने घालून दिलेल्या मर्यादा सहजासहजी सहन करत नाही. आणि जेव्हा कधी ती त्या मर्यादा मान्य करते तेव्हाही, उच्चतम आध्यात्मिक पातळी त्या मर्यादांच्या अतीत जाते. ती ज्या अनुभूतीमध्ये जीवन जगत असते ती अनुभूती औपचारिक धार्मिक मनाला दुर्बोध असते, अनाकलनीय असते. परंतु सर्वोच्च आंतरिक उंचीप्रत मनुष्य तत्काळ पोहोचू शकत नाही. आणि ही उंची त्याने एकदम गाठावी अशी अपेक्षा त्याच्याकडून बाळगली, तर तो तेथे कधीच पोहोचू शकणार नाही.

त्याला उन्नत होण्यासाठी प्रथम खालच्या आधारांची, पायऱ्यांची आवश्यकता असते. धर्ममत, पूजा, मूर्ती, चिन्ह, आकार, प्रतीक, अर्धवट स्वाभाविक मिश्र प्रेरणेची परवानगी व परिपूर्ती, या गोष्टींची, स्वतःच्या आंतरिक आत्म्याचे मंदिर बांधत असताना, आधार म्हणून, पायऱ्या म्हणून, उभे राहायचे स्थान म्हणून माणसाला आवश्यकता असते. हे मंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतरच आधार वगैरे काढून घेता घेता येऊ शकतात, बांधलेले पाड (scaffolding) काढून टाकता येऊ शकतात. ‘हिंदुधर्म’ हे ज्या धार्मिक संस्कृतीचे नाव आहे त्या संस्कृतीने हा हेतू साध्य केला, एवढेच नव्हे तर इतर प्रचलित पंथांकडे जी जाण अभावानेच आढळते ती हेतुची स्पष्ट जाणही हिंदुधर्माला होती, असे दिसते. (आत्ममंदिराची उभारणी केली जात असताना आधार देणे हा धर्माचा हेतू आहे याची हिंदुधर्माला जाण आहे.)

हिंदुधर्माने स्वत:ला कोणतेही नाव दिले नाही कारण त्याने स्वत:वर कोणत्याही पंथाच्या मर्यादा घालून घेतल्या नाहीत; त्याने कोणत्याही एकाच गोष्टीला वैश्विक समर्थन दिलेले नाही; त्याने कोणत्याच मतप्रणालीला बिनचूक म्हणून घोषित केलेले नाही; त्याने मुक्तीचा कोणताही एकच एक मार्ग वा प्रवेशद्वार सांगितलेले नाही; हिंदुधर्म म्हणजे कोणता एकच एक असा पंथ वा संप्रदाय नसून, मानवी आत्म्याने ‘ईश्वराभिमुख’ राहत, सातत्याने केलेल्या विस्तारित प्रयत्नांची ती परंपरा आहे. आध्यात्मिक आत्मरचना आणि आत्मशोधासाठी, अनेकांगी आणि अनेक पातळ्यांवरील व्यवस्था यामध्ये आहे; या साऱ्यामुळेच ज्या नावाने हा धर्म ओळखला जातो, ते शाश्वत धर्म, सनातन धर्म, हेच नाव स्वत:ला धारण करण्याचा त्याला पुरेपूर अधिकार आहे. या धर्माच्या अर्थाची आणि त्याच्या आत्म्याची न्याय्य आणि योग्य समज आपल्याला असेल तर आणि तरच भारतीय संस्कृतीचा खरा अर्थ आणि तिचा आत्मा यांचे आपल्याला आकलन होऊ शकेल.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 178-179]

भारत – एक दर्शन ०१

 

“जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी” असे म्हटले जाते. तेव्हा स्वर्गापेक्षाही जिची महानता अधिक आहे अशी आपली मातृभूमी म्हणजे ‘भारत’. भारत या शब्दामध्ये भा आणि रत ही दोन पदं आहेत. भारत या शब्दाची संस्कृतातील व्युत्त्पत्ती ‘भा नाम अभा, अभा नाम प्रभा, प्रभा नाम ज्ञानम्‌, तत्र रतः’ अशी आहे; म्हणजेच ज्ञानामध्ये रममाण झालेल्या लोकांचा देश म्हणजे ‘भारत’, अशी भारताची व्याख्या आहे.

भारताला एक महान परंपरा लाभलेली आहे, ज्ञानवारसा लाभलेला आहे. एकेकाळी सर्व जगाचे लक्ष ज्या भारताकडे वळलेले होते, त्या भारताच्या वैभवसंपन्नतेचे काय वर्णन करावे? भारत एकेकाळी समृद्धीच्या, ज्ञानशोधांच्या, कर्मकौशल्याच्या, कलानिपुणतेच्या गिरीशिखरावर विराजमान होता. सरस्वती आणि लक्ष्मी दोघीजणी येथे गुण्यागोविंदाने नांदत होत्या. भारतामध्ये आजही टिकून असलेली प्राचीन मंदिरे, वास्तुकलेचे नमुने याची साक्ष देतात.

परंतु परधार्जिणेपणाचा, अवमानाचा, यातनांचा एक अचेतन कालखंडही या भारताने सोसला. सारी समृद्धता, ज्ञानवैभव, कलाकौशल्य नामशेष होत गेले. भारतभूमीला दास्यत्व पत्करावे लागले. भारत आणि भारतीयांच्या प्रत्येक गोष्टीकडेच नकारार्थी दृष्टीने पाहणाऱ्या काही विद्वज्जनांच्या विखारी प्रचारामुळे भारतीय लोकांच्या मनामध्ये खोलवर न्यूनगंड निर्माण झाला. तो वाढतच राहिला आणि भारत खचत खचत गेला.

पुढे अनेकानेकांच्या प्रयत्नांमुळे, बलिदानामुळे, चातुर्यामुळे, व्यूहरचनेमुळे, मुत्सद्दीपणामुळे भारताला यथावकाश स्वातंत्र्य मिळाले. पण दुर्दैवाची बाब अशी की, ते होते विभाजित स्वातंत्र्य. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांमध्ये भारताने काय कमावले आणि काय गमावले याचा लेखाजोखा आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. कारण त्यातील काही गोष्टींचे आपण साक्षी आहोत.

आज जग पुन्हा एकदा भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे. एकेकाळी भारताच्या केवळ भौतिक समृद्धतेला भुललेले जग, आता काहीसे अधिक सुजाण झाले आहे. सोनेनाणे, पैसाअडका, जडजवाहीर, किमती मसाले, धनधान्य इत्यादी भौतिक संपत्तीपेक्षा, अधिक मौल्यवान संपत्ती भारताकडे आहे, याची जाणीव आता जगाला झाली आहे. अर्थसंपदेच्या बाबतीत भारताचा जगामध्ये कितवा का क्रमांक असेना, पण योगमार्ग, दर्शनं, पराविद्या, अध्यात्म, तत्त्वज्ञान, यांची भांडारं आणि मुख्यतः आंतरिक शांतीचे झरे भारतात जागोजागी आहेत, त्याचा शोध घ्यायला हवा, याची जाण आता जगाला झाली आहे. आणि म्हणूनच भारताकडे जिज्ञासेने येऊ पाहणाऱ्या परदेशी व्यक्तींची संख्या आज वाढत आहे.

अशा वेळी, एक भारतीय नागरिक म्हणून आपण स्वतःतरी या बाबतीत कितपत सुजाण आहोत, हे स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची आवश्यकता आहे. आपल्याला भारताच्या समृद्ध वारशाची खरंच ओळख आहे का? की, केवळ इतिहासाच्या गौरवशाली वारशाचे ढोल बडविण्यामध्येच आपण कृतकृत्यता मानतो? आपल्याला भारताच्या समृद्ध वारशाची खरंच ओळख आहे का? की आपण केवळ पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाने, भारताला नावे ठेवत राहतो? एकीकडे नुसतेच स्तुतिपाठक आणि दुसरीकडे निंदानालस्ती करणारे आपल्याच अस्तनीतले निखारे, हे दोघेही भारताचे सारखेच नुकसान करत नसतात का? तेव्हा आता गरज आहे, या दोन्ही टोकांच्या विचारसरणीचा त्याग करून, भारताची खरी महानता कशामध्ये दडलेली आहे, याचा शोध घेण्याची!

भारत पारतंत्र्यामध्ये असताना, देशबांधवाच्या मनात देशप्रेमाचे स्फुल्लिंग पेटविण्यासाठी ‘कर्मयोगिन्’ साप्ताहिकाच्या माध्यमातून श्रीअरविंद यांनी भारतीय संस्कृतीचे, तिच्या समृद्ध वारशाचे जे संस्मरण केले होते, त्याचाच मागोवा आपण उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘भारत – एक दर्शन’, या मालिकेच्या माध्यमातून घेणार आहोत. भारत हा नेहमीच श्रीअरविंदांच्या चिंतनाचा विषय राहिलेला होता. त्यांनी भारताविषयी विपुल लेखन केले आहे, त्यातील निवडक भागाचा समावेश या मालिकेमध्ये आपण करणार आहोत. सद्यकालीन भारत पुन्हा एकदा त्याच गिरीशिखरावर विराजमान होण्यासाठी एक नागरिक म्हणून आपल्याला नेमके काय करता येणे शक्य आहे, याची दिशा तुम्हाआम्हाला, आपल्या सर्वांना लाभावी, या भूमिकेतून भारताचे ‘दर्शन’ घेण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न!

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक.

विचारशलाका ४३

मानवाची महानता तो काय आहे यामध्ये नसून, तो काय करू शकतो यामध्ये सामावलेली आहे. मानव ही अशी एक बंदिस्त जागा आहे आणि जिवंत परिश्रमांची ती अशी एक गुप्त कार्यशाळा आहे की, ज्यामध्ये त्या दिव्य ‘शिल्पकारा’कडून ‘अतिमानवता’ (supermanhood) घडवली जात आहे आणि हेच मानवाचे खरेखुरे वैभव आहे.

पण यापेक्षाही एका अधिक महानतेमध्ये मानवाचा प्रवेश झाला आहे. ती महानता अशी की, कोणत्याही कनिष्ठ प्रजातींना मिळालेली नाही अशी एक संधी त्याला मिळालेली आहे. मानवामध्ये होणाऱ्या दिव्य परिवर्तनाचा जाणीवसंपन्न व सचेत कारागीर बनण्याची आणि त्या परिवर्तनामध्ये थोड्याफार प्रमाणात सहभागी होण्याची अनुमती त्याला मिळालेली आहे.

मात्र त्याच्या देहामध्ये ही महानता प्रत्यक्षात उतरावी याकरिता, म्हणजेच मानवी देहाचे अतिमानवामध्ये रूपांतरण शक्य व्हावे याकरता, मानवाची स्वेच्छापूर्वक संमती, त्याची पवित्र (consecrated) इच्छाशक्ती आणि त्याचा सहभाग यांची आवश्यकता आहे. मानवाची ‘अभीप्सा’ म्हणजे पृथ्वीने त्या ‘अतिमानसिक’ ‘सृष्टी-निर्माणकर्त्या’ला दिलेली हाक आहे.

पृथ्वी जर आवाहन करेल आणि तो ‘परमश्रेष्ठ’ (Supreme) त्याला प्रतिसाद देईल तर, त्या भव्य आणि गौरवशाली रूपांतरणाची घटिका अगदी आत्तादेखील असू शकते.

 

– श्रीअरविंद [CWSA 12 : 160]

विचारशलाका ४२

 

भाग – ०४

(स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन करण्याचे जे अनेकानेक मार्ग आहेत त्यापैकी नेमका आपला मार्ग कोणता याचा संकेत आपल्याला उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे मिळून जातो. त्याबद्दल येथे श्रीमाताजी सांगत आहेत.)

व्यक्तीने त्या अनुभवाचा स्वत:च्या अंत:करणात शोध घ्यावा, किंवा त्याचे स्मरण ठेवावे अथवा त्याचे निरीक्षण करावे, परंतु व्यक्तीने काय चालू आहे त्याची नोंद घेतलीच पाहिजे, त्याकडे लक्ष पुरविलेच पाहिजे, बस्, इतकेच पुरेसे असते.

व्यक्ती कधीकधी, एखादी अगदी उदारतेने केलेली कृती पाहते, जगावेगळे असे काहीतरी तिच्या कानावर पडते; उदारता, आत्म्याची थोरवी किंवा एखाद्या धाडसी वीराने केलेली कृती ती पाहते, कधीकधी काही विशेष प्रतिभासंपन्न अशा गोष्टी ती पाहते किंवा एखादी गोष्ट अत्यंत असाधारण पद्धतीने, सुंदरतेने केली असल्याचे व्यक्ती पाहते, ते करणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी तिची गाठभेठ होते; अशा प्रत्येक वेळी व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रकारचा उत्साह, एक प्रकारचे कौतुक, एक प्रकारची कृतज्ञता अचानकपणे दाटून येते आणि त्यातूनच अभूतपूर्व अशा आनंदाची, एका उबदार, प्रकाशमय, चेतनेच्या एका नव्या स्थितीकडे घेऊन जाणारे द्वार खुले होते. हा देखील तो संकेताचा धागा पकडण्याचा एक प्रकार आहे. हजारो मार्ग आहेत, व्यक्तीने फक्त सावधचित्त असले पाहिजे आणि निरीक्षण केले पाहिजे.

यासाठी सर्वप्रथम स्वत:ला ‘चेतनेमधील परिवर्तना’ची निकड जाणवली पाहिजे; तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रत घेऊन जाणारा हाच तो मार्ग आहे हे तुम्ही स्वीकारलेच पाहिजे आणि एकदा का तुम्ही ते तत्त्व स्वीकारले की, मग तुम्ही दक्ष असले पाहिजे. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, तुम्हाला ते निश्चितपणे गवसते. आणि एकदा का ते गवसले की, कोणतीही चलबिचल न होऊ देता, तुम्ही वाटचालीला सुरुवात केली पाहिजे.

व्यक्तीने सदानकदा उदासीन, अनुत्सुक असे जीवन जगू नये; सदोदित अनास्था बाळगू नये. व्यक्तीने आत्मनिरीक्षण केले पाहिजे, व्यक्तीने कायम सावध राहिले पाहिजे, हा प्रारंभबिंदू आहे.

– श्रीमाताजी [CWM 08 : 404-405]

विचारशलाका ४१

 

भाग – ०३

 

(स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन करण्याचे जे अनेकानेक मार्ग आहेत त्यापैकी नेमका आपला मार्ग कोणता याचा संकेत आपल्याला उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे मिळून जातो. त्याबद्दल येथे श्रीमाताजी सांगत आहेत.)

तुम्हाला नेहमीच अनेकानेक मार्ग सांगण्यात आलेले असतात पण आजवर शिकविण्यात आलेले मार्ग, तुम्ही पुस्तकातून वाचलेले मार्ग किंवा एखाद्या शिक्षकाकडून ऐकलेले मार्ग यामध्ये ती परिणामकारकता नसते; जी परिणामकारकता कोणत्याही सुस्पष्ट कारणाविना आलेल्या या उत्स्फूर्त अनुभवामध्ये असते. ते आत्म्याच्या जागृतीचे सहजतेने उमलणे असते; तुमचा तुमच्या चैत्य पुरुषाशी (Psychic being) क्षणभरापुरता आलेला तो संपर्क असतो; त्यातून तुमच्या आवाक्यात असलेला, तुमच्यासाठी सर्वोत्तम असलेला मार्ग कोणता, हे तुम्हाला दर्शविण्यात आलेले असते. ध्येयपूर्तीसाठी त्या मार्गाचे चिकाटीने अनुसरण करणे एवढेच आता तुम्हाला करायचे असते – हा असा एक क्षण असतो की, जो तुम्हाला कशी व कोठून सुरुवात करायची हे दाखवून देतो….

काही जणांना हा अनुभव रात्री स्वप्नामध्ये येतो, एखाद्याला तो कोणत्याही आकस्मिक क्षणी येऊ शकतो; कधीतरी कोणाला असे काहीतरी दिसते की, ज्यामुळे त्याच्यामध्ये एक नवीनच चेतना उदयास येते. व्यक्तीच्या ऐकण्यात काहीतरी येते, एखादे सुंदर निसर्गदृश्य, सुमधुर संगीत, वाचण्यात आलेले काही शब्द किंवा जीवापाड एकाग्रतेने केलेल्या प्रयासाची उत्कटता असे ते काहीही असू शकते, हा अनुभव येण्याचे अक्षरश: हजारो मार्ग आणि हजारो कारणे आहेत.

पण मी पुन्हा तेच सांगते, की ज्यांना साक्षात्कार होणार हे निश्चित असते त्यांना त्यांच्या आयुष्यात एकदातरी असा हा अनुभव येतोच येतो. भले तो क्षणिक असेल, भले त्यांना तो अनुभव अगदी बालपणी आलेला असेल पण आयुष्यात एकदा तरी ‘खरी चेतना’ काय याचा अनुभव त्यांना आलेला असतो. कोणता मार्ग अनुसरला पाहिजे हे सूचित करणारा तो सर्वोत्तम संकेत असतो. (क्रमश: …)

– श्रीमाताजी [CWM 08 : 404]

विचारशलाका ४०

 

भाग – ०२

 

(स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन करण्याचे जे अनेकानेक मार्ग आहेत त्यापैकी नेमका आपला मार्ग कोणता याचा संकेत आपल्याला उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे मिळून जातो. त्याबद्दल येथे श्रीमाताजी सांगत आहेत.)

व्यक्तीने असे लक्षात ठेवले पाहिजे की, तिने त्या अनुभवाच्या तळाशी गेले पाहिजे, ते क्षण पुन्हा जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तो अनुभव पुन्हा आठवून पाहिला पाहिजे, त्याची आस बाळगली पाहिजे, त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा प्रारंभबिंदू असतो; आणि तुम्हाला तुमचा मार्ग कोणता याचे मार्गदर्शन करणारा जो धागा होता, जो संकेत देण्यात आला होता त्याचे प्रयोजन आता येथे संपलेले असते.

ज्यांना स्वत:च्या आंतरिक अस्तित्वाचा, अस्तित्वाच्या सत्याचा शोध लागणार हे ज्यांच्याबाबतीत निर्धारित झालेले असते, त्यांच्या जीवनात एखादा तरी असा क्षण असतो की, जेव्हा ते पहिल्यासारखे राहत नाहीत, वीज चमकून जावी तसा तो क्षण असतो, पण तो तेवढा एखादा क्षणही पुरेसा असतो. व्यक्तीने कोणता मार्ग अनुसरावा हे सुचविण्यासाठी ते पुरेसे असते; हेच ते द्वार असते की जे या मार्गाकडे (चेतनेचे परिवर्तन घडविणाऱ्या मार्गाकडे) उघडले जाते. तेव्हा तुम्ही या द्वारातून प्रवेश केलाच पाहिजे. आणि प्राप्त झालेल्या त्या अवस्थेला उजाळा देण्यासाठी तुम्ही अथक चिकाटीने, सातत्याने आणि अविरत स्थिरपणे प्रयत्नशील राहिले पाहिजे. म्हणजे मग ती अवस्था तुम्हाला अधिक खऱ्याखुऱ्या, अधिक समग्र अशा एका अवस्थेकडे घेऊन जाईल. (क्रमश: ..)

– श्रीमाताजी [CWM 08 : 404]

विचारशलाका ३९

 

भाग – ०१

 

साधक : व्यक्तीने स्वत:च्या चेतनेमध्ये परिवर्तन कसे करायचे?

श्रीमाताजी : अर्थातच याचे विविध मार्ग आहेत पण प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या आवाक्यातील मार्गाचा अवलंब केला पाहिजे. आणि बहुधा उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे त्या मार्गाचा संकेत आपल्याला मिळून जातो. तो मार्ग गवसण्याची पद्धत प्रत्येकाच्या बाबतीत काहीशी वेगवेगळी असते.

उदाहरणार्थ, एखाद्याला पृष्ठभागावर क्षितिजसमांतर पसरलेल्या अशा अगदी सामान्य चेतनेचे भान असू शकते; ती एकाचवेळी वस्तुमात्रांच्या पृष्ठवर्ती भागामध्ये कार्य करते. माणसं, वस्तू परिस्थिती यांच्या वरवरच्या बाह्यवर्ती भागाशी तिचा संपर्क असतो आणि कधीतरी अचानक या ना त्या कारणाने – मी म्हटले त्याप्रमाणे, प्रत्येकाबाबत हे कारण वेगळे असते – तुमची चेतना वर उचलली जाते; आणि वस्तुमात्रांकडे त्यांच्याच पातळीवरून म्हणजे क्षितिजसमांतर पद्धतीने पाहण्याऐवजी, तुम्ही अकस्मात इतरांवर प्रभुत्व मिळविता, त्यांच्याकडे वरून पाहता; तुमच्या जवळपास असणाऱ्या छोट्या छोट्या अगणित गोष्टी पाहण्यापेक्षा आता तुम्ही त्यांच्याकडे समग्रतेने पाहता; जणू काही तुम्हाला कोणीतरी वर उचलून घेतलेले असते आणि तुम्ही पर्वतशिखरावरून किंवा विमानातून पाहता. अशा वेळी, त्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या पातळीवरून न पाहता, आणि प्रत्येक छोटेमोठे बारकावे न्याहाळत न बसता, तुम्ही त्या सर्व गोष्टींमध्ये जणू एकत्व आहे या दृष्टीने आणि खूप उंचावरून पाहता.

हा अनुभव प्राप्त करून घेण्याचे विविध मार्ग आहेत पण बहुधा हा अनुभव एखाद्या दिवशी अचानकपणे योगायोगाने येतो किंवा कधीकधी असेही होते की, या अनुभवाच्या अगदी विरोधी असाही अनुभव येतो पण आपण तेथेच येऊन पोहोचतो. व्यक्ती अचानकपणे चेतनेमध्ये अगदी खोलवर बुडी मारते, आपल्या अवतीभवती दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून दूर जाते; या साऱ्या गोष्टी तिला आता दूरस्थ, वरवरच्या, अगदी किरकोळ अशा भासू लागतात; ती व्यक्ती आंतरिक निरवतेमध्ये, आंतरिक स्थिरतेमध्ये, वस्तुमात्रांच्या आंतरिक दृष्टीमध्ये प्रवेश करते. त्या व्यक्तीला वस्तुमात्रांचे व आजूबाजूच्या परिस्थितीचे अगदी अंतरंगातून आकलन होते, एक सखोल जाणीव होते आणि त्यामुळे सर्वांचे मूल्यच बदलून जाते. आणि मग, वरकरणी कितीही बाह्य रुपं असली तरी त्या बाह्य रूपांपाठीमागे असलेल्या एका सखोल एकात्मतेची, एकरूपतेची जाणीव त्या व्यक्तीला होते.

किंवा कधीकधी, अचानकपणे, मर्यादितपणाची जाणीवच नाहीशी होते आणि आदिअंतरहित अशा अनिश्चित काळाच्या, की जो काळ आजवर होता आणि पुढेही कायमच असणार आहे अशा काळाच्या अनुभूतीमध्ये व्यक्ती प्रवेश करते. हे अनुभव तुमच्या आयुष्यात अचानकपणे वीजेप्रमाणे क्षणार्धात येतात; तुम्हाला कळतदेखील नाही ते का आणि कसे आले…

इतरही अनेक मार्ग असतात, अनेक अनुभव असतात. ते अगणित असतात, ते व्यक्तीव्यक्तीनुसार वेगवेगळे असतात, पण, एका क्षणाच्या, निमिषार्धातील या एखाद्या अनुभवामुळे तुम्ही त्या गोष्टीचा धागा पकडू शकता. (क्रमश: ..)

– श्रीमाताजी [CWM 08 : 402-404]

विचारशलाका ३७

 

परिपूर्ण चेतना प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे तुमची प्रत्यक्ष चेतना ही तिच्या सद्यस्थितीतील सवयी व कक्षा यांच्या पलीकडे वृद्धिंगत करणे; तिला प्रशिक्षण देणे, तिला ‘दिव्य प्रकाशा’च्या दिशेने खुली करणे, तिच्यामध्ये ‘दिव्य प्रकाशा’ला त्याचे कार्य मुक्तपणे आणि परिपूर्णपणे करू देणे.

परंतु तो ‘दिव्य प्रकाश’ तेव्हाच त्याचे कार्य परिपूर्णपणे आणि निर्विघ्नपणे पार पाडू शकतो जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व लालसा आणि भीती यांपासून मुक्त झालेले असता; जेव्हा तुमच्यामध्ये कोणतेही मानसिक पूर्वग्रह नसतात; कोणत्याही प्राणिक आवडीनिवडी नसतात; तुम्हाला बंधनात पाडणारी किंवा गढूळ करणारी कोणतीही शारीरिक भयशंकितता नसते किंवा विचलित करणारे कसले आकर्षणही नसते.

– श्रीमाताजी [CWM 03 : 101]