Posts

आपण जर प्राचीन ग्रंथ अभ्यासले तर ‘जाग्रत अवस्था’ (Waking State) म्हणजे भौतिक विश्वाची जाणीव असल्याचे आपल्या लक्षात येईल. सर्वसाधारणपणे भौतिक मनाची हुकमत असलेल्या आपल्या देहधारी अस्तित्वामध्ये ही जाणीव असते.

‘स्वप्नावस्था’ (Dream State) म्हणजे भौतिक पातळीच्या मागे असणाऱ्या सूक्ष्म प्राणिक व सूक्ष्म मानसिक पातळ्यांशी संवादी असलेली जाणीव होय; या सूक्ष्म पातळ्यांबाबतचे संकेत जरी आपल्याला मिळाले तरीदेखील, आपल्याला भौतिक अस्तित्वातील गोष्टी जेवढ्या खऱ्या वाटतात तेवढ्या या पातळ्या खऱ्या आहेत असे वाटत नाही.

‘सुषुप्तावस्था’ (Sleep State) म्हणजे विज्ञानसदृश (The Gnosis) असणाऱ्या अतिमानसिक पातळीशी संवादी असलेली जाणीव होय; ही जाणीव आपल्या अनुभवाच्या पलीकडे आहे; कारण, आपले कारणशरीर (Causal Body) किंवा विज्ञानकोश (Envelope of Gnosis) आपल्यामध्ये विकसित झालेला नाही; त्याच्या शक्ती आपल्यामध्ये सक्रिय झालेल्या नाहीत; त्यामुळे, या अतिमानसिक पातळीच्या अनुषंगाने पाहता, आपली सद्यस्थिती ही गाढ स्वप्नरहित झोपेत असल्यासारखीच आहे.

या अवस्थांच्या पलीकडे जी ‘तुरिया’ अवस्था आहे, ती म्हणजे आपल्या शुद्ध आत्मिक अस्तित्वाची जाणीव किंवा आपल्या पूर्ण चरमअस्तित्वाची जाणीव होय. जरी कधीकधी आपल्याला जाग्रत अवस्थेत, किंवा स्वप्नावस्थेत त्याची मनोमय प्रतिबिंब दिसली, किंवा जागे झाल्यावर न आठवणारी अशी मनोमय प्रतिबिंब सुषुप्तावस्थेत जरी दिसली तरी; असे असूनदेखील त्या आत्मिक अस्तित्वाशी आपला थेट संबंध मुळीच असत नाही.

जिच्या साहाय्याने चढून आपण परत, परमात्म्याप्रत पोहोचतो अशी आपल्या अस्तित्वाची जी शिडी आहे, तिच्या पायऱ्यांशी संवादी अशी ही चतुर्विध श्रेणी आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 520)

प्रश्न : व्यक्ती जेव्हा झोपलेली असते तेव्हा तिची जाणीव ही जागेपणी असलेल्या जाणिवेपेक्षा कशा प्रकारे वेगळी असते?

श्रीमाताजी : ती भिन्न असल्याचे तुमच्या कधी लक्षात आले नाही का? तुमची शारीरिक जाणीव किंवा तुमची सूक्ष्म शारीरिक जाणीव, तुमची प्राणिक जाणीव किंवा तुमच्यामधील कनिष्ठ किंवा उच्चतर प्राणिक जाणीव, तुमची चैत्य जाणीव, तुमची मानसिक जाणीव, ह्या सगळ्या एकमेकींपासून पूर्णत: भिन्न आहेत. म्हणून जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा एक जाणीव असते आणि जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा वेगळीच जाणीव असते.

तुम्ही जागे असता तेव्हा गोष्टी तुमच्या बाहेर प्रक्षेपित झालेल्या तुम्ही पाहता, तर निद्रावस्थेत त्याच गोष्टी तुम्ही अंतरंगात पाहता. म्हणजे जागे असताना, तुम्हाला जणू बाहेर धाडण्यात आलेले असते आणि तुम्ही त्याकडे समोरून पाहता आणि निद्रावस्थेत तुम्ही स्वत:कडेच आंतरिक आरशामध्ये पाहता. व्यक्तीने जाणिवांच्या स्थितीमध्ये फरक करावयास शिकले पाहिजे अन्यथा व्यक्ती कायमच गोंधळलेली राहील.

वास्तविक, ही योगमार्गावरील पहिली पायरी आहे, ही धाग्याची सुरुवात आहे. जर व्यक्तीने हा धागा शेवटपर्यंत पकडून ठेवला नाही तर, व्यक्ती वाट चुकण्याची शक्यता असते. तेव्हा तो धागा शेवटपर्यंत पकडून ठेवणे अत्यंत आवश्यक असते.

-श्रीमाताजी
(CWM 07 : 131)

येथे दोन गोष्टी विचारात घ्यायला हव्या : जाणीव आणि ही जाणीव ज्या माध्यमांमधून व्यक्त होते ती साधने.

त्या साधनांचा विचार करू : मानसिक अस्तित्वामधून ‘विचार’ निर्माण होतात, भावनिक अस्तित्वामधून ‘भावना’ निर्माण होतात, प्राणिक अस्तित्वामधून ‘कार्यकारी शक्ती’ निर्माण होते आणि शारीरिक अस्तित्व ‘प्रत्यक्ष कृती’ करते.

प्रतिभावान माणसाला काहीही दिले तरी, त्यापासून तो काहीतरी सुंदर असे बनवून दाखवेल कारण तो प्रतिभाशाली आहे. पण त्याच प्रतिभावंताला तुम्ही एक परिपूर्ण असे साधन द्या, तो त्यापासून आधीपेक्षाही अधिक सुंदर असे काही करून दाखवेल. एखादा महान पियानोवादक अगदी खराब झालेल्या पियानोमधूनही काहीतरी उत्तम संगीत निर्माण करेल पण त्याला जुळवलेला, उत्तम असा पियानो द्या, तो त्यापासून अधिकच सुंदर असे काही निर्माण करेल. या दोन्ही बाबतीत जाणीव एकसारखीच आहे पण तिच्या अभिव्यक्तीसाठी चांगल्या साधनाची आवश्यकता असते. – अगदी त्याचप्रमाणे मानसिक, प्राणिक, आंतरात्मिक आणि शारीरिक क्षमता असलेल्या देहाची साधन म्हणून आवश्यकता असते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 40)

प्रश्न : चेतना म्हणजे काय?

श्रीमाताजी : अनेक स्पष्टीकरणांपैकी एकाची निवड करावयाचा मी प्रयत्न करते. गंमतीदाखल म्हणायचे तर, अचेतनेच्या विरोधी जी असते ती चेतना. दुसरे एक स्पष्टीकरण…

विश्वाचे सृजनात्मक सत्त्व म्हणजे चेतना. चेतनेविना हे ब्रह्मांड नाही; कारण चेतना म्हणजे उत्पत्ती. चेतना म्हणजे जे आहे ते सर्व. कारण चेतनेविना काहीच नाही – हे उत्तम स्पष्टीकरण आहे. चेतनेविना जीवन नाही, प्रकाश नाही, उत्पत्ती नाही, सृष्टी नाही, ब्रह्मांड नाही. चेतना ही सर्व निर्मितीचे मूळ आहे. चेतना नाही तर निर्मिती नाही, सृष्टी नाही.

आपण ज्याला ‘जाणीव’ असे संबोधतो तिचा परमोच्च चेतनेशी फारच दूरान्वयाने संबंध आहे, त्यामध्ये कोणताही नेमकेपणा, निश्चितपणा नाही. जर म्हणावयाचेच झाले तर ते प्रतिबिंब आहे असे म्हणता येईल; पण ते मूळ चेतनेचे यथार्थ किंवा शुद्ध प्रतिबिंब नव्हे. ज्याला आपण आपली जाणीव असे म्हणतो ती म्हणजे मूळ चेतनेचे व्यक्तिरूप आरशामध्ये पडलेले धूसर असे प्रतिबिंब आहे. (कधी धूसर तर कधी विरूप.) ह्या प्रतिबिंबाच्या आधारे, सावकाशपणे मागे जात जात, जे प्रतिबिंबित झाले आहे त्याच्या मुळाशी, उगमाशी आपण गेलो तर आपण त्या सत्य चेतनेच्या संपर्कात येऊ शकतो.

आणि एकदा का आपण त्या सत्य-चेतनेच्या संपर्कात आलो की, मग आपल्याला जाणीव होते की, ती सत्य-चेतना सर्वत्र सारखीच आहे, केवळ विरूपीकरणामुळे तिच्यामध्ये भेद उत्पन्न होतात. जर विरूपीकरण नसेल तर सर्वकाही त्या एकाच आणि एकमेव चेतनेमध्ये सामावलेले आहे. म्हणजेच असे की, या विपर्यासातून, विपर्यास करणाऱ्या आरशातील प्रतिबिंबातूनच चेतनेमधील विभिन्नता आणि भेदाभेद निर्माण होतात, अन्यथा ती एकच एक अशी चेतना आहे. पण व्यक्ती ह्या साऱ्या गोष्टी फक्त अनुभवानेच जाणू शकते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 233-34)

धार्मिक आणि आध्यात्मिक शिकवण यामध्ये गल्लत करता कामा नये. धार्मिक शिकवण ही भूतकाळाशी संबंधित असते आणि प्रगतीस विराम देते. आध्यात्मिक शिकवण ही भविष्याची शिकवण असते, त्यामुळे चेतना उजळून निघते आणि भावी काळातील साक्षात्कारासाठी तयारी करून देते. आध्यात्मिक शिकवण ही सर्व धर्मांतीत असते आणि वैश्विक सत्याच्या दिशेने शर्थीचे प्रयत्न करते. ही शिकवण दिव्यत्वाशी थेट नाते निर्माण करण्यास शिकविते.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 120)

आपल्या अस्तित्वाची आत्ताची रचना किंवा स्थिती ही अंतिम आहे, असे मानून, विकासक्रमाच्या शक्यतेवर मर्यादा घालण्याचे काहीच कारण नाही. पशुजीवन ही एक अशी प्रयोगशाळा आहे की, ज्या प्रयोगशाळेमध्ये प्रकृतीने मनुष्यजात घडवली. मनुष्यदेखील तशीच एक प्रयोगशाळा बनू शकतो. या मनुष्यरूपी प्रयोगशाळेमध्ये – दिव्य जीवाच्या रूपाने आत्म्याला प्रकट करण्याची व एक दिव्य प्रकृती उदयास आणण्याची आणि अतिमानव घडविण्याचे कार्य करण्याची – प्रकृतीची इच्छा आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 502)

पाश्चिमात्य मनाच्या दृष्टीने, नीति ही बाह्य वर्तनाची गोष्ट आहे; भारतीय मनाच्या दृष्टीने मात्र, बाह्य वर्तन हे आत्मावस्थेच्या अभिव्यक्तीचे केवळ एक साधन आहे, ते आत्मावस्थेचे केवळ एक लक्षण आहे. पालन करण्यासाठी हिंदुधर्माने नैतिक नियमांचा तक्ता, काही आदेश कधीकधी जरुर एकत्रित केलेले आढळतात, पण अधिक भर दिलेला आहे तो मनाच्या आत्मिक, नैतिक शुद्धीवर; येथे वर्तन, कृति ही केवळ आंतरिक शुद्धीचे बाह्य लक्षण आहे असे सांगितले जाते; येथे “तू हिंसा करू नकोस” असे जोरकसपणे सांगितले जाते, खूप स्पष्टपणे सांगितले जाते, पण त्याहून अधिक ठामपणे अशा एका आदेशावर भर दिला जातो की, “तू कोणाचाही द्वेष करू नकोस; लोभ, क्रोध, मत्सर या विकारांना बळी पडू नकोस.” कारण हिंसेचे मूळ या द्वेषादि विकारातच असते.

आणखी एक गोष्ट अशी की, हिंदुधर्मात सापेक्ष आदर्श मान्य करण्यात आले आहेत. परंतु युरोपीय बुद्धीला हे शहाणपण झेपणारे नाही. हिंदुधर्मात सर्वात श्रेष्ठ नियम अहिंसा हा आहे – ‘अहिंसा परमो धर्मः’ तथापि योद्ध्यासाठी मात्र हा नियम ठेवलेला नाही; शारीरिक अहिंसा त्याच्या कर्तव्यात बसत नाही; मात्र योद्ध्याने न लढणारे लोक व दुबळे, नि:शस्त्र, पराभूत झालेले लोक, कैदी, जखमी, पळणारे लोक यांजबददल दया, दाक्षिण्य व समानबुद्धी दाखवलीच पाहिजे असे हिंदुधर्म आग्रहाने सांगतो. याप्रमाणे सर्वांना एकच पूर्ण निरपवाद नियम ठेवण्यात जी अव्यावहारिकता असते, ती अव्यावहारिकता हिंदुधर्म टाळतो.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 149)

जो जो कोणी श्रेष्ठता प्रकट करण्याचा संकल्प करील, एकामागून एक डोंगर चढत ईश्वरी शिखर गाठण्यास पुढे सरसावेल तो ‘आर्य’ होय. त्याला भीतीचा लवलेशही कधी स्पर्श करीत नाही. परागती वा अपयश त्याला आपल्या ध्येयमार्गापासून विचलित करू शकत नाहीत. जो कोणी ह्याची निवड करतो, जो कोणी दिव्यत्वाची शिखरे एका पाठोपाठ एक सर करण्याचा यत्न करतो, जो कशासही घाबरत नाही, पिछेहाट किंवा पराजयाने ज्याची गती अवरूद्ध होत नाही, स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या खूप पलीकडे, अति व्यापक आहे म्हणून त्या व्यापकतेपासून, विशालतेपासून जो अंग चोरून घेत नाही, स्वत:च्या जीवाच्या मानाने एखादी गोष्ट खूप उच्च पातळीवर आहे असे पाहून जो त्या उंचीमुळे दडपून जात नाही, स्वत:च्या शक्तीच्या आणि धैर्याच्या मानाने एखादी गोष्ट खूपच महान आहे म्हणून त्या महानतेपासून जो दूर पळत नाही, तो आर्य होय; तो दिव्य योद्धा आणि विजेता, उदात्त मानव आहे, तो उच्चकुलीन, श्रेष्ठ, गीतेत वर्णिलेला ‘श्रेष्ठ’ आहे.

आर्य ह्या शब्दाचा मूळ अर्थ प्रयत्न, उत्थान आणि विजय असा आहे. मानवी प्रगतीच्या विरूद्ध येणाऱ्या सर्व आंतरिक प्रवृत्ती व बाह्य परिस्थिती ह्यांविरुद्ध लढून त्यांच्यावर जो विजय मिळवतो तो आर्य! ‘आत्मविजय’ हा त्याच्या प्रकृतीचा पहिला कायदा आहे. तो पृथ्वी व शरीर ह्यांवर विजय मिळवितो आणि अन्य सामान्य माणसांप्रमाणे आळस, प्रमाद, चाकोरी इत्यादी तामसिक मर्यादांमध्ये राहण्यास आपल्या शरीरास संमती देत नाही. नाना इच्छा, भुका व अन्य रजोगुणात्मक वासना ह्यांच्या गुलामीत तो आपले जीवन वा जीवनशक्ती जखडू देत नाही. तो मनोविजय प्राप्त करतो. तो मन आणि त्याच्या सवयी यांच्यावर मात करतो. तो अज्ञान, परंपरागत पूर्वग्रह, रुढीबद्ध कल्पना, सुखद मते यांच्या कवचामध्ये राहत नाही; तर ठाम आणि दृढ अशी इच्छाशक्ती स्वत:कडे असूनदेखील, बुद्धि विशाल आणि लवचीक कशी बनेल ह्याचा तो शोध घेत असतो, निवड करीत असतो. प्रत्येक गोष्टीत तो सत्याचा वेध घेत असतो, प्रत्येक गोष्टीतील योग्य, प्रत्येक गोष्टीतील सर्वोच्च आणि स्वातंत्र्य यांचा तो शोध घेत असतो.

आत्मसिद्धी हे त्याच्या आत्मविजयाचे ध्येय असते. तो ज्या ज्या गोष्टीवर विजय संपादन करतो ती ती गोष्ट तो नष्ट करीत नाही; तर तिला उदात्तता व पूर्णता प्राप्त करून देतो. शरीर, प्राण व मन ही साधने आहेत आणि त्या साधनांच्या अतीत असणाऱ्या उच्चतर गोष्टींच्या प्राप्तीसाठी ती आपणास देण्यात आली आहेत, हे तो जाणतो; आणि त्यामुळे त्यांच्यावर मात करून, त्यांच्या अतीत जाणेच आवश्यक आहे, त्यांच्या मर्यादा नाकारणेच आवश्यक आहे, त्यांची पुष्टीतुष्टी करण्यातील मग्नता टाळणेच आवश्यक आहे, हे तो जाणतो. भलेही कनिष्ठ जीवनाने ह्या शोधकावर, साधकावर काही अटी, मर्यादा लादलेल्या असल्या तरी, एकदा का ही परमोच्च अवस्था त्याने प्राप्त करून घेतली की, त्याने काय करणे अपेक्षित आहे हे तो जाणतो.

परमोच्च अवस्था म्हणजे या जगातून निघून जाणे, नाहीसे होणे नव्हे तर, ईश्वरी संकल्प, चेतना, प्रेम, सौंदर्य जे ह्या शोधकाद्वारे, साधकाद्वारे ओसंडून बाहेर पडू पाहते, त्या साऱ्याची चढत्यावाढत्या प्रमाणामध्ये त्याने अभिव्यक्ती करणे; सभोवती असणाऱ्यांपैकी जे कोणी स्वीकारक्षम आहेत त्यांच्यावर त्या साऱ्याचा वर्षाव करणे. आर्य हा त्या परमोच्च शक्तीचा सेवक, भक्त, उपासक व साधक असतो. आत्मसिद्धी प्राप्त झाल्यावर आपल्या सर्व कर्मातून अखिल मानवजातीवर तो प्रेम, आनंद व ज्ञान ह्यांचा वर्षाव करीत राहतो. कारण आर्य हा सदैवच एक कर्मयोगी व योद्धा असतो. परमेश्वराची प्राप्ती व सेवा ह्यांमध्ये कोणत्याही अडचणीस तो जुमानत नाही वा थकल्यामुळे त्याच्या कामात कधी मंदपणा येत नाही. त्याच्या जीवनांत मनाशी व जगाशी अंतर्बाह्य युद्ध करण्याचा प्रसंग सदैवच हजर असतो. तो आपले स्वराज्य व साम्राज्य सदैव स्थापन करीत व वाढवीत असतो. स्वत:च्या आतल्या स्वराज्यासाठी आणि बाहेरील साम्राज्यासाठी तो सदैव झुंज देत राहतो.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 442-443)

जर कोणी आम्हाला असा प्रश्न विचारला की, “हिंदुधर्म म्हणजे काय, तो कसा आहे? हा धर्म काय शिकवतो, कसा आचार करतो, यात सर्वसामान्य घटक कोणते आहेत?” तर उत्तरादाखल आम्ही असे म्हणू शकतो की, सर्वोच्च असूनही, व्यापक अशा तीन आध्यात्मिक अनुभूतींवर, तीन मूलभूत संकल्पनांवर भारतीय धर्म आधारलेला आहे.

‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’
पहिली गोष्ट वेदामध्ये म्हटल्याप्रमाणे, एक अस्तित्व आहे ज्याला सज्जन अनेक नावे देतात. (‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’) उपनिषदात याचे वर्णन एकमेवाद्वितीय ब्रह्म असे केले आहे; हे एकच सर्व काही असून, ते या सर्वांच्या अतीतदेखील आहे. बुद्धधर्मीय या तत्त्वाला ‘चिरंतन तत्त्व’ म्हणतात. मायावादी याला ‘केवल तत्त्व’ म्हणतात; देववादी याला ‘ईश्वर किंवा पुरुष’ म्हणतात. जीव आणि निसर्ग किंवा प्रकृती या ईश्वराच्या आधीन असतात. एका शब्दात या तत्त्वाला ‘शाश्वत, अनंत’ म्हणता येते. हिंदुधर्माचा हा सर्वत्र समान असा पाया आहे; मानवी बुद्धीने या तत्त्वाचे वर्णन अनेक प्रकारे केले आहे. या चिरंतनाचा, अनंताचा शाश्वताचा शोध लावणे, त्याच्या अगदी निकट जाणे, त्यात प्रविष्ट होणे, त्याच्याशी कोणत्या तरी प्रमाणात, कोणत्या तरी प्रकारे एकरूप होणे, हा त्याच्याविषयीच्या आध्यात्मिक अनुभूतीचा कळस होय. हा कळस गाठणे, त्यासाठी अंतिम प्रयत्न करणे ही पहिली सार्वत्रिक श्रद्धा भारताच्या धार्मिक मनात आढळते. हिंदुधर्माचे हे पहिले पायाभूत तत्त्व अनेक सूत्रांनी सांगितले आहे. हे पायाभूत तत्त्व कोण्या एका सूत्ररूपाने माना, हे महान आध्यात्मिक ध्येय, भारतात संमत असलेल्या सहस्त्रावधि मार्गांपैकी कोण्या एका मार्गाने अनुसरा, अथवा त्यातून फुटणाऱ्या एखाद्या नव्याच मार्गाने त्या ध्येयाचा मागोवा घ्या; असे तुम्ही केलेत की, या धर्माच्या हृदयाला तुम्ही गाठले असे होईल.

शाश्वत अनंताकडे जाण्याचे अनंत मार्ग
या धर्माची दुसरी पायाभूत कल्पना हीच आहे की, शाश्वत अनंताकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत. अनंत जे मूळ आहे त्यात अनेक अनंते आहेत आणि या अनेक अनंतांपैकी प्रत्येक अनंत शाश्वतच आहे. विश्वाच्या मर्यादांमध्ये ईश्वर स्वत:ला अभिव्यक्त करतो आणि अनेक मार्गांनी या विश्वामध्ये तो स्वत:ची परिपूर्ती अनुभवतो; आणि हा प्रत्येक मार्ग त्या ‘शाश्वता’चा मार्ग असतो. प्रत्येक सान्तामध्ये आपल्याला ‘अनंता’ची भेट होऊ शकते. सर्व गोष्टी ह्या अनंताच्या मूर्ती व प्रतीके असल्याने, कोणत्याही गोष्टीच्या द्वारा आम्ही अनंताकडे जाऊ शकतो. सर्व विश्वशक्ती ह्या ‘एका’चे आविष्कार आहेत. सर्व शक्ती ह्या ‘एका’च्या शक्ती आहेत. प्रकृतीच्या कार्यामागील देवदेवतांकडे, त्या एका ईश्वराच्या विविध शक्ती आहेत, एका ईश्वराची विविध नामे आहेत, एका ईश्वराची विविध व्यक्तित्वे आहेत या भावनेने पाहिले पाहिजे आणि पूजले पाहिजे. सर्व घटनांच्या पाठीमागे, मग त्या घटना चांगल्या दिसोत वा वाईट, ग्राह्य वाटोत वा अग्राह्य वाटोत, भाग्याच्या वाटोत वा दुर्भाग्यपूर्ण वाटोत, त्यांच्या पाठीमागे अनंत जाणीवयुक्त शक्ती आहे, कार्यकारी शक्ती आहे, ‘अनंता’ची इच्छा आहे, कायदा आहे, माया आहे, प्रकृती आहे, शक्ती किंवा कर्म आहे. ‘अनंत’ निर्मिती करतो आणि ब्रह्मा होतो, तो रक्षण करतो आणि विष्णु होतो, संहार करतो किंवा स्वत:मध्ये सामावून घेतो आणि रुद्र वा शिव होतो. सर्वश्रेष्ठ शक्ती ही आधार देणारी, संरक्षण करणारी होते, ती लक्ष्मी किंवा दुर्गा किंवा विश्वमाता म्हटली जाते. अगदी संहारक रूप धारण करूनदेखील, जी कल्याणकारिणीच असते; तिला चंडी, काली, कालीमाता म्हणतात. एकच ईश्वर विविध नामांनी आणि विविध देवदेवतांच्या रूपाने, विभिन्न गुणवैशिष्ट्यांच्या द्वारे अभिव्यक्त होतो. वैष्णवांचा दिव्य प्रेमाचा देव आणि शाक्तांचा दिव्य सामर्थ्याचा देव हे दोन वेगळे देव असल्याचे भासतात, परंतु खरेतर वेगवेगळ्या रूपांमधून अभिव्यक्त होणारी ती एकच अनंत देवता असते. सर्वश्रेष्ठ देवाकडे, अनंत शाश्वताकडे यांपैकी कोणत्याही नामरूपाच्या आधाराने जावे, ज्ञान असता जावे, ज्ञान नसताही जावे; कारण या नामरूपांच्या द्वारा, त्यांच्या पलीकडे, त्यांच्या अतीत असलेल्या सर्वश्रेष्ठ तत्त्वाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला पुढे जाता येते….

अंत:करणातील ईश्वर
भारतीय धर्माला आधारभूत अशा उच्चतम आध्यात्मिक अनुभवाच्या ज्या तीन गोष्टी आहेत, त्यातील दोन गोष्टींचा विचार आत्तापर्यंत झाला. तिसरी पायाभूत गोष्ट आंतरिक आध्यात्मिक जीवनाला अतिशय गती देणारी आहे. सर्वश्रेष्ठाकडे वा ईश्वराकडे विश्वात्मक जाणिवेच्या द्वारे जाता येते किंवा सर्व आंतरिक व बाह्य प्रकृतीचा भेद करून जाता येते, हे खरे आहे पण तो ईश्वर प्रत्येक व्यक्तिभूत आत्म्याला स्वत:मध्येच, म्हणजे स्वत:च्या आध्यात्मिक भागामध्ये भेटू शकतो, कारण त्यामध्ये असे काहीतरी असते की, जे त्या ईश्वरी अस्तित्वाशी एकत्व पावणारे असते, किमान त्या दिव्य ईश्वरी अस्तित्वाशी संबंधित असते. भारतीय धर्माचे सार हे आहे की, मानवाने आपला विकास करून घ्यावा, आपल्याला अज्ञानातून पार व्हावयाचे आहे, आपल्या मनापासून व जीवनापासून आत्मज्ञान दडवून ठेवणाऱ्या अज्ञानातून आपल्याला पार व्हावयाचे आहे आणि आपल्यातील ईश्वराची ओळख करून घ्यावयाची आहे हे ध्येय मनात ठेवून मानवाने आपले जीवन जगावे; ह्या तीन गोष्टी एकत्र केल्या तर त्यामध्येच हिंदु धर्म सामावलेला आहे, हेच त्याचे मूलभूत सार आहे आणि जर कोणता मार्ग आवश्यक असेल तर तो हाच मार्ग आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 193-195)

हिंदुधर्माने स्वत:ला कोणतेही नाव देऊ केले नाही कारण त्याने स्वत:वर कोणत्याही पंथाच्या मर्यादा घालून घेतल्या नाहीत; त्याने कोणत्याही एकाच एक गोष्टीला वैश्विक समर्थन दिलेले नाही; त्याने कोणत्याच मतप्रणालीला बिनचूक म्हणून घोषित केलेले नाही; मुक्तीचा कोणताच एकच एक मार्ग वा प्रवेशद्वार असे सांगितलेले नाही; हिंदुधर्म म्हणजे कोणता एकच एक असा पंथ वा संप्रदाय नसून, मानवी आत्म्याने ईश्वराभिमुख राहत, सातत्याने केलेल्या विस्तारित प्रयत्नांची ती परंपरा आहे. आध्यात्मिक आत्मरचना आणि आत्मशोधासाठी, अनेकांगी, आणि अनेक पातळ्यांवरील व्यवस्था यामध्ये आहे; या साऱ्यामुळेच ज्या नावाने हा धर्म ओळखला जातो, शाश्वत धर्म हेच नाव स्वत:ला लावण्याचा त्याला पुरेपूर अधिकार आहे. या धर्माच्या अर्थाची आणि त्याच्या आत्म्याची न्याय्य आणि योग्य समज आपल्याला असेल तर आणि तरच भारतीय संस्कृतीचा खरा अर्थ आणि तिचा आत्मा यांचे आपल्याला आकलन होऊ शकेल.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 178-179)