Posts

मनुष्य हा एक संक्रमणशील जीव आहे, तो अंतिम नव्हे; कारण त्याच्यामध्ये आणि त्याच्या पलीकडे आरोहण करणाऱ्या अशा कितीतरी तेजोमय श्रेणी आहेत की, ज्या दिव्य अतिमानवतेकडे चढत जातात.

मनुष्याकडून अतिमानवाप्रत पडणारे हे पाऊल म्हणजे पृथ्वीच्या उत्क्रांतीतील येऊ घातलेली पुढची उपलब्धी आहे. तीच आमची नियती आहे आणि आमच्या अभीप्सा बाळगणाऱ्या पण त्रस्त व मर्यादित मानवी अस्तित्वाला मुक्त करणारी किल्लीदेखील तीच आहे. – हे अटळ आहे कारण ते आंतरिक आत्म्याचे प्रयोजन आहे आणि त्याचवेळी ते प्रकृतीच्या व्यवहाराचे तर्कशास्त्र आहे.

जडभौतिकामध्ये आणि पशु जगतामध्ये मानवाच्या उदयाची शक्यता प्रकट झाली; ती दिव्य प्रकाशाच्या आगमनाची पहिलीवहिली चमक होती – जडामधून जन्मास येणाऱ्या देवत्वाची ती पहिली दूरस्थ सूचना होती. मानवी जगतामध्ये अतिमानवाचा उदय ही त्या दूरवर चमकणाऱ्या वचनाची परिपूर्ती असेल.

वनस्पती आणि प्राणी यांच्या जाणिवेच्या दृष्टीने, विचारी मन हे जेवढे पल्याडचे होते; तेवढेच अंतर मानवाचे मन आणि अतिमानवी चेतना यांमध्ये असेल. मानव आणि अतिमानव यांतील फरक हा मन आणि जाणीव यांमधील फरक असेल. माणसाचे व्यवच्छेदक लक्षण (त्याला प्राणीजगतापासून वेगळे करणारे लक्षण) जसे मन हे आहे, तसे अतिमानवाचे व्यवच्छेदक लक्षण (त्याला मानवापासून वेगळे करणारे लक्षण) अतिमन किंवा दिव्य विज्ञान हे असणार आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 157)

प्रश्न : तुम्ही येथे असे सांगितले आहे की, “आपण कर्मबंधनाने बांधले गेलेलो असतो,” पण जेव्हा ईश्वरी कृपा कार्य करते तेव्हा ती कर्माचा निरास करते..

श्रीमाताजी : हो पूर्णपणे, ईश्वरी कृपा कर्माचा पूर्ण निरास करते. सूर्यासमोर लोणी ठेवले तर ते कसे वितळून जाईल तसे होते.

मी आत्ता तेच सांगत होते. जर तुमच्याकडे पुरेशी प्रामाणिक अभीप्सा असेल किंवा पुरेशी तीव्र प्रार्थना असेल, तर तुम्ही तुमच्यामध्ये असे ‘काहीतरी’ खाली उतरवू शकता की, ज्यामुळे प्रत्येक गोष्टच, अगदी प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. खरोखर, प्रत्येक गोष्ट बदलून जाते.

म्हटले तर, एक अगदी साधे उदाहरण देता येईल; पण त्यामुळे तुम्हाला मुद्दा नीट समजेल. दगड अगदी यांत्रिकपणे खाली पडतो; समजा एखादी फरशी सैल झालेली आहे तर ती खाली पडेल, हो ना? पण जर समजा, प्राणिक वा मानसिक निर्धार असणारी एखादी व्यक्ती तिथून जात असेल; आणि तिला असे वाटले की, ती फरशी खाली पडू नये, आणि त्या व्यक्तीने जर हात पसरले तर ती फरशी त्या व्यक्तीच्या हातावर पडेल; पण ती खाली जमिनीवर पडणार नाही. तेव्हा, त्या दगडाची वा फरशीची नियती त्या व्यक्तीने बदललेली असते. येथे वेगळ्या प्रकारच्या नियतीवादाचा प्रवेश झालेला आहे. तो दगड आता कोणाच्यातरी डोक्यात पडण्याऐवजी, तो त्या व्यक्तीच्या हातावर पडतो आणि त्यामुळे कोणाचा जीव दगावत नाही.

येथे कमीअधिक अचेतन अशा यंत्रणेमध्ये एका वेगळ्या प्रतलावरील सचेतन इच्छाशक्तीचा हस्तक्षेप घडून आलेला असतो.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 90-91)

संक्रमणकाळात विचारांची अधिकच आवश्यकता असते. क्रांतिकारी कालखंड दोन प्रकारच्या अविचारी, कोणतेही आकलन नसलेल्या, कोणताही विचारविमर्श न केलेल्या मनांना जन्म देतो; एक असे मन की जे जुन्या गोष्टींना, केवळ ते जुने आहे म्हणून चिकटून राहते आणि दुसरे मन अमुक एक गोष्ट केवळ नवीन आहे म्हणून त्याच्या पाठीमागे वेड्यासारखे धावत सुटते. या दोहोंमध्ये स्वयंघोषित मध्यममार्गी माणूस उभा राहतो. तो म्हणतो, जुन्यामधले काहीतरी आणि नवीन मधलेही काहीतरी असे दोन्ही असू दे. या दोन टोकांच्या माणसांपेक्षा हा मध्यममार्गी माणूस काही कमी अविचारी नसतो. तो मध्यममार्गाच्या सूत्राच्या आणाभाका घेतो आणि अशक्य असा ताळमेळ घालू पाहतो. ‘जुन्या बाटल्यांमध्ये नवीन वाईन भरता येत नाही’ असे जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतात तेव्हा त्याच्या म्हणण्याचा हाच आशय असतो.

विचार केव्हाही एखादे सूत्र ठरवीत नाही, आधीच अंदाज बांधत नाही, तर तो प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करतो. जर एखादा माणूस म्हणेल की, प्रबुद्ध युरोपाच्या मार्गानुसार तुमच्या सर्व सवयी, संकल्पना बदला तर विचार उत्तर देईल, ”मला आधी विचार करू दे. युरोप हा प्रबुद्ध आहे आणि भारत अडाणी आहे असे मी का गृहीत धरू? कदाचित असेही असू शकेल की, युरोपियन लोक हेच खरे अडाणी असू शकतील आणि भारतीय ज्ञानामध्ये खरेखुरे तथ्य असेल. मला शोधले पाहिजे.” आणि दुसऱ्या बाजूने जर एखादा माणूस म्हणेल, ”भारतीय बन आणि भारतीयांप्रमाणे वाग,” तर विचार म्हणेल, ”भारतीय बनण्यासाठी मला भारतीयांप्रमाणेच वागावे लागेल का याविषयी माझ्या मनात संभ्रम आहे. कदाचित असेही असू शकेल की, भारतीयांना जे अपेक्षित नव्हते तेच आत्ताच्या काळातील या देशातील माणसे बनली असतील. भारतीय संस्कृतीच्या वेगवेगळ्या कालखंडांमध्ये भारतीय कसे होते हे मला शोधलेच पाहिजे आणि संस्कृतीमधील शाश्वत काय आणि तात्पुरते काय ह्याचा शोध मला घेतलाच पाहिजे. असेही शक्य आहे की, आम्ही गमावलेल्या काही खऱ्याखुऱ्या भारतीय गोष्टी युरोपयिनांकडे असू शकतील.” भारतीय असणे चांगलेच आहे, पण भारतीय असणे म्हणजे ज्ञानाने भारतीय असणे होय, केवळ पूर्वग्रहाने नव्हे.

मानवी समाजाच्या रक्षणासाठी, तसेच व्यक्तीच्या आणि मानवी समूहाच्या परिपूर्णतेसाठी नेमका कोणता आचार उत्तम आहे हे विचार, विवेक आणि ज्ञान यांच्या साहाय्याने ठरविणे ह्यावरच हिंदुधर्माची उभारणी करण्यात आलेली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 499-500)

मानवाची महानता तो काय आहे ह्यामध्ये नसून, तो काय करू शकतो ह्यामध्ये सामावलेली आहे. मानव ही बंदिस्त अशी एक जागा आहे आणि जिवंत परिश्रमांची ती अशी एक गुप्त कार्यशाळा आहे की, ज्यामध्ये त्या दिव्य कारागीराकडून अतिमानवता घडवली जात आहे आणि हेच मानवाचे खरेखुरे वैभव आहे.

पण यापेक्षाही एका अधिक महानतेमध्ये त्याचा प्रवेश झाला आहे. ती महानता अशी की, कोणत्याही कनिष्ठ प्रजातींना मिळाली नाही अशी एक संधी त्याला मिळालेली आहे. मानवामध्ये होणाऱ्या दिव्य परिवर्तनाचा जाणीवसंपन्न कारागीर बनण्याची, त्या परिवर्तनामध्ये थोड्याफार प्रमाणात सहभागी होण्याची परवानगी त्याला मिळालेली आहे.

मात्र त्याच्या देहामध्ये ही महानता प्रत्यक्षात उतरावी याकरिता, म्हणजेच मानवी देहाचे अतिमानवामध्ये रूपांतर शक्य व्हावे याकरिता, मानवाची स्वेच्छापूर्वक संमती, त्याची एकदिश झालेली इच्छाशक्ती आणि त्याचा सहभाग यांची आवश्यकता आहे. त्याची ‘अभीप्सा’ ही पृथ्वीने त्या अतिमानसिक निर्मिकाला दिलेली हाक आहे.

जर पृथ्वी आवाहन करेल आणि परमश्रेष्ठ त्यास प्रतिसाद देईल तर, त्या भव्य आणि गौरवशाली रूपांतरणाची घटिका अगदी आत्तादेखील असू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 160)

इ. स. १९५५ च्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला श्रीमाताजींनी साधकांना जो संदेश दिला होता, त्याची पार्श्वभूमी खालील प्रश्नोत्तरामध्ये अभिव्यक्त झालेली आहे. कठीण काळाच्या पार्श्वभूमीवर आपण स्वतःला जाणिवपूर्वकपणे आणि निरपवादपणे ईश्वराच्या बाजूस राखले पाहिजे; त्यामुळे सरतेशेवटी विजयाची सुनिश्चिती आहे, हे त्यांनी त्यामध्ये नमूद केले होते.

आज काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे, संदर्भ बदललेला आहे तरीही श्रीमाताजींनी दिलेला संदेश तेवढाच सार्थ आहे, म्हणून येथे त्या संदेशाची पुन्हा एकदा आठवण…

*

प्रश्न : येणारे हे वर्ष आश्रम किंवा भारतासाठी आणि अखिल जगासाठी अवघड असेल का?

श्रीमाताजी : सामान्यतः जग, भारत, आश्रम आणि व्यक्तींसाठी सुद्धा हे वर्ष अवघड असेल. अर्थात ते ज्याच्या त्याच्या अवस्थेवर अवलंबून आहे, सर्वांसाठी ते सारखेच असेल असे मात्र नाही. काही गोष्टी या इतरांपेक्षा अधिक सोप्या भासतील. पण हो, सर्वसामान्यतः सांगायचे झाले तर हे वर्ष अवघड असेल – जर तुम्ही समजून घेऊ इच्छित असाल तर, मी तुम्हाला सांगू शकते की, सद्यकालीन साक्षात्काराच्या विरोधात विजय प्राप्त करून घेण्याची विरोधी शक्तींसाठीची ही शेवटची संधी असेल.

परंतु व्यक्तीने या काही महिन्यांच्या कालावधीत स्वतःला दृढ राखले तर, या विरोधी शक्ती फारसे काही बिघडवू शकणार नाहीत; त्यांचा विरोध ढासळून पडेल.

हा मूलतः विरोधी शक्तींचा, अदिव्य शक्तींचा संघर्ष आहे; ह्या शक्ती दिव्य साक्षात्काराला त्यांच्या परीने होता होईल तेवढे मागे रेटू पाहत आहेत.. त्या हजारो वर्षे या आशेवर आहेत. आणि आता तो संघर्ष टोकाला गेला आहे. ही त्यांची शेवटची संधी आहे; आणि या त्यांच्या बाह्य कृत्यामागे जे कोणी आहेत ते पूर्णतः जागृत जीव आहेत; त्यांना हे चांगलेच माहीत आहे की, ही त्यांची शेवटची संधी असणार आहे आणि म्हणूनच त्यांना जेवढे शक्य आहे तेवढे आटोकाट प्रयत्न ते करणार. आणि ते जे काही करू शकतात ते खूपच जास्त आहे. सामान्य किरकोळ मानवी जाणिवांसारखी त्यांची जाणीव नाही. त्यांची जाणीव अजिबातच मानवी नाही. मानवी जाणिवांच्या शक्यतेच्या तुलनेत पाहता, त्यांच्या जाणिवा ह्या, त्यांच्या शक्तीच्या, सामर्थ्याच्या आणि अगदी त्यांच्या ज्ञानाच्या बाबतीतसुद्धा दैवी आहेत असे भासते.

म्हणून हा एक भयानक संघर्ष असणार आहे आणि तो पूर्णतः पृथ्वीवर केंद्रित झालेला असणार आहे कारण, त्यांना हे माहीत आहे की, पहिला विजय मिळवायचा आहे तो या पृथ्वीवरच! एक निर्णायक विजय, असा विजय जो पृथ्वीच्या भवितव्याची दिशा ठरविणारा असेल.

जेव्हा गोष्टी भयावह बनतील तेव्हा, जे उदात्त हृदयाचे असून, आपला माथा उन्नत ठेऊ शकतील, ते कुशलमंगल राहू शकतील.

स्वतःचे उत्थान करून घेण्याची ही एक संधी असेल.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 459-460)

“हे दुर्भाग्या, तुझे कल्याण होवो, कारण तुझ्या माध्यमातूनच मला माझ्या प्राणेश्वराचे मुखदर्शन झाले.” – असे श्रीअरविंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे त्यावर भाष्य करताना श्रीमाताजी म्हणतात,

जर दुर्भाग्यामुळे एखाद्याला ईश्वराच्या मुखदर्शन झाले तर, त्याला दुर्भाग्य तरी कसे म्हणावे, नाही का ? अर्थातच, त्याला दुर्भाग्य म्हणताच येणार नाही, तो तर कृपाशीर्वाद ठरेल. आणि नेमकेपणाने हेच श्रीअरविंदांना येथे म्हणावयाचे आहे.

आपण ज्या अपेक्षा करतो, आपण ज्याची आशा बाळगतो, आपल्याला जे हवे असते, तसे जेव्हा घडत नाही; आपल्या इच्छाआकांक्षांपेक्षा काहीतरी विपरितच घडते तेव्हा, आपल्यातील अज्ञानामुळे आपण त्याला दुर्भाग्य म्हणतो आणि शोक करतो.

पण जर का आपण थोडेसे जरी समजदार झालो आणि त्याच घटनांचे खोलवर परिणाम काय झाले याचे अवलोकन केले तर, आपल्या असे ध्यानात येईल की, ह्याच घटना आपल्याला त्वरेने ईश्वराकडे, आपल्या प्राणेश्वराकडे घेऊन जात आहेत.

उलटपक्षी, सहज-सुखासीन परिस्थिती मात्र आपल्याला मार्गावर अळमटळम करण्यास प्रोत्साहित करते, ती परिस्थिती, या मार्गावर आपल्या समोर सौख्याची फुले पसरते आणि ती वेचून घेण्यासाठी आपण मार्गावर मध्येच थांबून राहतो. आपल्या प्रगतीमध्ये विलंब होऊ नये यासाठी, अशा गोष्टींचा निर्धारपूर्वक अस्वीकार करण्याइतपत आपण प्रामाणिकही नसतो किंवा खूपच दुर्बल असतो. यश किंवा छोट्याछोट्या सुखोपभांना सामोरे जायचे आणि तरीही मार्गावरून ढळायचे नाही, हे जमण्यासाठी व्यक्ती मूळातच दृढ असावी लागते किंवा ती मार्गावर पुष्कळ प्रगत झालेली असावी लागते.

असे जे कोणी करू शकतात, जे असे दृढनिश्चयी असतात, ते यशाच्या मागे धावत नाहीत, ते यश मिळविण्यासाठी आटापिटा करत नाही आणि जर यश प्राप्त झालेच तरी ते यश अगदी निःसंगपणे स्वीकारतात. कारण दुःख व दुर्भाग्यामुळे यांना जे तडाखे बसलेले असतात त्याचे मूल्य त्यांना माहीत असते आणि त्याची त्यांना कदरही असते.

आपल्याला यश व अपयश, आनंद व दुःख, सुदैव व दुर्दैव ह्या गोष्टी सारख्याच समाधानी स्थिरचित्तवृत्तीने स्वीकारण्यासाठी जी सक्षम बनवते, ती परिपूर्ण समता ही, आपण आपल्या ध्येयाच्या निकट पोहोचलो आहोत याची खूण, याची साक्ष असते. आणि खराखुरा योग्य दृष्टिकोनदेखील तोच असतो.

तात्पर्य असे की, ईश्वराने त्याच्या अपार करूणेतून, ज्या ज्या गोष्टींचा आपल्यावर वर्षाव केलेला असतो त्या साऱ्याच गोष्टी या आपल्यासाठी अद्भुत वरदान ठरतात.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 58-59)

सत्यशोधन आणि त्याप्रत पोहोचणे या गोष्टी आपापल्या मार्गाने मुक्तपणे अनुसरता येणे, हा प्रत्येक मनुष्याचा अधिकारच आहे. परंतु प्रत्येकाला हे ठाऊक असावयास हवे की, त्याला लागलेला शोध हा केवळ त्याच्यासाठीच उचित आहे आणि तो त्याने इतरांवर लादता कामा नये.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 207)

जोपर्यंत धर्म अस्तित्वात राहतील तोपर्यंत समतोल राखण्यासाठी नास्तिकतावाद अपरिहार्य आहे. नंतर मात्र धार्मिकता आणि नास्तिकता या दोहोंनी निवृत्त होऊन सत्याचा प्रामाणिक आणि निरपेक्षपणे शोध घेण्यासाठी आणि या शोधाच्या उद्दिष्टाला पूर्ण समर्पण करण्यासाठी जागा करून देणे आवश्यक आहे.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 284)

प्रश्न : प्रत्येकातील चैत्य पुरुष (Psychic Being) नेहमी शुद्धच असतो का? की, तो शुद्ध करावा लागतो?
श्रीमाताजी : अस्तित्वामधील चैत्य पुरुष हा नेहमीच अतिशय शुद्ध असतो, कारण अस्तित्वाचा हा एक असा भाग आहे की, जो ईश्वराच्या संपर्कात असतो आणि अस्तित्वाचे सत्य तो अभिव्यक्त करत असतो. परंतु हा चैत्य पुरुष म्हणजे व्यक्तिच्या अस्तित्वाच्या अंधकारातील एक ठिणगी असू शकते किंवा तो जागृत, पूर्ण विकसित व स्वतंत्र असा प्रकाशमय पुरुष असू शकतो. या दोहोंच्या दरम्यान अनेक श्रेणी असतात.

प्रश्न : तो सहसा झाकलेलाच असतो का?
श्रीमाताजी : बाह्यवर्ती जाणीव (Outer consciousness) ही त्याच्या संपर्कात असत नाही, कारण ती आतमध्ये वळलेली असण्याऐवजी, बाहेरच्या दिशेला वळलेली असते कारण ती बाह्य गोंगाट, हालचाली या साऱ्यांमध्ये जगत असते. अंतरंगामध्ये पाहण्याऐवजी, अस्तित्वाच्या तळाशी पाहण्याऐवजी आणि आंतरिक प्रेरणांचे ऐकण्याऐवजी, ती जाणीव बाह्यामध्ये जे काही पाहते, जे काही करते, जे काही बोलते त्या साऱ्या गोष्टींमध्येच वावरत असते.

प्रश्न : चैत्य पुरुषाकडे कोणती शक्ती असते का?
श्रीमाताजी : सहसा, जीवाला मार्गदर्शन करणारा चैत्य पुरुषच तर असतो. व्यक्तीला त्याविषयी काहीच माहीत नसते कारण व्यक्ती त्याविषयी जागृत नसते, परंतु चैत्य पुरुषच सहसा जीवाला मार्गदर्शन करत असतो. जर का व्यक्ती सावध राहिली तर, व्यक्तीला त्याची जाण येते. परंतु बहुसंख्य लोकांना त्याची पुसटशी देखील कल्पना नसते.

उदाहरणार्थ, त्यांनी काहीतरी करावयाचे ठरविलेले असते, अर्थात त्यांच्या बाह्यवर्ती अज्ञानापोटीच, काहीतरी करावयाचे ठरविलेले असते आणि सारे काही असे घडत जाते की, जे करायचे ठरविले होते त्याऐवजी ते काहीतरी भलतेच करून बसतात आणि मग ते चिडतात, त्रागा करता, दैवाला दोष देत, संताप व्यक्त करत राहतात (ते ज्याच्या त्याच्या भावना व श्रद्धा यांवर अवलंबून असते.) ते म्हणत राहतात, प्रकृती दुष्ट आहे, किंवा नियती निर्दयी आहे किंवा मग देवच अन्यायी आहे किंवा…असेच काहीही. (ते ज्याच्या त्याच्या समजुतींवर अवलंबून असते.) खरंतर, बरेचदा तीच परिस्थिती त्यांच्या आंतरिक विकासासाठी अत्यंत अनुकूल अशी असते.

तुम्हाला आरामदायी जीवन हवे आहे, पैसा हवा आहे, कुलदीपक अशी मुलेबाळे हवी आहेत, त्या साऱ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून मला मदत कर, असे जर तुम्ही तुमच्या चैत्य पुरुषाला सांगाल तर तो तुम्हाला त्यात साहाय्य करणार नाही, हे उघडच आहे. परंतु जेणेकरून, ईश्वराशी एकरूप होण्याची निकड तुमच्या जाणिवेमध्ये उत्पन्न व्हावी, असे काहीतरी तुमच्यामध्ये जागृत होईल, अशी परिस्थिती मात्र तो तुमच्यासाठी निर्माण करेल.

तुम्ही आखलेल्या चांगल्याचांगल्या योजना जर यशस्वी झाल्या, तर तुमच्या बाह्य अज्ञानाचे, तुमच्या मूर्ख क्षुल्लक महत्त्वाकांक्षांचे आणि तुमच्या ध्येयहीन कृतींचे आवरण अधिकाधिक घट्ट होत जाईल अशी शक्यता असते. परंतु जेव्हा तुम्हाला मोठा धक्का बसतो, ज्याची तुम्ही अभिलाषा बाळगली होती ते पद तुम्हाला नाकारले जाते, तुमच्या योजना छिन्नविछिन्न होऊन जातात, जेव्हा तुम्ही पूर्णपणे विफल झालेले असता तेव्हा, कधीकधी ही प्रतिकूलताच तुमच्यासाठी अधिक सत्य आणि अधिक सखोल अशा कोणत्यातरी गोष्टींची दारे खुली करून देते.

आणि मग नंतर कधीतरी, जेव्हा तुम्ही थोडेसे जागृत असता आणि मागे वळून पाहू लागता तेव्हा, तुम्ही थोडेसे जरी प्रामाणिक असाल तर तुम्ही म्हणता, “खरंच की ! तेव्हा माझे म्हणणं बरोबर नव्हते – प्रकृती किंवा ईश्वरी कृपा किंवा माझा चैत्य पुरुष ह्यांचेच बरोबर होते, त्यांनीच हे सारे घडवून आणले आहे.” तो चैत्य पुरुषच असतो की, ज्याने हे सारे घडवून आणलेले असते.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 393-394)

आपल्यामधील चैत्य घटक हा असा भाग असतो की, जो थेट ईश्वराकडून आलेला असतो आणि ईश्वराच्या संपर्कामध्ये असतो. मूलत: चैत्य घटक म्हणजे दिव्य शक्यतांनी गर्भित असलेले असे एक केंद्र असते की जे, मन-प्राण-शरीर यांच्या कनिष्ठ आविष्कारत्रयीला आधार पुरविते. हे ईश्वरी वा दिव्य तत्त्व सर्व सजीवांमध्ये असते; पण ते सामान्य चेतनेच्या मागे लपलेले असते. ते केंद्र प्रथमत: विकसित झालेले नसते आणि जरी अगदी विकसित झालेच तरीही, ते नेहमीच किंवा बहुतांशी वेळा पुढे आलेले नसते; मन-प्राण-शरीर या साधनांच्या अपूर्णतांकडून जेवढी मुभा मिळेल तेवढेच, त्यांच्या माध्यमातूनच आणि त्यांच्या मर्यादांमध्ये राहूनच, हे तत्त्व स्वत:ला अभिव्यक्त करते.

ईश्वरानुगामी अनुभूतींच्या योगे, त्याची चेतनेमध्ये वृद्धी होत असते; आपल्यामध्ये जेव्हा जेव्हा उच्चतर क्रिया होते, त्या प्रत्येक वेळी त्याला सामर्थ्य प्राप्त होत जाते आणि सरतेशेवटी, ह्या सखोल आणि उच्चतर अशा गतिविधींच्या संचयामधून चैत्य व्यक्तित्वाची घडण होते आणि त्यालाच आपण सर्वसाधारणत: ‘चैत्य पुरुष वा चैत्य अस्तित्व’ असे म्हणतो.

मनुष्य आध्यात्मिक जीवनाकडे वळण्याचे निमित्त-कारण खरंतर हाच चैत्य पुरुष असतो; ह्या चैत्यपुरुषाचीच मनुष्याला सर्वात अधिक मदत होत असते पण बरेचदा हे निमित्त-कारणच अनभिज्ञ राहते. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या ह्या पूर्णयोगामध्ये त्याला मागून पुढे पृष्ठभागी आणले पाहिजे.

इंग्रजी भाषेमध्ये ‘आत्मा आणि चैत्य पुरुष’ (Soul & Psychic) हे दोन्ही शब्द अगदीच ढोबळमानाने आणि विविध अर्थांनी वापरले जातात. बहुतांशी वेळा तर, मन आणि आत्मा ह्यांमध्ये स्पष्ट फरकच केला जात नाही आणि त्यापेक्षा अधिक गंभीर गोंधळ पुढील बाबतीत केला जातो : ‘आत्मा’ वा ‘चैत्य’ या शब्दाद्वारे त्यांना, खराखुरा आत्मा वा चैत्य पुरुष अभिप्रेत नसतो, तर इच्छावासनांचे प्राणिक अस्तित्व – म्हणजे वासनात्मा वा भ्रामक आत्मा (desire-soul) हाच अभिप्रेत असतो.

मन वा प्राण यांपासून चैत्य पुरुष हा पूर्णत: भिन्न असतो; मन व प्राण दोघेही हृदयस्थानी जिथे एकत्रित येतात तेथे, तो त्यांच्या पाठीमागे उभा असतो. त्याचे मध्यवर्ती स्थान तेथे असते, हृदयात नव्हे तर, हृदयाच्या पाठीमागे असते. हृदय हे भावभावनांचे स्थान असते, असे लोक सहसा ज्याविषयी म्हणतात, त्या मानवी भावभावना म्हणजे मानसिक प्राणिक आवेग असतात; त्या सहसा चैत्य स्वरूपाच्या असत नाहीत. मन आणि प्राणशक्तीपेक्षा भिन्न असणारी, पार्श्वस्थानी असणारी ही बहुतांशी गुप्त शक्ती म्हणजे खरा आत्मा होय, आपल्यातील चैत्य पुरुष होय.

वास्तविक, चैत्य पुरुषाची शक्ती ही मन, प्राण व शरीर यांच्यावर कार्य करू शकते, विचारांचे, बोधाचे, भावनांचे (ह्याच भावना नंतर चैत्य भावना बनतात) तसेच संवेदना, कृती आणि आपल्यातील इतर सर्वच गोष्टींचे शुद्धीकरण करते आणि त्यांनी दिव्य गतिविधी बनावे म्हणून त्यांची पूर्वतयारी करून घेते.

भारतीय भाषांमध्ये या चैत्य पुरुषाचे वर्णन ‘हृदयामधील पुरुष’ असेही केले जाते. येथे आंतरहृदयाचा किंवा गुप्त असणाऱ्या हृदयाचा (हृदये गुहायाम्) असा बोध व्हावयास हवा.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 103-104)