Tag Archive for: तत्त्वज्ञान

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०२

जीवनाचा अंत होत नाही, पण रूपाचे मात्र विघटन होते आणि या विघटनाचीच शारीरिक चेतनेला भीती वाटत असते. आणि तरीही हे रूप सारखे बदलत राहते आणि मूलत: या बदलास प्रगत होण्यापासून रोखू शकेल असे काहीच असत नाही. हा प्रागतिक बदलच भविष्यात मृत्युची अनिवार्यता नाहीशी करू शकेल. परंतु ही गोष्ट साध्य करणे अत्यंत कठीण आहे आणि त्यासाठी अशा अटी घालण्यात येतात की, ज्या अटींची परिपूर्ती अगदी मोजकी माणसंच करू शकतील. त्यामुळे मृत्युच्या भीतीवर मात करण्याची जी पद्धत अवलंबायची, ती प्रकृतीगणिक आणि चेतनेच्या अवस्थेगणिक वेगवेगळी असेल. या प्रत्येक पद्धतीमध्ये पुष्कळ विविधता आढळत असली तरीही, या पद्धतींचे चार मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते; खरे तर, प्रत्येकाने स्वतःची प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 82)

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०१

व्यक्ती मृत्युच्या भीतीवर कशी मात करू शकते? तर, यासाठी अनेक पद्धती उपयोगात आणता येऊ शकतात. परंतु, या आपल्या प्रयत्नांमध्ये साहाय्यभूत होतील अशा काही मूलभूत संकल्पना प्रथम लक्षात घेऊ. जाणून घेतली पाहिजे अशी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की, जीवन हे एकसलग आहे आणि अमर्त्य आहे; फक्त त्याची रूपे अगणित, क्षणभंगुर आणि नाशिवंत असतात – हे ज्ञान व्यक्तीने मनामध्ये सुरक्षितपणे आणि कायमस्वरूपी स्थापित केले पाहिजे आणि या प्रत्येक रूपापासून स्वतंत्र असणाऱ्या पण तरीही या सर्व रूपांमधून आविष्कृत होणाऱ्या शाश्वत जीवनाशी, व्यक्तीने स्वतःची चेतना शक्य तितकी तादात्म्य केली पाहिजे. समस्या तशीच शिल्लक असते; पण या तादात्म्यामुळे समस्येला सामोरे जाण्यासाठी अपरिहार्य असा मनोवैज्ञानिक आधार प्राप्त होतो. अगदी आंतरिक अस्तित्व जरी सर्व भीतीच्या पलीकडे जाण्याइतपत प्रदीप्त झालेले असले तरीही शरीराच्या पेशींमध्ये भीती दडून राहिलेली असते; ती धूसर, स्वाभाविक, तर्कातीत आणि बरेचदा ती अगदी अज्ञात असते. व्यक्तीने या अंधार भरल्या गहनतेमध्ये तिचा शोध घेतला पाहिजे, तिचा ताबा घेतला पाहिजे आणि तिच्यावर ज्ञानाचा आणि दृढ विश्वासाचा प्रकाश टाकला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 82-83)

प्रश्न : माणसं जर मृत्यूच पावली नाहीत, तर वाढत्या वयाबरोबर त्यांचे शरीर निरूपयोगी होणार नाही का?

श्रीमाताजी : नाही, तुम्ही चुकीच्या बाजूने पाहात आहात. त्यांच्या शरीराचा ऱ्हास झाला नाही तरच ते मृत्युपासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकतील. शरीराचा ऱ्हास होतो त्यामुळेच तर ते मरण पावतात. त्यांचे शरीर निरुपयोगी होते त्यामुळेच तर ते मरण पावतात. त्यांना मृत्यू नको असेल तर, त्यांचे शरीर निरुपयोगी होता कामा नये… शरीराचा ऱ्हास होतो, प्रकृती खालावत जाते आणि नंतर पूर्णतः त्याला उतरती कळा लागून, अंतीमत: ते नाश पावते म्हणूनच मृत्यू आवश्यक होऊन बसतो. परंतु शरीरानेसुद्धा अंतरात्म्याच्या (Inner being) प्रगमनशील वाटचालीचे अनुसरण केले, चैत्य पुरुषाला (Psychic being) असते तशीच प्रगतीची आणि पूर्णत्वाची जाणीव शरीरालासुद्धा झाली तर, शरीर मृत पावण्याची कोणतीच आवश्यकता उरणार नाही. वय वाढत गेले म्हणून शरीराचा ऱ्हास होण्याचे काहीच कारण नाही. प्रकृतीचा हा केवळ एक नित्य-परिपाठ, सवय आहे. ‘सद्यस्थिती’त जे काही घडत आहे, त्याचा हा एक केवळ परिपाठ आहे. आणि नेमके हेच मृत्युचे कारण आहे.

…जर शरीर टिकून राहायचे असेल तर, त्याचा ऱ्हास होता कामा नये. तेथे क्षीणता असताच कामा नये. त्याने या एका बाजूवर विजय प्राप्त करून घेतला पाहिजे, तो म्हणजे, त्याचा ऱ्हास न होता, त्याचे रूपांतर झाले पाहिजे. त्याचा जर ऱ्हास होणार असेल तर अमर्त्यत्वाची शक्यताच उरत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 111-115)

मृत्युला त्याचे स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व नाही, तर मृत्यू म्हणजे शरीरामध्ये असणाऱ्या ऱ्हासकारक तत्त्वाचा केवळ परिणाम आहे. आणि ते तत्त्व आधीपासूनच तेथे अस्तित्वात असते – ते जडभौतिक प्रकृतीचाच एक भाग आहे. परंतु त्याच बरोबर, मृत्यू अटळ आहे, असेही नाही. एखाद्याकडे जर आवश्यक ती चेतना आणि ती शक्ती असेल तर, शरीराचा -हास आणि मृत्यू अटळ नाहीत.

परंतु, ज्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विनाशकारक तत्त्वच समूळ नाहीसे होईल अशा रितीने, ती चेतना आणि ती शक्ती समग्र जडभौतिक प्रकृतीमध्ये उतरविणे, ही सर्वाधिक कठीण गोष्ट आहे.

*

विकासक्रमामध्ये (evolution) मृत्यू आवश्यक आहे कारण शरीर याहून अधिक प्रगती करू शकत नाही – चेतनेची जी प्रगती किंवा विकास चालू आहे त्यासाठी हे शरीर यापुढे साधन म्हणून पुरे पडू शकणार नाही. – त्यामुळे चेतनेला तिचे शारीरिक साधन बदलून नवे साधन धारण करावे लागेल. आत्म्याचे विकासानुगामी साधन (plastic instrument) बनावे यासाठी शरीरामध्ये काही उतरविता आले तर मग मृत्यूची आवश्यकताच शिल्लक राहणार नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 310-311), (CWSA 28 : 310)

देहधारी जीव, आज आहे त्याच शरीरामध्ये कोणत्याही बदलाच्या आवश्यकतेशिवाय प्रगती करू शकेल, इतपत आजवर विकसित झालेला नाहीये; आणि त्यामुळेच मृत्यूचे अस्तित्व आहे. तसेच खुद्द हे शरीरदेखील अजून पुरेसे जागृत झालेले नाही.

मन आणि प्राण आणि शरीर जर स्वतःच अधिक सचेत व अधिक लवचीक असते तर मृत्युची आवश्यकताच नव्हती.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 313-314)

प्रश्न : शारीरिक देह हा संरक्षण म्हणून कशा रितीने कार्य करतो?

ज्या जडतेबद्दल आपण आपल्या देहाला नावं ठेवत असतो त्या त्याच्या जडतेमुळेच हा शारीरिक देह संरक्षणाचे काम करत असतो. शरीर सुस्त, असंवेदनशील, निबर, अलवचीक आणि कठीण असते; बाजूने मजबूत तटबंदी असलेल्या गडकोटाप्रमाणे ते असते. तर प्राणिक जगत मात्र द्रवरूप असते, त्यातील गोष्टी प्रवाही असतात, त्या एकमेकांत मिसळत असतात, त्या परस्परांमध्ये प्रविष्ट होत असतात; समुद्राच्या लाटा ज्याप्रमाणे अखंडपणे एकमेकींमध्ये मिसळत असतात, बदलत असतात, त्यांची घुसळण होत असते त्या लाटांप्रमाणे हे सारे असते. तुम्ही जर अतिशय शक्तिशाली अशा आंतरिक प्रकाशाने आणि शक्तीने या प्राणिक जगताचा विरोध करू शकला नाहीत तर, त्याच्या या प्रवाहीपणासमोर तुम्ही संरक्षणविहीन असता; अन्यथा ते तुमच्यामध्ये आतपर्यंत जाऊन मिसळते आणि त्या आक्रमक प्रभावाला थोपवू शकेल असे तुमच्याकडे काहीच नसते. परंतु देह हस्तक्षेप करतो, देह तुम्हाला प्राणिक जगतापासून तोडतो, अलग ठेवतो. त्या जगताच्या शक्तींच्या पूरापासून रोखणारा देह म्हणजे जणू एक धरणच असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 48)

मृत्युनंतर काही कालावधी असा असतो की जेव्हा जीवात्मा प्राणिक जगतामधून (vital world) जातो आणि तेथे काही काळ राहतो. या संक्रमणाचा केवळ पहिला भागच काहीसा भयंकर वा वेदनादायी, यातनामय असू शकतो. देहामध्ये असताना त्याच्या ज्या प्राणिक वासना आणि सहजप्रवृत्ती होत्या, त्यातील शिल्लक राहिलेल्या गोष्टींवर, विशिष्ट अशा परिस्थितीत, उरलेल्या काळात तो काम करतो.

ज्या क्षणी तो या साऱ्याने थकून जातो आणि याही पलीकडे जाण्याची त्याची तयारी होते, त्या क्षणी लगेचच त्याचा प्राणमय कोष गळून पडतो. त्यानंतर, मानसिक अवशेषांपासून (mental survivals) सुटका करून घेण्यासाठी जो थोडा कालावधी लागतो, त्या कालावधीनंतर चैत्य जगतात (psychic world) विश्रांत अवस्थेत जाण्यासाठी जीवात्मा निघून जातो आणि पृथ्वीवरील पुढील जन्म येईपर्यंत तो तेथे राहतो.

एखादी व्यक्ती तिच्या सदिच्छेद्वारे किंवा जर तिला गूढ मार्गाचे ज्ञान असेल तर त्या माध्यमातून त्या जीवात्म्याला साहाय्य करू शकते.

त्याच्याविषयी शोक करून किंवा त्याच्यामध्ये मनाने गुंतून राहून किंवा ज्यामुळे तो खाली, या भूलोकाजवळ खेचला जाईल अशी कोणतीही गोष्ट करून आपण त्याला बांधून ठेवू नये किंवा विश्रांतीस्थळाकडे होणारा त्याचा प्रवास लांबवू नये.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 529-530)

मृत्युबद्दल शोक करण्यासारखे काहीच नाही कारण मृत्यू म्हणजे केवळ एका प्रांतांतून दुसऱ्या प्रांतांत जाण्यासारखे आहे – की कदाचित जिथे तुम्ही बरेचदा गाढ झोपेमध्ये असताना जात असता.

*

… मृत्यू म्हणजे वैयक्तिक अस्तित्वाची समाप्ती नव्हे तर मृत्यू म्हणजे केवळ देह सोडणे होय, हे खरे वास्तव आहे. माणसाचा मृत्यू होत नाही कारण तो एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जातो आणि तेथील वातावरणानुसार कपडे बदलतो.

*

जे काही घडले आहे त्याचा आता शांतपणे स्वीकार केला पाहिजे कारण घटना घडून गेली आहे. मानवी दृष्टीला – जी फक्त वर्तमान व बाह्य दृश्यच पाहत असते तिला – ते चांगले वाटले नाही तरी आत्म्याच्या एका जीवनाकडून दुसऱ्या जीवनाकडे होणाऱ्या वाटचालीसाठी तेच सर्वोत्तम असते. अध्यात्म-साधकासाठी मृत्यू म्हणजे जीवनाच्या एका रूपाकडून दुसऱ्या रूपाकडे जाणारा फक्त एक मार्ग आहे आणि म्हणून कोणाचा मृत्यू झालेला नसतो, तर ते केवळ प्रस्थान आहे; या दृष्टीने मृत्युकडे पाहा…

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 529)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३३

पूर्णयोगाच्या प्रक्रियेच्या तीन अवस्था आहेत; त्या एकमेकींपासून वेगळ्या ओळखता येण्यासारख्या नाहीत किंवा त्या पूर्ण वेगळ्याही नाहीत; परंतु त्या एका विशिष्ट प्रमाणात क्रमबद्ध आहेत.

प्रथम, स्वतःच्या अतीत जाण्याची आणि ईश्वराशी संपर्क साधण्याची पात्रता येण्यासाठी किमान अगदी प्राथमिक प्रयास केले पाहिजेत ही पहिली पायरी. जे अतीत आहे आणि ज्याच्याशी आपण ऐक्य साध्य केले आहे त्याचा, आपले समग्र जाणीवयुक्त अस्तित्व रूपांतरित व्हावे म्हणून आपण आपल्या स्वतःमध्ये स्वीकार करणे ही दुसरी पायरी; आणि या रूपांतरित मनुष्यत्वाचा दिव्य कार्यकेंद्र म्हणून विश्वात उपयोग करणे, ही तिसरी पायरी होय.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 58)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २६

पूर्णयोगामध्ये समग्र जीवन हे, अगदी बारीकसारीक तपशिलासहित रूपांतरित करायचे असते, ते दिव्यत्वामध्ये परिवर्तित करायचे असते.

इथे कोणतीच गोष्ट निरर्थक नसते आणि कोणतीच गोष्ट क्षुल्लक नसते. “जेव्हा मी ध्यानधारणा करत असेन, जेव्हा तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत असेन किंवा (आध्यात्मिक) चर्चा ऐकत असेन तेव्हा मी प्रकाशाभिमुख अशा उन्मीलित स्थितीत राहीन आणि प्रकाशाप्रत आवाहन करेन; पण जेव्हा मी फिरायला बाहेर पडेन किंवा मी जेव्हा मित्रांना भेटेन तेव्हा मात्र हे सारे विसरून गेलो तरी चालेल,” असे तुम्ही म्हणू शकत नाही. जर तुम्ही अशा तऱ्हेचाच दृष्टिकोन ठेवलात तर त्याचा अर्थ असा होईल की, तुम्ही तसेच अरूपांतरित राहाल आणि मग तुम्ही ईश्वराशी खरेखुरे एकत्व कधीच साधू शकणार नाही. फार फार तर तुम्हाला उच्चतर जीवनाची थोडीफार झलक पाहायला मिळेल. परंतु तुम्ही नेहमीच ईश्वरापासून विभक्त राहाल.

तुमच्या ध्यानावस्थेत किंवा तुमच्या आंतरिक चेतनेमध्ये तुम्हाला काही अनुभव आले किंवा काही साक्षात्कार झाले तरीही तुमचे शरीर आणि तुमचे बाह्य जीवन मात्र तसेच अपरिवर्तित राहिलेले असेल. शरीर आणि बाह्य जीवन यांची अजिबात दखल न घेणारे असे आंतरिक प्रदीपन (illumination) हे फारसे उपयोगाचे नाही, कारण असे आंतरिक प्रदीपन जगाला ते जसे आहे तसेच सोडून देते. आजवर हे असेच घडत आले आहे. ज्यांना अगदी महान आणि शक्तिशाली साक्षात्कार झाला होता त्यांनीदेखील, आंतरिक शांतीमध्ये आणि स्थिरतेमध्ये कोणतीही बाधा येऊ नये म्हणून या जगापासून स्वतःला विलग केले होते; या जगाला आहे त्या परिस्थितीत सोडून दिले होते, त्यामुळे, दुःखकष्ट, मूर्खपणा, मृत्यू आणि अज्ञान यांवर कोणताही परिणाम न होता, त्या गोष्टी तशाच कायम राहिल्या; त्यांचे या भौतिक जगतावरील सार्वभौमत्व तसेच अबाधित राहिले. जे अशा तऱ्हेने या जगापासून विलग झाले होते त्यांच्यासाठी, या गडबडगोंधळापासून सुटका करून घेणे, अडचणींकडे पाठ फिरविणे आणि अन्यत्र एखादी आनंदी अवस्था शोधणे हे, सुखकर असू शकेल; पण ते या जगाला आणि जीवनाला आहे तशाच असुधारित आणि अरूपांतरित अवस्थेत सोडून जातात; आणि त्यांच्या स्वतःच्या बाह्य चेतनेलादेखील ते अरूपांतरित अवस्थेत सोडून जातात, आणि त्यांचे शरीरदेखील जसे होते तसेच, पुनरुज्जीवित न झालेल्या अवस्थेत ते सोडून जातात. परंतु जेव्हा या भौतिक जगात त्यांना परत यावे लागेल तेव्हा ते अगदी सामान्य माणसापेक्षादेखील सामान्य असू शकतात; कारण त्यांनी भौतिक वस्तुमात्रांवरील त्यांचे प्रभुत्व गमावलेले असते आणि त्यामुळे, त्यांचा जीवनव्यवहार विसंगत होण्याची तसेच येणाऱ्याजाणाऱ्या प्रत्येक शक्तीच्या दयेवर अवलंबून असण्याची शक्यता असते.

ज्यांचा हाच आदर्श आहे, त्यांच्यासाठी तो चांगला असू शकेल. परंतु हा आपला योग नाही. कारण आपल्याला या विश्वावर दिव्य विजय प्राप्त करून घ्यायचा आहे; या विश्वातील सर्व घडामोडी, गतीविधींवर विजय मिळवायचा आहे आणि इथेच त्या ‘ईश्वरा’चा साक्षात्कार घडवायचा आहे. परंतु ‘ईश्वरा’ने येथे राज्य करावे असे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्यापाशी जे काही आहे, आपण जे काही आहोत, आपण येथे जे काही करत असतो ते सारे ईश्वरार्पण केले पाहिजे. एखादी गोष्ट कमी महत्त्वाची आहे किंवा ‘बाह्य जीवन आणि त्याच्या आवश्यकता या दिव्य जीवनाचा भाग असू शकत नाहीत,’ असा विचार आपण करून चालणार नाही. आपण जर असा विचार केला तर आपण आजवर जेथे आहोत तेथेच राहू आणि मग या बाह्य जगतावर आपण कधीच विजय मिळवू शकणार नाही, चिरस्थायी असे आपण काहीही केलेले नसेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 24-25)