Posts

जीवाची उत्क्रांती किंवा जडाच्या पडद्यामधून बाहेर पडून क्रमश: आत्मशोध घेतघेत विकसित होणे, फुलून येणे हा पुनर्जन्माच्या सिद्धान्ताचा खरा आधार आहे……

पण या उत्क्रांतीचे प्रयोजन काय ? ….दिव्य ज्ञान, सामर्थ्य, प्रेम आणि शुद्धता यांच्या दिशेने होणारा सातत्यपूर्ण विकास हे ह्या उत्क्रांतीचे प्रयोजन असून ह्या गोष्टी हेच खरे तर गुण आहेत आणि हे गुण हेच त्याचे खरे बक्षीस होय.

आत्म्याच्या सर्वसमावेशक आलिंगनातील परमानंद आणि विश्वाविषयीचा जिव्हाळा यांपर्यंत जाऊन पोहोचू शकेल अशी सातत्याने वृद्धिंगत होत जाणारी क्षमता आणि प्रेमानंद हेच प्रेमाच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस असते. योग्य ज्ञानाच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस म्हणजे अनंत अशा प्रकाशामध्ये हळूहळू, क्रमाक्रमाने विकसित होत राहणे; योग्य शक्तीच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस म्हणजे दिव्य शक्तीमध्ये स्वत: अधिकाधिकपणे तळ ठोकणे आणि शुद्धतेच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस म्हणजे अहंकारापासून अधिकाधिक मोकळे होत होत, जेथे सर्व गोष्टी रूपांतरित होत, दिव्य समतेशी सममेळ पावतात त्या निष्कलंक व्यापकतेप्रत जाऊन पोहोचणे हे होय. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा बाळगणे म्हणजे स्वत:ला एक प्रकारच्या मूर्खतेशी आणि पोरकट अज्ञानाशी जखडून ठेवणे होय; वर उल्लेख केलेल्या गोष्टींव्यतिरिक्त इतर गोष्टींना बक्षीस समजणे हे अपरिपक्वतेचे आणि अपूर्णतेचे लक्षण आहे.

आणि मग दु:खभोग आणि आनंद, दुर्दैव आणि समृद्धी ह्यांचे काय ? ह्याचे उत्तर असे की : हे सर्व जीवाच्या प्रशिक्षणातील अनुभव असून ते त्याला त्याच्या घडणीमध्ये साहाय्य करतात, त्या गोष्टी टेकूसारख्या असतात, ती साधने असतात, त्या परीक्षा असतात, त्या अग्निपरीक्षा असतात आणि समृद्धी ही तर दुःखभोगापेक्षाही अधिक दुष्कर अशी अग्निपरीक्षा असते. खरेतर, आपत्ती, दुःखभोग याकडे पापाची शिक्षा म्हणून पाहण्यापेक्षा, त्यांच्याकडे गुणांचे पारितोषिक म्हणून पाहिले गेले पाहिजे. कारण उमलून येण्याची धडपड करू पाहणाऱ्या जीवाच्या दृष्टीने या गोष्टी त्याचे शुद्धीकरण घडविणाऱ्या आणि अत्यंत साहाय्यक ठरतात. दुःखभोग म्हणजे जणू न्यायाधीशाने दिलेले कठोर पारितोषिक किंवा दुःखभोग म्हणजे वैतागलेल्या सत्ताधीशाचा संताप आहे असे समजणे किंवा दुःखभोग म्हणजे वाईट कृत्याचा परिणाम म्हणून वाईट फळ मिळणे असे समजणे म्हणजे या विश्व-उत्क्रांतीच्या कायद्याविषयी आणि ईश्वराच्या जीवाबरोबरच्या संभाव्य व्यवहाराविषयी अगदीच वरवरचा दृष्टिकोन बाळगणे होय.

आणि मग ही भौतिक समृद्धी, वैभव, मुलेबाळे, कला, सौंदर्य, सत्ता ह्यांचा उपभोग ह्यांचे काय? तर, आपल्या आत्म्याला हानी न पोहोचता, जर त्या गोष्टी प्राप्त करून घेतल्या आणि आपल्या भौतिक अस्तित्वावर दिव्य आनंद व कृपा यांचा वर्षाव या भूमिकेतून त्यांचा आनंद घेतला तर त्या चांगल्या आहेत. त्या आपण प्रथमत: इतरांसाठी, खरंतर सर्वांसाठी मिळविण्याचा प्रयत्न करूयात; आपल्यासाठी त्या वैश्विक परिस्थितीचा केवळ एक अंशभाग असतील किंवा पूर्णत्व अधिक जवळ आणण्याचे ते केवळ एक साधन असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 267-268)

(पुनर्जन्म म्हणजे बक्षीस किंवा शिक्षा असते अशी समजूत असणारी माणसं कसा विचार करतात याविषयी श्रीअरविंद येथे सांगत आहेत.)

एखादा माणूस भला दिसतो आहे पण त्या माणसाकडे श्रीमंती, पैसे, भाग्य नसेल तर सर्वसामान्य माणसं असा समज करून घेतात की, तो गत जन्मामध्ये नीच असला पाहिजे; तो त्याच्या गुन्ह्यांची सजा ह्या जन्मामध्ये भोगत असला पाहिजे. पण केवळ अचानकपणे मातेच्या उदरात असताना त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे आणि तो भला म्हणून या जन्मात जन्माला आला आहे. आणि त्याचवेळी दुसरीकडे, जर एखाद्या दुष्ट माणसाची भरभराट होत आहे आणि जग त्याच्या पायाशी लोळण घेत आहे असे दिसले, तर (वरीलप्रमाणे विचार करणाऱ्या लोकांच्या लेखी,) तो त्याच्या गतजन्मातील चांगुलपणाचा परिणाम असतो. वास्तविक, एकेकाळी तो संतसत्पुरुष असणार पण त्याने सद्गुणांच्या मोठेपणाच्या क्षणिकतेचा अनुभव घेतला असेल आणि म्हणून तर त्याने ह्या जन्मी हा पापाचा पंथ स्वीकारला नसेल ना? (असा ते विचार करतात.) त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींचे स्पष्टीकरण असते, त्यांना सगळ्या गोष्टींचे समर्थन करता येते. आपण मागच्या जन्मात केलेल्या पापांमुळे दुःख भोगतो, ह्या जन्मातील गुणांचे आपल्याला पुढील जन्मी बक्षीस मिळणार आहे आणि हे असे अनंत काळपर्यंत चालत राहणार आहे; असे त्यांचे मत असते.

तत्त्वज्ञानी लोकांना मात्र ह्यात काही राम आढळत नाही आणि ते पाप आणि पुण्य या दोन्हींपासून स्वत:ची सुटका करून घ्यायला सांगतात आणि इतकेच नव्हे तर अद्भुतरित्या चालविल्या जाणाऱ्या या विश्वापासून सुटका करून घेणे, ह्यातच आपले भले आहे असे ते सांगतात, पण ह्यात काही नवल नाही.

हे उघड आहे की, ही विचारसरणी ही जुन्याच लौकिक-पारलौकिक लालूच आणि धमकी यांचे एक वेगळे रूप आहे; चांगल्या वागणुकीसाठी स्वर्गीय सुखांच्या लयलूटीची लालूच आणि दुष्प्रवृत्त माणसासाठी नरकातील शाश्वत आगीची वा पाशवी नरकयातनांची धमकी !

या जगताचे नियमन कोणा एका बक्षीस वा शिक्षा देणाऱ्या योजकाकरवी होत असते, ही यामागील कल्पना आहे. परमेश्वर हा जणू काही न्यायाधीश आहे, पिता आहे, किंवा परमेश्वर म्हणजे जणूकाही, वर्गातील गुणी मुलांना नेहमी लॉलिपॉप देणारा व खोडकर, वात्रट मुलांना दमात घेणारा कोणी शाळाशिक्षक आहे, ह्या कल्पनेशी सादृश्य राखणारी वरील कल्पना आहे.

सामाजिक गुन्हा केला की, त्याला अवमानित करणारी शिक्षा द्यावयाची, कधीकधी तर अगदी अमानुष अशी शिक्षा द्यावयाची, या रानटी आणि अविचारी विचारप्रणालीशी साधर्म्य राखणारी ही कल्पना आहे.

देवाच्या प्रतिमेनुसार स्वत:ला घडविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, आपल्या स्वत:च्या प्रतिमेमध्ये देवाला बसविण्यावर माणसाचा नेहमी भर असतो; परंतु या सर्व कल्पना म्हणजे आपल्यातील बालबुद्धीचे, आपल्यामध्ये असणाऱ्या रानटीपणाचे वा पशुचे प्रतिबिंब असते. आपण अजून त्यापलीकडे गेलो नाही किंवा आपल्यामध्ये रूपांतर घडवून आणू शकलो नाही, ह्याचेच ह्या कल्पना निदर्शक असतात….

ज्याअर्थी ह्या कल्पना इतक्या ठाशीवपणे आढळतात त्याअर्थी त्यांचा मानवाला घडविण्यामध्ये काही एक उपयोग असणार हे निश्चित. कदाचित असेदेखील असू शकेल की, अप्रगत जीवदशेतील लोकांबरोबर परमेश्वर त्यांच्या त्यांच्या बालीशतेला धरून व्यवहार करीत असेल; आणि मृत्युनंतरच्या जीवनाविषयीच्या वा पुनर्जन्माविषयीच्या, स्वर्गनरकाच्या त्यांच्या ज्या काही रोमांचकारी कल्पना असतात त्या कल्पना त्यांना बाळगू देण्यास तो संमती देत असेल. कदाचित मृत्युनंतरच्या जीवनाविषयीच्या आणि पुनर्जन्माविषयीच्या या बक्षीस व शिक्षेच्या कल्पना आवश्यक असतील, कारण त्या आपल्या अर्ध-मानसिक पशुतेशी मिळत्याजुळत्या होत्या. पण खरंतर, एका विशिष्ट दशेनंतर ही प्रणाली तितकीशी परिणामकारक ठरत नाही. माणसं स्वर्ग व नरक या कल्पनांवर विश्वास ठेवतात पण ….मृत्युशय्येवर पश्चात्ताप होईपर्यंत किंवा गंगातीरी जाऊन स्नान करेपर्यंत किंवा बनारसमध्ये पवित्र मरण येईपर्यंत खुशाल पापं करीत राहतात; (बालीशपणापासून सुटका करून घेण्याची ही सारी बालीश साधनं आहेत.)

पण सरतेशेवटी, मन परिपक्व बनते तेव्हा मग ह्या बालीश, शाळकरी उपायांना ते तिरस्काराने दूर करते. कारण ज्याच्यामध्ये दैवी क्षमता सामावलेली असते अशा मानवाने, केवळ बक्षीस मिळते म्हणून गुणवान होणे किंवा भयामुळे पापापासून दूर राहणे हे मानवण्यासारखे नाही…. कृपणा: फलहेतव: असे गीतेमध्ये यथार्थपणे म्हटले आहे. ह्या एवढ्या विशालकाय, प्रचंड अशा जगाची व्यवस्था ह्या असल्या क्षुद्र, क्षुल्लक प्रेरणांवर बसवली असेल, हे न पटण्यासारखे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 265-268)

…अशीही काही माणसं असतात, जी थोडंफार काही शिकलेली असतात, ती कमी अधिक प्रमाणात गूढवादी असतात वा पुनर्जन्मावर त्यांचा बालीश विश्वास असतो. त्यांना असे वाटते की अशी एक छोटीशी व्यक्ती असते की जी, भौतिकाचे वस्त्र पांघरते, म्हणजे शरीर धारण करते आणि जेव्हा हे वस्त्र गळून पडते तेव्हा ती निघून जाते आणि नंतर परत दुसरे वस्त्र पुन्हा धारण करते… जणू एखाद्या बाहुलीचे कपड़े बदलावेत त्याप्रमाणे. काही लोकांनी तर यावर अगदी गांभीर्याने त्यांच्या गतजीवनातील गोष्टी सांगणारी पुस्तके लिहिली आहेत, ते अगदी माकड होते तेव्हापासूनच्या जीवनातील गोष्टी; हा निव्वळ बालीशपणा आहे.

कारण हजारापैकी नऊशे नव्व्याणव वेळी, केवळ त्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असणारी एक छोटीशी चैत्य रचना मृत्यूनंतर कायम राहते, बाकी सर्व गोष्टी विरघळून जातात, तुकडेतुकडे होऊन इथे तिथे विखरून जातात आणि त्यांची व्यक्तिविशिष्टता, व्यक्ती त्यांची पृथागात्मता टिकून राहत नाही.

आत्ता, या भौतिक जीवनामध्ये, भौतिक व्यक्ती जे काही करीत आहे त्यामध्ये चैत्य पुरुष कितीवेळा सहभागी होतो ?… जे कोणी योगसाधना करतात, थोडेफार अनुशासित आहेत त्या माणसांविषयी येथे मी बोलत नाही; जीवनामध्ये मध्यस्थी करू शकेल, मार्गदर्शन करू शकेल इतपत ज्यांचा चैत्यपुरुष विकसित झालेला आहे, चैत्यपुरुषाची अशी क्षमता ज्यांच्यापाशी आहे अशा एकंदर माणसांविषयी मी बोलत आहे – काहींची वर्षच्या वर्षं कोणत्याही चैत्य मध्यस्थीविना जातात.

आणि तरीसुद्धा ते तुम्हाला येऊन सांगतात की, ते अमुक एका देशामध्ये जन्मले होते, त्यांचे आईवडील कसे होते, ते कोणत्या घरामध्ये राहायचे, त्यांच्या चर्चचे छप्पर कसे होते, त्यांच्या शेजारी कसे जंगल होते, जीवनातील अशा प्रकारच्या खूप साधारण गोष्टी, घटना.. या सर्व गोष्टी निव्वळ मूर्खतापूर्ण आहेत कारण त्या पूर्णतया पुसल्या जातात, त्या तशाच टिकून राहत नाहीत;

एखाद्या व्यक्तीमध्ये जीवनातील एखाद्या विशिष्ट अशा क्षणाची आठवण टिकून राहू शकते : जेव्हा काही खास अशी परिस्थिती असते, काही महत्त्वाचे क्षण असतात, असे क्षण की जेव्हा चैत्य अस्तित्वाने आकस्मिकपणे त्यामध्ये सहभाग घेतलेला असतो; आंतरिक हाकेपोटी वा आत्यंतिक निकडीपोटी चैत्य अस्तित्वाने आकस्मिकपणे हस्तक्षेप केलेला असतो अशा वेळी त्या क्षणाची स्मृती चैत्य स्मृतीमध्ये कोरल्यासारखी होते. जेव्हा तुमच्याकडे अशी चैत्य स्मृती असते तेव्हा तुम्हाला जीवनातील त्या क्षणाची परिस्थिती, विशेषत: आंतरिक भावना, त्या क्षणी सक्रिय असलेली जाणीव आठवते. आणि मग ती काही सहसंबंधांनिशी, तुमच्या अवतीभोवती जे होते त्यानिशी, एखादा उच्चारलेला शब्द, एखादा ऐकलेला वाक्प्रयोग यानिशी तुमच्या जाणिवेसोबत राहते. पण सर्वात महत्त्वाचे काय असेल तर ते म्हणजे, तुमचा आत्मा ज्या स्थितीमध्ये होता ती आत्म्याची स्थिती वा अवस्था; कारण ती अवस्थाच कोरल्याप्रमाणे स्पष्टपणे टिकून राहते. ह्याच चैत्य जीवनाच्या खाणाखुणा असतात, की ज्या गोष्टींचा खोल ठसा उमटलेला होता, त्याच्या घडणीमध्ये ज्यांचा सहभाग होता. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमच्या चैत्य अस्तित्वाचा सातत्याने, नेहमी, स्पष्टपणे असा शोध लागतो तेव्हा यासारख्या गोष्टीच तुम्हाला आठवतात.

या अगदी अल्पस्वल्प असू शकतात, पण त्या एखाद्याच्या आयुष्यातील चमकदार गोष्टी असू शकतात पण माणूस असे सांगू शकत नाही की, ”मी असा असा माणूस होतो, मी असे असे केले, मी या नावाने ओळखला जात होतो, मी असे करत असे, मी तसे करीत असे..”

अन्यथा, तारीख, स्थळ, देश, तो काळ हे सर्व सांगण्याइतपत परिस्थितीचे एकीकरण झाले असण्याची ती दुर्मिळ घटिका असली पाहिजे. असे घडू शकते. स्वाभाविकपणेच चैत्य जाणीवच त्यामध्ये अधिकाधिक अंशाने सहभागी होते आणि त्यातून स्मृतींचा साठा वाढत राहतो. अशा वेळी व्यक्तीला मागील जन्मांचे स्मरण होऊ शकते पण ते त्याच्या सर्व तपशीलानिशी नक्कीच नाही. व्यक्ती काही ठरावीक क्षणांविषयी असे म्हणू शकते, “हे असे असे होते” किंवा ‘मी अशी होते.” इ.

….पण येथे आवश्यकता कशाची आहे तर व्यक्तीचे अस्तित्व हे चैत्य पुरुषाशी पूर्णपणे एकात्म पावलेले असावे, व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्वच त्याच्याभोवती रचले गेले असावे, त्याचे संपूर्ण अस्तित्व – त्याच्या छोट्या छोट्या भागांसहित, सर्व घटकांसहित, व्यक्तित्वाच्या सर्व गतिविधी, हालचाली ह्या चैत्य केंद्राभोवती गुंफलेल्या असल्या पाहिजेत – या सर्वांनिशी एकसंध एकच एक असे, पूर्णत: ईश्वराभिमुख झालेले अस्तित्व तयार झाले असले पाहिजे; असे झाले असता, जेव्हा देह पडेल (मृत्यू येईल) तेव्हाही ते अस्तित्व टिकून राहील. पूर्णत: तयार झालेला जागृत जीवच अशा रीतीने गत जन्मामध्ये काय घडले होते ते नेमकेपणाने आठवू शकतो. त्याच्या जाणिवेतील काहीही न गमावता तो एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्येदेखील जागृतपणे जाऊ शकतो. या पृथ्वीवर अशा अवस्थेपर्यंत पोहोचलेले किती जीव असतील?… मला वाटते, फार नाहीत. आणि सहसा त्यांची ही साहसं सांगत बसण्यास असे जीव फारसे उत्सुक नसतात.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 32-34)

प्रश्न : आपल्यापैकी किती जणांना मागील जीवनांचे स्मरण आहे?

श्रीमाताजी : आपल्या चेतनेमधील काही भागांना स्मरण असते. पण हा खूप धोकादायक विषय आहे, कारण मानवी मनाला एकूणातच कल्पनारम्यतेची आवड असते. त्याला या पुनर्जन्माच्या सत्यतेविषयी माहिती मिळाल्याबरोबर, ते ताबडतोब त्याभोवती सुंदर कहाण्या रचू इच्छिते. अनेक जण तुम्हाला, हे जग कसे तयार झाले, ते भविष्यात कसे कसे प्रगत होणार आहे; तुम्ही गतजन्मांमध्ये कुठे आणि कसे जन्माला आला होतात आणि ह्या जन्मानंतर तुम्ही कसे असाल, तुम्ही आत्तापर्यंत कशा कशाप्रकारे जीवन जगले होतात आणि यानंतरची तुमची जीवने कशी असतील, याविषयी अद्भुत कहाण्या ऐकवतील. या सगळ्या गोष्टींचा आध्यात्मिक जीवनाशी काहीएक संबंध नाही.

गत जन्मांची खरीखुरी आठवण हा समग्र ज्ञानाचा खरोखरच भाग असू शकतो पण अशा प्रकारच्या कल्पनारम्यतेच्या मार्गाने ती स्मृती प्राप्त होत नाही. एका बाजूने जशी ती वस्तुनिष्ठ ज्ञान आहे, तद्वतच ती खाजगी आणि व्यक्तिनिष्ठ अनुभवावरही मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि इथेच नवकल्पना, विकृती वा मिथ्या कल्पनांच्या रचना यांना वाव मिळतो.

या गोष्टींच्या सत्याप्रत पोहोचावयाचे असेल तर, अनुभव घेणारी तुमची चेतना, जाणीव ही खूप शुद्ध, पारदर्शक, कोणत्याही प्राणिक वा मानसिक हस्तक्षेपापासून मुक्त, तुमची वैयक्तिक मते, भावना यांपासून मुक्त, गोष्टींचे स्वत:च्याच तऱ्हेने स्पष्टीकरण वा विवरण करण्याच्या मनाच्या सवयीपासून मुक्त पाहिजे. गत जन्मांचा अनुभव हा खरा असू शकतो, पण तुम्ही जे काही पाहिले असते ते आणि तुमचे मन त्याचे जे स्पष्टीकरण करते, वा रचना उभारते त्या दोन्हीमध्ये भलीमोठी दरी असण्याची नेहमीच शक्यता असते. जेव्हा तुम्ही मानवी भावभावनांच्या वर उठता, मनापासून वर उठता तेव्हाच तुम्ही त्याच्या सत्याप्रत पोहोचू शकता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 40-41)

प्रश्न : क्ष मला असे विचारत होता की, पुनर्जन्माच्या या मालिकेमध्ये एखादी स्त्री पुरुष म्हणून किंवा एखादा पुरुष स्त्री म्हणून जन्माला येऊ शकतो का? त्याच्यामध्ये आढळणाऱ्या बायकी लक्षणांचे स्पष्टीकरण ह्या प्रकारे करता येईल असे त्याला वाटते. मलापण असे जाणून घ्यायचे आहे की, चैत्य पुरुषाला लिंग अशी काही गोष्ट असते का ?

श्रीअरविंद : चैत्य पुरुषामध्ये लिंग अशी काही गोष्ट नसते, पण पुरुष किंवा स्त्री तत्त्व असे म्हणता येईल. पुरुष हा स्त्री म्हणून किंवा स्त्री ही पुरुष म्हणून पुन्हा जन्माला येऊ शकते का हा एक कठीण प्रश्न आहे. पुनर्जन्मामध्ये काही विशिष्ट धागा पाळला जातो आणि माझा अनुभव तसेच सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, एखादा जीव सहसा (स्त्री तर स्त्री किंवा पुरुष तर पुरुष) असा एकाच प्रकारचा धागा पकडतो. पण लिंगामध्ये बदल ही गोष्ट अशक्य आहे असे मात्र म्हणता येणार नाही.

असेही काही असतात की, जे एका आड एक यापद्धतीने जन्म घेतात. पुरुषामध्ये बायकी लक्षणे आढळली तर तेवढ्यावरून तो गेल्या जन्मी स्त्री होता, असे काही खात्रीशीररित्या सांगता येत नाही. विविध शक्तींच्या खेळामधून आणि त्यांच्या विविध रचनांमधून अशी लक्षणे दिसून येऊ शकतात. अशीही काही गुणवैशिष्ट्ये असतात की, जी दोन्ही लिंगांमध्ये समान असतात. स्वतःचे नसलेले असे एखादे मानसिक व्यक्तिमत्त्व, त्याचा अंशभाग हा जन्माच्या वेळी त्या व्यक्तीशी सहसंबंधित झालेला असू शकतो. ….पुनर्जन्म ही गुंतागुंतीची गोष्ट आहे आणि त्याविषयीची जी प्रचलित कल्पना आहे तितकी त्याची यंत्रणा साधीसोपी नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 548-549)

पुनर्जन्म या विषयाबद्दलची नेहमी होणारी एक सर्वसाधारण घोडचूक तुम्ही टाळली पाहिजे. कोणी एक ‘टायटस बाल्बस’ हा ‘जॉन स्मिथ’ म्हणून पुन्हा जन्म घेतो, म्हणजे तो माणूस मागील जन्मात होता अगदी त्याच व्यक्तिमत्त्वानिशी, त्याच चारित्र्याचा, तेच प्राप्तव्य लाभलेला असा जन्माला येतो; फरक इतकाच की आधी तो टोगा परिधान करावयाचा आणि आता तो कोटपँट वापरतो आणि लॅटिन भाषेऐवजी कॉकनी इंग्रजी भाषा बोलतो; अशी सर्वसाधारणपणे समजूत असते. पण हे असे काही नसते.

काळाच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत या भूतलावर तेच ते एकच व्यक्तिमत्त्व, तेच चारित्र्य पुन्हा पुन्हा धारण करण्यात फायदा काय? आत्मा हा अनुभव घेण्यासाठी, वाढीसाठी, उत्क्रांत होण्यासाठी जन्माला येतो; जडद्रव्यामध्ये ईश्वरत्व आणेपर्यंत हे विकसन चालू राहावयाचे असते. केंद्रात्मा पुन्हा जन्माला येत असतो; बाह्य व्यक्तिमत्त्वाचा पुनर्जन्म होत नाही…

व्यक्तिमत्त्व म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, त्या एका जन्मातील अनुभव घेण्यासाठी बनविण्यात आलेला निव्वळ एक साचा असतो. दुसऱ्या एका वेगळ्या जन्मामध्ये तो चैत्य पुरुष स्वत:साठी एक वेगळे व्यक्तिमत्त्व, वेगळ्या क्षमता, वेगळे जीवन आणि वेगळी कारकीर्द घडवेल. जर समजा, रोमन कवी व्हर्जिल हा परत जन्माला आला, तर तो एक किंवा दोन जन्मामध्ये परत काव्य हाताशी धरेलही, पण तो निश्चितपणे महाकाव्य लिहिणार नाही, तर त्याला ज्या पद्धतीच्या ललित, सुंदर रचना लिहावयाची इच्छा होती, पण रोममध्ये असताना तो त्या लिहू शकला नव्हता, तशा तो लिहील. पुढच्या एखाद्या जन्मामध्ये तो अजिबातच कवी नसेल, कदाचित तो सर्वोच्च सत्य अभिव्यक्त करू पाहणारा, आणि त्याच्या सिद्धीसाठी धडपडणारा तत्त्वज्ञानी, योगी असेल – कारण या गोष्टींकडेसुद्धा त्याच्या जाणिवेचा सुप्त कल होता. कदाचित आपल्या काव्यामधून त्याने ज्या एनियन वा ऑगस्टसचे वर्णन केले आहे त्यांच्यासारखा तो कोणी योद्धा वा सत्ताधीश आधीच्या जन्मात असू शकेल.

केंद्रात्मा या वा त्या अंगाने एक नवीन चारित्र्य, एक नवीन व्यक्तिमत्त्व वाढवतो, विकसित करतो आणि तो सर्व प्रकारच्या पार्थिव अनुभवांमधून जात राहतो. उत्क्रांत होणारा जीव जसजसा अधिकाधिक विकसित होत जातो, अधिकाधिक संपन्न आणि जटिल होत जातो, तसतसा आपली सर्व व्यक्तिमत्त्वं जणू तो साठवत जातो. कधीकधी ती व्यक्तिमत्त्वं त्याच्या सक्रिय घटकांच्या पाठीशी उभी असतात, त्याच्या दर्शनी व्यक्तिमत्त्वामध्ये, त्या व्यक्तिमत्त्वांचा काही रंग, काही गुणधर्म, काही क्षमता इथेतिथे अशा आढळून येतात – कधीकधी तर त्या अगदी पृष्ठवर्ती येतात आणि मग अशा व्यक्तीची विविधांगी व्यक्तिमत्त्वं आढळतात, ती व्यक्ती बहुआयामी असते, कधीकधी तर असे भासते की, त्या व्यक्तीच्या ठिकाणी वैश्विक क्षमता आहेत.

पण जर का आधीचेच व्यक्तिमत्त्व, आधीचीच क्षमता पूर्णत: पुढ्यात आणण्यात आली, तर आधी जे केले होते तेच करण्यासाठी ती व्यक्ती पुन्हा तशीच येणार नाही; तर नवीन आकारात, नवीन रूपात तीच क्षमता अभिव्यक्त होईल, पण असे करताना जे आधी अस्तित्वात होते, त्याचेच केवळ पुनरुत्पादन असे त्याचे स्वरूप असणार नाही; तर अस्तित्वाच्या एका नवीन सुमेळामध्ये त्यांचे सामावून जाणे असेल.

तेव्हा तुम्ही अशी अपेक्षा बाळगता कामा नये की, आधीचा योद्धा, आधीचा कवी त्यांच्या बाह्य व्यक्तिवैशिष्ट्यांनिशी जसाच्या तसा पुन्हा येईल – हां, असे असू शकते की, त्याच्या बाह्य गुणवैशिष्ट्यांपैकी काही पुन्हा नवीन जन्मामध्येही दिसून येतील; पण ती गुणवैशिष्ट्ये एका नवीन गुणसम्मुचयामध्ये नव्याने प्रतिबिंबित झालेली असतील. पूर्वी जे केले नव्हते ते करण्यासाठी एका नव्या दिशेने सर्व शक्ती कामाला लावल्या जातील. आणखी एक गोष्ट अशी की, पुनर्जन्मामध्ये व्यक्तिमत्त्व, चारित्र्य ह्याला प्राधान्याने महत्त्व असत नाही. प्रकृतीच्या उत्क्रांतीच्या पाठीमागे चैत्य पुरुष असतो आणि तोच उत्क्रांत होत असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 543-544)

पुनर्जन्माच्या बाबतीत बोलायचे झाले तर हे मान्य करावे लागेल की, सर्व बाबतीत एकसारखाच नियम लागू होत नाही. काही लोकं मृत्युनंतर लगेचच जन्माला येतात – जर मुले त्यांच्या पालकांशी खूपच अनुबद्ध (attached) असतील तर बरेचदा अशा पालकांमधील काही भाग हा त्यांच्या मुलांमध्ये सामावला जातो. काही लोकांना मात्र, पुन्हा जन्माला येण्यासाठी शतकं आणि कधीकधी तर हजारो वर्षेही लागतात. त्यांच्यासाठी सुयोग्य असे माध्यम त्यांना लाभावे म्हणून, परिस्थिती परिपक्व होण्यापर्यंत ते थांबून राहतात.

जर एखादी व्यक्ती ही योगिक दृष्ट्या प्रगल्भ असेल तर, ती व्यक्ती पुढच्या जन्मातील स्वतःचा देह देखील (स्वत:च) घडवू शकते. ते शरीर जन्माला येण्यापूर्वी ती व्यक्ती त्याला आकार देते, साचा तयार करते, त्यामुळे त्याचा खराखुरा निर्माता ती व्यक्तीच असते, अशा वेळी या नवजात बालकाचे पालक हे आगंतुक, केवळ शारीरिक साधन असतात.

मला येथे सांगितले पाहिजे की, पुनर्जन्माबाबत काही गैरसमजुती सर्वसाधारणपणे आढळतात. व्यक्तीच्या अस्तित्वाचे काही घटक हे इतरांबरोबर सम्मीलित होतात आणि नवीन देहांच्या माध्यमातून कार्य करू लागतात, हे जरी खरे असले तरी लोकांची ही जी समजूत असते की, ते तसेच पुन्हा जन्माला येतात, ती मात्र घोडचूक आहे.

त्यांचे संपूर्ण अस्तित्व हे काही परत जन्माला येत नाही, कारण एवढेच की ‘स्वत:’ असे ते ज्याला खरोखर समजत असतात, ते त्यांचे खऱ्या अर्थाने पृथक झालेले असे व्यक्तित्व नसते; तर त्यांच्या बाह्य व्यक्तिमत्त्वालाच, नाम रूपात्मक व्यक्तिमत्त्वालाच ते ‘स्व’ असे समजत असतात. म्हणून ‘अ’ हा पुन्हा ‘ब’च्या रूपाने जन्माला आला असे म्हणणे चुकीचे आहे; कारण अ ही व्यक्ती ब ह्या व्यक्तीपासून ऐंद्रियदृष्टया भिन्न असते; त्यामुळे ब म्हणून ती जन्माला आली असे म्हणता येत नाही. जर तुम्ही असे म्हणाल की, चेतनेच्या एकाच धाग्याने, त्याच्या आविष्करणासाठी अ आणि ब यांचा साधन म्हणून उपयोग केला, तर आणि तरच ते म्हणणे योग्य ठरेल. कारण जे कायम टिकून राहते ते चैत्य अस्तित्व असते, बाह्य व्यक्तिमत्त्व म्हणजे काही चैत्य अस्तित्व नव्हे, बाह्य नाव वा रूप असणारे असे काही तरी म्हणजे चैत्य अस्तित्व नव्हे, तर चैत्य अस्तित्व हे खोल अंतरंगात असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 145-146)

जर उत्क्रांती हे सत्य असेल; ती जीवजातांची केवळ शारीरिक उत्क्रांती नसेल, पण जर का ती चेतनेची उत्क्रांती असेल, तर ती केवळ भौतिक वस्तुस्थिती असू शकत नाही, ती आध्यात्मिकच असावयास हवी. अशा परिस्थितीत, व्यक्तीच उत्क्रांत होते, अधिकाधिक विकसित आणि पूर्ण जाणिवसंपन्नतेमध्ये वृद्धिंगत पावत जाते आणि अर्थातच ही गोष्ट माणसाच्या एका तोकड्या जीवनामध्ये घडून येणे शक्य नाही.

जाणीवयुक्त व्यक्तीची उत्क्रांती जर व्हावयाची असेल तर, त्यासाठी पुनर्जन्म आवश्यकच आहे. पुनर्जन्म ही तार्किकदृष्ट्या आवश्यक गोष्ट आहे आणि ती अशी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे की जिचा आपण अनुभव घेऊ शकतो. पुनर्जन्माचे पुरावे, कधीकधी तर अगदी खात्रीलायक पुरावे आढळतात, त्यांचा तुटवडा नाही पण एवढेच की, आजवर त्यांच्या काळजीपूर्वक नोंदी झालेल्या नाहीत आणि त्या आजवर एकत्रित केल्या गेलेल्या नाहीत.

– श्रीअरविंद

प्रश्न : माताजी, आपण पुनर्जन्मावर विश्वास का ठेवतो?

श्रीमाताजी : ज्यांना गत जीवनांचे स्मरण आहे त्यांनी पुनर्जन्म ही वस्तुस्थिती असल्याचे घोषित केले आहे. आत्ताच्या देहामध्ये असलेली ही चेतना, याआधीच्या जन्मांमध्ये इतर देहांद्वारेही अभिव्यक्त झालेली होती आणि या देहाच्या अंतानंतरही ती टिकून राहणार आहे, हे जाणण्याइतपत ज्यांच्या आंतरिक चेतनेचा विकास झाला आहे, असे आजवर पुष्कळ जण होऊन गेले आणि अजूनही आहेत. ‘पुनर्जन्माचा सिद्धान्त’ चर्चा करत बसावी असा विषय नाही, तर ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यांच्यासाठी तो वादातीत असा विषय आहे.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 400)

*

शिष्य : एका विधानाची सध्या इथे चर्चा आहे. त्यात असे म्हटले आहे की, “नुकतेच ह्या विजयाच्या बरोबरीने जे काही घडले आहे, ते केवळ अवतरण नव्हते तर ते आविष्करण होते. आणि एखाद्या व्यक्तिगत घटनेपेक्षा त्याचे मोल अधिक आहे : कारण अतिमनाचा वैश्विक लीलेमध्ये उदय झालेला आहे.”

श्रीमाताजी : हो, हो. खरंतर मीच हे सारे म्हटले होते.

शिष्य : ते म्हणतात की, अतिमानस तत्त्व आता कार्यरत झाले आहे…

श्रीमाताजी : ….प्रथम जाणिवेचे आरोहण होते, नंतर जाणीव तेथील ‘सद्वस्तु’ ग्रहण करते आणि तिला घेऊन खाली येते. ही ‘व्यक्तिगत’ घटना असते. मी ह्याला ‘अवतरण’ म्हणते.

परंतु, हीच व्यक्तिगत घटना जेव्हा अशा रीतीने घडून येते की, ज्यामुळे सार्वत्रिक स्तरावरील शक्यता निर्माण होण्यास ती पुरेशी आहे असे सिद्ध होते, तेव्हा ते केवळ ‘अवतरण’ नसते तर ते ‘आविष्करण’ असते.

ज्याला मी अवतरण म्हणते ती व्यक्तीच्या जाणिवेमध्ये घडून आलेली, व्यक्तिगत क्रिया असते. पण जर उदाहरणच द्यावयाचे झाले तर, जेव्हा मन या पृथ्वीतलावर प्रसृत झाले होते त्याप्रमाणे, या जुन्या विश्वामध्ये, एखादे नवीनच विश्व आविष्कृत होते, तेव्हा त्याला मी ‘आविष्करण’ म्हणते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 133)