Posts

देहधारी जीव, आज आहे त्याच शरीरामध्ये कोणत्याही बदलाच्या आवश्यकतेशिवाय प्रगती करू शकेल, इतपत आजवर विकसित झालेला नाहीये; आणि त्यामुळेच मृत्यूचे अस्तित्व आहे. तसेच खुद्द हे शरीरदेखील अजून पुरेसे जागृत झालेले नाही.

मन आणि प्राण आणि शरीर जर स्वतःच अधिक सचेत व अधिक लवचीक असते तर मृत्युची आवश्यकताच नव्हती.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 313-314)

प्रश्न : शारीरिक देह हा संरक्षण म्हणून कशा रितीने कार्य करतो?

ज्या जडतेबद्दल आपण आपल्या देहाला नावं ठेवत असतो त्या त्याच्या जडतेमुळेच हा शारीरिक देह संरक्षणाचे काम करत असतो. शरीर सुस्त, असंवेदनशील, निबर, अलवचीक आणि कठीण असते; बाजूने मजबूत तटबंदी असलेल्या गडकोटाप्रमाणे ते असते. तर प्राणिक जगत मात्र द्रवरूप असते, त्यातील गोष्टी प्रवाही असतात, त्या एकमेकांत मिसळत असतात, त्या परस्परांमध्ये प्रविष्ट होत असतात; समुद्राच्या लाटा ज्याप्रमाणे अखंडपणे एकमेकींमध्ये मिसळत असतात, बदलत असतात, त्यांची घुसळण होत असते त्या लाटांप्रमाणे हे सारे असते. तुम्ही जर अतिशय शक्तिशाली अशा आंतरिक प्रकाशाने आणि शक्तीने या प्राणिक जगताचा विरोध करू शकला नाहीत तर, त्याच्या या प्रवाहीपणासमोर तुम्ही संरक्षणविहीन असता; अन्यथा ते तुमच्यामध्ये आतपर्यंत जाऊन मिसळते आणि त्या आक्रमक प्रभावाला थोपवू शकेल असे तुमच्याकडे काहीच नसते. परंतु देह हस्तक्षेप करतो, देह तुम्हाला प्राणिक जगतापासून तोडतो, अलग ठेवतो. त्या जगताच्या शक्तींच्या पूरापासून रोखणारा देह म्हणजे जणू एक धरणच असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 48)

मृत्युनंतर काही कालावधी असा असतो की जेव्हा जीवात्मा प्राणिक जगतामधून (vital world) जातो आणि तेथे काही काळ राहतो. या संक्रमणाचा केवळ पहिला भागच काहीसा भयंकर वा वेदनादायी, यातनामय असू शकतो. देहामध्ये असताना त्याच्या ज्या प्राणिक वासना आणि सहजप्रवृत्ती होत्या, त्यातील शिल्लक राहिलेल्या गोष्टींवर, विशिष्ट अशा परिस्थितीत, उरलेल्या काळात तो काम करतो.

ज्या क्षणी तो या साऱ्याने थकून जातो आणि याही पलीकडे जाण्याची त्याची तयारी होते, त्या क्षणी लगेचच त्याचा प्राणमय कोष गळून पडतो. त्यानंतर, मानसिक अवशेषांपासून (mental survivals) सुटका करून घेण्यासाठी जो थोडा कालावधी लागतो, त्या कालावधीनंतर चैत्य जगतात (psychic world) विश्रांत अवस्थेत जाण्यासाठी जीवात्मा निघून जातो आणि पृथ्वीवरील पुढील जन्म येईपर्यंत तो तेथे राहतो.

एखादी व्यक्ती तिच्या सदिच्छेद्वारे किंवा जर तिला गूढ मार्गाचे ज्ञान असेल तर त्या माध्यमातून त्या जीवात्म्याला साहाय्य करू शकते.

त्याच्याविषयी शोक करून किंवा त्याच्यामध्ये मनाने गुंतून राहून किंवा ज्यामुळे तो खाली, या भूलोकाजवळ खेचला जाईल अशी कोणतीही गोष्ट करून आपण त्याला बांधून ठेवू नये किंवा विश्रांतीस्थळाकडे होणारा त्याचा प्रवास लांबवू नये.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 529-530)

मृत्युबद्दल शोक करण्यासारखे काहीच नाही कारण मृत्यू म्हणजे केवळ एका प्रांतांतून दुसऱ्या प्रांतांत जाण्यासारखे आहे – की कदाचित जिथे तुम्ही बरेचदा गाढ झोपेमध्ये असताना जात असता.

*

… मृत्यू म्हणजे वैयक्तिक अस्तित्वाची समाप्ती नव्हे तर मृत्यू म्हणजे केवळ देह सोडणे होय, हे खरे वास्तव आहे. माणसाचा मृत्यू होत नाही कारण तो एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जातो आणि तेथील वातावरणानुसार कपडे बदलतो.

*

जे काही घडले आहे त्याचा आता शांतपणे स्वीकार केला पाहिजे कारण घटना घडून गेली आहे. मानवी दृष्टीला – जी फक्त वर्तमान व बाह्य दृश्यच पाहत असते तिला – ते चांगले वाटले नाही तरी आत्म्याच्या एका जीवनाकडून दुसऱ्या जीवनाकडे होणाऱ्या वाटचालीसाठी तेच सर्वोत्तम असते. अध्यात्म-साधकासाठी मृत्यू म्हणजे जीवनाच्या एका रूपाकडून दुसऱ्या रूपाकडे जाणारा फक्त एक मार्ग आहे आणि म्हणून कोणाचा मृत्यू झालेला नसतो, तर ते केवळ प्रस्थान आहे; या दृष्टीने मृत्युकडे पाहा…

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 529)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३३

पूर्णयोगाच्या प्रक्रियेच्या तीन अवस्था आहेत; त्या एकमेकींपासून वेगळ्या ओळखता येण्यासारख्या नाहीत किंवा त्या पूर्ण वेगळ्याही नाहीत; परंतु त्या एका विशिष्ट प्रमाणात क्रमबद्ध आहेत.

प्रथम, स्वतःच्या अतीत जाण्याची आणि ईश्वराशी संपर्क साधण्याची पात्रता येण्यासाठी किमान अगदी प्राथमिक प्रयास केले पाहिजेत ही पहिली पायरी. जे अतीत आहे आणि ज्याच्याशी आपण ऐक्य साध्य केले आहे त्याचा, आपले समग्र जाणीवयुक्त अस्तित्व रूपांतरित व्हावे म्हणून आपण आपल्या स्वतःमध्ये स्वीकार करणे ही दुसरी पायरी; आणि या रूपांतरित मनुष्यत्वाचा दिव्य कार्यकेंद्र म्हणून विश्वात उपयोग करणे, ही तिसरी पायरी होय.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 58)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २६

पूर्णयोगामध्ये समग्र जीवन हे, अगदी बारीकसारीक तपशिलासहित रूपांतरित करायचे असते, ते दिव्यत्वामध्ये परिवर्तित करायचे असते.

इथे कोणतीच गोष्ट निरर्थक नसते आणि कोणतीच गोष्ट क्षुल्लक नसते. “जेव्हा मी ध्यानधारणा करत असेन, जेव्हा तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत असेन किंवा (आध्यात्मिक) चर्चा ऐकत असेन तेव्हा मी प्रकाशाभिमुख अशा उन्मीलित स्थितीत राहीन आणि प्रकाशाप्रत आवाहन करेन; पण जेव्हा मी फिरायला बाहेर पडेन किंवा मी जेव्हा मित्रांना भेटेन तेव्हा मात्र हे सारे विसरून गेलो तरी चालेल,” असे तुम्ही म्हणू शकत नाही. जर तुम्ही अशा तऱ्हेचाच दृष्टिकोन ठेवलात तर त्याचा अर्थ असा होईल की, तुम्ही तसेच अरूपांतरित राहाल आणि मग तुम्ही ईश्वराशी खरेखुरे एकत्व कधीच साधू शकणार नाही. फार फार तर तुम्हाला उच्चतर जीवनाची थोडीफार झलक पाहायला मिळेल. परंतु तुम्ही नेहमीच ईश्वरापासून विभक्त राहाल.

तुमच्या ध्यानावस्थेत किंवा तुमच्या आंतरिक चेतनेमध्ये तुम्हाला काही अनुभव आले किंवा काही साक्षात्कार झाले तरीही तुमचे शरीर आणि तुमचे बाह्य जीवन मात्र तसेच अपरिवर्तित राहिलेले असेल. शरीर आणि बाह्य जीवन यांची अजिबात दखल न घेणारे असे आंतरिक प्रदीपन (illumination) हे फारसे उपयोगाचे नाही, कारण असे आंतरिक प्रदीपन जगाला ते जसे आहे तसेच सोडून देते. आजवर हे असेच घडत आले आहे. ज्यांना अगदी महान आणि शक्तिशाली साक्षात्कार झाला होता त्यांनीदेखील, आंतरिक शांतीमध्ये आणि स्थिरतेमध्ये कोणतीही बाधा येऊ नये म्हणून या जगापासून स्वतःला विलग केले होते; या जगाला आहे त्या परिस्थितीत सोडून दिले होते, त्यामुळे, दुःखकष्ट, मूर्खपणा, मृत्यू आणि अज्ञान यांवर कोणताही परिणाम न होता, त्या गोष्टी तशाच कायम राहिल्या; त्यांचे या भौतिक जगतावरील सार्वभौमत्व तसेच अबाधित राहिले. जे अशा तऱ्हेने या जगापासून विलग झाले होते त्यांच्यासाठी, या गडबडगोंधळापासून सुटका करून घेणे, अडचणींकडे पाठ फिरविणे आणि अन्यत्र एखादी आनंदी अवस्था शोधणे हे, सुखकर असू शकेल; पण ते या जगाला आणि जीवनाला आहे तशाच असुधारित आणि अरूपांतरित अवस्थेत सोडून जातात; आणि त्यांच्या स्वतःच्या बाह्य चेतनेलादेखील ते अरूपांतरित अवस्थेत सोडून जातात, आणि त्यांचे शरीरदेखील जसे होते तसेच, पुनरुज्जीवित न झालेल्या अवस्थेत ते सोडून जातात. परंतु जेव्हा या भौतिक जगात त्यांना परत यावे लागेल तेव्हा ते अगदी सामान्य माणसापेक्षादेखील सामान्य असू शकतात; कारण त्यांनी भौतिक वस्तुमात्रांवरील त्यांचे प्रभुत्व गमावलेले असते आणि त्यामुळे, त्यांचा जीवनव्यवहार विसंगत होण्याची तसेच येणाऱ्याजाणाऱ्या प्रत्येक शक्तीच्या दयेवर अवलंबून असण्याची शक्यता असते.

ज्यांचा हाच आदर्श आहे, त्यांच्यासाठी तो चांगला असू शकेल. परंतु हा आपला योग नाही. कारण आपल्याला या विश्वावर दिव्य विजय प्राप्त करून घ्यायचा आहे; या विश्वातील सर्व घडामोडी, गतीविधींवर विजय मिळवायचा आहे आणि इथेच त्या ‘ईश्वरा’चा साक्षात्कार घडवायचा आहे. परंतु ‘ईश्वरा’ने येथे राज्य करावे असे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्यापाशी जे काही आहे, आपण जे काही आहोत, आपण येथे जे काही करत असतो ते सारे ईश्वरार्पण केले पाहिजे. एखादी गोष्ट कमी महत्त्वाची आहे किंवा ‘बाह्य जीवन आणि त्याच्या आवश्यकता या दिव्य जीवनाचा भाग असू शकत नाहीत,’ असा विचार आपण करून चालणार नाही. आपण जर असा विचार केला तर आपण आजवर जेथे आहोत तेथेच राहू आणि मग या बाह्य जगतावर आपण कधीच विजय मिळवू शकणार नाही, चिरस्थायी असे आपण काहीही केलेले नसेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 24-25)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २३

आमचा योग हा रूपांतरणाचा योग आहे; हे रूपांतरण म्हणजे संपूर्ण चेतनेचे रूपांतर आहे; तसेच ते संपूर्ण प्रकृतीचे, तिच्या मस्तकापासून ते पायापर्यंत, तिच्या अगदी गुप्त आंतरिक घटकांपासून, ते तिच्या अगदी दृश्य बहिर्वर्ती हालचालींपर्यंतच्या प्रत्येक भागाचे रूपांतर आहे. हा बदल काही केवळ नैतिक नाही किंवा ते धार्मिक परिवर्तन नव्हे, किंवा संतत्व वा संन्यासमार्गी संयमदेखील नव्हे, उदात्तीकरण नाही किंवा, जीवनाचे व प्राणिक प्रवृत्तींचे दमनही आम्हाला अभिप्रेत नाही; किंवा ते काही गौरवीकरण नाही, अथवा कठोर असे नियंत्रणदेखील नाही; किंवा भौतिक अस्तित्वालाच नकार देणेही, अभिप्रेत नाही. अल्पतेकडून अधिकतेकडे, कनिष्ठाकडून उच्चतेकडे, पृष्ठवर्ती जाणिवेकडून सखोल चेतनेप्रत होणारा बदल आम्हाला अभिप्रेत आहे. सर्वाधिक महान, सर्वोच्च, सखोलतम असे संभाव्यकोटीतील रूपांतर आम्हाला अभिप्रेत आहे. तसेच समग्र अस्तित्वाचे त्याच्या साधनसामग्रीनिशी संपूर्ण परिवर्तन आणि क्रांती अभिप्रेत आहे; प्रत्येक तपशीलाचे अस्तित्वाच्या आजवर प्रत्यक्षीभूत न झालेल्या दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर होणे, हे आम्हाला अभिप्रेत आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 371)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २२

केवळ अतिमानव बनण्याच्या कल्पनेने या योगाकडे वळणे ही प्राणिक अहंकाराची कृती ठरेल आणि त्यामुळे या योगाचे मूळ उद्दिष्टच निष्फळ ठरेल. जी माणसे त्यांच्या सर्व क्रियाकलापांसमोर हे उद्दिष्ट ठेवतात त्यांना अपरिहार्यपणे आध्यात्मिक आणि अन्य दु:खं सहन करावी लागतात. विभक्तकारी अहंकाराचे दिव्य चेतनेमध्ये विलयन करून, त्या द्वारे दिव्य चेतनेमध्ये प्रथम प्रवेश करणे (त्या अनुषंगाने, म्हणजे असे करत असताना, व्यक्तीला स्वतःच्या खऱ्या व्यक्तिगत ‘स्व’चा शोध लागतो; हा ‘स्व’ म्हणजे मर्यादित, निरर्थक आणि स्वार्थी मानवी अहंकार नसतो तर, तो ईश्वराचा अंश असतो.) आणि दुसरे म्हणजे, मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करण्यासाठी म्हणून अतिमानसिक चेतना या पृथ्वीवर अवतरित करणे हे या योगाचे ध्येय आहे. बाकी सर्व गोष्टी या दोन ध्येयांचे परिणाम असू शकतात, परंतु त्या या योगाचे मुख्य उद्दिष्ट असू शकत नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 21)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १९

आत्म्याचा साक्षात्कार आणि विश्वपुरुषाचा साक्षात्कार या आपल्या योगातील आवश्यक पायऱ्या आहेत; (विश्वपुरुषाच्या साक्षात्काराविना आत्म्याचा साक्षात्कार अपूर्ण असतो.) इतर योगांची तेथे परिसमाप्ती होते, परंतु हीच जणू आपल्या योगाची सुरुवात असते; म्हणजे हाच तो टप्पा असतो जेथे (पूर्ण)योगाच्या वैशिष्ट्यपूर्ण साक्षात्काराचा आरंभ होऊ शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 334)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १६

आपल्या समग्र अस्तित्वाने त्याच्या सर्व घटकांसहित आणि आपल्या अस्तित्वाने सर्वथा, ‘दिव्य सद्वस्तु’च्या समग्र चेतनेमध्ये प्रविष्ट होणे आणि आपल्या जीवात्म्याने व तत्त्वाने आपण वास्तविक जे आहोत, त्या ‘दिव्य सद्वस्तु’चे साधन आणि आविष्करण बनावे म्हणून, आपल्या वर्तमान अज्ञानी आणि मर्यादित प्रकृतीचे दिव्य प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविणे, हीच आपल्या अस्तित्वाची परिपूर्ण परिपूर्ती आहे आणि हाच ‘पूर्णयोग’ आहे.

विचारी मनाच्या मार्गाने, किंवा हृदयाच्या मार्गाने किंवा कर्मामधील इच्छेच्या मार्गाने किंवा मानसिक प्रकृति-द्रव्याच्या परिवर्तनाद्वारे किंवा देहांतर्गत असलेली प्राण-शक्ती (Vital force) मुक्त करून, त्या दिव्यत्वामध्ये प्रविष्ट होणे पुरेसे नाही; हे एवढेच पुरेसे नाही. या साऱ्या गोष्टी एकत्रितपणे करून ते परिवर्तन घडविले पाहिजे. आणि खुद्द आपल्या इंद्रियांमधील तसेच शारीर-चेतनेमधील, अगदी जडभौतिक अचेतनापर्यंतच्या परिवर्तनाद्वारे, सर्वकाही त्या ‘ईश्वरा’विषयी सजग आणि त्या ईश्वरासमवेत दीप्तिमान झालेच पाहिजे. ईश्वराशी ऐक्य पावणे, ईश्वरामध्ये आणि त्याच्यासोबत जगणे, ईश्वरासमवेत त्याच्या प्रकृतीचेच होणे, हे आपल्या योगाचे उद्दिष्ट असले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 356-357)