Posts

साधनेची मुळाक्षरे – २१

एक गोष्ट अगदी एक क्षणभरसुद्धा विसरू नका की, हे सारे त्या परमेश्वराने निर्माण केले आहे, ‘त्या’ने ते स्वतःमधूनच निर्माण केलेले आहे. ‘तो’ या साऱ्यांमध्ये फक्त उपस्थितच आहे असे नाही तर, ‘तो’ स्वतःच हे सारेकाही आहे. केवळ अभिव्यक्ती आणि आविष्करण यामध्ये एवढाच काय तो फरक आहे.

तुम्ही ही गोष्ट विसरलात तर, सर्वकाही गमावून बसाल.

*

साधक : ‘ईश्वर’ सर्व वस्तुमात्रांमध्येच, म्हणजे अगदी कचरापेटीमध्ये देखील असतो का?

श्रीमाताजी : हे संपूर्ण विश्व ‘ईश्वरा’चे आविष्करण आहे, परंतु या आविष्करणाचा प्रारंभ उगमाशी असलेल्या अगदी अचेतनतेपासून होतो आणि तेथून ते या चेतनेप्रत हळूहळू उन्नत होत राहते.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 05)

साधनेची मुळाक्षरे – २०

शारीरिक किंवा भौतिक स्तरावर ‘ईश्वर’ स्वतःला सौंदर्याद्वारे अभिव्यक्त करतो; मानसिक स्तरावर ज्ञानाद्वारे, प्राणिक स्तरावर शक्तिद्वारे, आणि आंतरात्मिक स्तरावर प्रेमाद्वारे तो स्वतःला अभिव्यक्त करतो.

आपण जेव्हा पुरेसे उन्नत होतो तेव्हा हे चारही पैलू एकाच चेतनेमध्ये, प्रेम, तेजस्विता, शक्तिमानता, सौंदर्य या साऱ्यांनी परिपूर्ण, सर्वांना सामावून घेत, सर्वांमध्ये व्याप्त अशा रीतीने, परस्परांशी संयुक्त होतात, असा शोध आपल्याला लागतो.

वैश्विक लीलेला समाधानी करण्यासाठीच ही चेतना स्वतःला आविष्करणाच्या विविध स्तरांवर वा पैलूंमध्ये विभाजित करते.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 06)

साधनेची मुळाक्षरे – १९

कुटुंब, समाज, देश हे अधिक विस्तारित अहंकार आहेत – ते म्हणजे ‘ईश्वर’ नव्हेत. व्यक्ती जर ‘ईश्वरी आदेशा’बाबत जागरूक असेल आणि त्यानुसार कार्य करत असेल किंवा स्वतःमध्ये ‘ईश्वरी शक्ती’च कार्यरत आहे अशी जर व्यक्तीला जाणीव असेल तर, कुटुंब, समाज, देश यांच्यासाठी कार्य करत असूनही, मी ‘ईश्वरा’ साठी कार्य करत आहे, असे ती व्यक्ती म्हणू शकते; अन्यथा, देश वगैरे म्हणजे जणू देवच, ही मनाची कल्पना असते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 438)

साधनेची मुळाक्षरे – ०८

आपल्यामधील चैत्य घटक (psychic part) हा असा भाग असतो की, जो थेट ‘ईश्वरा’कडून आलेला असतो आणि ‘ईश्वरा’च्या संपर्कामध्ये असतो. मूलत: चैत्य घटक म्हणजे दिव्य शक्यतांनी गर्भित असलेले असे एक केंद्र असते की जे, मन, प्राण व शरीर या कनिष्ठ आविष्कारत्रयीला आधार पुरविते. हे ईश्वरी वा दिव्य तत्त्व सर्व सजीवांमध्ये असते पण ते सामान्य चेतनेच्या मागे लपलेले असते; ते प्रथमत: विकसित झालेले नसते… मन, प्राण व शरीर या साधनांच्या अपूर्णतांकडून जेवढी मुभा मिळेल तेवढ्यामध्येच आणि, त्यांच्या माध्यमातूनच व त्यांच्या मर्यादांमध्ये राहूनच, हे तत्त्व स्वत:ला अभिव्यक्त करते. ‘ईश्वरानुगामी’ अनुभूतींच्या योगे, या तत्त्वाची चेतनेमध्ये वृद्धी होत असते; आपल्यामध्ये जेव्हा उच्चतर अशी क्रिया घडते त्या प्रत्येक वेळी या तत्त्वाला सामर्थ्य प्राप्त होत जाते आणि सरतेशेवटी, या सखोल आणि उच्चतर अशा गतिविधींच्या संचयामधून चैत्य व्यक्तित्वाची घडण होते आणि त्यालाच आपण सर्वसाधारणत: ‘चैत्य पुरुष’ (Psychic being) असे संबोधतो. माणूस आध्यात्मिक जीवनाकडे वळण्याचे निमित्त-कारण खरंतर हाच चैत्य पुरुष असतो; ह्या चैत्यपुरुषाचीच त्याला सर्वात अधिक मदत होत असते पण बरेचदा हे निमित्त-कारण अनभिज्ञच राहते. आणि म्हणूनच आपल्याला ‘पूर्णयोगा’मध्ये त्या चैत्यपुरुषाला अग्रभागी आणावे लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 103)

साधनेची मुळाक्षरे – ०७

शुद्ध आत्मा (The pure self) हा अजन्मा असतो, तो जन्म वा मृत्युमधून प्रवास करीत नाही, तो जनननिरपेक्ष असतो किंवा तो देह, प्राण वा मन यांपासून वा या आविष्कृत झालेल्या प्रकृतीपासूनदेखील स्वतंत्र असतो. त्या सर्व गोष्टींचा तो अंगीकार करीत असला आणि त्यांना आधार देत असला तरीसुद्धा तो त्या गोष्टींनी बांधला गेलेला नसतो, सीमित झालेला नसतो, प्रभावित झालेला नसतो. याउलट, चैत्य पुरुष (Psychic being) मात्र, जन्माबरोबर खाली अवतरतो आणि मृत्युद्वारे निघून जातो – (तो स्वत: मृत्यू पावत नाही कारण तो अमर्त्य असतो.) तो एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत, भूलोकावरून इतर लोकांमध्ये आणि परत पुन्हा या पृथ्वीवरील जीवनात प्रवास करत असतो. जन्मजन्मांतरी उत्क्रांतीच्या माध्यमातून त्याची मनुष्यदशेकडे वाटचाल होत राहते… हा चैत्य पुरुष उत्क्रांतीला आधार देतो आणि विश्वानुभव घेण्यासाठीची साधने म्हणून शारीरिक, प्राणिक व मानसिक अशी मानवी चेतना विकसित करतो. ही साधने प्रच्छन्न (disguised), अपूर्ण पण चढतीवाढती आत्मअभिव्यक्ती करणारी असतात. हे सारे तो पडद्यामागे राहून करत असतो, आणि साधनभूत अस्तित्वाच्या अपूर्णतेमुळे जितपत शक्य आहे तेवढेच स्वत:मधील दिव्यत्व दाखवून देतो. पण एक वेळ अशी येते, जेव्हा तो चैत्य पुरुष या पडद्यामागून बाहेर येण्यास, साधनभूत प्रकृतीचा ताबा घेऊन तिला दिव्य पूर्णत्वाकडे वळविण्यासाठी सिद्ध होतो; खऱ्या अध्यात्मजीवनाची ही सुरुवात असते. असा चैत्य पुरुष मग आता मानसिक मानवी पातळीवरून आविष्कृत तयार होतो; तो आता मानसिक चेतनेकडून आध्यात्मिक चेतनेकडे आणि आध्यात्मिकतेच्या विविध पातळ्यांमधून हळूहळू अतिमानसिक अवस्थेकडे वाटचाल करू लागतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 536-537)

(पौर्वात्य देशांचा पाश्चिमात्य आणि पाश्चिमात्य देशांचा पौर्वात्य देशांवर प्रभाव पडत आहे, आणि या साऱ्या घडामोडींच्या माध्यमातून नवीनच काही आकाराला येऊ घातले आहे, ‘प्रकृती’ हे सारे काही घडवून आणत आहे, या विषयी श्रीमाताजी पुढे सांगतात -)

‘प्रकृती’चे मार्ग संथ, अंधकारमय आणि जटिल असतात. आत्म्याच्या माध्यमातून जी गोष्ट अगदी त्वरेने, सुकरतेने आणि काहीही व्यर्थ जाऊ न देता झाली असती, तीच गोष्ट करण्यास ‘प्रकृती’ला मात्र खूप दीर्घ कालावधी लागतो. सध्या या जगामध्ये प्रचंड अपव्यय होताना दिसतो. परंतु या गोष्टी अशाच घडत आहेत. लोकांना परस्परांमध्ये मिसळविण्याचे ‘प्रकृती’चे तिचे तिचे स्वतःचे असे काही मार्ग आहेत.

साधक : हे सारे हेतुपूर्वक केले जात आहे का?

श्रीमाताजी : माणसं ज्याला ‘हेतुपूर्वक’ असे समजतात, तशा तऱ्हेने नाही. परंतु त्या पाठीमागे निश्चितपणे काही ‘प्रयोजन’ आहे, एक ‘उद्दिष्ट’ आहे की ज्या दिशेने ही वाटचाल चालू आहे. इतकेच, की सारे काही चेतनेच्या प्रमाणावर अवलंबून असते. एखाद्या माणसाला हे सारे काही गोंधळाचे वाटू शकते, कारण तो फक्त तपशीलाचा भाग पाहू शकतो, आणि मग त्याला तो काळाचा प्रचंड अपव्यय आहे असे वाटते, कारण त्याची काळाची संकल्पना ही त्याच्या स्वतःच्या व्यक्ती म्हणून असलेल्या कालावधीइतकीच मर्यादित असते.

परंतु ‘प्रकृती’ समोर मात्र शाश्वतता पसरलेली असते. आणि तिच्या दृष्टीने हे वाया घालविणे नसते, कारण ती म्हणजे जणू काही अशा एखाद्या व्यक्तीसारखी आहे की, जिच्यापाशी एक भली मोठी कढई आहे, त्यामध्ये ती साऱ्या गोष्टी ओतत असते, त्याचे मिश्रण बनवीत असते आणि जर ते मिश्रण यशस्वी झाले नाही तर ती ते सारे मिश्रण बाहेर काढून टाकते कारण तिला हे माहीत असते की, त्याच गोष्टींचा वापर करून ती पुन्हा एक नवीन मिश्रण तयार करणार आहे. असे असते हे सारे. येथे काहीही व्यर्थ जात नाही, कारण ते पुन्हा केव्हातरी उपयोगात येणार असते. आकार नष्ट होतात आणि त्यातील द्रव्य पुन्हा हाती घेतले जाते आणि हे सारे असेच सातत्याने चालू राहते. काही घडविले जाते, काही बिघडविले जाते, होत्याचे नव्हते केले जाते – ‘प्रकृती’ला वाटले तर ती हे सारे शेकडो, हजारो वेळा करू शकते, त्याचे तिला काहीच वाटत नाही. कारण यामध्ये काहीच वाया जात नाही, कारण ते सारे तिचेच कार्य असते. कार्य हेच तिचे सुख असते, कार्याशिवाय ती अस्तित्वातच राहू शकली नसती.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 342-343)

‘प्रकृती’ने ही सृष्टी हाती धरलेली आहे, ती पूर्णतः अचेतन असल्यासारखी वाटते परंतु तिच्यामध्ये ‘परम चेतना’ आणि एकमेव ‘सद्वस्तु’ सामावलेली आहे आणि हे सर्व विकसित व्हावे, आत्म-जागृत व्हावे, आणि त्यांनी स्वतःला पूर्ण जाणून घ्यावे यासाठी ती कार्य करत असते. परंतु या गोष्टी ती अगदी सुरुवातीलाच प्रकट करत नाही. ती त्या हळूहळू विकसित करत नेते आणि म्हणूनच प्रारंभी गुप्त असलेली ही बाब शेवटाकडे येता-येता प्रकट होत जाते. आणि मनुष्य आता उत्क्रांतीच्या एका उच्च बिंदूपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे त्याच्यासमोर प्रकृतीचे हे उपरोक्त रहस्य प्रकट केले जाऊ शकते आणि आजवर जे वरकरणी अचेतनेमध्ये घडले होते तेच आता सचेतनतेने, स्वेच्छेने आणि म्हणूनच कितीतरी अधिक वेगाने आणि साक्षात्काराच्या आनंदामध्ये घडू शकते.

आध्यात्मिक वास्तविकता (Spiritual Reality) मनुष्यामध्ये विकसित केली जात आहे आणि ती आता स्वतःला समग्रपणे आणि मुक्तपणे अभिव्यक्त करणार आहे, हे मनुष्यामध्ये घडताना एखादी व्यक्ती आता आधीच पाहू शकते. यापूर्वी, प्राण्यांमध्ये व वनस्पतींमध्ये, (अशाच प्रकारचे काहीतरी घडत होते) ते दिसण्यासाठी अतिंद्रिय दृष्टी (clairvoyant) असणे आवश्यक होते, मात्र मनुष्य हा त्याच्या स्वतःच्या ठायी असणाऱ्या या आध्यात्मिक वास्तविकतेविषयी जागरूक आहे; किमान मानवी अस्तित्वाच्या उच्चतर भागामध्ये तरी ही जाणीव असते. ‘परमस्रोता’ला आपल्याकडून कशाची अपेक्षा आहे हे मनुष्याला आता कळू लागले आहे आणि ते प्रत्यक्षात उतरावे म्हणून तो आता सहकार्य करू लागला आहे.

सृष्टी म्हणजे वस्तुनिष्ठीकरण (objectivisation) झालेला खुद्द ‘निर्माणकर्ता’च आहे, याविषयी सृष्टीने स्वत:ने जागरूक व्हावे अशी तिच्याकडून ‘प्रकृती’ची अपेक्षा आहे. म्हणजे असे की, ‘निर्माणकर्ता’ आणि ‘निर्मिती’ (The Creator and the Creation) यांच्यामध्ये भेद नाहीच मुळी, आणि त्यामुळे सजग व प्रत्यक्षीभूत झालेले ऐक्य हे उद्दिष्ट आहे. हेच ‘प्रकृती’चे गुपित आहे.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 321-322)

साधक : माताजी, “उत्क्रांत होणाऱ्या ‘प्रकृती’च्या सुरुवातीच्या टप्प्यांवर आपली गाठ तिच्या अचेतनेच्या मुग्ध गोपनीयतेशी (dumb secrecy) पडते.” मला (श्रीअरविंदांच्या ‘दिव्य जीवन’मधील) या विधानाचा अर्थ समजला नाही. ही गोपनीयता म्हणजे काय ते सांगाल का?

श्रीमाताजी : …श्रीअरविंद अगदी सुरुवातीपासून हेच सांगत आहेत की, जडभौतिकाच्या अगदी गाभ्यामध्ये, आतमध्ये खोलवर ‘ईश्वरी उपस्थिती’ (Divine Presence) दडलेली असते. आणि सर्व वस्तुमात्रांच्याच केंद्रस्थानी असलेल्या या ‘ईश्वरी उपस्थिती’कडे म्हणजे तिच्या उगमाकडे सृष्टी परत वळावी, यासाठी तिची तयारी करणे हे समग्र पार्थिव उत्क्रांतीकडून अपेक्षित आहे. आणि हाच ‘प्रकृती’चा मनोदय आहे.

हे विश्व म्हणजे त्या ‘परमेश्वरा’चे वस्तुनिष्ठीकरण (objectivisation) आहे, जणू त्याने स्वतःच स्वतःला न्याहाळता यावे, स्वतःला स्वतःचे जीवन जगता यावे, स्वतःच स्वतःला जाणून घ्यावे या हेतुने, स्वतःला स्वतःपासून वेगळे काढून, वस्तुनिष्ठ रूपात आणले असावे. आणि म्हणून तेथे असे एक अस्तित्व असेल, अशी एक चेतना असेल की जी त्या ‘परमेश्वरा’ला स्वतःचा उगमस्रोत म्हणून ओळखू शकेल आणि संभूतीमध्ये (Becoming) त्याचे आविष्करण घडून यावे म्हणून त्याच्याशी सचेतनपणे एकत्व पावेल. याव्यतिरिक्त या विश्वाचे अन्य कोणतेच प्रयोजन नाही. ही पृथ्वी म्हणजे या वैश्विक जीवनाचे स्फटिकीभवन (crystallization) झालेले एक प्रातिनिधिक रूप आहे, एककेंद्रीकरण झालेली, ती एक छोटी प्रतिकृती आहे; ज्यामुळे, उत्क्रांतीचे कार्य करणे आणि त्याचे अनुसरण करणे सोपे जाण्याची शक्यता आहे. आपण पृथ्वीचा इतिहास समजावून घेतला की, या विश्वाची निर्मिती का झाली असावी, हे आपल्या लक्षात येते. शाश्वत ‘संभूती’मध्ये (eternal Becoming) ‘परमेश्वर’ स्वतःविषयीच अधिकाधिक जागृत होत आहे आणि निर्मितीचे ‘निर्माणकर्त्या’शी ऐक्य व्हावे हे त्यामधील उद्दिष्ट आहे; ‘आविष्करणा’मध्ये घडून येणारे हे ऐक्य सजग, ऐच्छिक आणि मुक्त असणार आहे.

हे ‘प्रकृती’चे गुपित आहे. ‘प्रकृती’ ही कार्यकारी शक्ती आहे, तीच हे सारे कार्य करत असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 321)

एखादा भूकंप होतो, किंवा एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा जर त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात माणसं राहत असतील तर या घटनांमुळे त्यांचा मृत्यू होतो, आणि अर्थातच त्यांच्यासाठी ती एक आपत्ती ठरते, ‘निसर्गा’साठी मात्र ती एक गंमत असते. आपण म्हणतो, “काय भयंकर वारा सुटला आहे?” साहजिकच आहे, माणसांसाठी तो “भयंकर” असतो, पण ‘निसर्गा’साठी मात्र तो तसा नसतो. हा प्रमाणाचा प्रश्न असतो, नाही का? एखादी उच्चतर शक्ती आविष्कृत होण्याची इच्छा बाळगत आहे आणि ‘प्रकृती’कडून तिला प्रतिरोध होत आहे, असे घडणे शक्य आहे, पण हे आवश्यक मात्र नाही.

ही गोष्ट अगदी सहज समजण्यासारखी आहे की, महाकाय शक्तींबरोबर ‘प्रकृती’चा चाललेला हा खेळ असतो आणि तिच्यासाठी ती केवळ एक लीला असते; तिच्या दृष्टीने त्यात कोणत्याही प्रकारे आपत्तीजनक असे काहीही नसते. ‘प्रकृती’-चेतनेच्या किंवा जडभौतिक चेतनेच्या दृष्टीने, पृथ्वीवरील भौतिक आकार आणि मानवजात या गोष्टी म्हणजे जणू काही मुंग्यांसारख्याच असतात. तुम्ही स्वतःदेखील जेव्हा चालत असता तेव्हा, तुम्ही तुमच्या पायाखाली मुंग्या चिरडू नयेत म्हणून तुमचा मार्ग बदलणे आवश्यक समजत नाही. (अर्थात तुम्ही कट्टर ‘अहिंसक’ असलात तर बाब निराळी!) तुम्ही चालत असता आणि तुमच्या पायांखाली शेकडो मुंग्या आल्या तरी काही इलाज नसतो. ‘प्रकृती’चेही अगदी असेच असते. ती वाटचाल करत असते आणि तिच्या त्या वाटचालीत तिच्या पायदळी तिने हजारो माणसं जरी नष्ट केली तरी ती बाब तिच्यासाठी इतकी महत्त्वाची नसते कारण ती अशी लाखो माणसे पुन्हा निर्माण करू शकते. तिच्यासाठी ते अवघड नसते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 175)

पृथ्वी ही जडभौतिक विश्वाचे केंद्र आहे. ज्या शक्तीद्वारे ‘जडभौतिका’चे रूपांतरण घडून येणार आहे त्या शक्तीच्या एककेंद्रीकरणासाठी पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. ‘जडभौतिका’मधील ईश्वरी क्षमतेचे ती प्रतीक आहे. …‘ईश्वरी चेतने’च्या थेट हस्तक्षेपामुळे या पृथ्वीची निर्मिती झाली आहे आणि त्यामुळे फक्त या पृथ्वीवरच ‘ईश्वरा’शी थेट संपर्क होऊ शकतो आणि तसा तो होतो देखील. पृथ्वी दिव्य प्रकाश शोषून घेते, विकसित करते आणि त्याचा किरणोत्सर्ग करते. हा किरणोत्सर्ग स्थलाच्या कक्षा ओलांडून पलीकडे जातो आणि जेथे जेथे ‘जडभौतिकता’ आहे तेथे तेथे तो पसरतो. ‘ईश्वरी चेतने’ची सुसंवादिता आणि प्रकाशाची जी देणगी पृथ्वी घेऊन येते ती देणगी, हे जडभौतिक विश्व काही प्रमाणात वाटून घेते. परंतु त्या चेतनेचे परिपूर्ण आणि अंतिम विकसन हे या ‘पृथ्वी’वरच शक्य असते. चैत्य पुरुष (Psychic being) हा फक्त या पृथ्वीवरच आढळून येतो, कारण तो पृथ्वीचीच निर्मिती आहे. तो ‘जडभौतिका’ ला झालेला ‘ईश्वरी’ स्पर्श आहे. चैत्य पुरुष हा ‘पृथ्वी’ चे अपत्य असते; तो या ‘पृथ्वी’वरच जन्माला येतो आणि येथेच विकसित होतो. तो ‘पृथ्वी’खेरीज अन्य कोणत्याच ठिकाणचा रहिवासी नाही.

– श्रीअरविंद
(The Yoga of Sri Aurobindo : Part 06 by Nolini Kant Gupta : 23)