Posts

विचारशलाका १२

आपल्या अस्तित्वाची आत्ताची रचना किंवा स्थिती ही अंतिम आहे असे मानून, विकासक्रमाच्या शक्यतेवर मर्यादा घालण्याचे काहीच कारण नाही. पशुजीवन ही एक अशी प्रयोगशाळा आहे की, ज्या प्रयोगशाळेमध्ये प्रकृतीने मनुष्यजात घडवली. मनुष्यदेखील तशीच एक प्रयोगशाळा बनू शकतो. या मनुष्यरूपी प्रयोगशाळेमध्ये अतिमानव (superman) घडविण्याचे कार्य करण्याचा प्रकृतीचा संकल्प आहे. दिव्य जीवाच्या रूपाने आत्म्याला प्रकट करण्याचा व एक दिव्य प्रकृती उदयास आणण्याचा तिचा संकल्प आहे.

– श्रीअरविंद [CWSA 13 : 502]

विचारशलाका – ०२

‘योग’ हे असे एक साधन आहे की, ज्याद्वारे आपल्याला, बहिर्वर्ती आणि व्यक्त चेतनेकडून आंतरिक आणि सत्य चेतनेप्रत घेऊन जाण्यात येते आणि त्याद्वारे आंतरिक साधनेच्या माध्यमातून आपण वस्तुमात्रांमागील ‘सत्या’शी एकत्व पावण्याप्रत येऊन पोहोचतो.

योग-चेतना (Yogic Consciousness) बाह्य व्यक्त विश्वाच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करते, असे नाही तर उलट, ती त्या विश्वाकडे अंतर्दृष्टीने पाहते. ती विश्वाकडे बाह्य दृष्टीने पाहत नाही किंवा त्याचा बाह्य अनुभवही घेत नाही तर ती आंतरिक सखोल, महत्तर, सत्यतर चेतनेच्या प्रकाशात बाह्य विश्वाला त्याचे योग्य ते मूल्य प्रदान करते, त्यात परिवर्तन घडविते. आणि त्याला सद्वस्तुचा ‘कायदा’ लागू करते; प्राणिमात्रांच्या ‘अज्ञानी’ कायद्याच्या जागी ईश्वरी ‘संकल्प’ आणि ‘ज्ञाना’चा नियम प्रस्थापित करते.

चेतनेमधील (Consciousness) बदल हाच योगप्रक्रियेचा समग्र अर्थ होय.

– श्रीअरविंद [CWSA 12 : 327]

आध्यात्मिकता ३७

(श्रीमाताजींकृत प्रार्थना…)

बाह्य जीवन, दररोजची प्रत्येक कृती आणि प्रत्येक घटना, ही आपल्या तास न् तास केलेल्या चिंतनासाठी आणि ध्यानासाठी अनिवार्यपणे पूरकच नसते का?

…आपले दैनंदिन जीवन ही एक प्रकारची ऐरण आहे; आणि चिंतनामधून जी प्रदीप्तता येते ती स्वीकारण्यासाठी आणि धारण करण्यासाठी दैनंदिन जीवनातील सर्व घटनांचे शुद्धीकरण व्हावे, त्या परिशुद्ध व्हाव्यात, त्या अधिक लवचीक आणि परिपक्व व्हाव्यात, म्हणून या घटना त्या ऐरणीवरून सरकणेच आवश्यक असते. समग्र विकसनासाठी बाह्य कृती अनावश्यक ठरत नाही तोपर्यंत हे सर्व घटक एकापाठोपाठ एक मुशीमधून गेलेच पाहिजेत. नंतर, पात्र घडविणे आणि ते प्रकाशित करणे या दुहेरी कार्यासाठी चेतनेची इतर केंद्रसुद्धा जागृत व्हावीत म्हणून, हे ईश्वरा, या कृती तुला आविष्कृत करण्याची माध्यमं बनतात. आणि त्यामुळेच आत्मप्रौढी आणि आत्मसंतुष्टता या गोष्टी सर्व अडथळ्यांमधील सर्वाधिक वाईट असा अडथळा असतात.

अगणित घटकांपैकी काही घटकांचे तरी शुद्धीकरण करण्यासाठी आणि तिंबून, मळून त्यांना घडणयोग्य बनविण्यासाठी, त्यांना निर्व्यक्तिक बनविण्यासाठी, त्यांना ‘स्व’चे विस्मरण आणि परित्याग करण्यास शिकविण्यासाठी आणि भक्ती, उदारता आणि हळूवारपणा शिकविण्यासाठी, आपल्याला प्रदान करण्यात आलेल्या छोट्याछोट्या सर्व संधींचा आपण अतिशय विनम्रपणे लाभ घेतला पाहिजे. आणि अस्तित्वाच्या या सर्व पद्धती जेव्हा त्यांच्या अंगवळणी पडतील, तेव्हा ते सारे घटक या ‘निदिध्यासा’मध्ये सहभागी होण्यासाठी, परम ‘एकाग्रते’मध्ये तुझ्याबरोबर एकात्म पावण्यासाठी सिद्ध झालेले असतील.

आणि म्हणूनच मला असे वाटते की, आकस्मिकपणे झालेला बदल हा सर्वांगीण नसतो आणि म्हणूनच हे कार्य अगदी उत्तमात उत्तम साधकांसाठीसुद्धा दीर्घकालीन आणि धीम्या गतीने होणेच आवश्यक असते. आकस्मिक बदल हे व्यक्तीचा दृष्टिकोन बदलवून टाकतात, ते बदल व्यक्तीला निश्चितपणे सुयोग्य मार्गावर आणतात; परंतु खऱ्या अर्थाने उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सर्व प्रकारच्या आणि सर्व घटकांच्या अगणित अनुभवांची आवश्यकता असते, त्यापासून कोणाचीच सुटका होऊ शकत नाही.

…माझ्यामध्ये आणि प्रत्येक वस्तुमात्रामध्ये तेजोमयतेने प्रभासित होणाऱ्या हे ‘परम प्रभू’, तुझा ‘दिव्य प्रकाश’ आविष्कृत होऊ दे आणि तुझ्या ‘दिव्य शांती’चे साम्राज्य सर्वांवर पसरू दे. – श्रीमाताजी [CWM 01 : 06-07]

आध्यात्मिकता ३२

‘आध्यात्मिकता’ या मालिकेमध्ये आजपर्यंत आपण श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या साहित्याच्या आधारे, आध्यात्मिकता म्हणजे काय नाही आणि खरी आध्यात्मिकता म्हणजे काय हे समजावून घेतले. आध्यात्मिकतेविषयीची पारंपरिक समजूत आणि त्याची ‘पूर्णयोगा’वर आधारित संकल्पना यामधील फरकही समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या आध्यात्मिक पुरूषाचा (spiritual being) शोध घेणे हे मनुष्याचे केवळ कर्तव्यकर्म आहे असे नव्हे तर, ते त्याचे जीवितकार्य आहे, हेही आपण समजावून घेतले. खऱ्या आध्यात्मिकतेची कसोटी म्हणजे चेतनेचे प्रतिक्रमण (Reversal of consciousness) हेही आपण जाणून घेतले.

आता प्रश्न निर्माण होतो की, आध्यात्मिक पुरुषाचा शोध कसा घ्यायचा? त्यासाठी ध्यानधारणा करायची? की अन्य काही करायचे? का मन एकाग्र करायचे? दैनंदिन व्यावहारिक जीवनाच्या धकाधकीमध्ये, त्यातील भेडसावणाऱ्या प्रश्नांमुळे सामान्य माणसाच्या जिवाला स्वस्थता नसते, मग अशा धकाधकीच्या जीवनात अध्यात्म करायचे तरी कसे? दैनंदिन व्यवहार न सोडता, भौतिक जीवनापासून पलायन न करता, आहे त्याच जीवनाला ‘दिव्यत्वा’चे वळण कसे द्यायचे? त्यासाठी नेमके काय करायला हवे ? यासारखे अनेकानेक प्रश्न वाचकांच्या मनात निर्माण झाले असतील. हे व अशाच प्रकारचे प्रश्न त्यावेळच्या साधकांच्या मनातही निर्माण झाले होते; त्यांनी ते प्रश्न श्रीअरविंद व श्रीमाताजी यांना विचारले होते, आणि त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. त्यातील काही निवडक प्रश्नोत्तरे, काही पत्रे, काही लिखाण, संवाद यांच्या माध्यमातून आपण उद्यापासून त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

‘पूर्णयोगा’च्या साधनेचे – अंतरंग साधना आणि बहिरंग साधना असे दोन प्रकार आहेत. चेतना अंतर्मुख करून चैत्य पुरुषाचा (Psychic being) शोध आणि चेतना ऊर्ध्वमुख करून आत्मतत्त्वाचा (Soul) शोध घेणे; चेतना विशाल करत करत, ती विश्वात्मक करत नेणे या सर्व गोष्टींचा समावेश अंतरंग साधनेमध्ये होतो; तर अंतरंग साधनेमधून प्राप्त झालेल्या शांती, स्थिरता, प्रकाश, प्रेम, समता यांसारख्या गोष्टी दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्यक्षात आचरणात आणणे यांचा समावेश बहिरंग साधनेमध्ये होतो. या दोन्ही साधनापद्धतींसंबंधी काही मार्गदर्शन येथे मिळेल आणि अध्यात्म मार्गावर पहिलीवहिली पावले टाकण्यासाठी ही शिदोरी आपणा सर्वांना उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो.

– संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

आध्यात्मिकता ३१

(भाग ०३)

व्यक्ती जोपर्यंत मानसिक चेतनेमध्ये जीवन जगत असते, – भलेही ते जीवन कितीही उच्च स्तरावरील असले तरी, जेव्हा ती बाहेरून आध्यात्मिक जीवनाकडे पाहते तेव्हा व्यक्ती स्वतःच्या मानसिक क्षमतांनुसार त्या जीवनाचे परीक्षण करते, शोधार्थ धडपडायचे, चुका करायच्या, त्या दुरूस्त करायच्या, थोडेसे प्रगत व्हायचे आणि पुन्हा शोधासाठी धडपडायचे या सवयीनुसार ती त्या जीवनाचे परीक्षण करू पाहते. ती व्यक्ती असा विचार करते की आध्यात्मिक जीवन जगणाऱ्या व्यक्तींनाही अशाच अक्षमतांचा त्रास सहन करावा लागतो पण असा विचार करणे ही एक घोडचूक आहे, असे म्हणावे लागेल.

जेव्हा व्यक्तीमध्ये चेतनेचे प्रतिक्रमण घडून येते तेव्हा या साऱ्या गोष्टी संपुष्टात आलेल्या असतात. आता व्यक्ती शोधासाठी धडपडत नाही, तिला गोष्टी ‘दिसतात’. आता व्यक्ती तर्क करत नाही, अनुमाने काढत नाही, तर तिला गोष्टी ‘ज्ञात’ असतात. आता व्यक्ती चाचपडत बसत नाही, तर ती ‘ध्येयाच्या दिशेने सरळ चालत’ जाते. आणि व्यक्ती जेव्हा अशी पुढे जाते अगदी थोडीशी जरी पुढे गेली तरी व्यक्तीला परम सत्य उमगते, जाणवते, व्यक्ती ते ‘परम सत्य’ जगते; ते परम सत्य हे असते की, एकमेव ‘परमोच्च सत्य’च कार्यरत असते, ‘परम ईश्वर’च मानवी जिवांच्या माध्यमातून संकल्प करतो, तोच जाणतो आणि तोच कार्य करतो. अशावेळी मग त्रुटी राहण्याची शक्यताच कशी असू शकेल? तो जे करतो, ते तो करतो कारण तसे करण्याची ‘त्याची’ इच्छा असते.

आपल्या सदोष दृष्टीला या कृती कदाचित अनाकलनीय असतात पण त्यांना काही अर्थ असतो, त्यांचे काही उद्दिष्ट असते आणि त्या ज्या दिशेने जाणे आवश्यक असते तेथेच त्या नेल्या जातात. व्यक्तीला जर इतरांना आणि या जगाला मदत करण्याची खरी प्रामाणिक इच्छा असेल तर, व्यक्ती त्यातल्या त्यात एक गोष्ट अशी करू शकते की, इतरांनी जसे असावे असे व्यक्तीला वाटते तसे तिने स्वतः बनले पाहिजे – केवळ उदाहरण म्हणून नाही, परंतु, असे केल्याने, व्यक्ती तेजस्वी शक्तीचे एक केंद्र बनू शकते, आणि तिच्या तशा रितीने अस्तित्वात असण्यामुळेच, उर्वरित जगाला ती रूपांतर घडविण्यासाठी भाग पाडू शकते.

( ….समाप्त)

– श्रीमाताजी [CWM 09 : 415-416]

आध्यात्मिकता ३०

(भाग ०२)

व्यक्ती ज्या क्षणी आध्यात्मिक जीवनाकडे आणि सत्यतेकडे वळते, त्याच क्षणी ती ‘अनंता’ला, त्या ‘शाश्वता’ला स्पर्श करते आणि त्यामुळे त्या व्यक्तीकडे कमीअधिक क्षमता आहेत किंवा शक्यता आहेत असा प्रश्नच शिल्लक राहत नाही. आध्यात्मिक जीवन जगण्याची एखाद्याकडे जास्त क्षमता आहे किंवा दुसऱ्या एखाद्याकडे कमी क्षमता आहे असे म्हणणे ही आध्यात्मिक जीवनासंबंधीची मानसिक संकल्पना आहे, मात्र हे विधान अजिबात उचित नाही. एखादी व्यक्ती निर्णायक आणि (चेतनेच्या) संपूर्ण प्रतिक्रमणासाठी (reversal of consciousness) कमी-अधिक सज्ज आहे, असे फार फार तर म्हणता येईल. वस्तुत: सामान्य गतीविधींपासून मागे वळून, आध्यात्मिक जीवनाच्या शोधात निघायचे ही जी मानसिक क्षमता असते, तिचे मोजमाप करता येऊ शकते.

परंतु जोपर्यंत व्यक्ती मानसिक क्षेत्रामध्ये वावरत असते, त्या अवस्थेत असते, चेतनेच्या त्या स्तरावर असते तेथून व्यक्ती इतरांसाठी फारसे काही करू शकत नाही, म्हणजे सर्वसाधारण जीवनाबाबत किंवा काही विशिष्ट व्यक्तींबाबत फारसे काही करू शकत नाही, कारण व्यक्तीला स्वतःविषयीच खात्री नसते, तिला स्वतःला निर्णायक असा अनुभव आलेला नसतो, तिची चेतना ही आध्यात्मिक विश्वामध्ये सुस्थापित झालेली नसते. आणि म्हणून त्या सर्व गोष्टींबाबत असे म्हणता येते की, त्या सर्व मानसिक कृती असतात आणि त्यांना बऱ्यावाईट बाजू असतात, परंतु त्यांच्यामध्ये फारशी शक्ती नसते, आध्यात्मिक संक्रमणाची शक्ती, जी वास्तविक एकमेव खरी परिणामकारक शक्ती असते, ती त्यांच्यामध्ये अजिबात नसते.

व्यक्ती स्वतः ज्या चेतनेमध्ये जीवन जगत असते ती चेतनेची अवस्था इतरांमध्ये संक्रमित करण्याची शक्यता ही एकमेव खरी परिणामकारक गोष्ट असते. पण अशी शक्ती कल्पनेने तयार करता येत नाही. व्यक्ती तिचे अनुकरण करू शकत नाही, स्वतःकडे ती शक्ती असल्याचे व्यक्ती दाखवू शकत नाही; व्यक्ती जेव्हा स्वतः त्या अवस्थेमध्ये सुस्थिर होते तेव्हाच ती क्षमता सहजस्वाभाविकपणे उदयाला येते, जेव्हा व्यक्ती अंतरंगामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ती क्षमता तिच्या अंगी नसते, मात्र व्यक्ती जेव्हा अंतरंगामध्ये जीवन जगत असते, जेव्हा ती तेथे असते तेव्हा ही क्षमता त्या व्यक्तीच्या अंगी येते. आणि म्हणूनच जे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जीवन जगत असतात त्यांची फसवणूक केली जाऊ शकत नाही.

जे अजूनही मानसिक स्तरावरच जीवन जगत आहेत ते, आध्यात्मिक जीवनाची नक्कल पाहून, भुलू शकतात, फसू शकतात, परंतु ज्यांना स्वतःलाच चेतनेच्या प्रतिक्रमणाचा अनुभव आलेला आहे, ज्यांचे बाह्य अस्तित्वाशी असलेले नाते हे पूर्णपणे वेगळे आहे, ते अशा रितीने फशी पडत नाहीत किंवा ते (बेगडी, बाह्य रूपाला भुलण्याची) चूक करू शकत नाहीत.

अशा लोकांना, म्हणजे मानसिक स्तरावरील जीवन जगणाऱ्या लोकांना हे कळू शकणार नाही.

(क्रमश:…)

– श्रीमाताजी [CWM 09 : 414-415]

आध्यात्मिकता २८

“राजकीय, सामाजिक किंवा यांत्रिक पद्धतीने झालेले अत्यंत आमूलाग्र बदलसुद्धा कोणतेही परिवर्तन घडवून आणू शकलेले नाहीत कारण जुनीच दुखणी नव्या रूपात पुन्हा तशीच टिकून राहतात: बाह्य वातावरणाच्या एखाद्या अंगाबाबत काहीसा फरक होतो पण मनुष्य जसा होता तसाच कायम राहतो. तो अजूनही तसाच अज्ञानी मानसिक जीव आहे जो त्याच्या ज्ञानाचा दुरूपयोग करत आहे किंवा ते ज्ञान परिणामकारक रीतीने तो वापरत नाहीये. तो अजूनही अहंकारानेच संचालित होत आहे आणि अजूनही त्याच्यावर प्राणिक इच्छावासनांची, आवेगांची, शरीराच्या गरजांची सत्ता चालते, त्याचा दृष्टिकोन अजूनही तसाच वरवरचा आहे आणि आध्यात्मिक नसलेला (unspiritual) असाच आहे, तो त्याच्या स्वतःच्या आत्मतत्त्वाविषयी आणि त्याला संचालित करणाऱ्या आणि त्याचा उपयोग करून घेणाऱ्या शक्तींविषयी अजूनही अनभिज्ञच आहे…

केवळ आध्यात्मिक परिवर्तनामुळेच म्हणजे, मनुष्याच्या (सद्यकालीन) उथळ मानसिक अस्तित्वाकडून सखोल आध्यात्मिक चेतनेकडे होणाऱ्या उत्क्रांतीमुळेच खरा आणि परिणामकारक फरक घडून येऊ शकेल. स्वतःमधील आध्यात्मिक पुरुषाचा (spiritual being) शोध लावणे हे आध्यात्मिक मनुष्याचे मुख्य कर्तव्यकर्म असते आणि त्याच उत्क्रांतीच्या दिशेने जाण्यासाठी इतरांना साहाय्य करणे ही मानववंशासाठी त्याने केलेली खरी सेवा असते; जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत एखादी बाह्य मदत ही थोडीफार साहाय्य करू शकते किंवा दिलासा देऊ शकते पण त्यातून फारसे काही निष्पन्न होत नाही. किंवा काही निष्पन्न झालेच तर ते अगदीच अल्प असते.”

– श्रीअरविंद [CWSA 21-22 : 917-918]

श्रीअरविंदलिखित ‘दिव्य जीवन’ ग्रंथामधील वरील उतारा श्रीमाताजींनी वाचून दाखविला आणि त्यावर एका साधकाने प्रश्न विचारला. त्याला श्रीमाताजी उत्तर देत आहेत. ते आपण उद्यापासून पाहू. (क्रमश:…)

आध्यात्मिकता २६

जीवनाचा त्याग करणे ही खरी आध्यात्मिकता नव्हे, तर ‘ईश्वरी पूर्णत्वा’च्या साहाय्याने जीवन परिपूर्ण बनविणे ही खरी आध्यात्मिकता असते. भारताने आता जगाला ही खरी आध्यात्मिकताच दाखविली पाहिजे.

*

आध्यात्मिकतेच्या दृष्टीने पहिले असता भारत हा जगातील अग्रगण्य देश आहे. आध्यात्मिकतेचे आदर्श उदाहरण घालून देणे हे त्याचे जीवितकार्य आहे. आणि जगाला ही शिकवण देण्यासाठी श्रीअरविंदांनी या भूतलावर देह धारण केला.

*

खरी आध्यात्मिकता जीवनाचे रूपांतर घडविते.

*

मनुष्यामध्ये अभीप्सेच्या बिजाला जर खऱ्या आध्यात्मिकतेचे खतपाणी दिले तर तो ‘दिव्यत्वा’मध्ये विकसित होईल.

*

आध्यात्मिकता म्हणजे परम साधेपणा. खरी आध्यात्मिकता ही अतिशय साधी सरळ असते.

*

कर्मामध्ये ‘पूर्णत्वा’साठी असलेली ओढ ही खरी आध्यात्मिकता असते.

*

तुम्ही आध्यात्मिकतेच्या त्या स्तराशी संबंधित आहात ज्या स्तरावर जडभौतिकाला नकार देण्याची आवश्यकता असते आणि जी आध्यात्मिकता जडभौतिकापासून सुटका करून घेऊ इच्छित असते. परंतु ‘उद्याची आध्यात्मिकता’ ही जडभौतिकाला हाती घेईल आणि तिचे रूपांतर घडवून आणेल.

– श्रीमाताजी [CWM 13 : 357, 13 : 244, 14 : 32, 14 : 75, 14 : 151, 14 : 306, 15 : 85]

आध्यात्मिकता २५

आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक चेतना तुम्हाला सखोल आंतरिक साक्षात्कार प्रदान करते, ती तुमचा ‘ईश्वरा’शी संपर्क करून देते, बाह्य बंधनांपासून मुक्ती देते; परंतु ही मुक्ती परिणामकारक व्हायची असेल तर, आणि या मुक्तीचा जिवाच्या इतर घटकांवरदेखील परिणाम व्हायला हवा असेल तर, ‘ज्ञाना’चा आध्यात्मिक प्रकाश धारण करण्याइतपत मन पुरेसे खुले झाले पाहिजे; दृश्य रूपांच्या पाठीमागे असणाऱ्या शक्तींना हाताळण्याइतपत आणि त्यांच्यावर वर्चस्व गाजविण्याइतपत प्राण सशक्त झाला पाहिजे; हा सखोल अनुभव दैनंदिन जीवन-व्यवहारांमध्ये आणि प्रत्येक क्षणी अभिव्यक्त करणे शक्य व्हावे आणि समग्रतया तो अनुभव जगता यावा यासाठी शरीराला शिस्त लावली पाहिजे, त्याची नीट व्यवस्था लावली पाहिजे.

…आपल्याला जीव म्हणून जर समग्र, पूर्ण बनायचे असेल, पूर्ण साक्षात्कार व्हावा असे जर आपल्याला वाटत असेल तर, आलेला आध्यात्मिक अनुभव आपल्याला मनाद्वारे, प्राणाद्वारे आणि शरीराद्वारे अभिव्यक्त करता आला पाहिजे. आणि आपली अभिव्यक्ती जितकी जास्त निर्दोष असेल, आणि ती एका समग्र आणि परिपूर्ण जिवाकडून कार्यवाहीत झाली असेल, तर आपला साक्षात्कार हा अधिक समग्र आणि परिपूर्ण असेल.

– श्रीमाताजी [CWM 09 : 345-346]

आध्यात्मिकता २४

ज्यांना आध्यात्मिक जीवन जगण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आत्म-नियंत्रण, आत्म-प्रभुत्व, परीमितता, इच्छाविरहितता, जिवाच्या आंतरिक सत्याचा आणि त्याच्या आत्माविष्करणाच्या नियमाचा शोध या गोष्टी अगदी आवश्यक आहेत असे आपण म्हणू शकतो. स्वतःशी, स्वतःच्या ध्येयाशी प्रामाणिक असणे, स्वतःला अस्ताव्यस्त भावावेगांबरोबर वाहवत जाऊ न देणे, बदलणाऱ्या रूपांना ‘वास्तविकता’ अथवा ‘सत्य’ न मानणे, या गोष्टी अध्यात्म-मार्गावर प्रगत होण्यासाठी व्यक्तीकडे असणेच आवश्यक असते.

– श्रीमाताजी [CWM 03 : 191]