Posts

प्रश्न : जर मन, प्राण आणि शरीर हे पुन्हा जन्म घेणार नसतील आणि फक्त चैत्य पुरुषाचाच पुनर्जन्म होत असेल तर, मग आधी केलेल्या प्राणिक वा मानसिक प्रगतीचे पुढील जन्मासाठी काहीच मोल नाही का?

श्रीमाताजी : ही अंगे चैत्य पुरुषाच्या जेवढी निकट आणली असतील तेवढ्याच प्रगतीच्या प्रमाणात त्यांचा उपयोग होतो; म्हणजे, जेवढ्या प्रमाणात अस्तित्वाची ही सारी अंगे हळूहळू, क्रमाक्रमाने चैत्य पुरुषाच्या प्रभावाखाली आणली असतील तेवढ्या प्रमाणात त्यांचा उपयोग होतो कारण जे चैत्य पुरुषाच्या प्रभावाखाली असते, चैत्य पुरुषाशी जे एकात्म झालेले असते, तेवढे टिकून राहते व केवळ तेवढेच कायम राहते.

पण जर एखाद्या व्यक्तीबाबत चैत्य पुरुष हा त्याच्या चेतनेचे व जीवनाचे केंद्र झाला असेल आणि जर समग्र अस्तित्वाची जडणघडण या केंद्राभोवतीच झाली असेल तर, मग ते समग्र अस्तित्वच चैत्य पुरुषाच्या प्रभावाखाली येते, त्याच्याशी एकात्म पावते, आणि मग ते कायम राहू शकते – जर का ते कायम राहणे आवश्यक असेल तर.

खरोखर, जर चैत्य पुरुषाच्या प्रगतीनुसार आणि आरोहणाच्या त्याच्या क्षमतेनुसार जड देहदेखील समान प्रगती करू शकेल तर, त्याचे विघटन होण्याची गरजच उरणार नाही. पण इथेच तर खरी अडचण आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 358-360)

…अशीही काही माणसं असतात, जी थोडंफार काही शिकलेली असतात, ती कमी अधिक प्रमाणात गूढवादी असतात वा पुनर्जन्मावर त्यांचा बालीश विश्वास असतो. त्यांना असे वाटते की अशी एक छोटीशी व्यक्ती असते की जी, भौतिकाचे वस्त्र पांघरते, म्हणजे शरीर धारण करते आणि जेव्हा हे वस्त्र गळून पडते तेव्हा ती निघून जाते आणि नंतर परत दुसरे वस्त्र पुन्हा धारण करते… जणू एखाद्या बाहुलीचे कपड़े बदलावेत त्याप्रमाणे. काही लोकांनी तर यावर अगदी गांभीर्याने त्यांच्या गतजीवनातील गोष्टी सांगणारी पुस्तके लिहिली आहेत, ते अगदी माकड होते तेव्हापासूनच्या जीवनातील गोष्टी; हा निव्वळ बालीशपणा आहे.

कारण हजारापैकी नऊशे नव्व्याणव वेळी, केवळ त्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असणारी एक छोटीशी चैत्य रचना मृत्यूनंतर कायम राहते, बाकी सर्व गोष्टी विरघळून जातात, तुकडेतुकडे होऊन इथे तिथे विखरून जातात आणि त्यांची व्यक्तिविशिष्टता, व्यक्ती त्यांची पृथागात्मता टिकून राहत नाही.

आत्ता, या भौतिक जीवनामध्ये, भौतिक व्यक्ती जे काही करीत आहे त्यामध्ये चैत्य पुरुष कितीवेळा सहभागी होतो ?… जे कोणी योगसाधना करतात, थोडेफार अनुशासित आहेत त्या माणसांविषयी येथे मी बोलत नाही; जीवनामध्ये मध्यस्थी करू शकेल, मार्गदर्शन करू शकेल इतपत ज्यांचा चैत्यपुरुष विकसित झालेला आहे, चैत्यपुरुषाची अशी क्षमता ज्यांच्यापाशी आहे अशा एकंदर माणसांविषयी मी बोलत आहे – काहींची वर्षच्या वर्षं कोणत्याही चैत्य मध्यस्थीविना जातात.

आणि तरीसुद्धा ते तुम्हाला येऊन सांगतात की, ते अमुक एका देशामध्ये जन्मले होते, त्यांचे आईवडील कसे होते, ते कोणत्या घरामध्ये राहायचे, त्यांच्या चर्चचे छप्पर कसे होते, त्यांच्या शेजारी कसे जंगल होते, जीवनातील अशा प्रकारच्या खूप साधारण गोष्टी, घटना.. या सर्व गोष्टी निव्वळ मूर्खतापूर्ण आहेत कारण त्या पूर्णतया पुसल्या जातात, त्या तशाच टिकून राहत नाहीत;

एखाद्या व्यक्तीमध्ये जीवनातील एखाद्या विशिष्ट अशा क्षणाची आठवण टिकून राहू शकते : जेव्हा काही खास अशी परिस्थिती असते, काही महत्त्वाचे क्षण असतात, असे क्षण की जेव्हा चैत्य अस्तित्वाने आकस्मिकपणे त्यामध्ये सहभाग घेतलेला असतो; आंतरिक हाकेपोटी वा आत्यंतिक निकडीपोटी चैत्य अस्तित्वाने आकस्मिकपणे हस्तक्षेप केलेला असतो अशा वेळी त्या क्षणाची स्मृती चैत्य स्मृतीमध्ये कोरल्यासारखी होते. जेव्हा तुमच्याकडे अशी चैत्य स्मृती असते तेव्हा तुम्हाला जीवनातील त्या क्षणाची परिस्थिती, विशेषत: आंतरिक भावना, त्या क्षणी सक्रिय असलेली जाणीव आठवते. आणि मग ती काही सहसंबंधांनिशी, तुमच्या अवतीभोवती जे होते त्यानिशी, एखादा उच्चारलेला शब्द, एखादा ऐकलेला वाक्प्रयोग यानिशी तुमच्या जाणिवेसोबत राहते. पण सर्वात महत्त्वाचे काय असेल तर ते म्हणजे, तुमचा आत्मा ज्या स्थितीमध्ये होता ती आत्म्याची स्थिती वा अवस्था; कारण ती अवस्थाच कोरल्याप्रमाणे स्पष्टपणे टिकून राहते. ह्याच चैत्य जीवनाच्या खाणाखुणा असतात, की ज्या गोष्टींचा खोल ठसा उमटलेला होता, त्याच्या घडणीमध्ये ज्यांचा सहभाग होता. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमच्या चैत्य अस्तित्वाचा सातत्याने, नेहमी, स्पष्टपणे असा शोध लागतो तेव्हा यासारख्या गोष्टीच तुम्हाला आठवतात.

या अगदी अल्पस्वल्प असू शकतात, पण त्या एखाद्याच्या आयुष्यातील चमकदार गोष्टी असू शकतात पण माणूस असे सांगू शकत नाही की, ”मी असा असा माणूस होतो, मी असे असे केले, मी या नावाने ओळखला जात होतो, मी असे करत असे, मी तसे करीत असे..”

अन्यथा, तारीख, स्थळ, देश, तो काळ हे सर्व सांगण्याइतपत परिस्थितीचे एकीकरण झाले असण्याची ती दुर्मिळ घटिका असली पाहिजे. असे घडू शकते. स्वाभाविकपणेच चैत्य जाणीवच त्यामध्ये अधिकाधिक अंशाने सहभागी होते आणि त्यातून स्मृतींचा साठा वाढत राहतो. अशा वेळी व्यक्तीला मागील जन्मांचे स्मरण होऊ शकते पण ते त्याच्या सर्व तपशीलानिशी नक्कीच नाही. व्यक्ती काही ठरावीक क्षणांविषयी असे म्हणू शकते, “हे असे असे होते” किंवा ‘मी अशी होते.” इ.

….पण येथे आवश्यकता कशाची आहे तर व्यक्तीचे अस्तित्व हे चैत्य पुरुषाशी पूर्णपणे एकात्म पावलेले असावे, व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्वच त्याच्याभोवती रचले गेले असावे, त्याचे संपूर्ण अस्तित्व – त्याच्या छोट्या छोट्या भागांसहित, सर्व घटकांसहित, व्यक्तित्वाच्या सर्व गतिविधी, हालचाली ह्या चैत्य केंद्राभोवती गुंफलेल्या असल्या पाहिजेत – या सर्वांनिशी एकसंध एकच एक असे, पूर्णत: ईश्वराभिमुख झालेले अस्तित्व तयार झाले असले पाहिजे; असे झाले असता, जेव्हा देह पडेल (मृत्यू येईल) तेव्हाही ते अस्तित्व टिकून राहील. पूर्णत: तयार झालेला जागृत जीवच अशा रीतीने गत जन्मामध्ये काय घडले होते ते नेमकेपणाने आठवू शकतो. त्याच्या जाणिवेतील काहीही न गमावता तो एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्येदेखील जागृतपणे जाऊ शकतो. या पृथ्वीवर अशा अवस्थेपर्यंत पोहोचलेले किती जीव असतील?… मला वाटते, फार नाहीत. आणि सहसा त्यांची ही साहसं सांगत बसण्यास असे जीव फारसे उत्सुक नसतात.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 32-34)

देह सोडल्यानंतर चैत्य पुरुष, दुसऱ्या जगातील काही विशिष्ट अनुभव घेतल्यानंतर, मानसिक आणि प्राणिक व्यक्तिमत्त्व टाकून देतो आणि गतकाळातील अर्क आत्मसात करण्यासाठी आणि पुढील जन्माची तयारी करण्यासाठी विश्रांत अशा स्थितीत निघून जातो.

नवीन जन्माची परिस्थिती कशी असेल हे, ह्या तयारीवरच अवलंबून असते. या तयारीमधूनच, नवीन व्यक्तिमत्त्वाची पुनर्रचना आणि त्यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीची निवड यासाठी मार्गदर्शन मिळते.

निघून गेलेला चैत्य पुरुष भूतकाळातील अनुभव अर्करूपाने स्मरणात साठवून ठेवतो, तो त्यांचे रूप वा तपशील लक्षात ठेवत नाही. आत्ताच्या आविष्करणाचा एक भाग म्हणून आत्म्याने जर गत जीवनातील एक वा अधिक व्यक्तिमत्त्वं आपल्यासोबत आणली असतील तर, त्याला गत जन्मातील काही तपशील आठवण्याची शक्यता असते. अन्यथा, केवळ योगदृष्टीनेच अशी स्मृती येते.

चैत्य पुरुषाच्या उत्क्रांतीमध्ये प्रतिगामी वाटतील अशाही काही हालचाली असतात, पण त्या केवळ आडव्यातिडव्या हालचाली असतात, ते खरोखरीचे मागे जाऊन पडणे नसते, तर ते ज्याच्यावर अद्यापि काम झालेले नाही पण परत त्यावर अधिक चांगले काम करावे म्हणून, अशा कोणत्यातरी गोष्टीकडे परत फिरून जाणे असते.

आत्मा प्राणिमात्रांच्या अवस्थेत परत मागे जात नाही; पण प्राणिक व्यक्तिमत्त्वातील काही भाग स्वत:ला विलग करून घेत, स्वत:मधील पशुप्रवृत्तीवर काम करण्यासाठी, परत पशुजन्माला जाऊन मिळू शकतो. लोभी मनुष्य साप बनून पुन्हा जन्माला येतो, या लोकरूढ कल्पनेमध्ये काही तथ्य नाही. ह्या प्रचलित काल्पनिक अंधश्रद्धा आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 534)

आंतरिक सत्याविषयी सजग होणे

शिक्षक : एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे लहान मूलदेखील त्याच्या आंतरिक सत्याविषयी सजग होऊ शकते का?

श्रीमाताजी : लहान मुलांमध्ये ही जाणीव अगदी सुस्पष्ट असते, कारण ते सत्य त्यांना कोणत्याही विचारांच्या वा शब्दांच्या गुंतागुंतीविना थेट संवेद्य होते – हे तेच असते ज्यामुळे त्याला अगदी स्वस्थ वाटते किंवा ज्यामुळे त्याला अस्वस्थ वाटते. ….आणि हे सगळे प्रौढ माणसांपेक्षा लहान मुलामध्ये अधिक सुस्पष्ट असते कारण प्रौढ व्यक्तीमध्ये ह्या आंतरिक सत्याविषयीची संवेदना मनाच्या कार्यामुळे झाकोळली जाते.

लहान मुलाला वेगवेगळे सिद्धान्त सांगणे अगदीच निरूपयोगी आहे कारण जेव्हा त्याचे मन जागृत होईल तेव्हा त्या सिद्धान्ताच्या विरोधी हजारो कारणे त्याला सापडतील.

मुलांमध्ये एक छोटेसे सत्य दडलेले असते ते म्हणजे त्यांच्या अंतरात्म्यामध्ये असणारी दिव्यत्वाची उपस्थिती. वनस्पती व प्राण्यांमध्येदेखील हे अस्तित्व असते. वनस्पतींमध्ये हे अस्तित्व जागृत नसते, प्राण्यांमध्ये ते जागृत व्हायला सुरुवात झालेली असते आणि लहान मुलांमध्ये ते खूपच जागृत असते. मला अशी मुले माहीत आहेत की, जी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षीपेक्षा आणि चौदाव्या वर्षी पंचविसाव्या वर्षापेक्षा या आंतरात्मिक अस्तित्वाविषयी, चैत्यपुरुषाविषयी (Psychic being) अधिक जागृत होती.

आणि आश्चर्य म्हणजे, ज्या क्षणापासून ती शाळेत जायला सुरुवात करतात, जेथे अस्तित्वाच्या बौद्धिक भागाकडे त्यांचे लक्ष वेधून घेईल असे गहन मानसिक शिक्षण ती घेतात, तेव्हापासून या चैत्यपुरुषाबरोबरचा असलेला त्यांचा संपर्क बहुधा ती नेहमीच व जवळजवळ पूर्णपणे हरवून बसतात.

जर तुम्ही अनुभवी निरीक्षक असाल, तर तुम्ही व्यक्तीच्या डोळ्यांत पाहूनच त्या व्यक्तीच्या आंतमध्ये काय चालू आहे ह्याविषयी सांगू शकाल. …डोळे हा आत्म्याचा आरसा असतो असे म्हटले जाते. पण जर डोळ्यांमधून अंतरात्मा अभिव्यक्त होत नसेल, तर त्याचे कारण असे असते की, तो खूप मागे गेलेला असतो, बऱ्याच गोष्टींनी झाकला गेलेला असतो. काळजीपूर्वकपणे लहान मुलांच्या डोळ्यांत पाहा, तुम्हाला त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारचा प्रकाश दिसेल – काही जण त्याला निरागसता असे म्हणतात – ते इतके खरे असतात, ते जगाकडे कुतूहलाने टुकूटुकू पाहत असतात. हा कुतूहलाचा भाव चैत्यपुरुषाचा असतो, तो सत्य पाहत असतो पण त्याला या जगाविषयी फारशी काही माहिती नसते; कारण तो त्याच्यापासून फार दूर असतो. लहान मुलांमध्ये हे सारे असते पण जसजशी ती अधिकाधिक शिकत जातात, अधिकाधिक बुद्धिमान, अधिक शिक्षित होतात, तसतसे हे सारे पुसले जाते; आणि मग तुम्हाला त्यांच्या डोळ्यांमध्ये विचार, इच्छा, आवेग, दुष्टपणा – सारे काही दिसू लागते पण ती छोटीशी ज्योत, अत्यंत पवित्र, शुद्ध अशी ज्योत मात्र हरवलेली असते. तेव्हा तुम्ही खात्रीने सांगू शकता की, तेथे मनाचा प्रवेश झाला आहे आणि अंतरात्मा दूर खूप दूर गेलेला आहे.

ज्याचा मेंदू अजून पुरेसा विकसित झालेला नाही अशा मुलाकडे तुम्ही संरक्षणाचे किंवा प्रेमाचे, किंवा तळमळीचे किंवा सांत्वनाचे स्पंदन संक्रमित केलेत तर ते त्याला प्रतिसाद देते असे तुम्हाला आढळेल. पण जर तुम्ही एखाद्या शाळेत जाणाऱ्या चौदा वर्षाच्या मुलाचे उदाहरण घेतलेत की, ज्याचे आईवडील सामान्य आहेत आणि ज्यांनी त्याला सामान्य पद्धतीने वाढविले आहे, अशा मुलाबाबत त्याचे मन हे खूपच वर, पृष्ठस्तरावर आलेले आढळते; काहीतरी कठीण असे त्याच्या ठिकाणी असते, अंतरात्मा खूप दूर निघून गेलेला असतो. अशी मुले त्या कोणत्याच स्पंदनांना प्रतिसाद देत नाहीत. जणू काही ती प्लास्टर वा लाकडी ओंडक्याची बनलेली असावीत.

– श्रीमाताजी

(इंग्लंड मधील एक स्त्री आश्रमवासी कशी झाली त्याची कहाणी श्रीमाताजी सांगत आहेत…)

वरकरणी पाहिले तर, ती येथे आश्रमात येण्याचे कारण अगदीच मजेशीर होते. ती चारचौघींसारखीच होती, तरुण होती; तिचे लग्न ठरले होते पण ते झाले नाही; तिच्या होणाऱ्या नवऱ्याने दिलेला शब्द पाळला नाही. तेव्हा ती खूप दुःखीकष्टी झाली. ती खूप रडायची आणि त्यामुळे तिचा सुंदर चेहरा खराब होऊन गेला, तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या. आणि जेव्हा ती त्या दुःखाच्या भरातून बाहेर पडली, तेव्हा तिचे सौंदर्य लोप पावले होते. त्यामुळे ती खूप त्रस्त झाली. सौंदर्यसेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांचा तिने सल्लादेखील घेतला. त्यांनी तिला चेहऱ्यावर पॅराफिनची इंजेक्शन्स घेण्याचा सल्ला दिला आणि म्हणाले, “तसे केलेस तर मग तुझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडणार नाहीत.” तिला इंजेक्शन्स देण्यात आली पण त्यामुळे ईप्सित परिणाम साध्य होण्याऐवजी, तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर त्याच्या गुठळ्या आल्या. ती दुःखाने चूर झाली कारण आता तर ती पूर्वीपेक्षा अधिकच कुरुप दिसू लागली होती.

मग तिला कोणी एक बुवा भेटले आणि त्यांनी तिला सांगितले, ”तुझा सुंदर चेहरा परत मिळविण्यासाठी येथे इंग्लडमध्ये काही उपाय नाहीत. भारतात जा, तेथे मोठेमोठे योगी आहेत, ते तुझे हे काम करतील.” आणि म्हणून ती इथे पाँन्डिचेरीला आली. तिने आल्याआल्या मला विचारले, ”माझा चेहरा किती खराब झाला आहे पाहा ना, तुम्ही मला माझे सुंदर रूप परत मिळवून द्याल का?” मी म्हणाले, “नाही.”

नंतर ती मला योगासंबंधी प्रश्न विचारू लागली आणि तेथेच ती खऱ्या अर्थाने प्रभावित झाली. तेव्हा ती मला म्हणाली, ”या सुरकुत्यांपासून माझी सुटका व्हावी म्हणून खरंतर मी भारतात आले, पण आत्ता तुम्ही मला जे काही सांगत आहात ते मला अधिकच भावते आहे. पण मग मी इथे कशी आले? इथे येण्याचे माझे खरे कारण तर हे नव्हते.”

तेव्हा मी तिला समजावून सांगितले की, “बाह्य व्यक्तिमत्त्वापेक्षा निराळे असेही काही असते. तुझ्यामधील चैत्य पुरुष (Psychic Being) तुला येथे घेऊन आला. चैत्य पुरुषाद्वारे बाह्य प्रेरणा ह्या केवळ निमित्तमात्र म्हणून वापरल्या जातात.”

– श्रीमाताजी
(CWM 05 : 03-04)

चैत्य पुरुषाचे जागृत होणे आणि तो पुढे येणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. चैत्य पुरुषाचे जागृत होणे म्हणजे मागे असलेल्या चैत्याची जाणीवपूर्वक कृती…

जेव्हा तो पुढे येतो तेव्हा तो मन, प्राण आणि शरीर यांच्यावर अधिराज्य गाजवतो आणि त्यांच्या सर्व हालचालींचे चैत्यीकरण करतो. विशेषत: अभीप्सा बाळगून व कोणतेही प्रश्न उपस्थित न करता, नि:शेषत्वाने श्रीमाताजींकडे पूर्णपणे वळल्याने आणि त्यांना समर्पित झाल्याने चैत्यपुरुष पुढे येतो. परंतु कधीकधी ‘आधार’ (मन, प्राण आणि शरीर) जर सक्षम झालेला असेल तर, अशावेळी तो स्वत:हूनच पुढे येतो.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 354-355)

एखाद्या व्यक्तीला चैत्य पुरुषाचा शोध घ्यावयाचा असेल, तर त्या व्यक्तीला चैत्य पुरुषाच्या अस्तित्वाविषयी दृढ विश्वास व श्रद्धा असणे, अपेक्षित आहे. व्यक्ती त्याविषयी जागरुक व्हावयास हवी आणि चैत्य पुरुषाने आपले जीवन हाती घेऊन, आपल्या कृतींना दिशादर्शन करणे हाती घ्यावे ह्यासाठी, व्यक्तीने त्याला संमती दिली पाहिजे. व्यक्तीने प्रत्येक वेळी त्याचा संदर्भ घेऊन, त्याला आपले मार्गदर्शक बनविले पाहिजे. व्यक्ती चैत्य पुरुषाला अधिकाधिक आत्मनिवेदन करत गेली, त्याचे मार्गदर्शन अधिकाधिक घेत राहिली तर, व्यक्ती स्वत:च्या अस्तित्वाच्या विविध गतिविधींविषयी जागरुक होते.

*

प्रश्न : चैत्य पुरुषाच्या संपर्कात येणे ही ‘सोपी गोष्ट’ नाही, असे तुम्ही मला लिहिले आहे. ते कठीण असते, असे तुम्ही का म्हणता? त्यासाठी मी कोठून सुरुवात करू?

श्रीमाताजी : मी ते ‘सोपे नाही’ असे म्हटले कारण तो संपर्क हा आपोआप घडत नाही, तो ऐच्छिक असतो. विचार व कृतींवर चैत्य पुरुषाचा नेहमीच प्रभाव पडत असतो, पण व्यक्तीला क्वचितच त्याची जाणीव असते. चैत्य पुरुषाबाबत सजग होण्यासाठी, व्यक्तीला तशी इच्छा हवी, तिने आपले मन शक्य तितके नि:स्तब्ध केले पाहिजे आणि स्वत:च्या हृदयात खोलवर प्रवेश केला पाहिजे, संवेदना व विचारांच्याही पलीकडे प्रवेश केला पाहिजे. शांत एकाग्रतेची आणि स्वत:च्या अस्तित्वात आत खोलवर उतरण्याची सवय व्यक्तीने लावून घ्यायला हवी. ज्यांनी ज्यांनी हा अनुभव घेतला आहे, त्यांना माहीत आहे त्याप्रमाणे, चैत्य पुरुषाचा शोध ही एक सुनिश्चित आणि अतिशय सघन अशी वास्तविकता आहे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 302) आणि (CWM 16 : 399)

वस्तुत: खरंतर जी एकमेव शोकात्म गोष्ट आहे आणि तरीही ज्याची मनुष्याला खंत वाटत नाही, ती गोष्ट म्हणजे स्वत:च्या आत्म्याचा शोध घेण्यात आणि आत्मसत्तेनुसार जीवन जगण्यामध्ये त्याला आलेले अपयश ! स्वत:च्या आत्म्याविषयी, स्वत:च्या चैत्य पुरुषाविषयी (Psychic Being) जागृत न होणे आणि जीवनामध्ये पूर्णतया त्याचे मार्गदर्शन न लाभणे, हीच खरोखर एकमेव शोकात्म गोष्ट आहे. स्वत:च्या आत्म्याचा शोध घेतल्याशिवाय आणि त्याच्या कायद्यानुसार जीवन जगल्याशिवाय मरण पावणे, हे खरेखुरे अपयश आहे.

आणि खरे महाकाव्य, खरे वैभव जर कोणते असेल तर, ते म्हणजे स्वत:मधील ईश्वराचा शोध घेणे आणि त्याच्या कायद्यानुसार जीवन व्यतीत करणे.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 277)

प्रश्न : “आपल्या गुप्त प्रकृतीमध्ये, असे काहीतरी असते की जे कळत-नकळतपणे, नेहमीच ईश्वराची आस बाळगत असते, म्हणून तो ईश्वर हाच आपले एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे.” असे येथे म्हटले आहे. आपल्या गुप्त प्रकृतीमध्ये आस बाळगून असणारी ही गोष्ट कोणती?

श्रीमाताजी : तो आपल्या अस्तित्वाचा एक भाग असतो, परंतु तो प्रत्येकाच्या बाबतीत सारखाच नसतो. तो प्रत्येक व्यक्तीमधील असा एक घटक असतो की, जो उपजतपणे चैत्याच्या प्रभावासाठी खुला असतो. प्रत्येकामध्ये नेहमीच असा एक घटक असतो – काहीकाही वेळा चैत्य खरोखरच खूप झाकलेले असते, आपण त्याविषयी अजिबात जागृत नसतो – आपल्यातील तो घटक मात्र चैत्याकडे वळलेला असतो आणि त्याचा प्रभाव स्वीकारत असतो. हा घटक, आपली बाह्य जाणीव आणि चैत्य जाणीव यांच्यामधील मध्यस्थ असतो.

हा घटक प्रत्येकाच्या बाबतीत एकच असतो असे नाही तर, प्रत्येक व्यक्तिगणिक तो भिन्न असतो. व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये किंवा व्यक्तिमत्त्वामध्ये असा एक घटक असतो की, ज्याच्या माध्यमातून ती व्यक्ती चैत्याला स्पर्श करू शकते आणि त्या माध्यमातून ती चैत्य प्रभाव स्वीकारू शकते. ते व्यक्तीवर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीनुसार ही गोष्ट वेगवेगळी असते, परंतु प्रत्येकामध्ये असा एक घटक असतोच असतो.

तुम्हाला असे सुद्धा जाणवू शकते की, काही ठरावीक गोष्टी अशा असतात की, ज्या तुम्हाला एकदम पुढे रेटतात, तुमचे उन्नयन करण्यास त्या मदत करतात, कोणत्या तरी अधिक महान अशा एखाद्या गोष्टीकडचा दरवाजा त्या जणू उघडून देतात. अशा बऱ्याच गोष्टी असतात, पण ते प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. व्यक्तीमधील तो एक असा घटक असतो की, जो इतर घटकांपेक्षा अधिक उत्सुक असतो. त्या घटकाला अधिक हुरुप असतो.

येथे दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. ही अशी एक ‘उत्साहवर्धक क्षमता’ असते की जी, व्यक्तीला तिच्या कमीअधिक जडतेमधून बाहेर काढते आणि ज्यामुळे ती व्यक्ती प्रभावित झाली होती त्या गोष्टीमध्ये कमीअधिक प्रमाणात पूर्णपणे झोकून देण्यास व्यक्तीला प्रवृत्त करते. उदाहरणार्थ, कलाकाराला त्याची कला किंवा शास्त्रज्ञाला त्याचे विज्ञान जसे प्रवृत्त करते त्याप्रमाणे…. आणि साधारणत:, जी व्यक्ती काही निर्मिती करते, काही घडवते तिच्यामध्ये हे अशा प्रकारचे खुलेपण असते, एका असामान्य क्षमतेसाठी ती व्यक्ती खुली असते, ज्यामुळे तिच्यामध्ये एक हुरुप येतो. जेव्हा अशी निर्मितीक्षमता सक्रिय होते तेव्हा व्यक्तीमधील कोणतीतरी एक गोष्ट जागृत होते आणि त्यामुळे ज्या गोष्टीची निर्मिती चालू आहे त्यामध्ये, त्या व्यक्तीचे समग्र व्यक्तित्वच सहभागी होते. ही झाली पहिली गोष्ट.

आणि असे काही जण असतात की, ज्यांच्यामध्ये उपजतच कृतज्ञतेची एक शक्ती असते; या समग्र जीवनाच्या पाठीमागे दडून असलेले जे आश्चर्य आहे असे त्यांना वाटते त्या गोष्टीप्रत, आत्मीयतेने, भक्तीने, आनंदाने प्रतिक्रिया देण्याची, प्रतिसाद देण्याची एक उत्कट गरज त्यांना भासते. अगदी छोट्यात छोट्या अशा गोष्टीमागे, जीवनातील अगदी लहानशा घटनेमागे, ज्यांना त्या ईश्वराची अनंत कृपा किंवा सार्वभौम सौंदर्य जाणवते अशा लोकांमध्ये त्या ईश्वराप्रत एक प्रकारची कृतज्ञतेची भावना असते.

मला अशी काही माणसं माहीत आहेत की, ज्यांना काही ज्ञान नव्हते, म्हणजे ते काही फार शिकलेले होते असेही नाही, त्यांची मनं ही अगदीच सर्वसाधारण म्हणता येतील अशी होती परंतु त्यांच्याकडे ही आत्मीयतेची, कृतज्ञतेची भावना होती, त्या भावनेमुळेच ते सर्व काही द्यायला तयार असत, त्या भावनेपोटीच त्यांना समज येत असे आणि ते कृतज्ञ असत. अशा व्यक्तींबाबत, अगदी नेहमी, सातत्याने हा चैत्य संपर्क होत असे.. ते जेवढ्या प्रमाणात सक्षम असत, जेवढ्या प्रमाणात सजग असत – अगदी खूप सजग असेसुद्धा नाही, थोडे जरी सजग असत तेवढ्या प्रमाणात त्यांचे उन्नयन झाल्यासारखे, त्यांना कोणीतरी उचलून घेतल्याचे, त्यांना साहाय्य मिळाल्याचे जाणवत असे.

‘उत्साहवर्धक क्षमता’ आणि ‘कृतज्ञतेची भावना’ ह्या दोन गोष्टी व्यक्तींची तयारी करून घेत असतात. ही किंवा ती गोष्ट घेऊन व्यक्ती जन्माला येते आणि थोडेसे जरी कष्ट घेतले तर ती गोष्ट हळूहळू वृद्धिंगत होते, विकसित होत जाते. म्हणजे, तुम्हाला तुमच्या क्षुद्र आणि त्रासदायक अशा अहंकारातून बाहेर काढते अशी तुमच्यामधील उत्साहवर्धक क्षमता ही एक गोष्ट किंवा दुसरी गोष्ट म्हणजे, अशी उदारहृदयी कृतज्ञता, की ज्यामुळे तुम्ही तुमच्या क्षुद्र अशा अहंकारातून बाहेर पडून, कृतज्ञतेने समर्पित होऊ पाहता अशी कृतज्ञतेची उदारता!

स्वत:च्या चैत्य पुरुषामध्ये वसलेल्या ईश्वराच्या संपर्कात येण्यासाठीच्या या अतिशय शक्तिशाली तरफा आहेत. ह्या गोष्टी चैत्य पुरुषाशी जोडणारा एक खात्रीशीर धागा म्हणून काम करतात.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 417-19)

प्रश्न : चैत्य पुरुषाच्या संपर्कात येणे ही ‘सोपी गोष्ट’ नाही, असे तुम्ही मला लिहिले आहे. ते कठीण असते, असे तुम्ही का म्हणता? त्यासाठी मी कोठून सुरुवात करू?

श्रीमाताजी : मी ते ‘सोपे नाही’ असे म्हटले कारण तो संपर्क हा आपोआप घडत नाही, तो ऐच्छिक असतो. विचार व कृतींवर चैत्य पुरुषाचा नेहमीच प्रभाव पडत असतो, पण व्यक्तीला क्वचितच त्याची जाणीव असते. चैत्य पुरुषाबाबत सजग होण्यासाठी, व्यक्तीला तशी इच्छा हवी, तिने आपले मन शक्य तितके नि:स्तब्ध केले पाहिजे आणि स्वत:च्या हृदयात खोलवर प्रवेश केला पाहिजे, संवेदना व विचारांच्याही पलीकडे प्रवेश केला पाहिजे. शांत एकाग्रतेची आणि स्वत:च्या अस्तित्वात आत खोलवर उतरण्याची सवय व्यक्तीने लावून घ्यायला हवी. ज्यांनी ज्यांनी हा अनुभव घेतला आहे त्यांना माहीत आहे त्याप्रमाणे, चैत्य पुरुषाचा शोध ही एक सुनिश्चित आणि अतिशय सघन अशी वास्तविकता आहे.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 399)