विचारशलाका ३३
चेतना ही अस्तित्वामध्ये सहजस्वाभाविकपणे असणारी एक वस्तुस्थिती आहे. पृष्ठवर्ती भागामध्ये क्रियाशील नसताना जेव्हा ती शांत, गतिविहिन असते तेव्हाही ती तेथेच असते. वरवर पाहता ती दिसत नाही, किंवा बाह्य गोष्टींवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, त्यांच्याविषयी ती जागृत नाही असे वाटत असले तरीही ती तेथेच असते; अंतरंगामध्ये ती अंतर्मुख पद्धतीने, क्रियाशील किंवा निष्क्रिय स्वरूपात असते; तिचे अस्तित्वच नाही असे आपल्याला वाटत असते; किंवा आपल्याला तिचे अस्तित्व अगदी अचेतन किंवा निर्जीव असे भासत असते तरीही ही चेतना तेथेच असते.
*
चेतना म्हणजे केवळ स्वत:बद्दलची किंवा वस्तुमात्रांबाबतची जाणीव शक्ती नव्हे; तर ती एक गतिमान आणि क्रियाशील ऊर्जा असते किंवा तिच्याकडे गतिमान आणि क्रियाशील ऊर्जा असते. ती तिच्या स्वत:च्या प्रतिक्रिया ठरवू शकते किंवा या प्रतिक्रियांपासून स्वत:ला वेगळी ठेवू शकते; ती शक्तींना फक्त प्रतिसादच देते असे नाही, तर ती या शक्ती निर्माण करू शकते किंवा स्वत:मधून शक्तींना बाहेरही काढू शकते. चेतना म्हणजे फक्त ‘चित’ नाही, तर ती ‘चित्शक्ती’देखील असते.
चेतना आणि मन या गोष्टी अभिन्न आहेत, असे सहसा मानले जाते; पण मानसिक चेतना ही अशी एक निव्वळ मानवी कक्षा आहे की, त्या कक्षेपलीकडील चेतनेच्या सर्व संभाव्य श्रेणींना ती कवळून घेऊ शकत नाही. मानवाला जे दिसू शकते किंवा ऐकू येते अशा श्रेणींच्या वर आणि खालीसुद्धा अनेक श्रेणी असतात; त्या श्रेणी मानवाला अदृश्य किंवा अश्राव्य असतात. मानवाची दृष्टी रंगांच्या किंवा त्याची श्रवणशक्ती ध्वनींच्या सर्व श्रेणी कवळू शकत नाही; मानवी चेतनेचेदेखील असेच असते.
मानवी कक्षेच्या वर आणि खालीदेखील चेतनेच्या अनेक श्रेणी आहेत; त्यांच्याशी सामान्य मानवाचा संपर्क नसतो आणि त्यामुळे त्या श्रेणी त्याला एकतर अचेतन (unconscious), अधोमानसिक (submental) किंवा अधिमानसिक (overmental), अतिमानसिक (supramental) अशा वाटतात.
– श्रीअरविंद [CWSA 28 : 15-16]