Tag Archive for: खुलेपणा

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

उन्मुखता किंवा खुलेपणा ही गोष्ट काही अगदी सुरुवातीपासूनच पूर्णत्वाला पोहोचलेली असते असे नाही. सुरुवातीला अस्तित्वाचा एखादा भाग उन्मुख होतो आणि चेतनेचे इतर भाग हे अजूनही बंद किंवा अर्धवट उन्मुख झालेले असतात; ते सर्वच्या सर्व भाग खुले व्हावेत म्हणून व्यक्तीने अभीप्सा (aspire) बाळगणे आवश्यक असते.

अगदी सर्वोत्तम आणि प्रगत साधकांमध्ये देखील पूर्ण खुलेपण येण्यासाठी काही कालावधी लागतो. तसेच एखादा साधक अध्यात्ममार्गाच्या वाटचालीमध्ये आड येणाऱ्या गोष्टी कोणताही संघर्ष न करताच सोडू शकला आहे, असेही आढळत नाही.

आणि त्यामुळे, अडीअडचणीच्या वेळी तुम्ही श्रीमाताजींकडे मदतीसाठी साद घातलीत तर ती त्यांच्या कानी पडणार नाही, असे समजू नका. मानवी प्रकृतीच्या अडीअडचणी श्रीमाताजी जाणतात आणि त्याच तुम्हाला या साऱ्यामधून बाहेर पडण्यासाठी साहाय्य करतील. धीर धरा, त्यांच्यापाशी नेहमी प्रार्थना करत राहा. तसे केलेत तर, प्रत्येक अडचणीनंतर तुमची प्रगती होईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 156-157)

 

“तुम्ही ईश्वरी शक्तीसमोर खुले व्हा म्हणजे तुम्हाला ईश्वरी शक्ती प्राप्त होईल,” असे तुम्हाला सांगण्यात आले आहे. तुम्हाला असेसुद्धा सांगण्यात आले आहे की, “श्रद्धा आणि सद्भावना बाळगा म्हणजे मग तुम्ही सुरक्षित राहाल.” खरोखरच तुम्ही दिव्य चेतनेमध्ये, दिव्य शक्तीमध्ये, दिव्य संरक्षणामध्ये न्हाऊन निघत आहात आणि जेवढ्या प्रमाणात तुमच्या ठायी श्रद्धा असेल आणि जेवढे तुम्ही स्वतःला खुले करू शकाल तेवढ्या प्रमाणात वरील गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. छोट्याछोट्या आंतरिक क्षोभाच्या गोष्टींना नकार देण्यासाठी आणि या गोष्टी उद्भवल्याच तर पुन्हा एक सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांचे तुम्हाला साहाय्य लाभते. तुमच्याबाबतीत ज्या कोणत्या दुर्घटना घडू शकल्या असत्या किंवा जे बारीकसारीक हल्ले होऊ शकले असते त्या सगळ्यापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी आणि तुम्हाला आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठीसुद्धा त्यांचे तुम्हाला साहाय्य लाभते.

पण जर तुमच्या अस्तित्वामध्ये, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये, किंवा तुमच्या प्राणामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये, अनेक घटकांमध्ये किंवा अगदी एखाद्या भागामध्येदेखील जर अवतरित होणाऱ्या शक्तीस ग्रहण करण्याची क्षमता नसेल तर, यंत्रामध्ये एखादा बारीकसा वाळूचा कण अडकला तर तो चालत्या कामात जशी खीळ घालू शकतो, तसे घडून येते. म्हणजे एखादे चांगले यंत्र अतिशय सुरळीतपणे चालू असते, सारे काही सुरळीत चालू असते आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये एखादा बारीकसा वाळूचा कण टाकलात (फार मोठा नाही, अगदी एखादा छोटासा कण) तर, अचानक त्यामध्ये काहीतरी बिघाड होतो आणि यंत्र एकाएकी बंद पडते. त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये कोठेतरी ग्रहणशीलतेचा थोडासा जरी अभाव असेल, तुमच्यामधील कोणता तरी एखादा घटक ईश्वरी शक्तीचा स्वीकार करण्यास अक्षम असेल तर, म्हणजे तो पूर्णपणे मिटलेला असेल तर, त्यातून ताबडतोब एक प्रकारचा मोठा असमतोल निर्माण होतो. म्हणजे तो भाग कोठेतरी एखाद्या छोट्याशा काळ्या डागासारखा झालेला असतो. तो अगदी छोटासा असला तरी दगडासारखा कठीण असतो. ईश्वरी शक्ती ग्रहण करण्यास तो नकार देतो; म्हणजे एकतर ती शक्ती त्याला ग्रहण करता येत नाही किंवा ती त्याला ग्रहण करायची इच्छा नसते. कारण काहीही असो पण त्यामुळे ईश्वरी शक्ती त्याच्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि जी गोष्ट ऊर्ध्वदिशेने प्रगत होत होती, जी अतिशय उत्कृष्ट रितीने बहरून येत होती, ती एकाएकी कोमेजून जाते. कधीकधी तर तुम्ही अगदी नेहमीप्रमाणे संतुलित स्थितीत असता, तुमची तब्येत उत्तम असते, सारे काही सुरळीत चालू असते, तक्रार करण्यास कोठे जागाच नसते अशा वेळीसुद्धा कधीकधी असे घडून येऊ शकते.

एखाद्या दिवशी तुम्हाला एखादी अभिनव कल्पना सुचलेली असते, एक नवीन उर्मी आलेली असते, तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची उत्कट आस असते आणि त्यासाठी तुम्हाला महान शक्ती लाभलेली असते, एखादा उत्कृष्ट अनुभव तुम्हाला आलेला असतो, त्या सुंदर अनुभवाने तुमची आंतरिक द्वारं खुली केलेली असतात, पूर्वी नसलेले असे काही नवीनच ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेले असते, जेव्हा तुम्हाला अशी खात्री असते की सारे काही व्यवस्थित चालू आहे…

मात्र अगदी पुढच्याच दिवशी, तुम्ही आजारी पडता. आणि मग तुम्ही म्हणता, “हे काय? पुन्हा तेच? अशक्य आहे हे! हे असे घडता कामा नये.” पण हे असे घडलेले असते याचे कारण मी आत्ता तुम्हाला सांगितले तेच असते – वाळूचा एक बारीकसा कण! तुमच्यामध्ये असे काहीतरी होते की जे ग्रहण करण्यास अक्षम ठरले. त्यातूनच ताबडतोब असंतुलन निर्माण झाले. ती गोष्ट अगदी आंशिक असली तरी तेवढीदेखील पुरेशी असते. परिणामतः तुम्ही आजारी पडता.

– श्रीमाताजी (CWM 05 : 176)

 

(एका साधकाने श्रीअरविंद यांना पत्राने काही शंका विचारली होती. तेव्हा त्याला काय उत्तर द्यावे हे श्रीअरविंद यांनी सचिवाला लिहून कळविले होते. ते हे पत्र…)

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचा प्रभाव ग्रहण करण्यासाठी, त्या प्रभावाप्रत स्वतःला खुले करण्याची क्षमता व इच्छा, श्रद्धा आणि आध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करण्यामध्ये संपूर्ण प्रामाणिकपणा यांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही अटी नाहीत. सहसा प्रामाणिकपणा व श्रद्धा यांचा परिणाम म्हणून, श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या प्रभावाप्रत स्वतःला खुले, उन्मुख करण्याची क्षमता निर्माण होते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 106)

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

आम्हाला (मला व श्रीमाताजींना) तुमच्यामध्ये नेहमीच एक प्रकारची गहन अभीप्सा असल्याचे आणि त्या अभीप्सेमध्ये प्रामाणिकपणा असल्याचे आढळून आले आहे. आणि तीच सतत तुम्हाला आमच्या निकट संपर्कात ठेवते. जिथे अशा प्रकारची अभीप्सेची गहनता असते, प्रामाणिकपणा असतो आणि अशी निकटता आढळते तिथे व्यक्ती (ईश्वरी शक्तीप्रत) हळूहळू खुली होत जाणार हे निश्चित असते. आणि तुमच्यामध्ये तर हा खुलेपणा आधीपासूनच अस्तित्वात आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या साधनेबाबत चिंता किंवा काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असे मला वाटते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 52)

 

हृदयामध्ये प्रामाणिकपणा असेल आणि हेतू निःस्वार्थी असेल आणि वरून (ईश्वरी शक्तीकडून) येणाऱ्या साहाय्याप्रत खुलेपणा, उन्मुखता असेल तर, कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी त्यावर मात करता येते किंवा कालांतराने त्यामध्ये बदल करता येतो.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 528)

(पूर्वार्ध)

(व्यक्तीच्या मनात जे पूर्वग्रह, पूर्वकल्पना असतात त्यामुळे तिच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये कसा अडथळा येतो, हे श्रीमाताजींनी सांगितले आणि आता त्या पुढे सांगत आहेत…)

व्यक्ती जर अगदी सहजस्वाभाविक रितीने खुली होऊ शकली… (श्रीमाताजी हातांची ओंजळ खुली करून दाखवितात.) अशा साधेपणाने खुली होऊ शकली आणि अशा रितीने, येणारी प्रत्येक गोष्ट स्वीकारण्यासाठी व्यक्ती तयार झाली तर, कदाचित काहीतरी (प्रगती) घडून येईल. अर्थातच, तुमच्यापाशी प्रगतीची तृष्णा असली पाहिजे. काही जाणून घेण्याची, स्वतःचे रूपांतरण करण्याची तळमळ तुमच्यामध्ये असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्य प्रेम व सत्या‌विषयीची आस तुमच्यामध्ये असेल आणि ती आस जर तुम्ही तशीच कायम ठेवू शकलात तर तुम्ही वेगाने प्रगती करता. खरोखर, ही आस, ही गरजच महत्त्वाची असते. इतर गोष्टी तितक्याशा महत्त्वाच्या नसतात. जर कशाची जरुरी असेल तर ती असते आस बाळगण्याची! (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (Conversation with a Disciple, October 7, 1964)

(उत्तरार्ध)

स्वत:बद्दल विचार करत राहणे, काय करावे आणि काय करू नये याची चिंता बाळगणे, स्वत:साठी काय चांगले आहे व काय वाईट, कोणत्या गोष्टीला मुरड घालायची आणि कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा, यासारखे विचार सतत करत बसणे या गोष्टी किती थकविणाऱ्या आहेत; किती कंटाळवाण्या, रटाळ, किती अळणी आहेत या! त्यापेक्षा सूर्यप्रकाशात उमलणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे जर व्यक्ती त्या परम चेतनेसमोर, परम प्रज्ञेसमोर, परम प्रकाशासमोर, परम प्रेमासमोर, स्वत:ला पूर्णपणे खुली करू शकली; ज्याला सर्वकाही ज्ञात आहे, जो सारेकाही करू शकतो, जो तुमच्या जीवनाचे संचालन करू शकतो (अशा परमेश्वरासमोर) स्वत:ला पूर्णपणे खुली करू शकली, तर मग अशा व्यक्तीला कोणत्याही चिंता, काळज्या भेडसावणार नाहीत. ही आदर्श स्थिती आहे.

पण मग हे असे का केले जात नाही? कारण व्यक्ती त्याचा विचारच करत नाही, व्यक्ती तसे करायचे विसरून जाते, आणि मग जुन्याच सवयी परत येतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अचेतनामध्ये किंवा अबोध मनामध्ये आत खोलवर कोठेतरी, एक घातक शंका नकळतपणे घर करून बसलेली असते. ती कानात कुजबुजते की, “बघ हं! तू जर काळजी घेतली नाहीस तर तुझ्याबाबतीत काहीतरी दुर्घटना घडेल. जर तू स्वत:कडे लक्ष पुरविले नाहीस तर काय घडेल काही सांगता येत नाही.’’ आणि तुम्ही एवढे मूढ असता, इतके अंध झालेले असता की, तुम्ही तेच ऐकता आणि तुम्ही फक्त स्वत:कडे लक्ष द्यायला लागता आणि मग सगळेच बिघडून जाते. मग तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून तुमच्या पेशींना थोडेसे शहाणपण, थोडेसे सामान्य ज्ञान पुरवावे लागते आणि ‘चिंता करू नका,’ ही गोष्ट त्यांना पुन्हा शिकवावी लागते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 256-257)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प आणि अभीप्सेला स्थान आहे, मात्र इच्छेला थारा नाही. जर इच्छा असेल तर तेथे आसक्ती, अपेक्षा, लालसा, समत्वाचा अभाव, ईश्वरप्राप्ती झाली नाही तर होणारे दुःख यासारख्या, योगाशी विसंगत असणाऱ्या सर्व गोष्टी आढळून येतील.

*

व्यक्तीला जे काही प्राप्त होते त्याबाबत तिने समाधानी असले पाहिजे आणि तरीही सर्वत्व (all) साध्य होत नाही तोपर्यंत व्यक्तीने, अधिकासाठी कोणताही संघर्ष न करता, शांतपणे आस बाळगली पाहिजे. तेथे इच्छा असता कामा नये, संघर्षसुद्धा असता कामा नये तर अभीप्सा, श्रद्धा, खुलेपणा असला पाहिजे आणि (मुख्य म्हणजे) ईश्वरी कृपा असली पाहिजे.

श्रीअरविंद (CWSA 29 : 61, 60)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १६

साधकाची योगमार्गावर जी वाटचाल चालू असते त्या वाटचालीमध्ये अशी एक अवस्था येते की, ज्या अवस्थेमध्ये साधक त्याच्या अंतरंगामध्ये कार्यरत असणाऱ्या दिव्य शक्तीविषयी सचेत असतो किंवा किमानपक्षी, तो त्या कार्याच्या परिणामाविषयी तरी नक्कीच सचेत असतो. (आणि अशा रितीने सचेत झाल्यामुळे) तो आता तिच्या अवतरणामध्ये किंवा तिच्या कार्यामध्ये, स्वतःच्या मानसिक गतिविधींमुळे किंवा स्वतःच्या प्राणिक अस्वस्थतेमुळे किंवा शारीरिक जडतेमुळे व तमोमयतेमुळे अडथळे निर्माण करत नाही. यालाच ‘ईश्वराप्रति खुले असणे’ (openness to the Divine) असे म्हणतात.

ईश्वराप्रति खुले होण्याचा समर्पण (Surrender) हा सवोत्तम मार्ग आहे. पण साधकामध्ये जोपर्यंत समर्पण भाव निर्माण होत नाही तोपर्यंत, अभीप्सा आणि अविचलतेच्या साहाय्याने एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे खुलेपण येऊ शकते.

स्वतःकडे असलेले सर्वकाही ईश्वराच्या स्वाधीन करणे; तसेच स्वतःकडे जे आहे ते सर्व आणि एवढेच नव्हे तर, स्वत:ला सुद्धा ईश्वराप्रति अर्पण करणे म्हणजे ‘समर्पण’. समर्पण करणाऱ्या व्यक्तीने स्वत:च्या कल्पना, इच्छा, सवयी यांचा आग्रह धरता कामा नये तर, त्या प्रत्येकाची जागा दिव्य सत्याच्या ज्ञानाने, संकल्पाने आणि कार्याने घ्यावी यासाठी, त्या दिव्य सत्याला मोकळीक देणे म्हणजे ‘समर्पण’.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 67)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३४

श्रीमाताजींचे नित्य स्मरण केल्यामुळे व्यक्तीची पूर्ण उन्मुखतेच्या, खुलेपणाच्या (opening) दृष्टीने तयारी होते. हृदय खुले होण्याने श्रीमाताजींच्या उपस्थितीची जाणीव व्हायला सुरुवात होते आणि ऊर्ध्वस्थित असलेल्या त्यांच्या शक्तिप्रत उन्मुख झाल्याने, उच्चतर चेतनेचे सामर्थ्य देहामध्ये खाली उतरते आणि तेथे राहून ते, (व्यक्तीची) संपूर्ण प्रकृती बदलण्याचे कार्य करते.
*
श्रीमाताजींची प्रार्थना करणे, त्यांचा धावा करणे या गोष्टी मनाच्या क्रिया आहेत; तर उन्मुखता ही चेतनेची एक अशी स्थिती आहे की, जी चेतनेची इतर सर्व गतिविधींपासून मुक्तता करून, तिला श्रीमाताजींकडे अभिमुख ठेवते. अशी चेतना ईश्वराकडून जे काही येईल केवळ त्याचीच आस बाळगून असते आणि ते ग्रहण करण्यास ती सक्षम असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 167), (CWSA 29 : 105)