साधना, योग आणि रूपांतरण – १९ (भाग ०३)
ध्यान कसे करायचे असते हे ज्यांना माहीत असते अशी माणसं थोडी असतात. आणि आपण असे मानूया की, पुष्कळशी साधना आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर तुम्ही ध्यानधारणेमध्ये ‘ईश्वराच्या अस्तित्वा’शी सजगपणे संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी झाला आहात. …आणि त्याचा तुमच्या चारित्र्यावर आणि तुमच्या जीवनावर अनिवार्यपणे प्रभाव पडला आहे, असेही आपण मानूया. परंतु हा प्रभाव व्यक्तिगणिक अगदी भिन्नभिन्न असतो.
अशीही काही उदाहरणं असतात की ज्यामध्ये व्यक्ती ही जणू दोन भागांमध्ये विभागल्यासारखी होते. ही अशी स्थिती असते की जेव्हा अशा प्रकारची माणसं ध्यानावस्थेमध्ये ‘ईश्वरा’च्या संपर्कामध्ये येतात आणि त्यांना सायुज्याचा परमानंद अनुभवास येतो परंतु एकदा का ती माणसं ध्यानामधून बाहेर आली आणि पुन्हा सामान्य जीवन जगू लागली, जीवनव्यवहार करू लागली की तीच माणसं अगदी अतिसामान्य बनून जातात आणि कधीकधी तर त्यांच्या प्रतिक्रिया या अत्यंत असभ्य असतात.
खरोखरच, मला अशी माणसं माहीत आहेत की जी अगदी अतिसामान्य होऊन जायची आणि मग करू नये त्या गोष्टी करत राहायची. उदाहरणार्थ, त्यांचा वेळ ते इतरांविषयी कुचाळक्या (gossiping) करण्यात घालवयाचे, फक्त स्वतःचाच स्वार्थीपणाने विचार करायचे, त्यांच्या सर्व प्रतिक्रिया स्वार्थमूलक असायच्या आणि त्यांच्या क्षुल्लक व्यक्तिगत स्वार्थासाठी ते त्यांच्या जीवनाचे व्यवस्थापन करू इच्छित असत. ते कधीच कुणाचाही विचार करायचे नाहीत किंवा ते कधीही कोणासाठी काहीही करायचे नाहीत, कोणती एखादी मोठी कल्पना त्यांच्या मनाला शिवतही नसे. आणि असे असून, ध्यानामध्ये मात्र त्यांचा ‘ईश्वरा’शी संपर्क झालेला असायचा!
आणि म्हणून ही सामान्य बाह्यवर्ती प्रकृती, की जी व्यक्तीने स्वतःच्या शरीरासोबतच अंगीकृत केलेली असते, तिच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे किती कठीण आहे, स्वतःच्या अतीत जाणे किती अवघड आहे, स्वतःच्या प्रवृत्तीमध्ये रूपांतरण घडविणे किती अवघड आहे याचा शोध ज्यांना लागलेला असतो ते म्हणतात, “हे (असे परिवर्तन घडविणे) शक्यच नाही; तेव्हा त्यासाठी उगीच प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. या जगामध्ये येताना आपण एक धूळमाखले शरीर धारण केले आहे, ते आपण झटकून टाकले पाहिजे आणि त्यापासून दूर जाण्यासाठी तयार झाले पाहिजे. हे जग आहे तसेच सोडून दिले पाहिजे, आणि करण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे शक्य तितक्या लवकर आपण पलायन केले पाहिजे आणि जर प्रत्येकजणच अशा रीतीने पळून गेला तर मग हे जगच शिल्लक राहणार नाही आणि त्यामुळे कोणते दुःखही राहणार नाही.” तर्कसंगत आहे त्यांचे हे विधान!
परंतु त्यांना जर असे सांगण्यात आले की, “इतरांना तसेच चाचपडत ठेवून स्वतः निघून जायचे? तुम्ही ही जी संकल्पना मांडली आहे ती तर अगदीच स्वार्थी आहे,” तर त्यावर त्यांचे असे उत्तर असते की, “मी जे करत आहे तेच इतरांनी केले पाहिजे. मी जे करत आहे तसेच जर प्रत्येकाने केले तर ते यातून बाहेर पडू शकतील आणि मग जगच शिल्लक उरणार नाही आणि पर्यायाने कोणतीही दुःखविवंचना राहणार नाही.”
जणूकाही हे सारे, त्या व्यक्तींच्या म्हणजे या जगाच्या निर्मितीमध्ये ज्यांचा काडीमात्र सहभाग नाही, अशा व्यक्तींच्या इच्छेवरच अवलंबून आहे! हे सारे थांबविण्याची आशा ते कशी बाळगू शकतात? किमान जर त्यांनी हे जग निर्माण केले असते, तर हे कसे निर्माण करायचे हे तरी त्यांना ज्ञात होऊ शकले असते आणि मग हे जग होत्याचे नव्हते करण्यासाठी अशा व्यक्ती प्रयत्न करू शकल्या असत्या. (अर्थात तुम्ही जे केलेले असते ते नाहीसे करणे नेहमीच सोपे असते असे नाही.) परंतु हे जग काही त्यांनी निर्माण केलेले नाही, हे जग निर्माण कसे झाले हेदेखील त्यांना ठाऊक नाही आणि ते पुन्हा पूर्ववत करायचे अशी त्यांची इच्छा आहे, कारण त्यांना असे वाटते की, ते स्वतः या जगापासून पळून दूर जाऊ शकतात…. परंतु हे शक्य आहे, असे मला तरी वाटत नाही. तुम्ही या जगापासून दूर पळायचा कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही पलायन करू शकत नाही. (क्रमशः)
– श्रीमाताजी (CWM 05 : 42-43)