Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ५०

साधक : मी सध्या ध्यानासाठी जेवढा वेळ देतो त्यापेक्षा अधिक वेळ देणे माझ्यासाठी योग्य ठरेल का, हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे. सकाळी आणि संध्याकाळी मिळून मी सुमारे दोन तास ध्यानामध्ये व्यतीत करतो. मात्र अजूनही मी ध्यान करण्यामध्ये यशस्वी झालेलो नाही. माझे शारीर-मन त्यामध्ये खूप व्यत्यय आणते.. ते शांत व्हावे आणि माझा चैत्य पुरुष (psychic being) अग्रभागी यावा, अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो. माझे मन एखाद्या वेड्या यंत्रासारखे कार्यरत असते आणि हृदय मात्र एखाद्या दगडासारखे पडलेले असते आणि हे पाहणे माझ्यासाठी खूप वेदनादायी असते. माताजी, माझ्या हृदयात मला सदोदित तुमची उपस्थिती अनुभवास यावी, अशी कृपा करावी.

श्रीमाताजी : ध्यानाबद्दल अंतरंगातून जर उत्स्फूर्तपणे तळमळ वाटत नसेल आणि तरीही ध्यान करायचे हा मनाचा स्वैर (arbitrary) निर्णय असेल तर (फक्त) ध्यानाच्या कालवाधीमध्ये वाढ करणे हे काही फारसे उपयुक्त नसते. माझे साहाय्य, प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत.

*

ध्यानासाठी ठरावीक तास निश्चित करण्यापेक्षा, सातत्याने एकाग्रतेचा आणि अंतर्मुख दृष्टिकोन बाळगणे हे अधिक महत्त्वाचे आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 52-53)

साधना, योग आणि रूपांतरण – ४८

साधक : मी तुमच्या पुस्तकात असे वाचले आहे की, “एकाग्रता हीच व्यक्तीला तिच्या ध्येयाप्रत घेऊन जाते.” असे असेल तर मग आम्ही ध्यानाचा कालावधी वाढविला पाहिजे का?

श्रीमाताजी : येथे एकाग्रतेचा अर्थ ‘ध्यान’ असा नाही. उलट, बाह्यतः तुम्ही कोणतेही कार्य करत असलात तरी तुम्ही कायम एकाग्रतेच्या स्थितीमध्ये असले पाहिजे. आपल्या सर्व ऊर्जा, आपले सर्व संकल्प, आपली सर्व अभीप्सा ही आपल्या चेतनेमध्ये केवळ ‘ईश्वरा’वर आणि ‘पूर्णयोगां’तर्गत अभिप्रेत असलेल्या ‘ईश्वरा’च्या साक्षात्काराकडे वळलेली असणे याला मी ‘एकाग्रता’ म्हणते.

– श्रीमाताजी (CWM 16 : 177-178)

साधना, योग आणि रूपांतरण – ४७

ध्यानासाठी एक ठरावीक वेळ निश्चित करता येणे शक्य असेल आणि ती नेहमी पाळणे शक्य असेल तर ते नक्कीच इष्ट ठरेल.
*
तुमची चेतना जागृत ठेवायची असेल तर तुम्ही ध्यानासाठी एक ठरावीक वेळ राखून ठेवली पाहिजे आणि श्रीमाताजींचे स्मरण करून, आमच्या संपर्कात राहिले पाहिजे. ध्यानामध्ये काही विघ्न आले तर, तुम्हाला जे प्राप्त झालेले असते ते नष्ट होत नाही, पण ते माघारी फिरण्याची शक्यता असते आणि ते पुन्हा आविर्भूत व्हायला वेळ लागतो आणि म्हणून (आपल्यातील) तो धागा तुटता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 312)

साधना, योग आणि रूपांतरण – ४६

निश्चल स्तब्ध बसणे ही एकाग्रतापूर्ण ध्यानासाठी अगदी स्वाभाविक अशी आसनस्थिती असते तर चालणे आणि उभे राहणे या, ऊर्जा वितरणासाठी आणि मनाच्या क्रियाकलापांसाठी अनुकूल अशा सक्रिय स्थिती असतात. व्यक्तीने जर स्थायी शांती आणि चेतनेची नैष्कर्म्य अवस्था प्राप्त करून घेतली असेल तर तेव्हाच व्यक्तीला चालत असताना किंवा अन्य काही करत असताना लक्ष एकाग्र करणे आणि (ईश्वरी शक्ती) ग्रहण करणे सुलभ जाते. चेतनेची जर स्वतःमध्येच मूलभूत नैष्कर्म्य अवस्था एकवटलेली असेल तर ती एकाग्रतेसाठी योग्य बैठक असते आणि शरीर निश्चल ठेवून लक्ष एकवटून बसणे ही ध्यानासाठी योग्य स्थिती असते. पहुडलेले असताना देखील एकाग्रता साधता येते पण ही स्थिती फारच निष्क्रिय असल्यामुळे चित्त एकाग्र होण्याऐवजी जडत्व, सुस्ती येण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच योगी नेहमी आसनस्थ स्थितीमध्ये बसतात. चालत असता, उभे असता, किंवा पहुडलेले असताना व्यक्ती ध्यान करण्याचा नित्य सराव करू शकते, परंतु आसनस्थ असणे ही मूळ स्वाभाविक स्थिती आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 311)

साधना, योग आणि रूपांतरण – ४५

सुरुवाती सुरुवातीला एकाग्रता करण्यासाठी, ध्यानाला बसण्यासाठी स्थिरता आणि शांतीपूर्ण अवस्था असणेच आवश्यक असते हे अगदी स्वाभाविक आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा अशी अवस्था असणे आणि ध्यान करण्याची तुम्हाला आवश्यकता वाटणे ही गोष्ट महत्त्वाची असते. परंतु अन्य वेळी मात्र त्याचा परिणाम म्हणून सुरुवातीला फक्त एक प्रकारची मानसिक अविचलता आणि विचारांपासून मुक्तता अनुभवास येईल.

कालांतराने शांतीपूर्ण अवस्था ही आंतरिक अस्तित्वामध्ये काहीशी स्थिर झालेली असते (कारण तुम्ही एकाग्रता करता तेव्हा आंतरिक अस्तित्वामध्येच प्रवेश करत असता,) तेव्हा मग ती शांतीपूर्ण अवस्था तिथून बाह्य व्यक्तित्वामध्ये येऊ लागते आणि बाह्य व्यक्तित्वाचे नियंत्रण करू लागते. आणि त्यामुळे तुम्ही काम करत असताना, इतरांबरोबर मिळूनमिसळून वागत असताना, बोलत असताना किंवा इतर व्यवहार करत असतानासुद्धा ती शांती आणि स्थिरता कायम राहते. कारण तेव्हा बाह्यवर्ती चेतना काहीही करत असली तरी आंतरिक अस्तित्व अंतरंगामध्ये स्थिरशांत असल्याचे व्यक्तीला जाणवते. खरोखर आपले आंतरिक अस्तित्व हेच आपले खरे अस्तित्व आहे आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे काहीसे पृष्ठवर्ती, वरवरचे अस्तित्व आहे आणि त्याच्या माध्यमातून आंतरिक अस्तित्वच या जीवनामध्ये कार्य करत आहे असे व्यक्तीला जाणवते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 313)

साधना, योग आणि रूपांतरण – ४३

साधक : ध्यानासाठी अत्यावश्यक अशी आंतरिक व बाह्य परिस्थिती कोणती?

श्रीअरविंद : मूलभूत अशी कोणतीही बाह्य परिस्थिती आवश्यक नसते, परंतु ध्यानाच्या वेळी एकांत व विलगपणा (solitude and seclusion ) असेल आणि त्याचबरोबर शरीराची स्थिरता असेल, तर ध्यानासाठी या गोष्टींची मदत होते. नवोदितांसाठी या गोष्टी बऱ्याचदा अगदी आवश्यक असतात.

परंतु बाह्य परिस्थितीमुळे तुम्ही बांधले गेले आहात असे होता कामा नये. एकदा ध्यानाची सवय झाली की मग, कोणत्याही परिस्थितीत म्हणजे, पहुडलेले असताना, उठता-बसता, चालताना, एकटे असताना किंवा इतर लोकांसमवेत असताना, शांततेमध्ये किंवा गोंगाटामध्ये, कोणत्याही परिस्थितीत ध्यान करता आले पाहिजे. मनाचे भरकटणे, विस्मरण, निद्रा, शारीरिक आणि नाडीगत अधीरता व अशांती या ध्यानाच्या आड येणाऱ्या साऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ‘संकल्पाची एकाग्रता’ ही आंतरिक परिस्थिती सर्वप्रथम महत्त्वाची असते.

दुसरी आवश्यक परिस्थिती म्हणजे उत्तरोत्तर वाढणारे पावित्र्य आणि जेथून विचार आणि चित्त-वृत्तींचा उदय होतो, त्या आंतरिक चेतनेची (चित्ताची) स्थिरता. म्हणजे राग, दुःख, निराशा, ऐहिक घटनांविषयीची चिंता या साऱ्या अडथळा निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांपासून ‘चित्त’ मुक्त असले पाहिजे. नैतिक आणि मानसिक पूर्णत्व या दोन्ही गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे जोडलेल्या असतात.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 295)

साधना, योग आणि रूपांतरण – ४१

(ध्यानाची उद्दिष्टे काय असतात किंवा काय असावीत यासंबंधीचा विचार आपण येथे समजावून घेत आहोत. त्याचा हा उत्तरार्ध…)

‘योगा’मध्ये एकाग्रतेचा उपयोग अन्य उद्दिष्टासाठीदेखील केला जातो. उदा. आपल्या जाग्रत स्थितीपासून (waking state) म्हणजे चेतनेची जी सीमित आणि पृष्ठवर्ती अवस्था असते त्यापासून निवृत्त होऊन, आपल्या अस्तित्वाच्या अंतरंगामध्ये खोलवर जाण्यासाठीदेखील (‘समाधी’च्या विविध अवस्थांद्वारे ही खोली मोजली जाते) एकाग्रतेचा अवलंब केला जातो. या प्रक्रियेसाठी, विचारमालिकेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा (ध्यानापेक्षा), कोणत्यातरी एकाच वस्तुवर, संकल्पनेवर किंवा नामावर लक्ष केंद्रित करणे (निदिध्यास) अधिक परिणामकारक असते.

असे असले तरी, ध्यानामुळे ‘पूर्णयोगां’तर्गत अभिप्रेत असलेल्या समाधीची पूर्वतयारी होते. असे ध्यान आपले आपल्या अस्तित्वाच्या खोलवर असणाऱ्या अवस्थांशी अप्रत्यक्षपणे पण जाग्रत सायुज्य (communion) निर्माण करते. काहीही असले तरी, जो विचार ‘पुरुषा’च्या नियंत्रणाखाली (सांख्य तत्त्वज्ञानातील पुरुष) आणला गेला आहे अशा रचनात्मक विचाराची तेजस्वी कृती हा ध्यानाचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग असतो. त्याद्वारे उर्वरित सर्व चेतना नियंत्रित केली जाते, ती उच्चतर आणि विशालतर संकल्पनांनी परिपोषित केली जाते आणि त्या संकल्पनांच्या साच्यामध्ये चेतनेचे त्वरेने परिवर्तन केले जाते आणि अशा प्रकारे चेतना पूर्णत्वाला नेली जाते.

ध्यानाचे इतर आणि महत्तर उपयोग याच्याही पलीकडचे असतात पण ते आत्मविकसनाच्या पुढील टप्प्यांशी संबंधित असतात. ‘भक्तियोगा’मध्ये, या दोन्ही प्रक्रिया (ध्यान आणि निदिध्यासन) समग्र अस्तित्व एकाग्र करण्यासाठी, समानतेने उपयोगात आणल्या जातात. किंवा भक्तीविषयाच्या (आराध्य देवतेच्या) चिंतनाने, त्याच्या रूपाने, त्याच्या सत्त्वाने, त्याच्या गुणवैशिष्ट्यांनी आणि त्याच्याबद्दलच्या भक्तिभावाच्या व ऐक्याच्या आनंदाने समग्र प्रकृती न्हाऊन निघावी यासाठी या दोन्ही प्रक्रिया समानतेने उपयोगात आणल्या जातात. तेव्हा विचार हा ‘दिव्य प्रेमा’चा सेवक, ‘कैवल्य-आनंदा’ची तयारी करून घेणारा असा घडविला जातो.

‘ज्ञानयोगा’मध्येदेखील ध्यानाचा उपयोग, वरकरणी दिसणारे रूप आणि सत्य यांमध्ये, तसेच आत्मा आणि त्याची विविध रूपे यांमध्ये सदसद्विवेक करण्यासाठी केला जातो. व्यक्तिगत चेतनेचा ‘ब्रह्मन्’मध्ये प्रवेश व्हावा आणि नंतर सायुज्य घडावे यासाठी एकाग्र निदिध्यासनाचा अवलंब केला जातो. ‘पूर्णयोगा’मध्ये या सर्वच उद्दिष्टांचा सुमेळ साधला जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 446-447)

साधना, योग आणि रूपांतरण – ३९

(पूर्णयोगांतर्गत साक्षात्कारामध्ये, स्वत:मधील ईश्वराचे दर्शन, विश्वगत ईश्वराचे दर्शन, विश्वातीत ईश्वराचे दर्शन या तीन साक्षात्कारांचा समावेश होतो. त्यातील ‘विश्वगत ईश्वराचे दर्शन’ घेण्याचा मार्ग श्रीअरविंद येथे सांगत आहेत.
श्रीअरविंदलिखित Synthesis of Yoga या पुस्तकामधील एक उतारा आणि नंतर त्याचे श्रीअरविंदकृत स्पष्टीकरण)

…ही एकाग्रता ‘संकल्पने’वर आधारित असते. कारण या ‘संकल्पने’च्या माध्यमातून मनोमय पुरुष सर्व अभिव्यक्तीच्या अतीत उन्नत होतो; जे अभिव्यक्त झाले आहे त्याच्याप्रत तो उन्नत होतो; खुद्द ती संकल्पना ही ज्याचे केवळ एक साधन आहे अशा ‘सद्वस्तु’प्रत तो उन्नत होतो. ‘संकल्पने’वर एकाग्रता केल्याने, आपण आज जे आहोत ते आपले मानसिक अस्तित्व, आपल्या मानसिकतेच्या कक्षा ओलांडून खुले होते आणि त्या चेतनेच्या एका स्थितीप्रत, जिवाच्या एका स्थितीप्रत, सचेत-पुरुषाच्या शक्तीच्या स्थितीप्रत आणि सचेत-पुरुषाच्या परमानंदाप्रत येऊन पोहोचते. ती संकल्पना ज्याच्याशी संबंधित असते आणि ती संकल्पना ज्याचे प्रतीक असते, ज्याची गतिविधी आणि लय असते अशा सद्वस्तुप्रत ती येऊन पोहोचते.

*

(वरील उताऱ्याचे श्रीअरविंदकृत स्पष्टीकरण…)

येथे वेदान्ती ज्ञानाच्या पद्धतीचे उदाहरण घेता येईल. यामध्ये ‘ब्रह्म सर्वत्र उपस्थित आहे’ या संकल्पनेवर व्यक्ती लक्ष केंद्रित करते आणि झाडाकडे, आजूबाजूच्या वस्तुमात्रांकडे, त्यामध्ये ब्रह्माचा निवास आहे आणि ते झाड किंवा ती वस्तू केवळ एक रूप आहे, या संकल्पनेनिशी पाहते. जर ती एकाग्रता योग्य प्रकारची असेल तर कालांतराने, व्यक्तीला तेथे एका अस्तित्वाची, एका उपस्थितीची जाणीव होऊ लागते आणि तेव्हा मग समोर दिसणारे झाड हे जणू एखाद्या बाह्य आवरणासारखे दिसते आणि त्यामधील अस्तित्व किंवा उपस्थिती हीच एकमेव वस्तुस्थिती असल्याचे व्यक्तीला जाणवू लागते. कालांतराने मग संकल्पना गळून पडते, आणि त्याची जागा त्या वस्तुच्या थेट दर्शनाने घेतली जाते. आता मग संकल्पनेवर लक्ष एकाग्र करण्याची आवश्यकताच उरलेली नसते, कारण व्यक्ती आता त्याकडे गहनतर चेतनेच्या साहाय्याने पाहत असते. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, संकल्पनेवर एकाग्रता करणे म्हणजे काही केवळ विचार करणे नसते, ते केवळ मननही नसते तर ती एकाग्रता म्हणजे त्या संकल्पनेच्या गाभ्यामध्ये केलेला आंतरिक निवास असतो.

– श्रीअरविंद (CWSA 23 : 321), (CWSA 29 : 305-306)

साधना, योग आणि रूपांतरण – ३७

कधी हृदय-केंद्रामध्ये तर कधी मस्तकाच्या वर लक्ष एकाग्र करण्यामध्ये काही अपाय नाही. परंतु यापैकी कोणत्याही ठिकाणी लक्ष एकाग्र करायचे म्हणजे एखाद्या विशिष्ट बिंदूवर अवधान केंद्रित करायचे असा याचा अर्थ नाही; तर तुम्ही तुमची चेतना या दोन्हीपैकी कोणत्यातरी एका ठिकाणी स्थिर करायची असते आणि एकाग्रता त्या ठिकाणावर नाही तर ‘ईश्वरा’वर करायची असते. ही गोष्ट तुम्हाला जशी योग्य, सोयीस्कर वाटेल त्यानुसार, म्हणजे डोळे उघडे ठेवून किंवा डोळे मिटून तुम्ही करू शकता. तुम्ही सूर्यावर एकाग्रता करू शकता पण सूर्यावर एकाग्रता करण्यापेक्षा ‘ईश्वरा’वर एकाग्रता करणे हे अधिक चांगले.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 309)

*

(त्राटक करण्याचा दीर्घकालीन अभ्यास नसेल तर) दृष्टी बराच वेळ एका जागी खिळवून ठेवता कामा नये. कारण त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. डोळे एका जागी खिळवून ठेवण्याची आवश्यकता नसते; दृष्टी सहजस्वाभाविक ठेवणे पुरेसे असते आणि डोळे मिटून ध्यान करताना दृष्टी ध्यानानुसार बदलली पाहिजे.

*

जेव्हा तुम्ही छायाचित्रावर लक्ष केंद्रित करून ध्यान करता तेव्हा डोळे उघडे ठेवून ध्यान करणे अधिक चांगले.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 313)

*

प्रयास म्हणजे ओढूनताणून केलेले प्रयत्न. अशीही एखादी संकल्पपूर्वक केलेली कृती असू शकते की ज्या कृतीमध्ये ओढाताण नसते किंवा प्रयास नसतात. एकाग्रतेसाठी ओढूनताणून केलेले प्रयत्न आणि एकाग्रता या भिन्न गोष्टी आहेत. ओढाताणीमध्ये उतावळेपणा आणि प्रयत्नांचा अट्टहास, जोरजबरदस्ती अध्याहृत असते तर एकाग्रता मुळातच शांत आणि स्थिर असते. ज्यामध्ये अस्वस्थता किंवा उतावळेपणा असतो त्यास ‘एकाग्रता’ म्हणता येणार नाही.

– श्रीअरविंद (SABCL 23 : 730)

साधना, योग आणि रूपांतरण – ३५

ध्यानाच्या वेळी तुम्ही तुमचे लक्ष (शरीरांतर्गत) कोणत्या भागावर केंद्रित केले आहे यावर ध्यानाचे स्वरूप अवलंबून असते.

मानसिक केंद्रं
व्यक्तीच्या प्रत्येक स्तराशी संबंधित अशी केंद्रं शरीरामध्ये असतात. (शरीरामध्ये म्हणण्यापेक्षा सूक्ष्म शरीरामध्ये असतात, असे म्हणणे अधिक योग्य होईल. अर्थात ती केंद्रं सूक्ष्म शरीरात असली तरी ती स्थूल शारीरिक देहामधील संबंधित भागांशी जोडलेली असतात.) मस्तकाच्या शिखरावर एक केंद्र असते आणि त्याच्याही वर मनाच्या अतीत असणारे किंवा उच्चतर चेतनेचे केंद्र असते. कपाळावर भ्रूमध्यामध्ये जे केंद्र असते ते विचारी, चिंतनशील मनाचे, मानसिक संकल्पाचे आणि मानसिक दर्शनाचे केंद्र असते. कंठामध्ये असणारे केंद्र हे अभिव्यक्ती करणाऱ्या किंवा बाह्याविष्करण करणाऱ्या मनाचे केंद्र असते. ही सर्व केंद्रं मानसिक केंद्रं असतात.

प्राणिक केंद्रं
(मानसिक केंद्रांच्या) खाली प्राणिक केंद्रं असतात. हृदय-केंद्र (भावनिक केंद्र), नाभी-केंद्र (गतिमान प्राण-केंद्र), नाभीखाली उदरामध्ये असणारे केंद्र हे कनिष्ठ किंवा संवेदनात्मक प्राण-केंद्र असते.

शारीरिक केंद्र
सर्वात शेवटी, मणक्याच्या तळाशी मूलाधार किंवा शारीरिक केंद्र असते.

आंतरात्मिक केंद्र
हृदयाच्या पाठीमागे आंतरात्मिक किंवा चैत्य केंद्र (psychic centre) असते. अनेक जण करतात त्याप्रमाणे व्यक्तीने जर मस्तकावर लक्ष एकाग्र केले तर ते मानसिक-आध्यात्मिक ध्यान असते, ज्यासाठी व्यक्ती प्रयत्नशील असते. व्यक्तीने जर हृदयकेंद्रावर लक्ष एकाग्र केले तर ते आंतरात्मिक ध्यान असते. व्यक्ती सहसा जेथे लक्ष केंद्रित करत असते अशी ही दोन स्थानं आहेत. परंतु जे केंद्र प्रथम उन्नत होते किंवा खुले होते ते मानसिक किंवा आंतरात्मिक केंद्रच असेल असे नाही; ते भावनिक किंवा प्राणिक केंद्रसुद्धा असू शकते. ते व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. कारण व्यक्तीमध्ये खुले होण्यासाठी जे सर्वाधिक सोपे असते ते चक्र प्रथम खुले होण्याची शक्यता असते.

जर प्राणिक केंद्र खुले झाले तर ते ध्यान, चेतनेला प्राणिक स्तर आणि त्याचे अनुभव घेण्यासाठी प्रक्षेपित करण्याची शक्यता असते. परंतु तेथून व्यक्ती त्या प्राणिक अनुभवांमध्ये गुंतून न पडता, स्वतःला त्यापासून वेगळे करून, त्यांच्याकडे अलिप्तपणे पाहू शकली – म्हणजे जणू काही ती व्यक्ती स्वतः आतमध्ये खोलवर स्थित आहे आणि तेथून स्वतःच्या बाहेर असणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण करत आहे या पद्धतीने जर ती त्या अनुभवांकडे पाहू लागली – आणि अशा रीतीने जर ती अधिकाधिक आत वळत गेली, तर ती व्यक्ती अंतरात्म्याप्रत जाऊन पोहोचण्याची शक्यता असते.

त्याचप्रमाणे, विचारांवर लक्ष एकाग्र केल्यामुळे आणि त्याच्याशी संबंधित असे अनुभव घेतल्यामुळे, व्यक्तीला मानसिक अनुभव येऊ शकतात. उदा. ‘सर्वकाही ब्रह्मच आहे’, असा विचार व्यक्ती करू शकते किंवा व्यक्ती स्वतःला विचारापासून मागे ओढून घेऊ शकते आणि बाहेरील वस्तुंकडे पाहावे त्याप्रमाणे ती स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करू शकते. आणि सरतेशेवटी व्यक्तीचा शांतीमध्ये आणि निखळ आध्यात्मिक अनुभवामध्ये प्रवेश होतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 306-307)