Tag Archive for: ईश्वरी कृपा

ईश्वरी कृपा – २६

‘ईश्वर’ आणि तुमच्यामध्ये तुम्ही इतर कोणाही व्यक्तिला, कोणत्याही कल्पनेला, कोणत्याही गोष्टीला का येऊ देता? तुम्ही जेव्हा पूर्ण अभीप्सायुक्त असता, आनंदात असता तेव्हा इतर कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही; ईश्वर आणि तुमची अभीप्सा या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व देता कामा नये. एखाद्या व्यक्तिला जर ‘ईश्वर’ त्वरेने, संपूर्णतः, समग्रतेने मिळावा असे वाटत असेल, तर त्या व्यक्तीची मनोभूमिका संपूर्ण, सर्वसमावेशक असावयास हवी. तोच त्याचा एकमेव उद्दिष्टबिंदू असायला हवा आणि त्यामध्ये इतर कोणत्याही गोष्टीचा हस्तक्षेप असता कामा नये.

‘ईश्वर’ कसा असावा, त्याने कसे वागावे, त्याने कसे वागता कामा नये, या संबंधीच्या मानसिक कल्पनांना काहीही किंमत नाही, उलट त्या मानसिक कल्पना म्हणजे मार्गातील धोंडच ठरतात. एक ‘ईश्वर’च केवळ महत्त्वाचा आहे. जेव्हा तुमची चेतना ‘ईश्वरा’ला कवळून घेते, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘ईश्वर’ काय आहे हे तुम्हाला समजते, त्या आधी नाही. कृष्ण हा कृष्ण आहे, त्यामुळे त्याने काय केले, काय केले नाही याला मग अशी व्यक्ती महत्त्व देत नाही तर ती व्यक्ती ‘त्याला’ पाहते, ‘त्याला’ भेटते; त्याचा ‘प्रकाश’, त्याची ‘उपस्थिती’, त्याचे ‘प्रेम’, त्याचा ‘आनंद’ हाच काय तो तिच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आध्यात्मिक अभीप्सेबाबतीत नेहमी हे असेच असते – हा आध्यात्मिक जीवनाचा नियम आहे.

कोणत्याही मानसिक कल्पना किंवा प्राणिक चढउतार यांच्यावर वेळ वाया घालवू नका – ते ढग पळवून लावा. जी एकमेव आवश्यक गोष्ट आहे त्यावरच तुमचे लक्ष केंद्रित करा.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 56)

ईश्वरी कृपा – २५

हे तर अगदी स्वाभाविक आहे की, एकच संपर्क किंवा एकच घटना एखाद्या व्यक्तिमध्ये सुखाची तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तिमध्ये वेदनेची भावना निर्माण करते, प्रत्येक व्यक्ती कोणता आंतरिक दृष्टिकोन बाळगते यावर ते अवलंबून असते. आणि पुढे हेच निरीक्षण एका अधिक महान अशा साक्षात्काराप्रत घेऊन जाते. परमेश्वर हा सर्व वस्तुमात्रांचा निर्माणकर्ता आहे, हे एकदा एखाद्या व्यक्तिला उमगले, नुसते उमगलेच नाही तर जाणवलेसुद्धा, आणि जर ती व्यक्ती त्या परमेश्वराच्या नित्य संपर्कात राहिली तर, सारे काही त्या ‘ईश्वरी कृपे’ची कृतीच बनून जाते आणि सारे काही स्थिर व तेजोमय आनंदामध्ये बदलून जाते.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 245)

ईश्वरी कृपा – २४

‘ईश्वरी कृपा’ सदोदित तुमच्यासोबत असते; शांत मनाने तुम्ही तुमच्या हृदयात लक्ष एकाग्र करा, म्हणजे मग तुम्हाला खात्रीपूर्वक, तुम्ही ज्याची आस बाळगून आहात ते साहाय्य आणि इतकेच नव्हे तर, मार्गदर्शनसुद्धा मिळेल.

*

‘ईश्वरी कृपा’ ही सदोदित असतेच, ती शाश्वतपणे अस्तित्वात असते, सक्रिय असते पण श्रीअरविंद म्हणतात की, ‘ईश्वरी कृपा’ स्वीकारण्यासाठी आपण ग्रहणशील स्थितिमध्ये असणे, तिला सांभाळून ठेवणे आणि आपल्याला जे काही प्रदान करण्यात आले आहे त्याचा उपयोग करणे, हे आपल्यालाच अवघड जाते… ‘ईश्वरी कृपा’ ग्रहण करण्यासाठी व्यक्तिपाशी नुसती उत्कट अभीप्सा असणेच पुरेसे नाही तर, तिच्याकडे प्रामाणिक विनम्रता आणि परिपूर्ण विश्वासदेखील असला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 87), (CWM 16 : 250)

ईश्वरी कृपा – २३

न्याय म्हणजे वैश्विक प्रकृतिच्या गतिविधींचा काटेकोर तार्किक नियतिवाद. हा नियतिवाद जडभौतिक शरीराला लागू होतो तेव्हा त्याला आजारपण असे म्हणतात. या अपरिहार्य न्यायाच्या आधारावर, वैद्यकीय मन, उत्तम आरोग्याकडे घेऊन जाणारी परिस्थिती आणण्यासाठी तार्किकपणाने धडपडते. त्याच प्रमाणे, नैतिक चेतना ही सामाजिक देहामध्ये (social body) आणि तपस्या ही आध्यात्मिक प्रांतामध्ये कार्य करते…

केवळ ‘ईश्वरी कृपे’मध्येच, हस्तक्षेप करण्याची आणि या वैश्विक न्यायाचा क्रम बदलण्याचे सामर्थ्य असते. या पृथ्वीवर ‘ईश्वरी कृपे’चे आविष्करण घडविणे हेच अवताराचे महान कार्य असते. अवताराचे शिष्य बनणे म्हणजे ईश्वरी कृपेचे साधन बनणे. दिव्य माता ही एक महान प्रबंधक आहे – ‘ईश्वरी कृपे’च्या तादात्म्याद्वारे, परिपूर्ण ज्ञानानिशी, वैश्विक न्यायाच्या परम यंत्रणेच्या तादात्म्याद्वारे ती प्रबंधनाचे (to dispense) कार्य करते. आणि दिव्य मातेच्या मध्यस्थीद्वारे, अभीप्सेचे ईश्वराप्रत असलेले प्रत्येक प्रामाणिक व विश्वासपूर्ण स्पंदन, ईश्वराने अवतरित व्हावे यासाठी त्याला आवाहन करते. आणि त्याला प्रतिसाद म्हणून ‘ईश्वरी कृपे’चा हस्तक्षेप घडून येतो.

हे ईश्वरा, तुझ्यासमोर उभे राहून कोण अगदी प्रामाणिकपणे असे म्हणू शकेल का की, ”मी कधीच कोणतीही चूक केलेली नाही.” दिवसभरात कितीदा तरी आम्ही तुझ्या कार्यामध्ये चुका करत असतो आणि तरीही त्या चुका पुसून टाकण्यासाठी नेहमीच तुझी कृपा मदतीस धावून येते. ‘तुझ्या कृपे’चा हस्तक्षेप नसता तर, वैश्विक न्याय-धर्माच्या निर्दय पात्याखाली किती जण किती वेळा आले असते बरे? येथे प्रत्येक जण, एका अशक्यतेचे प्रतिनिधित्व करतो; या अशक्यतेचे निराकरण करणे आवश्यक आहे; आणि तुझ्या दिव्य कृपेला सारे शक्य आहे. या साऱ्या अशक्यता दिव्य साक्षात्कारामध्ये रूपांतरित होऊन पूर्णत्वाला जातील, हेच तुझे अगदी तपशीलवार आणि समग्र कार्य असेल.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 83)

ईश्वरी कृपा – २१

मानवी बुद्धीच अशी आहे की, दोन गोष्टींमध्ये भेद असल्याखेरीज तिला कशाचे आकलनच होत नाही. कोणत्या तरी संकटातून ते वाचले म्हणून माझे आभार मानण्यासाठी लोकांची शेकडो पत्रं मला येत असतात; पण काहीच (विपरित) घडले नाही, म्हणून माझे आभार मानणारी पत्रं मला क्वचितच, अगदी क्वचितच येतात.

….कोणते तरी संकट आल्याखेरीज लोकांना ईश्वरी कृपेच्या कार्यप्रणालीची जाणीवच होत नाही; म्हणजे जेव्हा एखादा अपघात घडणार असतो किंवा एखादा अपघात घडलेला असतो आणि त्यातून ते सहीसलामत वाचलेले असतात, तेव्हा लोकांना त्या कृपेची जाणीव होते. पण एखादा प्रवास किंवा तत्सम काहीही, जर विनाअपघात सुरळीत पार पडले, तर ती त्याहूनही अधिक उच्च अपरिमित अशी ‘ईश्वरी कृपा’ आहे, याची त्यांना कधीच जाणीव नसते. म्हणजे, काहीही विपरित घडू नये अशाच रितीने तेथे सुसंवाद प्रस्थापित झालेला असतो. पण लोकांना ते अगदी स्वाभाविक वाटते. जेव्हा लोक आजारी पडतात आणि पटकन बरे होतात, तेव्हा त्यांच्याठायी कृतज्ञता असते; पण जेव्हा ते ठणठणीत बरे असतात तेव्हा त्यांना कृतज्ञ असावे असे कधीच वाटत नाही, आणि असे असूनही खरे तर, तोच सर्वात मोठा चमत्कार आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 405-406)

ईश्वरी कृपा – २०

एखाद्या व्यक्तीने जेव्हा ‘ईश्वर’प्राप्तीच्या साधनेसाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याबाबतीत ती व्यक्ती प्रामाणिक असते; म्हणजे असे की, तिचा संकल्प तळमळीचा, प्रामाणिक असून, तो प्रांजळपणे प्रत्यक्षात उतरविला जातो, तेव्हा त्या व्यक्तीने कशाचेच भय बाळगण्याचे कारण नाही; कारण तिच्याबाबतीत जे सारे घडते किंवा जे घडणार आहे ते तिला ईश्वराच्या साक्षात्काराप्रत सर्वात जवळच्या मार्गाने घेऊन जाईल.

हाच असतो ‘ईश्वरी कृपे’चा प्रतिसाद! जीवनातील प्रत्येक गोष्ट अगदी सहज, सुरळीत होणे म्हणजे ‘ईश्वरी कृपा’ असा लोकांचा समज असतो, पण हे खरे नाही.

‘ईश्वरी कृपा’ तुमच्या अभीप्सेची पूर्तता व्हावी यासाठी कार्य करते. आणि तुमच्या अभीप्सेची त्वरेने व वेगाने परिपूर्ती व्हावी म्हणून त्याला अनुरूप अशी प्रत्येक गोष्ट तिच्याकडून घडविली जाते. असे असल्यामुळे घाबरण्यासारखे काहीच नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 180-181)

ईश्वरी कृपा – १९

तुम्हाला जे ध्येय प्राप्त करून घ्यायचे आहे त्या दिशेने जाण्यास तुम्हाला प्रवृत्त करणारी गोष्ट म्हणजे ‘कृपा’. तुमच्या मनाद्वारे तिचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करू नका, त्यातून तुम्हाला काहीच साध्य होणार नाही, कारण ती अशी एक महान गोष्ट आहे की, मानवी शब्द किंवा भावना यांद्वारे तिचे स्पष्टीकरण करता येत नाही. ‘ईश्वरी कृपे’मुळे जीवनात सारे काही सुरळीत होते असे लोकांना वाटते. पण हे खरे नाही…

जेव्हा कृपा कार्य करते तेव्हा तिचे परिणाम सुखद असतील किंवा नसतील देखील – ती कोणतीही मानवी मूल्य विचारात घेत नाही, सामान्य आणि वरवरच्या दृष्टिकोनातून पाहिले असता, कधीकधी ती आपत्तीदेखील ठरू शकते. पण ते नेहमीच त्या व्यक्तिसाठी सर्वोत्तम असेच असते. अत्यंत त्वरेने प्रगती घडावी म्हणून ईश्वराने केलेला तो आघात असतो. ‘ईश्वरी कृपा’ ही साक्षात्काराच्या दिशेने तुम्हाला अगदी वेगाने वाटचाल करायला प्रवृत्त करते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 97)

ईश्वरी कृपा – १८

(व्यक्तीचे शारीरिक आरोग्य, शरीराची स्वास्थ्यकारक वृत्ती, त्याची जडणघडण यावर विवेचन केल्यानंतर श्रीमाताजी ‘ईश्वरी कृपे’बद्दल म्हणाल्या…)

व्यक्तीच्या अंतरंगात जर ‘ईश्वरी कृपे’विषयी अशी श्रद्धा असेल की, ‘ईश्वरी कृपा’ माझ्याकडे लक्ष ठेवून आहे आणि काहीही झाले तरी ‘ईश्वरी कृपा’ आहेच, आणि ती माझ्यावर दृष्टी ठेवून आहे तर, (व्यक्ती अशी श्रद्धा नेहमीच, व आयुष्यभर बाळगू शकते) तिच्या साहाय्याने व्यक्ती कोणत्याही संकटामधून पार होऊ शकते, या श्रद्धेच्या साहाय्याने सर्व अडचणींना सामोरे जाऊ शकते, अशा व्यक्तीला काहीच विचलित करू शकत नाही कारण तिच्यापाशी श्रद्धा असते आणि ‘ईश्वरी कृपा’देखील तिच्यासोबत असते. ती अनंतपटीने शक्तिशाली, अधिक सचेत, अधिक चिरकाळ टिकणारी अशी शक्ती आहे; तुमची शारीरिक ठेवण कशी आहे, तिची अवस्था काय आहे यावर ती शक्ती अवलंबून नसते; ती ‘ईश्वरी कृपे’खेरीज अन्य कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसते आणि म्हणून ती ‘सत्या’वरच विसंबून असते आणि मग तिला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 297)

ईश्वरी कृपा – १७

प्रश्न : तुम्ही असे सांगितले आहे की, “आपण कर्मबंधनाने बांधले गेलेलो असतो”, पण जेव्हा ईश्वरी कृपा कार्य करते तेव्हा ती कर्माचा निरास करते…

श्रीमाताजी : हो अगदी पूर्णपणे, ‘ईश्वरी कृपा’ कर्माचा पूर्ण निरास करते. सूर्यासमोर लोणी ठेवले तर ते जसे वितळून जाईल, तसे होते.

…तुमच्याकडे जर पुरेशी प्रामाणिक अभीप्सा असेल किंवा पुरेशी तीव्र प्रार्थना असेल, तर तुम्ही तुमच्यामध्ये असे काहीतरी खाली उतरवू शकता की, ज्यामुळे प्रत्येक गोष्टच, अगदी प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. खरोखर, प्रत्येक गोष्ट बदलून जाते. एक अगदी मर्यादित असे छोटेसे उदाहरण देता येईल की, ज्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी नीट समजून येतील. दगड अगदी यांत्रिकपणे खाली पडतो; समजा एखादी फरशी सैल झालेली आहे तर ती खाली पडेल, हो ना? पण जर समजा, प्राणिक वा मानसिक निर्धार असणारी एखादी व्यक्ती तिथून जात असेल; आणि तिला असे वाटले की, ती फरशी खाली पडू नये, आणि त्या व्यक्तिने जर हात पसरले तर ती फरशी त्या व्यक्तिच्या हातावर पडेल; पण ती खाली जमिनीवर पडणार नाही. तेव्हा, त्या दगडाची वा फरशीची नियती त्या व्यक्तिने बदललेली असते. येथे वेगळ्या प्रकारच्या नियतिवादाचा प्रवेश झालेला आहे. तो दगड आता कोणाच्यातरी डोक्यात पडण्याऐवजी, तो त्या व्यक्तिच्या हातावर पडतो आणि त्यामुळे कोणी दगावत नाही. येथे कमीअधिक अचेतन अशा यंत्रणेमध्ये एका वेगळ्या प्रतलावरील सचेतन इच्छाशक्तिचा हस्तक्षेप घडून आलेला असतो.

…मी आत्ता म्हणाले त्याप्रमाणे, पुरेशी प्रामाणिक अभीप्सा किंवा पुरेशी तीव्र प्रार्थना हा तो उपाय होय. मी “किंवा’’ असे म्हटले आहे, परंतु मला “किंवा” असे अभिप्रेत नाही. …दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. कर्मामध्ये बदल घडवून आणण्यासाठी फार मोठी विनम्रता आणि प्रचंड इच्छाशक्ती हवी.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 90-91)

ईश्वरी कृपा – १६

भविष्यामध्ये जो मार्ग उलगडत जाणार आहे, त्या मार्गाला बदलू शकण्यास; पुरेशी प्रामाणिक अभीप्सा आणि पुरेशी उत्कट प्रार्थना या दोन गोष्टी सक्षम नसतात, असे कोण म्हणेल बरे?

ह्याचाच अर्थ असा की, सर्व काही शक्य आहे.

व्यक्तीकडे पुरेशी अभीप्सा आणि पुरेशी उत्कट प्रार्थना मात्र हवी. मानवी प्रकृतिला ती देणगी देण्यात आलेली आहे. ईश्वरी कृपेद्वारे मानवी प्रकृतिला देण्यात आलेल्या बहुमूल्य देणग्यांपैकी ही एक देणगी आहे; मात्र, तिचा उपयोग कसा करायचा हे व्यक्तीला माहीत नसते.

म्हणजे असे म्हणता येईल की, दैववादाच्या आडव्या रेषा असल्या तरीदेखील ह्या आडव्या रेषा ओलांडून पलीकडे कसे जायचे आणि चेतनेच्या सर्वोच्च बिंदुपर्यंत कसे जाऊन पोहोचायचे हे ज्या व्यक्तीला माहीत आहे अशी व्यक्ती गोष्टींमध्ये परिवर्तन घडवून आणू शकते; वरकरणी, ज्या गोष्टी अगदी पूर्णत: पूर्वनिर्धारित असल्यासारख्या दिसतात त्या गोष्टींमध्येदेखील अशी व्यक्ती परिवर्तन घडवू शकते…

– श्रीमाताजी
(CWM 05 : 88)