ईश्वरी कृपा – ३२
तुम्ही जर अगदी प्रामाणिक अभीप्सेने आध्यात्मिक जीवनाकडे वळला असाल तर, कधीकधी असुखद गोष्टींचा तुमच्यावर जणू भडिमार होतो. उदाहरणार्थ, तुमच्या अगदी जवळच्या मित्रांशी तुमचे भांडण होते, तुमचे कुटुंबीय तुम्हाला घराबाहेर हाकलून देतात, तुम्ही जे प्राप्त करून घेतले आहे असे तुम्हाला वाटत असते ते तुम्ही गमावून बसता इ. इ.
मला असा एक माणूस माहीत आहे की, जो फार मोठी अभीप्सा बाळगून भारतामध्ये आला होता. ज्ञानप्राप्तीसाठीचे आणि योगसाधनेबाबतचे खूप काळ प्रयत्न करून झाल्यावर मग तो भारतात आला होता.
ही खूप पूर्वीची गोष्ट आहे. त्या काळी लोक साखळी असलेले घड्याळ वापरत असत. तर, ह्या सद्गृहस्थाला त्याच्या आजीने एक सोन्याची पेन्सिल दिलेली होती, त्याच्या दृष्टीने ती जगातील सर्वात मौल्यवान वस्तू होती. ती पेन्सिल त्या साखळीला अडकविलेली होती. जेव्हा तो बंदरावर – पाँडिचेरी किंवा भारतात कोणत्यातरी बंदरावर किंवा मला वाटते, कोलंबोला उतरला – त्या काळी प्रवाशांना, जहाजातून छोट्या बोटींमध्ये आणि मग त्या बोटींद्वारे किनाऱ्यावर आणून सोडत असत. त्यामुळे ह्या सद्गृहस्थाला जहाजाच्या मार्गिकेवरून बोटीमध्ये उडी मारावी लागली. त्याची पायरी चुकली, त्याने कसाबसा तोल सांभाळला, पण त्या धावपळीमध्ये ती सोन्याची पेन्सिल सरळ खाली समुद्रात पडली आणि पार तळाशीच गेली. प्रथम तो काहीसा उद्विग्न झाला, पण नंतर त्याने स्वत:लाच समजावले, “ठीक आहे, हा तर भारताचा प्रभाव दिसतो आहे – मी माझ्या आसक्तीपासून मुक्त झालो आहे.”…
जे खूप प्रामाणिक आहेत त्यांच्याबाबतीत अशा घटना घडून येतात. मूलत: अडचणी, संकटांचे पर्वत हे प्रामाणिक लोकांसाठीच असतात. जे प्रामाणिक नसतात त्यांना खूप सुंदर, विलोभनीय रंगांच्या गोष्टी भुरळ पाडण्यासाठी मिळत जातात, परंतु, सरतेशेवटी त्यांना कळून चुकते की ते चुकले आहेत. पण ज्या कोणाला खूप अडीअडचणी, संकटे येतात त्यांवरून हे सिद्ध होते की, ते प्रामाणिकपणाच्या एका विशिष्ट पातळीपर्यंत येऊन पोहोचले आहेत.
– श्रीमाताजी
(CWM 05 : 157)