आध्यात्मिकता ०८
तुम्ही तुमच्या पत्रामध्ये वर्णन केलेल्या परिपूर्णत्वाच्या गोष्टी या कितीही चांगल्या असल्या तरी, त्याचे वर्णन मी ‘आध्यात्मिक’ या शब्दाचा जो खरा अर्थ आहे त्या अर्थाने करणार नाही. कारण त्यामध्ये आध्यात्मिकतेच्या सारभूत आवश्यक अशा गोष्टींचा अभाव आहे. सर्व प्रकारचे पूर्णत्व हे खरोखर चांगलेच असते, कारण या किंवा त्या स्तरावर, या किंवा त्या मर्यादेत पूर्ण आत्माविष्काराच्या दिशेने, चेतनेचा जो प्रेरक-दाब (pressure) जडभौतिक विश्वावर पडतो, त्याची ती खूण असते. एका विशिष्ट अर्थाने ती स्वयमेव ‘ईश्वरा’चीच प्रेरणा असते, जी विविध रूपांमध्ये दडलेली असते. तिच्याद्वारे, चेतनेच्या निम्नतर श्रेणींमध्ये स्वयमेव ‘ईश्वर’च स्वतःच्या चढत्यावाढत्या आत्म-प्रकटीकरणाच्या (self-revelation) दिशेने स्वतःला प्रवृत्त करत असतो.
अचर निसर्गामध्ये एखाद्या वस्तूचे किंवा दृश्याचे पूर्णत्व; सामर्थ्य, वेग, शारीरिक सौंदर्य, धैर्य किंवा प्राण्यांची एकनिष्ठता, प्रेम, बुद्धिमत्ता यांचे सचेतन पूर्णत्व; कला, संगीत, काव्य, साहित्य यांचे पूर्णत्व; परिपूर्ण राजधुरंधर, योद्धा, कलाकार, कारागिर यांच्या मानसिक कृतीच्या कोणत्याही प्रकारातील बुद्धीचे पूर्णत्व; प्राणिक शक्ती आणि क्षमता यांचे पूर्णत्व; नैतिक गुणांमधील, चारित्र्यामधील, स्वभावधर्मातील पूर्णत्व – या सर्व गोष्टींना त्यांचे त्यांचे उच्च मूल्य आहे; उत्क्रांतीच्या शिडीवरील एक पायरी या दृष्टीने त्यांचे प्रत्येकाचे असे एक स्थान आहे; चैतन्याच्या उदयाच्या क्रमबद्ध पायऱ्या म्हणून त्यांचे मोल आहे. त्या पाठीमागे असलेल्या ‘ईश्वरा’च्या या अदृश्य प्रेरणेमुळे, त्याला आध्यात्मिक असे संबोधावे असे जर कोणाला वाटत असेल तर त्याने तसे खुशाल संबोधावे; फार फार तर, ती गुप्त चैतन्याच्या उदयाची पूर्वतयारी आहे, असे म्हणता येईल. परंतु, आवश्यक भेद केल्यानेच, विचार आणि ज्ञान प्रगत होऊ शकतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुष्कळसा गोंधळ निर्माण झाला आहे.
हा मानसिक आदर्शवाद, नैतिक विकास, धार्मिक पावित्र्य आणि उत्साह, गूढशक्ती आणि त्याचे विक्रम या सगळ्या गोष्टींची आजवर ‘आध्यात्मिकता’ म्हणून गणना करण्यात आली होती आणि आध्यात्मिक उत्क्रांती ही चेतनेच्या निम्नतर स्तरांशीच जखडून ठेवण्यात आली होती; वास्तविक त्या गोष्टींनी अनुभवाद्वारे आध्यात्मिक चेतनेसाठी जिवाची तयारी करून दिली होती, पण या गोष्टी म्हणजे स्वयमेव ‘आध्यात्मिकता’ नव्हे.
हे पूर्णत्व तेव्हाच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक बनते, जेव्हा हे पूर्णत्व जागृत झालेल्या आध्यात्मिक चेतनेवर आधारलेले असते आणि त्याने त्या चेतनेचे विशिष्ट सार ग्रहण केलेले असते. [क्रमश:]
– श्रीअरविंद [CWSA 28 : 416]