Tag Archive for: आजारपण

साधना, योग आणि रूपांतरण – २९६

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतन (subconscient) हे शरीराला प्रभावीत करते कारण शरीरातील सर्व गोष्टींची घडण ही अवचेतनामधूनच झालेली असते आणि खुद्द त्या अवचेतनामधील सर्व गोष्टी अजून अर्ध-सचेतच (half conscious) असतात आणि (म्हणूनच) त्यातील बहुतांशी कार्य हे अवचेतन म्हणावे असेच असते. आणि म्हणूनच शरीरावर सचेत मन किंवा सचेत संकल्पाचा किंवा अगदी प्राणिक मन व प्राणिक इच्छेचा प्रभाव पडण्याऐवजी, त्यावर अधिक सहजतेने अवचेतनेचा प्रभाव पडतो. मात्र ज्या गोष्टींवर सचेत मनाचे व प्राणाचे नियंत्रण स्थापित झालेले असते आणि स्वयमेव अवचेतनेने ते स्वीकारलेले असते, त्यांचा येथे अपवाद करावा लागेल.

असे नसते तर, (अवचेतनाचा प्रभाव पडत नसता तर) मनुष्याचे स्वतःच्या कृतींवर आणि शारीर-स्थितींवर पूर्णपणे नियंत्रण राहिले असते आणि मग आजारपणाची शक्यताच उरली नसती किंवा जरी आजारपण आले असतेच तरी ते मनाच्या कृतीद्वारे त्वरित बरे करता आले असते. परंतु (सद्यस्थितीत) ते तसे नाही. आणि म्हणूनच उच्चतर चेतना खाली उतरवली पाहिजे, तिच्याद्वारे शरीरास व अवचेतनास प्रकाशित केले पाहिजे आणि शरीराने व अवचेतनाने उच्चतर चेतनेचे आधिपत्य मान्य करण्याची सवय लावून घेतली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 599)

साधना, योग आणि रूपांतरण – २८२

शरीराचे रूपांतरण

दु:ख येते तेव्हा ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते आणि जितक्या लवकर आपण हा धडा घेऊ तितक्या प्रमाणात दु:खाची गरज कमी होते आणि जेव्हा आपल्याला त्याचे रहस्य कळते, तेव्हा दु:खाची शक्यताच मावळून जाते. कारण ते रहस्य आपल्याला कारणाचा उलगडा करून देते; दु:खाचे मूळ, त्याचे ध्येय आणि त्याच्या पलीकडे जाण्याचा मार्ग प्रकट करते.

व्यक्तीने अहंभावाच्या वर उठून, त्याच्या तुरुंगातून बाहेर पडावे, ‘ईश्वरा’शी स्वत:चे ऐक्य साधावे, त्याच्यामध्ये विलीन व्हावे, आपण ‘ईश्वरा’पासून दुरावले जाऊ अशी संधी व्यक्तीने कोणत्याही गोष्टीला देऊ नये; (हे व्यक्तीला उमगावे म्हणून दु:खभोग असतात,) हे ते रहस्य आहे. आणि एकदा का व्यक्तीला हे रहस्य गवसले आणि तिने स्वत:मध्ये त्याची अनुभूती घेतली की, दु:खाचे प्रयोजनच संपून जाते आणि दु:खभोग नाहीसे होतात. हा एक सर्वात शक्तिमान उपाय असून अस्तित्वाच्या केवळ सखोल भागांमध्ये, आत्म्यामध्ये, किंवा आध्यात्मिक चेतनेमध्येच तो शक्तिमान ठरतो असे नव्हे, तर तो उपाय जीवन आणि शरीर यांच्या बाबतीतही उपयोगी असतो. या रहस्याचा जो शोध लागलेला असतो त्यास किंवा ते रहस्य प्रत्यक्षात उतरविण्याच्या कृतीस विरोध करू शकेल असा कोणताच आजार किंवा कोणताच विकार नसतो. म्हणजे असा आजार केवळ व्यक्तीच्या उच्चतर भागांमध्येच नव्हे तर, शरीराच्या पेशींमध्येदेखील असू शकत नाही.

पेशींना त्यांच्या आतमध्ये दडलेल्या वैभवाविषयी शिकविण्याची युक्ती जर व्यक्तीला कळली; तसेच त्या पेशी ज्यामुळे अस्तित्वात आहेत, ज्यामुळे त्यांना जीवन प्राप्त झाले आहे त्या वास्तविकतेची जाण एखादी व्यक्ती जर त्यांना करून देऊ शकली, तर त्या पेशीसुद्धा संपूर्ण सुसंवादी होतात आणि ज्याप्रमाणे व्यक्तीचे इतर सारे विकार नाहीसे होतात अगदी त्याचप्रमाणे शारीरिक विकारही नाहीसे होतात.

परंतु असे व्हायला हवे असेल तर व्यक्तीने भित्रे किंवा भीतीग्रस्त असता कामा नये. जेव्हा एखादी शारीरिक व्याधी येते तेव्हा व्यक्तीने घाबरून जाता कामा नये किंवा तिच्यापासून पळ काढता कामा नये, तर व्यक्तीने त्या व्याधीला धीराने, शांतस्थिरतेने, विश्वासाने आणि खात्रीने सामोरे गेले पाहिजे. त्या व्यक्तीला ही खात्री असली पाहिजे की, आजारपण हे मिथ्यत्व आहे, आणि व्यक्ती जर पूर्णपणे, अगदी पूर्ण विश्वासाने, संपूर्ण अविचलतेने ‘ईश्वरी कृपे’कडे वळली तर ती कृपा, जशी व्यक्तीच्या अंतरंगामध्ये खोलवर प्रस्थापित झालेली असते तशीच ती या पेशींमध्ये स्थिर होईल आणि शाश्वत ‘सत्य’ व ‘आनंदा’मध्ये या पेशीसुद्धा सहभागी होतील.

– श्रीमाताजी (CWM 09 : 42-43)

विचार शलाका – ०५

प्रश्न : आजारपण येणार असे वाटत असेल तर, व्यक्तीने ते कशा प्रकारे थोपवावे?

श्रीमाताजी : सर्वप्रथम, तुम्हाला आणि तुमच्या शरीरातील कोणालाच ते हवे असता कामा नये. आपण आजारीच पडता कामा नये, अशी तुमच्यामध्ये अतिशय प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. ही पहिली अट आहे.

दुसरी अट अशी की, प्रकाशाला, साम्यावस्थेच्या प्रकाशाला, शांतीच्या, स्थिरतेच्या आणि समतोलाच्या प्रकाशाला आवाहन करून, तो प्रकाश शरीरातील पेशींपर्यंत पोहोचविला पहिजे. पेशी भयभीत होऊ नयेत म्हणून, त्यांचे प्रशासन केले पाहिजे; ही सुद्धा आणखी एक अट आहे.

तुम्ही आजारपणाला आकर्षित करता कामा नये किंवा त्याने घाबरून देखील जाता कामा नये. आजारपणाच्या भीतीमुळे ते नको असेही तुम्हाला वाटता कामा नये. ‘ईश्वरी कृपे’ची शक्ती तुमचे प्रत्येक गोष्टीपासून संरक्षण करेल याविषयी, तुम्हाला पूर्ण विश्वास आणि धीरयुक्त खात्री असली पाहिजे. त्यानंतर तुम्ही कोणत्यातरी दुसऱ्या गोष्टीचा विचार करा, त्या आजारपणाचा विचार करणे पूर्णपणे सोडून द्या.

जेव्हा तुम्ही या दोन गोष्टी केलेल्या असतील, म्हणजे, एकतर तुमच्या इच्छेनिशी तुम्ही आजारपणाला नकार दिला असेल आणि देहपेशींमधील भीतीचा पूर्णपणे निरास होईल असा विश्वास त्या पेशींमध्ये ओतला असेल आणि नंतर आजारपणाविषयी यत्किंचितही विचार न करता, तो अस्तित्वात आहे ह्याचा जराही विचार न करता, दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीमध्ये स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेतले असेल तर, अगदी संसर्गजन्य रोग झालेल्या लोकांच्या जरी तुम्ही संपर्कात आलात, तरीही तो आजार तुम्हाला होणार नाही.

पण हे कसे करावयाचे हे तुम्हाला माहीत हवे – अनेक जण म्हणतात, “मी काही घाबरलेलो नाहीये.” अशा वेळी, त्या माणसाच्या मनामध्ये भीती नसते, त्याचे मन घाबरलेले नसते, ते कणखर असते, ते घाबरलेले नसते, पण त्याच्या शरीराचा मात्र थरकाप उडालेला असतो आणि त्याला मात्र ते माहीतच नसते, कारण ही भयकंपितता त्याच्या शरीराच्या पेशींमध्ये असते. त्याचे शरीर प्रचंड चिंतेने थरकापत असते आणि त्यातूनच आजारपणाला निमंत्रण मिळते. आणि अशा वेळीच, व्यक्तिने पूर्ण शांतीची स्थिरता व शक्ती आणि ‘ईश्वरी कृपा’ यांवर संपूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWA 07 : 142-143)

तुम्हाला जर बरे व्हायचे असेल तर दोन अटी आहेत. पहिली अट अशी की, तुम्ही भीती बाळगता कामा नये, अगदी निर्भय राहायला हवे. आणि दुसरी अट अशी की, तुमच्यामध्ये ईश्वरी संरक्षणाबद्दल पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. ह्या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 15: 141)

आजारपणाचे शारीरिक किंवा मानसिक, बाह्य वा आंतरिक, कोणतेही कारण असू दे, परंतु त्याचा परिणाम शारीरिक देहावर होण्यापूर्वी, व्यक्तीभोवती असणाऱ्या आणि तिचे संरक्षण करणाऱ्या अजून एका स्तराला त्या आजाराने स्पर्श करणे आवश्यक असते. या सूक्ष्म स्तराला वेगवेगळ्या शिकवणीमध्ये विविध नावे असतात. कोणी त्याला आकाशदेह म्हणतात तर कोणी त्याला नाडीगत आवरण किंवा प्राणमय कोश (Nervous Envelope) म्हणतात. एखादी खूप गरम आणि उकळती वस्तू असली तर तिच्या भोवती जशी धग जाणवणारी, सूक्ष्म संवेदना असते, तशीच काहीशी त्याची घनता असते, ती त्याच्या शरीरातून बाहेर उत्सर्जित होत असते आणि ती शरीरावर अगदी निकट आवरण घालून असते.

या स्तराच्या माध्यमातूनच बाह्य जगताशी व्यक्तीचे सर्व व्यवहार होत असतात आणि शरीरावर प्रत्यक्ष परिणाम होण्यापूर्वी या प्राणमय कोशावर हल्ला होणे आणि त्यातून आत शिरकाव होणे हे प्रथम आवश्यक असते. हे आवरण जर पूर्णपणे बलवान आणि अभेद्य असेल, तर मग प्लेग किंवा कॉलरासारख्या महाभयंकर आजाराने ग्रस्त असलेल्या ठिकाणी जरी तुम्ही गेलात, तरी तुम्ही निरोगी राहू शकता. जोपर्यंत हे आवरण पूर्ण आणि समग्र आहे, एकसंध आहे, त्याचे घटक हे निर्दोष समतोल राखून आहेत, तोपर्यंत आजारांच्या सर्व संभाव्य हल्ल्यांपासून हे एक परिपूर्ण संरक्षण असते.

एका बाजूने शरीर हे जडतत्त्वाने बनलेले असते, जडद्रव्याने म्हणण्यापेक्षा भौतिक परिस्थितीने बनलेले आहे, असे म्हटले पाहिजे तर दुसऱ्या बाजूने ते आपल्या मानसिक स्थितीच्या स्पंदनांनी बनलेले असते. शांती, समता, आरोग्याबद्दल खात्री आणि श्रद्धा, स्वस्थ विश्रांती, प्रसन्नता आणि उजळ आनंदीपणा या तत्त्वांपासून हे आवरण बनलेले असते. आणि या आवरणाला ही तत्त्वे बळ आणि द्रव्य पुरवितात. अगदी सूक्ष्म आणि त्वरित प्रतिक्रिया देणारे असे हे संवेदनशील माध्यम असते; ते अगदी त्वरेने सर्व प्रकारच्या सूचनांचा स्वीकार करते आणि स्वतःमध्ये त्वरेने बदल घडवून आणू शकते आणि त्याची परिस्थितीही जवळजवळ पूर्णपणे बदलून टाकू शकते.

वाईट सूचनेचा त्याच्यावर खूपच जोरकसपणे परिणाम होतो; तसेच उलट, तितक्याच जोरदारपणे चांगल्या सूचनेचाही त्याच्यावर परिणाम होतो. नैराश्य आणि नाउमेद यांचा त्याच्यावर खूपच प्रतिकूल परिणाम होतो; या गोष्टी त्या आवरणाला छिद्रे पाडतात, जणू त्याच्या द्रव्यामध्ये छेद करून त्याला कमकुवत, अप्रतिकारक्षम बनवितात आणि विरोधी हल्ल्यांना सुकर असा मार्ग खुला करून देतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 89)

प्रत्येक देशामध्ये असे काही समूह असतात की जे मद्याचा निषेध करतात किंवा पूर्ण वर्ण्य करतात. मदिरेला स्पर्शही करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यातील सदस्य करतात. आणि काही ठरावीक शहरांमध्ये त्यांच्या विक्रीला बंदी असते. पण इतर ठिकाणी, जिथे दारूचे सेवन आधी माहीत नव्हते, तिथेही आता त्याचा प्रभाव वाढत आहे.

उदाहरणार्थ, भारतामध्ये जिथे अनेक शतके दारूबंदीचे साम्राज्य होते, तिथे प्राचीन गोष्टींमध्ये असलेल्या राक्षसांपेक्षाही अधिक भयानक स्वरूपात तिचा शिरकाव झाला आहे. कारण ज्या भयानक राक्षसांविषयी ते बोलत ते राक्षस केवळ शरीरालाच इजा करणारे असत, तर दारूमध्ये मात्र विचार आणि चारित्र्य नष्ट करण्याची ताकद असते. त्यातील पहिली सुरुवात शरीरापासून होते. जे पालक खूप जास्त प्रमाणात तिचे सेवन करतात, त्यांच्या मुलांना त्रास होतो. ती माणसाच्या बुद्धिमत्तेवर परिणाम करते आणि खरंतर जे मानवतेचे सेवक असायला हवेत त्यांना दारू तिचे गुलाम बनवून टाकते.

आपण प्रत्येकानेच खरंतर मानवतेचे सेवक असले पाहिजे. आणि जर का आपण आपल्या खाण्याने किंवा पिण्याने, आपली मनं व शरीरं कमकुवत करून टाकू, तर जे नोकर, नीटपणे काम करू शकत नाहीत अशा वाईट नोकरांमध्ये आपली गणना होईल.

शस्त्र तुटून गेल्यावर एखाद्या सैनिकाची स्थिती काय होईल ? जहाजाचे शीडच गमावल्यावर खलाशाची काय स्थिती होईल ? घोडा लुळापांगळा झाला तर घोडेस्वाराची स्थिती काय होईल? त्याप्रमाणेच, माणसाला प्राप्त झालेल्या सर्वात मौल्यवान अशा त्याच्या क्षमता त्याने गमावल्या तर माणूस काय करू शकेल ? एखाद्या चांगल्या प्राण्याइतकी सुद्धा त्याची किंमत उरणार नाही. कारण प्राणी निदान त्यांना घातक असणाऱ्या अन्नाचे किंवा द्रव्याचे सेवन तरी वर्ज्य करतात.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 208)

तीन गोष्टींपासून माणसाने स्वतःला जपले पाहिजे.

एक म्हणजे रोगाची सामूहिक सूचना. रोग हा निःसंशयपणे अस्तित्वात असणारी गोष्ट आहे, म्हणजे कार्यामध्ये विलंब करण्याचा, कार्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही विरोधी शक्ती असतातच, ह्या अर्थाने म्हणावयाचे आहे.

बाह्यतः ते रोग काही कल्पनांवर आधारलेले असतात; रोगजंतुंविषयीच्या, जीवजंतुंविषयीच्या आणि तत्सम गोष्टींविषयीच्या ज्ञानावर ते आधारलेले असतात. (त्याला लोक ‘ज्ञान’ असे म्हणतात.) पण रोगजंतुंमुळे रोग होतात असे म्हणणे म्हणजे गोष्टी उलट्यापालट्या करण्यासारखे आहे, खाली डोकं वर पाय करण्यासारखे आहे कारण हे रोगजंतू, जीवजंतू आणि तत्सम गोष्टी ह्या कारण नसून परिणाम असतात.

तीन गोष्टींच्या एकत्रिकरणाचा त्या परिणाम असतात.

दुरिच्छा, कमीअधिक प्रमाणातील पूर्णपणे वाईट अशी इच्छा; नियम व त्याचे परिणाम यांविषयीचे अज्ञान म्हणजे कारण व त्याचा परिणाम यांविषयीचे घोर अज्ञान; आणि अर्थातच, एक प्रकारचे जडत्व – या सगळ्याच गोष्टी जडत्वाचीच रूपं आहेत पण जडत्वाचे सर्वात मोठे रूप म्हणजे स्वीकारण्याची आणि प्रतिसाद देण्याची अक्षमता. या तिन्ही गोष्टींच्या एकत्रीकरणातून रोग निर्माण होतात आणि मग अंतिम परिणाम म्हणजे मृत्यु. म्हणजे तयार झालेल्या सुमेळाचे विघटन.

– श्रीमाताजी
(Conversation with a disciple : March 02, 1968)

प्रश्न : मानसिक, प्राणिक आणि शारीरिक भीतीमध्ये काय फरक असतो?

श्रीमाताजी : जर तुम्ही तुमच्या मनाची स्पंदने, प्राणाच्या गतिविधी आणि शरीराच्या हालचाली यांविषयी सजग असाल, तर तुम्हाला तो फरक माहीत असतो. मनाच्या बाबतीत सांगावयाचे, तर ते अगदीच सोपे आहे. उदाहरणार्थ – विचार येतात; तुम्ही विचार करायला लागता की, सध्या हा असा असा आजार आहे, तो फारच संसर्गजन्य आहे, कदाचित त्याचा संसर्ग मला होण्याची शक्यता आहे आणि तसे जर का झालेच, तर ते फारच भयंकर असेल, मग हा आजार होऊ नये म्हणून काय केले पाहिजे, उद्या काय होणार आहे कोण जाणे? इ. इ. …तेव्हा मन गडबडून जाते, भयभीत होते.

प्राणाच्या बाबतीत सांगावयाचे तर, तुम्हाला त्याची जाणीव होते. तुमच्या संवेदनांना त्याची जाणीव होते. तुम्हाला एकाएकी एकदम गरम वाटायला लागते, किंवा गार वाटायला लागते; तुम्हाला दरदरून घाम येतो किंवा अस्वस्थ वाटायला लागते. आणि मग तुम्हाला जाणवते की, हृदय खूप जोराने धडधडत आहे आणि अचानक तुम्हाला ताप भरतो, रक्ताभिसरण थांबल्यासारखे होते आणि तुम्ही गार पडता.

शारीरिक दृष्ट्या सांगावयाचे तर, जेव्हा तुमच्यामध्ये इतर दोन प्रकारच्या भीती नसतात, तेव्हा तुम्ही शारीरिक भीतीविषयी जागृत होऊ शकता. सर्वसाधारणतः इतर दोन अधिक जाणिवयुक्त असतात. मानसिक व प्राणिक भीती ह्या शारीरिक भीतीला तुमच्यापासून लपवून ठेवतात. मात्र जेव्हा तुमच्यामध्ये मानसिक किंवा प्राणिक भीती उरत नाही तेव्हा मग, तुम्हाला शारीरिक भीतीची जाणीव होऊ लागते. शरीरामधील भीती हे एक प्रकारचे चौकस, लहानसे असे स्पंदन असते, ते पेशींमध्ये शिरते आणि मग त्यांचा थरकाप उडू लागतो. पण हृदयाप्रमाणे त्या जोरजोराने धडधडत नाहीत. ती भीती त्या पेशींमध्येच असते आणि थोड्याशा कंपनाने सुद्धा त्यांचा थरकाप उडतो. आणि मग त्यावर नियंत्रण करणे अवघड असते. परंतु त्यावर नियंत्रण करता येणे शक्य असते.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 167)

अगदी भौतिक वातावरणामध्येदेखील, या पृथ्वीच्या वातावरणामध्ये, असंख्य छोटेछोटे जीव असतात, जे तुम्हाला दिसत नाहीत, कारण तुमची दृष्टी ही खूपच मर्यादित असते, पण ते मात्र तुमच्या वातावरणात इतस्ततः फिरत असतात. त्यातील काहीकाही चांगलेसुद्धा असतात, इतर दुष्ट असतात. सामान्यतः प्राणिक अस्तित्वाच्या विघटनामधून हे छोटे छोटे जीव तयार होतात – त्यांची पैदास होत राहते – आणि त्यांचा एक असुखद असा पुंजकाच तयार होतो. त्यातील काही जण काही चांगल्या गोष्टीही करतात.

या छोट्याछोट्या क्षुद्र जीवांचे गट असतात आणि मग त्यांच्यात एकमेकांमध्ये झगडे होतात. कारण त्यांच्या त्यांच्यामध्ये सुद्धा ते शांततामय जीवन जगत नसतात, तर त्यांच्या परस्परांमध्ये मारामाऱ्या, लढाईझगडे, भांडणतंटे चालू असतात. ते एकमेकांना मारु पाहत असतात, विनाश घडवून आणू पहात असतात आणि हेच रोगजंतुंचे उगमस्थान असते. त्या शक्ती विघटनकारी असतात. आणि अशा त्या दुभंगलेल्या, छिन्नविछिन्न झालेल्या रूपातसुद्धा ते जिवंत राहतात आणि तेच सूक्ष्म जीवजंतु आणि रोगजंतुंचे मूळ असते. म्हणूनच बऱ्याचशा रोगजंतूंच्या मागे ही दुरिच्छा असते आणि त्यामुळे ते एवढे भयानक बनतात. आणि या रोगजंतुंचा दर्जा, त्यांच्या दुरिच्छेचे स्वरूप समजल्याशिवाय आणि त्यांच्यावर कार्य करण्याची क्षमता असल्याशिवाय, नव्याण्णव टक्के वेळा पूर्ण खात्रीशीर इलाज सापडणे शक्य नसते.

सूक्ष्म भौतिक विश्वात जिवंत असणाऱ्या अशा कोणत्यातरी गोष्टीचे एक अगदी जडभौतिक रूप म्हणजे हे रोगजंतू असतात. आणि ते तुमच्या अवतीभोवती वावरत असतात, तुमच्यामध्ये वावरत असतात, अनेक वर्षे ते तुम्हाला काहीही इजा पोहोचवीत नाहीत. नंतर कधीतरी अचानकपणे तुम्हाला ते आजारी पाडतात आणि इथेच दुसरे कारण महत्त्वाचे ठरते.

रोगजंतुंचे मूळ आणि त्यांना साहाय्य लाभते ते विसंवादामध्ये आणि विरोधी शक्तींविषयीची व्यक्तीची जी ग्रहणशीलता असते त्यामध्ये ! त्यासंबंधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)

अशा उदाहरणात, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रतिकार करावयाचा तर, मी म्हटले त्याप्रमाणे व्यक्ती ही प्राणिकदृष्ट्या योद्धा असावयास हवी, म्हणजे ती प्राणामध्ये आध्यात्मिक योद्धा असावयास हवी. जे कोणी अगदी प्रामाणिकपणे योगसाधना करतात त्यांनी तेच बनावयास हवे आणि जेव्हा ते तसे बनतात, तेव्हा ते अगदी पूर्णपणे संरक्षित, सुरक्षित असतात.

पण तसे बनण्याची एक पूर्वअट म्हणजे व्यक्तीमध्ये कधीही दुरिच्छा असता कामा नये किंवा तिच्या मनात इतरांबद्दल वाईट विचार असता कामा नयेत. कारण जेव्हा तुम्ही अशी वाईट भावना किंवा वाईट इच्छा किंवा वाईट विचार बाळगता, तेव्हा तुम्ही त्यांच्या पातळीवर उतरता आणि जेव्हा अशा रीतीने तुम्ही त्यांच्या पातळीवर जाऊन पडता तेव्हा, त्यांच्याकडून तुमच्यावर आघात होण्याची शक्यता असतेच असते.
(क्रमश:)

– श्रीमाताजी

(CWM 05 : 171-181)