Tag Archive for: आजारपण

आजारपणाचे हल्ले हे कनिष्ठ प्रकृतीचे किंवा विरोधी शक्तींचे हल्ले असतात, ते प्रकृतीमधील एखाद्या उघड्या भागाचा किंवा प्रकृतीकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा किंवा कोणत्यातरी दुर्बलतेचा फायदा घेऊ पाहातात – इतर सगळ्या बाहेरून आत येणाऱ्या गोष्टींप्रमाणेच हे हल्लेही बाहेरून होतात आणि ते परतवूनच लावावे लागतात. जर व्यक्तीला त्यांच्या येण्याची संवेदना होऊ शकली आणि ते शरीरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच व्यक्तीने त्यांना बाहेर फेकून द्यायची सवय लावून घेतली असेल आणि सामर्थ्य प्राप्त करून घेतले असेल तर, अशी व्यक्ती आजारपणापासून मुक्त राहू शकते.

कधी हा हल्ला आतून उद्भवल्यासारखाही जाणवतो, त्याचा अर्थ एवढाच की, त्याची जाणीव तुम्हाला तो अवचेतनेमध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी झालेली नव्हती; एकदा का तो अवचेतनेपर्यंत गेला की, त्याने स्वतःसोबत जी शक्ती आणली होती, ती शक्ती आज ना उद्या तेथून उद्भवतेच आणि तुमच्या शारीर प्रणालीवर आक्रमण करतेच. त्या आजाराने आत प्रवेश केल्यानंतरच तुम्हाला त्याची जाणीव झाली; याचे कारण असे की, तो आजार अवचेतनाद्वारे न उद्भवता, त्याने थेटपणे आत प्रवेश केला होता, कारण तो तुमच्या बाहेर असताना तुम्ही त्याला ओळखू शकला नव्हतात.

बऱ्याचदा आजारपण असेच येते, समोरून, किंवा बऱ्याचदा बाजूने, अगदी जाणवेल असे थेटपणे, आपल्या संरक्षणाच्या मुख्य चिलखतामधून म्हणजे आपल्या सूक्ष्म प्राणिक आवरणाला भेदून ते आजारपण आत प्रवेश करते; परंतु ते जडभौतिक शरीरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच या सूक्ष्म प्राणिक आवरणामध्येच त्याला थोपविता येणे शक्य असते. अशा वेळी तुम्हाला त्याचा काहीसा परिणाम जाणवू शकतो, म्हणजे उदा. तापाची कणकण किंवा थंडी वाजून आल्यासारखे होऊ शकते, परंतु, तरीही अशा वेळी त्या आजाराचे पूर्ण आक्रमण होत नाही. जर ते आजारपण आधीच रोखता आले किंवा व्यक्तीच्या प्राणिक आवरणानेच त्याला प्रतिकार केला आणि ते आवरण स्वतः सुदृढ, दमदार, अखंड, क्षतिहीन राहिले तर आजारपण येत नाही ; हल्ल्याचा कोणताही भौतिक परिणाम होऊ शकत नाही किंवा हल्ल्याचा मागमूसही ते शिल्लक ठेवत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 553-554)

आजारपणाची भावना ही सुरुवातीला फक्त एक सूचना या स्वरूपाची असते; तुमच्या शारीर जाणिवेने तिचा स्वीकार केल्यामुळे ती वास्तविकता बनते. मनात उठणाऱ्या चुकीच्या सूचनेसारखीच ही गोष्ट असते. जर मनाने तिचा स्वीकार केला तर, मनावर मळभ येते आणि ते गोंधळून जाते आणि प्रसन्नता व सुसंवाद परत लाभावा म्हणून त्याला झगडावे लागते. तीच गोष्ट शारीरिक जाणीव आणि आजारपणालाही लागू पडते.

तुम्ही आजारपणाची सूचना स्वीकारता कामा नये; एवढेच नव्हे तर, तिला तुमच्या शारीरिक मनामधून नकार दिला पाहिजे आणि ती सूचना धुडकावून देण्यास शारीरिक जाणिवेला मदत केली पाहिजे. आवश्यकता असेल तर, ”मी पूर्णपणे निरोगी राहीन, मी स्वस्थ, सुरक्षितच आहे आणि सुरक्षितच राहीन,” अशी प्रति-सूचना करा. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आजारपणाची सूचना आणि त्या सूचनेमुळे येणारे आजारपण, फेकून देण्यासाठी श्रीमाताजींच्या शक्तीचा धावा करा.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 555)

“आजारपणाची सूचना’ या शब्दांमधून मला केवळ विचार वा शब्दच अभिप्रेत नाहीत. जेव्हा संमोहनकार, “झोपा” असे म्हणतो, तेव्हा ती सूचना असते; परंतु जेव्हा तो काहीही बोलत नाही तर, तुम्ही झोपावे म्हणून तो त्याची मौन इच्छा संक्रमित करतो, तेव्हा तीदेखील एक प्रकारची सूचनाच असते किंवा तुमच्या चेहऱ्यावर हातांच्या तो ज्या काही हालचाली करतो, तीदेखील एक प्रकारची सूचनाच असते.

जेव्हा एखादी शक्ती तुमच्यावर आघात करते किंवा आजारपणाचे एखादे स्पंदन उमटते तेव्हा त्यातून शरीराला एक प्रकारची सूचना मिळते. एक प्रकारचे स्पंदन, जणू एक लाटच शरीरात घुसते आणि शरीराला तापाची आठवण होते किंवा मग त्याला तापाची जाणीव होऊ लागते अणि मग ते खोकायला लगते, शिंकायला लागते किंवा त्याला थंडी वाजू लागते तेव्हा ”मला बरे वाटत नाहीये, मला अशक्त वाटतंय, मला ताप येणार आहे,” अशा तऱ्हेच्या सूचना मनाला मिळतात.
*

डेंग्यू किंवा एन्फ्लुएंझा होणार अशी वातावरणात एक सर्वसाधारण सूचना असते. या सूचनांमुळे विरोधी शक्तींना तशा प्रकारची लक्षणे घडवून आणणे शक्य होते आणि त्यातून आजाराच्या तक्रारी पसरतात. व्यक्तीने जर अशा सूचना आणि ती लक्षणे या दोन्हींना धुडकावून लावले तर, या गोष्टी प्रत्यक्षात उतरणार नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 556-557)

आजारपणातून एकतर, एकप्रकारची अपूर्णता येते किंवा अशक्तपणा येतो नाहीतर मग, शारीरिक प्रकृती विरोधी स्पर्शांसाठी खुली होते. तसेच आजारपण हे बरेचदा कनिष्ठ प्राण किंवा शारीरिक मन किंवा इतरत्र कोठेतरी कोणत्यातरी अंधकाराशी किंवा विसंवादाशीसुद्धा संबंधित असते.

एखादी व्यक्ती जर श्रद्धेच्या जोरावर किंवा योग-सामर्थ्याच्या आधारे किंवा दिव्य शक्तीच्या प्रवाहाद्वारे, आजारापासून पूर्णपणे सुटका करून घेऊ शकत असेल, तर ते खूपच चांगले. पण बरेचदा व्यक्तीची समग्र प्रकृती खुली नसल्यामुळे किंवा ती त्या शक्तीला पूर्णपणे प्रतिसाद देऊ शकत नसल्यामुळे, अशा रीतीने आजाराचा पूर्णतः नायनाट करणे, बरेचदा शक्य होत नाही.

मनामध्ये श्रद्धा असू शकते आणि मन प्रतिसादही देते; मात्र कनिष्ठ प्राण किंवा शरीर त्याचे अनुसरण करत नाहीत. किंवा मन आणि प्राण तयार असतील तर, शरीरच प्रतिसाद देत नाही किंवा ते अंशतःच प्रतिसाद देते, असेही होऊ शकते. कारण एखादा विशिष्ट आजार निर्माण करणाऱ्या शक्तींना प्रतिसाद देण्याची त्याला सवय जडलेली असते अणि सवय ही प्रकृतीच्या जडभौतिक भागामधील सर्वाधिक दुराग्रही शक्ती असते. अशा परिस्थितीमध्ये, भौतिक उपायांवर विसंबणे चालू शकते – अर्थात मुख्य उपाय म्हणून नाही, तर त्या शक्तीच्या कार्यासाठी एक प्रकारचे भौतिक साहाय्य किंवा मदत म्हणून! खूप कडक आणि जालीम उपायांची मदत घेऊ नये तर, जे शरीराला हानीकारक न होता, उपायकारक होतील अशाच उपायांची मदत घ्यावी.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 580)