Tag Archive for: अभीप्सा

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते आणि ती कोणत्याही क्षमतेपेक्षा अधिक मूलभूत महत्त्वाची व अधिक परिणामकारक असते.

आंतरिक हाक, आंतरिक अनुभूती येण्यासाठी आणि आंतरिक उपस्थितीची जाणीव होण्यासाठी बहिर्मुख न राहता, चेतना अंतरंगामध्ये वळविणे हीदेखील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 55)

(पूर्वार्ध)

‘सुजाण व्हा’ असे सांगण्यासाठी सर्वसाधारणपणे जी कारणे सुचविली जातात ती नेहमीच अगदी किरकोळ असतात, असे मला नेहमी वाटत आले आहे. उदाहरणार्थ, “असे करू नका, नाहीतर तुम्हाला दुःख सहन करावे लागेल. तसे करू नका, नाहीतर त्यातून तुमच्या मनात भीती निर्माण होईल.” …परंतु यामुळे चेतना अधिकाधिक शुष्क बनत जाते, कठीण बनत जाते कारण ती दुःख-वेदनेला घाबरत असते.

(म्हणून तसे सांगण्याऐवजी) असे सांगितले गेले पाहिजे की, चेतनेची एक अशी स्थिती असते की, ज्या स्थितीमध्ये निर्भेळ आनंद असतो, छायाविरहित प्रकाश असतो, जेथे भीतीच्या सर्व शक्यताच नाहीशा होतात. अशी स्थिती अभीप्सेद्वारे आणि आंतरिक सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य करून घेता येते. ही अशी अवस्था असते की, ज्या अवस्थेमध्ये व्यक्ती स्वत:साठी जगत नाही, तर व्यक्ती जे काही करते, जे काही तिला वाटते, तिच्या सर्व कृती या परमेश्वराला अर्पण या भावातून, परिपूर्ण विश्वासातून, स्वत:विषयीच्या चिंता, काळजी यांपासून विनिर्मुक्त होऊन केल्या जातात. या अवस्थेमध्ये स्वत:वरील सर्व प्रकारचे ओझे की, जे आता ओझे वाटतच नाही, ते सारे त्या परमेश्वरावर सोपविलेले असते. (परमेश्वरावर सारे काही सोपविले असल्यामुळे) स्वत:विषयी कोणतीही काळजी नसणे, (परमेश्वराखेरीज अन्य कशाचाही विशेषत:) स्वत:विषयीचा कोणताही विचार मनात नसणे, हा एक अवर्णनीय आनंद असतो.
(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 03 : 256)

प्रामाणिक (असणे) हे फक्त एक विशेषण आहे. त्याचा अर्थ असा की, तुमची इच्छा ही खरीखुरी इच्छा असली पाहिजे. “मी अभीप्सा बाळगतो” असा जर तुम्ही नुसताच विचार करत बसाल आणि त्या अभीप्सेशी विसंगत अशा गोष्टी करत राहाल किंवा तुमच्या स्वतःच्या इच्छावासनांचीच पूर्ती करत राहाल किंवा विरोधी प्रभावाप्रत स्वतःला खुले कराल, तर ती इच्छा प्रामाणिक नाही, (असे समजावे).

– श्रीअरविंद (CWSA 29 : 50)

प्रामाणिकपणामध्ये (Sincerity) नुसत्या सचोटीपेक्षा (honesty) बराच अधिक अर्थ सामावलेला आहे. म्हणजे असे की, तुम्ही जे बोलता तेच तुम्हाला अभिप्रेत असते, तुम्ही जे प्रतिपादित करत असता त्याची तुम्हाला जाणीव असते, तसेच तुमच्या इच्छेमध्ये खरेपणा असतो. साधक जेव्हा ईश्वराचे साधन बनण्याची आणि ईश्वराशी एकरूप होण्याची अभीप्सा बाळगत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रामाणिकपणाचा अर्थ असा असतो की, तो खरोखरच कळकळीने अभीप्सा बाळगत असतो व ईश्वराव्यतिरिक्तच्या इतर सर्व इच्छांना किंवा आवेगांना तो नकार देत असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 50)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प आणि अभीप्सेला स्थान आहे, मात्र इच्छेला थारा नाही. जर इच्छा असेल तर तेथे आसक्ती, अपेक्षा, लालसा, समत्वाचा अभाव, ईश्वरप्राप्ती झाली नाही तर होणारे दुःख यासारख्या, योगाशी विसंगत असणाऱ्या सर्व गोष्टी आढळून येतील.

*

व्यक्तीला जे काही प्राप्त होते त्याबाबत तिने समाधानी असले पाहिजे आणि तरीही सर्वत्व (all) साध्य होत नाही तोपर्यंत व्यक्तीने, अधिकासाठी कोणताही संघर्ष न करता, शांतपणे आस बाळगली पाहिजे. तेथे इच्छा असता कामा नये, संघर्षसुद्धा असता कामा नये तर अभीप्सा, श्रद्धा, खुलेपणा असला पाहिजे आणि (मुख्य म्हणजे) ईश्वरी कृपा असली पाहिजे.

श्रीअरविंद (CWSA 29 : 61, 60)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे अगदी साधनेतील प्रयत्नांमध्येसुद्धा तुमची इच्छा मिसळलेली आहे, यात शंकाच नाही आणि तीच तुमची अडचण आहे. इच्छा आली की तिच्यासोबतच, प्रयत्नांच्या बाबतीत एक प्रकारची अधीरतेची वृत्ती येते. (म्हणजे त्या प्रयत्नांचे फळ लगेच मिळावे असे व्यक्तीला वाटू लागते.) तसेच, जेव्हा कधी अडचण जाणवते किंवा परिणाम तत्काळ होताना दिसत नाहीत तेव्हा निराशेची व बंडखोरीची प्रतिक्रिया आणि त्यासारख्या गोंधळ व अस्वस्थ करणाऱ्या अन्य भावना निर्माण होतात.

इच्छेच्या या भेसळीपासून पूर्णतः सुटका करून घेणे हे निश्चितच सोपे नाही, ते तसे कोणासाठीच सोपे नसते; परंतु अशी सुटका व्हावी म्हणून एखाद्या व्यक्तीने संकल्प केला असेल तर ही गोष्टसुद्धा शाश्वत शक्तीच्या साहाय्याने प्रत्यक्षात येऊ शकते.

अभीप्सा ही इच्छेचे किंवा अभिलाषेचे रूप असता कामा नये तर, ती अंतरात्म्याची निकड असली पाहिजे. ईश्वराभिमुख होण्याचा आणि ईश्वराचा शोध घेण्याचा शांत, स्थिर संकल्प तेथे असला पाहिजे.

श्रीअरविंद (CWSA 29 : 60-61)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३३

अभीप्सा अधिक एक-लक्ष्यी असेल तर साहजिकच प्रगती अधिक वेगाने होते. पण त्यामध्ये जर प्राणाचा, त्याच्या इच्छावासनांसहित आणि शरीराचा, त्याच्या गतकालीन सवयीच्या वृत्तींसहित शिरकाव झाला तर मात्र अडचण येते आणि तसा तो शिरकाव बहुतेक सर्वांमध्येच होतो. असा शिरकाव होतो तेव्हा अभीप्सेमध्ये अस्वाभाविकता येते आणि साधनेमध्ये एक प्रकारची निरसता येते. अशी निरसता हा साधनेतील सर्वश्रुत अडथळा असतो. परंतु व्यक्तीने निराश होता कामा नये; चिकाटी बाळगली पाहिजे. या शुष्क कालावधीमध्येही व्यक्तीने संकल्प दृढ ठेवला तर (अस्वाभाविकता आणि निरसता) या गोष्टी निघून जातात आणि त्यानंतर अभीप्सेची एक महत्तर शक्ती व अनुभूती शक्य होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 61)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३२

अभीप्सा (aspiration) जशी असेल अगदी तंतोतंत त्यानुसारच उच्चतर चेतना अवतरित होईल असे नाही; पण म्हणून अभीप्सा काही निष्फल ठरत नाही. अभीप्सेमुळे चेतना खुली ठेवली जाते; तसेच येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मूकसंमती देण्याची साधकामध्ये जी एक निष्क्रिय अवस्था असू शकते त्या अवस्थेला अभीप्सेमुळे एक प्रकारचा आळा बसतो. आणि उच्चतर चेतनेच्या स्रोतांप्रति एक प्रकारची ओढ निर्माण होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 58)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३१

कोणतेही साहाय्य नसताना, केवळ स्वतःच्या अभीप्सेच्या आणि संकल्पशक्तीच्या आधारे, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींवर मात करता येईल असे बळ क्वचितच एखाद्याकडे असते. आणि अगदी कोणी जरी अशी मात केलीच तरी त्याला या कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींवर केवळ एका विशिष्ट प्रकारचेच नियंत्रण मिळविता येते, त्यांच्यावर पूर्ण प्रभुत्व मिळविता येत नाही.

कनिष्ठ शक्तींशी सामना करत असताना, आपण ईश्वरी शक्ती‌च्या बाजूचे असावे यासाठी आणि ईश्वरी शक्ती‌चे साहाय्य मिळविता यावे यासाठी (साधकाकडे) संकल्पशक्ती व अभीप्सा असणे आवश्यक असते. आध्यात्मिक संकल्पाची आणि हृदयाच्या आंतरात्मिक अभीप्सेची परिपूर्ती करणारी ईश्वरी शक्तीच केवळ (कनिष्ठ प्रकृतीवर) विजय मिळवू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 721)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३०

साधक एका विशिष्ट अवस्थेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तरी त्याने वैयक्तिकरित्या अभीप्सा बाळगणे आवश्यकच असते. सारे काही आपोआप घडून येत आहे आणि विकासासाठी विशिष्ट ज्ञान व सहमतीचीच तेवढी आवश्यकता आहे अशी अवस्था येत नाही तोपर्यंत तरी, ही वैयक्तिक अभीप्सा आवश्यक असते.

*

ईश्वराला केलेले आवाहन म्हणजे ‘अभीप्सा’ आणि चेतना-शक्तीने प्रकृतीवर टाकलेला दबाव म्हणजे ‘संकल्पशक्ती’.

*

‘अभीप्सा’ म्हणजे शक्तींना केलेले आवाहन. शक्तींकडून जेव्हा त्या आवाहनाला प्रतिसाद मिळतो तेव्हा साधकामध्ये अविचल ग्रहणशीलतेची एक केंद्रिभूत झालेली पण सहजस्फूर्त अशी स्वाभाविक स्थिती असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 58, 57, 57)