नैराश्यापासून सुटका – ०६
आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला (strength) निश्चितच एक मूल्य असते, पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो आणि तो अन्य कोणत्याच मार्गामुळे होऊ शकत नाही, असे म्हणणे ही खूपच अतिशयोक्ती ठरेल.
‘ईश्वरी कृपा’ ही काही एखादी काल्पनिक गोष्ट नाही, तर ती अनुभवास येणारी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे. विद्वान आणि सामर्थ्यवान व्यक्ती ज्यांना अगदी नगण्य समजतात अशा अनेक जणांना ‘ईश्वरी कृपे’मुळे आध्यात्मिक साक्षात्कार झालेला आहे. अशिक्षित असताना आणि कोणतीही मानसिक शक्ती किंवा प्रशिक्षण नसताना, व्यक्तित्वामध्ये (तुम्ही म्हणता तसे त्यांच्यापाशी) कोणतेही ‘सामर्थ्य’ नसताना किंवा संकल्पशक्ती नसताना देखील, त्यांनी (फक्त आणि फक्त) अभीप्साच बाळगली होती आणि त्यांना एकाएकी, अगदी अल्पावधीतच आध्यात्मिक साक्षात्कार झाला होता; कारण त्यांच्यापाशी श्रद्धा होती किंवा ते प्रामाणिक होते.
ही जी तथ्यं आहेत, ती आध्यात्मिक इतिहासातील तथ्यं आहेत आणि ती तथ्यं अगदी सार्वत्रिक आध्यात्मिक अनुभवाचा भाग आहेत. असे असूनही या गोष्टी काल्पनिक आहेत असे समजून, त्यांच्या बाबतीत एवढा उहापोह का केला जातो, त्यांच्या बाबतीत इतके युक्तिवाद का केले जातात, किंवा या गोष्टी नाकारल्या का जातात हेच मला कळत नाही.
सामर्थ्य, जर आध्यात्मिक असेल तर, त्यामध्ये आध्यात्मिक साक्षात्काराची शक्ती असते; (पण) त्याहूनही अधिक शक्ती प्रामाणिकपणामध्ये असते; आणि सर्वाधिक शक्ती ‘ईश्वरी कृपे’मध्ये असते. कितीही वेळ लागला आणि कितीही अडचणी आल्या तरी, एखादी व्यक्ती जर प्रामाणिक असेल तर ती या सगळ्यामधून पार होतेच, हे मी असंख्य वेळा सांगितले आहे. मी अनेकवेळा ईश्वरी कृपेविषयीदेखील बोललो आहे. “शोक करू नकोस; मी तुला सर्व पापांमधून आणि अनिष्ट गोष्टींपासून मुक्त करेन,” (अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुच:) हे ‘गीते’मधील वचन मी अनेकवेळा उद्धृत केले आहे.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 172)






