Tag Archive for: साधना

आंतरिक आध्यात्मिक प्रगती ही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते, तर बाह्य परिस्थितीला आपण अंतरंगातून कशी प्रतिक्रिया देतो यावर ती अवलंबून असते. आध्यात्मिक अनुभवाचा तो नेहमीच अंतिम निष्कर्ष राहिलेला आहे. आणि म्हणूनच योग्य दृष्टिकोन बाळगण्यावर आणि त्यात सातत्य राखण्यावर आम्ही इतका भर देत असतो; बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसणाऱ्या आंतरिक स्थितीवर म्हणजे समतेच्या आणि स्थिरतेच्या स्थितीवर आम्ही भर देत असतो. आंतरिक आनंदाची स्थिती एकाएकी येऊ शकणार नाही पण, जीवनातील धक्के व आघात यांच्या नेहमीच अधीन असणाऱ्या पृष्ठवर्ती मनामध्ये राहण्यापेक्षा, अंतरंगात अधिकाधिक प्रवेश करून, तेथून जीवनाकडे पाहण्यावर आमचा भर असतो. या आंतरिक स्थितीमुळेच व्यक्ती जीवन आणि त्याच्या अस्वस्थकारी शक्तींपेक्षा अधिक शक्तिशाली बनू शकते आणि विजय प्राप्त करण्याची थोडीफार तरी आशा बाळगू शकते.

अंतरंगामध्ये अविचल (quiet) राहणे, अडीअडचणी किंवा चढउतार यांमुळे अस्वस्थ किंवा नाउमेद होण्यास नकार देऊन, त्यामधून सहीसलामत पार होण्याचा दृढ संकल्प बाळगणे, या योगमार्गावरील शिकण्यायोग्य गोष्टींपैकी काही प्रारंभिक गोष्टी आहेत.

या व्यतिरिक्त अन्य काही करणे म्हणजे चेतनेच्या अस्थिरतेस प्रोत्साहन देण्यासारखे आहे, परंतु तुम्ही अंतरंगामध्ये स्थिर आणि अविचल राहू शकलात तर मग, अनुभवांचा प्रवाह काहीशा स्थिरपणाने वाहू लागेल. अर्थात या वाटचालीमध्ये व्यत्यय आणि चढउतार येणारच नाहीत, असे नाही. परंतु या गोष्टी योग्य रितीने हाताळल्या गेल्या तर, या कालावधीमध्ये साधनाच झाली नाही, असे होत नाही. तर हाच कालावधी अडचणी संपुष्टात येऊन, आधी आलेले अनुभव पचवण्यासाठीचा कालावधी ठरू शकतो.

बाह्य परिस्थितीपेक्षा आध्यात्मिक वातावरण हे नेहमीच अधिक महत्त्वाचे असते. साधकाला जर ते प्राप्त होऊ शकले आणि तो स्वतः ज्यामध्ये श्वास घेऊ शकेल व ज्यामध्ये जीवन जगू शकेल असे स्वतःचे आध्यात्मिक वातावरण साधक स्वत: तयार करू शकेल तर, ती परिस्थिती प्रगतीसाठी खरी सुयोग्य परिस्थिती असेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 140)

(आज ही मालिका समाप्त होत आहे.)

सर्व प्रकारच्या पसंती-नापसंतीपासून मुक्त असणे आणि ईश्वरी संकल्पाकडून जे काही प्राप्त होईल त्याचा आनंदाने स्वीकार करणे ही गोष्ट कोणत्याही मनुष्याला अगदी सुरुवातीलाच शक्य होत नाही.

त्यासाठी व्यक्तीकडे प्रारंभी कोणती गोष्ट असली पाहिजे? तर, ईश्वर जो संकल्प करेल तो भल्यासाठीच असतो, अशी नित्य धारणा व्यक्तीकडे असली पाहिजे. हे असे कसे काय, हे जरी मनाला उमगले नाही तरीही, व्यक्तीने तशी धारणा बाळगली पाहिजे. तसेच, जी गोष्ट तिला अजूनपर्यंत आनंदाने स्वीकारता येत नाहीये ती गोष्ट तिने सहिष्णू वृत्तीने स्वीकारली पाहिजे. पृष्ठभागावर, बाह्य घटनांबद्दलच्या तात्कालिक प्रतिक्रियांच्या काही तात्पुरत्या गतीविधी कदाचित असू शकतील परंतु तेव्हासुद्धा व्यक्तीने स्थिर समत्वापर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे. एकदा हे समत्व दृढपणे प्रस्थापित झाले की मग बाकी सर्व गोष्टी येऊ शकतील.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 134)

अहंकाराचा अभाव म्हणजे समता नव्हे, तर इच्छावासना आणि आसक्तीचा अभाव म्हणजे समता. म्हणजे मी असे म्हटले आहे की, ‘समता‌’ या शब्दामधून इच्छावासना आणि आसक्तीचा अभाव यांचा निर्देश होतो; अहंकाराची जाणीव नाहीशी होईल का, ती सूक्ष्म आणि व्यापक रूपामध्ये टिकून राहील, हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 133)

संपूर्ण समता प्रस्थापित होण्यासाठी वेळ लागतो. आंतरिक समर्पणाद्वारे जिवाने ईश्वराला केलेले आत्मदान, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या आध्यात्मिक स्थिरतेचे व शांतीचे अवतरण आणि समतेला विरोध करणाऱ्या अहंकारी, राजसिक आणि त्यासारख्या सर्व भावनांना दृढतापूर्वक, सातत्यपूर्ण व दीर्घकाळ दिलेला नकार या तीन गोष्टींवर समता आधारित असते. त्यासाठी हृदयामध्ये संपूर्ण आत्मनिवेदन व अर्पण भाव असणे ही गोष्ट सर्वप्रथम आवश्यक असते. रजोगुणाचा, अहंकाराचा त्याग इ. गोष्टी परिणामकारक होण्यासाठी आध्यात्मिक स्थिरतेमध्ये आणि समर्पणामध्ये वृद्धी होणे ही स्थिती आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 131)

समत्व-वृत्ती ही खऱ्या आध्यात्मिक चेतनेचा मुख्य आधार असते. जेव्हा एखादा साधक प्राणिक भावावेगाच्या लाटेबरोबर, भावनेद्वारे, वाणीद्वारे वा कृतीद्वारे स्वत:ला वाहवत जाऊ द्यायला संमती देतो तेव्हा, तो साधक या समत्वापासूनच विचलित होतो. स्थिर झालेले समत्व हे नि:संशयपणे खूप मोठ्या प्रमाणात, कधीकधी तर अगदी अमर्यादपणे माणसाची सहनशीलता आणि क्षमाशीलता वाढविते. तरीही ती क्षमाशीलता म्हणजे समत्व नव्हे.

शांत व अविचल मन आणि प्राण म्हणजे समत्व. तुमच्या बाबतीत घडलेल्या किंवा तुमच्याविषयी बोलल्या गेलेल्या किंवा तुमच्याबाबत केल्या गेलेल्या कोणत्याही गोष्टींनी वा घटनांनी अस्वस्थ किंवा विचलित न होता, वैयक्तिक भावभावनांमधून उत्पन्न होणाऱ्या विकारांपासून मुक्त होऊन, त्यांच्याकडे थेटपणे पाहणे आणि त्या गोष्टींच्या पाठीमागे काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणे; त्या का घडतात, त्यापासून आपण काय धडा घेतला पाहिजे; आपल्यामध्ये असे काय आहे की, ज्यामुळे त्या गोष्टी आपल्या विरोधात उभ्या ठाकल्या; त्यापासून कोणता आंतरिक लाभ किंवा प्रगती आपण करून घेऊ शकतो, हे सारे स्वच्छ दृष्टीने पाहणे म्हणजे समत्व. प्राणिक आवेगांवरील आत्म-प्रभुत्व म्हणजे समत्व. राग, अति-संवेदनशीलता, गर्व, तसेच इच्छावासना आणि तत्सम गोष्टी या साऱ्या प्राणिक आवेगांवरील आत्म-प्रभुत्व म्हणजे समत्व. तसेच (राग, अति-संवेदनशीलता, गर्व, इच्छावासना इ.) या गोष्टींना आपल्या भावनिक अस्तित्वाचा ताबा घेऊ न देणे, त्यांच्यामुळे आपली आंतरिक शांती बिघडवू न देणे; त्यांच्या भरीस पडून, बोलण्याची किंवा कृती करण्याची घाई न करणे; तर नेहमीच आत्म्याच्या आंतरिक शांत स्थितीत राहून बोलणे आणि कृती करणे म्हणजे समत्व.

असे समत्व पूर्णांशाने आणि परिपूर्ण प्रमाणात असणे ही गोष्ट सोपी नाही, तरीही व्यक्तीने अशा समत्वास आपल्या आंतरिक स्थितीचा आणि बाह्य हालचालींचा पाया बनविण्याचे अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत.

समत्वाचा आणखी एक अर्थ आहे. तो म्हणजे विविध व्यक्ती, त्यांची प्रकृती, त्यांच्या कृती, त्यांना कृतिप्रवण करणाऱ्या शक्ती या सर्व गोष्टींकडे समदृष्टीने पाहणे. (समदृष्टीने पाहताना) त्या व्यक्तीने स्वतःच्या मनातून, त्यांच्याविषयीच्या दृष्टिकोनातील आणि त्यांच्याविषयीचे मत बनविण्यामधील सर्व वैयक्तिक भावभावना दूर सारलेल्या असतात, तसेच त्यांच्याविषयीचे सर्व मानसिक पूर्वग्रह व्यक्तीने मनातून दूर केलेले असतात. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला त्यांच्याविषयीचे सत्य दिसण्यास मदत होते.

वैयक्तिक भावभावनांमुळे नेहमीच विपर्यास होतो आणि इतरांच्या कृतींकडे पाहताना, त्या कृती (वस्तुनिष्ठपणे) पाहण्याचे सोडून, व्यक्ती त्या पाठीमागील गोष्टी (म्हणजे अमुक एका कृतीमागे ती कृती करणाऱ्या व्यक्तीचा हेतू काय होता इत्यादी गोष्टी) पाहायला लागते; वास्तविक, बरेचदा अशा गोष्टी तिथे अस्तित्वातच नसतात. आणि ज्या गोष्टी टाळता येऊ शकल्या असत्या अशा गोष्टींमध्ये म्हणजे गैरसमजुती, चुकीचे आडाखे अशा गोष्टींमध्ये त्यांचे पर्यवसान होते. छोटे परिणाम करणाऱ्या गोष्टीही मग विक्राळ रूप धारण करतात. मी हे पाहिले आहे की, जीवनातील अनिष्ट घटनांपैकी निम्म्यापेक्षा अधिक घटना याच कारणामुळे घडतात.

परंतु सर्वसामान्य आयुष्यात मात्र वैयक्तिक भावभावना, संवदेनशीलता या बाबी मानवी प्रकृतीचा एक नेहमीचा भाग असतात आणि स्वसंरक्षणासाठी त्यांची गरज पडू शकते. असे असूनदेखील मला असे वाटते की, अगदी तेथेसुद्धा इतरांविषयीचा आणि सर्व गोष्टींविषयीचा एक दृढ, विशाल आणि समत्वपूर्ण दृष्टिकोन हा संरक्षणाचा अधिक चांगला मार्ग असू शकतो. साधकासाठी मात्र, भावभावना, अति-संवेदनशीलता यांवर मात करून, आत्म्याच्या शांत सामर्थ्यामध्ये जीवन जगणे, हा त्याच्या प्रगतीचा एक आवश्यक भाग असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 130-131)

सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये अंतरंगामध्ये अविचल राहणे म्हणजे समत्व (equality).

*

समत्वाशिवाय साधनेचा भरभक्कम पाया रचला जाऊ शकत नाही. परिस्थिती कितीही त्रासदायक असू दे, इतरांची वागणूक भलेही तुम्हाला न पटणारी असू दे, तुम्ही त्या साऱ्या गोष्टी एका सुयोग्य स्थिरतेने आणि कोणत्याही अस्वस्थ प्रतिक्रियांविना स्वीकारण्यास शिकले पाहिजे. या गोष्टी हीच समत्वाची कसोटी असते. सर्व गोष्टी सुरळीत असताना, माणसं आणि परिस्थिती सुखकारक असताना समत्व बाळगणे आणि स्थिरता राखणे सहजसोपे असते; पण जेव्हा परिस्थिती विपरित असते तेव्हाच स्थिरता, शांती, समत्व यांच्या परिपूर्णत्वाचा कस लागतो आणि अशा परिस्थितीमध्येच त्या अधिक दृढ, अधिक परिपूर्ण केल्या जाऊ शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 130, 129)

कोणत्याही बाह्य गोष्टींमुळे, हर्ष किंवा शोक यामुळे, किंवा सुख-दु:खामुळे विचलित न होणे, तसेच लोकं काय म्हणतात किंवा काय करतात यामुळे विचलित न होणे, याला योगमार्गामध्ये समतेची अवस्था म्हणतात किंवा व्यक्तीमध्ये सर्व गोष्टींबाबत समभाव आहे, असे म्हटले जाते. या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचणे हे साधनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे मन तसेच प्राणामध्ये, अविचलता (quietude) आणि निश्चल-निरवता (silence) येण्यास मदत होते. याचा अर्थ असा की, आता खरोखरच प्राण व प्राणिक मन स्वयमेव अविचल आणि निश्चल-निरव होऊ लागले आहे. त्या पाठोपाठ बुद्धीदेखील अविचल आणि निश्चल-निरव होणार हे निश्चित.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 335)

(कामात गुंतलेले असताना, शांती, स्थिरता टिकून राहत नाही याबाबतची खंत एका साधकाने श्रीअरविंद यांच्यापाशी व्यक्त केली आहे, असे दिसते. त्याला श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

ज्ञान, सामर्थ्य आणि आनंद या गोष्टी येण्यासाठी स्थिरतेचे, शांतीचे आणि समर्पणाचे पोषक वातावरण आवश्य क असते. तुम्ही कामामध्ये गुंतलेले असताना ते वातावरण टिकून राहत नाही कारण तुमच्या मनाला ही निश्चल-निरवतेची (silence) देणगी अलीकडेच प्राप्त झाली आहे; आणि ती देणगी अजूनपर्यंत तरी फक्त मनापुरतीच सीमित आहे. (आत्ता तुमच्या प्राणाला त्या निश्चल-निरवतेचा फक्त स्पर्श झाला आहे किंवा तिचा प्रभाव जाणवू लागला आहे पण त्या निरवतेने प्राणाचा अजूनपर्यंत ताबा घेतलेला नाही.) जेव्हा नवीन चेतना पूर्णतः तयार झालेली असेल आणि ती जेव्हा तुमच्या प्राणिक प्रकृतीचा आणि शारीरिक अस्तित्वाचा संपूर्ण ताबा घेईल तेव्हा (तुम्ही म्हणत आहात) तो दोष निघून जाईल.

तुमच्या मनाला लाभलेली ही शांतीची अविचल चेतना केवळ स्थिर होणे पुरेसे नाही, तर ती व्यापकही झाली पाहिजे. तुम्हाला ती सर्वत्र जाणवली पाहिजे. म्हणजे, तुम्ही स्वतः आणि इतर सर्वकाही त्या चेतनेमध्येच आहे, असे तुम्हाला जाणवले पाहिजे. तुमच्या कर्मामध्ये स्थिरतेचा पाया निर्माण करण्यासाठीसुद्धा तुम्हाला त्या चेतनेची मदत होईल. तुमची चेतना जेवढी अधिक व्यापक होईल तेवढ्या अधिक प्रमाणात तुम्ही वरून येणाऱ्या गोष्टी (ज्ञान, प्रकाश, प्रेम इ.) ग्रहण करू शकाल. (आणि तसे झाल्यावर मग) दिव्य शक्ती तुमच्या अस्तित्वामध्ये अवतरू शकेल आणि ती त्यामध्ये सामर्थ्य, प्रकाश आणि शांती ओतू शकेल.

तुम्हाला कोंडल्यासारखे, मर्यादित असे जे काही जाणवत आहे ते तुमचे शारीरिक मन (physical mind) आहे; उपरोक्त व्यापक चेतना आणि हा प्रकाश खाली अवतरला आणि त्याने तुमच्या प्रकृतीचा ताबा घेतला तरच, हे मन व्यापक होऊ शकते. तुमच्या देहप्रणालीमध्ये जेव्हा वरून सामर्थ्य अवतरेल तेव्हाच, तुम्हाला ज्याचा त्रास होत आहे ते शारीरिक जडत्व कमी होऊन नाहीसे होण्याची शक्यता आहे.

अविचल राहा, स्वतःला खुले करा आणि स्थिरता व शांती दृढ करण्यासाठी, चेतना व्यापक करण्यासाठी दिव्य शक्तीला आवाहन करा. सद्यस्थितीत जेवढे ग्रहण करण्याची तसेच आत्मसात करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे तेवढा प्रकाश व तेवढी शक्ती लाभावी यासाठी दिव्य शक्तीला आवाहन करा. तुम्ही उतावीळ होणार नाही याची काळजी घ्या, कारण त्यामुळे, तुमच्या प्राणिक प्रकृतीमध्ये अगोदरच प्रस्थापित झालेल्या अविचलता आणि समतोल या गोष्टींना पुन्हा धक्का लागण्याची शक्यता आहे. अंतिम परिणामाबाबत विश्वातस बाळगा आणि त्या दिव्य शक्तीला तिचे कार्य करू देण्यास पुरेसा अवधी द्या.

श्रीअरविंद (CWSA 29 : 124-125)

सर्व परिस्थितीमध्ये, अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये समता आणि शांती असणे हा योगस्थितीचा पहिला मुख्य आधार आहे. (तो दृढ झाला की मग) व्यक्तीचा कल जसा असेल त्यानुसार मग एकतर (ज्ञानासहित) प्रकाश येईल किंवा (सामर्थ्य आणि अनेक प्रकारची गतिमानता घेऊन) शक्ती अवतरेल किंवा (प्रेम आणि अस्तित्वाचा मोद घेऊन) आनंद येईल. परंतु पहिली आवश्यक स्थिती म्हणजे शांती! तिच्याविना (उपरोक्त) कोणतीच गोष्ट स्थिर होऊ शकत नाही.

श्रीअरविंद (CWSA 29 : 123)

अविचलता (quietude) कायम ठेवा आणि ती काही काळासाठी रिक्त असली तरी काळजी करू नका. चेतना ही बरेचदा एखाद्या पात्रासारखी असते, त्यामधील मिश्रित आणि अनिष्ट गोष्टी काढून ते पात्र रिकामे करावे लागते; योग्य आणि विशुद्ध गोष्टींनी ते पात्र भरले जाईपर्यंत, काही काळासाठी ते पात्र तसेच रिकामे ठेवावे लागते. ते पात्र जुन्याच गढूळ गोष्टींमुळे पुन्हा भरले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

त्या दरम्यानच्या कालावधीत थोडे थांबा, वाट पाहा, ऊर्ध्व दिशेस स्वतःला खुले करा. शांती (peace) ही निश्चल-निरवतेमध्ये (silence) परिणत व्हावी म्हणून, अतिशय अविचलपणे आणि स्थिरपणे आवाहन करा, त्यामध्ये अस्वस्थ आतुरता असता कामा नये. आणि शांती निश्चल-निरवतेमध्ये परिणत झाली की मग, आनंद आणि ईश्वरी उपस्थितीसाठी आवाहन करा.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 145)