Tag Archive for: शांती

व्यक्तीच्या अस्तित्वामध्ये जेव्हा सर्वत्र पूर्णतः शांती प्रस्थापित झालेली असते तेव्हा, कनिष्ठ प्राणाच्या प्रतिक्रिया त्या शांतीला विचलित करू शकत नाहीत. सुरुवातीला त्या प्रतिक्रिया, पृष्ठभागावर तरंग असावेत त्याप्रमाणे येऊ शकतात, नंतर त्या फक्त सूचनांच्या स्वरूपात येऊ शकतात. त्यांच्याकडे व्यक्ती लक्ष देईल किंवा देणारही नाही, परंतु काहीही असले तरी त्या आत शिरकाव करणार नाहीत, त्या अंतरंगातील शांतीवर परिणाम करणार नाहीत किंवा यत्किंचितही अस्वस्थता निर्माण करणार नाहीत.

या अवस्थेचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे, पण तरीही सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, एखाद्या पर्वतावर कोणी दगड फेकून मारावेत आणि त्या पर्वताला जाणीव असेलच तर, फार फार त्याला त्या दगडांचा स्पर्श जाणवेल. पण तो स्पर्श इतका किरकोळ आणि वरवरचा असेल की, त्याचा त्या पर्वतावर काहीच परिणाम होणार नाही, तशी ही अवस्था असते. सरतेशेवटी ही प्रतिक्रियासुद्धा नाहीशी होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 150-151)

शांतीमध्ये स्थिरतेच्या जाणिवेबरोबरच एक सुसंवादाची जाणीवदेखील असते आणि या जाणिवेमुळे मुक्तीची आणि परिपूर्ण तृप्तीची भावना निर्माण होते.

*

पृष्ठभागावर अशांतता असतानासुद्धा, आंतरिक अस्तित्वामध्ये प्रस्थापित शांतीचा अनुभव येणे ही नित्याची गोष्ट आहे. वास्तविक, समग्र अस्तित्वामध्ये परिपूर्ण समता साध्य होण्यापूर्वीची कोणत्याही योग्याची ती नित्याची अवस्था असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 148 & 153)

(श्रीअरविंद येथे सकारात्मक आणि अभावात्मक स्थिरता म्हणजे काय ते सांगत आहेत. तसेच स्थिरता आणि शांती यामधील फरक देखील ते उलगडवून दाखवत आहेत.)

स्थिरतेपेक्षा (calm) शांती (peace) अधिक सकारात्मक असते. जिथे अस्वस्थता, अशांतता किंवा त्रास नाही अशी एक अभावात्मक (negative) स्थिरतासुद्धा असू शकते. परंतु शांतीमध्ये नेहमीच काहीतरी सकारात्मक असते. स्थिरतेप्रमाणे शांतीमध्ये केवळ सुटकाच नसते तर; शांती येताना स्वतःसोबत एक विशिष्ट आनंद किंवा स्वतःचा आनंद घेऊन येत असते.

(अभावात्मक स्थिरतेप्रमाणेच) एक सकारात्मक स्थिरतादेखील असते; त्रास देऊ पाहणाऱ्या सर्व गोष्टींच्या विरोधात ती ठामपणाने उभी राहते, ती अभावात्मक स्थिरतेसारखी क्षीण आणि तटस्थ नसते तर ती सशक्त आणि भव्य असते.

बरेचदा शांती आणि स्थिरता हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात पण वर सांगितल्यानुसार, दोन्हीच्या खऱ्या अर्थाच्या आधारे, व्यक्तीला त्या दोन्हीमधील फरक लक्षात येऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 148)

अचंचलता किंवा अविचलता, स्थिरता, शांती आणि निश्चल-निरवता या प्रत्येक शब्दांना अर्थांच्या त्यांच्यात्यांच्या अशा खास छटा आहेत आणि त्यांची व्याख्या करणे तितकेसे सोपे नाही.

Quiet म्हणजे अचंचलता, अविचलता – ही अशी एक अवस्था असते की, जेथे कोणतीही अस्वस्थता किंवा चलबिचल नसते.

Calm म्हणजे स्थिरता – ही एक अक्षुब्ध, अचल अशी अवस्था असते की, जिच्यावर कोणत्याही क्षोभाचा परिणाम होऊ शकत नाही. अविचलतेच्या तुलनेत स्थिरता ही अधिक सकारात्मक अवस्था असते.

Peace म्हणजे शांती – ही त्याहूनही अधिक सकारात्मक अवस्था असते; शांतीसोबतच एक सुस्थिर व सुसंवादी विश्रामाची आणि मुक्ततेची भावनासुद्धा येते.

Silence म्हणजे निश्चल-निरवता – (ही शांतीहूनही अधिक सकारात्मक अवस्था असते.) ही अशी एक अवस्था असते की, जेथे प्राणाचे किंवा मनाचे कोणतेही तरंग उमटत नाहीत. किंवा तसे नसेल तर, मग तेथे एक प्रगाढ अविचलता असते आणि त्या अविचलतेला कोणतीही पृष्ठवर्ती हालचाल भेदू शकत नाही किंवा त्यात बदल घडवू शकत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137)

नैराश्यापासून सुटका – २२

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

प्राणिक अस्वस्थतेमध्ये आणि उदासीनतेमध्ये रममाण होण्याची तुमची वृत्ती पुन्हा एकदा उफाळून आली आहे, असे तुम्ही लिहिलेल्या पत्रावरून दिसते. त्यासाठी तिला विशेष असे काही कारण लागत नाही, पण स्वतःचे पोषण व्हावे म्हणून ती प्रत्येक गोष्टीचाच ताबा घेते; वस्तुतः ही मज्जातंतूंच्या दुर्बलतेची केवळ जुनाट अशी सवय आहे. व्यक्ती जेवढी अधिक कुढत बसते, तेवढी उदासीनता अधिकच वाढत राहते.

त्यावर मात करण्याचे तीन मार्ग आहेत. स्वतःमध्ये रमण्यापेक्षा अन्य कोणत्यातरी गोष्टीमध्ये रस घेणे आणि त्यात स्वतःला गुंतवून ठेवणे तसेच तुमच्या मन:स्थितीचा शक्य तितका कमीत कमी विचार करणे, हा पहिला मार्ग आहे.

दुसरा मार्ग म्हणजे या प्राणिक अस्वस्थतेपासून आणि उदासीनतेपासून स्वतःला शक्य तितके विलग करणे आणि त्यांना (धीराने) सामोरे जाणे. जसे तुम्ही आत्ता करत आहात त्याप्रमाणे, त्यांचा स्वीकार करण्यास जोमाने आणि निर्धारपूर्वक नकार देणे.

तिसरा मार्ग म्हणजे ‘श्रीमाताजीं’च्या शांतीला आवाहन करण्यासाठी, मनाला ऊर्ध्वमुख करण्याची सवय लावून घेणे. ती शांती ऊर्ध्वस्थित आहे आणि तुम्ही जर स्वतःला खुले केलेत तर, ती खाली अवतरित होण्याची प्रतीक्षा करत आहे. ती शांती जर अवतरली तर, ती तुमची या दुःखभोगापासून, त्रासापासून कायमची सुटका करेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 180-181)

जीवन जगण्याचे शास्त्र – २३

आपली (कनिष्ठ) प्रकृती ही गोंधळाच्या, अव्यवस्थेच्या आधारे कार्य करत असते. तिला कृती करणे जणू भागच असते म्हणून ती अस्वस्थपणे कृती करत राहते. पण ईश्वर मात्र अगाध स्थिरतेच्या, शांतीच्या आधारे मुक्तपणे कार्य करत असतो. आपल्या आत्म्यावरील कनिष्ठ प्रकृतीची पकड आपल्याला नाहीशी करायची असेल तर, आपण प्रगाढ शांतीच्या खोल दरीत झेप घेतली पाहिजे आणि आपण त्या ईश्वराप्रमाणेच झाले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 23 : 365)

जीवन जगण्याचे शास्त्र – १६

तुम्ही जर ईश्वरी शक्तीप्रत आत्मदान करू शकत नसाल आणि तिच्या कार्यावर तुमचा विश्वास नसेल तर, तुम्हाला पूर्णयोग करता येणे शक्यच होणार नाही. तुम्ही जर केवळ मनामध्ये आणि मनाच्या शंकाकुशंका व कल्पना यांच्यामध्येच जीवन जगत असाल तर, तुमच्याबाबतीत पूर्णयोगाची शक्यताच निर्माण होत नाही. त्यासाठी मन शांत करण्याची क्षमता तसेच श्रीमाताजींची शक्ती म्हणजे महत्तर ईश्वरी शक्ती तुमच्यामध्ये कार्य करत आहे यावर विश्वास ठेवण्याची आणि त्याचा अनुभव घेण्याची क्षमता तुमच्याकडे असणे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे तुमच्या प्रकृतीमध्ये त्या कार्याच्या आड येणारे जे जे काही असते त्यास नकार देत, त्या कार्याला साहाय्यभूत होण्याची क्षमता तुमच्याकडे असणे आवश्यक असते. या गोष्टी म्हणजे तुमच्यामध्ये पूर्णयोग करण्याची क्षमता आहे याची कसोटी असते.
*
तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींचा विचार करणे थांबविणे आणि शांती व शक्ती यांना स्वतःहून आविष्कृत होण्यास आणि तुमच्यामध्ये कार्य करू देण्यास वाव देणे याचा अर्थ ‘मन स्थिर-शांत करणे’ असा होतो. असे असेल तर ‘अंतरंगामध्ये राहणे’ (living inside) ही गोष्ट आपोआप घडून येईल. मग, त्याच्या बरोबरीने येणारी आंतरिक शांती आणि चेतना म्हणजेच तुम्ही स्वतः आहात असे तुम्हाला अधिकाधिक जाणवू लागेल आणि अन्य सर्व गोष्टी बाह्यवर्ती, वरवरच्या, उथळ असल्याचे देखील जाणवू लागेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 27-28)

जीवन जगण्याचे शास्त्र – १२

पूर्णयोगाची साधना करताना नेहमी गंभीर चेहऱ्याने वावरण्याची किंवा शांत शांत राहण्याची आवश्यकता नसते, पण योगसाधना मात्र गांभीर्याने घेणे आवश्यक असते. शांती आणि अंतर्मुख एकाग्रता या गोष्टींना या योगामध्ये फार मोठे स्थान आहे. अंतरंगात वळणे आणि तेथे ईश्वराला भेटणे हे जर व्यक्तीचे ध्येय असेल तर तिने स्वतःला सदासर्वकाळ बहिर्मुख ठेवून चालत नाही. पण म्हणून व्यक्तीने सदासर्वकाळ किंवा बहुतांश काळ गंभीर आणि उदास असले पाहिजे, असाही त्याचा अर्थ होत नाही.

…‘क्ष’मध्ये (एका साधकाचा येथे निर्देश आहे.) दोन व्यक्तिमत्त्वं दडलेली आहेत. त्यातील एकाला जीवनामध्ये (बहिर्मुखी) प्राणिक विस्तार हवाहवासा वाटतो तर त्यातील दुसऱ्याला आंतरिक जीवन हवेसे वाटते. त्यातील पहिले व्यक्तिमत्त्व अस्वस्थ होते कारण आंतरिक जीवन हे काही बहिर्मुख विस्ताराचे जीवन नसते. तर (आंतरिक ओढ असलेले) दुसरे व्यक्तिमत्त्व दुःखीकष्टी होते कारण त्याचे ध्येय प्रत्यक्षात उतरत नाही.

पूर्णयोगामध्ये दोहोंपैकी (आंतरिक आणि बाह्य) कोणतेच व्यक्तिमत्त्व सोडून देण्याची आवश्यकता नसते. परंतु बाह्य प्राणिक अस्तित्वाने, आधी आंतरिक अस्तित्व प्रस्थापित होण्यासाठी वाव दिला पाहिजे, त्याला प्राधान्य दिले पाहिजे आणि त्याने (बाह्य प्राणिक अस्तित्वाने) आत्म्याचे साधन बनण्यासाठी व आंतरिक जीवनाचे कायदे पाळण्यासाठी संमती दिली पाहिजे.

ही गोष्ट मान्य करण्यास ‘क्ष’चे मन अजूनही नकार देत आहे. त्याला असे वाटते की, व्यक्तीने एकतर पूर्ण उदास, थंड आणि गंभीर असले पाहिजे; नाही तर, आंतरिक जीवनामध्ये भावनिक उकळ्या फुटल्या पाहिजेत आणि (उत्साहाचे) उधाण आणले पाहिजे. आंतरिक अस्तित्वाद्वारे प्राणिक अस्तित्वाचे शांत, आनंदी आणि प्रसन्नचित्त नियमन करणे ही गोष्ट काही अजून त्याच्या पचनी पडत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 175)

आत्मसाक्षात्कार – ०५

साधक : पूर्णयोगामध्ये ‘साक्षात्कारा’चे स्वरूप काय असते?

श्रीअरविंद : या योगामध्ये आपण सत्य-चेतना’ (Truth-consciousness) समग्र अस्तित्वामध्ये उतरवू इच्छित आहोत. अस्तित्वाचा कोणताही भाग त्याविना रिक्त राहता कामा नये. हे कार्य स्वयमेव ‘उच्चतर शक्ती’द्वारेच केले जाऊ शकते. मग तुम्ही काय करणे आवश्यक असते? तर, तुम्ही स्वतःला तिच्याप्रत खुले करायचे असते.

साधक : उच्चतर शक्तीच जर कार्य करणार असेल तर मग ती सर्व माणसांमध्येच ते का करत नाही?

श्रीअरविंद : कारण, सद्यस्थितीत, मनुष्य त्याच्या मनोमय अस्तित्वामध्ये, त्याच्या प्राणिक प्रकृतीमध्ये आणि त्याच्या शारीर-चेतनेमध्ये आणि त्यांच्या मर्यादांमध्ये बंदिस्त आहे. तुम्ही स्वतःला खुले केले पाहिजे. खुले करणे (an opening) म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, ऊर्ध्वस्थित असणारी ‘शक्ती’ खाली अवतरित व्हावी म्हणून हृदयामध्ये अभीप्सा (Aspiration) बाळगली पाहिजे आणि ‘मना’मध्ये किंवा ‘मना’च्या वर असणाऱ्या पातळ्यांमध्ये त्या शक्तीप्रत खुले होण्याची इच्छा बाळगली पाहिजे.

उच्चतर शक्ती कार्य करू लागल्यावर प्रथम ती अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये शांती प्रस्थापित करते आणि ऊर्ध्वमुख खुलेपणा आणते. ही शांती म्हणजे केवळ मानसिक शांती नसते तर, ती शक्तीने ओतप्रोत भरलेली असते आणि त्यामुळे अस्तित्वामध्ये कोणतीही क्रिया घडली तरी समता, समत्व हा तिचा पाया असतो आणि शांती व समता कधीही विचलित होत नाहीत. ऊर्ध्वदिशेकडून शांती, शक्ती व हर्ष या गोष्टी अवतरित होतात. त्याचबरोबरीने उच्चतर शक्ती, आपल्या प्रकृतीच्या विविध भागांमध्ये परिवर्तन घडवून आणते, जेणेकरून हे भाग उच्चतर शक्तीचा दबाव सहन करू शकतील.

टप्प्याटप्प्याने आपल्यामध्ये ज्ञानदेखील विकसित व्हायला लागते आणि ते आपल्या अस्तित्वामधील कोणत्या गोष्टी काढून टाकणे आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी जपून ठेवणे आवश्यक आहे हे आपल्याला दाखवून देते. खरंतर, ज्ञान आणि मार्गदर्शन दोन्ही गोष्टी एकत्रितपणे येतात. आणि त्यासाठी तुम्ही त्या मार्गदर्शनाला सातत्याने संमती देणे आवश्यक असते. एका बाजूपेक्षा दुसऱ्या बाजूने होणारी प्रगती काहीशी अधिक होत आहे, असे असू शकते. परंतु काहीही असले तरी, उच्चतर शक्तीच कार्य करत असते. बाकी सर्व गोष्टी या अनुभव आणि शक्तीच्या गतिविधीशी संबंधित असतात.

– श्रीअरविंद (Evening talks with Sri Aurobindo : 34-35)

श्रीमाताजी आणि समीपता – १०

व्यक्ती जोपर्यंत अंतरंगामध्ये जीवन जगत नाही तोपर्यंत व्यक्तीला चिरकाळ टिकेल अशा स्वरूपाचा आनंद मिळणे शक्य नाही. आपले कर्म, आपल्या कृती या श्रीमाताजींना अर्पण केल्याच पाहिजेत, त्या त्यांच्यासाठी म्हणूनच केल्या गेल्या पाहिजेत, त्यामध्ये तुमचा स्वतःसाठीचा विचार, तुमच्या स्वतःच्या कल्पना, तुमचे अग्रक्रम, तुमच्या भावना, पसंती-नापसंती या गोष्टी असता कामा नयेत. आणि जर अशा गोष्टींवर व्यक्तीची नजर असेल तर तिला प्रत्येक पावलागणिक मन किंवा प्राणामध्ये संघर्षाचा सामना करावा लागतो. तसेच समजा जरी व्यक्तीचे मन व प्राण तुलनेने शांत झालेले असले तरीही शरीरामधील आणि मज्जातंतूमधील संघर्षाला तिने सामोरे जाणे अजून बाकी असते. व्यक्ती जेव्हा अंतरंगातून श्रीमाताजींपाशी राहते तेव्हाच फक्त शांती आणि आनंद स्थिर राहू शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 460)