Posts

आंतरिक आधार शोधण्यासाठी व्यक्तीने, आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या अत्यंत सखोल गुहेमध्ये बुडी मारली पाहिजे; व्यक्तीने आत अधिक आत, खोल, अधिक खोल उतरले पाहिजे. मनावर उमटलेले सारे ठसे बाजूला सारून, अक्षुब्ध, अविचल शांतीच्या शोधात, एका स्तरानंतर दुसऱ्या स्तरावर, एका चेतनेनंतर दुसऱ्या चेतनेकडे, असे अगदी खोल गाभ्यातच प्रविष्ट झाले पाहिजे. अस्तित्वाच्या या अतीव अचंचलतेमध्ये (quietude), साऱ्या बाह्य गोंगाटापासून दूर, साऱ्या दुःखयातनांपासून दूर, विचार, कल्पनांपासून दूर, साऱ्या संवेदनांपासून अगदी दूर जात, जिथे अहंकार अस्तित्वातच नसतो अशा स्थानी, ईश्वराचे ‘अस्तित्व’ अनुभवण्यासाठी व्यक्तीने अगदी काळजीपूर्वकपणे अंतरंगामध्ये प्रविष्ट झालेच पाहिजे.

तेथूनही अजून पुढे जावे लागते, शोध घेण्यासारखे बरेच काही शिल्लक असते, जेथे सर्व-शक्तिमान, सर्व-सिद्धिदायिनी ईश्वरी ‘शक्ती’ स्पंदित होत असते, त्या शक्तीकडे चेतना अभिमुख करणे आवश्यक असते. जिथे कोणतीही कृती शिल्लक राहात नाही, कोणताही ठसा उमटलेला नाही, अहंकार नाही, स्वतंत्र अस्तित्व शिल्लक नाही, अन्य काहीही नाही तर फक्त आनंदलहरी आहेत, आणि ज्या ठायी एक परिपूर्ण समत्व असते असे एक स्पंदन; असे एक स्पंदन की जे साऱ्याचे उगमस्थान असते, तिथपर्यंत व्यक्तीने खोल खोल गेले पाहिजे. या परिपूर्ण आणि अक्षर, अविकारी शांतीमध्ये एकात्म पावले पाहिजे, ते ऐक्य अनुभवले पाहिजे…

-श्रीमाताजी [The Supreme by Mona Sarkar]

आंतरिक शांतीचा आधार असतो समता. बाह्य गोष्टींचे हल्ले आणि बाह्य गोष्टींची विविध रूपे, मग ती सुखद असोत वा दुःखद, दुर्भाग्यपूर्ण असोत किंवा सौभाग्यपूर्ण, आनंददायी असोत वा वेदनादायी, मानसन्मानाचे असोत किंवा अपकीर्तीचे, स्तुती असो वा निंदा, मैत्री असो वा शत्रुत्व, पापी असो वा संत, आणि भौतिकदृष्ट्या उष्ण असोत वा शीत असोत इत्यादी सर्व गोष्टींना स्थिर आणि समतायुक्त मनाने स्वीकारण्याची क्षमता म्हणजे समता.

– श्रीअरविंद
(CWSA 10-11 : 03)

कर्म आराधना – ११

प्रश्न : साधना आणि मनाच्या शांतीसाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

श्रीमाताजी : १) कर्म हे साधना म्हणून करा. तुमच्या सर्वोच्च क्षमतेनिशी तुम्ही जे कर्म केले असेल, ते ‘ईश्वरा’ला अर्पण करा आणि कर्मफल ‘ईश्वरा’वर सोपवा.

२) तुमचा मेंदू शक्य तेवढा शांत ठेवून, तुमच्या मस्तकाच्या ऊर्ध्वदिशेस सचेत होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर यामध्ये यशस्वी झालात आणि त्याच अवस्थेमध्ये कर्म केलेत तर, ते कर्म परिपूर्ण होईल.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 301)

विचार शलाका – ०७

अहंकार स्वत:चा अधिकार सोडण्यास नकार देतो त्यामुळेच जीवनात नेहमी सर्व तऱ्हेची कटुता येते.

*

सारे जे काही घडत असते, ते आपल्याला केवळ एकमेव धडा शिकविण्यासाठीच घडत असते; तो म्हणजे, जर आपण अहंकाराचा त्याग केला नाही तर शांती ना आपल्याला मिळेल, ना इतरांना! आणि तेच, जीवन जर अहंकारविरहित असेल तर तो एक अद्भुत चमत्कार ठरतो.

*

अहंकाराच्या लीलेविना कोणतेही संघर्ष झाले नसते. आणि नाटके करण्याची प्राणाची प्रवृत्ती नसती तर जीवनात नाट्यमय घटनाही घडल्या नसत्या.

*

तुमच्या अडचणींच्या प्रमाणावरूनच तुम्हाला किती अहंकार आहे ते तुमचे तुम्हाला कळते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 257-258)

सद्भावना – ११

प्रत्येक व्यक्ती तिच्याभोवती स्पंदनांनी बनलेले असे एक वातावरण वागवत असते; ही स्पंदने त्या व्यक्तीच्या चारित्र्यातून, तिच्या विचारसरणीतून, तिच्या मनःस्थितीतून, तिच्या भावनांच्या, तिच्या कृती करण्याच्या पद्धतीतून निर्माण होत असतात. प्रत्येकाचे असणारे असे हे वातावरण, संपर्काच्या द्वारे, परस्परांवर क्रिया-प्रतिक्रिया करत असते; ही स्पंदने संसर्गजन्य असतात; म्हणजे असे की, आपण ज्या व्यक्तीला भेटतो त्या व्यक्तीची स्पंदने आपण अगदी सहजगत्या स्वीकारतो, विशेषतः त्या व्यक्तीची स्पंदने शक्तिशाली असतील तर! यावरून एक गोष्ट सहज लक्षात येईल की, एखादी व्यक्ती स्वतःमध्ये आणि स्वतःभोवती शांती आणि सद्भावना वागवीत असेल तर, ती व्यक्ती तिच्या व्यक्तिमत्त्वातील आंशिक का होईना पण शांती आणि सद्भावना यांचे एक प्रकारे प्रक्षेपणच इतरांवर करेल, आणि त्याऐवजी ती व्यक्ती जर तिरस्कार, चिडचिड आणि रागराग या गोष्टी वागवत असेल तर, (तिच्या संपर्कात आलेल्या) इतर व्यक्तींमध्ये देखील तशाच प्रवृत्ती जागृत होतील. याच्या आधारे अनेक घटनांचे स्पष्टीकरण देता येणे शक्य आहे, अर्थात, हे काही एकमेव स्पष्टीकरण नाही.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 32)

विचार शलाका – १०

‘पूर्णयोग’ अत्यंत उन्नत आणि अत्यंत अवघड अशा आध्यात्मिक साध्याकडे घेऊन जाणारा वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे.

व्यक्तीकडे या योगासाठी आवश्यक अशी क्षमता असल्याचा पुरेसा आधार असेल किंवा त्या व्यक्तीला दुर्दम्य अशी हाक आली असेल तरच हा योग त्यास प्रदान करण्यात येतो.

केवळ आंतरिक शांती हे या योगाचे उद्दिष्ट नाही, तर ती केवळ या योगासाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक अटींपैकी एक अट आहे

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 27)

ईश्वरी कृपा – ०८

एक अशी ‘सत्ता’ आहे, जिच्यावर कोणताही सत्ताधीश हुकमत गाजवू शकणार नाही; असा एक ‘आनंद’ आहे की, जो कोणत्याही लौकिक यशातून प्राप्त होणार नाही; असा एक ‘प्रकाश’ आहे, जो कोणत्याही प्रज्ञेच्या ताब्यात असणार नाही; असे एक ‘ज्ञान’ आहे की, ज्यावर कोणतेही तत्त्वज्ञान किंवा कोणतेही विज्ञान प्रभुत्व मिळवू शकणार नाही; एक असा ‘परमानंद’ आहे की, कोणत्याही इच्छापूर्तीच्या समाधानातून तसा आनंद मिळू शकणार नाही; अशी एक ‘प्रेमा’ची तृष्णा आहे, जिची तृप्ती कोणत्याही मानवी नातेसंबंधातून होऊ शकत नाही; अशी एक ‘शांती’ आहे, जी व्यक्तिला कोठेच प्राप्त होत नाही, अगदी मृत्युमध्येसुद्धा प्राप्त होत नाही. ही ‘सत्ता’, हा ‘आनंद’, हा ‘प्रकाश’, हे ‘ज्ञान’, हा ‘परमानंद’, हे ‘प्रेम’, ही ‘शांती’ ‘ईश्वरी कृपे’पासूनच प्रवाहित होते.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 380)

शांतपणे तेवणाऱ्या एखाद्या ज्योतीप्रमाणे, कोणतीही वेडीवाकडी वळणे न घेता, सरळ वर जाणाऱ्या सुगंधाप्रमाणे, माझे प्रेम सरळ तुझ्याप्रत जात आहे आणि एखाद्या बालकाप्रमाणे, कोणत्याही तार्किकतेविना, किंवा कोणत्याही काळजीविना, मी तुझ्याप्रत असा विश्वास बाळगत आहे की, तुझा मानस प्रत्यक्षात उतरेल, तुझा प्रकाश उजळून येईल, तुझी शांती सर्वत्र प्रसृत होईल. आणि तुझे प्रेम विश्वावर पांघरले जाईल. जेव्हा तुझी इच्छा असेल की, मी तुझ्यामध्ये असावे, मी तूच व्हावे तेव्हा मग आपल्यामध्ये कोणताही भेद उरलेला नसेल. त्या कृपांकित क्षणांची मी कोणत्याही अधीरतेविना वाट पाहत आहे; एखादा शांतपणे वाहणारा झरा जसा असीम सागराकडे प्रवाहित होत असतो, तशीच मी स्वत:ला त्या क्षणांप्रत अप्रतिहतपणे जाऊ देत आहे.

तुझी शांती माझ्यामध्ये आहे आणि त्या शांतीमध्ये मी हे पाहत आहे की, या अवघ्या चराचरात एकमेव तूच विद्यमान आहेस, तू सर्वत्र चिरकालाच्या स्थिरतेनिशी निवास करत आहेस.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 11)

तुम्हाला आठवते का, ती प्रचंड वादळाची रात्र ? विजांचा, ढगांचा मोठाच गडगडाट चालू होता, पावसाच्या माऱ्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. मला वाटले की, श्रीअरविंदांच्या खोलीत जावे आणि खिडक्या बंद करण्यास त्यांना मदत करावी. मी दार उघडून आत गेले तेव्हा पाहते तो काय? श्रीअरविंद अगदी शांतपणे त्यांच्या टेबलावर काहीतरी लिहीत बसले होते. तिथे त्या खोलीमध्ये एवढी सघन शांती होती की, बाहेर एवढे वादळ घोंघावत आहे याची कोणी कल्पनाही करू शकले नसते.

– श्रीमाताजी

एका विशिष्ट दृष्टीने पाहिले तर समता आणि तमस ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे एकमेकींच्या उजळ व अंधाऱ्या अशा प्रतिकृती आहेत. उच्चतर प्रकृती शांतीमध्ये आराम शोधते तर, निम्नतर प्रकृती उर्जेच्या विश्रांतीमध्ये आणि तमसामध्ये, अचेतनामध्ये परतण्यामध्ये आराम मिळविण्यासाठी धडपड करते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 477)

कशामध्ये तरी गढलेली प्रगाढ अशी स्थिरता म्हणजे शांती होय. ती अतिशय सकारात्मक असते, ती जणुकाही शांत, लाटाविरहित आनंदाच्या जवळ जाणारी असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137)

उच्चतर आध्यात्मिक चेतनेची शांती, शक्ती, प्रकाश, आनंद ह्या साऱ्या गोष्टी वर आहेत, परंतु त्या झाकलेल्या स्वरूपात आहेत. त्या खाली अवतरण्यासाठी एक विशिष्ट ऊर्ध्वगामी असणारा झरोका असला पाहिजे. मनाची शांती आणि अवतरित होऊ पाहणाऱ्या प्रभावाला खुली असणारी एककेंद्री क्रियाविरहितता ह्या गोष्टी म्हणजे त्या अवतरणासाठी आवश्यक असणारी उत्तम स्थिती होय.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 482)

साधनेमधील पहिली आवश्यक गोष्ट कोणती असेल तर, ती म्हणजे मनामध्ये स्थिर शांती आणि शांतता प्राप्त करून घेणे. अन्यथा तुम्हाला साधनेतील अनुभूती येऊ शकतील पण स्थायी असे काहीही नसेल. शांत मनामध्येच खरीखुरी जाणीव निर्माण करता येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 149-150)