Tag Archive for: महानता

 

(दि. १९.०६.१९०९)

मानवतेसाठी भारताच्या उभारणीमध्ये साहाय्यभूत होणे हे आमचे ध्येय आहे. हाच आमच्या राष्ट्रीयतेचा आत्मा असून, त्याला आम्ही मानतो आणि त्याचे अनुसरण करतो. आमचे मानवतेला असे सांगणे आहे की, “आता अशी वेळ आली आहे जेव्हा तुम्ही एक मोठे पाऊल उचलले पाहिजे आणि या भौतिक अस्तित्वाच्या वर उठले पाहिजे; आणि मानवता आता ज्याकडे वळत आहे अशा अधिक उच्च, अधिक खोल व अधिक विशाल अशा जीवनाकडे वाटचाल केली पाहिजे. मानवजातीला भेडसावणाऱ्या समस्या या आंतरिक साम्राज्यावर विजय प्राप्त करून घेऊनच सोडविता येतील; केवळ निसर्गाच्या शक्ती आरामदायक सुखसोयींच्या सेवेत जुंपून या समस्या सुटणार नाहीत; तर बाह्य प्रकृतीवर आंतरिक रितीने विजय मिळवत, माणसाचे बाह्य व आंतरिक स्वातंत्र्य सिद्ध करत, बुद्धी व आत्म्याच्या शक्तींवर प्रभुत्व मिळवूनच या समस्या सोडविता येतील. या कार्यासाठी आशिया खंडाचे पुनरुत्थान आवश्यक असल्यामुळेच आशिया खंडाचा उत्कर्ष होत आहे. या कार्यासाठी भारताचे स्वातंत्र्य व त्याची महानता यांची आवश्यकता आहे आणि म्हणूनच भारत त्याच्या नियत अशा स्वातंत्र्याचा व महानतेचा दावा करत आहे…”

– श्रीअरविंद (CWSA 08 : 26-27)

मानवाची महानता तो काय आहे ह्यामध्ये नसून, तो काय करू शकतो ह्यामध्ये सामावलेली आहे. मानव ही बंदिस्त अशी एक जागा आहे आणि जिवंत परिश्रमांची ती अशी एक गुप्त कार्यशाळा आहे की, ज्यामध्ये त्या दिव्य कारागीराकडून अतिमानवता घडवली जात आहे आणि हेच मानवाचे खरेखुरे वैभव आहे.

पण यापेक्षाही एका अधिक महानतेमध्ये त्याचा प्रवेश झाला आहे. ती महानता अशी की, कोणत्याही कनिष्ठ प्रजातींना मिळाली नाही अशी एक संधी त्याला मिळालेली आहे. मानवामध्ये होणाऱ्या दिव्य परिवर्तनाचा जाणीवसंपन्न कारागीर बनण्याची, त्या परिवर्तनामध्ये थोड्याफार प्रमाणात सहभागी होण्याची परवानगी त्याला मिळालेली आहे.

मात्र त्याच्या देहामध्ये ही महानता प्रत्यक्षात उतरावी याकरिता, म्हणजेच मानवी देहाचे अतिमानवामध्ये रूपांतर शक्य व्हावे याकरिता, मानवाची स्वेच्छापूर्वक संमती, त्याची एकदिश झालेली इच्छाशक्ती आणि त्याचा सहभाग यांची आवश्यकता आहे. त्याची ‘अभीप्सा’ ही पृथ्वीने त्या अतिमानसिक निर्मिकाला दिलेली हाक आहे.

जर पृथ्वी आवाहन करेल आणि परमश्रेष्ठ त्यास प्रतिसाद देईल तर, त्या भव्य आणि गौरवशाली रूपांतरणाची घटिका अगदी आत्तादेखील असू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 160)