भारत – एक दर्शन ०३
जीवनविषयक भारतीय संकल्पना ही युरोपीयन संकल्पनांपेक्षा अधिक सखोल अशा केंद्रातून निघते आणि ती युरोपीयन संकल्पनांपेक्षा तुलनेने अधिक आंतरिक मार्गांवरून वाटचाल करत, एका अगदी वेगळ्या उद्दिष्टाप्रत जाऊन पोहोचते. भारतीय विचारदृष्टीचे एक वैशिष्ट्य हे आहे की, ती रूपांच्या माध्यमातून वेध घेते, इतकेच काय पण शक्तीच्या माध्यमातूनदेखील वेध घेते आणि सर्वत्र, प्रत्येक गोष्टीमध्ये ‘आत्म्या’चा शोध घेते.
भारतीयांच्या जीवनविषयक इच्छेचे हे वैशिष्ट्य आहे की, तिला जर आत्म्याचे सत्य गवसले नाही आणि त्या सत्यानुसार ती जगली नाही तर तिला कृतार्थ झाल्यासारखे वाटत नाही, स्वतःला परिपूर्णतेचा स्पर्श झाल्यासारखे तिला वाटत नाही, अधल्यामधल्या कोणत्याही स्थितीमध्ये कायमचे समाधान मानून राहणे तिला न्याय्य वाटत नाही. जगाविषयीची, ‘प्रकृती’विषयीची आणि अस्तित्वाविषयीची भारतीय संकल्पना भौतिक नसून, ती मानसिक आणि आध्यात्मिक आहे. जड भौतिकद्रव्य आणि अचेतन शक्ती याहून ‘चैतन्य’, आत्मा, चेतना या गोष्टी केवळ महत्तर आहेत असे नाही तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात आहेत आणि त्यातूनच जड भौतिकद्रव्य आणि अचेतन शक्ती या निम्नतर गोष्टींचा उदय होतो. सर्व प्रकारचे सामर्थ्य म्हणजे गुप्त आत्म्याची शक्ती असते किंवा त्याचे माध्यम असते; जगाला धारण करणारी ‘शक्ती’ ही सचेत ‘संकल्पशक्ती’ आहे आणि ‘प्रकृती’ ही तिच्या कार्यकारी शक्तीची यंत्रणा आहे. जडभौतिक द्रव्य हे त्यामध्ये लपलेल्या चेतनेचे शरीर किंवा क्षेत्र आहे, भौतिक विश्व हे ‘चैतन्या’चे रूप आणि चलनवलन आहे. मनुष्य म्हणजे जडद्रव्यापासून जन्माला आलेला प्राण आणि मन नाही आणि तो भौतिक प्रकृतीच्या कायमच आधीन राहणारा आहे, असेही नाही तर, प्राण आणि शरीर यांचा उपयोग करून घेणारा असा तो ‘आत्मा’ आहे. भारतीय मनुष्य अस्तित्वाच्या या संकल्पनेवर ज्ञानयुक्त श्रद्धा ठेवतो, त्या संकल्पनेनुसार जीवन जगण्याचा तो प्रयत्न करतो. त्याच्या उच्चकोटीच्या परिश्रमांचे शास्त्र हेच आहे आणि साधनाही हीच असते. अंतत: प्राण आणि शरीराला जखडलेल्या मनाचे कवच फोडून बाहेर यायचे, आणि एका महत्तर आध्यात्मिक चेतनेमध्ये प्रवेश करायचा ही त्याची आस असते; भारतीय संस्कृतीचा अगदी गाभाभूत अर्थ हाच आहे. ज्या भारतीय आध्यात्मिकतेविषयी बरीच चर्चा केली जाते ती आध्यात्मिकता याच संकल्पनेच्या आधारे घडलेली आहे.
(टीप – श्रीअरविंद येथे आध्यात्मिकतेविषयीची प्राचीन संकल्पना स्पष्ट करत आहेत, हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. परंतु त्यांची आध्यात्मिकतेविषयीची संकल्पना याहून अधिक व्यापक आहे, हे आपण जाणतोच.)
– श्रीअरविंद [CWSA 20 : 154-155]