Posts

शरीरातील चैत्य अस्तित्वाची उपस्थिती हे नेहमीच सुरचना आणि परिवर्तनाचे केंद्र असते. म्हणून, दोन शारीर जन्मांच्या मधल्या संक्रमणाच्या काळात प्रगती होत राहते, असे समजणे किंवा काही जण मानतात त्याप्रमाणे, त्या काळात ही प्रगती अधिक पूर्णत्वाने आणि अधिक त्वरेने होते, असे मानणे ही मोठी चूक आहे. सर्वसाधारणत: त्या काळात कोणतीही प्रगती होत नाही; कारण चैत्य पुरुषाने विश्रांत स्थितीत प्रवेश केलेला असतो आणि इतर सर्व भाग, कमीअधिक क्षणिक जीवनानंतर त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये विसर्जित होऊन गेलेले असतात.

पृथ्वीवरील जीवन हेच प्रगतीचे स्थान आहे. इथे, या पृथ्वीवरच, पृथ्वीवरील जीवनकालावधीमध्येच प्रगती शक्य आहे. तो चैत्य पुरुष स्वत:च स्वत:च्या प्रगतीचे आणि उत्क्रांतीचे नियोजन करीत, एका जन्मामागून दुसऱ्या जन्मांमध्ये ही प्रगती घडवीत राहतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 270)

प्रश्न : चैत्य अग्नी (Psychic Fire) कसा प्रज्वलित करावा?

श्रीमाताजी : अभीप्सेच्या द्वारे ! प्रगतीसाठी केलेला संकल्प आणि परिपूर्णतेप्रत बाळगलेली आस यांद्वारे ! आणि सर्वांवर कळस म्हणजे, प्रगतीसाठीचा संकल्प आणि आत्मशुद्धीकरण यांद्वारे हा चैत्य अग्नी चेतवला जातो.

ज्यांच्यामध्ये प्रगतीची इच्छा तीव्र असते आणि जेव्हा ते ती इच्छा आध्यात्मिक प्रगती आणि शुद्धीकरण या दिशेने वळवितात तेव्हा, आपोआप त्यांच्यामधील चैत्य अग्नी प्रदिप्त होतो. एखाद्याला जर स्वत:मधील एखादा दोष, एखादी त्रुटी दूर करावयाची असेल, त्याच्या प्रकृतीमधील काहीतरी त्याला प्रगत होण्यापासून रोखत असेल, ते सारे जर त्याने या चैत्य अग्नी मध्ये फेकून दिले तर, हा अग्नी अधिक तीव्रतेने प्रज्वलित होतो. आणि ही केवळ प्रतिमा नाही, ती सूक्ष्म भौतिक पातळीवरील वस्तुस्थिती आहे.

कोणी त्या ज्योतीची ऊब अनुभवू शकतो, तर कोणी एखादा सूक्ष्म भौतिक स्तरावर त्या ज्योतीचा प्रकाशदेखील पाहू शकतो. जेव्हा प्रकृतीमध्ये असे काही असते की, जे प्रगत होण्यापासून रोखत असते; ते जर व्यक्तीने त्या अग्नीमध्ये फेकून दिले, तर ते जळू लागते आणि ती ज्वाला अधिकाधिक मोठी होत जाते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 251)

पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजनच प्रगती हे आहे. जर तुम्ही प्रगत होत राहणे थांबविलेत तर तुम्ही मरून जाल. प्रगत न होता जो कोणता क्षण तुम्ही व्यतीत करता, तो तुम्हाला स्मशानाच्या एक पाऊल जवळ घेऊन जाणारा असतो.

*

ज्या क्षणी तुम्ही समाधानी होता आणि अभीप्सा बाळगेनाशी होता, तत्क्षणी तुम्ही मरु लागता. जीवन ही एक वाटचाल आहे, जीवन हा एक प्रयास आहे आहे; जीवन म्हणजे पुढे चालत राहणे आहे, भावी प्रकटीकरण आणि साक्षात्काराप्रत उन्नत होणे आहे.

विश्रांती घेण्याची इच्छा बाळगणे याइतकी दुसरी कोणतीच भयानक गोष्ट नाही.

*

शिकायला हवे आणि प्रगती करायला हवी असे नेहमीच काहीतरी व्यक्तीकडे असते. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये ज्यामधून काही धडा घेता येईल असे आणि ज्याद्वारे प्रगती करता येईल असे प्रसंग आपण शोधू शकतो.

*

मार्गावर प्रगत होण्यासाठी म्हणून, व्यक्ती स्वत: जशी आहे आणि जे काही तिच्याकडे आहे ते सारे त्यागण्यासाठी, व्यक्तीने प्रत्येक क्षणी सिद्ध असणे म्हणजे प्रगती होय.

*

ईश्वराच्या नेहमी अधिकाधिक समीप जाणे म्हणजे खरी प्रगती.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 75 & 77)

प्रश्न : चैत्य पुरुष जागृत करण्याची प्रभावी साधना कोणती?

श्रीमाताजी : तो जागृतच आहे; तो टक्क जागा आहे. आणि तो जागा आहे, एवढेच नाही तर, तो सक्रिय आहे, एवढेच की, तुम्हाला त्याची जाणीव नाही. तुम्हाला तो संवेदित होत नसल्यामुळे तुम्हाला तो झोपला आहे असे वाटते.

मूलत: ह्या चैत्य पुरुषाची आंतरिक इच्छा जर मानवामध्ये नसती तर, मला वाटते मनुष्यमात्र हा अगदीच निराश, मंद झाला असता, तो जवळजवळ प्राण्यासारखेच जीवन जगला असता. अभीप्सेची प्रत्येक चमक ही त्या चैत्य प्रभावाची अभिव्यक्ती असते. जर चैत्याचे अस्तित्वच नसते, चैत्याचा प्रभाव नसता तर, माणसामध्ये प्रगतीची जाणीव किंवा प्रगतीची इच्छाच कधी निर्माण झाली नसती.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 165)

(‘जीवनाचे शास्त्र’ या लेखमालिकेमध्ये श्रीमाताजींचे एक वचन असे आहे की – “प्राणतत्त्वाचे सहकार्य मिळाले तर, कोणताच साक्षात्कार अशक्य नाही आणि कोणतेच रूपांतरण अव्यवहार्य नाही.” या विधानाचे अधिक स्पष्टीकरण करताना त्या म्हणतात.)

प्राणतत्त्वाला स्वत:च्या शक्तीची चांगली जाणीव असते; आणि म्हणूनच प्राणाला महत्त्व आहे. त्याच्या ठिकाणी प्रचंड कार्यशक्ती असल्याने कोणतीच अडचण ओलांडणे त्याला कठीण नसते; पण त्याने योग्य गोष्टीला साथ द्यावयास हवी. त्याने सहकार्य केले तर सर्वकाही अद्भुत रीतीने घडून येईल. पण त्याच्याकडून असे सहकार्य सतत मिळणे हे काही तितकेसे सोपे नाही.

प्राण हा एक चांगला कार्यकर्ता आहे; तो अत्यंत चांगल्या रीतीने कर्म करणारा आहे. पण कर्म करत असताना स्वत:चे समाधान मिळविण्यासाठी तो नेहमी धडपडत राहतो. कर्मामधून त्याला काहीतरी हवे असते, कर्मातला सर्व आनंद त्याला हवा असतो, सर्व फायदा त्यालाच पाहिजे असतो; आणि जेव्हा या ना त्या कारणाने (कारण अशी कारणे अनेक असू शकतात) हे समाधान त्याला मिळू शकले नाही तर तो दु:खी होतो, त्याचे सुख अजिबात नाहीसे होऊन जाते : ”हे बरोबर नाही; मी कर्म करतो आणि त्याच्या मोबदल्यात मला काहीच मिळत नाही?” असे म्हणून तो खट्टू होतो. तो जागचा हलत नाही, तो ढिम्म बनतो, काहीच बोलत नाही आणि कधी कधी तर तो असेही म्हणतो, ”म्हणजे मी कोणीच नव्हे, मला अस्तित्वच नाही.” तेव्हा तुमच्या शरीरातून सर्व त्राण निघून जातात, तुम्हाला अतोनात थकवा वाटतो, तुम्हाला गळून गेल्यासारखे वाटते आणि तुम्ही काहीही करू शकत नाही.

आणि एकाएकी ही परिस्थिती अधिकच बिकट होते कारण, मी तुम्हाला हे सांगितलेच पाहिजे की, मनाचे ह्या प्राणतत्त्वाशी बरेच सख्य असते; तर्कसंगत विचार करणाऱ्या मनाची नव्हे तर, भौतिक मनाची ह्या प्राणतत्त्वाशी अगदी घनिष्ठ मैत्री असते. त्यामुळे जेव्हा प्राणतत्त्व म्हणू लागते, “मला अमुक तमुकशी काही कर्तव्य नाही; मला नीट वागणूक मिळालेली नाही, मला त्याच्याशी काहीही संबंध नको आहे,” त्यावेळी साहजिकच हे भौतिक मन प्राणाला पुष्टी देण्यासाठी, त्याचे समर्थन करण्यासाठी, त्याला सबळ कारणे पुरविण्यासाठी पुढे सरसावते, आणि मग पुन्हा एकदा तीच रडकथा सुरु होते :

प्राणतत्त्व म्हणू लागते, “जीवनात काही अर्थ नाही; खरेच मला या लोकांचा अगदी वीट आला आहे. सर्वच परिस्थिती माझ्यावर उलटलेली दिसते. आता येथून निघून गेलेलेच बरे.” इ. इ.. असे नेहमी नेहमी घडून येते; पण कधी तरी, कुठेतरी बुद्धीचा प्रकाश दिसतो आणि ती म्हणते, “पुरे झाले आता हे सगळे नाटक.”

पण जर का हे प्रकरण फारच बळावले आणि तुम्ही वेळीच प्रतिकार केला नाहीत तर, तुम्ही निराशेला बळी पडता आणि म्हणू लागता, ”खरेतर हे जीवन माझ्यासारख्यांसाठी बनविलेलेच नाही. मी स्वर्गामध्ये खरा सुखी होईन. तेथे सर्वजण चांगले वागणारे असतील आणि मला जे काय पाहिजे ते तेथे मला करता येईल.” अशा रीतीने या स्वर्गकल्पना जन्म पावलेल्या असतात.

मला खरोखरीच वाटते की, मन आणि प्राणतत्त्व या दोघांनी मिळून संगनमताने ही स्वर्गकल्पना शोधून काढलेली आहे. कारण, जेव्हा तुमचे जीवन आणि तुमचे अस्तित्व तुमच्या इच्छावासनांशी मिळतेजुळते नसते तेव्हा, तुम्ही शोक करू लागता आणि म्हणता, ”पुरे झाले आता हे जीवन. हे जीवन दुःखमय आहे, फसवे आहे. मला मरण हवे आहे.” त्यानंतर असा क्षण येतो की, जेव्हा परिस्थिती अधिकच गंभीर, बिकट बनते. निराशा बंडखोरीमध्ये पालटते आणि विषण्णता ही असंतोषाचे रूप धारण करते.

मी याठिकाणी वाईट वृत्तीच्या व्यक्तींविषयी बोलत आहे. ….ही वाईट प्रवृत्तीची माणसे संतापतात, चिडतात, त्यांना सर्वकाही मोडून तोडून, खाली खेचून जमीनदोस्त करायचे असते : “आता तुम्ही पाहाच, मला जसे पाहिजे तसे जे वागत नाहीयेत, ते त्याबद्दल शिक्षा भोगतील,” असे ते म्हणू लागतात. आणि तेव्हा मग परिस्थिती अधिकच गंभीर, बिकट बनते; कारण त्याला साथ द्यायला हे भौतिक मन तेथे तयारच असते. मग काय, हे मन सूड उगविण्याच्या नाना अद्भुत कल्पना सुचवू लागते. निराशेच्या भरात तुम्ही एक मूर्खपणा करता आणि या सूडभावनेतून अजून एक!

निराशेच्या भरात तुम्ही केलेल्या मूर्खपणाच्या कृतींचा व्यक्तिश: तुमच्याशी संबंध असतो, पण दुष्टपणाने केलेल्या दुष्ट कृतींचा इतरांशीही संबंध असतो. कधीकधी तर ही अविचारी कृत्ये फारच गंभीर स्वरूपाची हानी पोहोचविणारी असतात.

तुमच्यापाशी थोडीशी जरी सदिच्छा असेल तर, जेव्हा अशा रीतीने तुम्ही तीव्र भावनांनी पछाडले जाता, तेव्हा काहीच कृती करायची नाही असे ठरवून तुम्ही स्वत:ला जर सांगितलेत की, “मी मुळीच हलणार नाही, हे वादळ शांत होईपर्यंत मी असाच स्तब्ध राहीन.” तर फारच चांगले; कारण जर तुम्ही तसे केले नाहीत तर, तुमचे कित्येक महिन्यांचे नियमितपणे केलेले परिश्रम काही क्षणात धुळीस मिळतात.

(श्रीमाताजी ‘जीवनाचे शास्त्र’ या लेखमालिकेतील काही भाग वाचतात आणि म्हणतात की, ‘याठिकाणी आता मी तुम्हाला एक दिलासा दिला आहे.” तो भाग असा -)

“ज्यांनी आपल्या चैत्यपुरुषाशी इतका पुरेसा संबंध प्रस्थापित केला आहे की, ज्यामुळे ते अभीप्सा-ज्योती व प्राप्तव्य ध्येयाची जाणीव जितीजागती ठेवू शकतात, त्या लोकांच्या बाबतीत असे आणीबाणीचे कसोटीचे प्रसंग फार काळ टिकत नाहीत. आणि त्यापासून त्यांना फारसा धोकाही पोहोचत नाही. (चैत्यपुरुषाशी संपर्क प्रस्थापित झालेल्या) अशा व्यक्ती, एखाद्या बंडखोर मुलाला एखादी व्यक्ती जशी हाताळते त्याप्रमाणे, ध्येयाविषयीच्या या जाणिवेच्या साहाय्याने, धीराने व चिकाटीने सत्य व प्रकाश दाखवून देऊन, त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत, आपल्या प्राणाला हाताळू शकतात आणि क्षणभरासाठी झाकोळला गेलेला सद्भाव परत जागृत होतो.

(श्रीमाताजी आता पुढे विवेचन करत आहेत) आणि आता हा अखेरचा दिलासा. जे कोणी अंत:करणाने खरेखुरे सच्चे आहेत, जे खरेखुरे सद्प्रवृत्त आहेत, त्यांच्याबाबतीत मात्र प्राणाचे हे उद्रेक, हे क्षोभ प्रगतीसाठीचे उपयुक्त असे साधन होऊ शकतात. ज्या ज्या वेळी तुम्हावर असा आघात होईल, असे वादळ तुम्हामध्ये उठेल, त्या प्रत्येक वेळी, तुम्ही त्याचे स्वरूप बदलून, त्याचा नवीन प्रगतीसाठी उपयोग करून घेऊ शकाल. ध्येयप्राप्ती साध्य करून देणारे एक पुढचे पाऊल असे त्याला रूप येऊ शकेल.

अगदी नेमकेपणाने सांगायचे तर, जर तुमच्यामध्ये, या आघाताच्या मूळ कारणाकडे म्हणजे तुम्ही जे चुकीचे वागलात, तुम्ही जे चुकीचे विचार केलेत, तुमच्या ज्या चुकीच्या भावना होत्या – त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून पाहण्यासाठी आवश्यक असणारी खरीखुरी प्रामाणिकता जर तुमच्यापाशी असेल; तुम्ही ती दुर्बलता, ती हिंसा, तुमचा तो पोकळ अभिमान जर तुम्ही पाहू शकाल; (मी एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरले की प्राणतत्त्वामध्ये मनापेक्षाही पुष्कळ अधिक मिथ्याभिमान असतो.) आणि या सर्व गोष्टींकडे जर तुम्ही रोखून बघितलेत, अगदी जणू डोळ्यात डोळे घालून रोखून पाहिलेत आणि अगदी प्रामाणिकपणे, मनापासून जर तुम्ही कबूल केलेत; जर तुम्हाला पटले की, तुमच्या चुकीमुळे, तुमच्या दोषामुळे अमुक एक गोष्ट घडली आहे तर, त्या भागावर तुम्ही जणू जळजळीत निखारा ठेवू शकाल. त्यामुळे तुमची दुर्बलता शुद्ध होईल आणि एका नवीन चेतनेमध्ये तिचे परिवर्तन होईल. मग तुम्हाला कळून येईल, वादळानंतर तुमच्यात बदल झालेला आहे, तुमचा थोडातरी विकास झालेला आहे, तुम्ही खरोखरीच काही प्रगती साधली आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 50-52)

कधीकधी असेही होते की, व्यक्ती तत्त्वज्ञानाचे एक आख्खे पुस्तक वाचून काढते पण, एका पावलाने देखील तिची पुढे प्रगती होत नाही. असेही घडते की, एखादी व्यक्ती धर्माची अगदी उत्कट भक्त असू शकते पण तिची अजिबात प्रगती होत नाही. अशीही काही माणसं आहेत की, ज्यांनी त्यांचे आख्खे आयुष्य हे ध्यानधारणेमध्ये व्यतीत केले आणि तरीदेखील त्यांना काहीच प्राप्त झाले नाही. अशी ही काही माणसं आहेत की, जी अगदी साधीसुधी कामे करायची, उदा. चांभाराने जुन्या चपलाबूट शिवणे इ. आणि त्यांना आध्यात्मिक अनुभव आलेला होता. व्यक्ती काय विचार करते, काय बोलते यापेक्षा अनुभव वगैरे गोष्टी या खूप वेगळ्या आहेत. ती एक देणगी आहे, इतकेच काय ते. आणि यासाठी काय आवश्यक असेल तर ते म्हणजे – त्या ईश्वराशी एकत्त्व पावण्यामध्ये यशस्वी होणे आणि ईश्वरामध्ये जीवन जगणे. कधीकधी तुम्ही पुस्तकातील एकच वाक्य वाचता आणि तुम्हाला ते वाक्य तेथे घेऊन जाते. तर कधी तुम्ही तत्त्वज्ञानाचे आख्खे पुस्तक वाचूनही काही उपयोग होत नाही. पण अशीही काही माणसं असतात की, तत्त्वज्ञानाची पुस्तके वाचल्यामुळे त्यांना प्रगती करण्यासाठी काही मदत झालेली असते. पण या सर्व गोष्टी गौण असतात.

एकच गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे : प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण इच्छा, संकल्प; कारण या गोष्टी निमिषार्धात होत नाहीत. त्यामुळे व्यक्तीने चिकाटी ठेवली पाहिजे. जेव्हा एखाद्याला असे वाटते की, त्याची प्रगती होत नाहीये, अशावेळी त्याने नाउमेद होता कामा नये. त्याच्या प्रकृतीमध्ये असे काय आहे की, जे त्याला विरोध करत आहे ते त्याने शोधून काढावयास हवे; आणि मग आवश्यक ती प्रगती करावयास हवी. त्यामुळे व्यक्ती एकाएकी पुढे जाते. आणि जेव्हा तुम्ही शेवटापर्यंत जाता तेव्हा, तुम्हाला अनुभव येतो.

आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, ज्या माणसांनी परस्परांहून अगदी विभिन्न असे मार्ग अनुसरलेले असतात, ज्यांच्या विभिन्न अशा मनोवृत्ती असतात, त्यांच्यापैकी काहीजण खूप भाविक असतात तर काही अगदी नास्तिक असतात, काही जडवादी असतात पण हे सारे एकाच प्रकारच्या अनुभवापाशी येऊन पोहोचतात; तो अनुभव सर्वांना सारखाच येतो. कारण तो सत्य आहे – तो खरा आहे, कारण ती एकमेवाद्वितीय अशी वस्तुस्थिती आहे. व्यक्ती काय बोलते ते महत्त्वाचे नाही, तर महत्त्वाचे आहे ते तुम्ही तुमच्या मार्गाचे अनुसरण करणे, भले मग तो मार्ग कोणताही असो, त्याचे अनुसरण करणे हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 26-27)

विद्यार्थी : माताजी, प्रगतीसाठी क्रीडास्पर्धा आवश्यक आहेत का ?

श्रीमाताजी : नैतिक शिक्षणाच्या दृष्टीने विचार करता, खरंतर, त्या आवश्यक आहेत कारण जर एखाद्याने त्या स्पर्धांमध्ये योग्य वृत्तीने सहभाग घेतला तर स्वत:च्या अहंकारावर ताबा मिळविण्याची ती एक उत्तम संधी आहे. पण स्वत:च्या दुर्बलता व कनिष्ठ वृत्ती ह्यांच्यावर मात करण्याच्या भूमिकेतून त्याकडे न पाहता, जर का एखादा नुसताच खेळत राहिला तर साहजिकच आहे की, त्याला त्यांपासून कसा व काय फायदा करून घ्यावयाचा ते माहीत नसेल आणि त्यामुळे त्याचा काहीच उपयोग होणार नाही. परंतु अशा कोणत्याही हीन प्रकारच्या प्रवृत्तींशिवाय, द्वेषभाव वा महत्त्वाकांक्षा न बाळगता, जर का एखादा योग्य वृत्तीने खेळावयाची इच्छा बाळगेल; ज्याला ‘चांगला खेळ’ (fair play) म्हटले जाते तशी अभिवृत्ती राखेल, म्हणजेच सर्वोत्तम तेच करण्याचा प्रयत्न करणे आणि यशापयशाची चिंता न करणे, अशी अभिवृत्ती राखेल; समजा त्याला यश मिळाले नाही किंवा त्याला अनुकूल अशा गोष्टी घडल्या नाहीत तरी त्यामुळे अस्वस्थ न होता तो जर प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकेल, तर त्या गोष्टी उपयुक्त ठरतील. याचा परिणाम म्हणून, या अशा स्पर्धांमधून, आत्मसंयम व कर्मफलापासून अलिप्तवृत्ती या गुणांनी व्यक्ती संपन्न होईल. ह्या गोष्टी व्यक्तीचे असामान्य चारित्र्य घडविण्यामध्ये साहाय्यभूत होतात.

अर्थातच, जर तुम्ही त्या स्पर्धा अगदी सामान्य पद्धतीने, सर्व प्रकारच्या सामान्य व हीन क्रियाप्रतिक्रिया राखत खेळलात, तर त्यांपासून तुम्हाला काहीच लाभ होणार नाही. पण हे तर कोणत्याही कृतीबाबत म्हणता येईल. मग ते खेळात असो किंवा बौद्धिक क्षेत्रात असो, जर कोणी कोणतीही कृती सामान्य पद्धतीने करेल, तर तसे करणे म्हणजे वेळ वाया घालावणेच आहे. पण जर का तुम्ही स्पर्धेमध्ये, वा सामूहिक क्रीडास्पर्धांमध्ये योग्य वृत्तीने खेळलात, योग्य वृत्तीने सहभागी झालात तर, ते एक चांगले शिक्षण आहे कारण ते तुम्हाला विशेष प्रयत्न करावयास आणि तुमच्या स्वत:च्या अशा मर्यादा ओलांडण्यास भाग पाडते. ज्या एरवी बहुधा सुप्तच राहिल्या असत्या अशा तुमच्यातील बऱ्याच गोष्टींबाबत, हालचालींबाबत सजग करण्याकरता तुम्हाला मिळालेली ती एक नक्कीच उत्तम संधी असते.

पण अर्थातच, तुम्हाला मिळालेली ही एक संधी आहे आणि प्रगतीचे साधन आहे हे तुम्ही कधीही विसरता कामा नये. जर तुम्ही स्वत:ला नुसतेच मोकळे सोडलेत आणि सामान्य पद्धतीनेच, नुसतेच खेळत राहिलात तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालविता आहात. पण हे सर्वच बाबतीत खरे आहे; केवळ खेळाबाबत आहे असे नाही, अगदी अभ्यास आणि इतर सर्व बाबतीतसुद्धा तेच खरे आहे. एखादा काय करतो यापेक्षा तो त्या गोष्टी कशा करतो, तो कोणत्या वृत्तीने त्या गोष्टी करतो यावर सारे काही अवलंबून असते.
जर का तुम्ही सगळेच योगी असता आणि तुम्ही जे काही करता ते तुमच्या सर्वोच्च प्रयत्नांनिशी व सर्वोच्च क्षमतांनिशी करत असता, नेहमी अधिकाधिक उत्तम करण्याच्या दृष्टीने, शक्य तितके चांगलेच करत असता, तर मग ह्या स्पर्धा, बक्षिसे, पारितोषिके ह्यांची काहीच आवश्यकता नव्हती. पण श्रीअरविंद लिहितात त्याप्रमाणे, योगी असावे अशी अपेक्षा लहान मुलांकडून करता येत नाही. आणि घडणीच्या काळामध्ये, अगदी जड जाणिवेलादेखील प्रगतीसाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रोत्साहनाची आवश्यकता असते…आणि हा असा बालपणीचा काळ कितीही वर्षे टिकून राहू शकतो.

कोणतीही महत्त्वाकांक्षा बाळगू नका, कोणतेही ढोंग करू नका, आव आणू नका, प्रत्येक क्षणी तुमच्यातील चरम स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा.

कोणतेही काम करीत असताना अशा स्थितीत राहणे, ही समग्र जीवनाच्या दृष्टीने आदर्श स्थिती आहे. आणि अशी स्थिती जर एखाद्याला साध्य झाली, तर, तो पूर्णत्वाच्या मार्गावर फार पुढे निघून गेला आहे हे निश्चित…. पण अर्थातच हे सारे खरोखर प्रामाणिकपणे करावयाचे असेल तर, एक प्रकारची आंतरिक परिपक्वता आवश्यक आहे. तुम्ही तुमच्यासाठी हा कार्यक्रम निर्धारित करू शकता.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 97-98)