Posts

मी आंतरिक सत्य, प्रकाश, सुमेळ आणि शांती यांचे काहीएक तत्त्व, पृथ्वीचेतनेमध्ये आणू पाहत आहे. उर्ध्वस्थित असलेले ते मला दिसत आहे आणि ते काय आहे हे मला माहीत आहे. जाणिवेमध्ये उतरू पाहणारी त्याची तेज:प्रभा मी सातत्याने अनुभवत आहे.

आज मानवाची प्रकृती अर्धप्रकाश, अर्धअंधकार अशा दशेत आहे; त्याने त्याच दशेमध्ये राहण्यापेक्षा, मानवाने समग्र अस्तित्वच, त्या सत्य-तत्त्वाने स्वत:च्या अंगभूत शक्तीमध्ये सामावून घ्यावे आणि त्या सत्य-तत्त्वाला हे शक्य व्हावे म्हणून मी झटत आहे. या पृथ्वीवरील अंतिम उत्क्रांती असे जिला म्हणता येईल, अशी उत्क्रांती म्हणजे दिव्य चेतनेचा विकास; आणि तो विकास घडून येण्यासाठीचा मार्ग या सत्य-तत्त्वाच्या अवतरणाने खुला होईल, अशी मला खात्री आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 35 : 281)

जर उत्क्रांती हे सत्य असेल; ती जीवजातांची केवळ शारीरिक उत्क्रांती नसेल, पण जर का ती चेतनेची उत्क्रांती असेल, तर ती केवळ भौतिक वस्तुस्थिती असू शकत नाही, ती आध्यात्मिकच असावयास हवी. अशा परिस्थितीत, व्यक्तीच उत्क्रांत होते, अधिकाधिक विकसित आणि पूर्ण जाणिवसंपन्नतेमध्ये वृद्धिंगत पावत जाते आणि अर्थातच ही गोष्ट माणसाच्या एका तोकड्या जीवनामध्ये घडून येणे शक्य नाही.

जाणीवयुक्त व्यक्तीची उत्क्रांती जर व्हावयाची असेल तर, त्यासाठी पुनर्जन्म आवश्यकच आहे. पुनर्जन्म ही तार्किकदृष्ट्या आवश्यक गोष्ट आहे आणि ती अशी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे की जिचा आपण अनुभव घेऊ शकतो. पुनर्जन्माचे पुरावे, कधीकधी तर अगदी खात्रीलायक पुरावे आढळतात, त्यांचा तुटवडा नाही पण एवढेच की, आजवर त्यांच्या काळजीपूर्वक नोंदी झालेल्या नाहीत आणि त्या आजवर एकत्रित केल्या गेलेल्या नाहीत.

– श्रीअरविंद

सद्यस्थितीमध्ये, मानवाचे जीवन हे बुद्धीने शासित केले जात आहे; मनाच्या सर्व कृती, हालचाली त्याला नेहमीच्या उपयोगाच्या अशा आहेत; निरीक्षण व अनुमान ही त्याच्या ज्ञानाची साधने आहेत; तो त्याच्या तर्कबुद्धीच्या आधारे जीवनातील निर्णय घेतो, मार्गाची निवड करतो. किंवा तो तर्कबुद्धीच्या आधारे तो तसे करतो, अशी त्याची समजूत असते.

परन्तु नवीन वंश हा मात्र अंतर्ज्ञानाने, म्हणजेच आंतरिक दिव्य कायद्याच्या थेट बोधाने शासित होईल. ही अंतर्ज्ञानशक्ती काही माणसांना खरंतर माहीत असते, आणि तिचा त्यांनी अनुभवदेखील घेतलेला असतो. ज्याप्रमाणे, मानवाच्या उदयापूर्वी जंगलातील काही ठरावीक अशा मोठ्या गोरिलांना निश्चितपणे तर्कबुद्धीची झलक दिसलेली होती, त्याप्रमाणे काही माणसांना ही अंतर्ज्ञानशक्ती माहीत असते, आणि तिचा त्यांनी अनुभवदेखील घेतलेला असतो. ज्यांनी आपला अंतरात्मा विकसित केलेला आहे, ज्यांनी आपल्या अस्तित्वाचा खरा कायदा काय, ह्याच्या शोधासाठी आपल्या ऊर्जा एकवटलेल्या आहेत, मानववंशातील अशा अगदी काही मोजक्याच व्यक्तींमध्ये अंतर्ज्ञानाची कमीअधिक शक्ती आढळते.

जेव्हा मन पूर्णपणे शांत असते, एखाद्या घासूनपुसून चकचकीत केलेल्या आरशाप्रमाणे स्वच्छ असते, वाराविरहित दिवशी असलेल्या निस्तरंग तळ्याप्रमाणे जेव्हा मन निस्तरंग असते तेव्हा, ज्याप्रमाणे, त्या पाण्यामध्ये वरून चांदण्यांचा प्रकाश पडतो, त्याप्रमाणे अतिमानवाचा, आंतरिक सत्याचा प्रकाश निश्चल मनाला उजळवून टाकतो आणि त्यातून अंतर्ज्ञानाचा उदय होतो. शांतीमधून येणारा हा आवाज ऐकण्याची ज्यांना सवय आहे, अशा व्यक्ती त्याकडे आपल्या कृतींचा प्रेरक प्रारंभ म्हणून पाहतात. जेव्हा इतर सर्वसामान्य माणसं बुद्धीच्या जटिल मार्गांवरून इतस्ततः भटकत राहतात, तेव्हा अशा व्यक्ती मात्र अंतर्ज्ञानाच्या साहाय्याने, या सरस उपजतप्रेरणेच्या साहाय्याने, जीवनाच्या वळणावळणाच्या मार्गावरून सरळ पुढे जातात; जणूकाही त्यांना सामर्थ्यवान आणि अमोघ अशा हातांकडून मार्गदर्शन मिळत असावे.

ही जी आत्ता अपवादात्मक आणि असामान्य वाटणारी अशी क्षमता आहे, ती उद्याच्या मानवासाठी, येणाऱ्या नवीन प्रजातीसाठी, नूतन वंशासाठी अगदी सर्वसामान्य आणि स्वाभाविक असेल. पण कदाचित त्याचा सातत्यपूर्ण वापर हा बौद्धिक क्षमतांना बाधक ठरू शकेल. ज्याप्रमाणे माकडाकडे असलेल्या आत्यंतिक शारीरिक क्षमता ह्या माणसांमध्ये आढळत नाहीत, त्याचप्रमाणे मानवाकडे असलेली आत्यंतिक मानसिक क्षमता, अतिमानवाने गमावलेली असेल.

आजवर मानवाने जे काही विकसित केले आहे, – अगदी त्यामध्ये, जिच्या बद्दल त्याला सार्थ आणि तरीही उगीचच अभिमान असतो अशी बुद्धीदेखील आली; – ते सारे आता त्याला पुरेसे वाटत नाही, असे जाहीर करण्याचे धाडस जेव्हा मानव करेल आणि त्याच्या अंतरंगांत असलेल्या महत्तर शक्ती खुल्या करणे, त्यांचे अनावरण करणे, त्या बाहेर काढणे, हाच जेव्हा त्याचा मोठ्यातला मोठा उद्यम होईल, तेव्हा मानवाचा अतिमानत्वाकडे जाणारा मार्ग खुला होईल.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 163-64)

आपण हे आधीच पाहिले आहे की, एका नवीन प्रजातीचा उदय ही नेहमीच या पृथ्वीवर एका नवीन तत्त्वाच्या, चेतनेच्या एका नवीन पातळीच्या, एका नव्या शक्तीच्या वा सामर्थ्याच्या आविष्करणाची घोषणा असते. पण त्याच वेळी, ही नवी प्रजाती, जेव्हा आजवर आविष्कृत न झालेली शक्ती वा चेतना प्राप्त करून घेते, तेव्हा ती तिच्या अगदी लगतच्या आधीच्या प्रजातीची वैशिष्ट्ये म्हणून गणल्या जाणाऱ्या एक वा अनेक निपुणता, सिद्धी, संपदा (perfections) गमावून बसण्याची शक्यता असते.

उदाहरणादाखल, प्रकृतीच्या विकसनाची अगदी अलीकडची पायरी पाहू. मनुष्य आणि त्याच्या निकटचा पूर्ववर्ती असणारा वानर ह्यामधील लक्षणीय फरक कोणते आहेत? आपल्याला माकडांमध्ये पूर्णत्वाच्या जवळ जाणारी शारीरिक क्षमता आणि प्राणशक्ती आढळून येते; त्या निपुणतेचा नव्या प्रजातीमध्ये (माणसामध्ये) त्याग करावा लागला आहे. माणसामध्ये, आता झाडांवर ते सरासरा चढणे नाही, डोंगरदऱ्यांमधून केलेल्या कसरती नाहीत, या कड्यावरून त्या कड्यावर मारलेल्या उड्या नाहीत; पण त्या बदल्यात त्याला बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, समन्वयाची, निर्मितीची शक्ती लाभलेली आहे. माणसाच्या आगमनाबरोबर या पृथ्वीवर मनाच्या, बुद्धीच्या जीवनाचा उदय झाला.

माकडामध्ये ज्याप्रमाणे मानसिक क्षमता सुप्तावस्थेत असतात त्याप्रमाणेच, मनुष्य हा मूलत: मनोमय जीव असल्यामुळे, जर त्याच्या शक्यता मनोमयापाशीच विराम न पावता, त्याला स्वत:मध्ये मनोमय जीवनाच्या पलीकडची इतर विश्वं, इतर क्षमता, चेतनेच्या इतर पातळ्या प्रतीत होत असतील तर, ते दुसरे तिसरे काही नसून भवितव्याचे आश्वासन असते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 162-163)

उच्चतर अशा अतिमानसिक स्थितीप्रत उत्क्रांतीला घेऊन जाणाऱ्या, अतिमानसिक किंवा विज्ञानमय जीवांचे जीवन, म्हणजे ‘दिव्य जीवन’ असे यथार्थपणे म्हणता येईल. कारण ते जीवन दिव्यत्वामधील जीवन असेल; भौतिक जीवनामध्ये आविष्कृत झालेल्या, आध्यात्मिक दिव्य प्रकाशाच्या, शक्तीच्या आणि आनंदाच्या प्रारंभाचे ते जीवन असेल. हे जीवन मानसिक मानवी पातळी ओलांडून पलीकडे जात असल्यामुळे, ‘आध्यात्मिक आणि अतिमानसिक अतिमानवाचे जीवन’ असे या जीवनाचे वर्णन करता येईल.

परंतु अतिमानवत्वाच्या भूतकालीन किंवा वर्तमान संकल्पनांशी, त्याची गल्लत करता कामा नये. कारण, आजवरच्या सर्व संकल्पना या अतिमानवत्वाबद्दल असलेल्या ‘मानसिक कल्पनां’मध्ये मोडतात.

अतिमानवत्वाच्या ‘राक्षसी’ कल्पना :

विस्तारित झालेल्या व्यक्तिमत्त्वाच्या साहाय्याने, सामान्य मानवी पातळी ओलांडून वर जाणे, केवळ प्रतलाच्या दृष्टीनेच नव्हे तर, एकाच प्रतलावरील श्रेणींमध्येसुद्धा मानवी पातळी ओलांडून जाणे; पुष्ट झालेला आणि अतिशयोक्त अहंकार, मनाची वाढलेली शक्ती, प्राणिक शक्तीची वाढलेली ताकद, मानवी अज्ञानाच्या शक्तींचे अधिक सुधारित किंवा सघन आणि प्रचंड अतिशयोक्त असे रूप या साऱ्याचा समावेश अतिमानवत्वाच्या या ‘मानसिक’ कल्पनांमध्ये होतो. या गोष्टींप्रमाणेच, मानवावर अतिमानवाने बलपूर्वक वर्चस्व गाजविण्याची कल्पना देखील सामान्यतः यामध्ये अंतर्भूत केली जाते. परंतु, ही तर अतिमानवत्वाची नित्शेची (जर्मन तत्त्वज्ञ) संकल्पना ठरेल. फारफार तर त्यातून, (नित्शेने वर्णन केलेल्या) गोऱ्या कातडीच्या पशुचे किंवा काळ्या पशुचे किंवा कोणत्याही आणि सर्वच पशुंचे राज्य; एक प्रकारे, रानवट ताकदीकडे, बळाकडे आणि क्रौर्याकडे परतणे असा अर्थबोध होईल. परंतु मग ही उत्क्रांती असणार नाही; तर ते पुन्हा एकदा जुन्या आवेशयुक्त क्रूराचाराकडे वळणे ठरेल.

अन्यथा, मानवाचे स्वतःला ओलांडून, स्वतःच्या अतीत जाण्याचे जे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत, त्या प्रयत्नामधून राक्षसाचा किंवा असुराचा उदय होण्यामध्ये त्याची परिणती होईल. मानवत्वाला
ओलांडण्याचे, त्याच्या अतीत जाण्याचेच प्रयत्न पण चुकीच्या दिशेने झालेले प्रयत्न असे त्याचे वर्णन करावे लागेल. स्वतःच्या तृप्तीसाठी, आत्यंतिक जुलमी किंवा अराजक शक्ती पणाला लावणारा, अत्यंत हिंसक आणि शिरजोर झालेला, मदोन्मत्त झालेला प्राणिक अहंकार, अशी ही अतिमानवाची ‘राक्षसी कल्पना’ ठरेल. परंतु महाकाय, पिशाच्च किंवा जगाचे भक्षण करणारा, राक्षस, जरी आजही अस्तित्वात असला, तरी तो गतकालीन युगधर्माचा भाग आहे. अशा प्रकाराचा मोठ्या प्रमाणावर उदय होणे म्हणजे सुद्धा प्रतिगामी उत्क्रांती ठरेल.

अतिमानवात्वाची ‘आसुरी’ कल्पना :

उग्र शक्तीचे प्रचंड प्रदर्शन, आत्म-जयी, आत्मधारक, अगदी ती तपस्व्याची आत्म-नियंत्रित मनःशक्ती आणि प्राणशक्ती का असेना, सामर्थ्यशाली, शांत किंवा थंड किंवा एकवटलेल्या ताकदीमुळे दुर्जयी झालेला, सूक्ष्म, वर्चस्ववादी, एकाच वेळी मानसिक व प्राणिक अहंकाराही उंचावलेला – हा अतिमानवात्वाचा ‘आसुरी’ प्रकार ठरेल.

परंतु भूतकाळामध्ये पृथ्वीने असे प्रकार पुरेसे अनुभवले आहेत आणि त्यांची पुनरावृत्ती करणे म्हणजे जुन्याच गोष्टी लांबविण्यासारखे होईल. या असुरांकडून किंवा राक्षसांकडून, तिला स्वतःच्या अतीत होण्याची कोणतीही शक्ती, तिच्या भविष्यासाठी खराखुरा लाभ होईल अशी कोणतीही शक्ती मिळण्याची शक्यता नाही. अगदी त्यातील महान किंवा असामान्य शक्तीसुद्धा पृथ्वीला केवळ तिच्या जुन्या कक्षेमध्येच अधिक विस्तृत परिघातच फिरवत राहतील. परंतु, आता जे उदयाला यावयास हवे ते अधिक कठीण पण अधिक सहज असे काही असावयास हवे.

खरे अतिमानवत्व :

तो आत्मसाक्षात्कार झालेला एक जीव असेल, आध्यात्मिक स्वची बांधणी झालेला जीव असेल, त्यामध्ये आत्माची प्रेरणा, आणि आत्म्याची गहनता असेल, त्यामध्ये त्याच्या प्रकाश, शक्ती आणि सौंदर्याची मुक्ती आणि सार्वभौमता असेल. तो मानवतेवर मानसिक आणि प्राणिक वर्चस्व गाजवू पाहणारा अहंकारी अतिमानव असणार नाही. अशा जीवाची स्वतःच्याच साधनांवर आत्मशक्तीची प्रभुता असेल. त्याचा स्वतःचा स्वतःवर ताबा असेल आणि आत्मशक्तीच्या योगे त्याचे जीवनावर प्रभुत्व असेल. उदयाला येण्यासाठी धडपडू पाहणाऱ्या दिव्यत्वेच्या प्रकटीकरणाद्वारे, एका नवीनच चेतनेच्या योगे, की ज्यामध्ये खुद्द मानवतेलाच, स्व-अतीत होणे गवसू शकेल; तिला आत्मपरिपूर्ती लाभू शकेल अशा एका चेतनेच्या योगे, त्याचे स्वतःवर आणि जीवनावर प्रभुत्व असेल. हेच एकमेव खरे अतिमानवत्व असेल आणि प्रकृतीच्या उत्क्रांतीमधील शक्यतेच्या कोटीतील हे एक खरेखुरे पुढचे पाऊल असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 22 : 1104 -1105)

अतिमानवतेविषयीचे गैरसमज : अतिमानवाच्या ध्येयाविषयी अलीकडेच लोकांचे विशेष लक्ष वेधले जाऊ लागले आहे. त्यामध्ये निष्फळ चर्चेचाच भाग अधिक आहे आणि मोठ्या प्रमाणात कुचेष्टेचा सूर आहे. सर्वसामान्य माणसांमध्ये त्याबद्दल एक प्रकारची अढी असणे स्वाभाविकच आहे, कारण त्यांना असे सांगण्यात आले आहे किंवा त्यापाठीमागे अशी एक छुपी जाणीव आहे की, जेथवर बहुसंख्य लोक जाऊन पोहोचण्यासाठी सक्षम नाहीत, अशा उंचीवर आम्ही काही थोडे जणच चढू शकतो; नैतिक आणि आध्यात्मिक विशेषाधिकार आमच्याकडे एकवटलेले आहेत; प्रसंगी मानवजातीच्या स्वातंत्र्यावर गदा आणू शकतील आणि मानवाच्या विस्मृत सन्मानाला हानिकारक ठरू शकेल असे वर्चस्व भोगण्याचा आम्हाला अधिकार आहे; इतकी सत्ता आमच्या हाती एकवटली आहे आणि त्यांचा उपभोग घेण्याचा आम्हाला विशेषाधिकार आहे, असा काही जण दावा करीत असतात. तसे पाहिले तर मग, सामान्यत: मानवी गुणांच्या आधारावर, जो अहंकार फुलतो, त्यालाही मागे टाकणारा, अतिमानवपणा हा एक प्रकारचा एक विरळा किवा एकमेवाद्वितीय असा अहंकारच आहे, त्यापेक्षा अधिक काही महत्त्वाची गोष्ट नाही, असा समज होईल. परंतु ही मांडणी खूप संकुचित आहे; किंबहुना ते एक प्रकारचे विडंबन आहे असे म्हणावे लागेल.

अतिमानवतेचे सत्य : वास्तविक, खऱ्याखुऱ्या अतिमानवतेचे पूर्णसत्य आपल्या प्रागतिक मानववंशाला एक उदार ध्येय पुरविते; पण त्याचे पर्यवसान एखाद्या वर्गाच्या किंवा काही व्यक्तींच्या उद्दाम दाव्यामध्ये होता कामा नये.

निसर्गाच्या विचारमग्नतेचा परिणाम म्हणून विश्व-संकल्पनेचा जो सातत्यपूर्ण चक्राकार विकास चालू आहे त्यामध्ये, मानवाच्या पुढची जी अधिक श्रेष्ठ अशी श्रेणी उत्क्रांत होणार आहे, तिचे अर्धेमुर्धे दर्शन आधीच झालेले आहे.

आपल्याहून अधिक श्रेष्ठ अशी जी प्रजाती उत्क्रांत व्हावयाची आहे त्यामध्ये स्वत:हून जाणिवपूर्वकतेने सहभागी व्हायची हाक आजवर या पार्थिव जीवनाच्या इतिहासात कोणत्याही प्रजातींना आलेली नाही, किंवा तसे करण्याची आकांक्षाही कोणी आजवर बाळगली नाही. मानवाला मात्र ही हाक आलेली आहे.

ह्या (अतिमानवाच्या) संकल्पनेचा आपण जेव्हा विचार करू लागतो, तेव्हा लक्षात येते की, आपल्या मानववृद्धीच्या भूमीमध्ये, विचाराच्या माध्यमातून, जेवढे सकस बियाणे पेरणे शक्य होते, त्यापैकी सर्वात जास्त सकस बियाणे ते हेच; ही संकल्पना हेच ते सकस बियाणे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 151)

कनिष्ठ प्रतीच्या मानवप्रजातीमध्ये मनाकडून प्राणाकडे व शरीराकडे असे अधोमुखी गुरुत्वाकर्षण असते.

साधारण प्रतीच्या मानवप्रजातीचा मुक्काम हा, प्राण व शरीराने मर्यादित केलेल्या आणि त्यांच्याकडेच लक्ष ठेवून असणाऱ्या अशा मनामध्ये असतो.

सरस अशी मानवप्रजाती ही आदर्शवत् मनोवस्थेकडे, किंवा एखाद्या विशुद्ध संकल्पनेकडे, ज्ञानाच्या साक्षात् सत्याकडे आणि अस्तित्वाच्या उत्स्फूर्त सत्याप्रत उत्थापित होते.

परमोच्च मानवप्रजाती ही दिव्य परमानंदाप्रत उन्नत होते आणि तेथून ती त्याहून वर असलेल्या केवल सत् अणि परब्रह्माकडे ऊर्ध्वगामी होते अन्यथा, तिच्या कनिष्ठ सदस्यांना हा परमानंद लाभावा; तसेच स्वत:ला आणि मानवी जीवनातील इतरांना हे दिव्यत्व लाभावे म्हणून कार्यरत राहते.

ज्याने कनिष्ठ आणि वरिष्ठ गोलार्धामध्ये असलेला पडदा भेदला आहे; जो मानव त्याच्यामध्ये सद्यस्थितीत गुप्त असलेल्या उच्चतर वा दिव्य गोलार्धात वसती करतो, तो खरा अतिमानव आहे आणि तो या विश्वामधील क्रमश: होणाऱ्या ईश्वराच्या आत्माविष्करणाची शेवटची उत्पत्ती असेल; जडामधून चेतनेचा उदय होण्याची, ज्याला आज उत्क्रांतितत्त्व म्हणून संबोधले जाते त्याची ही शेवटची उत्पत्ती असेल.

या दिव्य अस्तित्वामध्ये, शक्तीमध्ये, प्रकाशामध्ये, आनंदामध्ये उन्नत होणे आणि त्याच्या साच्यामध्ये सर्व सांसारिक (mundane) अस्तित्व पुन्हा ओतणे, ही धर्माची सर्वोच्च अशी आकांक्षा आहे आणि हेच योगाचे व्यावहारिक ध्येय आहे. विश्वामध्ये ईश्वराचा साक्षात्कार घडविणे हे उद्दिष्ट आहे पण विश्वातीत असलेल्या ईश्वराचा साक्षात्कार झाल्याशिवाय, ते साध्य होऊ शकत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 102)

मनुष्य हा एक संक्रमणशील जीव आहे, तो अंतिम नव्हे; कारण त्याच्यामध्ये आणि त्याच्या पलीकडे आरोहण करणाऱ्या अशा कितीतरी तेजोमय श्रेणी आहेत की, ज्या दिव्य अतिमानवतेकडे चढत जातात.

मनुष्याकडून अतिमानवाप्रत पडणारे हे पाऊल म्हणजे पृथ्वीच्या उत्क्रांतीतील येऊ घातलेली पुढची उपलब्धी आहे. तीच आमची नियती आहे आणि आमच्या अभीप्सा बाळगणाऱ्या पण त्रस्त व मर्यादित मानवी अस्तित्वाला मुक्त करणारी किल्लीदेखील तीच आहे. – हे अटळ आहे कारण ते आंतरिक आत्म्याचे प्रयोजन आहे आणि त्याचवेळी ते प्रकृतीच्या व्यवहाराचे तर्कशास्त्र आहे.

जडभौतिकामध्ये आणि पशु जगतामध्ये मानवाच्या उदयाची शक्यता प्रकट झाली; ती दिव्य प्रकाशाच्या आगमनाची पहिलीवहिली चमक होती – जडामधून जन्मास येणाऱ्या देवत्वाची ती पहिली दूरस्थ सूचना होती. मानवी जगतामध्ये अतिमानवाचा उदय ही त्या दूरवर चमकणाऱ्या वचनाची परिपूर्ती असेल.

वनस्पती आणि प्राणी यांच्या जाणिवेच्या दृष्टीने, विचारी मन हे जेवढे पल्याडचे होते; तेवढेच अंतर मानवाचे मन आणि अतिमानवी चेतना यांमध्ये असेल. मानव आणि अतिमानव यांतील फरक हा मन आणि जाणीव यांमधील फरक असेल. माणसाचे व्यवच्छेदक लक्षण (त्याला प्राणीजगतापासून वेगळे करणारे लक्षण) जसे मन हे आहे, तसे अतिमानवाचे व्यवच्छेदक लक्षण (त्याला मानवापासून वेगळे करणारे लक्षण) अतिमन किंवा दिव्य विज्ञान हे असणार आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 157)

या जगताच्या दृश्यमानतेच्या पाठीमागे अस्तित्वाची आणि चेतनेची एक वास्तविकता आहे; सर्व गोष्टींमागे एकच शाश्वत आत्मा आहे, अशी शिकवण ज्या प्राचीन ऋषीमुनींची आहे, त्या ऋषीमुनींच्या शिकवणुकीपासून श्रीअरविंदांच्या शिकवणुकीचा प्रारंभ होतो. सर्व अस्तित्वं वस्तुतः त्या ‘एका’ आत्म्यात, चैतन्यात संघटित आहेत पण चेतनेच्या विशिष्ट विलगीकरणामुळे तसेच स्वत:च्या खऱ्याखुऱ्या आत्म्याविषयी आणि मन, प्राण, देह यांतील वास्तविकतेविषयी असलेल्या अज्ञानामुळे ती अस्तित्वं विभागली गेली आहेत. एका विशिष्ट अशा मानसिक शिस्तीद्वारे हा विभक्त जाणिवेचा पडदा दूर करणे आणि खऱ्याखुऱ्या आत्म्याची, स्वत:मधील व सर्वांमधील दिव्यत्वाची जाणीव होणे शक्य आहे. Read more

मी आंतरिक सत्य, प्रकाश, सुमेळ आणि शांती यांचे काहीएक तत्त्व, पृथ्वीचेतनेमध्ये आणू पाहत आहे. मला ते वर दिसत आहे आणि ते काय आहे हे मला माहीत आहे. जाणिवेमध्ये उतरू पाहणारी त्याची तेज:प्रभा मी सातत्याने अनुभवत आहे. आज मानवाची प्रकृती अर्धप्रकाश, अर्धअंधकार अशा दशेत आहे; त्याने त्याच दशेमध्ये राहण्यापेक्षा, मानवाचे समग्र अस्तित्वच, त्या सत्य-तत्त्वाने स्वत:च्या अंगभूत शक्तीमध्ये सामावून घ्यावे, हे त्या सत्य-तत्त्वाला शक्य व्हावे म्हणून मी झटत आहे. या पृथ्वीवरील अंतिम उत्क्रांती असे जिला म्हणता येईल, अशी उत्क्रांती म्हणजे दिव्य चेतनेचा विकास; तो विकास घडून येण्यासाठीचा मार्ग या सत्य-तत्त्वाच्या अवतरणाने खुला होईल, अशी मला खात्री आहे.

-श्रीअरविंद
(CWSA 35 : 281)