श्रीमाताजी : मी सतत तुमच्या सोबत असते आणि या आंतरिक ‘उपस्थिती’विषयी जागृत होणे हा साधनेमधील सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही ‘क्ष’ला विचारा, तो तुम्हाला सांगेल की ही ‘उपस्थिती’ हा काही केवळ श्रद्धेचा विषय किंवा केवळ मानसिक कल्पनेचा खेळ नाही, तर ती अतिशय सघन अशी वस्तुस्थिती आहे, आणि चेतनेसाठी ती अगदी एखाद्या जडभौतिक गोष्टीप्रमाणे खरीखुरी आणि इंद्रियगम्य असते.

*

साधक : ज्याच्यामुळे मला ईश्वरी ‘उपस्थिती’ची जाणीव सदासर्वदा आणि सर्वत्र होईल अशा प्रकारच्या ईश्वरी ‘प्रेमा’चा उगम मी कोठे व कसा शोधू?

श्रीमाताजी : त्यासाठी तुम्ही आधी ‘ईश्वरा’चा शोध घेतला पाहिजे, एकतर तो शोध तुम्ही आंतरिकीकरणाच्या (interiorisation) आणि एकाग्रतेच्या साहाय्याने तुमच्या स्वतःमध्ये घेतला पाहिजे, किंवा तो शोध तुम्ही प्रेमाच्या आणि आत्म-त्यागाच्या माध्यमातून माझ्यामध्ये किंवा श्रीअरविंदांमध्ये घेतला पाहिजे. एकदा का तुम्हाला ‘ईश्वरा’चा शोध लागला की मग अगदी स्वाभाविकपणे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये, सर्वत्र त्याचेच दर्शन घडू लागेल.

*

‘ईश्वरा’शी ऐक्य पावण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे हृदयामध्ये चित्त एकाग्र करायचे आणि ‘त्या’च्या ‘अस्तित्वा’चा शोध लागेपर्यंत अंतरंगामध्ये, आत आत खोलवर जायचे. आणि दुसरा मार्ग म्हणजे ‘ईश्वरा’च्या हाती स्वतःला सोपवून द्यायचे, आणि आईच्या कुशीत जसे लहानगे मूल विसावते तसे त्याच्या कुशीमध्ये, संपूर्ण समर्पणाच्या भावनेने विसावायचे. आणि या दोन मार्गांपैकी दुसरा मार्ग मला स्वतःला अधिक सोपा वाटतो.

– श्रीमाताजी [CWM 16 : 160-161]

ज्या ‘ईश्वरा’च्या प्राप्तीची आपण इच्छा बाळगतो तो कोणी दूरस्थ आणि अप्राप्य नाही. ‘तो’ त्याच्या स्वनिर्मित सृष्टीच्या अंतस्थ गाभ्यात विद्यमान आहे आणि आपल्याकडून ज्या कृतीची त्याला अपेक्षा असते ती कृती म्हणजे ‘त्या’चा शोध. तसेच आपल्या व्यक्तिगत रूपांतरणाच्या साहाय्याने ‘त्या’ला जाणण्यास, ‘त्या’च्याशी एकत्व पावण्यास, आणि अखेरीस जाणीवपूर्वक ‘त्या’ला अभिव्यक्त करण्यास आपण समर्थ बनणे ही होय. याच गोष्टीसाठी आपण स्वतःला समर्पित केले पाहिजे, हेच आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन आहे. आणि या श्रेष्ठ साक्षात्काराच्या दिशेने पडणारे आपले पहिले पाऊल म्हणजे अतिमानसिक ‘चैतन्या’चे आविष्करण.

– श्रीमाताजी [CWM 13 : 347]

आपल्या अंतरंगातील ‘देवता’ कधीही सक्ती करत नाही. कोणतीही मागणी करत नाही किंवा भयदेखील दाखवीत नाही; ती स्वत:चेच आत्मदान करते, प्राणिमात्र आणि वस्तुजात यांच्या हृदयांमध्ये ती स्वत:ला झाकून घेते आणि ती त्यांच्यामध्ये स्वत:ला विसरून जाते. ती कोणाला दोष देत नाही, की गुणदोषांचे मापन करत बसत नाही. कोणास शाप देत नाही की कोणाची निंदाही करत नाही. तर ती देवता, निर्बंधरहित पूर्णत्व आणण्याचे, कानउघडणी न करता सुधारणा घडवून आणण्याचे, उतावीळपणा न करता प्रोत्साहित करत राहण्याचे कार्य अथकपणे करत राहते. व्यक्तीच्या ग्रहणशीलतेनुसार प्रत्येक व्यक्तीला वैभवसंपन्न करण्यासाठी ती अथकपणे झटत राहते. ती माऊली आहे. तिच्या प्रेमरूपी फळांकरवी ती भरणपोषण करते; सांभाळ करते आणि रक्षण करते; सल्ला देते व सांत्वन करते; कारण ती सर्वकाही जाणते, ती सर्वकाही सहन करू शकते, ती सर्वांच्या चुका पदरात घेते व क्षमा करते; सर्वांविषयी आशा बाळगते आणि सर्वांना सर्व गोष्टींसाठी सुसज्ज करते.

– श्रीमाताजी [CWM 02 : 42-43]

व्यक्तीमधील ‘आत्मा’ आणि वैश्विक ‘आत्मा’ हे एकच आहेत; प्रत्येक विश्वामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वस्तुमध्ये, प्रत्येक कणामध्ये दिव्य अस्तित्व आहे आणि त्याचे आविष्करण करणे हे माणसाचे जीवितकार्य आहे. ते कार्य करण्यासाठी व्यक्तीला आधी त्याच्या अंतरंगात असणाऱ्या या ‘ईश्वरी अस्तित्वा’ची जाणीव झाली पाहिजे. …एकदा का ही सखोल चेतना प्राप्त करून घेतली की मग मात्र आपली भूमिकाच बदलून जाते. त्यामुळे आपले आकलन व्यापक होते, आपल्यामध्ये करूणेचा उदय होतो.

– श्रीमाताजी [CWM 02 : 41-42]

स्वत:ला समजून घेतल्याने आणि स्वत:ला कसे जाणून घ्यायचे हे शिकल्यामुळे माणूस परमशोध लावू शकतो. जेव्हा भौतिकाच्या प्रत्येक कणाकणामध्ये माणसाला ‘ईश्वरा’च्या या अधिवासाची जाणीव होईल, प्रत्येक प्राणिमात्रामध्ये त्याला ‘ईश्वरा’च्या अस्तित्वाची काही झलक मिळू शकेल, जेव्हा प्रत्येक माणूस त्याच्या बांधवांमध्ये ‘ईश्वरा’ला पाहू शकेल तेव्हा अरुणोदय होईल, तेव्हा या समग्र प्रकृतीला भारभूत झालेले अज्ञान, मिथ्यत्व, दोष, दुःखभोग, अंधकार भेदले जातील. कारण “समग्र प्रकृती सहन करत आहे आणि शोक करत आहे, ती ‘ईश्वरपुत्रांना’ (मनुष्याला) साक्षात्कार कधी होणार याची वाट पाहत थांबली आहे.” हा एक असा मध्यवर्ती विचार आहे की जो इतर सर्व विचारांचे प्रतिनिधित्व करतो; सूर्य ज्याप्रमाणे सर्व जीवन उजळवून टाकतो तसा हा विचार कायम आपल्या स्मरणात असला पाहिजे. एखाद्या दुर्मिळ रत्नाप्रमाणे, खूप मौल्यवान खजिना असल्याप्रमाणे आपण आपल्या हृदयात या विचाराची जपणूक करून, त्यानुसार मार्गक्रमण केले आणि त्या मध्यवर्ती विचाराला त्याचे ज्योतिर्मय करण्याचे व रूपांतरण करण्याचे कार्य आपल्यामध्ये करू देण्याची मुभा दिली तर आपल्याला हे कळू शकेल की, सर्व वस्तुमात्रांच्या आणि प्राणिमात्रांच्या अंतर्यामी ‘तो’च राहतो आणि ‘त्या’च्या मध्येच या विश्वाचे अद्भुत एकत्व आपण अनुभवू शकतो. तेव्हा मग आपल्याला आपली मूर्ख भांडणे, आपल्या छोट्याछोट्या इच्छावासना, आपले अंध रोष, किरकोळ समाधानांमधील बालीशपणा आणि फोलपणा लक्षात येईल. आपल्यातील छोटेछोटे दोष विरघळून जात आहेत, आपल्या संकुचित व्यक्तिमत्त्वाची तटबंदी आणि आपला आडमुठा अहंकार कोसळून पडत आहे असे आपल्याला दिसेल. आपल्या संकुचित मर्यादा आणि बंध यांनी बांधलेल्या अस्तित्वापासून आपली सुटका करत, खऱ्याखुऱ्या आध्यात्मिकतेच्या या उदात्त प्रवाहामध्ये आपले अस्तित्व प्रवाहित होत आहे असे आपल्याला जाणवेल.

– श्रीमाताजी [CWM 02 : 40-41]

एखादा माणूस जेव्हा ‘दिव्यत्वा’ला गवसणी घालू पाहतो, तेव्हा तो अप्राप्याच्या (inaccessible) दिशेने कलेकलेने उन्नत होत जाण्याची धडपड करू लागतो, त्यावेळी तो हे विसरून जातो की, त्याच्याकडे असलेला सर्व ज्ञानसंचय आणि त्याच्याकडे असणारे अगदी अंतर्ज्ञानदेखील त्या अनंताच्या दिशेने जाण्याच्या वाटेवरील एक पाऊलसुद्धा नसते. तसेच जे प्राप्त करण्याची इच्छा तो बाळगत आहे, जे त्याच्यापासून कित्येक योजने दूर आहे असे त्याला वाटत असते, ते त्याच्या स्वत:च्याच अंतरंगामध्ये असते, हे सुद्धा त्याला माहीत नसते. जोपर्यंत स्वत:मध्ये असलेल्या या ‘आद्या’विषयी (origin) तो जागृत होत नाही तोवर माणसाला विश्वाच्या ‘आद्या’विषयी ज्ञान कसे बरे होईल?

– श्रीमाताजी [CWM 02 : 40]

व्यक्तीमध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्व नसते, व्यक्तीच्या गाभ्यामध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्वच नसते, तर व्यक्तीला ‘ईश्वरा’ची जाणीव कधीच होऊ शकली नसती, ती एक अशक्यप्राय गोष्ट ठरली असती. …तुमच्या अंतरंगामध्ये ‘ईश्वर’ आहे आणि तुम्ही ‘ईश्वरा’मध्ये आहात, हे ज्या क्षणी तुम्हाला या किंवा त्या मार्गाने आकलन होते, जाणवते, किंवा जाणवायला सुरूवात होते, आणि जेव्हा तुम्ही ते मान्य करता, तेव्हा तुमचे दार साक्षात्काराच्या दिशेने किंचितसे खुले होते, किलकिले होते. नंतर कधीतरी मग अभीप्सा निर्माण झाली, ‘ईश्वरा’ला जाणून घेण्याची आणि ‘ईश्वर’च बनण्याची तीव्र निकड निर्माण झाली तर त्यामुळे, म्हणजे त्या तीव्र निकडीमुळे, ते किलकिले झालेले दार, व्यक्तीचा आतपर्यंत शिरकाव होईल इतके खुले होते. आणि एकदा का व्यक्तीचा आत शिरकाव झाला की, व्यक्तीला ‘आपण कोण आहोत’ याची जाणीव होते.

– श्रीमाताजी [CWM 07 : 236]

भौतिक संभावनांच्या वर उठून, पुरेसे उन्नत कसे व्हायचे हे जर व्यक्तीला माहीत असेल तर, तिला या पार्थिव जीवनाकडे समग्रपणाने पाहता येते. त्या क्षणापासून हे लक्षात घेणे सोपे जाते की, आजवरचे मानवजातीचे सारे प्रयत्न हे एकाच ध्येयाच्या दिशेने चाललेले आहेत. सामूहिक रीतीने असू देत वा वैयक्तिक रीतीने असू देत, माणसं तेथपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात हे खरे आहे. त्यातील काही मार्ग हे इतके वेड्यावाकड्या वळणांचे असतात की, कधीकधी प्रथमदर्शनी ते त्या ध्येयाच्या दिशेने जाण्याऐवजी, त्या ध्येयापासून दूर गेल्यासारखेच दिसतात. परंतु सारे मार्ग जाणते वा अजाणतेपणी, कमीअधिक वेगाने एकाच दिशेने चाललेले असतात. तर मग हे ध्येय आहे तरी कोणते? तेच मानवी जीवनाचे प्रयोजन आणि या विश्वातील मानवाचे जीवितकार्य असते. हे ध्येय म्हणजे, मग तुम्ही ‘त्या’ला कोणत्याही नावाने आवाहन करा, कारण प्रज्ञावंतासाठी तो सर्वच नावांचा धारणकर्ता असतो. चिनी लोकांचा ‘ताओ’, हिंदुंचे ‘ब्रह्म’, बौद्धांचा ‘नियम’, हर्मीस लोकांच्या दृष्टीने ‘शुभ’, प्राचीन ज्यू लोकांच्या परंपरेनुसार ‘अनाम’, ख्रिश्चन लोकांचा ‘प्रभु’, मुसलमानांचा ‘अल्ला’, भौतिकतावादी दृष्टिकोन असलेल्या लोकांच्या दृष्टीने ‘न्याय, सत्य’. (अशी ध्येयाची कितीही विविध नावे असली तरी) ‘त्या’च्याबद्दल सचेत होणे हे मानवी जीवनाचे प्रयोजन आहे. ‘त्या’चे आविष्करण करणे हे मानवाचे जीवितकार्य आहे.

– श्रीमाताजी [CWM 02 : 129]

जिवाला जगदीश्वराकडे जाण्याच्या मार्गामध्ये जगत् आडवे येते, अशी पूर्वी समजूत असल्याने, जगताचा त्याग करून, दूर कोठेतरी अरण्यात राहून, उपासना करण्याकडे पूर्वीच्या योगाचा कल होता. परंतु आहे त्या जीवनात राहूनच, साधना, उपासना करता येते, नव्हे, तर ती तशीच केली पाहिजे असे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी प्रतिपादन केले. जगाला आणि जीवनाला ते आत्ता आहे त्याच स्थितीत सोडून द्यायचे आणि केवळ वैयक्तिक ‘मुक्ती’वर लक्ष केंद्रित करायचे हे ‘पूर्णयोगा’चे उद्दिष्ट नाही. तर या पार्थिव जीवनाचेच ‘दिव्य जीवना’त परिवर्तन करण्याची भूमिका ‘पूर्णयोग’ घेतो.

‘सर्व जीवन हा योगच आहे’, हे श्रीअरविंदांचे योगसूत्र आहे. आणि त्यामुळे वैयक्तिक जीवनातील किरकोळ दैनंदिन गोष्टी म्हणून एरवी ज्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असे त्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो; त्या गोष्टीसुद्धा निरीक्षणाचा, अभ्यासाचा, साधनेचा एक अविभाज्य भाग बनतात. त्या योगयुक्त होऊन कशा करायच्या, त्यासाठी मूळ भूमिकेतच कसा बदल करायचा, ‘बालक’भाव कसा धारण करायचा, कर्म करताना कोणती भूमिका असली पाहिजे, आणि मुळात जीवनच कशासाठी असते? इत्यादी मूलभूत महत्त्वाच्या प्रश्नांवर  ‘सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन’ या मालिकेतून प्रकाश टाकण्यात येणार आहे.

– संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक